Skip to main content

बागकामप्रेमी ऐसीकर - २०२१

घरच्या बागेची चर्चा खरडफळ्यावर करण्या ऐवजी एक धागाच काढावा अशी चर्चा तिकडे झाल्याने इकडे धागा सुरू करतो आहे.
तुमच्या यावर्षीच्या योजना, सल्ले जरूर लिहावेत!

तर सुरुवात अशी झाली की माझ्या मुलाला गेल्या वर्षी शाळेत ॲक्टिविटी करण्यासाठी एक यादी दिली होती. त्यात ओला कचरा व्यवस्थापन हा एक विषय होता.
हाच मी पटकन निवडायचा सल्ला दिला. माझ्या आवडीचा विषय, त्याचा दहावीचा वेळ काही प्रमाणात वाचवायचा आणि बागकाम करायची माझी हौस भागवून घ्यायची असे उद्देश ठेवून काम सुरू केले.

अपार्टमेंट मधली फणस, चिकू आणि चाफा वगैरे झाडांची सतत पाने गळत असतात. ती चार पोत्यात भरून टेरेसवर आणली. एक जाड प्लास्टिक कागद दुहेरी अंथरूण घेतला.
आधी झाडांची पाने पसरली आणि त्यावर हलका मातीचा थर देऊन घरचा ओला कचरा बारीक तुकडे करून टाकायला सुरुवात केली. मित्राच्या शेतावरून गोमूत्र आणि गो शेण आणलं. त्यात बेसन, गूळ मिसळून दहा दिवस ठेवलं.

हे मिश्रण टाकून दोन महिन्यात बरीच चांगली माती सदृश जमीन तयार केली.
बालपणी गावात शेण माती अन् गोमूत्र हाताळण्याचा अनुभव असल्याने हे सगळे हताळणे सोपे गेले.

चिमणराव यांचे काही धागे वाचले असल्याने त्यांना थेट फोन करून थोडी माहिती घेतली. आणि पावसाळा सुरू झाला!
आधी टाकलेल्या केर, आंब्याच्या कोयी यातून भरपूर रोपे उगवली. अनावश्यक काढून टाकली आणि काही बियाणे आणून बिया पेरल्या.
पहिल्या वर्षी मुलाचा प्रकल्प अहवाल इतकाच मर्यादित हेतू होता पण अपेक्षेपेक्षा जास्त निसर्ग देत होता.

यावर्षी मात्र आधी ठरवून भाजी आणि फळे ही थीम घेऊन सुरुवात केली.

भेंडी, कारली, राजगिरा घेवडा भरपूर आले. टोमॅटो जरा उशीराने सुरू झाले पण जेव्हा आले तेव्हा अनपेक्षित पणे दोन रोपांना मिळून ९६ आले...!
त्याच्या वजनाने झाडे टेकू लागली म्हणून बांबूचे तुकडे आणून आधार दिला. या मधल्या काळात दहाबारा टोमॅटो खराब झाले असतील.
आता रोज साताठ टोमॅटो तयार होत आहेत. म्हणजे जवळजवळ एक किलो! घरी खाऊन, शेजाऱ्यांना देऊन वर उरले. टोमॅटो फेस्ट साजरा झाला. आता सहा रोपे वाढत आहेत, म्हणजे मार्चला परत एक महोत्सव!
साठ ते नव्वद दिवस ही सायकल आहे, त्यामुळे वर्षभर मिळण्याचे नियोजन करत आहे.

सध्या भोपळ्याचे आणि काकडीचे वेल वाढलेत, त्यात भोपळ्याला खूप फुले येत आहेत पण बुरशी वाढते आणि फुले गळून पडतात.
मिरची आणि फ्लॉवर रोपे आणून लावली आहेत. पपईचं रोप आपोआप आलं आहे, पण एक वर्ष जाईल फळे यायला. आपोआप वाढलेले वड, पिंपळ, जांभूळ, सीताफळ ही रोपे देऊन टाकणार आहे. ती गच्चीत वाढवून उपयोग नाही.

