ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १६

प्रकरण १६ – ॲलोपथी

सुधीर भिडे

Allopathic medicine, or allopathy, is a term used to define science-based, modern medicine. (Gale Encyclopedia of Medicine , 2008). The term was coined in 1810 by the inventor of homoeopathy, Samuel Hahnemann. It was originally used by 19th century homoeopaths as a derogatory term.

होमिओपॅथीचा जनक सॅम्युअल हाहनेमान याने त्याचे वैद्यक सोडून त्या काळात वापरात असलेल्या वैद्यकाला ॲलोपथी हे नाव दिले. हाहनेमानला त्याने शोधलेल्या वैद्यकाविषयी एवढी खात्री होती की त्याने ॲलोपथी हे नाव चेष्टा करण्यासाठी वापरले. सध्या ॲलोपथी हे नाव शास्त्रीय वैद्यकाकरता वापरले जाते. ॲलोपथी हे पूर्ण शास्त्रीय वैद्यक आहे का याचा विचार भाग १९मध्ये करू.

वैद्यकाच्या इतिहासात प्रथमच घडलेली घटना म्हणजे आज ॲलोपथी सबंध जगात सर्वमान्य झाली आहे आणि सर्व जगात याचा वापर होत आहे. याच्या आधी जगात निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या वैद्यकप्रणाली वापरात होत्या. त्यांपैकी काही अजूनही वापरल्या जातात. या लेखनाचा उद्देश या जुन्या वैद्यकीय प्रणाली आणि ॲलोपथी यांतील फरक समजावून घेणे हा आहे.

ॲलोपथीत जे बदल होतात ते सर्व जगात राबविले जातात. राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक घटकांचा या वैद्यकावर परिणाम होत नाही. कारण आजच्या युगात सर्वच राज्यकर्त्यांना आपल्या जनतेच्या आरोग्याची काळजी करावी लागते. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी सरकारवर झालेली टीका हेच दर्शविते. शास्त्रीय वैद्यकाची सतराव्या शतकात सुरुवात झाली असे मानले, आणि मनुष्याच्या उत्क्रांतीनंतर सुमारे दहा हजार वर्षांचा विचार केला तर शास्त्रीय वैद्यक अगदीच नवीन आहे असे म्हणायला पाहिजे. या आधीच्या भागांतून आपण प्राचीन वैद्यकीय प्रणालींची माहिती घेतली. या कालखंडात काही विशिष्ट वैद्यकीय प्रणाली बनल्या. ग्रीकांचे वैद्यक, भारतातील वैद्यक (आयुर्वेद), अरबांचे वैद्यक (युनानी), चिनी वैद्यक. सर्वात शेवटी होमिओपाथीचा उगम झाला. या सर्व प्रणाल्यांना मागे टाकून आता ॲलोपथी पुढे गेली आहे.

शास्त्रीय वैद्यकाची सुरुवात

शास्त्रीय वैद्यकीला चालना रेनेसान्स काळात – १४००ते १७०० – मिळाली. याच काळात प्रोटेस्टंट पंथाची सुरुवात झाली. याचा परिणाम जुन्या रूढींना आव्हान मिळण्यात झाला. व्हेसालियसने १५३७मध्ये शिस्तबद्ध रीतीने शवविच्छेदनाचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्याने रक्ताभिसरणाचा अभ्यास केला. १६२८मध्ये हृदय हा एक पंप आहे हे समजले. १६३२मध्ये सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध लागला. रसायनशास्त्रामधील प्रगती आणि मायक्रोस्कोपचा शोध या दोन गोष्टी वैद्यकातील शास्त्रीय वृत्तीला कारणीभूत झाल्या. एकोणिसाव्या शतकात शास्त्रात आश्चर्यकारक प्रगती झाली. भूल देण्याच्या शास्त्राचा (ॲनिस्थेऑलॉजी) उगम झाला. एक्स रेचा शोध लागला. १८८२मध्ये क्षय रोगाच्या सूक्ष्म जंतूंचा शोध लागला. त्याबरोबर रोग जंतूंमुळे होऊ शकतात ही कल्पना आली.

