दिवाळी अंकासाठी आवाहन - २०२१

Letter X

(छायाचित्र आंतरजालावरून साभार)

गेल्या वर्षभरात आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत अनेक बदल झाले. त्यांपैकी काही अत्यंत मूलगामी आहेत आणि त्यांच्यामुळे यापुढच्या काळात आपल्या वागण्यावर आणि वावरावर मोठे परिणाम होतील अशी चिन्हं आहेत. कुठल्याही संदर्भात असे आमूलाग्र बदल होणं म्हणजे मन्वंतर.

पुराणांत ही स्थिती कित्येक लाख वर्षांनी उद्भवते अशी कल्पना केली आहे. मानवजातीच्या गेल्या दोन-पाच हजार वर्षांच्या अस्तित्वात अशी स्थिती पुष्कळदा आलेली दिसते – “मानवासाठी हे एक छोटं पाऊल आहे (पण) मानवजातीनं घेतलेली मोठी भरारी आहे”, असं चंद्रावर माणूस जाण्याचं वर्णन केलं जातं; याची व्याप्ती ठरावीक विषयांपुरती मर्यादित आहे. याउलट, सध्याच्या करोनाकाळाचा परिणाम मानवी नातेसंबधांच्या स्वरूपापासून ते जागतिक व्यापार, देशांच्या आरोग्यव्यवस्था अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर, वेगवेगळ्या पद्धतींनी होताना दिसत आहे. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे ‘मन्वंतर’ नेहमीच तात्कालिक अथवा ‘क्रांती’-स्वरूपी बदलांनी घडतं असं नाही; बदल घडताना काही वेळा त्यांची गती संथ, कदाचित अगदी न जाणवणारीही असू शकते. मग मागे वळून विचार करताना आपल्याला एखाद्या वेळी असं जाणवतं की, ‘अरे, हे असं नव्हतं; यात अगदी मुळापासून बदल झालेला आहे’. असं संथ ‘संक्रमण’ म्हणजे सुद्धा ‘मन्वंतर’ ठरू शकतं. १९८०च्या दशकाच्या शेवटी कम्युनिझमचा पाडाव झाला; भारताची अर्थव्यवस्था जागतिक व्यापारासाठी उघडली; पाश्चात्त्य देशांत नवउदारमतवादाविरोधात मतप्रवाह तयार झाला… हे गेली तीसेक वर्षं चाललेलं मन्वंतर आहे.

‘मन्वंतर’ ‘ऐसी’च्या यंदाच्या दिवाळी अंकाची संकल्पना आहे. गेल्या वर्षभरात झालेले आमूलाग्र बदल हे जरी त्या मागचं तात्कालिक कारण असलं तरी विषय तेवढ्यापुरता मर्यादित मात्र नाही. मन्वंतर घडून गेलेल्या, भूतकाळाबद्दलच असायला हवं असंही नाही; वर्तमान आणि भविष्याबद्दलही असू शकतं.

दिवाळी अंकासाठीचं साहित्य लेखनरूपातच असायची गरज नाही; वेगवेगळ्या दृश्यचित्र किंवा कथित/कल्पित वाङ्मयरूपातही जालीय अंकातलं सादरीकरण असू शकतं. साहित्य, विज्ञान, कला, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, वैद्यक, व्यापारउदीम अशा कितीतरी क्षेत्रांतल्या मन्वंतराविषयी साहित्य पाठवता येईल. सामाजिक, राजकीय, आर्थिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, कलात्मक अशा वेगवेगळ्या अंगांनी अशा बदलांकडे पाहणं शक्य आहे. या बदलांची नोंद घेण्याव्यतिरिक्त त्यांना कलात्मक प्रतिसाद देणं, त्यांचे अनन्यसाधारण असे प्रकार उलगडणं आणि त्यासाठी वेगवेगळ्या आविष्कारांची मदत घेणं अशा स्वरूपाचं योगदानही या विशेष विभागात संपादक मंडळाला अभिप्रेत आहे.

नेहमीप्रमाणेच ह्याशिवाय इतर कुठल्याही विषयावर चांगलं लेखन, अभिवाचन, व्हिडिओ, आंतरजालावरून प्रकाशित करता येईल असं कुठल्याही प्रकारचं साहित्य पाठवा. ललित असो वा अललित; गद्य असो वा पद्य. पथ्य एकच, साहित्य उत्तम असावं.

---
दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. ऐसीअक्षरे या आयडीला व्यक्तिगत निरोपातून पाठवा किंवा aisiakshare@जीमेल.कॉम या पत्त्यावर पाठवा. लेखन पाठवताना ते युनिकोड टंकांमध्ये (फाँट्स) पाठवा. हस्तलिखित, पीडीएफ, किंवा स्कॅन केलेली डॉक्युमेंट्स कृपया पाठवू नयेत. त्यांचा विचार अंकासाठी केला जाणार नाही. ’दिवाळी अंक २०२१’ असा विषय देऊन इमेल किंवा व्यक्तिगत निरोप पाठवा.

Taxonomy upgrade extras: 

प्रतिक्रिया

दिवाळीचा फराळ मस्त असणार आहे तर यावेळी. ऐसीला आगाऊ शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0