’विभक्ती’चे प्रत्यय आणि सापेक्ष सुरक्षिततेचे सिद्धान्त

संकल्पनाविषयक

'विभक्ती'चे प्रत्यय आणि सापेक्ष सुरक्षिततेचे सिद्धान्त

लेखक - रुची

'अ' आणि 'ब' विभक्त होताहेत, तब्बल एका तपाच्या संबंधांतून मुक्त होताहेत. त्यांच्या विभक्त होण्यामुळे त्यांच्या एकत्र अस्तित्वाच्या सगळ्या सामायिक जागा हळूहळू मोडल्या जाताहेत. काय म्हणतात त्याला… ते ग्वानेथ पाल्त्रोव्हचं 'कॉन्शस्‌ अनकपलिंग' वगैरे... तसला काही हा प्रकार नाही. आणि खरं तर तसला काही प्रकारच अस्तित्वात नसतो. माणसं एकत्र आली आणि त्यांच्यातल्या औपचारिकतेच्या सीमा ओलांडल्या गेल्या की मग निरगाठीच पडतात, त्याच्या फाशांत तऱ्हेतऱ्हेच्या भावना, राग-लोभ, अधिकार, अहंकार, एकमेकांवरचं अवलंबित्व अशी अनेक प्रकारची गुंतागुंत होते. हे काही सरळफास नाहीत, की जे सहजी मोकळे करून त्यातून 'कॉन्शस अनकपलिंग' करून घ्यावं, जे चांगलं आहे ते मोडू न द्यावं...मोडतोड झाल्याशिवाय या गुंत्यातून सुटका नाही. एकेक करून विणलेले धागे उसवून निघणार, जमवलेल्या काड्या विखरून पडणार, कोलमडणार आणि सगळ्याच्या अवशेषांवर मालकीचे दावे ठोकले जाणार. हो, मोडतोड तर होणारच!

समस्या अशी आहे, की 'अ' आणि 'ब' यांच्या या मोडतोडीत इतर काय-काय चिरडलं जातंय याची त्यांना पूर्ण कल्पनाही नाही आणि आपल्या ठेचकाळलेल्या अहंगंडांपुढे त्यांना त्याची पर्वाही नाही. साहजिकच आमच्या 'अ', 'ब', 'क', 'ड', 'ई', 'फ' आणि मी यांच्यातल्या नियमित कट्ट्यांचं काय करायचं याची त्यांना पर्वा नाही आणि इतरांसाठीही ते सगळं सार्वमताने दुय्यम आहे. 'क' तर मला सरळच म्हणतो, "कोणाला कशाचं तर कोणाला कशाचं… तिथे त्यांना त्यांचं घरदार, मुलंबाळं यांच्या विवंचना आहेत आणि तुला कट्ट्यांची काळजी! तुझ्या आत्मकेंद्रीपणाला तोड नाही." औपचारिकतेच्या मर्यादा पार करून सहजीवनात अडकल्यापासून, 'क' माझ्यावर अशी अधिकाराने आणि मोकळेपणाने टीका करतो. मीदेखील अधिकाराने त्याचं मत निकालात काढते, "आत्मकेंद्रीपणा ते करताहेत, आपल्यापलीकडे आपल्या गुंत्यात काय-काय आणि कोण-कोण जखडलंय याची त्यांना पर्वाच नाही असं वागतायत."

अर्थात फक्त त्यांनाच नव्हे, तर एकूणच मित्रांच्या विभक्त होण्याचे इतर मैत्र्यांवर होणारे दुष्पपरिणाम या समस्येचं भान कोणालाच नाही असं दिसतं. गेल्या काही महिन्यांतल्या या कल्लोळात मी असहायपणे सेल्फ हेल्प पुस्तकं धुंडाळली, तर मला 'हाऊ टू कोप विथ युअर फ्रेंड्स डिवोर्स' असं एकही पुस्तक सापडलं नाही. सगळ्यांनीच 'क'प्रमाणेच मान्य करून टाकलंय, की विभक्त होत असलेल्या व्यक्ती आणि त्यांची मुलं वगळता या मोडतोडीचा इतर गोष्टींवर होणारा परिणाम नगण्य असल्यामुळे त्याचा विचार करण्याची गरजच नाही; जे मला फार अन्यायकारक वाटतं. 'अ' आणि 'ब' यांच्यामध्ये वितुष्ट आल्यापासून आमच्यासमोर अनेक समस्या तयार झाल्या आहेत. सर्वांत महत्त्वाची समस्या मी आधी म्हटल्याप्रमाणे कट्ट्यांची तयार झाली आहे. 'ब'ने आपला बाडबिस्तरा गुंडाळल्यावर कट्ट्याची नेहमीची जागा - म्हणजे त्यांचं घर - आता 'अ'चं झाली. भेटायची अधिकृत जागा तीच राहिली, पण अर्थातच 'ब'च्या अनुपस्थितीत. 'ब'ला भेटायचं तर ते वेगळं, 'ब'ला आणि इतरांना जमेल तसं; सगळीकडे नवे गडी नाहीतर नवं राज्य.