औषधे बनविणारी पहिली कंपनी हेक्स्ट जर्मनीत स्थापली गेली. या कंपनीने सुरुवातीला बाजारात आणलेली काही औषधे कंपनीला बंद करावी लागली; कारण त्या काळात औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स असा काही प्रकार नव्हता. औषधाचे परिणाम वाईट झाले तर औषध परत घ्या, असा प्रकार होता. १८९३ साली बेयर कंपनीने ॲस्पिरिन बाजारात आणले, जे अजूनही वापरले जाते. बेयरने प्रथमत: औषधांची प्राण्यांवर चाचणी करून पाहण्याची सुरुवात केली. १९२८ साली पेनिसिलीनचा शोध लागला आणि वैद्यकशास्त्राने मोठी उडी घेतली. आता जीवाणूंवर विजय मिळविणे शक्य झाले. १९५० साली औषधे बाजारात आणण्यापूर्वी रोग्यांवर चाचणी करणे ही कल्पना आली. तसे पाहिले तर ॲलोपथी अगदी नवे वैद्यक आहे. खऱ्या अर्थाने गेल्या ७०-८० वर्षांतील ही प्रगती आहे.

१९८०नंतर randomized, double blind controlled trials सक्तीच्या करण्यात आल्या. याची माहिती आपण पुढे घेऊच.

मूलभूत तत्त्वे / सिद्धांत

आपण पाहिले त्याप्रमाणे आयुर्वेदाचे काही मूलभूत सिद्धांत आहेत; उदाहरणार्थ, त्रिदोष, अग्नी कल्पना, धातू. होमिओपॅथीचेही सिद्धांत आहेत – लाइक क्युयर्स लाइक आणि पाण्याला स्मृती असते. ॲलोपथीची मूलभूत शास्त्रे आहेत ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी.

Physiology is the science of life. Research in physiology helps us to understand how the body works in health and how it responds and adapts to the challenges of everyday life; it also helps us to determine what goes wrong in disease, facilitating the development of new treatments and guidelines for maintaining human and animal health. Physiology integrates molecular, cellular, systems and whole body function. Physiology is an experimental science. Physiologists study every aspect of the way human and other animal bodies work. Some physiologists investigate the behaviour of individual proteins in single cells. Others are researching the interaction of cells in tissues, organs and systems or study the integration of these systems to control the whole complex organism. This work provides the foundation for medicine.

– Publication of Physiological Society, London

फिजिऑलॉजीचे किती महत्त्व आहे ते नोबेल पारितोषिकावरून दिसते. ज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांत नोबेल पारितोषिक दिले जाते. वैद्यकीय शास्त्रात दिल्या जाणाऱ्या पारितोषिकाचे नाव आहे – नोबेल प्राइज फॉर फिजिऑलॉजी किंवा मेडिसीन. याचा अर्थ फिजिऑलॉजीमधील संशोधन हे वैद्यकाच्या इतर सर्व शाखांएवढेच महत्त्वाचे आहे. नोबेल पारितोषिकांची यादी पाहिली तर बहुतेक पारितोषिके फिजिऑलॉजीमधील संशोधनाला दिलेली दिसतील.

ॲलोपथीत काय मूलभूत सिद्धांत आहेत? आहेत, अक्षरश: हजारो आहेत. हे सर्व सिद्धांत वर्षांनुवर्षे प्रयोग करून आणि निरीक्षणे करून सिद्ध करण्यात आले आहेत. या सर्व सिद्धांतांना सर्व जगात प्रसिद्धी देण्यात आली आहे आणि शेकडो तज्ज्ञांनी याची सत्यता पडताळून पाहिली आहे. जी प्रमेये पडताळणीत सिद्ध होऊ शकली नाहीत ती इतिहासजमा करण्यात आली. अमक्या ऋषीने हे लिहून ठेवले आहे म्हणून ते खरे असा इथे प्रकार नाही. कितीही मोठ्या डॉक्टराचे विधान चॅलेंज होऊ शकते. तसे पाहिले तर जितकी मोठी डॉक्टर तितके तिचे विधान हाणून पाडण्यासाठी नवीन डॉक्टर्स प्रयत्न करत असतात. यात त्या मोठ्या डॉक्टरांचे मोठेपण कमी होत नाही, कारण शास्त्र अशीच प्रगती करते.

