पिफ २०२१ : चित्रपट महोत्सव आणि सामाजिकता

शीर्षकातील ‘सामाजिकता’ या शब्दाबाबत थोडा खुलासा. तिथे ‘सामाजिक जाणीव’ हा शब्दप्रयोग चालणार नाही, कारण ‘सामाजिक जाणीव’ याचा अर्थ समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाची जाणीव, असा होतो. तिथे नुसतं ‘समाज’ असं म्हणता येत नाही कारण ‘समाज’ ही संज्ञा वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थाने वापरली जाते. विनासंदर्भ ते गोलमाल होईल. ‘समाज’ या अस्तित्वाविषयी सजगता, हा अर्थ व्यक्त करण्यासाठी ‘सामाजिकता’ असा प्रयोग करण्यात आला आहे.

चित्रपटामध्ये किंवा कुठल्याही कलेमध्ये सामाजिक जाणीव कितपत असावी; कलेने व्यक्तिवादी, सौंदर्यवादी असावं की नसावं, हा वाद न संपणारा आहे. पण चित्रपटासारख्या अनेकांगी कलामाध्यमातून समाज कसा व्यक्त होतो आणि त्यातून त्या समाजाविषयी – चित्रपटाच्या विषयाबाहेर जाऊन – काय अंदाज करता येतो, हा भाग रहातोच. त्या दृष्टिकोनातून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ २०२१) पहायला मिळालेल्या चित्रपटांकडे बघण्याचा हा प्रयत्न आहे.

हा फेस्टिवल नुकताच पार पडला. मला त्याचा ऑनलाइन विभाग पहायला मिळाला. एकूण २६ चित्रपटांपैकी मी २२ बघितले. प्रत्येकाविषयी स्वतंत्रपणे लिहून झालं. सगळ्यांचा मिळून विचार करताना काही वेगळ्या गोष्टी सुचतात. उदाहरणार्थ, हॉलिवुडचा एकही चित्रपट नव्हता. पण यात आश्चर्य नाही. ‘फेस्टिवलचा सिनेमा’ अशी जी ओळख आहे, तिचं व्यवच्छेदक लक्षण ‘केवळ व्यवसाय म्हणून न काढलेला सिनेमा’ असं आहे आणि हॉलिवुड व्यावसायिक आहे. हॉलिवुडचा सिनेमा वाईट असतो, सर्वसामान्य असतो, प्रेक्षकांच्या किमान पातळीवरच्या अभिरुचीला आवाहन करणारा असतो, असं मानण्याचं कारण नाही; पण तो व्यावसायिक असतो आणि व्यवसायाच्या आड येतील अशा गोष्टी तो टाळतो, यात शंका नाही. त्या गोष्टी कोणत्या या तपशिलांत न जाता आपण उलट म्हणू शकतो की अशा गोष्टी मुद्दाम न टाळणारा सिनेमा फेस्टिवलमध्ये बघायला मिळतो. किंबहुना, हेच असल्या फेस्टिवलचं आकर्षण होय.

यात भारतीय चित्रपटही नाही. गोष्ट अशी आहे, की समजा यात एखादा भारतीय – कोणत्याही भाषेतला – असता, तरी मी तो बहुधा टाळला असता. कारण भारतीय चित्रपट बघण्याची संधी एरवी मिळू शकते; त्यासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावण्याचं कारण नाही. तिथे असेच चित्रपट बघावेत, जे एरवी सहजासहजी समोर येणार नाहीत. चित्रपटातले दर्दी किंवा या कलामाध्यमाचे अभ्यासक जगभरचे चांगले चित्रपट शोधून मिळवतात आणि बघतात. मी त्यांपैकी नाही. मी अशा दर्दी लोकांनी निवडलेले चित्रपट बघतो. वेगळ्या शब्दांत, फेस्टिवलला जातो. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियासाठी गोव्याला गेलो होतो; हा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आयता घरबसल्या बघायला मिळाला.

या २२ चित्रपटांपैकी नऊ चित्रपट पश्चिम युरोपातले तर पाच पूर्व युरोपातले आहेत. ‘युरोपातले तेरा (एक दोन्हीकडे घडतो, त्यामुळे दोन्हीकडे मोजण्यात आला आहे) चित्रपट’ असं म्हणू नये कारण पश्चिम युरोप आणि पूर्व युरोप सामाजिकदृष्ट्या एकमेकांपासून वेगळे आहेत. हा वेगळेपणा त्यांच्या चित्रपटांतल्या तपशिलांमध्ये, सामाजिक पार्श्वभूमीत उमटतो. किमान, तो तसा उमटावा, अशी अपेक्षा असते. एकच तपशील या दोन ठिकाणी एकच अर्थ व्यक्त करेल, असं नाही. बावीसांपैकी एक चित्रपट – आय नेव्हर क्राय – पोलंड आणि आयर्लंड, असा दोन ठिकाणी, म्हणजे पूर्व आणि पश्चिम युरोपात घडतो. या दोन देशांमधला फरक तिथे आपोआपच स्पष्ट होतो. पूर्व युरोपातल्या पोलंडमधली गरीब मुलगी गाडी घेण्याची आकांक्षा बाळगून असते. पण ते सहजसाध्य नसतं. आयर्लंडला गेलेल्या तिच्या बापाने पैसे पाठवण्यावर ते अवलंबून असतं. तो तिथे मजूर म्हणून काम करत असतो; कारण तिथे मजुरी पोलंडपेक्षा जास्त असते आणि मजुरी देणारं कामही असतं. पण आयर्लंडमध्ये वस्तू महागही असतात! ती तिथे जाते तेव्हा तिला तिथे सिगारेट परवडत नाही.

हे कळणं काही कठीण नाही. ते दोन देश तरी आहेत; आपल्या इथे यूपी-बिहारमधून लोक मुंबईला येतात, त्यांची स्थिती नेमकी अशीच तर असते.

आणखी एक गोष्ट. आयर्लंडमध्ये अपघात होऊन बाप मरतो. त्याचं शव घरी आणून त्यावर योग्य ते अंत्यसंस्कार करणं आईला अपरिहार्य वाटतं. त्यासाठी बापाने मुलीच्या गाडीसाठी जमवलेले पैसे खर्च करावेत, असा तिचा आग्रह असतो. बापाने मुलीची गाडी घेण्याची हौस पुरवण्यासाठी मजुरीतून पैसे बाजूला काढावेत, मृत पतीवर प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याची प्रबळ इच्छा पत्नीने धरावी, हे तपशील पश्चिम युरोपपेक्षा ‘आपल्याला’ जास्त जवळचे वाटतात! सहज कळतात, मान्य होतात.

