रीटा वेलिणकर

Rita Welinkar
नुकतंच शांता गोखलेंचं 'रीटा वेलिणकर ' हे पुस्तक वाचलं. त्यांचं रीटा वेलिणकर (१९९५), त्या वर्षी (२००८) आणि वन फूट ऑन द ग्राउंड (२०१८) ही तीन पुस्तकं पाठोपाठ, म्हणजे अगदी महिन्याभरात वाचल्यानंतर, रीटा हे त्यांचं 'मॅग्नम ओपस' आहे असं ठामपणे म्हणता येईल. एका चाळिशीच्या आसपासच्या अविवाहित स्त्रीची ही गोष्ट आहे. रीटाची आई कोकणस्थ ब्राम्हण आणि वडिलांच्या बापाचा किंवा जातीचा काहीही पत्ता नसल्यामुळे, हे लग्न आंतरजातीय विवाहाच्याही पलीकडीलं. पण शिक्षणाच्या आणि 'अँग्लोफिल' असण्याच्या जोरावर रीटाचे वडील मोठ्या हुद्द्यावर पोहोचतात. लहानपणापासून पाश्चात्य संस्कारात आणि श्रीमंतीत वाढलेल्या रीटा आणि तिच्या पाठीवरच्या तीन बहिणी, वडिलांची नोकरी गेल्यामुळे अचानक गरिबीत फेकल्या जातात. ते कुटुंब कुरकुरत त्यांची नवगरिबी पत्करत असताना घरातली थोरली मुलगी - रीटा - शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाची जबाबदारी घेते. दोन बहिणींची लग्न लावून उसंत मिळेपर्यंत रीटानं तिशी ओलांडलेली असते. आणि चाळीशीच्या आसपास अचानक तिच्या मनात एक मोठी उलथापालथ होते. ज्यामुळे तिला तिच्या आयुष्याकडे अगदी पहिल्यापासून नीट बघावं लागतं.

पुस्तकातील पात्रांची ओळख करून द्यायची शांता गोखलेंची पद्धत अद्भुत आहे. त्या सुरुवातीच्या काही पानांमध्ये सगळी पात्रं आणून आपल्यापुढे फेकतात. वेगवेगळ्या रंगांच्या लोकरीचा एकच गुंडा फेकावा तशी. आणि मग पुस्तकभर त्यातला एक एक धागा शांतपणे सोडवतात. 'त्या वर्षी' वाचताना पहिल्या काही पानांत, आपल्याला ही सगळी पात्रं लक्षात न राहिल्यामुळे आपण हे पुस्तक सोडून पळून जाऊ का, अशी भीती एकदा - दोनदा वाटल्याचं स्पष्ट आठवतंय. पण साठाव्या पानावर अचानक मला मुख्य पात्रांचीच नव्हे तर त्यांच्या नोकरांचीही नावं पाठ झाली होती असं लक्षात आलं. या पुस्तकातही तसंच आहे. हा कोण, ही कोण, त्यांचं आपल्या नायिकेशी नातं काय हे वाचकाला ताबडतोब कळेल का, असल्या चिंता लेखिका करत नाहीत. पण प्रत्येक पात्रासाठी त्यांची अनेक आवर्तनं कथेतच असतात. त्यामुळे ती कथा अंगवळणी पडते आणि सोडवतही नाही.

हे पुस्तक वाचणं सोपं नाही. यातल्या पानापानावर एकीकडे रीटासाठी काळीज तुटतं तर दुसरीकडे स्वतःच्या आयुष्याबद्दल अपराधी वाटायला लागतं. भारतीय लग्नव्यवस्थेवर अतिशय स्पष्टवक्तेपणाने केलेलं भाष्य यात आहे. यातली रीटा अगदी, ‘मॅटर-ऑफ-फॅक्ट’ म्हणतात तशा भाषेत आपल्याला तिचं वर्म उघडून दाखवते. पुस्तकाची सुरुवातच रीटाच्या, रुग्णालयातल्या नर्सकडे आरसा मागण्याने होते. तिला स्वतःकडे बघून आपण बारीक झालो आहोत का हे तपासायचं असतं. त्या निमित्तानं तिला आजूबाजूचे किती जण, "तू फार जाडी झाली आहेस" असं कधी तुच्छतेनं, टाकून आणि कधी काळजीनं सांगत होते ते ती अत्यंत शांतपणे सांगते. स्वतःच्या मैत्रिणीला पत्र लिहितानादेखील, एखाद्या घटनेच्या दोन्ही बाजू ती मैत्रिणीसमोर शांतपणे ठेऊ शकते. हा स्पष्टवक्तेपणा तिचे अनुभव अधिक दाहक, भेदक करतो आणि आपल्याला सहज मिळालेली सामाजिक प्रतिष्ठा पुन्हा एकदा तपासायला लावतो.