याबाबतचे ॲलोपथीतील एक उदाहरण घेऊ. एक प्रमेय असे आहे की रक्तात ड जीवनसत्त्वाचे प्रमाण योग्य असले तर कॅल्शियमचे हाडांत शोषण चांगले होते. हे प्रमेय कसे सिद्ध करता येईल? पन्नास व्यक्ती निवडा ज्यांची हाडांची घनता कमी आहे. पंचवीस व्यक्तींना सहा महिने कॅल्शियमच्या गोळ्या द्या. उरलेल्या पंचवीस व्यक्तींचे ड जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढवून घ्या. त्यानंतर या पंचवीस व्यक्तींना रोज कॅल्शियम आणि ड जीवनसत्त्वाच्या गोळ्या द्या. सहा महिन्यांनंतर सर्व व्यक्तींच्या हाडांची घनता तपासा. दुसऱ्या गटातील व्यक्तींच्या हाडांची घनता सुधारलेली दिसेल. जर सुधारलेली दिसली नाही तर आपले प्रमेय चुकीचे आहे.

The Journal of General Physiology हे मासिक १९१८साली सुरू करण्यात आले. पहिले संपादक डॉ. लोएब काय लिहितात ते पहा –

The experimental biology of the cell — will have to form the basis not only of Physiology but also of General Pathology and Therapeutics.

जी गोष्ट प्रयोगाने सिद्ध होऊ शकते तीच खरी असे शास्त्र मानते.

डबल ब्लाइंड ट्रायल्स

आजच्या शास्त्रीय वैद्यकात कोणतेही नवे औषध, नवी लस, नवी चाचणी किंवा तपासणीची नव्या पद्धत यांचा वापर करण्याआधी नवे शोध एका प्रक्रियेतून जावे लागतात. या प्रक्रियेला randomized, double blind controlled trials असे नाव आहे. याचा थोडक्यात उल्लेख पहिल्या भागात झाला आहेच. कोणत्याही नव्या शोधाची चाचणी प्रथम प्राण्यांवर करण्यात येते. त्यानंतर चाचणी तीसपर्यंत रोग्यांवर करण्यात येते. जेव्हा रोग्यांवर चाचणी करण्यात येते, तेव्हा त्या रोग्यांचे दोन गट करण्यात येतात. एका गटाला सध्याचे चालू औषध देण्यात येते. दुसऱ्या गटाला नवीन शोधाचे औषध देण्यात येते. किंवा एका गटाला नवीन औषधासारखे दिसणारे पण काही दुष्परिणाम न करेल असे औषधासारखे दिसणाऱ्या गोळ्या देण्यात येतात (placebo) आणि दुसऱ्या गटाला नवीन औषध देण्यात येते. कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह होऊ नये म्हणून कोणत्या रोग्याला खरे औषध आहे आणि कोणत्या रोग्याला प्लासिबो आहे हे औषध देणाऱ्या डॉक्टरांनाही माहीत नसते. ज्यांना खरे औषध देण्यात येते त्यांना प्रमाणित केलेल्या डोसपेक्षा कमी डोस दिला जातो. या पहिल्या स्टेजचे उद्दिष्ट असते की हे पाहणे की त्या औषधाचे काही दुष्परिणाम तर होत नाहीत.

यानंतर अशाच प्रकारची चाचणी ३००पर्यंत रोग्यांवर केली जाते. या वेळेस प्रमाणित केलेला डोस दिला जातो आणि औषधाचे काय परिणाम होतात ते पाहिले जाते. त्यानंतर ही चाचणी ३००० रोग्यांवर केली जाते. प्रत्येक चाचणीचे निकाल औषध पास करणाऱ्या सरकारी खात्याला द्यावे लागतात. यानंतर औषध घेतानाची काळजी प्रसिद्ध करावी लागते. एकदा औषध विक्रीला सुरुवात झाली की परत १००० रोग्यांवर अशाच प्रकारे चाचणी केली जाते.