ही मुलगी सतरा-अठरा वर्षांची आहे. आयुष्यात प्रथमच ती परदेशी जाते आहे. तिच्यावर ओढवणाऱ्या विविध अडचणी, हा चित्रपटाचा प्राथमिक विषय आहे. अशा वेळी तिच्यावर ओढवणाऱ्या कठीण प्रसंगांमध्ये तिच्या अब्रूवर घाला पडणे, या संकटाचा समावेश असायला हवा. तो नाही. मात्र, हे एकूण युरोपच्या सुसंस्कृतपणाशी संबंधित असावं. ‘क्वीन’ या हिंदी चित्रपटातली नायिका जेव्हा एकटीच (आणि प्रथमच) परदेशी, म्हणजे युरोपात, म्हणजेच पश्चिम युरोपात, जाते; तेव्हा तिच्यावरही असला बांका प्रसंग ओढवत नाही!

Blue Eyes and Colourful My Dress (2020)

पश्चिम युरोपातल्या चित्रपटांत ‘ब्लू आइज अँड कलरफुल माय ड्रेस’ ही बल्गेरियन-जर्मन डॉक्युमेंटरी येते. एका दोन-तीन वर्षांच्या मुलीचं बागेत, इमारतींच्या आवारात, फूटपाथवर हिंडणं त्यात टिपलं आहे. याला ‘व्हॉइस ओव्हर’ नाही. म्हणजे दृश्याच्या मागे काही खुलासा करणारा आवाज नाही. कॅमेऱ्यासमोर जे घडतं, तेवढं दाखवलं आहे. त्यातून निरागसता व्यक्त तर होतेच; त्याबरोबर वातावरणातली शांतता आणि सुरक्षितता यांचीसुद्धा जाणीव होते. ही मुलगी एकटी आहे. ती बहुतेकदा विविध वयाच्या बालकांशीच बोलते; पण क्वचित प्रौढांशीही तिचा संबंध येतो. कुठेही कसल्याही धोक्याची चाहूल येत नाही. बल्गेरियन शहरी समाजात असं निवांत वातावरण आहे, असा निष्कर्ष काढावा का?

अ फिश स्विमिंग अपसाइड डाउन’ या चित्रपटाची कथा एका कुटुंबात घडते, असं म्हणण्यापेक्षा एका घरात घडते, असं म्हटलं तर जास्त बरोबर होईल. बाप आणि मुलगा यांच्यात संवाद नाहीच, असं म्हणता येत नसलं तरी प्रत्येकाचं वर्तन कौटुंबिक नातेसंबंधांकडे डोळेझाक करूनच होत असतं. पुन्हा, यात पश्चिम युरोपमधल्या समृद्ध, व्यक्तिकेंद्रित समाजाचं प्रतिबिंब आहे, असं म्हणता येईल का? यातली नायिका तर उन्मुक्त जगणाऱ्या व्यक्तीचं उदाहरण भासते. तिच्या प्रतिसादांमध्ये (क्षणिक वा स्थायी) मोह, आकर्षण यांचा प्रभाव असण्यापेक्षा ‘काय केलेलं चालतं आणि काय चालत नाही’ याविषयीची बेफिकिरीच अधिक असल्यासारखी वाटते. वेगळ्या शब्दांमध्ये म्हणायचं, तर सामाजिकतेचा अभाव दिसून येतो.

रोलां रेबेर्स कॅबरे ऑफ डेथ’ हा जर्मन चित्रपट तर सरळ सरळ समाजात, विशेषत: बायकांच्यात दिसून येणाऱ्या तारुण्याच्या ओढीवर, आपल्याकडे लोकांचं लक्ष जात रहावं, या इच्छेवर तिरकस नजर टाकतो. हे सगळे लोक पैशाने मोठे असतात, कलावंत असतात किंवा कलेविषयी आत्मियता बाळगून असतात, वगैरे. हा चित्रपट कुण्या एकाची कहाणी नाही. तो माणसांच्या अनेक तऱ्हा न्याहाळतो. म्हणजे तो आगळ्या स्वभावाच्या मोजक्या व्यक्तींची गोष्ट सांगत नाही. कोणत्या अपवादात्मक घटनांमुळे त्यांच्यावर एखादी कृती लादली जाते, असंही वाटत नाही. हा चित्रपट जर त्या समाजाचं प्रातिनिधिक चित्र समोर आणतो, असं मानलं; तर तिथे विषमता किंवा गरिबीपेक्षा समृद्धीमागोमाग येणाऱ्या मानसिक समस्या जास्त मोठ्या दिसू लागल्या आहेत, असं म्हणावं का?

फोर्ट्रेस’ हा इटालियन चित्रपट पूर्णपणे तुरुंगात घडतो आणि त्यातले सगळे कलावंत तुरुंगाचे रहिवासी आहेत. विसाव्या शतकातल्या श्रेष्ठ कादंबऱ्यांमध्ये गणना केल्या जाणाऱ्या लेखनकृतीवर हा आधारलेला आहे. यातही तुरुंगाची, तुरुंगातील एका कैद्याची वा काही कैद्यांची कहाणी नाही. हा तुरुंग म्हणजे वाळवंटालगतचा एक किल्ला आहे. होऊ घातलेल्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी सदैव सज्ज असलेला. मात्र ते आक्रमण कधीच होणार नाही, याची जाणीव प्रत्येकाला आहे. ज्या संभाव्य घटनेशी इथलं अस्तित्व आणि इथल्या जगण्याचे तपशील जोडलेले आहेत, ती घटना कधीच घडणार नाही आहे; हे अगदीच अस्तिववादी झालं. इथे काही घडत नाही आणि तरीही ही जागा इथे आलेल्याला धरून ठेवते, ही त्याच्याही पुढची पायरी. यातून एकूण मानवी मनावर काही प्रकाश पडत असेल; पण यात भूगोलात वसलेली सामाजिकता नाही. म्हणजे पुन्हा तेच. यात समाजाअंतर्गत ताणतणाव नाहीत.

टेल्स ऑफ द लॉकडाउन’मध्ये स्पेनमध्ये लॉकडाउनच्या काळात घडणाऱ्या काही घटनांचं चित्रण आहे. त्यात हिंसेचे विविध पैलू बघायला मिळतात. लॉकडाउनमुळे समाजातल्या वेगवेगळ्या व्यक्तींवर कसे वेगवेगळे पेचप्रसंग ओढवले, हे दिसतं; पण व्यक्ती व्यक्तीच रहातात, त्यांच्यामधून ‘समाज’ व्यक्त होत नाही. एकेका कहाणीत जे घडतं, त्याला त्या कहाणीतल्या पात्रांच्या वर्तनाशी, कहाणीतल्या वैशिष्ट्यपूर्ण घटनेशी थेट जोडता येतं. समाज असं करेल किंवा समाज असं करायला भाग पाडेल; यातलं काही म्हणता येईलसं वाटत नाही. कथानकाला पुढे ढकलण्याची क्रिया ‘सामाजिक’ नाही.

