करो ना!!

कुरंगनयना, सरोज कारखानिस ने व्यायामशाळा म्हणजे उच्चभ्रु भाषेत, जिम जॉइन करुन उणापुरा एक महीना झालाही नव्हता की जिममध्ये मेंबरांची संख्या एक्स्पोनेन्शिअली वाढू लागली. बाय द वे, सरोजनेदेखील जिम काही मेंबर म्हणुन जॉइन केलेले नव्हते. ती तिथे लागली होती जिम इन्स्ट्रक्टर म्हणुन. तसे तिथे आधीपासूनच ३ इन्स्ट्रक्टर्स होते. पण त्यांना फार मेंबर खेचता आलेले नव्हते. पैकी पहील्याला रेडा म्हणु यात, दुसऱ्याला गेंडा तर तीसरीला कैदाशीण म्हणु यात ना.रेड्याने प्रोटीन शेक्स पीउन पिउन शरीर कमावलेले होते. गेंडा बोलण्यात अघळपघळ व चतुर असला तरी त्याने फारसे दिवे लावलेले नव्हते. कैदाशिणीची मात्र बरीच वट होती कारण बहुसंख्य स्त्रियांना जिम इन्स्ट्रक्टरम्हणुन स्त्रीच लागे. त्यामुळे तिला बराच भाव होता. चवथे पात्र होते आपला दिनू टिपणीस. डाएट स्पेशिअलिस्ट कम मॅनेजर कम 'हॅन्डी मॅन'. डाएटचं काम तसं फार नसे, एकदा मेंबरसची आवडनिवड, सवयी, आरोग्यविषयक समस्या आणि गरजा कळल्या की , मग दिनूचे काम सोप्पे असे. एक विशिष्ठ व अतिक्लिष्ट असा डाएट प्लॅन बनवुन द्यायचा जो की आकाशातून ब्रह्मदेव जरी जमिनीवर आला आणि अनंतकाळ प्रयत्न करत राहीला, तरी तो प्लॅन तंतोतंत पाळणे त्यालाही शक्य होणार नाही. आणि मग वजन कमी झाले नाही तरी मेंबर कोणत्या तोंडाने तक्रार करणार बरोबर!

गद्धे पंचविशीतील दिनू आजकाल कंटाळु लागला होता. त्याच्या आयुष्यात नवीन काही, सनसनाटी नाही तरी दिलखेचक असे काहीच घडत नव्हते. जिम एके जिम, जिम दुणे घर. घरातही तेच जेवण, पुस्तके, फेसबुक, व्हॉट्सॅप .... कंटाळा कंटाळा आला होता. पण ज्या दिवसापासुन सरोज कामावर येउ लागली होती, त्या दिवसापासुन त्या रुक्ष जिममध्ये जरा तरी हिरवळ फुलली होती. टाईट ॲक्टिव्ह वेअर मध्ये सरोज रोज तिच्या टीमबरोबर कधी योगासने तर कधी पिलाटेज् ( pilates), कधी सूर्यनमस्कार तर कधी वेट-लिफ्टिंग करत असे. त्यामध्ये तिचे अकार, उकार, वेलांट्या ..... असो!! दिनू काही सन्यासी नव्हता त्याला भुरळ न पडती तरच नवल. पण त्याच्या मनाचा बेत, सरोजला कसा कळावा? असेच दिसामागुनी दिस व ऋतूमागुनी ऋतु चालले होते आणि ....... अचानक ते संकट येउन ठेपले. कोणते? अहो महामारी, पॅनडेमिक,जगबुडी, कोव्हिड -१९ चे. जिम बंद करण्याचे आदेश निघाले व त्याची अंमलबजावणीही झाली. मात्र उत्तम सेवा देणाऱ्या कोणत्याही सेवादात्याला, क्लायंटची कमी भासत नाही, तद्वत काही स्त्रिया मात्र त्या महामारीतही ,सरोजच्या अशील(कस्टमर) म्हणुन टिकल्या. सरोजने फेसबुकवरती लाईव्ह येउन, आठवड्यातले ३ दिवस त्यांचा व्यायाम करुन घ्यावा अशी टुम त्यांनी काढली. बरं व्यायामाइतकाच डायेटचाही सहभाग महत्वाचा म्हणुन दिनूलाही त्या टिममध्ये सामिल व्हावेच लागले. अर्थात फेसबुक आय डीज ची देवघेव अपरिहार्यपणे, आलीच. जर कोव्हीडचे संकट नसते तर कशाला फेसबुक अन कशाला व्हॉट्सॲप दिनूचे व सरोजचे संबंध फक्त सहकारी म्हणुन वरवरचे व रुक्ष राहीले असते मात्र आता करोना देवदूतासारखा मदतीला आलेला होता.