भारतीय लग्नव्यवस्था क्रूर आहे. पण तिचे चटके सगळ्यांना सारखे बसत नाहीत. पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक. स्त्रियांमध्येही सौंदर्य, भावंडांची संख्या (त्यातही बहिणींची संख्या), आई-वडिलांची जात, त्यांची सामाजिक आणि आर्थिक पत या सगळ्यांवर आपण या व्यवस्थेतून किती पोळून निघणार हे अवलंबून असतं. यांपैकी कुठल्याच गोष्टीवर लग्न (न) करू पाहणाऱ्या स्त्रीचं नियंत्रण नसतं. तरीही, या दिव्यातून पार झालेल्या अनेक स्त्रियांना 'लग्न' हे त्यांचं वैयक्तिक यश आहे असं वाटत राहतं. एखाद्या पुरुषाशी लग्न करून त्याची बायको होणं, हा जरी टोकाचा वैयक्तिक निर्णय मानला, तरी त्याला असलेली ही सामाजिक पार्श्वभूमी आपण सहज नजरेआड करतो. आणि लग्न असेल किंवा मुलं जन्माला घालणं असेल, हे आपले अगदी समजून- उमजून घेतलेले वैयक्तिक निर्णय आहेत असं समजून त्यांचं सतत समर्थन करत राहतो. ते आपण नक्की का करतो याची उत्तरं हे पुस्तक वाचताना मिळतात. कारण या पुस्तकाची मूळ गोष्ट जरी रीटाची असली तरी यात रीतीप्रमाणे किंवा रीतीच्या विरोधात जाऊन लग्न केलेल्या स्त्रियांचीही उदाहरणं आहेत. या स्त्रिया आपल्या वैवाहिक आयुष्यात जरी संपूर्ण आनंदी नसल्या तरीही त्या रीटाला तडजोड करून लग्न करायचा सल्ला देताना दिसतात. कारण लग्नाच्या चौकटीत बसल्याने सुरक्षित असल्याची भावना, मग ती खोटी का असेना, या स्त्रियांना मिळत असते.

संख्याशास्त्रात हाती लागलेला डेटा मांडून बघायची एक पद्धत आहे. त्याला 'नॉर्मल' डिस्ट्रिब्युशन म्हणतात. यात एक घंटेच्या आकाराचा कर्व्ह असतो. त्या घंटेसारख्या आकाराच्या खाली येणाऱ्या सगळ्या नोंदी ग्राह्य धरल्या जातात आणि दोन्ही बाजूला फेकलया गेलेल्या निरीक्षणांना 'आउट्लायर' म्हणतात. पण गंमत अशी, की या नॉर्मल डिस्ट्रिब्युशनमध्ये बसण्यासाठी तुम्ही जितके सरासरीच्या जवळ असाल तितके तुम्ही सुरक्षित असता. बाहेर फेकली गेलेली निरीक्षणं आपल्याला काही वेगळं सांगत असतील का, असा विचारही करायला अनेक शास्त्रज्ञांना वेळ नसतो. कारण त्यांना त्यांचे नॉर्मल दिसणारे सुबक निकष प्रसिद्ध करायची घाई असते. इतर वेळी, आपल्याला सासरासरीपेक्षा जास्त पैसा, प्रतिष्ठा मिळावी म्हणून झटणारे भारतीय, लग्नव्यवस्थेच्या बाबतीत मात्र सरासरी, म्हणजेच बहुसंख्य लोक जे करतात, त्यांच्या जितक्या जवळ जाता येईल तितका प्रयत्न करत असतात. हा प्रयत्न स्वतःपुरता असेल तरी तो कमी उपद्रवी म्हणता येईल, पण या व्यवस्थेतून बाहेर फेकल्या गेलेल्या अनेकांना टोचून हैराण करायचे काम हे लोक करत असतात. आणि या नॉर्मल डिस्ट्रिब्युशनमध्ये फिट बसण्यासाठी लागणारा महत्त्वाचा गुण म्हणजे बहुसंख्य लोकांसारखे असणे. मग आपण तसे नाही हे ज्यांच्या लक्षात येतं, ते आयुष्यातली अनेक वर्ष या व्यवस्थेशी लढा देण्यात वाया घालवतात. रीटा लग्नाच्या बाबतीत अशीच आऊटलायर आहे. पण तो एक मुद्दा सोडला तर तिच्या पिढीतल्या अनेक स्त्रियांपेक्षा तिचं अनुभवविश्व मोठं आहे. तिच्याकडे स्वतः कमावलेली, नावावर असलेली मालमत्ता आहे. तिच्याकडे चांगली नोकरी आहे. पण तरीही तिला या 'नॉर्मल' आयुष्याची ओढ आहे.