पश्चिम युरोपात असं दिसतं याचं कारण कदाचित तिथल्या सामाजिक उत्क्रांतीमध्ये असेल. माणसातले व्यक्तिगुण त्याच्या सामाजिक रूपाला झाकून टाकत असतील. प्रत्येक मनुष्य वेगळा आहे, स्वतंत्र आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या इच्छेचा मान ठेवण्याची सहजप्रवृत्ती सगळ्यांच्यात बाणवणे हेच जर सुसंस्कृततेचं अंतिम श्रेय असेल, तर या समाजाने पुढचा पल्ला गाठला आहे, असं म्हणता येईल.

माय फादर्स स्टोरीज’ हा फ्रेंच चित्रपट या प्रतिपादनात बसतो आणि बसत नाही. तो बसतो, कारण इथलं प्रमुख पात्र नॉर्मल नाही. ते नॉर्मल नसण्यातूनच चित्रपटाला दिशा मिळाली आहे. ‘बसत नाही,’ असंही म्हणता येतं कारण चित्रणाचा भर त्या पात्राच्या विकृतीवर नाही तर त्या विकृतीमुळे इतर, सर्वसाधारण पात्रांच्या जगण्यावर काय प्रभाव पडतो, यावर आहे. ही पात्रं मुख्यत: आहेत, त्याची बायको आणि त्याहीपेक्षा जास्त, त्याचा मुलगा. खटकणारी गोष्ट अशी की फ्रान्समधल्या कुटुंबातली ही स्त्री नवऱ्याचं विचित्र वर्तन सहन करते, समाजापासून त्याचा बचाव करते आणि मुलालासुद्धा तशीच शिस्त लावण्याचा प्रयत्न करते. ती घटस्फोट घेत नाही, त्याला सोडून जात नाही! तिच्या या वागण्याचं समर्थन चित्रपट तिच्याच स्वभावातल्या कुठल्या गुणवैशिष्ट्यावरून करताना दिसत नाही. मुलगा तर लहान आहे. आईवडील हे त्याच्या जगण्याचे, त्याच्या मूल्यचौकटीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. ती असं का करते, याला उत्तर ‘पत्नीधर्म’ असं सुचतं. कदाचित माझ्या नजरेतून काही महत्त्वाचं सुटलं असेल. पण उत्तर जर हे असेल, तर चित्रपट ‘सामाजिक’ आहे, कारण पातिव्रत्य सामाजिक आहे, वैयक्तिक नाही.

हा चित्रपट काहीसा मागच्या, दुसरं महायुद्ध संपल्यानंतरच्या काळात घडतो, असं म्हणून यातून सुटका करून घेता येईल: त्या काळात तिथली सामाजिक उत्क्रांती खालच्या पायरीवर होती!

लँड ऑफ द फरगॉटन’ हा आणखी एक इटालियन चित्रपट. हा १९५१ सालात घडतो. एका डोंगराळ भागातील गावाने अन्याय, पिळवणूक यांविरुद्ध दिलेला लढा, हा या चित्रपटाचा विषय. पण सामाजिक-वैयक्तिक मांडणी करण्याच्या ओढाताणीत तो ना धड इकडचा ना तिकडचा झाला आहे. समस्या सामाजिक आहे; पण तिची उकल सामाजिक कृतीतून होत नाही! आपल्या काही हिंदी आणि बऱ्याच दक्षिणी चित्रपटांतही शेवटी नायक (समाजावर अन्याय करणाऱ्या) खलनायकाला बेदम चोप देतो आणि सर्वत्र आनंदीआनंद होतो, असं असतं; पण ते इतकं बेगडी असतं की ‘आपल्या सामाजिक समस्या निरुत्तर करणाऱ्या आहेत,’ असाच जणू निष्कर्ष हे चित्रपट प्रेक्षकांसमोर ठेवत असतात. ‘लँड ऑफ द फरगॉटन’चं तसं होत नाही. समाज की व्यक्ती, या दुविधेला चित्रपट भिडतच नाही, असं वाटतं. १९५१ सालात इटलीतल्या अत्यंत दुर्गम भागात रहाणारे खेडूत असले म्हणून काय झालं; त्यांना जर लिहिता वाचता येत असेल, तर गांधी माहीत हवेत, असं मात्र प्रकर्षाने वाटतं! मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला अशा नेत्यांना सामाजिक-राजकीय अन्यायविरोधी वाट शोधण्यासाठी गांधी उपयोगी पडले!

इंटू द डार्कनेस’ हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धाच्या काळात डेन्मार्कमध्ये घडतो. त्यात युद्ध नाही कारण डेन्मार्कने जर्मनीसमोर शरणागती पत्करली होती. परंतु डेन्मार्क राष्ट्र किंवा डॅनिश लोक जर्मनीला, जर्मनांच्या युद्धखोरीला सामील झाले नव्हते. या चित्रपटाचा सगळा रोख ‘संघर्ष टाळून शरण गेलेल्या समाजामध्ये कोणकोणत्या प्रतिक्रिया उमटतात,’ यावर आहे. हा समाज एकसंध नाही. जे ज्यू आहेत, त्यांचे प्राणच धोक्यात आहेत. तीच गत कम्युनिटांची आहे. स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी प्राणपणाने जर्मन वरचष्म्याला विरोध करण्यावाचून त्यांना इलाज नाही. त्यातही ज्यूंपेक्षा कम्युनिस्ट गनिमी संघर्षाला जास्त तयार आहेत. इतरांपैकी काही करियरिस्ट आहेत, काही भावनाप्रधान आहेत, काही बाणेदार आहेत, तर काही व्यवहारवादी आहेत. काही कर्तव्याच्या तागडीत हेलकावणारेदेखील आहेत. एकूण, समाजातल्या विविध प्रवृत्तींचे प्रतिनिधी आहेत. मग याला सामाजिक चित्रण का म्हणू नये? परकी आक्रमकांसमोर एका समाजातील विविध विचारधारांचं काय झालं, या दृष्टीने पाहिलं, तर तसं म्हणायला हरकत नाही. पण इथे जरी एकेकाच्या वागण्यात फरक दिसत असला, तरी सगळा समाज एका बाह्य शत्रूशी – प्रभावाशी दोन हात करतो आहे. स्वत:च्या गतीने चालणाऱ्या समाजातील ताणतणाव, संघर्ष, तडजोडी यांचं स्वरूप वेगळं असतं. म्हणजे, शक्तिमान शत्रूशी जळवून घेणारा शत्रू नसताना नेमस्त असेल का? शत्रूला पूर्णपणे सामील होणारा एरवी राष्ट्रद्रोही होईल का? भावनेच्या आहारी जाऊन अतिरेकी कृती करणारा शांततेच्या वातावरणात कृतिशील असेल का? या प्रश्नांना निश्चित उत्तरं देता येत नाहीत. तरी या चित्रपटाला सामाजिकतेतून बाद करता येत नाही. चुकलेल्या मुलाला वाचवण्याचा आटापिटा करणारा बाप कौटुंबिक मूल्यंच दाखवतो.