पूर्वीचे एकत्र कट्टे म्हणजे आमच्यासाठी केवळ बागडण्याची जागा कधीच नव्हती. बाहेरच्या जगातल्या अडचणी, अन्याय, सुखदुःखं, विसंगती यांना वाचा फोडण्याची, गावगप्पा करण्याची आणि सर्व विषयांवर मनमोकळं भाष्य करण्याची ती एक हक्काची जागा होती. यावर 'ड'चं म्हणणं असं, की मला सर्व विषयांवर भाष्य करावंसं वाटणं हीच एक बिकट समस्या आहे. याला 'ड'चा खवचटपणा म्हणायचं की प्रांजळपणा ही बाब बाजूला ठेवली, तरी मला 'ड'च्या मतावर प्रचंड आक्षेप आहे. मतं असणं आणि ती व्यक्त करणं हा मनुष्य म्हणून जिवंत असण्याचाच अविभाज्य भाग आहे आणि ती व्यक्त करण्यासाठी अधिकाराची आरामदायक जागा असणं ही एक अतिशय महत्त्वाची आणि प्राथमिक गरज आहे असंही मला वाटतं. 'ड'सारखी व्यक्तीदेखील फार आग्रहीपणाने नाही, तरी आपल्या खोचक टिप्पण्यांमधून आपली मतं व्यक्त करतच असते हे दाखवून देणं मला भाग पडतं. शिवाय मुद्दा केवळ मतप्रदर्शनाचाही नसतो; असतो तो त्यातल्या संभाषणाचा, देवाणघेवाणीचा, तडजोडीचा आणि आपली मतं चाचपडत, तपासत राहण्याचाही. हे करता येण्यासाठी जी आरामदायक, विश्वासाची, सोयीची, सर्वसमावेशक, सवयीची आणि मतभेद असलेली अशी एक जागा लागते, ती तो कट्टा पुरवायचा. आता या गढूळलेल्या वातावरणात चालू असलेल्या रस्सीखेचीत ना आराम राहिलाय, ना विश्वास आणि गृहीत धरलेल्या साऱ्याच नात्यांबद्दल प्रश्नचिन्ह उमटलंय ते निराळंच. या बदललेल्या भोवतालाची झळ माझ्याइतकीच 'क', 'ड', 'ई', 'फ' यांनाही लागली आहे याची मला खात्री आहे; पण ते सार्वजनिकपणे त्याबद्दल एक निर्विकारपणा घेऊन वावरतात. 'ड'ला तर माझ्यावर टीका करणारे विनोद वगळता सार्वजनिक भाष्य करायलाच फारसं आवडत नाही आणि त्याच्या उच्चासनावरून मानवजातीच्या साऱ्या भावनिक समस्या त्याला बिनमहत्त्वाच्या वाटतात. 'अ' आणि 'ब' यांच्यातलं नातं बिघडत चाललं होतं, तेव्हाही 'ड'ला या 'किरकोळ' कुरबुरीच वाटत होत्या आणि आता हे तंटे विकोपाला गेल्यावरही त्याच्या दृष्टीने त्यांचे इतरांवरचे परिणाम सापेक्ष आहेत.