सकाळी आणि संध्याकाळी वेळ मिळेल तसे मी बराच वेळ इथे देतो. सोबतीला आवडती गाणी वाजत असतात. टेरेस वर उंच टाकी आहे, तिथे एक घार फॅमिली राहते. ते कधीतरी हल्ला करायचा प्रयत्न करतात. पण हे सकाळी साडेसात पर्यंतच. नंतर रात्री पर्यंत घारी आमच्याकडे दुर्लक्ष करतात.

हा प्रयोग यशस्वी झाला असल्याने आता या पावसाळ्यात बागेचे क्षेत्र दुप्पट करणार आहे. जागा भरपूर आहे..यंदा फुलांचा समावेश होईल.
मधमाशी पालनाचा विचारही फक्त मनात आहे..बहुतेक पुढील वर्षी करेन.

काही चित्रं चिकटवत आहे. प्रतिसादात अजून काही टाकेन. चित्रे टाकायला मदत करणारे श्री चिमणराव, सामो आणि चिं. ज़ं. यांचे आभार!

टोमॅटो रोपे आणि फळे

1

2

3

भोपळ्याचा वेल आजारी आहे...

4

मक्याला आलेले दमदार स्वीट कोर्न:

5

मोहरीच्या फुलंवर फुलपाखरू...

a

अशी पालेभाजी मधे मधे मिळत असते.

6

पहिल्या वर्षाच्या मानाने बटाट्याचं पीकही बरं आलंय..

7

कलिंगडची सुरुवात बरी झाली, पण नंतर फळे गळून पडली.

8

आमच्या अनुपस्थितीत हे पाहुणे हजेरी लावून जातात!

9

परवा धागा काढेपर्यंत घार सकाळी हल्ला का करते हे कळत नव्हते.. दोनदा डोक्यावर झडप घालून मला घाबरवायचा प्रयत्न करत होती.आमचे चिरंजीव निरीक्षण करत होते, त्यावेळी घारीची दोन क्युट पिल्ले नारळाच्या झाडावर घरट्यात दिसली. त्यांच्या काळजीने घार आम्हाला तिकडे फिरकू देत नाही! खरं म्हणजे हे झाड थोडे दूर, आमच्या शेजारच्या इमारतीत आहे. मग डोक्यात उजेड पडला.. दसऱ्याच्या वेळी घार दोरे, काड्या जमवत होती!

आता पिल्ले उडून जाई पर्यंत दोन महिने त्यांचे निरीक्षण करणे हा आणखी एक विरंगुळा मिळाला..:)

घारीचे पिल्लू कधीच पाहिले नव्हते!

b

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/01/2021 - 01:50

In reply to by सिद्धि

आहा, काय सुंदर दिसतंय हे झाड.

मी ते सेलोसिया/कुर्डूचं झाड लावलं तरी सवयीच्या भाज्या-फळांपलीकडे फार काही खात नाही. मी ते सगळं शोभेसाठीच लावते. येत्या शनिवारी बिया पेरणारे.

राजगिऱ्याचाही बिया फारच थंड झाल्यामुळे उगवल्या नसणार.

सामो Sat, 09/01/2021 - 15:52

ऑटोबान, बर्डस & ब्लुम्स च्या फेसबुक पोस्टस फार आवडतात. वेड्यासारख्या आवडतात मला. पक्ष्यांची ओळख होते, व कितीतरी टिप्स मिळतात. पैकी - ते सांगतत, नेटिव्ह रोपे, झुडुपे लावा. आणि वैविध्य ठेवा. तण काढून टाका व मोठाले वृक्षही लावा. ज्यायोगे खूप फुलपाखरे, पक्षी पाहुणेरावळे येतील. बर्फात झुडुपांचा आडोसा या पक्ष्यांकरता निर्माण होतो. तेव्हा हिवाळी झाडे लावाच.

