काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: करोना चॅप्टर ३१ मे ते २ जून

निघताना नाही म्हटलं तरी आतून थोडं हलकं वाटत होतं.

युनिव्हर्सच्या जगड्व्याळ...(बाय द वे हा 'जगड्व्याळ' शब्द भारी आवडतो मला) भांड्याला आपण सूक्ष्म काही का होईना पोचा मारला असं काहीतरी फिलींग येत होतं.
थोडा खुशीतच नाशिकच्या निवांत रस्त्यांवरून सरसर परत निघालो.

जाता जाता दिसलेला एका निवांत सरकारी कॉलनीतला हा देखणा रस्ता:

rasta

नाशिक रोडवर पुढे पायानी थोडं अधू असलेला एक माणूस पाय ओढत चालताना दिसला.

त्याचे केस मेंदीमुळे भडक लाल रंगाचे झाले होते.

मला उगीचच ती शेरलॉकची होम्सची लाल केसवाल्या माणसांची गोष्ट आठवली.
त्याला बोल्लो, "भाई बस सिन्नरपर्यंत सोडतो तुला."

हा बिचारा पेशानी रंगकाम करणारा होता.
शिर्डीला पायी निघाला होता.

हातावर पोट असलेल्या मजुरांचे आपण अपराधी आहोत हे बोलणंसुद्धा 'ढोंगी' वाटावं अशी परिस्थिती आहे...

त्याला सिन्नर फाट्याला सोडला.

तितक्यात एका अननोन नंबर वरून फोन आला.
कोणी साहूजी म्हणून लीडर होते उन्नाववरून.
उन्नाव अर्थातच माहिती होतं.
(साहूजींचा पक्ष कोणता त्यात नको शिरुयात.)
साहूजी पण त्या तीन मुलांच्या संपर्कात होते आणि त्यांनी माझे खास नॉर्थच्या मृदू आर्जवी स्टाईलमध्ये आभार मानले.

मी घरच्या ओढीनं गाडी बिंग-बिंग मारत चाललो होतो.
हा परतीचा एकला ड्राईव्ह एन्जॉय करत नव्हतो असं काही मला म्हणवत नाही...
नुकतीच सर्व्हिस मारलेल्या गाडीची तृप्त मांजरीसारखी सुखद गुरगुर...
उजव्या बाजूला मोकळं पठार...त्याच्या पाठी मागे नांदूर - संगमनेरचे डोंगर...
डावीकडे मोस्टली हिरवी शेतं...
मे शेवट असल्याने संध्याकाळचे पावणेसात वाजलेतरी 'नारायण सुर्वे' बऱ्यापैकी फॉर्मात होते.
आणि त्यात हलका पाऊस सुरू झाला.
पुढे जवळ जवळ तासभर तरी गाडीतून समोर छान इंद्रधनुष्य दिसत राहिलं.

नारायणगावाजवळ सात वाजता पुन्हा नाशिकचे सत्संगी धनंजय ठाकरेंचा फोन आला.
बस-स्टॅण्डवर त्यांनी तिघांना जेवण पोचवलं होतं.
अमेझिंग को ऑर्डिनेशन... सत्संग हॅट्स ऑफ!

असंच को ऑर्डिनेशन मगाशी बसच्या वेळेस मिळालं असतं तर?...
मी स्वतः, प्रशासन, समाजसेवी संस्था आणि आपण सगळेच ह्या करोनाकाळात इंडियन टीमसारखे वागतोय.
एकाच वेळी प्रचंड ब्रिलियंट आणि प्रचंड ढिसाळ असं काहीतरी.

बाणेरला घरी पोचे पोचे तो दहा वाजले.
प्रचंड दमलो होतो... आई आणि बायकोनी आल्या आल्या आधी अंघोळीला पळवलं.
गर्रम शॉवरखाली बसून एक गारेगार बीअर मारली.
फ्रेश होऊन जेवायला बसे बसे तो अकरा!
सगळे जेवायला बसणार इतक्यात कुशलेंद्रचा फोन आला,
रात्रीपर्यंत जवळ जवळ १२ मजूर एस. टी. स्टॅण्डवर जमले होते.
पण आर. टी. ओ. चे लोक आले आणि सांगितलं की दुपारच्या बसेस शेवटच्या होत्या.
आज एकतीस मे असल्याने उद्यापासून अनलॉक १.० चालू होईल आणि परप्रान्तीय मजुरांना सोडणाऱ्या बसेस आता थांबवल्यायत.
सगळं विजयी-बिजयी फिलिंग खाड्कन उतरलं.
बेसिकली जगातलं सगळ्यात वाईट टायमींग होतं आमचं.
ऑफीशियली लॉक डाऊन संपल्यामुळे मजुरांची बसेसची सोय काढून घेतली होती.
आणि नॉर्मल सोयी तर अर्थातच इतक्यात चालू होणार नव्हत्या.