'ई' आणि 'फ' नेहमीच सावधपणे वागतात आणि दोन व्यक्तींच्या वैयक्तिक मतभेदांबाबत उघड भूमिका घेणं टाळतात. उघड भूमिका घेणं धोक्याचं असतं. आपले पत्ते उघडे केले, तर गोष्टी आपल्याच अंगावर शेकण्याची शक्यता असते. अभावितपणे एखाद्या व्यक्तीचा रोष पत्करावा लागू शकतो. आपली इतर बाबींविषयी अध्याहृत ठेवलेली मतं उघड होण्याची शक्यता असते. आपण आपल्या अधिकाराच्या तथाकथित मर्यादा ओलांडण्याची भीतीही असते. असले धोके अनेकांना पत्करायचे नसतात. अगदी आपल्या म्हणवल्या जाण्याऱ्या व्यक्तींबाबतही हा धोका पत्करणं शक्य न झाल्यामुळे ते मौन पाळतात, मला त्यांचं मौन 'अ' आणि 'ब'च्या तंट्यापेक्षाही अधिक अस्वस्थ करतं. "जे होतंय ते 'दुर्दैवी' आहे" किंवा 'अनपेक्षित' आहे." यापलीकडे जाऊन "हे स्वीकारता येण्यासारखं नाही आणि 'चुकीचं' आहे." असं म्हणायला का कचरतात हे लोक? जी बाजू लंगडी आहे, अग्राह्य आहे, अन्याय्य आहे, तिच्याबद्दल जाहीर भूमिका घेणं ही नैतिक जबाबदारी का नाही वाटत त्यांना? माणसं दुरावली जात असताना, दुखावली जात असताना, कडवट बनत चालली असताना त्यांच्या आप्तांच्या मौनाने नाती अधिकाधिक अशक्य बनत जात असतात का? नाती जपण्याची जबाबदारी फक्त दोन व्यक्तींची असते की त्यांच्या आजूबाजूच्या समूहाचीही असते? समूहाने हे शहाणपण दाखवून वेळीच समुपदेशन न केल्यास त्यांच्या व्यावहारिक मौनाला अनैतिक, जाचक आणि निष्ठुर का म्हणू नये? मला 'क', 'ड', 'ई', 'फ' आणि मीदेखील या घटस्फोटाला जबाबदार आहोत असं वाटायला लागतं.

आपणही बोलायला उशीर केला, म्हणून गोष्टी चिघळत गेल्या असतील अशी शक्यता मी 'क'पाशी बोलून दाखवते. त्यावर 'क'चं म्हणणं पडतं, की "सर्व जग सर्व काळ आपल्याभोवतीच फिरतं असं तुला का वाटतं? काही गोष्टींना आपण जबाबदार नाही आणि काही गोष्टी आपल्याही नियंत्रणाबाहेर असतात, हे मान्य करायला तुला इतका त्रास का होतो?" मग मी 'क'वर नियतीवादाचा आरोप करते. मला माहित आहे, की सर्व घटनांकडे आपल्याच दृष्टीकोनातून पाहणं म्हणजे 'क'ला आत्मकेंद्रीपणा वाटतो; पण माझा दावा असा आहे, की प्रत्येक जीव मूलभूतपणे आत्मकेंद्रीच असतो. सापेक्षता सिद्धान्ताप्रमाणे अगदी काळ आणि अवकाशही निरीक्षकाच्या दृष्टीकोनातून सापेक्ष असतात. इथे आपण तर फक्त मानवी नात्यांचं अर्थनिर्णयन करत आहोत. घडलेल्या घटनांकडे आपल्याच दृष्टीकोनातून पाहणं नुसतं नैसर्गिकच नाही, तर मूलभूतच आहे. माझ्या दाव्यातली विसंगती दाखवायला 'क' फक्त भुवया उंचावून डोळे कपाळात घालतो.

माझ्याप्रमाणेच 'अ', 'ब, 'क', 'ड', 'ई', 'फ' हेदेखील त्या-त्या निरीक्षकाच्या सापेक्ष जागेनुसार भूमिका घेतात - काही उघड, तर काही छुप्या. आपापल्या स्नेहाची विभागणी करण्याची जबाबदारी कुणी न सांगता, न मागता निरीक्षकांवरच येऊन पडते. या तंट्यात माझी सहानुभूती 'ब'ला आहे हे उघड व्हायला लागलं आहे. 'ब' मनस्वी आहे, पण उत्छृंखल नाही; आग्रही आहे, पण निष्ठुर नाही; सर्जनशील आहे, पण भावनिक नाही. 'अ' व्यासंगी आहे, पण अहंकारी; चाणाक्ष आहे, पण धूर्तही; आतिथ्यशील आहे, पण व्यवहारीही. ते दोघे एकत्र असताना छान होते, एकमेकांच्या सामर्थ्यांना पूरक आणि एकमेकांच्या उणिवा झाकणारे. आता विभक्तपणे त्यांच्यातल्या उणिवा बोचायला लागल्यात. 'ब'चा आग्रहीपणा दुराग्रह वाटायला लागलाय आणि 'अ' फक्त धूर्तच नव्हे, तर निर्दयही आहे अशी शंका येतेय; पण निर्दयतेहून दुराग्रह हा अधिक मानवी आणि म्हणून माफ करता येण्याजोगा दोष वाटतोय. हे सगळंही अर्थातच सापेक्ष!

आईवडील दोघेही एकाच छताखाली पूर्वीप्रमाणे कायम राहायला हवेत असं वाटणाऱ्या आणि त्यांच्यामधल्या तणावात भरडल्या गेलेल्या मुलांप्रमाणेच मला असाहाय्य वाटतं. 'अ'च्या घरात 'ब'च्या खुणा निर्लज्जपणे दृश्य असतात, 'ब'ने रंगवलेल्या भिंतीवर 'अ'ने नुकतंच लावलेलं चित्र, 'ब'च्या आवडत्या कपांतून 'अ'ची आवडती कॉफी, 'ब'च्या कपाटातून नाहीशी झालेली पुस्तकं आणि त्याजागी वाढलेले 'अ'चे पारिभाषिक ग्रंथ. सर्वांत अंगावर येते ती 'ब'ची बाग. 'अ'च्या अंगणात 'ब'ने हौसेने लावलेली झाडं खुशाल बागडत असतात. 'अ'ने बागकामाचं काम आउटसोर्स केलं आहे, फार महत्त्वाचं नसल्याप्रमाणे. मला बागेच्या पायरीवर एकमेकांच्या अंगावर आश्वस्तपणे रेलून निरर्थक वाद घालणारे ते दोघे आठवतात. 'अ'च्या खवचट टिप्पण्या आणि 'ब'ची पल्लेदार वाक्यं यांच्या पार्श्वभूमीवर 'ब'च्या केसांशी चाळा करणारे 'अ'चे देखणे हात आठवत राहतात. मला या आठवणी व्याकूळ करतात, त्यांच्या विभक्त होण्याने माझ्याही आतलं काहीतरी तुटत जातं. स्नेह, वात्सल्य, आकर्षण, आदर या गोमट्या गोष्टी किती अल्पजीवी असू शकतात या जाणिवेने मी हादरून जाते. 'अ'च्या ठार प्रेमात असताना 'ब'ने माझ्यासमोर बोललेल्या गोष्टींचा शब्दन्‌ शब्द आठवतो, जो आता तो फसवा वाटतो. एकमेकांच्या गुणावगुणांची जाण नसलेलं भाबडं प्रेम नव्हतंच त्यांचं कधी; पण एकदा आकर्षण, आदर आणि सुरक्षितता संपल्यावर ते नातं अगदी बिनबुडाचं होतं की काय असं वाटायला लागलंय.

इतक्या मोठ्या काळाच्या सहवासानंतर, एकमेकांशी इतक्यांदा रत झाल्यावर, शरीराने आणि मनाने इतक्या जवळ आल्यानंतर मग जरी नातं बिघडलं, तरी एकमेकांचा तिरस्कार कारण्यापर्यंत ते कसं येतं या प्रश्नाचं उत्तर शोधत राहणं मला गरजेचं वाटतं. प्रेम आणि तिरस्कार या भावना एकाच नाण्याच्या दोन बाजू असू शकतील काय? ज्याच्यावर इतकं प्रेम केलं त्याच्याकडूनच प्रतारणा झाल्याने माणसं अधिक दुखावली जात असतील का? अपेक्षाभंग झाल्यावर, विश्वासातल्या माणसाकडून मानहानी झालीय आणि आपल्याला फसवलं गेलंय असं वाटल्याने माणसं अधिक कटू बनत असावीत हे माझ्या हाती लागलेलं सत्य मला पुरतं निराश करतं. स्वतःला कोणत्याही बंधनात बांधून घ्यायला कचरणारी, कोणालाही आपल्याला दुखावण्याचा अधिकार नाकारणारी, कोणाच्याच फार जवळ न जाणारी, शुद्ध व्यवहारी माणसं सुरक्षित असतात का? 'अ' अधिक व्यवहारी आहे म्हणून या विभक्तीनंतरही शांत राहू शकतो आणि आपण त्यामुळे मुळीच कटू झालेलो नाही असंही दर्शवतो. पण ते खरं असू शकतं का? व्यवहारी माणसाचं आपल्या भावनांवर नियंत्रण अधिक असतं, पण म्हणून त्याला दु:ख कमी बोचतं का? मी फार व्यवहारी नाही आणि आक्रस्ताळ्या भावनाविष्काराहून शांत, नियंत्रण असलेला राग विखारी असू शकतो हे मी अनुभवलं आहे. पण मग फक्त आपल्याप्रमाणेच मानसिकता असलेली व्यक्ती म्हणून माझी 'ब'ला अधिक सहानुभूती आहे का? उत्तरं मिळाल्याचा आभास निर्माण करून शंकेस जागा ठेवणाऱ्या अनुत्तरीत प्रश्नांशी मी चाचपडत राहाते.

हे नातं इथवर बिघडायला इतका कमी काळ कसा पुरला याचंही मला नवल वाटतं. एके काळी एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेली ही माणसं एकमेकांशी इतक्या क्रौर्याने वागताना पाहून मी बिचकते आणि ही माणसं आपल्याशीही अशीच वागू शकतील या जाणिवेने धास्तावते. माझ्या आणि 'क'च्या नात्याहून जुनं, आणि एके काळी शाश्वत वाटत असलेलं, हे नातं असं विषारी होताना पाहिलं की एकूणच नात्यांबद्दलच कमालीची असुरक्षितता वाटायला लागते. समजांचे गैरसमज, संभाषणातल्या अडचणी, अहंकाराच्या ओझ्याखाली दडपलेल्या भावना ही सगळी समान सूत्रं दिसायला लागतात. हे आपल्याही बाबतीत होऊ शकतं या जाणिवेने मी हडबडते आणि 'क'ला माझी सांकेतिक भाषा शिकवायला जाते. "मला एकटीला राहू दे." म्हणजे "माझं माझ्या भावनांवरचं नियंत्रण सुटतं आहे, मला एकटीला सोडून जाऊ नकोस."; "मी तुला सोडून जाणार आहे." म्हणजे "माझ्या नाराजीचा तुझ्यावर शून्य परिणाम होतोय हे पाहून मी हतबुद्ध झाले आहे आणि मी कळवळून तुझ्याकडून माफीवजा काहीतरी मागते आहे."; "मला तुझं तोंडही पाहायचं नाही." म्हणजे "मी आत्ता तुझ्यावर भयंकर संतापले आहे, पण तू मला मनवायचा प्रयत्न करत राहा."; "मला आता यावर काहीच बोलायचं नाहीय." म्हणजे "माझं बोलून झालंय, आता तू काहीतरी बोल." वगैरे वगैरे. मी असलं काही सांगायला लागले की 'क'चे डोळे माझी थट्टा करायची की नाही या निर्णयसंभ्रमात मिश्कीलपणे हसतात आणि माझ्या असुरक्षिततेवर मला तात्कालिक दिलासा मिळतो.

'क'ची सांकेतिक भाषा आपल्याला समजते असा माझा आशावाद आहे. 'क' स्वतःहून आपल्याविषयी काही सांगत नसताना, माझ्या मनाने मानलेल्या गोष्टी, गृहीतकं हेच सत्य आहेत असे समजण्याखेरीज अखेरीस पर्यायही नसतो.

निजताना 'क'च्या हृदयाचे ठोके ऐकत ताल धरताना मला जाणवतं, की त्याचे जलद ठोके माझ्या हृदयाच्या संथ लयीशी विसंगत आहेत, त्याच्या श्वासांच्या तालाहून माझा ताल निराळा आहे. पण त्याच्या दीड ठोक्याला आपला एक ठोका, त्याच्या सव्वा श्वासाला आपला एक श्वास या विसंगतीतही एक असंबद्ध लय आहे, अपेक्षितता आहे. शरीराचं तापमान किंचित निराळं असूनही एकमेकांच्या बाहूंत जखडल्यावर शरीरांच्या सीमा धूसर होत जातात. आपल्या शरीराचा प्रांत संपून दुसर्‍या शरीराचा प्रांत कुठून सुरू होतो याची जाणीवच पुसट होते; जणू तोही आपल्याच अस्तित्वाचा विस्तारित प्रांत असावा. एक असंबद्ध विक्षिप्त ताल आणि शरीराचा आश्वस्त स्पर्श आमच्या नात्याला बांधून ठेवतो. मनकवड्यासारखा 'क' पुटपुटतो, "ते दोघे म्हणजे आपण नव्हे, हे आपल्याबाबतीत नाही होणार, झोप आता." मग मी निर्धास्त होते, निदान तेवढ्यापुरती तरी. आणि माझ्या सापेक्ष सुरक्षिततेला कवटाळून झोपी जाते.

field_vote: 
4.9
Your rating: None Average: 4.9 (10 votes)

प्रतिक्रिया

सॉलिड!!! व्यक्तीच्या मनातले तरंग फार कौशल्याने टिपले आहेत. हे स्फुट संपूच नये असे वाटत राहीले.

व्यवहारी माणसाचं आपल्या भावनांवर नियंत्रण अधिक असतं, पण म्हणून त्याला दु:ख कमी बोचतं का?