सिद्धि Wed, 13/01/2021 - 21:52

In reply to by सामो

खरंय. आमच्या घराजवळच फुलपाखरांसाठीची बाग आहे. कॉलनीतले काही जण तिची निगराणी करतात. (अळ्यांसाठी लागणारी झुडपं लावणे, फुलपाखरांची पैदास वगैरे). नक्की डिटेल्स माहिती नाहीत पण तिथली बरीच फुलपाखरं उडत उडत आमच्या बागेतपण येतात. 

पक्षांचे ढोबळ सोडले तर बाकीचे प्रकार फार माहिती नाहीत पण हमिंगबर्ड, किमान दोन ते तीन प्रकारचे चिमणीच्या आकाराचे पक्षी येऊन जाऊन असतात. सध्या घरून काम करत असल्याने दुपारचे जेवण बागेत करतो. पक्ष्यांशी बोलत, त्यांना बोलावत जेवताना आमचा छोटा माणूस मजेत असतो. 

चिमणराव Thu, 14/01/2021 - 05:53

In reply to by सिद्धि

हे शक्य नसल्याने जेवणाच्या टेबलावर दोन चार झाडे ठेवून हौस भागवतो.

फुलपाखरांसाठी घाणेरी ( lantana) weed आहेच. इतरही आहेतच. पण करोना आणि डासांसाठी सतत फवारे मारले जात असल्याने हे दोन सोडून सर्व कीटक नष्ट झाले आहेत. असो.

'Garden up' channel छान आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 14/01/2021 - 20:21

In reply to by सिद्धि

फुलपाखरांना आवडतात अशी तुमच्या भागातली स्थानिक झाडं कुठली ते शोध. साधारणतः छोट्या नर्सऱ्या, वाईल्डफ्लावर सेंटर वगैरेंकडे अशी माहिती, बिया, रोपटी मिळतात. आमच्या इथे एका स्थानिक केबलचॅनलच्या संस्थळावरही अशी बातमी मिळते.

आणि एक उपाय म्हणजे स्थानिक रानफुलांच्या बिया मिळतात. मी हे सगळे प्रकार तिर्रीसाठी करते. फुलांमुळे फुलपाखरं, पतंग, इतर कीटक, मग पक्षी येतात. ती ह्या सगळ्यांच्या मागे लागते. मग माझी करमणूक होते.

सामो Thu, 14/01/2021 - 21:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वाह!! खूप मस्त. तिर्री चा हातभार आहे कीटक संवर्धनात तर :)
टेक्सास, सॅन अँटॉनिओमध्ये भर दुपारी रस्त्यावर फुलपाखरे मरुन पडलेली पाहीलेली आहेत. भोवळ येउन वगैरे मरतात की काय कोण जाणे. काय राक्षसी ऊन असे कधी कधी १०४-११० डिग. फॅरनहाईट वगैरे :(

सिद्धि Tue, 23/03/2021 - 00:48

हा धागा वर काढतेय. 
वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाचे निमित्त साधून बागेत आवराआवरी केली ह्या विकांताला. मका (बिया आणून) पेरलंय. बघु कितपत यशस्वी होतो प्रयोग. ह्याखेरीज काकडीचे बी आणि लसूण पेरलेत. शिवाय एक दोन फुलझाडांच्या बिया. बागेतल्या मोट्ठ्या झाडांमुळे बऱ्यापैकी सावली असते त्यामुळे ऊन येणारी जागा शोधायला बरीच कसरत करावी लागते. आता भारतीय दुकानात जाईन तेव्हा पेरण्यासाठी अरवी आणेन. टोणगा टोमॅटो ( तोच तो फुलं येणारा पण फळ न धरणारा ) काढावा की असू दे ह्या विचारात आहे. शिवाय उन्हाप्रमाणे जागा बदलणे सोपे जावे ह्यासाठी काही झाडं कुंड्यात आहेत ( कढीपत्ता , मिरची, शेवगा).  एक तीन छोट्या बांबूच्या कुंड्यांचा  सेट आणलाय. त्यांत काय लावू हा विचार करतेय. सुचवा सोपं काहीतरी.  