त्याहीपेक्षा जास्त साक्षात्कारी संवाद चित्रपटात आहे. उद्योजक नवरा जर्मनांच्या अरेरावीसमोर नमतं घेतो, हे पाहून त्याची बायको नाराजी व्यक्त करते. तेव्हा तो उत्तरतो, तुझ्या बापाप्रमाणे माझी संपत्ती वडिलोपार्जित नाही! या उत्तराला अनेक फाटे फुटू शकतात. स्वकष्टार्जित संपत्तीपेक्षा वडिलोपार्जित संपत्तीवर पाणी सोडणं तुलनेने सोपं असतं, हा एक विचार झाला. स्वत:च्या कमाईशी असते तशी बांधिलकी नसण्यातून ‘राष्ट्रासाठी त्याग’ करण्याकडे तो जास्त सहज प्रवृत्त होऊ शकतो. विशेषाधिकारांची सवय हाडात मुरल्यामुळे विशेषाधिकार गमावण्याचा सुप्त संबंध राष्ट्राने स्वातंत्र्य गमावण्याशी लागून या सुप्त उद्देशाने केलेली कृती स्वत:च्याच बाह्य मनात त्या उद्देशाला जोडली जाऊ शकते! जन्मापासून सुबत्ता उपभोगणाऱ्याला सुबत्तेवर आपला निसर्गदत्त आणि अपरिवर्तनीय अधिकार आहे, असं वाटायला लागून त्याच्या वागण्यात सबुरीचं प्रमाण कमी होऊ शकतं.

खूप जास्त पैलू समोर आणण्याच्या प्रयत्नात हा चित्रपट थोडा लांबला आहे. त्याचा शेवटही सोडून दिल्यासारखा वाटतो. ‘अखंड चाललेल्या जीवनाचा एक तुकडा’ असं जरी चित्रपटाच्या सादरीकरणाला म्हटलं, तरी कुठेतरी काहीतरी सुरू झालं आणि तसंच कुठेतरी ते संपलं, असं तर गोष्टीचं व्हायलाच पाहिजे! आणि चित्रपट म्हणजे वेगळ्या माध्यमातून सांगितलेली गोष्टच होय.

आता पूर्व युरोपकडे जाऊ. तिथले सर्वच चित्रपट ‘सामाजिक वळणा’चे होते, असं म्हणता येत नाही; पण तिथल्या व्यक्तिगत समस्या वेगळ्या असलेल्या दिसतात. त्याला भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक कारणं आहेत. उदाहरणार्थ, ‘द लॉयर’ या चित्रपटात सामाजिक समस्या हा विषय नाही. हा चित्रपट बल्गेरिया आणि सर्बिया या दोन देशांत घडतो; मात्र त्यात दोन्हीकडल्या राष्ट्रपातळीवरच्या घडामोडींचं चित्रण नाही. पश्चिम आशियातील अस्वस्थ परिस्थितीमुळे बाहेर पडलेले निवार्सित पूर्व युरोपात तुलनेने जास्त आले, याचा मात्र चित्रपटातील समस्येशी थेट संबंध आहे. म्हणजे हा चित्रपट युरोपच्या पश्चिमी संस्कृतीकडे झुकलेला आहे, असं म्हणता येईल.

इथे एका गोष्टीचा खुलासा करायला हवा. सांस्कृतिक, सामाजिक या विशेषणांनी युक्त असलेली स्थिती भौतिकविज्ञानाप्रमाणे सुस्पष्ट सीमारेषा असलेली नसते. ज्याप्रमाणे अर्थशास्त्रातल्या नियमाला ‘स्टेटमेंट ऑफ टेण्डन्सीज’ म्हणतात, तसंच. पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप यांच्यातला फरक असाच आहे. एकीकडे कुटुंबसंस्था आहे आणि दुसरीकडे ती लयास गेली आहे, अशी मांडणी इथे नाही. कुटुंबसंस्थेचं प्राबल्य हा मुद्दा मात्र नक्की आहे.

स्टिचेस’ हा सर्बियन चित्रपट एका व्यक्तीचा, जन्मत:च बाळापासून तुटलेल्या आणि १८ वर्षं त्याला शोधण्याचा ध्यास शेवटपर्यंत न सोडलेल्या आईचा आहे. ती, तिचं कुटुंब, शेजारी, परिचित यांचं दर्शन घडत असताना इथे कौटुंबिक, सामाजिक बंध जास्त घट्ट आहेत, हे जाणवल्याविना रहात नाही; जरी ‘आय नेव्हर क्राय’प्रमाणे तारुण्य बंडखोरच असलं, तरी! सुरुवातीलाच ती मुलाच्या वाढदिवसाचा केक बनवते! तिची टीनेजर मुलगी अर्थातच नाराज होते. तिच्या मते आई कधीच नसलेल्या भावात जास्त गुंतलेली आहे आणि तिच्याकडे दुर्लक्ष करते आहे. या बाईचा नवरा तिच्याविषयी सहानुभूती बाळगून असला, तरी तो तिच्या दु:खात, तिच्या विकृत म्हणावं अशा ध्यासात सहभागी नसतोच. संपूर्ण चित्रपट या बाईच्या व्यक्तिरेखेभोवती उभा आहे आणि त्या नटीच्या अप्रतिम अभिनयामुळे ताठ उभा आहे.

एका परीने ही व्यक्तीची कहाणी आहे. पण चित्रपट संपल्यावर पडद्यावर सर्बियात जन्मल्यावर लगेच पळवून विकल्या गेलेल्या बाळांची संख्या दाखवली जाते आणि संपूर्ण चित्रपटाला सामाजिक अंग मिळून जातं!

क्वो वादिस, आयदा?’ या चित्रपटात बोस्नियाची परवड समोर येते. युगोस्लावियाचे तुकडे पडत असताना वेगळे झालेल्या देशांमधल्या लोकांत परस्परांविषयी असलेला कमालीचा विद्वेष बाहेर आला आणि त्यातून अमानुष हिंसा घडली. यात तिथल्या इस्लामधर्मीय लोकांची तर सरसकट कत्तलच झाली. बोस्नियातल्या अशाच एका गावावर सर्बियन सैनिक कब्जा करतात आणि पुढे काय होतं, याची ही गोष्ट. यूनोच्या संरक्षणाखाली असूनही गावाला धोका टाळता येत नाही. या चित्रपटाने सामाजिक आणि वैयक्तिक यात तोल सांभाळला आहे, असं वरवर भासलं, तरी यातला वैयक्तिक भाग समाजात रुजलेल्या मूल्यांकडेच निर्देश करतो. आयदा ही शिक्षिका यूनोच्या लोकांसाठी दुभाष्याचं काम करत असते. परिणामी यूनोचे अधिकारी जिथे जातात, तिथे आयदा शेजारी असते. ते जे बोलतात, ते ती भाषांतर करून सांगते. परिणामी गावातल्या सगळ्या लोकांना आयदा हीच वशिल्याची, मदतीची जागा म्हणून दिसू लागते. यूनोच्या लोकांचं तर तिच्याविना चालतच नाही.