स्त्रीचं एकटेपण हे पुरुषाच्या एकटेपणापेक्षा वेगळं असतं का? या प्रश्नाचा वेध शांता गोखलेंनी 'त्या वर्षी' मध्येही घेतला आहे. एखाद्या बाईचं एकटं असणं - मग ते प्रत्यक्ष एकटं राहणं असो किंवा लग्नात/नात्यात एकटं वाटणं असो - या पुस्तकात उलगडून दाखवलं आहे. पुरुषाचा एकटेपणा सोपा असतो असं जरी म्हणता आलं नाही, तरी तो कदाचित बाईच्या एकटेपणापेक्षा सुसह्य असतो. यातही पुन्हा, स्त्री-पुरुषांचे सामाजिक स्थान महत्त्वाचे. भरपूर शिक्षण, अर्थार्जनाचे साधन, राहायला आपली अशी जागा आणि शारीरिक आणि भावनिक गरजा भागवायची सोय असेल, आणि आज आपण जगतोय तशी समाजात अजिबात न वावरता येण्याजोगी परिस्थिती असेल, जिथे सतत सार्वजनिक जगात वावरच करता येणार नाही, जेणेकरून आपलं वैयक्तिक आयुष्य कुणाच्या नजरेतच येणार नाही, तर स्त्री आणि पुरुष आनंदाने एकटे राहू शकतील. पण वरील बाबींमधील विषमतांमुळे स्त्रियांना लग्नाचा आधार पुरुषांपेक्षा जास्त लागतो. पण यांपैकी सगळं असूनही केवळ समाजाला मान्य असलेलं नातं हवं म्हणूनही अनेकींची घुसमट होते. लग्न करायचा निर्णय जसा आपल्या जडण घडणीतून आणि सामाजिक दबावातून आलेला असतो, आणि तो आपल्याला नैसर्गिक वाटतो, तसंच लग्नामुळे प्राप्त होणारी सगळी सुखं लग्नाशिवाय उपभोगत असतानाही, लग्न व्हावं किंवा समोरच्यानं आपल्याशी असलेलं नातं त्या एकाच चौकटीत बसवावं हा अट्टहास देखील त्याच सामाजिक दबावातून येतो. आणि तो दबाव झुगारून टाकायला प्रचंड मानसिक बळ लागतं. या पुस्तकात या दोन्ही बाजूंचा प्रत्यय येतो. रीटाच्या आई वडिलांच्या अडचणीच्या लग्नामुळे, रीटावर एखाद्या मध्यमवर्गीय, 'दोन्हीकडून' ब्राम्हण असलेल्या मुलीवर जे 'कुलीनपणाच' ताण असतात ते नाहीत. तिचं तिच्या प्रियकरावर प्रेम आहे. त्यांचं नातं मैत्रीतून आणि एकमेकांबद्दल असेल्या आदरातून निर्माण झालेलं आहे. तो विवाहित आहे हे रीटाला सुरुवातीपासून माहिती आहे. पण तरीही ते एकत्र आहेत.
एका वळणावर आपल्या प्रियकरानं आपल्याशी लग्नच करावं किंवा लग्नासारखं उघड नातं ठेवावं असा हेका ती धरते आणि प्रचंड आत्मक्लेश करून घेते. हा अट्टहास काही प्रमाणात तिच्या त्याच्यावरील प्रेमामुळे असला, तरी पुस्तक वाचताना त्याला सामाजिक दबाव कारणीभूत आहे असंही वाटतं.