बाकी नेहमीचे यशस्वी कलाकार ( अदिती,अचरटकाका, टॅनोबा, भाऊ ) काय म्हणतात ?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 23/03/2021 - 06:14

In reply to by सिद्धि

आमच्याकडे अनपेक्षित आणि फार जास्त थंडीमध्ये बऱ्याच झाडांचं नुकसान झालं. पण आता बरीचशी झाडं पुन्हा वाढायला लागली आहेत. पानगळीच्या काळात मी पानं गोळा करून, चुरडून वाफ्यांमध्ये पसरून देते. त्या आच्छादनामुळे बरीच फुलझाडं वाचली. गझानिया, जर्बेरा वगैरे वाचतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण माझ्या आळशी-कंजूषपणामुळे ती पुन्हा परत येत आहेत.

आमच्याकडे मागीलदारी बरीच सावली आहे आणि तिथे बरीच जागाही मोकळी आहे. आता मी तिथे रोपं लावायला सुरुवात केली आहे. हळूहळू फोटो लावते त्याचे.

सध्या भाज्यांमध्ये टोमॅटो, झुकिनी, वांगी आणि मिरच्या लावल्या आहेत.

चिमणराव Tue, 23/03/2021 - 10:13

In reply to by सिद्धि

@सिद्धि,
सध्या या फेसबुक ग्रुपकडे सरकलो जॉईन झालो आहे.

गच्चीवरील माती विरहित बाग संस्था - https://facebook.com/groups/pltambe/

खडकी गच्ची व परसबाग
https://facebook.com/groups/2167503466836189/

आणि
दुर्मिळ वनस्पती माहिती आणि उपयोग -

https://m.facebook.com/groups/129710604383987/

बागकाम अमेरिका ( मायबोली ग्रुप आहे) हा आमच्यापेक्षा वेगळ्या हवामानाचा बागकामाचा ग्रुप आहे. तिकडे जाऊन उपयोग नाही.

--------------------
शेवटी एकदाचे खरे बेझिल मिळाले. वाढवले. पण नक्की कसा कोणत्या पदार्थांत ( भाजी,आमटी,सलाड,कोशिंबीर, भेळ, वगैरे) उपयोग होईल सांगता येत नाही कारण तुळशीचाच वास आहे. परदेशी गुणगान गायलेला pesto आमच्या कामाचा नाही. (परमेसन चीज सॉस आहे.)
आता इतर लवेंडर, रोजमरी, थाईम, ओरिगानो आणून वाढवण्याचा उत्साहही गेला आहे.
पण लसुणपान उर्फ chives चांगलं वाढतंय, आणि डोसा टॉपिंग किंवा रोस्टेड सँडविच किंवा कोथिंबीर चटणीने त्यास आपलं म्हटलं आहे.
हे झाड आणि चिनी गुलाब आणि दोन झाडं आहेत ती बांबू टोपल्यांना योग्य आहेत. १) dwarf morning glory , 2) Russelia red flowers plant
(- आचरटबाबा ,)

भाऊ Tue, 23/03/2021 - 15:28

मिरची, वांगी रोपे लावली आहेत. तीन वांगी आलीत.
मागच्या सीझनला हिट्ट झालेले टॉमॅटो झाड वाळून आता नव्याने बहरत आहे. लिंबाची रोपे आली आहेत, ती वाढवायची आहेत.
पपई आणि आंबा मोठ्या पिपात हलवणे आवश्यक आहे.
याशिवाय वड, पिंपळ, चिंच आणि जांभूळ अशी मोठी वाढणारी रोपे एका संस्थेला देण्यात येणार आहेत. ते तळजाई, पर्वती वगैरे टेकड्यांवर जाऊन लावतात अन् वाढवतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 31/03/2021 - 03:14

या मोगऱ्याला मराठीत काय म्हणतात? जालावरून मागवलेला, आज आला. या आठवड्यात जमिनीत लावून देईन.
grand duke jasmine

इथल्या विचित्र हिमवादळात अख्खा मोगरा कोळपला होता. त्याला आता नवीन फुटवा आलेला आजच दिसला. त्या कोळपलेल्या फांद्या आता छाटायलाच हव्यात.