एस. टी. स्टँडच्या कंट्रोलर साहेबांशी बोलून बघितलं. १२ मजुरांसाठी एक शेवटची बस सोडता आली असती.
विनवण्या केल्या पण त्यांचा नाईलाज होता. 'वरतून' परवानगी नव्हती.

परत कुशलेंद्रला फोन केला तर तिनाचे बारा झालेला त्यांचा ग्रुप विनातक्रार एस. टी. स्टॅन्ड सोडून अपरात्रीच पायी चालायला लागला होता.

साहू साहेबांना फोन करून काही मदत होऊ शकेल का बघितलं ते ही प्रयत्न करत होते पण इतक्या रात्री अर्थातच काही शक्य नव्हतं.

शेवटी हिंपुटी होऊन झोपलो.

१ जून:
सकाळी साहूजींचा फोन आला.
रात्रभर चालल्यावर नाशिकच्या थोडं पुढे आपल्या पोरांना एका यु. पी. च्या बसवाल्यानी घेतलं होतं.

तो त्यांना भोपाळला सोडणार होता.

थोडं हायसं वाटलं आणि सोमवारच्या मीटिंग्जच्या धबडग्यात बुडून गेलो.

संध्याकाळी साडेसहाला परत कुशलेंद्रचा फोन आला.

हे लोकं भोपाळला पोचले होते.

उद्या त्यांची रेवाला जायची व्यवस्था होणार होती.

भोपाळ ते रेवा अजून ११ तास.

तिकडून शाहडोल ४ तास.

तिकडून बांधवगडच्या जवळपास त्यांचं घर ५० किलोमीटर.

२ जून:

संध्याकाळी पावणेपाचला फोन आला.

आपली पोरं घरी पोचली होती.

त्यांना आणि मलाही खूप खूप काही बोलायचं होतं..

पण ते बरेचदा "बहोत शुक्रिया" आणि मी बरेचदा "चलो अच्छा हुआ" इतकंच बोलत राहिलो.

तसंही आम्हा पुरुषांना आनंद नी प्रेम खुलून व्यक्त न करायचा बद्धकोष्ठी प्रॉब्लेम असतोच.

कधीतरी बांधवगडला येण्याचा वायदा करून आम्ही फोन ठेवला.

फाय-फकिंग-नली !!!

(दोन महिने आधी गोव्यावरून आणि)

३१ मेला सकाळी दहा वाजता पुण्यावरून चालू झालेली त्यांची फरफट शेवटी संपली होती.

मी त्यातल्या एका अगदी अगदी छोटयाशा तुकड्यात त्यांच्या बरोबर होतो.

अशा लाखो अश्राप जीवांचे लॉकडाऊनमध्ये किती आणि कसे हाल झाले असतील ह्याची किंचितशी कल्पना आली असं कदाचित म्हणता येईल.

काही निरीक्षणं:

  • आधीच सांगितल्यानुसार समाजसेवी संस्थांचा अप्रतिम समन्वय बघायला मिळाला.
  • पोलीस, एस. टी. वाले. आर. टी. ओ. ह्यांचाही हडेलहप्पी अनुभव आला नाही. थेट मदत करू शकत नसले तरी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सगळे काम करतायत. हायवेवर भेटलेल्या 'त्या' एस. टी. ड्रायव्हरनीसुद्धा पोरांना घ्यायचं नाकारलं कारण त्यालाही मध्येच रस्त्यात माणसं घेण्यात धोका वाटला असू शकतो.
  • पण नाशकात कुठून बस सुटतायत हे मात्र कोणी नीट सांगितलं नाही आणि आमचा बहुमोल वेळ वाया गेला त्याची चुटपुट लागून राहिली.
  • अनलॉक वनच्या पूर्वसंध्येला आम्ही गेलो ते भिक्कारचोट टायमींग होतं. "लॉकडाऊन"मधल्या गरिबांसाठीच्या सोयी काढून घेतल्या गेल्या पण "अनलॉक" काही लगेच चालू झालं नाही.
  • निवांत सामसूम नाशिक अजूनच सुंदर दिसतं Smile

बाकी घरी हॉट बायकोनी चार दिवस सेल्फ-क्वारंटाईन करायला लावलं तेव्हा हालत थोडीफार "वुल्फ ऑफ वॉल..." मधल्या लिओ सारखी झाली होती...

आणि जाता जाता साहूजींची परवानगी घेऊन त्यांचा डी. पी. टाकतोय.

ह्यातले साहूजी कोण ते तुम्हीच ओळखा.

Sahooji

---------------- समाप्त----------------

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बॉस !!! जबरदस्त !!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी माणूस आहात तुम्ही आणि लै भारी लिहिता पण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख मस्त. खरंच, ३१ मे मुळे घोळ झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्यांचे आभार Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0