सर्ब सेनाधिकारी तोंडाने जरी काही म्हणत असला, तरी तो शेवटी सगळ्या बोस्नियन गावकऱ्यांची कत्तलच करणार आहे, याबद्दल गावात कोणालाही शंका नसते. त्यांना यूनोचा वरवर आधार वाटत असतो; पण तो किती पोकळ असतो, हे वेळ येताच दिसून येतं. जेव्हा शेवट जवळ येतो, भीषण भविष्य स्पष्ट होऊ लागतं, तेव्हा आयदा जिवाच्या आकांताने आपला नवरा आणि दोन मुलं यांना वाचवू बघते. अचानक सर्व गावाची आयदा केवळ तिच्या कुटुंबाची होऊन जाते. माकडीण आणि तिचं पिल्लू, या गोष्टीतली ही जणू शेवटून दुसरी पायरी.

यात कुटुंब आणि समाज, यात विरोध असल्यासारखं भासत असलं, तरी यामुळे चित्रपटाची सामाजिक भीषणता जास्त ठळकपणे पुढे येते. अमुक ठिकाणी इतकी माणसं मारली, ही आकडेवारी असते; पण त्या माणसांची नावं आणि त्यांचे फोटो यांच्यामुळे मृत्यूला चेहरा मिळतो. तसाच चेहरा मग क्रौर्यालाही मिळतो आणि त्या कृत्यामधली भीषणता प्रकर्षाने जाणवते. आयदाच्या गावावरचं संकट प्रेक्षकाला कळत असतं; पण आयदाच्या तडफडीमुळे त्यातली अमानुषता बाहेर येते.

चित्रपटाच्या शेवटी पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आहे आणि शाळेत लहान मुलं खेळत आहेत, असं दृश्य आहे. त्याचं प्रयोजन कळलं नाही. कारण त्यानंतर पडद्यावर त्या गावातले सगळे, म्हणजे काही हजार पुरुष गोळ्या घालून ठार करण्यात आले, असं शब्दांत येतं. बालकं खेळताहेत, वातावरण शांत आहे, हे चित्र फसवं असतं, त्याच्या आगेमागे अमानुष हिंसा असते, असं चित्रपट सांगू बघतो का?

इनहेल-एक्झहेल’ हा जॉर्जियन चित्रपट पुन्हा एका स्त्रीच्या एकटेपणाचा आहे. नवऱ्याचा गुन्हा स्वत:च्या डोक्यावर घेऊन ती तुरुंगात जाते पण त्याबद्दल तिला शून्य सहानुभूती मिळते. मुलीला काही माहीत नसतं, मुलगा अगदी लहान असल्यामुळे ती परत आल्यावर तिला ओळखतच नाही, नवरा स्वत:च्या जगण्यात गर्क असतो आणि त्यात तिने बदल करण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी तिलाच दटावतो. बाकीचे नातेवाईक तोंडदेखले असतात. बाहेर सोबत शोधण्याचे तिचे प्रयत्न विफल होतात.

ही ‘समाजाची गोष्ट’ नव्हे. पण गोष्ट घडण्याचं माध्यम समाजाचा एक घटक, म्हणजे कुटुंब, हे आहे. तिला एक प्रकारे कौटुंबिकच आधार हवा असतो. तो मिळत नाही आणि ती निराश होते. ही नैराश्याची कथा आहे. या बाईच्या वाट्याला पहिल्यापासून दुरावाच येतो, हे जाणवत रहातं. तिच्या चेहऱ्यावर उदास भाव तर आहेतच; पण चित्रपटाचं वातावरण कधीही प्रसन्न, उत्साही भासत नाही. माणसं तशी नाहीत आणि परिसरही नाही. यातले प्रसंग एकाला एक जोडून न येता तुटक आल्यासारखे वाटतात; तिचं एकटेपण जराही विसरता येत नाही. चित्रणातून, वातावरणातून आशय पोहोचवण्याचे जे प्रकार जाणवतात, त्यावरून असं वाटतं, की जॉर्जिया हा एकेकाळच्या सोवियत युनियनचा भाग होता, यापलीकडे तिथल्या सामाजिक, सार्वजनिक जीवनाची कल्पना आपल्याला फारशी नाही; त्यामुळे काही संवेदनशील तपशील निसटून जात असावेत.

महोत्सवात जगाच्या कानाकोपऱ्यातून चित्रपट यावे लागतात. इथे दक्षिण अमेरिकेचं प्रतिनिधित्व ब्राझीलने केलं आहे. दोन चित्रपट ब्राझीलमध्ये घडतात. मेक्सिकोला दक्षिणेत मोजलं तर ‘टुवर्ड्स द बॅटल’ हा तिसरा चित्रपट. हा चित्रपट फ्रेंच माणसाबद्दल असला तरी तो मेक्सिकोत घडतो आणि फ्रेंच विरुद्ध मेक्सिकन युद्धाची पार्श्वभूमी त्याला आहे. फोटोग्राफरला होणाऱ्या ज्ञानाची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटातही म्हटलं तर सांस्कृतिक कॉमेंट्स आहेत. उदाहरणार्थ, लढाईच्या शोधात भटकणाऱ्या फ्रेंच फोटोग्राफरला एक दृश्य दिसतं, ज्यात सैनिक खोटे खोटे मरून पडलेले असतात आणि फोटो काढून झाल्यावर उठून आपल्या कामाला लागतात. हे खोट्या लढाईचे फोटो काढणारा अमेरिकन असतो. या फ्रेंच फोटोग्राफरची कीर्ती त्याच्या कानी पडलेली असते आणि तो त्या फ्रेंचाचा सहाय्यक म्हणून काम करायला उतावीळ असतो. तसंच, लढाई चालू असताना एक बडा मेक्सिकन अधिकारी नागड्या बायकांच्या वेढ्यात, दारू बिरू पीत रंगलेला असतो. तसंच, हा फ्रेंच मनुष्य खड्ड्यात पडलेला असताना एक मेक्सिकन गावकरी त्याला बाहेर काढून त्याचे प्राण वाचवतो; शत्रू मानून सोडून जात नाही. पण दुसरा गोरा मैत्री करतो आणि घोडा घेऊन पळून जातो! मुळात तरुण मुलगा मृत्यू पावल्याचं दु:ख विसरण्यासाठी पॅरिसमधल्या सुखासीन जगण्याला सोडून हा फ्रेंच पुरुष लढाईचे फोटो काढण्याच्या उद्देशानेच मेक्सिकोत येऊन हाल भोगत असतो. या सगळ्यातून १. फ्रेंच माणसाने दु:ख विसरण्यासाठी सुखासीन जगणं सोडून वेगळे फोटो काढायला मिळतील म्हणून भलतीकडे भटकणे, २. अमेरिकन माणसाने खुशाल खोटेपणा करून व्यवसायाशी अप्रामाणिक होणे, ३. मेक्सिकन सेनाधिकाऱ्याने ऐन लढाईत ऐश करणे, ४. सामान्य मेक्सिकन माणसाने वैर, लढाई विसरून अपरिचित माणसाचे प्राण वाचवणे, ५. एका गोऱ्या माणसाने मैत्री दाखवून घोडा घेऊन पळून जाणे, या कृत्यांना फ्रेंच, अमेरिकन, मेक्सिकन स्वभाववैशिष्ट्यांच्या छाया मानावं की त्या त्या व्यक्तींचे स्वभावविशेष मानावेत?