सामो Wed, 31/03/2021 - 18:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आई ग्ग!! हा बटमोगरा आहे का? हा डबल मोगरा नाही.
_________________
टपोरा असतो. पहाटे पहाटे दवात न्हालेला आठवतो आहे. लहानपणी आजोळी पहाटे देवासाठी फुले गोळा करायचे काम माझे होते. तगर, मोगरा, प्राजक्त.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 01/04/2021 - 00:15

In reply to by भाऊ

याचं इंग्लिश नाव आहे - Grand Duke Jasmine

पूर्ण उन्हात लावू नका, अर्ध-सावलीत लावा असं गूगलून सापडत आहे. भाऊ, तुम्ही हा मोगरा लावला आहेत का? तुमचा काय अनुभव आहे? मी साधा मोगरा अर्ध-सावलीत लावलाय, भरभरून फुलं येतात.

आमच्याकडे उन्हाळ्याचे दोन ते तीन महिने पाऊस नसतो, तापमान नियमितपणे ३५ सेल्सियसच्या वर जातं, अधूनमधून ४०च्या पुढेही जातं. आणि दिवसाचा उजेड १४+ तास असतो. त्या उन्हात फक्त स्थानिक झाडं-झुडपंच तग धरून राहतात; रोज पाणी दिल्यावर फक्त भेंडीलाच फळ धरतं; टोमॅटो, वांगी, काकडी वगैरे सगळं बाद असतं त्या काळात.

भाऊ Tue, 06/04/2021 - 11:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही, मोगरा लावला नाही अजून.
पण लहानपणी खेड्यातल्या घरी दोन्ही प्रकारचे मोगरे होते, हा आणि साधा सुगंधी मोगरा.

'न'वी बाजू Thu, 17/06/2021 - 20:28

In reply to by 'न'वी बाजू

हा आमच्या बॅकयार्डातला साप.

('आमचा साप' किंवा 'घरचा साप'.)

गोग्गोड आहे, नै? (बोले तो, साप. ब्लॅकबेरी नव्हे. ब्लॅकबेरी आंबट-तुरट होती.)

Snake-1

Snake-2

Snake-3

Snake-4

पर्स्पेक्टिव्ह Thu, 17/06/2021 - 23:19

In reply to by 'न'वी बाजू

नै, खाऊन पाहिला की काय? म्हणजे ब्लॅकबेरी आंबट-तुरट होती असे तुम्हीच म्हणालात, म्हणून विचारलं.

बादवे, तो सापदेखील तुमच्या तळहातावर असता तर मान्य केलं असतं, की तुमचा साप आहे म्हणून. ती ब्लॅकबेरी तुमचीच होती हे मान्य करायला मला काहीच प्रत्यवाय नाही. होक्कीनै?

जोक्स अपार्ट, मला तो वायपरसारखा वाटतोय, तेव्हा (घरचा असला तरी) त्याच्यापासून जरा लांबच रहा.

'न'वी बाजू Fri, 18/06/2021 - 01:13

In reply to by पर्स्पेक्टिव्ह

नै, खाऊन पाहिला की काय? म्हणजे ब्लॅकबेरी आंबट-तुरट होती असे तुम्हीच म्हणालात, म्हणून विचारलं.

नाही बुवा. अजूनपर्यंत तरी हे श्वापद मी खात नाही.

बादवे, तो सापदेखील तुमच्या तळहातावर असता तर मान्य केलं असतं, की तुमचा साप आहे म्हणून.