इथे तिच्या प्रियकराच्या भूमिकेत, तिच्यावर अन्याय करणारा, तिचं शोषण करणारा असा पुरुष रंगवता आला असता. पण असं काहीही नाट्यपूर्ण न करता, शांता गोखलेंनी विठ्ठल साळवी रंगवला आहे. तो सौम्य आहे. परिस्थितीला शरण जाणारा आहे. रीटावर त्याचं प्रेम आहे. तिच्याबद्दल त्याला आदर आहे. तो तडकाफडकी नातं तोडून विसरून जाता येईल असा प्रियकर नाही. पण तो तिचा 'नाईट इन शायनिंग आर्मर' देखील नाही. त्याचा हा सामान्य खरेपणा रीटाचा आत्मक्लेश अधिक गडद करतो. तिला जे होतं आहे, ती तिच्याच मनात अनेक वर्षांच्या अनुभवांतून आलेली एक त्सुनामी आहे. तिच्या उसळण्याला साळवी जबाबदार नाही, नव्हे त्याची तेवढी पात्रताच नाही.

आई वडिलांची जबाबदारी घेणाऱ्या बाईकडे कुठल्या- कुठल्या कोनांतून बघता येऊ शकतं, ते सगळे दृष्टिकोन या पुस्तकात मांडले आहेत. आपल्या आजूबाजूला कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी म्हणून अविवाहित राहिलेल्या अनेक रीटा आपण बघितलेल्या असतात. पण हे अजूनही इतकं अनैसर्गिक आहे, की त्या कर्तृत्ववान मुलींचाही मत्सर आई वडिलांना वाटतो. इथे जर पुरुष असेल तर त्याचं अगदी तोंड फाटेपर्यंत कौतुक होताना दिसतं. आपली मुलगी लग्न न करता आपल्याला सांभाळते आहे, यातून येणाऱ्या अवघडलेपणाचे, हतबलतेची अनेक उग्र रूपं बघायला मिळतात. आणि हा विरोधाभास थक्क करणारा असतो. तो या पुस्तकात अचूक टिपला आहे.

शांता गोखलेंच्या तीनही पुस्तकांमधून अधून मधून डोकावणारा स्त्री शरीराबद्दलचा ऊहापोह मला फार आपलासा वाटतो. मी अजून ठामपणे भाष्य करावं इतकं मराठी स्त्रीवादी साहित्य वाचलं नाही. पण आजवर वाचलेल्या पुस्तकांपैकी स्त्रीदेहाबद्दल अतिशय सोपं आणि प्रामाणिक लेखन शांता गोखलेंनी केलं आहे असं मला वाटतं. यातील काही ओळी वाचताना, आपणही आपल्या शरीराबद्दल बरोबर हाच विचार, हे पुस्तक न वाचता केला आहे हे सतत जाणवत राहतं. त्यामुळे मला हे लेखन जास्त जवळच वाटतं. शरीराबद्दल असलेल्या या नोंदी, इतक्या सोप्या शब्दात, तेही मराठीत मांडायचं धैर्य असणं ही साधी गोष्ट नक्कीच नाही. पुस्तकात एके ठिकाणी रीटाच्या बाजूला राहणारा पुरुष सतत तिच्या छातीकडे बघत बोलायचा अशी आठवण ती सांगते. आणि नंतर आपल्याला हवे तेव्हा काढून ठेवता येतील असे स्तन असते तर किती बरं झालं असतं असं विधान करते. एखाद्या तणावपूर्ण गोष्टीचे एकदम विनोदात रूपांतर करून, शांता गोखले तो मुद्दा एकदम सहज करून टाकतात. तरीही, मराठीत आपण "शारीरिक सुख" असं तासलेलं, गुळगुळीत नाव देऊन ज्याचं वर्णन करतो, तो संभोग बाईसाठी देखील महत्वाचा असू शकतो, ती तिचीही गरज असू शकते हे उघडपणे मान्य करणारी रीटा, अनेक ठिकाणी संभोगाला संभोगच म्हणताना दिसते. ही या पुस्तकाबद्दल आवडलेली अजून एक गोष्ट.