ब्राझीलमध्ये घडणाऱ्या दोन चित्रपटांपैकी एक (ऑल द डेड वन्स) गुलामगिरी प्रथा नुकतीच बंद केली असतानाच्या काळात, म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला घडतो. दुसरा वर्तमानातला आहे. गुलामगिरी बंद झाल्यावर गुलामांचे (एके काळचे) मालक आणि पूर्वाश्रमीचे गुलाम, दोघेही सैरभैर होतात. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांची त्रेधा उडते. मुक्त गुलामांना स्वातंत्र्याचा उपभोग कसा घ्यायचा कळत नाही. आर्थिक स्थैर्य आणि नव्याने मिळालेले अधिकार यांच्यात कधी कधी रस्सीखेच होते पण मुक्त गुलामांचा कल पोटाला थोडा चिमटा घेऊन स्वातंत्र्याच्या बाजूने जाण्याचा दिसतो. जे अगोदर गुलाम होते, त्यांच्याशी ‘सभ्य’ वर्तन करण्याची धडपड गोरे मालक करतात; पण त्यांना स्वत:ची कामं कुठे नीट करता येत असतात? श्रद्धा, समजुती, सवयी, सोय यांच्या गडबडगुंड्याचं चित्रण इथे सर्रियल पातळीवर केलेलं आहे. खरं काय, अतिरेकी चित्रण कुठलं, भास कोणते आणि सरळ सरळ विकृती कोणती, यांची सरमिसळ होत रहाते.

या चित्रपटाकडे सामाजिक दृष्टीतून बघून चित्रपटाचं मूल्यमापन करणं, त्याचं स्थान ठरवणं हे प्रेक्षकाच्या निवडीवर आहे. जेव्हा व्यक्तीला समाजातील अमुक प्रवृत्तीचा प्रतिनिधी म्हणायचं असतं, तेव्हा त्या व्यक्तीमध्ये तऱ्हेवाईकपणा, विकृती, खटकणारी वैशिष्ट्यं या गोष्टी किमान स्तरावर ठेवाव्या लागतात. तसं नसेल, तर घडणाऱ्या घटनांची संगती सामाजिक अंगाने न लावता व्यक्तीच्या कृतीवरून लावणं शक्य होतं. हा चित्रपट म्हणूनच ‘सोपा’ नाही, एक सामाजिक शेरा, असं म्हणून त्याचं स्थान निश्चित करता येत नाही. त्यातल्या पात्रांना स्वत:चे, ठळक असे स्वभाव आहेत. त्यामुळे ‘काही चमत्कारिक व्यक्तींचं अनपेक्षित स्थितीमधलं वर्तन,’ असंही त्याकडे बघता येतं. चित्रपट सादरीकरण एकाच वेळी अनेक पातळ्यांवर होऊ शकतं, हे चित्रपट माध्यमाचं सामर्थ्य या चित्रपटात अधोरेखित होतं.

वॅलेन्तिना हा दुसरा ब्राझीलियन चित्रपट सरळ आहे, त्यात अशी गुंतागुंत नाही. लिंगबदल केल्यामुळे समाजाच्या काही भागाकडून मिळणारी कडू वागणूक, हा या चित्रपटाचा विषय आहे. ही वागणूक चुकीची होय, असं यात अगोदरच ठरलेलं आहे. त्यामुळे सर्व सूज्ञ लोक त्या वागणुकीला विरोध करतात आणि विरोध करणारे आणखीही काही चुकीचं करत असतात. इतकंच काय, शेवटी ‘उद्याची पिढी’, म्हणजे शाळेतले विद्यार्थी बहुसंख्येने ‘पुरोगामी’ बाजू घेतात. आपोआपच विरोध करणारे खलप्रवृत्तीचे ठरतात. म्हणजे हा चित्रपट प्रचारकी आहे. एका पुरोगामी भूमिकेचा तो प्रचार करतो. पण म्हणजेच तो तटस्थपणे सामाजिक स्थिती दाखवत नाही. लिंगबदल करून घेण्याला समाजाची वृत्ती सर्वसाधारणपणे विरोधी आहे, त्या वृत्तीत बदल घडवून आणायला हवा; असा, जास्त समंजस रोख चित्रपट ठेवत नाही. सुरुवातीपासून प्रेक्षक लिंगबदल केलेल्या मुलीवषयी सहानुभूती बाळगेल, अशाच दिशेने चित्रपटाची पटकथा रचलेली आहे. ती मुलगी पूर्ण मुलगी दिसते, हे तिच्या बाजूने कल होण्याचं आणखी एक मोठं कारण (जरी ही भूमिका करणारीनेसुद्धा लिंगबदल करून घेतलेला आहे) . समाजातला एक मोठा वर्ग लिंगबदलाच्या विरोधी असेल, तर चित्रपटातली मध्यवर्ती समस्या उभी रहाते. पण त्यासाठी त्या वर्गाच्या समजुती, श्रद्धा यांनाही काही जागा मिळायला हवी. ते इथे होत नाही.

तरी या चित्रपटातल्या दोन गोष्टी आवर्जून सांगण्यासारख्या आहेत. एक म्हणजे, ती मुलगी साध्या, निम्नवर्गीय घरातली आहे. तिच्या या क्रांतिकारक म्हणता येईल अशा निर्णयाने तिची आई उद्‌ध्वस्त तर होत नाहीच, ती खचूनही जात नाही. उलट, मुलीच्या मागे उभी रहाते. जे होईल, ते दोघी मिळून भोगू, असा खंबीर पवित्रा घेते. (बाप मात्र पळून जातो!)