या चाचण्यांमध्ये जे रोगी भाग घेतात त्यांना या चाचणीची जाणीव करून द्यावी लागते आणि त्या रोग्यांची सहमती असेल तरच त्यांना चाचणीचा भाग केले जाते.

भारत सरकारने The Clinical Trials Registry- India (CTRI), बनविली आहे. इथे भारतात ज्या क्लिनिकल ट्रायल्स होतात त्या नोंदल्या जातात. The Drugs Controller General of India (DCGI) ही अधिकारी भारतातील क्लिनिकल ट्रायल्सचे नियंत्रण करते. DCGIने इथे चाचण्यांची नोंदणी अनिवार्य केली आहे. भारतातील ११ वैद्यकीय जर्नल्सनी ठरविले आहे की केवळ CTRIकडे नोंदल्या गेलेल्या चाचण्यांचे निकाल ते प्रसिद्ध करतील.

गेल्या वर्षी ICMRने क्लिनिकल ट्रायल्स करण्यासाठी देशातील प्रमुख हॉस्पिटल्सचा एक प्लॅटफॉर्म बनविला आहे ज्यायोगे विश्वासार्हपणे क्लिनिकल ट्रायल्स करता येतील. खालील आकडेवारी दाखवते की क्लिनिकल ट्रायल्स करणारा भारत हा जगातील महत्त्वाचा देश आहे.

भारतात होणाऱ्या क्लिनिकल चाचण्यांच्या जगाच्या तुलनेत हिस्सा कसा वाढता आहे, हे गेल्या दहा वर्षांच्या आकडेवारीतून पाहा :

2011 – 5.5%,
2012 – 5.5%,
2013 – 4.4%,
2014 – 4.5%,
2015 – 5.2%,
2016 – 5.8%,
2017 – 6.7%,
2018 – 7.4%,
2019 – 11 %,
2020 – 8.3%

कायदा काय म्हणतो?

भारत सरकारने अमेरिकेतील Food and Drug Administrationच्या (US FDA) धर्तीवर The Central Drugs Standard Control Organization (CDSCO) बनविली. The Drugs Controller General of India (DCGI) ही अधिकारी भारतातील क्लिनिकल ट्रायल्सचे नियंत्रण करते. नवे औषध आयात करण्यासाठी DCGIकडे अर्ज करावा लागतो. नवीन औषधासाठी भारतात क्लिनिकल ट्रायलची आवश्यकता आहे. पण बाहेरच्या देशांत क्लिनिकल ट्रायल्स झाल्या असतील तर DCGI आयात करण्यास परवानगी देऊ शकते. एखादे औषध भारतात बनवायचे असल्यास भारतात क्लिनिकल ट्रायलची आवश्यकता आहे.

शास्त्रीय वैद्यकातील संशोधन

संशोधनाचं चक्र

शास्त्रीय वैद्यकात संशोधन कसे होते ते एका उदाहरणावरून पाहू. द जर्नल ऑफ फिजिऑलॉजी हे मासिक गेली पन्नास वर्षे प्रकाशित होत आहे. जून २०२२च्या अंकात एक संशोधन प्रकाशित झाले.

संशोधकांना एक नव्या सिद्धांताचा विचार करावासा वाटला – लठ्ठ मातांच्या मुलांत हृदयरोगाचे प्रमाण जास्त असते का? प्रयोगाचे प्लानिंग झाले. प्रयोगात एकंदर पन्नास लठ्ठ मातांच्या मुलांचा अभ्यास चालू केला. प्रयोगात जी माहिती मिळाली त्याचे पृथक्करण केले. या संशोधनाची माहिती द जर्नल ऑफ फिजिऑलॉजी यांना पाठविली. संपादकांनी हे संशोधन पाच तज्ज्ञांकडे पाठविले. तज्ज्ञांनी जेव्हा सांगितले की संशोधन बरोबर झाले आहे तेव्हा ते प्रकाशित करण्यात आले.

