आरक्षणाच्या बैलाला ऽ ऽ ऽ

त्याचं असं झालं, समाजाचं एकदमच बिनसलं
जातीपाती एकवटल्या, आरक्षणाला कंटाळून
संगनमताने सर्वांनी एकच ठराव केला संमत
आम्हाला करा ब्राह्मण, तरच सोडू आरक्षण

एकीकडे प्रत्येकाला पाहिजे होती ब्राह्मण जात
आरक्षणाच्या ठेकेदारांना पटत नव्हते अजिबात
जातीपातीच्या राजकारणाचे नेते झाले उदास
सगळेच झाले ब्राह्मण तर चालणार कसे दुकान

वाटलं होतं सुटेल पेच, पुढ्यात होती खरी मेख
ब्राह्मणात नक्की कोण, होत्या डझनभर शाखा
सगळे ब्राम्हण एकदम, आंदोलनात आले थेट
आधी सांगा कोणते ब्राह्मण, मग ठरवा कोटा

चित्पावन, देशस्थ, कऱ्हाडे की कायस्थ
सारस्वत चिडले, का आम्हाला वगळता!
सर्वात आधी ठरवा, गौड की द्राविडी
लगेचच यजुर्वेदींनी मांडल्या पोटजाती

तेवढ्यात आले देवरुखे, खोत आणि खिस्ती
सोबतीला होते कनौजी, देवेज्ञ आणि कानडी
अय्यर सरसावले तोच, नंबुद्रींचा वेगळा नारा
कोकणस्थ झाले सावध, देशस्थ उठले भराभरा

शेवटी कोटा ठरवण्यासाठी ठरली बैठक
उत्तरेतील पंचगौड, की दक्षिणेचे पंचद्रविड
नंतर मांडून पोटजाती ठरवा क्रीमी लेअर
शिक्कामोर्तब होऊन कोटा झाला सूकर

लिखित पाहिजे म्हणून ठरले एकछत्री सूत्र
तेवढ्यात आला प्रश्न, कोणतं घ्यायचं गोत्र
तयार होत्या वंशावळी, मात्र अडले सगेसोयरे
बैठक झाली सैरभैर, त्यात काही कावरेबावरे

नुसत्याच झाल्या चर्चा, वाद थोडी हमरीतुमरी
कागदोपत्री प्रत्यक्षात मात्र दिखावा एकसूरी
कोकणस्थांनी कानोसा घेऊन साधला निशाणा
आम्ही आहोत तुमच्यासोबत सांगून देशस्थांना

अय्यर लढून तीस टक्क्यांत झाले होते मातब्बर
नंबुद्रींना होता कमी वाटा तरी झाले धीरगंभीर
कनौजींचा प्रश्न मैथिल उत्कल ब्राह्मणांचं काय?
ठरलं होतं खरं, सगळे एकच ज्याला पवित्र गाय

एवढं सगळं बघत बघत आंदोलक झाले त्रस्त
जातीपातीच्या प्रश्न समस्या ह्या पेक्षा अस्तव्यस्त
म्होरक्या होता बेरकी, सोबत अनुभवी प्रशासन
आली हळूच मागणी, होऊ दे बहुजन ब्राम्हण

सगळे झाले खूष बघून नवीन होणारी शाखा
वाचल्या आपापल्या पोटजाती अन् उपशाखा
बहुजन ब्राम्हणी कुळाचार अन् रूढी, परंपरा
यांचेही झाले पाहिजे शासन नोंदणी गोषवारा

सरतेशेवटी ठरलं काढा घटनात्मक श्वेतपत्रिका
सगळ्या गोतावळ्यांनी घेतल्या आणाभाका
जे सांगू ते खरं सांगू कागदी पुराव्यानिशी नोंदवू
तडीपार करा कोणी सापडला आमच्यात भोंदू

शासकीय हस्तक्षेप होताच उभा नवीन पेचप्रसंग
घटना कलम, परिशिष्टे पारायणे झाली यथासांग
बहुजन ब्राम्हण साठी नोंदणीकृत नव्हती तरतूद
आणा दुरुस्ती विधेयक किंवा काढून वटहुकूम

पाच वर्षे सरली, अर्धवट ठेवून श्वेतपत्रिका
सर्वपक्षीय लोकांना दिसू लागल्या निवडणुका
एकाएकी घटना बदलणार, ठोकली आरोळी
चाणाक्षांनी घेतली भरून आपापली झोळी

येत्या अधिवेशनात येऊन सत्तेत दिले आश्वासन
करू नोंदणीकृत घटनात्मक बहुजन ब्राम्हण
तोवर जातीपातीच्या नेत्यांनी गाजवली भाषणं
'तरच सोडू आरक्षण' चं वाजत राहिलं तुणतुणं

© भूषण वर्धेकर
५ जूलै २०२४
पुणे

field_vote: 
0
No votes yet