चित्रपटाचं दुसरं वैशिष्ट्य अगदी शेवटी येतं जेव्हा वॅलेन्तिना तिच्यावर धावून जाणाऱ्याला बेडरपणे प्रश्न करते, ‘‘हवं तसं जगण्याचं स्वातंत्र्य मला आहे, याचा तुला इतका त्रास काय म्हणून होतो?’’
हा प्रश्न जरी एका परीने निरुत्तर करणारा असला, दुसऱ्याच्या जगण्याच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करण्याचा अधिकार परंपरेच्या नावाने कसा बळकावला जातो, हे उघड करणारा असला; तरी समाज विरुद्ध व्यक्ती या मांडणीत समाजाला सोडून व्यक्तीच्या पारड्यात वजन टाकण्यासाठी प्रेक्षकाला प्रवृत्त करण्यासाठी ही योजना आहे, असं म्हणता येईल.

उरलेल्या चित्रपटांमध्ये हायफा या इस्रायली शहरात घडणारा आणि इस्रायलींच्या बरोबर पॅलेस्टाइनी पात्रं असलेला 'लैला इन हायफा' हा चित्रपट आहे. कथा उच्चभ्रू लोकांमधली आहे. त्यांच्यातल्या नैतिकतेचा सैलपणा समोर येताना त्यांच्या जगण्यातल्या समस्यासुद्धा दिसतात; पण समस्यांपेक्षा त्यांच्या जगण्यातला पोकळपणाच जास्त जाणवतो. पैसेवाल्या पॅलेस्टाइनींचं इस्रायलमध्ये फार वाईट चाललेलं नाही, असं सुचवलं जातं. एकही पात्र खंबीरपणे नैतिक भूमिका घेत नाही. चौकट बदलली की नैतिकतेचे निकषही बदलताना दिसतात.

फनी बॉय’ची कथा श्रीलंकेत तमिळींची यादवी सुरू होण्याच्या काळात घडते. ही गोष्टदेखील श्रीमंतांचीच आहे. पण इथे वांशिक संघर्षात संपत्ती काम करत नाही, असा संदेश आहे. (मात्र, ‘तुमच्यापाशी पैशांचा विमा आहे, अशा आशयाचं विधान एकापेक्षा जास्त वेळा आहे!) यातलं एक विधान या चित्रपटाचंच नाही, तर संपूर्ण तमिळ-सिंहली भांडणाचंच मूळ जणू सांगून जातं. तमिळींच्या वर्तणुकीबद्दल एक सिंहली संतापाने म्हणतो, ‘मायनॉरिटी पीपल विथ ए मेजॉरिटी कॉम्प्लेक्स!’ अल्पसंख्यांक असूनसुद्धा बहुसंख्यांक असल्याची मिजास! बापरे! हे विधान संदर्भ बदलून आपल्या जातींचा बुजबुजाट असलेल्या देशात कुठे कुठे आणि कोणाकोणाला लावता येईल!

वूमन ऑफ द फोटोग्राफ्स’ जपानी आहे. चित्रपटीय भाषा खोलवर तपासणारा आहे. समाजाशी याचा काहीच संबंध नाही, असं नाही. पण जे समोर मांडलं जातं, ते व्यक्तीच्या संदर्भात मांडलं जातं. नातेसंबंध म्हणजे काय, माणूस स्वत:ची ओळख कशात शोधतो अशा प्रश्नांमध्ये हा चित्रपट शिरतो. जपानी असल्यामुळे सावकाश सरकतो. पण रेंगाळत नाही. प्रेक्षकाला मोकळा सोडत नाही. शब्दांपेक्षा गप्पपणा, अविर्भाव, दृष्टिकोन यांच्यावर जास्त विसंबणारा आहे. सामाजिक चित्रपट असा असत नाही. हा माणसाच्या अंतरंगात शिरणारा प्रयोगच आहे.

जनप्रवृतींवर एक शेरा मात्र यात सापडतो. यातल्या मुलीच्या फोटोंना (ती मॉडेल असते) सोशल मीडियावर पुष्कळ ‘लाइक्स’ मिळत असल्याने तिला जाहिराती मिळू लागतात. त्यातून एका बाजूने कमाई होते आणि दुसरीकडून तिची अनेकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरण्याची भूकही भागते. पण नंतर लाइक्स कमी होतात आणि ती हवालदिल होते. पुढे जेव्हा जखम दाखवणाऱ्या फोटोंना पुन्हा लाइक्स मिळू लागतात, तेव्हा ती जखम बरीच होऊ देत नाही! इथे व्यक्तीच्या मनावर, मूल्यांवर समाज संस्कार करताना दिसतो.

एम्प्टी नेस्ट’ हा चित्रपट चीनमधल्या एका मोठ्या शहरात घडतो. कित्येक वर्षांपासून एकटी रहाणारी आणि आता आत्महत्येचा विचार करू लागलेली म्हातारी बाई. हेल्थ प्रॉडक्ट्स विकायला आलेला एक तरुण सेल्समन लोचटपणे तिला चिकटतो आणि संबंध वाढवतो. पुढची कथा ओळखीच्या रस्त्याने जाते; पण अशी वळणं घेते की कंटाळा येत नाही. शेजाऱ्यांच्या निमित्ताने प्रेक्षकाला इतरांचं दर्शन होत रहातं; पण ते इतकं नेमकं, निवडक आहे की त्यातून समाजदर्शन होतं, असं म्हणवत नाही. अशा चित्रपटाच्या शेवटाविषयी सर्वसाधारणपणे दोनच पर्याय सुचतात; हा चित्रपट मात्र दोन्हींना खो देऊन, तरीही नीट संपतो. सकारात्मक शेवट करण्यासाठी नीतीला, सचोटीला मुरड घालण्याची गरज नाही, असं सांगून जातो!

महोत्सवातला सर्वोत्तम चित्रपट होता, इराणचा ‘नो चॉइस’. ही एकच कथा आहे; पण वेळोवेळी तिचं केंद्र तीन बायकांच्यात फिरतं. एक, अनाथ, रस्त्यावर रहाणारी, शरीरविक्री करणारी; दुसरी मानवी हक्कांच्या रक्षणासाठी इरेला पेटून काम करणारी पण विशाल चौकटीचा विचार न करणारी आणि तिसरी गरीब, नाडलेल्या बायकांबद्दल कणव वाटणारी आणि स्वत:च्या मूल्यांनुसार इतरांच्या बाबतीतही निर्णय घेणारी गायनॅकॉलोजिस्ट सर्जन. चौथं महत्त्वाचं पात्र आहे, ‘व्यवस्था’. चित्रपटात पुरुष आहेत; पण एक सोडल्यास बाकी सगळे बायकांच्या भूमिका स्पष्ट करण्याचं पूरक काम करणारे आहेत. चित्रपटाला वेग आहे: तो भावनांवरही थबकू देत नाही. एखाद्या डॉक्युमेंटरीप्रमाणे एकामागोमाग एक प्रसंग समोर येत रहातात आणि त्यावर चित्रपट काहीच शेरेबाजी जणू करत नाही. पार्श्वसंगीत तेवढं ताण निर्माण करत रहातं. मुख्य पात्रं जवळून दिसतात, बाकी सावल्या. किंवा पाठीकडून. चित्रपट निर्मम आहे आणि त्याचा शेवटही तसाच आहे; दिलासा न देणारा.