स्वभावात पूर असणार्‍या प्रत्येक माणसाच्या मनातील सनातन प्रश्न असावा हा
सो कॉल्ड समाज म्हणजे मित्रांशी आपले केवढी गुंतागुंतीचे नाते असते आणि त्यांच्या विसंवादाचा आपल्यावरही किती आणि कसा परीणाम होऊ शकतो हे लिंगनिरपेक्ष नामां/सर्वनामांतून अतिशय प्रभावीपणे मांडले आहे.
५/५

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नेमकं स्फुट. याच धर्तीवरचे काही अलीकडचे, काही जुने; काही मित्रपरिवारातले, काही जवळच्या नात्यांमधले अनुभव आठवले आणि काही काळ पुन्हा एकदा अस्वस्थ करून गेले.

*(शीर्षकाचा संदर्भ 'आहे मनोहर तरी': 'सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच. ही साठा प्रश्नांची कहाणी. सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे.')

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतीव सुंदर. अगदी टायटलसह.
अन अबक देखिल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

शीर्षकासहित सगळं लिखाण आवडलं. दोन माणसांतील ओढ ही अहंतेच्या चढाओढीपर्यंत येते कशी, इ. प्रश्न सार्वकालिक आहेत. पण त्या ओढघसटीच्या गुरुत्वाने भवतालातही ताण निर्माण होतो, यावर नेमकं बोट ठेवणारा लेख.

तरी शेवटच्या तीन परिच्छेदांनी तिथवरच्या स्वगताला दिलेल्या आकाराने काही काळ स्तब्ध झालो. 'विभक्ती'वरून 'सापेक्ष सुरक्षितते'वर अशा रीतीने आणलेलं आचंबित करून गेलं. असं इतकं सरळ स्वच्छ काही माणसांना लिहिता येतं याचं प्रचंड अप्रूप वाटतं (असंच अप्रूप वाटलं होतं 'हॉलिडे' या चित्रपटात केट विन्स्लेटच्या तोंडचा एक संवाद ऐकताना). तेव्हा एक दंडवत.

आता प्रतिक्रियेत थोडं वाहवत जाणार आहे..

इतरांनी कितीही हस्तक्षेप केला वा 'लेट गो', 'लिव्ह इन दि मोमेन्ट'ची कितीही व्याख्यानं ऐकून अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तरी 'मीच का म्हणून लेट गो करायचं ?' हाही प्रश्न पडून 'ये रे माझ्या मागल्या' अवस्थेत हतबल होतो माणूस. तरी एक बरं असतं. निदान दोन माणसांत बोलायला वाव तरी असतो; दोष द्यायला, बोल लावायला, आरोप ऐकून भांडायला निदान माणूस बोलायला समोर तरी असतो. शोकांतिका अधिक तीव्र होते जेव्हा माणसं बोलण्यापलीकडे जातात (उदा. 'सदमा' चित्रपटाचा शेवट). हे ज्यांना वेळीच उमगतं त्यांच्यासाठी एक तरी संधी असतेच - ज्यांच्याशी तुटलं आहे नि जी माणसं अजूनही संवाद साधण्याच्या स्थितीत नि कक्षेत आहेत त्यांच्यापर्यंत - हात पुढे करता येण्यासाठी. हा एक मोठाच दिलासा असतो. प्रतीक्षा असते ती आपणहून मौन सोडण्याची, निर्मळ होण्याची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतीक्षा असते ती आपणहून मौन सोडण्याची, निर्मळ होण्याची

या एकाच गोष्टीशी मी स्वतः अनेकदा अडकते. विचारी माणसांना आपण काय करायला हवं, काय बरोबर आहे, काय केलं तर आपलीच या क्लेशदायक अनुभवांतून सुटका होईल आणि आपल्याला 'निर्मळ' होता येईल याची एक अंतस्थ जाणीव असतेच पण अहंकार अनेक गोष्टी करू देण्यापासून आपल्याला थांबवतो. निर्मळ होण्यापेक्षा 'आपण बरोबर आहोत' हे स्वतःला पटवत रहाणं अधिक महत्वाचं व्ह्यायला लागतं, आपली माणूस म्हणून असलेली क्लेशदायक मर्यादा अनेक गोष्टी करण्यापासून स्वत:ला थांबवते. अशावेळी निर्मळ मनाच्या लोकांचा हेवाच वाटायला लागतो, जे महत्वाचं आहे ते टिकवणं, जोपासणं आणि सुधारणं किती सोपं असतं अशा लोकांसाठी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय आवडलं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतका सुंदर संवेदनशीलतेन लिहीलेला लेख वाचुन स्तब्ध झालो.
लेखिकेचं भिरभिरतं संवेदनशील मन, सतत जाणवतं राहत.
आपली नाती किती नाजुक पायांवर उभी असतात. किती गाफिल किती भेदरलेले असतो आपण आतल्या आत.
एक छोटासा तरंग बाहेरुन आलेला किती सहज एक्स्पोज करतो आपल्या नात्यांना किती तर्हेने प्रश्नांकित करु शकतो ?
किती भिरभिरती अवस्था होउन जाते अशा वेळेस एखाद्या संवेदनशील व्यक्तीच्या मनाची
फारच सुंदर लेख
पुर्ण कळला असे नाही मात्र खुप आवडला पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतो विचार करावासा वाटतो या लेखावर
याच बोट धरुन स्वतःत डोकवावस वाटतं
अत्यंत उत्कृष्ठ लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