हम्म्म्म... पॉइंट आहे.

वेल. माझ्या तळहातावर नाही, परंतु परवा माझ्या बायकोच्या ऑलमोस्ट हातात आला होता. झाले काय, की बायकोने लावलेल्या भाजीच्या मळ्यात अध्येमध्ये उगवलेले तण तिने उपटून बाजूला काढून ठेवले होते. त्यातच जुना पाइनस्ट्रॉसुद्धा काढून त्याच्यावरच थर करून ठेवून दिला होता. तो पाचोळा अधिक पाइनस्ट्रॉचा थर फेकून द्यावा, या उद्देशाने तिने उचलला, तर त्याच्या तळाशी - आणि तिच्या हातात! - हे महाशय वळवळत होते. तसाच टाकून दिला आणि पळाली.

पण तो साप माझा असल्याबद्दलचा तुमचा मुद्दा विचारात घेण्याजोगा आहे. म्हणजे, काय आहे, की आजपावेतो हे श्वापद मी माझ्या बॅकयार्डात किमान पाचदा पाहिलेले आहे. (चारदा जिवंत, एकदा मृत. मागे दोन वर्षांपूर्वी एकदा भाजीच्याच मळ्यात वळवळताना आढळले होते. नंतर मग एक वर्ष मळ्यात काही लावले नव्हते, नि त्यानंतर आमचा त्या वेळचा लॉन मोव करणारा मनुष्य बरेच महिने गायब झाल्याने त्या भागात गवताचे जंगल झाले होते. त्यानंतर दुसरा एक लॉन मोव करणारा शोधून ते साफ करून घेतले, तेव्हा त्याच्या आफ्टरमाथमध्ये त्या भागात एका स्पेसिमेनचे छिन्नविच्छिन्न झालेले अवशेष सापडले होते. नंतर दोन आठवड्यांपूर्वी घराच्या बाजूला ठेवून दिलेल्या कचऱ्याच्या डब्याखाली मला दिसला होता. चौथ्या वेळेस माझ्या बायकोने पाचोळ्यासकट उचलला होता, तो. नंतर काल पुन्हा तिथेच सापडला. फक्त, या वेळेस मी त्याचा नीट फोटो घेऊ शकलो, इतकेच.)

सांगण्याचा मतलब, याचा अर्थ इतकाच, की (१) हे श्वापद आमच्या बॅकयार्डात राहाते, कायमस्वरूपी राहाते, आणि (२) बहुधा कळपाने राहाते. खरे तर आम्ही त्याच्या जागेत राहातो, असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. म्हणजे, तो आमचा साप आहे, की आम्ही त्याची माणसे आहोत, हा खरा प्रश्न आहे. किंबहुना, त्याने एकदा 'ऐसीसर्पाक्षरे'मध्ये आमचा फोटो 'आमची माणसे' म्हणून छापला होतान्, अशी किंवदन्ता आहे. (कधी काढलान्, कल्पना नाही.)

जोक्स अपार्ट, मला तो वायपरसारखा वाटतोय, तेव्हा (घरचा असला तरी) त्याच्यापासून जरा लांबच रहा.

होय, जपूनच राहिलेले बरे, हे खरे. आणि, जोवर त्याची जातपात माहीत नव्हती, तोवर खरे तर घाबरूनच होतो. मात्र, काल पहिल्यांदा त्याचा फोटो घेऊ शकलो, म्हटल्यावर, लगेच तो सापाची जात आयडेंटिफाय करणाऱ्या एका सायटीकडे पाठविला. (काय आहे, की आमच्या भागांत साप आढळणे ही गोष्ट तशी नवीन नाही, आणि त्यातले बहुतेक बिनविषारी असतात, परंतु, कॉपरहेड, कॉटनमाउथ उर्फ वॉटर मोकॅसिन, झालेच तर डायमंडबॅक, असल्या काही डेडली जातीसुद्धा आढळतात. त्यामुळे, जोवर नक्की माहीत नाही, तोवर काहीही गृहीत धरता येत नाही. त्यात पुन्हा आमच्या घराच्या बाजूला तळे (लेक) आहे.) तर त्यांच्याकडून उत्तर आले, की ही DeKay's Brown Snake म्हणून बिनविषारी जात आहे, म्हणून. मातीत, झालेच तर गवतात, पालापाचोळ्याखाली वगैरे राहाते; गांडुळे, गोगलगायी वगैरे खाते. कधीकधी पक्षी त्यांना खाऊन टाकतात, वगैरे. हार्मलेस आहे, वगैरे.