(वरील उदाहरणात मूळ लेखाचा शब्दश: अनुवाद केलेला नाही. केवळ उदाहरण म्हणून त्याकडे पाहावे.)

या संशोधनाचा सबंध जगाला फायदा होणार हे निश्चित.

यात महत्त्वाची गोष्ट ही की संशोधन जगात कोठेही होत असते आणि ते प्रसिद्ध करणारे मासिक जगात कुठेही असू शकते. प्रत्येक विषयात काही मासिके अशी असतात की त्या मासिकात आपले संशोधन प्रसिद्ध झाले ही मानाची बाब समजली जाते.

रोगनिदान

जेव्हा आजारी व्यक्ती डॉक्टरकडे येते तेव्हा डॉक्टर त्या व्यक्तीकडून आजाराच्या लक्षणांची माहिती करून घेतात. डॉक्टर आजारी व्यक्तीची शारीरिक तपासणी करतात. त्यानंतर (कधी) आजारी व्यक्तीला काही चाचण्या करण्यास सांगितल्या जातात. आजारी व्यक्तीची विधाने, शारीरिक तपासणी आणि इतर चाचण्या यांवरून डॉक्टरांना निदान करायचे असते. केलेल्या निदानाप्रमाणे इलाज सुरू करायचे असतात. हे सर्व निर्णय डॉक्टरांनी घ्यायचे असतात.

काही वेळा आजाराचे निदान कोणत्याही शंकेशिवाय करता येते. एक सत्तर वर्षांची व्यक्ती अस्थिरोग तज्ज्ञाकडे आली आहे. चालताना त्या व्यक्तीस गुडघ्यात दुखते. गुडघे बाहेरील बाजूस वाकले आहेत. एक्स रेमध्ये सांध्यांतील झीज दिसत आहे. या केसचे निदान सरळ आहे.

बऱ्याच वेळेला इतक्या सहजपणे निदान करता येत नाही. अशा वेळी डॉक्टर्स डिफरनशियल डायग्नोसिसचा वापर करतात. रोगी जी लक्षणे दाखवीत आहे तशी लक्षणे तीन किंवा चार निरनिराळ्या आजारांमुळे होऊ शकतात. अशा वेळी डॉक्टर्स एकेक आजारासाठीच्या विवक्षित चाचण्या करून एकेक आजार नाही हे बघत जातात आणि शेवटी निदानापर्यंत पोचतात.

उपचार

सिद्ध झालेल्या प्रमेयांप्रमाणे इलाज करणे – evidence based medicine.

१९९०च्या दशकात सिद्ध झालेल्या प्रमेयांप्रमाणे इलाज करणे ही कल्पना पुढे आली. वैद्यकशास्त्राची प्रगती फार झपाट्याने होत आहे. दररोज नवीन संशोधन पुढे येत आहे. रोग्यांवर इलाज करताना डॉक्टरांनी हे नवीन ज्ञान वापरात आणले तर रोग्यांना फायदा होऊ शकेल. सिद्ध झालेल्या प्रमेयांप्रमाणे इलाज करणे ही कल्पना आहे.

रोगनिदान आणि इलाज यांसंबंधी निर्णय घेताना शास्त्रीय वैद्यकातील आधुनिक संशोधनाचा वापर करून सर्व निर्णय घेणे हे रोग्याच्या दृष्टीने हितावह असते. शास्त्रीय वैद्यकाच्या समोर हे मोठे आव्हान आहे की हे आधुनिक ज्ञान डॉक्टरांपर्यंत कसे पोचवावे. करोनाच्या काळात काही अंशी अशी यंत्रणा राबविण्यात आली होती. पण सार्वत्रिकरित्या, सातत्याने अशा यंत्रणेची गरज आहे.