रुची, तुला सलाम! अतिशय संवेदनशील आणि सुंदर लेख. या अंकाच्या विषयाला आणि एकूण पार्श्वभूमीला अगदी साजेसा, कळवळून लिहीलेला.

लेख वाचून काही गोड, काही कडवट जुन्या आठवणी जाग्या झाल्या, मित्रपरिवारात झालेल्या विभक्तींच्या. यात सर्वात त्रासदायक बाब अशी असते की कॉलेज-हॉस्टेल वगैरेच्या काळात (आणि जालीय मैत्रीपूर्व काळात) सगळं उघड उघड व्हायचं, आणि मित्रपरिवारही दोन्ही बाजू तपशीलात जाणून घ्यायचा, त्यावर फुकट सल्ला आणि मतप्रदर्शन करायचा आग्रह धरे. किंबहुना, तो त्या परिवाराचा हक्क होता.
आता थोडं वयामुळे असेल, किंवा मैत्रींच्या बदलेल्या संचारमाध्यमांच्या निराळ्या, अस्पष्ट आचारनियमांमुळे असेल, खोलात जाऊन नेमकं काय झालं, कोण चुकलं, कोणी सुरुवात केली, हे जाणून घ्यायला मित्रपरिवार कचरते. तसे केल्यास उगाच नाक खुपसल्यासारखे वाटते, जेवढे "शेअर" केले जाईल तेवढेच घ्यायचे अशी काहीशी पद्धत दिसते: "टेक ओन्ली वॉट इज फ्रीली गिवन". दोन्हींत फायदे-तोटे आहेतच, आणि कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणता मार्ग योग्य हे नेहमी आगाऊ कळतेच असे नाही. त्यामुळे कधी जास्त बोलून, तर कधी मौन बाळगून मित्रपरिवारातही गैरसमज वाढत जाऊ शकतात. आपण उगाच बोललो का, किंवा आपण करू शकलो असतो तितकं केलं नाही का, असं वाटत राहतं. आणि या सगळ्यात कुचकट बघे असतातच...

शेवटचा परिच्छेद विशेष आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मैत्रींच्या बदलेल्या संचारमाध्यमांच्या निराळ्या, अस्पष्ट आचारनियमांमुळे असेल

एकूणच सध्याच्या टोकाच्या व्यक्तीकेंद्री दिशेने चाललेल्या समाजाच्या दृष्टीकोनातून मैत्रीच्या संकल्पना बदललेल्या दिसताहेत. प्रत्येकाला त्याचा खासगी अवकाश देण्याच्या आग्रहामुळे आणि तो आपण दिला नाही तर आपण नाकखुपसेपणा केल्यासारखे होईल म्हणून अगदी राहवत नसूनही आपण अनेकदा मौन पाळतो.

परवा पेद्रो आल्मेद्वारने केलेला अ‍ॅलिस मन्रोच्या कथांवर आधारित 'ज्युलिएटा' सिनेमा पाहिला; त्यात एका अनोळखी व्यक्तीने केलेल्या आत्महत्येस आपण जबाबदार आहोत या अपराधीपणातून न सुटलेल्या एका व्यक्तिरेखेची एक सुरेख गोष्ट आहे. प्रश्न असा नाही की ती व्यक्ती आत्महत्येला प्रवृत्त होण्यास नायिका जबाबदार आहे का पण तिने त्या व्यक्तीची अस्वस्थता ओळखली असती ती आणि थोडी वेगळी वागली असती तर ती व्यक्ती वाचली असती का, हा तो प्रश्न. संचारमाध्यमांच्या निराळ्या, अस्पष्ट आचारनियमांमुळे हा निर्णय घेणे अनेकदा अवघड होते पण त्यातून येणारा अपराधीपणा मात्र चिरंतन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकूणच सध्याच्या टोकाच्या व्यक्तीकेंद्री दिशेने चाललेल्या समाजाच्या दृष्टीकोनातून मैत्रीच्या संकल्पना बदललेल्या दिसताहेत. प्रत्येकाला त्याचा खासगी अवकाश देण्याच्या आग्रहामुळे आणि तो आपण दिला नाही तर आपण नाकखुपसेपणा केल्यासारखे होईल म्हणून अगदी राहवत नसूनही आपण अनेकदा मौन पाळतो.