अर्थात, तरीही, जपून राहाणे आलेच. One should never throw caution to the wind. फक्त, उगाच घाबरण्याचीही गरज नाही, इतकेच.

----------

(ही जात जास्तीत जास्त एक ते दीड फूट लांबीपर्यंत जाते, म्हणे. आमचा स्पेसिमेन जेमतेम सहा इंच वगैरे असेल. आणि, साधारणत: स्पोर्ट्स शूजच्या नाडीइतका जाड. म्हणजे बहुधा बाळ असावे.)

----------

'सर्पाक्षरे'करिता 'नागमोडी' असाही एक प्रतिशब्द आहे. असो.

'न'वी बाजू Mon, 21/06/2021 - 22:19

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तूर्तास साधेच आहे.

सापड्या!!!

(जुन्या बालविनोदावर आधारित.)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 21/06/2021 - 22:22

In reply to by 'न'वी बाजू

हे अगदीच अपेक्षित आहे. लवकरच बरं नाव ठेवा, नाही तर तुमच्या 'न'व्या बाजूबद्दल मला संशय वाटायला लागेल.

भाऊ Thu, 17/06/2021 - 23:07

बाबो!
डेंजरस दिसतो साप! पुढे काय होतं त्याचं?

'न'वी बाजू Fri, 18/06/2021 - 01:04

In reply to by भाऊ

फोटोगिटो घेऊन झाल्यावर वाटेतून दूर करण्यासाठी उचलून फेकून द्यावा, म्हणून रेकने उचलण्याचा प्रयत्न केला, तर पळून गेला. (म्हणजे, बॅकयार्डातच घुटमळत असणार कोठेतरी; आणि त्या भाजीच्या मळ्याच्या आसपासच बहुधा. नाहीतर जाणार कोठे तो तरी? परंतु, तात्पुरता दृष्टीआड झाला आहे खरा.)

तूर्तास त्याचा फारसा विचार करत नाहीये. (नाहीतरी करणार काय?) पुढेमागे पुन्हा दिसला, तर (म्हणजे, दिसेलच.) बघू. (तेव्हा तरी बघण्यापलिकडे काय करू शकणार आहे, हा प्रश्न आहेच.) तूर्तास, जपून राहाणे, बूट घातल्याशिवाय त्या भागात न जाणे, वगैरे पथ्ये पाळायची, इतकेच. (ती तशीही पाळत होतोच, म्हणा.)

----------

डेंजरस नाही, म्हणताहेत, हा त्यातल्या त्यात दिलासा आहे. (I certainly hope so.)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 03/08/2021 - 01:34

In reply to by 'न'वी बाजू

आणि भेंडी कुठल्या रंगाची आहे? मी या वर्षी बुटकी, जाडी, लाल रंगाची आणि लांबडी हिरवी लावली आहे. दोन्हींची फुलं पिवळीच दिसतात.

'न'वी बाजू Tue, 03/08/2021 - 01:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ते डिपार्टमेंट माझे नसल्याकारणाने...

(आली, की फोटो लावेन.)

'न'वी बाजू Thu, 05/08/2021 - 05:20

In reply to by 'न'वी बाजू

हे चित्र पाहा. सांगा काही अर्थबोध होतोय का ते.