त्रूफोची नजर पाहताना... ०१

*लिहिताना मी प्रकाराचा, शैलीचा फारसा विचार करत नाही. परंतु लेखनप्रकार निवडण्यास भाग पाडलं गेल्यामुळे माझ्या सर्व लिखाणाला 'ललित' म्हणायचं ठरवलं आहे.*
*लेखांना आकडे देण्याचं एकमात्र कारण म्हणजे त्रूफोच्या सिनेमासंबंधी मी याच शीर्षकाखाली लिहिणार आहे.*
*कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो.*

'..देर्निए मेत्रो'चं पोस्टर. एक बाई आणि पुरुष अंधारातून रोखून पाहताहेत. पुरुषाने झडपेसारखं काहीतरी उचलून धरलं आहे, त्यावर नात्सींचा झेंडा रंगवलेला. हे तर स्वतःच लपून बसल्यासारखे वाटतायत. यांचे डोळे सांगतायत की यांच्या छातीत धडधडतंय. संध्याकाळी लगोलग फिल्म पाहिली. चला, पाहता पाहता पोस्टरमधला स्टिल (स्थिरचित्र) नेमका कोणत्या दृश्यात आहे / कोणत्या दृश्यावरून प्रेरित आहे ते शोधून काढू.

.. मारिआँच्या हातात कंदील आहे. मारिआँ (Marion) व बेर्नार (Bernard) अंधाऱ्या तळघरात उतरतात. तिथे मारिआँचा ज्यू नवरा, नाट्यदिग्दर्शक लुका श्ताइनेर (Lucas Steiner) गुप्तपणे राहतो आहे. तळघर तपासण्याकरता आलेल्या पोलिसांपासून लुकाचं अस्तित्व तडकाफडकी लपवण्याकरता मारिआँला बेर्नारची मदत हवी आहे.

पोलिस तळघरात उतरतात. लुका आणि बेर्नार अंधारातून श्वास रोखून पाहत राहतात. सारे निघून गेल्यानंतर दोघेजण अडगळीतून बाहेर येतात. लुका म्हणतो "बायको सुंदर दिसते ना माझी? ती तुझ्या प्रेमात आहे बेर्नार, पण तुझं तिच्यावर प्रेम आहे का ?"

दुसऱ्या महायुद्धात नात्सींनी फ्रान्स गिळंकृत केला होता त्या काळातील ही गोष्ट - 'लं देर्निए मेत्रो' (Le dernier métro).

पोस्टरमधे जे होतं ते फिल्ममधे हुबेहूब सापडलं नाही, सापडण्याची अपेक्षाही नव्हती माझी. पोस्टरनं मला माहिती पुरवली नव्हती, ते जणू माझ्याशी मोघम बोललं होतं. पण त्याच्या आवाजातली कंपनं माझ्या लक्षात राहिली होती. फिल्मभोवती या कंपनांचं धुकं साचलं होतं. या धुक्यात आता शिरायलाच हवं होतं...
पुढे एका मुलाखतीत फ्राँस्वा त्रूफोचे (François Truffaut) हे उद्गार वाचले: "फिल्म्स पाहण्याचा नाद लागला तेव्हा मी बारा वर्षांचा होतो. फ्रान्स मुक्त झाला होता, पॅरिसच्या पडद्यांवर अमेरिकन चित्रपट ओसंडत होते. थिएटरबाहेर लागलेली चित्रं बघून मी कोणती फिल्म पहायची ते ठरवत असे. नंतर का कोण जाणे, आवडलेल्या फिल्मच्या दिग्दर्शकाचं नाव वहीत टिपून घेण्याची मला सवय लागली. ...रस्त्याने जाता जाता थिएटरबाहेर लावलेल्या चित्रांकडे पाहून लोक सहज फिल्म निवडतात, दिग्दर्शकाचं नावबिव बघत नाहीत. गेल्या दहा वर्षांपासून मी अशा वाटसरूंचं कुतूहल चाळवण्याच्या आशेने फिल्म्स बनवतो." (एस्क्वायर, १९७०)

'..देर्निए मेत्रो' दोनदा पाहिली. दुसऱ्या वेळी काही कारणास्तव बरोब्बर पस्तिसाव्या मिनिटाला फिल्म थांबली. कम्प्युटरच्या पडद्यावर दिसणारं चित्र यापूर्वी माझ्या ध्यानातच आलं नव्हतं कारण ते अर्ध्याहून कमी सेकंदांत बदलत असे. मी फिल्म किंचित मागे नेऊन पस्तिसाव्या मिनिटावर थांबवली, बऱ्याचदा. दर मिनिटला अशी असंख्य चित्रं माझ्या डोळ्यांपुढून सरकत आहेत आणि मला ती हलल्याचा भास होतो आहे. आवाज मुद्रित करून चित्रांसोबत जुळवण्यात आला आहे, मला चित्र बोलतही असल्यासारखं वाटतंय. मी त्रूफोची फिल्म पाहतेय याचाच अर्थ मी त्रूफोची नजर पाहतेय.

फिल्ममधल्या नाटकात हेच घडतं - प्रकाशाच्या, रंगांच्या, पाठ संवादांच्या 'प्रयोगा'ला प्रेक्षक दाद देतात. फिल्ममधील नाट्यगृहाबाहेरच्या भवतालातसुद्धा हे घडतं. संवादातील (communication) तुटकपणा, अविश्वास, अति-औपचारिकता, पोकळ एकात्मता हे नात्सी अस्तित्वाचं अनिवार्य अंग बनून जातं. संकेतांना, चिह्नांना विशिष्ट प्रतिसाद देण्याची सक्ती होते. ज्यू असणं म्हणजे नक्की काय? - ज्यू माणसाला प्रश्न पडतो. ज्यू ओळख ही जणू नाटकातल्या पात्राप्रमाणे शोधावी लागेल, आठवावी लागेल, अचूक वठवावी लागेल; त्यात कमीजास्त होऊन चालणार नाही.

गोष्ट घडताना अनावधानानं जे निसटतं ते गोष्ट सांगणारी माणसं आपल्यापुढे मांडतात.

-

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet