१९०० | पालगड..

काळ उघडा करणारी पुस्तकं । लेखांक दुसरा

श्यामची आई
लेखक : पांडुरंग सदाशिव साने
प्रकाशन : १९३६

Shyamchi Aai

मी जेव्हा "श्यामची आई" पुस्तकात दिसणारा त्या काळाचा फोटो आल्बम, या विषयावर लेख लिहायला लागलो तेव्हा तो भसाभसा विस्कळीत होत गेला. कोंकणातल्या एखाद्या देवराईत कोणाच्या काटछाटीचं भय नसल्याने वाटेल तशी झाडं झुडपं अन वेली गुंताडा करत फोफावत जाव्यात तसं होत गेलं. त्याच काळातल्या एकमेकांच्या संदर्भांना साक्ष देणारी स्मृतिचित्रे, आमचा जगाचा प्रवास ही पुस्तकंही मी अर्धवट उष्टावून ठेवली. शेवटी क्रूरपणे खूप नोंदी "कापातल्या न्हाव्यांच्या" क्रूरतेने सपासप कापल्या आणि फक्त श्यामची आई या निरागसतेच्या पोथीवर फोकस ठेवला.

श्यामची आई हे पुस्तक मी लहानपणी आणि लहानपणभर सतत पुन्हापुन्हा वाचलं. आठ आणे, दीड रुपया अशा रेंजमधली परीकथांची पातळ पुस्तकं, रशियन भाषान्तरित रादुगाबिदुगा प्रकाशनं, मग उत्कर्षवाला फास्टर फेणे आणि भारांचे जवळजवळ सर्व हिरोज, हे सटासट येऊन जात असताना श्याम मात्र टिकून होता.

श्यामची आई हे पुस्तक कोणत्याही गावाच्या छपाईयंत्रावर का छापलं गेलं असेना, पण ते सर्व अर्थाने "कोंकणात छापून तेथेच प्रसिद्ध केले" प्रकारातलं आहे. कोंकणातच लहानपण जगलेला मी, म्हणून केवळ त्यातल्या वातावरणासाठी ते पुस्तक मनात टिकून राहिलं असेल. त्यातल्या "एज ऑफ इनोसन्स"च्या तात्त्विक चिंध्या होऊनही त्याचं कुठेतरी आकर्षण टिकून होतं.. आणि टिकून आहे. वाचक म्हणून वय वाढलं तरी आपल्याला श्यामच्या घरी एकदा तरी जायला मिळायला हवं होतं असं वाटत राहिलं.

तसं म्हटलं तर कोंकणातल्या आसपासच्या खेड्यांमध्ये अगदी तश्शी घरं आणि तस्सं वातावरण यांमध्ये जाऊन राहणं शाळूमित्रांमुळे असंख्यदा घडलं. माझ्या लहानपणच्या त्या काळात कोंकणात "बदल" या नावाखाली पाचोळाही इकडून तिकडे हलत नसे. त्यामुळे १९०० या शतकाच्या सुरुवातीच्या श्यामची संस्कृती माझ्या लहानपणीही अगदी पूर्ण कालबाह्य झाल्यासारखी वाटायची नाही.

साधारण तीच दशकं दाखवणारी आणखी काही पुस्तकं पुढे वाचण्यात आली. त्यातलं मुख्य म्हणजे स्मृतिचित्रे. पण तो एक स्वतंत्र विषय आहे. त्या पुस्तकात कोंकण नाही. पार्श्वभूमी वेगळी, पण काळाचे फोटो दाखवण्याबाबतीत ही पुस्तकं एकमेकांना साथ देतात.

त्याखेरीज इतरही अनेक पुस्तकं... काही पुस्तकांमध्ये ब्रिटिश, स्वातंत्र्यलढा, क्रान्तिकारक यावर फोकस असायचा. अशा पुस्तकांमध्ये काळाचे फोटो मिळाले तरी ते स्टुडियोतले वाटायचे. श्यामची आई आणि स्मृतिचित्रे यांमध्ये मात्र असा कोणताही एक फोकस नसल्यामुळे माणसांतले परस्परसंबंध, घरगुती नाती, ताणेबाणे, एकूण बाया आणि पुरुष यांच्या मनांची ठेवण, पैसाअडका, खाणंपिणं अशा सगळ्यासगळ्याची मनसोक्त हाय मेगापिक्सेल चित्रं दिसतात. स्वातंत्र्य, युद्ध, चळवळ, सत्याग्रह असा एक, डोळे तपासणीत असतो तसा काही कंपल्सरी "फिक्सेशन पॉईंट" श्यामची आई किंवा "स्मृतिचित्रे"त ठेवलेला नाही. त्यामुळे पेरिफेरल व्हिजनमध्ये धूसर काही दिसलं तर तिकडे सरळ वळून, रोखून आणि निरखून बघता येतं.

"मध्यमवर्गातल्या विसंगतींवर हसतखेळत भाष्य", किंवा "मी बुवा अगदी सामान्य मनुष्य, मला फार काही कळत नाही" असं म्हणत म्हणत दर चार ओळींनंतर उच्च फलसफे झाडणं असा कोणताही मुद्दाम स्वीकारलेला अभिनिवेश लेखनात नसल्याने हे पुस्तक म्हणजे लख्ख आरसा आहे.

या पुस्तकामध्ये त्या काळातलं मला काय दिसलं याविषयी मांडणी करणं अत्यंत विस्कळीत होणार आहे. आणि तसं मी करणार आहे.

या पुस्तकापुरताच आणि पालगड, दापोली, लाडघर, हर्णे आणि आसपासच्या परिसरापुरताच हा आल्बम आहे. त्यावेळी खरं जग पूर्ण वेगळंही असू शकेल. या आल्बममध्ये त्यावेळच्या उच्चजातीय घरातलेच फोटो जास्त आहेत. श्यामच्या घरी काम करणाऱ्या "मथुरी" कांडपिणीचा घरगुती आल्बम पूर्ण वेगळा असू शकेल. पण तो बनवलाच गेला नसेल ही शक्यता जास्त. तर या मर्यादा आहेतच.

श्यामची आई पुस्तकामध्ये दिसणारे पुरुष, विशेषतः श्यामचे बाबा हे अत्यंत अनाकलनीय आहेत. भाऊ म्हणजे श्यामचे बाबा हे वडवली गावाचे खोत. एकेकाळी प्रचंड वैभवात राहिलेले.. अशा गतवैभवाची वर्णनं करून, आठवणी काढून उसासे टाकणं हा आजही एका मोठ्या वर्गाचा आवडता टाईमपास असतो.

इथे श्यामच्या जन्मापासूनच अशी स्थिती आहे की "खोती सरली आहे. तेल आहे तर मीठ नाही". आर्थिक घसरण चालू झालेली आहे. काळ पाहून राहणीमानात बदल न करणं, पूर्वीच्या इतमामातच राहणं, कर्ज काढून लग्नमुंजीचा थाट करणं अशी कारणं पुस्तकातच उल्लेखलेली दिसतात. पण आवक का घटली? इनकमिंग ओघ का आटला ? याचं काही स्पष्टीकरण मिळत नाही. अशा घसरत्या परिस्थितीतच या पुस्तकातल्या जवळजवळ सगळ्या घटना घडतात.

श्यामचं सर्वकाही सांगून संपतं. पंधराएक वर्षांचा काळ कव्हर होतो. तरीही केवळ आला दिवस ढकलणे अशा अत्यंत निराशावादी परिस्थितीतून हे कुटुंब सूतभरही बाहेर येत नाही. "अहो शेणातले किडे का कायम शेणात राहतात ? तेही बाहेर पडतात" अशी "आशा" सावकाराच्या वसुली कारकुनाकडे लाचारीने व्यक्त करणारे श्यामचे बाबा पूर्ण काळात तितकेही बाहेर पडताना दिसत नाहीत. उलट दिवसेंदिवस फक्त शेण आणखी कुजतानाच दिसतं.

श्यामचे बाबा आणि एकूण कर्ते पुरुष दिवसभर बाहेर जाऊन काय करतात यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं, पण त्या दिनचर्येतल्या घरातली पूजा,स्नानसंध्या, देवळातली पूजा, भोजन एवढ्याच भागाचे तपशील मात्र ठळकपणे येतात. वडील हे घरात वसुली कारकून वाट पाहात ठाण देऊन बसलेला असतानाही, किंवा नंतर घराच्या जप्तीच्या दिवशीही आधी आंघोळ करुन देवपूजा करतात आणि देवळात जाऊन येतात.

भाजीत मीठ नसूनही श्यामचे बाबा खोटी वाहवा करत ती भाजी खातात आणि त्यामुळेच नंतर आईला प्रचंड गिल्ट देतात. आई मागाहून जेवायला बसेल तेव्हा तिला भाजीत मीठ नाही हे कळणारच असतं आणि हे बाबांना व्यवस्थित माहीत असतं. अशावेळी वडिलांनी जेवतानाच ते अळणीपण जाहीर केलं असतं तर चूक सुधारता आली असती. वेळीच वरुन मीठ लावून चव आणता आली असती. पण तसं न करण्यात आईला नंतर चरचरीत पश्चात्ताप व्हावा याखेरीज कोणताही उद्देश नसावा. आणि तो पश्चात्ताप तसा होतोच. तिच्या मनाला ते फार लागून राहतं. अखेरीस भाजीत मीठ नाही म्हणून वाईट वाटून घेणारी आई आणि तक्रार न करता अळणी भाजी खाणारे बाबा यांत "कोण जास्त महान" अशी स्पर्धा होते. त्याकाळी आजूबाजूला जगात किती जास्त वाईट वडील पुरुष दिसत असतील की ज्यामुळे हे वडील केवळ तक्रार न करण्याबद्दल महान वाटावेत, असा विचार मनात येतो.

दुर्वांची आजी ही एक नातेवाईक श्यामच्या घरातच कुटुंबाचा भाग बनून राहत असते. अत्यंत कठीण परिस्थितीतही, म्हणजे अगदी श्यामच्या आईच्या मृत्युपश्चातही ती अन्न शिजवून श्यामचे बाबा आणि त्यांची मुलं यांना खाऊ घालत असते. जप्ती ऑलरेडी आलेली असते. एव्हरग्रीन आणि प्रोग्रेसिव्ह दारिद्रयामुळे अर्थात नेहमीप्रमाणे घरात तेल, मीठ, भाजी काहीच नसतं.. "घरात स्वैपाकासाठी काहीच सामान नाही आता काय शिजवू?" अशी तक्रार दुर्वांची आजी करते तेव्हा त्याही परिस्थितीत दिलेलं श्यामच्या बाबांचं उत्तर रोचक आहे. "आमची अब्रू आणखी दवडू नका. नुसता भात शिजवून वाढा."

दुर्वांच्या आजीने हा उरलेला पीळ बघून गृहत्याग करायला हवा होता. पण तसं होत नाही. यावरुन नातेसंबंधातलं खूप काही अलिखित दिसून जातं. वास्तविक दुर्वांची आजी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. तिचं स्वतःचं शेत आहे. गावात सर्वांशी घरोबा आहे. ती भाऊरावांची "आई" नाही. तिने अडचण सहन करून खस्ता खात राहणं, भाऊंचा आणि त्यांच्या पोरांचा स्वैपाक करत राहणं अजिबात गरजेचं नाही असं आत्ताच्या काळच्या डिजिटल कलर फोटोमध्ये वाटलं असतं.

आईच्या शेवटच्या आजारात मावशी घरी येऊन राहते. ती शेवटच्या क्षणापर्यंत बहिणीची सर्व सुश्रुषा थुंकीमलमूत्रापासून सगळं बिछान्यावर पडल्याजागी करते. आईदेखील शेवटी हक्काने मुलांची जबाबदारी सरळ मावशीकडे देते. हाही फोटो त्याच आल्बममधला. जबाबदारी घेणं म्हणजे उचलून फक्त पैशाची मदत करणं ही आत्ताची व्याख्या त्यावेळी दिसत नाही. यात चांगलं वाईट काही नाही. फक्त स्नॅपशॉट्स.

श्यामचे मामा खुद्द श्यामला आणि त्याच्या भावंडांना त्याच्या घरी पुण्याला, मुंबईला शिकायला एकामागून एक सामावून घेतात. प्रसंगी स्वतः त्यांना घरी शिकवतात. ज्या घरी पोरंबाळं शिकायला पाठवली आहेत त्या घरी तांदळाचं पोतं इथून जावं आणि त्यांच्या घरी भाताची सोय व्हावी इतपतच व्यावहारिक देवाणघेवाणीचा उल्लेख आढळतो. पण इतकी नातेवाईकांची पोरं घरात ठेवून घेणं, "अडकून पडणं" (हा कलर आल्बममधला शब्द ?) आणि त्यांचे प्रताप सांभाळणं (जो विधुळेपणा श्याम करून दाखवतोच).. यामध्ये स्वतःच्या घराचं खाजगीपण, पती पत्नी आणि स्वतःची अपत्यं यांचा एक वेगळा गट असा भाव दूरान्वयानेही दिसत नाही. "प्रायव्हसी" हे पात्र कोणत्याही फोटोत दिसत नाही. अगदी स्मृतिचित्रे आणि अन्य अनेक पुस्तकं हेच दाखवतात. हा काळ साधारण वर्ष १९००च्या पुढेमागे काही दशकांचा. कोणालाही, नातेवाईक अथवा अगदी त्रयस्थ गरजूलाही सहज घरात ठेवून घेणं आणि पंगतीला पात्रं वाढवणं हे रुटीन असल्याचं दिसतं.

माणसाच्या जिवाची मात्र म्हणावी तितकी किंमत दिसत नाही. मेडिकल सोयी शून्यवत असल्याने माणसं पटापटापटा मरताना दिसतात आणि तसा फारसा शोक केलेला किंवा तीव्र सदमा घरच्या लोकांनीही घेतलेला दिसत नाही. प्रत्येकाने भरपूर मृत्यू लहानपणापासूनच पाहिलेले दिसतात. त्यामुळे अगदी लहान बालकं, स्वतःच्या पोटची पोरं लहान वयात वारल्यावरही ते काहीसं गृहीत धरलं गेल्यासारखं दिसतं. उपचार, जीव वाचवणं यासाठी जिवाचा आटापिटा, दूरचे प्रवास, सर्वस्व गहाण टाकणं असं डेस्परेशन दिसत नाही. "पोटफुगी"ने तडफडत, वेदनेने गडाबडा लोळत मरणारा श्यामचा लहानगा भाऊ यशवंत त्यात आहे.. दापोलीला आणि अन्य शहरांत डॉक्टर्स असल्याचा उल्लेख येतो. पण त्याचबरोबर "खेड्यात कुठला डॉक्टर आणि कसले उपचार" असा हताश विचार मांडलेला दिसतो. एरवी पुण्यामुंबईत नातेवाईक असूनही, आणि वडील दापोलीचा प्रवास अगदी नेहमी करत असूनही त्या पोटच्या गोळ्याला बैलगाडीत घालून तिथे शहरात नेऊन काही वेगळे उपचार करण्याचा प्रयत्नही दिसत नाही. कारुण्यापुरता त्या मृत्यूंचा थोडा उपयोग दिसतो, पण तो टळावा याची फारशी धडपड दिसत नाही. मेल्यानंतर मरणाच्या तिथीवरून यशवंत "पुण्यात्मा" मात्र ठरतो.

आजाराने येणारं मरण टाळण्यासाठी विशेष बजेट नसलेलं दिसतं. घरात कोणीतरी मरताना आणि मेल्यावर करण्याच्या वैद्यकीय वगळता अन्य प्रोसिजरची तपशीलवार माहिती मात्र सर्वांना असून त्या रीतसर पाळल्या जाणं एवढाच भाग दिसतो.

अगदी हेच श्यामच्या आईच्या आजाराबाबत. ती नेहमी आजारीच असलेली दिसते. आपल्या आजाराचं निराशाजनक वर्णन करण्याची एकही संधी श्यामची आई सोडत नाही.

"हिवताप लागला आहे पाठीस", "भूकच नसते. तोंडाला चवच नसते. आल्याच्या तुकड्यासोबत दोन घास कसेतरी घशाखाली दवडावे", "आला दिवस दवडला पाहिजे","आता खरेच जगावेसे वाटत नाही", "माझ्या अब्रूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा" अश्यापैकी एकही डिप्रेसिंग वाक्य नसलेले आईचे संवाद सापडायला दुर्मिळ आहेत.

आनंदाच्या प्रसंगी, म्हणजे नवीन स्वतंत्र घराच्या गृहप्रवेशावेळी आकाशातला तारा तुटताना बघून "श्याम तुझ्या आईच्या आयुष्याचा तारा लवकरच तुटेल असे तर तो तारा सांगत नसेल ना ? मला वर बोलावण्यास तर तो तारा आला नसेल ना ?" असं आई विचारते.

अगदी हद्द म्हणजे शेवटच्या आजारात अंतिम टप्प्यात मुंबईत नोकरी करणारा मोठा मुलगा आईला भेटायला घरी आलेला असताना तिची अवस्था बघून केविलवाणा होतो आणि यासम म्हणतो: "मी तुझ्याजवळच राहू का? नको ती नोकरी. आईची सेवा करता येत नसेल तर नोकरीला काय अर्थ.. "

त्यालाही उत्तर देताना त्याच्या मनाला "दिलासा" देण्यासाठी आई म्हणते: "मी इतक्यात मरत नाही. तेवढं माझं भाग्य नाही. झिजत झिजत मी मरणार. तेव्हा फार झालं की तुला बोलावू. तू आता जा"

साने गुरुजींच्या पुढच्या आयुष्याविषयी वाचताना अनेकदा ते अत्यंत नैराश्याच्या गर्तेत असल्यासारखं वाटतं. याची मुळं लहानपणच्या अत्यंत निगेटिव्ह वातावरणात असतील का असा विचार मनात येतो.

इतकी वर्षं रेंगाळत आणि वाढत जाणारा आजार असूनही एकदाही आईला मुंबई किंवा पुण्याला नेलेलंही दिसत नाही. उपचार तर फार दूरची गोष्ट. तिचा एका तपानंतरचा पालगडबाहेर पडण्याचा पहिला प्रवास आहे कोपऱ्यावर असलेल्या लाडघरला जाण्यापुरता. तोही नवस फेडण्यासाठी.

गावातले वैद्य सर्व केसेसमध्ये केवळ "किती घटका उरल्या" हे खिन्नपणे सांगण्यापुरते आणि शेवटची चाटवायला म्हणून हेमगर्भाची मात्रा देण्यापुरतेच उपचारोपयोगी वाटतात.

पुढची नोंद तर्क या विषयाविषयी.

तर्क, विशेषतः वस्तुनिष्ठ तर्क या गोष्टीची कोणालाच तोंडओळख दिसत नाही. दिसतो शुद्ध भक्तिभाव.

लाडघरचा समुद्र लालसर रंगाचा दिसतो म्हणून त्याला तामस्तीर्थ म्हणतात. तिथे श्याम आपल्या आईसोबत जातो. कथेतला हा भाग अदरवाईज खूप हृद्य आहे. पण त्यात "समुद्राच्या पाण्याचा रंग लाल का?" या श्यामच्या प्रश्नाला दोन "उत्तरं" मिळतात.

सोबत आलेल्या मेव्हण्यांचं उत्तर :"देवाचा चमत्कार, आणखी काय?"

आईचा अंदाज:" इथे देवाने राक्षसाला मारले असेल. त्याच्या रक्ताने इथे पाणी लाल झाले असेल".

यावर मेव्हणे म्हणतात "हो. तसा तर्क करावयास हरकत नाही.."

हे एक प्रातिनिधिक उदाहरण. तर्कांचे जे काही ऑप्शन्स असतील ते "देव१","देव२","देव३" असे असल्याचं जागोजागी दिसतं. ते उपाय वस्तुनिष्ठ ठरतात. सर्व प्रश्नांवर "देव" किंवा "दैव" असे दोनच पर्याय निवडीसाठी उपलब्ध दिसतात.

मुलं खूप लहान वयात कर्तीसवरती व्हावीत याचं प्रचंड प्रेशर त्या काळात दिसतं. स्वतःच्या आयुष्याचा आणि मुलांना आधार देण्याच्या आर्थिक क्षमतेचा बापांना भरवसा अजिबात वाटत नसावा. अशात पोराबाळांचा निभाव लागायचा असेल तर तो "घरबशा" होऊ नये याची प्रचंड काळजी केली आणि घेतली जाताना दिसते. शाळा पूर्ण करण्यासाठी फी भरणं शक्य नाही म्हणून श्यामने नोकरीला लागावं असा वडिलांचा आग्रह असतो. मात्र श्यामला खूप शिकायचं असतं. त्यामुळे तो दूर औंध संस्थानात मोफत शिकायला जातो. तिथे वार लावून जेवतो. पण एकदा तिथून अगदी जोरदार प्लेगच्या साथीमुळे त्याला कोंकणात घरी तात्पुरतं परत यावं लागतं. तेव्हाही त्याचा मुक्काम काही दिवस लांबल्यावर वडिलांना लगेच कुशंका येते. तो प्लेगचं खोटं कारण सांगून आयतोबा बनून फुकटचं बसून खायला घरी परत आला आहे अशी त्यांना खात्री वाटते. ते कठोरपणे त्याला परत प्लेगच्या खाईत पाठवतात. तो दुखावलेला असूनही ते त्याला थांब म्हणत नाहीत. आई रडत रडत का होईना पण पतीला पाठिंबा देते.

पतीची बाजू घट्ट सांभाळणं हा एक आणखी कॉमन फोटो. पतीला बिनशर्त पाठिंबा हा पत्नीच्या जीवनमरणाचा प्रश्न असावा. श्यामची आई प्रत्येक प्रसंगात तातडीने पतीची बाजू घेते. ती बाजू वाचणाऱ्याला कितीही चुकीची, तर्कदुष्ट, निष्काळजी किंवा मूर्खपणाची भासत असली तरी. अर्थातच त्यावेळचं बाईचं पुरुषांच्या कमाईवर असलेलं संपूर्ण अवलंबित्व पाहता यात कणभरही आश्चर्य नाही. पण तरीही चुकूनही पतीविरोधात न गेलेलं दिसण्याची जिवापाड धडपड केविलवाणी वाटत राहते. ती घाई फार ठळकपणे दिसते. आजही ते अवलंबित्व बऱ्याच अंशी उरलेलं आहे, पण "श्यामची आई"नंतरच्या काळात हा ठळकपणा जास्त जाणवला नाही. नाईलाजाने पतीशी सहमती पुढच्या पुस्तकांत कुठे कुठे दिसू शकते, पण पतीच्या प्रत्येक निर्णयाचं, वागण्याचं पूर्ण व्होकल समर्थन श्यामची आई करताना दिसते. तिला दारिद्र्याच्या खाईत लोटणाऱ्या आणि तिथेच दाबून धरणाऱ्या पतीची बाजू घेण्याच्या अट्टाहासापायी श्यामची आई स्वतःच्या मुलांना, स्वतःच्या वडिलांना आणि इतर अनेकांना सुनावते, दुखावते, अल्टिमेटम्स देते.. यामागची तिची दडलेली खोल स्वतःच्या "सर्व्हायव्हल"ची भीती का कोण जाणे पण या अल्बमच्या अनेक फोटोंत दिसते.

श्यामच्या बाबांवर तरुणपणी लग्नानंतर लवकरच झालेला हल्ला असा एक प्रसंग आहे. तेव्हा पतीचा जीव वाचवण्याबद्दल देवीकडे मागितलेली भीक पतीविषयी प्रेम किंवा आदर यापेक्षा तो मारला गेला तर पुढे काय दिवस येतील याची भीती दिसते.

याचं कारणही नोंद घ्यावं असं आहे. पतीच्या कर्तृत्वहीनतेबद्दल बोलण्याची प्रत्येक संधी आई घेते. श्यामचे बाबा आईच्या पाटल्या विकून कच्चं, गोठ्यासारखं घर कसंबसं बांधतात. तेही आईच्या स्वतंत्र राहण्याच्या स्वाभिमानी विनंतीमुळे. या घराच्या गृहप्रवेशप्रसंगी ते सर्वांना लाजेकाजेस्तव सांगत असतात की "तात्पुरते लहान घर बांधले आहे, पुढे मोठे बांधू.." तेव्हा आई मुलांना म्हणते "यांच्याकडून आता मोठे घर कधी बांधून होणार.. ?" आणि "मोठे घर आता मला वर देवाकडे गेल्यावरच मिळेल" हा आपला खास "ट्रेडमार्क" टाकायलाही विसरत नाही. अनेक प्रसंगी पतीचा भरवसा धरता येत नसल्याचे उल्लेख जाणवतात. एकंदरीत पतीची बाजू तर घ्यायची पण तो काही परिस्थिती सुधारु शकेल यावर, अर्थात त्याच्या कुवतीवर पूर्ण अविश्वास दाखवायचा अशी मानसिकता दिसते.

असं बरंच काही आहे.. पण लिहीत राहण्याला मर्यादा आहेत. इतकं सगळं असूनही तीन पानांचं ठिकोळं, जांभळ्या चिऱ्याची थंड पाण्याने भरलेली डोण, थारळे, पानगी पातोळे आणि सोबत बोळू म्हणून लोणी.. घरात टांगलेलं तंवसं, पपनसे, बावेत पोहताना कमरेला बांधलेल्या सुखडी, दह्याची कोंडुली, तुळशीच्या नेवैद्याची लोणीसाखर, तांदळाचं धापट, थंड पौष्टिक धुवण, घराचा लाकडी माळा, त्यावरची कणगी, अंगाशी झळंबलेला लहानगा पुरुषोत्तम, त्याची परसाकडे बसण्याची ठाकुली, तांब्या फासाला लावून काढलेलं विहिरीचं ताजं पाणी.. आणि अशा असंख्य गोष्टींत अडकलेलं मन सुटणं अशक्य आहे. त्या निरागसतेच्या जगात, ते कितीही कालबाह्य, तर्कदुष्ट आणि हास्यास्पद ठरलं तरी, किमान स्वप्नात तरी जाऊन यावं अशी इच्छा का कोण जाणे, पण राहतेच.

.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4.75
Your rating: None Average: 4.8 (4 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला आहे- मराठी लोकांच्या "काळजात घर" करून बसलेल्या पुस्तकाबद्दल नव्या पद्धतीने विचार केलेला आवडला.
-------------
शामच्या बाबांबद्द्ल म्हणायचं झालं तर त्या काळी बहुतेक कोकण्ये देवदेवस्कीत आयुष्यं घालवीत असत असं दिसतं.
दळवींच्या 'आत्मचरित्राऐवजी'त वाचलेलं आठवतं-
जयवंत दळवींचे(सानेगुरूजींच्या वडिलांपेक्षा मॉडर्न) असलेले वडील पूर्ण वेळ देवपूजा आणि तत्सम गोष्टींत मग्न असत.
इतर काकादेखील फार काही कामं न करता घरीच असत.शेतीच्या उत्पन्नावर गुजराण चाले.
शिवाय खानोलकरांच्या कोकणातले टिपिकल पुरूष, "बालकांड"मधले ह.मो.मराठेंचे वडील असली व्यक्तिचित्रं वाचून एक प्रतिमा उभी रहाते -

ब्राह्मण पुरूष. वेदाभ्यास,पूजापाठ,भिक्षुकी हे पोटापाण्याचे व्यवसाय. हाच स्किलसेट.
पूर्वी खोती असेल तर शेतीवर गुजराण. पण शेती स्वत: कष्टाने करण्याची उमेद नाही.
इतर कष्टाची कामं करायला कमीपणा वाटणं शिवाय देवावरचा अगाढ विश्वास- ह्यामुळे मग "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" असली वृत्ती बळावली असेल.

मग शामच्या बाबांचं वागणं त्या काळानुरूपच म्हणता येईल का? एक अपरिहार्यता जाणवल्याने नशीबाला दोष देत जगणं इतकंच आपल्या हाती आहे असा समज झाला असेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक3
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख अतिशय आवडला. पुस्तक वाचून अनेक वर्षं लोटली, पण त्यातले बहुतेक संदर्भ अद्याप ध्यानी आहेत.

पण तसं न करण्यात आईला नंतर चरचरीत पश्चात्ताप व्हावा याखेरीज कोणताही उद्देश नसावा. आणि तो पश्चात्ताप तसा होतोच.

नेमकं निरीक्षण. लहानपणी जेव्हा हे पुस्तक वाचलं होतं, तेव्हा हा शहाजोगपणा लक्षात आला नव्हता.

पतीच्या कर्तृत्वहीनतेबद्दल बोलण्याची प्रत्येक संधी आई घेते.

डिट्टो!

बाकी कोकणातल्या दैनंदिन आयुष्याचं वर्णन, तर्काचा अभाव, मुलांवर अगदी कोवळ्या वयात पडणारा जबाबदारीचा बोजा (इथे 'द इयरलिंग'/'पाडस'ची आठवण येणं अपरिहार्यच), मृत्यूचा आणि गरिबीचा निमूट स्वीकार इत्यादी वाचून "अगदी, अगदी!" अशीच प्रतिक्रिया उमटली.

अवांतर:

साने गुरुजी आणि पुलं यांच्या वयात वीस वर्षांचं अंतर. संस्कारांच्या दृष्टीने बदलांची तत्कालीन कूर्मगती पहायची, तर साधारण एकच पिढी. सदैव आसपास असणाऱ्या मृत्यूच्या अस्तित्वाबद्दल आणि अकाली अंगावर पडलेल्या जबाबदारीबद्दल बोलायचं, तर औषधांच्या अभावी पुलंचाही एक धाकटा भाऊ वयाच्या अकराव्या वर्षी दगावला होता आणि वडीलही पन्नाशीच्या वयात निर्वतले होते.

मात्र तुलनेने अधिक बरी आर्थिक परिस्थिती (गरीब वि. कनिष्ठ मध्यमवर्गीय); लहान गावात गेलेलं बालपण वि. उपनगरी का होईना, पण मुंबईतल्या संधी/एक्स्पोजर; माणसाच्या जिवाला आलेली थोडी अधिक किंमत (त्यांच्या मेव्हण्याला लिहिलेल्या पत्रातला - तू म्हणतोस की their deaths were not justified. My dear boy, whose deaths are justifiable? - असा उल्लेख) आणि एकंदरीतच कुढत जगण्यापेक्षा, शक्य होईल तेवढं समरसून आणि आनंदाने जगा हा दृष्टिकोण - इत्यादी बाबतींतला सांधेबदल लक्षणीय आहे.

व्यक्तिगणिक बदलणाऱ्या प्रकृतीचा (आणि nature vs nurture ह्या सनातन वादाचा) वाटा मान्य करूनही - ह्या दोन अग्रगण्य आणि त्या त्या काळातील ममव zeitgeist चा अर्क असं ज्यांचं लेखन म्हणता येईल, अशा लेखकांच्या - "जीवनविषयक तत्त्वज्ञाना"तल्या फरकामागे ह्या बदलत्या परिस्थितीचाही मोठा वाटा आहे.

आता एकविसावं शतक विशीत शिरण्याच्या मार्गावर असताना, निदान म.म.व.ची आर्थिक परिस्थिती, जिवाला आलेली किंमत, कुटुंबाचं स्वरुप, निदान सुशिक्षित ममव घरांत तरी मुलांना दीर्घ काळ मिळणारा भक्कम आर्थिक पाठिंबा या गोष्टी फार बदलल्या आहेत. 'कुढत बसण्याऐवजी आवडीचं क्षेत्र निवडून, समरसून आणि आनंदाने जगा' असा पुलोपदेश आता बराचसा moot, अनावश्यक ठरला आहे ('त्या त्या वेळीच फकून टाकलेलं बरं' असं वाक्य नुकतंच सखदेवांच्या 'काळेकरडे स्ट्रोक्स'मध्ये वाचल्याचं आठवतं.)

पुलंच्या साहित्याबद्दल चर्चा करताना, 'सा नंबरची ट्राम' किंवा भांबुर्डंसारखे तपशील कालबाह्य होत चालले आहेत; हे मला तितकंसं महत्त्वाचं वाटत नाही - तर बोळे काढून पाणी वाहतं करण्याचा संदेश देण्याची निकड आता बरीचशी फजूल ठरत चालली आहे; हे अधिक लक्षणीय वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक4
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अस्वलशेठ आणि नंदनशेठ, दोन्ही प्रतिसादांना रोचक दिली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गविशेठ, लेख अतिशय आवडला. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तपशीलवार लेखाबद्दल धन्यवाद. मात्र लेख वाचताना एक जाणवले ते हे की एका पुस्तकावरून पूर्ण तत्कालीन व्यवस्थेबद्दल जनरलाईझ्ड विधाने करणे प्रॉब्लेमॅटिक आहे. सानेगुर्जीचा स्वत:चा काहीएक लोच्या असेल आणि प्लस त्या काळातले ताणेबाणे आणले असतील. एरवी हे पुस्तक किती रिप्रेझेण्टेटिव मानावं याबद्दल अंमळ शंकाच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एका पुस्तकावरून पूर्ण तत्कालीन व्यवस्थेबद्दल जनरलाईझ्ड विधाने करणे प्रॉब्लेमॅटिक आहे

याची पूर्ण जाणीव आहे. हे लेखातच नोंदवलं आहे.

म्हणूनच घरगुती फोटो आल्बम समजतो आहे, ऑथेंटिक दस्तऐवज नाही. सर्वत्र अंदाजवाचक क्रियापदं वापरली आहेत.

म्हणून त्या काळातली अन्य पुस्तकं साम्यस्थळांसाठी घेतली होती आधी. पण तो पसारा आवरता आला नसता मग.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका पुस्तकावरून पूर्ण तत्कालीन व्यवस्थेबद्दल जनरलाईझ्ड विधाने करणे प्रॉब्लेमॅटिक आहे.

माझे आई-वडील, आणि आजी-आजोबा यांच्याकडून, त्यावेळेच्या राहणीमानाची जी वर्णने ऐकली आहेत, त्यानुसार, इन जनरल सुद्धा, त्यावेळेस घरांमध्ये उदासीनच वातावरण असायचे. सांपत्तिक स्थिती चांगली असली तरीही, मौजमजा, मोठ्याने हास्यविनोद करणे ह्याच्याकडे, अगदी काहीतरी वाईट, अशा दृष्टीनेच पाहिले जायचे. देवधर्म, कुळाचार,त्याग, याचे फारच अवडंबर असे. बरी सांपत्तिक स्थिती असलेल्या घरांतही बालमृत्यु, आजारपणं, ॲलोपथीला शक्यतो टाळणे, असले प्रकार कॉमन असायचे. लहान बाळं फटफटा गेली तरी, तितक्याच वेगाने आणखी जन्माला येत. लहान मुलांना आणि स्त्रियांना काही भावविश्व असतं, याची कोणाला जाणीवच नसे. आत्ताच्या ममवंपेक्षा त्यावेळचे ममव हे गममव (गरीब मराठी मध्यमवर्गीय) असल्यासारखेच रहात, कारण साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी, धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती, असली खुळं डोक्यांत भरवून दिली जात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. अशी उपोद्बलक विधाने प्रत्यक्षदर्शींकडून ऐकली की मग बरे वाटते, नपेक्षा अंदाज येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उत्तम लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काळ उघडा करणारी पुस्तके
आबा , गविशेठ च्या दमदार पुनरागमनात त्या काळचं कोकण .. वगैरे जोरदार समीक्षा आली आहे.
नेमाडेबुवांच्या तीनही पुस्तकांमध्ये एकोणीसशे ६०-७० च्या दशकातील महाराष्ट्रातील निमशहर निमखेडे यातील काळ उघडा होतो असे वाटते . पुणे मुंबई नागपूर कोल्लापूर सोडले तर उर्वरित महाराष्ट्रातील अशा भागातील सर्वच खूप वेगळे होते . (याच काय पण इव्हन नव्वद च्या दशकात मी हे अनुभवले आहे )
फक्त नेमाडेच नाही तर रंगनाथ पठारेंच्या पुस्तकांमधेही दिसते .
याबद्दल कुणी लिहिलं का ?
( साहित्य आणि साहित्यिक याविषयी लोकल पब्लिक मधे असलेले अनभिज्ञता ,अनास्था आणि आणि त्या त्या लोकल लेखकांची तिथे घुसमट/ फ्रस्ट्रेशन कशी होत असू शकेल हा विषय फार मोठा आहे . कुणी काही करावं या बाबतीत असं वाटतं )
१९९० च्या दशकाच्या अखेरीस दोन छोट्या गमती मी नोटीसल्या .
१. त्याकाळी एका कॉन्ट्रॅक्ट मुळे माझे संगमनेरला महिन्यातून जवळजवळ तीन वेळा तरी जाणे होई .
रंगनाथ पाठारे तेव्हाही चांगले नाव कमावून होते , ते संगमनेरात बरीच वर्षे प्रा होते . छोटंसं गाव , जुन्या शिक्षण संस्था वगैरे असलेलं ,त्यामुळे ते तिथे फेमस असतील अशी उगाचच माझी अपेक्षा होती . पण बऱ्याच ठिकाणी चौकशी केल्यावरहि कुणाला ( उच्चशिक्षित वगैरे पण असलेल्या पब्लिकला ) काही त्यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती . कुणीतरी ते सिनेमेटाग्राफर का वगैरे पतंग उडवले अखेर कुणाला तरी " अरे हा , ते अभिजित पठारे ( किंवा अत्सम काही नाव ) वडील असतील ते , वगैरे . मग त्यांच्याबद्दलच्या साहित्यबाह्य काही स्टोर्या निघाल्या असो .
बऱ्याच अशा निम शहरातील बऱ्या लेखकांना फ्रस्ट्रेटिन्ग असेल काय . असो .
२. याच संगमनेरात एकदा तीन मजली बिल्टिंग मध्ये पुस्तक प्रदर्शन भरले होते . खच्चून गर्दी . अगदी उभं राहायला जागा नाही इतकी. संगमनेरच्या या पुस्तकप्रेमामुळे भयंकर इम्प्रेस झालो . आणि आमचा प्रोजेक्ट मॅनेजर म्हणाला : हुरळून जाऊ नका . उद्या इथे भांड्यांचा सेल लागला तरी एवढीच गर्दी असेल . इथल्या लोकांचा हा टाईमपास असतो .
मी हे एवढं का लिहिलं ? असो .
त्या पुस्तकांबद्दल या दृष्टीने कुणी लिहावं म्हणून असेल बहुधा .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत. निमशहरी भागातील काय किंवा शहरी भागातील काय, लोकांची एकूणच साहित्यविषयक अनास्था जुन्या काळी खूप अंगावर यायची. आता सोशल मीडियामुळे तितकासा त्रास होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निमशहरी भागातील काय किंवा शहरी भागातील काय, लोकांची एकूणच साहित्यविषयक अनास्था जुन्या काळी खूप अंगावर यायची. आता सोशल मीडियामुळे तितकासा त्रास होत नाही.

किंवा असंही असेल की अनास्था ऐवजी हा एकंदरीत (मराठी) साहित्य वगैरे प्रकार अत्यंत भिकारचोद* वाटत असल्याने त्या मार्गाला कोणी लागत नसेल.

* लिंगनिरपेक्ष पर्यायी शिवी. विशेषत: चोट या शब्दाबाबत लैंगिक आक्षेप आल्याने त्याऐवजी चोद हा त्याच धर्तीचा शब्द वापरून तितकीच प्रभावी शिवी तयार होते असे एक नम्र मत आहे. सुधारणेचे अर्थातच स्वागत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तसे तर कुणालाही काहीही भिकारचोद वाटावे, त्याला लॉजिक ते काय? तेव्हा मराठी साहित्य कुणाला तसे वाटतही असेल, परंतु तितके आकलन बहुतांना होते हे गृहीतक धाडसी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तिरशिंगरावमास्तर बरेच जवळ गेलेत.
'मुलांन्वर' संस्कार या नावाखाली घरोघरी बोनसाइ करत होते काय अशी शंका येते. अजूनही काही भागात अतिरेक आहेत.
बाकी 'गोट्या' किंवा 'बापू' यांची थोडी तुलना कुणी करावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्यामचा बोन्साय झाला नाही एवढे नक्कीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अगदी गविस्तर लेख!! (श्रेयाव्हेर: कुणी तरी मिपाकर)
फार सुरेख लिहिलयंत. पुस्तकाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली.
मात्र श्याम पुढे जाऊन जे कर्तृत्व गाजवतो(शिक्षण, चळवळीतला सहभाग, फैजपूर अधिवेशन, दलितांसाठीचे कार्य, मासिके काढणे, आंतरभारतीसारख्या संस्था काढणे आणि किती तरी कष्टाने त्या चालवणे, प्रचंड लिखाण) ते डिप्रेशनच्या गर्तेत असलेल्या माणसाचे वाटत नाही हे मात्र नक्की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

तुमची वाट पहात होतो.

श्यामची बाजू घेणारं कोणी आल्याने बरं वाटलं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते डिप्रेशनच्या गर्तेत असलेल्या माणसाचे वाटत नाही

बायपोलर प्रकार वाटतो. त्यांनीच एका प्रकरणात लिहिलं आहे श्यामची आईत की ते टोकाचा उन्माद (शब्द वेगळा असेल) आणि टोकाच्या निराशेच्यामध्ये झोके खात असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'गविस्तर' - शब्द अतिशय आवडलेला आहे.
लेख परत परत वाचावा असा आहे. गवि लिहीत जा ब्वॉ. कोणताही अभिनिवेश नसलेलं, कृत्रिमता आणि जडव्यागळ शब्दांचे अवडंबर न माजवलेलं छान, परत परत वाचावं असं लिखाण असतं तुमचं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखाचा सूर, मुद्दे यांची तुलना करता पुस्तकाचं मुखपृष्ठ अत्यंत बाळबोध वाटायला लागलं. लहानपणापासून अशी 'बालभारती' चित्रं बघण्याची सवय होती, पण आता त्यातला विरोधाभास फारच जाणवला.

'लुळीपांगळी श्रीमंती आणि धट्टीकट्टी गरीबी' किंवा 'मुहूर्त बघण्यामुळे पेशवाई बुडली' अशा छापाचं मनात मुरलेलं शहाणपण कुठून आलं असेल याचाही अंदाज येतो.

लेखाबद्दल आभार गवि.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लहानपणी खूप (१४)सर्कशी पाहिल्या. शेवटची थ्री रिंग. एकाचवेळी तीन रिंगणात खेळ चालायचे. तिकिट काढल्यावर मागे तंबूमागे प्राणी काय करतात हे बघायला आवडायचे॥ पण तंबूमागचे जीवन खरे उघडे केले ते दामू धोत्रे या रिंगमास्टराने ' वाघ सिंह माझे सखे सोबती' पुस्तक लिहून. पुस्तक दोनदोनदा वाचले. कलाकार आणि मालक केरळ/बंगालचे असत. पण का कोण जाणे सांगली जिल्ह्यातल्या तासगावने पाच मालक दिले. एक वालावलचे (कुडाळजवळ) वालावलकर. तिकडे त्यांचे घर आहे अजून ते पाहिले.
नंतर सर्कशी चालवणे महागडे होऊ लागले. मेनका गांधीनी प्राण्यांवर बंदी आणल्यावर कुत्र्यांचे खेळ पाहायला लहान मुलेही येईनाशी झाली. अर्ध्या चड्ड्या घालून सायकली कसरती झोपाळे खेळ पाहण्यात पालकांचाही उत्साह कमी झाला असे म्हणता येणार नाही कारण टिवीवर ओलम्पीक जिमनॅस्टिक्स, डाइविंग, कसरती दिसू लागल्या होत्या.
-
मी इकडे का लिहिलं कारण धागा काढण्याइतका ऐवज मजपाशी नाही. चालवून घ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला गवि. शामची आई वाचुन कायम चिडचिड व्हायची. कधीही छान वाटलं नाही ते पुस्तक वाचुन. पण तरीही पुनर्वाचनं झालीच अनेक. लाडघरचा चॅप्टर आवडायचा. कारण कमालीची निराशा नसलेला तो एकच चॅप्टर असेल त्या पुस्तकात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लाडघरचा चॅप्टर आवडायचा. कारण कमालीची निराशा नसलेला तो एकच चॅप्टर असेल त्या पुस्तकात.

+१०१

तरीही शुभाताईकडे आईने मोकळ्या केलेल्या मनाच्या मळमळीत एक किमान डोस पातळी राखली गेली आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख खूप आवडला. काही कलाकृतींना आपण मखरात बसून ठेवले असते. त्या मखरातून खाली आणायला पाहिजे. मला साने गुरुजींबद्दल व्यक्तिशः आदर आहे पण 'श्यामची आई' मला कधीही आवडले नाही. मला लहानपणी ते वाचताना फार anxiety यायची. ही आई आता मरणार, मरणार या विचाराने मला ते वाचणे नको वाटायचे. गवि म्हणतात तसे त्या आईचे मरणाबद्दलचे spoilers टाकणे चालूच असायचे. ही पुस्तके मुलांना का वाचायला देत असतील? कदाचित मुलांना कठीण परिस्थितीची जाणीव व्हावी आणि आपल्या पालकांबद्दल थोडा आदरभाव वाटावा असा उद्देश असावा.

गवि यांनी त्या काळच्या लोकांचे मरणाबद्दलची स्थितप्रज्ञता नोंदवली आहे . त्यांचे निरीक्षण अचूक आहे पण विश्लेषणात आधुनिकतेची (modernity ) लेन्स वापरायला हवी. आपल्या आयुष्यावर - जन्मावर आणि मृत्यूवर - माणसाचे नियंत्रण असू शकते हा अतिशय आधुनिक विचार आहे. १९०० च्या सुमारास हा विचार जगात कुठेही नव्हता. पश्चिमेमध्ये त्याची सुरवात होत होती. त्यामुळे त्या काळाच्या वैचारिक framework मधुन या सगळ्या प्रतिक्रियेचा विचार करायला हवा . जन्म मृत्यूवर नियंत्रण birth control आणि पेनिसिलीन आल्यावर आणि एकूणच विज्ञानाच्या आणि modernity चा प्रभाव वाढल्यावर झाला. मुले व्हायचीच आणि जायचीच असाच विचार सगळीकडे होता. प्रसिद्ध athropologist Nancy Scheper-hughes यांचे 'Death without Weeping' या नावाचे ब्राझील मधल्या बालमृत्यूनवर पुस्तक आहे. ते तर १९८९ साली लिहिले आहे. त्यात आपल्याला मुलांच्या मरणाशी cope करण्यासाठी लोक कसा धर्माचा आधार घेतात, मिथके बनवतात , मुळात आपण मरण टाळु शकतो अशी शक्यताही त्यांच्या मनात कशी येत नाही हे लिहिले आहे. एका जीवाला आणि जीवनाला एवढे महत्व द्यायचा विचार modernity आणि individualim मधुन आला .

हे आपले माझे दोन आणे. बाकी लेख छानच आहे . असे लेख अजून येऊ द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप इंटरेस्टिंग.. रोचक श्रेणी दिली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं बरंच काही आहे.. पण लिहीत राहण्याला मर्यादा आहेत. इतकं सगळं असूनही तीन पानांचं ठिकोळं, जांभळ्या चिऱ्याची थंड पाण्याने भरलेली डोण, थारळे,...आणि अशा असंख्य गोष्टींत अडकलेलं मन सुटणं अशक्य आहे. त्या निरागसतेच्या जगात, ते कितीही कालबाह्य, तर्कदुष्ट आणि हास्यास्पद ठरलं तरी, किमान स्वप्नात तरी जाऊन यावं अशी इच्छा का कोण जाणे, पण राहतेच.

अलीकडेच मनोगतावर 'स्थित्यंतर' ही कथा वाचली (लेखक : 'चौकस') -
http://www.manogat.com/node/26412

साधारण याच काळातली व परिसरातली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकूणात शामची अाई हे पुस्तक अोव्हररेटेड अाहे असे वाटते. मुख्य म्हणजे लेख पुस्तकाची सरसकट भलामण न करता, चिकित्सा करणारा वाटला. याच पुस्तकाची यापेक्षाही कठोर चिकित्सा किशोर दरक यांनी ‘पालकनीती’ या मासिकात लेख लिहून केली होती. पण त्यांचा सगळा रोख त्याकाळच्या चातुर्वर्ण्य़ पाळण्यावर होता, जे म.म.व. नसलेल्या बहुजनसमाजातल्यांनाच फक्त जाणवू शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0