भारतात बायकांनी घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्या डॉक्टरच्या चिठ्ठीविना उपलब्ध असतात. म्हणजे विवाहित/अविवाहित कुणीही त्यांचा लाभ घेऊ शकतं. अमेरिकेत अशा गोळ्यांसाठी बायकांना चिठ्ठी लागते. आणि मुळात तिथे डॉक्टरच्या दाराची पायरी चढायलासुद्धा इन्शुरन्स लागतो. या तुलनेत भारतात, गर्भ न राहता स्त्रीला संभोग करता यावा यासाठी कायद्याने जास्त मोकळीक दिलेली आहे. असं असलं, तरी आपण अशा समाजात राहतो, जिथे एकही गर्भनिरोधक गोळीची जाहिरात लग्नाच्या संदर्भाशिवाय येत नाही. यशस्वी अभिनेत्रींची लग्न झाली की त्या कुठल्यातरी गर्भनिरोधक गोळीच्या नाहीतर गर्भधारणा झाली की नाही हे तपासायच्या किटच्या अम्बॅसेडर होतात. बरं, या गोळ्यांच्या जाहिरातीत कुठेच संभोग करणारे स्त्री-पुरुष तो निर्णय घेताना दिसत नाहीत. कारण स्वयंपाकघरात पुरुष जसे फक्त जेवायला येतात, तसंच कदाचित गर्भाशयाच्या बाबतीत गृहीत धरलं असावं. एक अनुभवी विवाहित बाई नवीन लग्न झालेल्या बाईला सल्ला देताना दिसते. यात मंगळसूत्र अत्यावश्यक दागिना आहे. नाहीतर स्क्रिप्टमध्ये लग्न हा शब्द तरी.
हेच कॉन्डोमच्या जाहिरातींमध्ये कधीही, एखादा पुरुष आपल्या मित्राच्या लग्नाच्या पहिल्या रात्री त्याला कॉन्डोमचं पाकीट देऊन नको असलेल्या गर्भधारणेबद्दल सल्ले देताना दिसत नाही. मुळात, निदान बायकांनी तरी, लग्न न करता संभोग करू नये असं कुठल्या ना कुठल्या मार्गानं सतत सांगितलं जातं.
या पुस्तकात इतर सगळ्या बाबतीत सुरुवातीला म्हणलं आहे तसा रीटाचा स्पष्टवक्तेपणा असला, तरी तिच्या विवाहित मैत्रिणीला पत्र लिहिताना मात्र रीटा तिच्या लग्न न करता ठेवलेल्या शरीरसंबंधांबद्दल थोडी संकोचताना दिसते. आपली मैत्रीण 'सोवळी' आहे. तिला काय वाटेल असा प्रश्न तिच्याही मनात येतो. हे पुस्तक १९९५ साली आलेलं आहे. अर्थात, यामागे झालेलं चिंतन हे लेखिकेच्या संपूर्ण आयुष्यातलं असणार. पण तरीही मनात एक प्रश्न येतो. की रीटा ज्या मराठी कनिष्ठ मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करते, त्या वर्गातील तरुण अविवाहित मुली २०२१ मध्ये आपल्या शारीरिक संबंधांबद्दल न संकोचता बोलू शकत असतील का? असे काही पुरावे सोशल मीडियावर दिसत नाहीत. पण इथे एखादी युरोपियन किंवा अमेरिकन तरुणी असेल, तर ती विनासंकोच, अगदी विनोदानं देखील तिच्या लैंगिक अनुभवांबद्दल बोलू शकते. त्यामुळे हे किंवा असंच एखादं पुस्तक पुन्हा लिहिलं पाहिजे. ज्यातली रीटा तिच्या लैंगिक अनुभवांबद्दल अधिक उघडपणे आणि संकोच न करता बोलणारी असेल.

या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर तीन बायकांचे सुंदर चित्र आहे. त्या एकमेकींना आधार देतायत असं त्या चित्रातून वाटतं. अडचणीच्या काळात बायकांनी बायकांची घेतलेली काळजी, त्यांना दिलेला आधार, मैत्रीतून मिळालेलं बळ हा देखील या गोष्टीचा पैलू आहे. यातल्या सरस्वती आणि संगीता वाचताना अनेक वर्षांपूर्वी अशाच अडचणीच्या काळात माझ्या अशाच जिवलग मैत्रिणीबरोबर केलेले प्रवास आठवले. तेव्हा आम्ही एकमेकींना म्हणायचो, की आपण एकमेकींना इतक्या छान समजून घेऊ शकतो, मग आपल्याला आपल्यासारखे पुरुष का भेटत नाहीत?

आपण या लग्नव्यवस्थेला शरण गेलो याबद्दल मला हे पुस्तक वाचताना अनेक वेळा अपराधी भावना वाटली. माझ्या पुरतं मी माझं विवाहित असणं आणि आई असणं कसंही वाकवू-मोडू शकते. पण स्वतःकडे या व्यवस्थेतील एक छोटासा ठिपका म्हणून बघितलं, तर अपराधी वाटणंही समजण्यासारखं आहे. आजही, सोशल मीडियावर एखाद्या अविवाहित किंवा मूल नसलेल्या स्त्रीने तिची बाजू मांडली, की तिची समजूत घालणाऱ्या, तिला उगीच पदराखाली घेणाऱ्या, तिचं लक्ष दुसरीकडे वेधून, "पण तू यात किती चांगली आहेस!" म्हणून तिला लहान मुलीसारखी वागणूक देणाऱ्या असंख्य कमेंट, त्याही स्त्रियांनीच केलेल्या, वाचायला मिळतात. एका अव्याहतपणे चाललेल्या संस्थेचा या सगळ्या स्त्रिया भाग असतात. आणि या व्यवस्थेत, जात, सामाजिक पत, उंची, देखणेपणा, भाषा, आहार, राजकीय मत हे सगळं सगळं जुळणारा जोडीदार निवडून त्यांनी त्यांचे सगळे संघर्ष संपवलेले असतात. आणि तरीही त्यांच्यापेक्षा वेगळे निर्णय घेण्याचे धाडस दाखवणाऱ्या स्त्रियांकडे त्या करुणेने कसे काय बघू शकतात याचा रोज नव्याने धक्का बसतो.
म्हणूनच हे पुस्तक सुखी संसारात रमलेल्या सगळ्यांनी वाचायला हवं. कारण आपल्या सुखी संसारातल्या अनेक सोज्वळ, सोवळ्या अन्यायांना वाचा फोडणारी ही गोष्ट आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उत्तम परिचय. हे पुस्तक कित्येक वर्षांपासून नावाने ओळखीचं असलं तरी वाचनातून सुटलं होतं, पण एकदा आवर्जून वाचायला हवं.

अधलीमधली काही वाक्यं मात्र इंग्रजीत विचार करून लिहिल्यासारखी वाटली. उदाहरणार्थ,

भरपूर शिक्षण, अर्थार्जनाचे साधन, राहायला आपली अशी जागा आणि शारीरिक आणि भावनिक गरजा भागवायची सोय असेल, आणि आज आपण जगतोय तशी समाजात अजिबात न वावरता येण्याजोगी परिस्थिती असेल, जिथे सतत सार्वजनिक जगात वावरच करता येणार नाही, जेणेकरून आपलं वैयक्तिक आयुष्य कुणाच्या नजरेतच येणार नाही, तर स्त्री आणि पुरुष आनंदाने एकटे राहू शकतील. 

ह्या वाक्याची व्यवस्थित संगती लागत नाही. म्हणजे गोळाबेरीज कळतं, पण नीट नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

हो. हे लेखन करताना जे मनात आलं ते मला इंग्लिशमध्ये जास्त उत्स्फूर्तपणे लिहीता आलं असतं. संपादन करायला वेळेची मर्यादा नसेल तर तो परिच्छेद उद्या पुन्हा लिहून काढीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेक वर्षं झाली रीटा वेलिणकर वाचल्याला. पुन्हा वाचलं पाहिजे.

(तुझ्या सवडीनं कर संपादन.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.