उपचारासंबंधी डॉक्टरांना व्यक्तीकडे पाहून निर्णय घ्यावा लागतो. दोन व्यक्ती १४० /८५ असा रक्तदाब दाखवीत आहेत. एक व्यक्ती सत्तर वर्षांची असून या व्यक्तीला इतर काही व्याधी आहेत. दुसरी व्यक्ती साठ वर्षांची असून या व्यक्तीस इतर काही व्याधी नाहीत. या दोन व्यक्तींना आजाराचे लक्षण एकच असून औषधे निराळी असू शकतात. या मुद्द्यावर भाग १९मध्ये जास्त विचार करू.

समालोचन

शास्त्रीय वैद्यकाच्या विकासाची सुरुवात पंधराव्या शतकापासून झाली. जसे रसायनशास्त्र आणि प्राणिशास्त्रात शोध लागत गेले तसतसे ते सिद्धांत वैद्यकाला लावण्यास सुरुवात झाली. युरोपातील विश्वविद्यालयात या विकासास सुरुवात झाली. त्या काळात युरोपात जे वैद्यक आचरणात होते त्याचा विकास झाला.

शास्त्रीय वैद्यकाचा पाया फिजिऑलॉजी या शास्त्रात आहे. गेली ऐंशी वर्षे या शास्त्रात अचाट संशोधन होत आहे. हे सर्व संशोधन शास्त्रीय वैद्यकाचे पायाभूत सिद्धांत आहेत.

नवीन औषधांच्या चाचणीची प्रक्रिया पन्नास वर्षांपूर्वी सुरुवात झाली. या प्रक्रियेला randomized, double blind controlled trials असे नाव आहे.औषध कंपनीने नवीन औषध शोधले की ते वापरण्याआधी त्याच्या ठरावीक पद्धतीने चाचण्या करणे जरूर असते. भारतात या चाचण्या मोठ्या प्रमाणावर केल्या जातात.

शास्त्रीय वैद्यकात संशोधन साचेबद्ध रितीने होत असते. या संशोधनाचे निष्कर्ष शास्त्रीय मासिकातून प्रसिद्ध केले जातात. याचा फायदा सगळ्या जगाला होतो.

शास्त्रीय वैद्यकात फार मोठ्या प्रमाणावर रोज नवीन ज्ञान उपलब्ध होत आहे. हे ज्ञान डॉक्टरांपर्यंत पोचवून डॉक्टरांनी या ज्ञानाचा उपयोग करून रोग्यास औषधे द्यावीत अशी अपेक्षा असते. याला सिद्ध झालेल्या प्रमेयांप्रमाणे उपचार म्हणतात.

क्रमशः

***

भाग १ - शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन
भाग २ - ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक
भाग ३ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त
भाग ४ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त – त्रिदोष
भाग ५ - परीक्षा आणि चिकित्सा
भाग ६ - आयुर्वेदाची औषधे – भाग १
भाग ७ - आयुर्वेदाची औषधे – भाग २
भाग ८ - आयुर्वेदाचे शिक्षण आणि नंतर
भाग ९ - आयुर्वेदाची प्रॅक्टीस
भाग १० - युनानी आणि सिद्ध
भाग ११ - निसर्गोपचार
भाग १२ - होमिओपॅथी आणि बाराक्षार
भाग १३ - होमिओपॅथी आणि बाराक्षार
भाग १४, १५ - ॲक्युपंक्चर आणि आयुष

field_vote: 
0
No votes yet

अमक्या ऋषीने हे लिहून ठेवले आहे म्हणून ते खरे असा इथे प्रकार नाही.
पूर्वी शेकडो वर्षांच्या अनुभवा नंतर त्या औषधीचा प्रचार होत होत असे. त्याकाळचा उपलब्ध ज्ञानाच्या आधारवर औषध निर्मिती होत होती. एका पद्धतीचा प्रचार करताना दुसर्‍या पद्धती बाबत बिना प्रमाण विधान करणे उचित नाही.
बाकी शास्त्रीय वैद्यकातील संशोधन सर्व प्रक्रिया पूर्ण करून DCGI मान्यताप्राप्त औषधाचा ही विरोध आपल्या देशात झालेला आहे. त्या मेडिकल माफिया बाबत ही काही लिहले तर उत्तम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0