तर दर आठवड्याला, लाइव्ह योगा क्लास व १५ दिवसातुन एकदा डाएट सल्ला सेशन सुरु झाले. जर १५ दिवसात कोण्या मेंबरचे वजन कमी झाले नाही तर ब्लेमगेम खेळला जाउ लागला. दिनूच्या डाएट प्लॅनमध्ये कमतरता राहीली की सरोजने नीट व्यायाम करवुन नाही घेतला याबद्दल व्हॉट्सॲपवरती , ग्रुप-डिस्कशन होउ लागले. कल्प्रिट अर्थात चूकी होती - संचारबंदीची. घरी बसून कंटाळलेले मेंबर नवेनवे , मेदयुक्त, कर्बोदकयुक्त मस्त रुचकर पदार्थ करत होते आणि त्यांच्या वजनाची लागत होती वाट. ठपका मात्र बिच्चाऱ्या दिनू-सरोजवरती. यावर त्या दोघांनी ठरवुनच टाकले की हा ब्लेमगेम एकदाचा थांबवायचा आणि मेंबर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणिव करुन द्यायची. पण हे लढाईचे आडाखे रचायचे कसे/कुठे. संचारबंदीमुळे भेटता तर येत नाही. अरे मग झुक्या कशाला आहे. फेसबुकवरती तर आरामात प्रायव्हेट चॅट करता येतेच की. दोघांचे असे रोजचे चॅट सेशन सुरु झाले. वाह!! सुंदर सुंदर फोटो, पोस्टस आणि आता कामच्या मिषाने, मस्त गप्पा सुरु झाल्या.मग गप्पागप्पातुन मस्त मस्त गाण्यांच्या लिंका जाऊयेऊ लागल्या. ती इंदिरा संतांची ओळ आहे ना -

असेच काही द्यावे-घ्यावे, दिला एकदा ताजा मरवा
देता-घेता त्यात मिसळला गंध मनातील त्याहून हिरवा!

तसे काहीसे होउ लागले. गोड, मधुर हिंदी गाणी, देताघेता, गप्प अधिक गहीऱ्या होउ लागल्या. मैत्रीचा वसंत बहरु लागला. एकमेकांच्या आवडी-निवडी एकमेकांना कळू लागल्या. आपापले लहान सहान लकबी, मूडस दुसऱ्यावर काय परीणाम करतात त्याचा अदमासा येउ लागला. कोव्हीड १९ ने भले दुनियेचे नुकसान झाले पण आपल्या प्रेमी युगलाकरता मात्र कोव्हीड क्युपिड ठरला. अर्थात, मेंबर्सनाही फायदा होतच होता की. दोन्ही इन्स्ट्रक्टर्सचा, व्यायामाबद्दल, डायेटबद्दल, पेप-टॉक अतिशय परीणामकारक होउ लागला होता. आनंदी मूड, उत्साह कंटेजिअस असतो म्हणजे त्याची लागण होते. तसा दिनू व सरोजचा उत्साह, मेंबर्स करता अत्यंत उत्तम ,परीणामकारक ठरत होता. हे म्हणजे आम के आम और गुठलीके दाम झाले होते म्हणजे प्रेमात पड्ण्याचा फायदा तर झालाच परत उत्तम परफॉर्मन्स्मुळे, क्लायंटही खूष व वेळेवर पगारही बँकेत जमा. दोघेही तरुण होते, दोघांचेही रक्त् सळसळणारे होते व दोघेही एकमेकांना आवडू लागले होते ते काय आपल्या म्हाताऱ्यांसारखे 'गोंदवलेकर महाराज आणि दत्ताच्या पोस्टस' पाठवत बसणारेत का? की 'उद्धव ठाकरे आणि मोदींच्या' बद्दल तासन तास वाद घालत बसणारेत? की प्रायव्हेट चॅटमधुन, पाककृती टाकत बसणारेत? अर्थात या चॅट सेशन्स्ची परीणीती मैत्रीतून, प्रेमात व प्रेमातून चावटपणात बदलली हे दोघांना कळलेही नाही. दिनूने, सरोजला प्रपोझ केले. Smile

एव्हाना ५ महीने संपून, कोव्हीडची लसही आलेली होतीच. आता थिअरी पुरे प्रॅक्टीकल परीक्षा देण्याची वेळ येउन ठेपली होती. तेव्हा लवकरच दिनू-सरोज विवाहबंधनात बद्ध झाले. करोनाची करामत म्हणुन, मुलगी झाली तर करोना आपलं करीना नाव ठेवायचे व मुलगा झाला तर करण नाव ठेवायचे दोघांनी निश्चित केले. Wink

- समाप्त -

field_vote: 
0
No votes yet