व्यक्ती च्या मानसिक जडणघडणीचा परिणामस्वरूप म्हणून व्यक्तीची आंतरिक उर्मी ही असते की व्यक्तीने "त्यांना" काही बाबी (प्रसंगी त्यांच्या खासगी अवकाशाची मर्यादा पार करून) सांगाव्यात. व बदलता व्यक्तीकेंद्री संकेत हा non-interference चा आहे. इथे व्यक्तीची इच्छा/उर्मी ही (बदलत्या) व्यक्तीकेंद्री संकेताच्या विपरीत जाते. व या दुविधेमुळे व्यक्ती अस्वस्थ होते.

व्यक्ती च्या मानसिक जडणघडणीचा परिणामस्वरूप म्हणून व्यक्तीची आंतरिक उर्मी non-interference ची असती व बदलता "सामाजिक" संकेत हा "त्यांना" काही बाबी सांगाव्या असा असता तर ?

मी प्रतिसाद म्हणून प्रश्न विचारलेला आहे.

सामाजिक संकेतांपैकी अनेक संकेत, शिष्टाचार हे आजची व्यक्ती जन्मास यायच्या आधी अस्तित्वात होते व त्यांचा व्यक्तीच्या मानसिकतेवर होणारा परिणाम (व्यक्ती लहानाची मोठी होताना) म्हंजे जडणघडण असं तुम्ही म्हणू शकता. त्यातले काही संकेत हे व्यक्ती बदलू पाहते असे सुद्धा चित्र आहे. म्हंजे संकेताचा व्यक्तीवर परिणाम होतो व व्यक्ती संकेतावर परिणाम करते. म्हंजे औषधाची गो़ळी पोटात गेल्यावर गोळी पोटावर काही परिणाम करते व दुसर्‍या बाजूला पोटातली यंत्रणा गोळी वर (हे फॉरिन ऑब्जेक्ट आहे असं समजून) काही परिणाम करते.

तुम्ही म्हणता ती बदलती व्यक्तीकेंद्री व्यवस्था ही मोरल इन्व्हर्जन चे उदाहरण आहे. प्रजातंत्र हे पहिले मोरल इन्व्हर्जन होते. लोकशाही यायच्यापूर्वी लोक सत्ताधीशांप्रति(म्हंजे राजा प्रति) निष्ठ असावेत अशी अपेक्षा होती. आज सत्ताधीश हे लोकांप्रति निष्ठ असावेत अशी अपेक्षा आहे. आजचे सत्ताधीश हे लोकांकडून मत मिळवल्यानंतर सत्तेवर बसतात.

(१९९२ मधे भारतात जे झाले ते आणखी एक मोरल इन्व्हर्जन होते. बिझनेसेस हे त्यांच्या बहुतांश कृत्यांमधे सरकारला उत्तरदायी आहेत या विचारसरणीपासून दूर जाऊन सरकार हे सुद्धा बिझनेसेस ना उत्तरदायी आहे अशा विचारसरणीचे सुतोवाच झाले. ते जेमतेम १% झालेय हे मान्य. पण झालेय. )

आज जे वातावरण व्यक्तीकेंद्री दिशेने चाललेले आहे (ज्यास तुम्ही टोकाची व्यक्तीकेंद्री "रुग्णवाहिका" असे म्हणू शकता) ती या इन्व्हर्जन ची आणखी एक आवृत्ती आहे असं मला वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप आवडला लेख!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद देणार्या सर्वांचे मनापासून आभार. प्रतिक्रिया वाचतानाही प्रकर्षाने जाणवले की लेखाचे अर्थनिर्णयनही निरिक्षकाच्या दृष्टीकोनानुसारच सापेक्ष आहे पण वाचकाला या लेखाकडे आपल्या अनुभवांच्या परिपेक्ष्यातून पाहाता आले असेल तर हा लेखनप्रपंच सफल झाला हे जाणवून सुखावले. धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0