समस्याप्रधान. सामाजिक. चित्रपटमाध्यमामध्ये प्रयोग करणारा. हे प्रयोगसुद्धा असे की अनुभूतीच्या प्रक्रियेत बेरंग न व्हावा. नटनट्यांच्या अभिनयावर अवलंबून नसलेला, पूर्णपणे दिग्दर्शकाचा. चित्रपट या माध्यमाच्या शक्तीची चुणूक दाखवणारा. असा हा चित्रपट. अनेक अर्थांनी श्रेष्ठ.

यापलीकडे जाऊन या महोत्सवाचं एक वेगळं वैशिष्ट्य मला जाणवलं. मी पाहिलेल्या बावीस चित्रपटांमध्ये सात चित्रपटांमध्ये गे किंवा लिंगबदल केलेली किंवा लेस्बियन पात्रं होती! ही पात्रं किंवा त्यांचा इतर पात्रांशी असलेला नातेसंबंध, हा विषय या सातही चित्रपटांच्या केंद्रस्थानी होता, असं नाही; पण इतक्या मोठ्या संख्येने जेंडरसंबंधी मांडणी असणे, यातून काहीतरी अर्थ काढावासा वाटतो. ‘फनी बॉय’ हा दीपा मेहता दिग्दर्शित चित्रपट जेवढा ढोबळ आहे, तितकाच तरल, संवेदनशील ‘द लॉयर’ हा चित्रपट आहे. ‘द लॉयर’मध्ये गे मित्रांचा एक अत्यंत नॉर्मल, ‘बुद्धिवादी’ ग्रूप बघायला मिळतो. त्यातला कुणीच बायकी अविर्भाव करत नाही, एकमेकांत लघळ वागत-बोलत नाही; किंबहुना त्यांचे शब्द कळले नाहीत, तर त्यांना गे म्हणण्याचं कारण दिसणार नाही. त्यांच्या बोलण्यात एकमेकांची मस्करी आहे आणि त्यात गेपणातून येणाऱ्या वागण्याची मस्करीसुद्धा आहे. एकूण, गे असणं म्हणजे पूर्ण नॉर्मल असणं, असं जोरदार लॉजिक मांडून पटवण्यापेक्षा हे बघून जास्त पटावं!

एका ऑस्ट्रेलियन चित्रपटाचा उल्लेख राहिला - अनसाउंड. यात तर एक मुलगी लिंग बदलून पुरुष होते आणि गे होऊन तरुण पुरुषाच्या प्रेमात पडते! हे कळायला आणि मान्य व्हायला जरी कठीण असलं, तरी डेटवर जाताना तो चड्डीत कृत्रिम लिंग घालतो, हे रोचक वाटलं. या चित्रपटात, तसंच इतर चित्रपटांतसुद्धा या गे किंवा लेस्बियन किंवा लिंगबदल केलेल्या व्यक्तींविषयी इतर सुजाण नागरिकांची, त्यांच्या नातेवाइकांची प्रतिक्रिया धक्का बसल्याची होताना दिसत नाही. याला अपवाद ‘फनी बॉय’मधलं आपल्याला परिचित असलेलं दक्षिण आशियाई कुटुंब.
भारतीय किंवा दक्षिण आशियाई कौटुंबिक वागण्याला भोंदू म्हणून सोडून दिलं, तर लॅटिन अमेरिकेपासून पश्चिम-पूर्व युरोपसकट ऑस्ट्रेलियापर्यंत ‘एलजीबीटीक्यू’ लोकांची संख्या इतकी वाढली आहे का, की त्यांचं दर्शन इतक्या मोठ्या प्रमाणावर चित्रपटांमध्ये सर्वसाधारण माणसं म्हणून व्हावं? मला वाटतं, असं झालं असावं. हॉलिवुडपटांमध्ये आफ्रिकन अमेरिकन माणसं पूर्वी अर्कचित्रांसारखी असत. त्यांच्या वागण्याबोलण्यात त्यांना वेगळे ठरवणाऱ्या विशिष्ट लकबी दिसून येत. आता तसं राहिलं नाही. विल स्मिथ, डेन्झेल वॉशिंग्टन हे नट चित्रपटात पोलिसापासून, वैज्ञानिकासकट सज्जन माणसापर्यंत कोणीही असू शकतात. अमेरिकन समाजाने आता आफ्रिकन-अमेरिकनांचा सर्वसाधारण नागरीक म्हणून स्वीकार केला आहे, याचंच हे चिन्ह. तसंच एलजीबीटीक्यू लोकांबद्दल म्हणता येईल.

आपण यापासून खूप लांब आहोत. आपला समाज लांब आहे, आणि आपल्या चित्रपटांमध्ये ‘वेगळ्या’ लोकांचं ‘नॉर्मल’ चित्रण होण्यापासूनही लांब.

- हेमंत कर्णिक

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या सिनेमात शेवटच्या सीनमध्ये ती आई मुलाला वडिलांच्या मनोविकारातून का सोडवत नाही याचे उत्तर आहे. त्याचे वर्णन करून मी इथे इतरांना स्पॉइलर देणार नाही. पण स्त्री फ्रान्समधली आहे म्हणून आपोआप तिला संसार मोडणे सोपे आहे हे इतके सरळ गृहितक मला पटत नाही. त्या सिनेमातली आईची भूमिका मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सुसंगत अशीच आहे. ज्यांनी लहानपणी घरात असा abuse भोगला आहे त्यांना आईचं वागणं विसंगत वाटणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक चित्रपट हा सुरुवातीपासूनच सामाजिक असतो असे मला वाटते. कारण चित्रपट म्हणजे एक अभिव्यक्ती आहे आणि अभिव्यक्तीचा मूलगामी उद्देश हा संवाद साधण्याचा असतो. मग तो संवाद इतरांशी असो किंवा स्वतःशी. संवाद आला की एकाहून अधिक श्रोते-अभिव्यक्ते आले, एकाहून अधिक व्यक्ती आल्या की ती गोष्ट वैयक्तिक न राहता सामाजिक बनत्ये. ह्या मोजपट्टीवर प्रत्येक चित्रपट, प्रत्येक कलाकृती नि प्रत्येक अभिव्यक्ती ही सामाजिक ठरत्ये.

प्रत्येक चित्रपटाची थोडक्यात करून दिलेली ओळख, त्यावर मूळ विषयाच्या धाग्याला धरून केलेली टिप्पणी हे सर्वच छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0