Skip to main content

दिवाळीचा फराळ : बेसन आणि खोबर्‍याचे लाडू

नमस्कार मंडळी,
सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा !!!

दिवाळी म्हटलं की रांगोळी, दिव्यांच्या रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजी सोबत आठवतो तो दिवाळीचा फराळ. तसा मी लहानअसल्या पासून तिखटखाऊ. फराळातल गोडं धोड सहसा आवडत नाही. अपवाद म्हणजे बेसनाचे लाडू.
तर आजची सुरवातच या आपल्या लाडक्या बेसनलांडूंनीच करु.

साहित्य :

२ वाट्या बेसन.
३/४ वाटी वितळलेल तुप.
१/४ वाटी चण्याची डाळ.
३/४ वाटी बारीक साखर / पिठी साखर
२-४ चमचे दुध.

१ लहान चमचा वेलची पुड
आणि आवडी नुसार काजु तुकडा , बेदाणे, चारोळ्या आदी सुका मेवा.

कृती :

बेसनाचे लाडु खाताना बरेच वेळा टाळ्याला चिटकुन बसतात आणि माझा विचका करतात. त्यामुळे माझी आई निव्वळ बेसन वापरण्या पेक्षा चण्याची डाळच भाजुन ती गीरणीवाल्या कडुन थोडी भरड वाटुन आणत असे. भारतात असेल तर ठिक आहे पण परदेशात असण्यार्‍यांनी आता पीठाची गिरणी कुठे शोधायची. त्यावर तोडगा म्हणुन मग मी थोडी चण्याची डाळ वापरतो.

चण्याची डाळ कोरडी भाजुन घ्यावी. थोडीशी डागाळायला लागली बाजुला काढुन ठेवावी.
गार झाल्यावर मिक्सर मध्ये थोडी भरड(रवाळ) वाटुन घ्यावी.

नॉनस्टीकच्या कढईत वितळवलेले तुप घेउन त्यात बेसन आणि डाळीच रवाळ पीठ टाकुन मध्यम आचेवर किमान २५-३० मिनिटं चांगल खरपुस भाजाव. सुरवातीला घट्ट दिसणार मिश्रण नंतर तुप सोडु लागल की थुलथुलीत दिसायला लागेल.

कढई गॅसवरुन उतरवुन मग त्या मिश्रणावर दुधाचा हबकारा मारावा. दुधामुळे मिश्रण लगेच फसफसुन येईल. ते चांगल ढवळुन घ्याव. आणि लागलीच एका वेगळ्या भांड्यात काढुन घ्याव.

साधारण १५-२० मिनिटां नंतर जेव्हा मिश्रण थोड गार होईल तेव्हा त्यात वेलची पुड आणि सुकामेवा टाकावा.
बरेच वेळा लाडू वाळुन झाले की मग वरुन एखादा बेदाणा, काजु लावुन तो सजवतात मला तो प्रकार आवडत नाही. हे म्हणजे काय की आमच्या लाडुत सुकामेवा आहे बरका अशी जाहिरात केल्या सारख झाल. ;)

सुकामेवा कसा लाडूखाताना मध्येच दाता खाली येउन सरप्राईज मिळायला हवं. जर एखादा जास्त पुण्यवान असेल त्याला मिळतील २-३ सुक्यामेव्याचे तुकडे. ;) असो हे झाल माझं मत.
तर सुकामेवा टाकुन झाल्यावर त्यात बारीक साखर नाहीतर सरळ पिठीसाखर टाकावी आणि मिश्रण एकत्र करावे. साखरेचे कण जेव्हा दाताखाली येतात तेव्हा एक वेगळ्याच प्रकारचा रवाळपणा लाडुत येतो जो मला खुप आवडतो.

नंतर लगेच आवडत्या आकारात लाडू वाळुन घ्यावे.

ही आमची वाढीव स्टेप.
चित्र फितीत दाखवल्या प्रमाणे एका बाऊल मध्ये दिड चमचा बारीक साखर घ्यावी. त्यात एका वेळी एक करत लाडू घोळवून घ्यावा. थोडासा हातात फिरवुन जास्तीची लागलेली साखर काढुन टाकावी.

आणि हे आहेत तयार बेसनचे लाडू. :)

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

दुसरे जे लाडू करणार आहोत ते फारच सोप्पे आणि अगदी १५-२० मिनिटात होण्यासारखे आहेत.
मुख्य म्हणजे जेवढे करायला सोप्पे तेवढे चवीत अफलातुन :)
चला तर सामान गोळा करु या.

खोबर्‍याचे लाडू.

साहित्य :

२ वाट्या डेसिकेटेट नारळ.+ १/४ वाटी बाजुला काढुन ठेवावा
१/२ वाटी पेक्षा थोड कमी क्रिम.
१/२ वाटी कंडेन्स्ड दुध.
१ चमचा वेलची पुड.
चीमुट्भर मीठ (ऑप्श्नल.)
बेदाणे

कृती :

नॉनस्टीक कढईत खोबर मध्यम आचेवर गुलाबी-सोनेरी रंगावर भाजुन घ्याव.

आच मंद करुन खोबर्‍यात क्रिम आणि कंडेंन्स्ड दुध टाकुन मिश्रण चांगले एकत्र करुन घ्याव.

५-१० मिनिटांनी आच बंद करुन वरुन वेलची पुड आणि बेदाणे मिश्रणात टाकावे.

मिश्रण गरम असतानाच पटापट लाडू वाळुन घावे आणि खोबर्‍याच्या चुर्‍यात घोळवुन घ्यावे.

हे आहेत तयार खोबर्‍याचे लाडू. :)

शुभ दिपावली.

पुर्वप्रकाशीत : 'मी मराठी' दीपावली अंक २०११

आवड/नावड

प्रियाली Thu, 27/10/2011 - 17:48

खोबर्‍याचे लाडू:

नॉनस्टीक कढईत खोबर मध्यम आचेवर गुलाबी-सोनेरी रंगावर भाजुन घ्याव.

हे सुमारे कितीवेळ भाजलं की पुरेसं असतं?
हे लाडू किती दिवस टिकतात?
दोन वाटी खोबर्‍यात किती लाडू व्हावेत? (तुमचे चित्र सुमारे १६ लाडू दाखवतात पण दोन वाट्यांमध्ये इतके लाडू होतील असे वाटत नाही म्हणून चौकशी ;-))

बायदवे, खोबर्‍याचे लाडू सोपे दिसतात. मी पूर्वी कधी केले नव्हते. आता करेन म्हणते.

गणपा Thu, 27/10/2011 - 20:35

In reply to by प्रियाली


हे सुमारे कितीवेळ भाजलं की पुरेसं असतं?

खोबर मध्यम आचेवर १०-१५ मिनिटांत भाजुन होत.


हे लाडू किती दिवस टिकतात?

हे १०-१२ दिवस सहज टिकतात. (जर तो पर्यंत उरले तर. ;))


दोन वाटी खोबर्‍यात किती लाडू व्हावेत?

दिलेल्या प्रमाणात अंदाजे १५ लाडू बसतात.
आता अर्थात ते तुमच्या लाडूंच्या आकारावर अवलंबुन आहेत. (मी खोबर्‍याचे लाडू, बेसनाच्या लाडूंच्या आकारचे आहेत.)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 27/10/2011 - 19:35

प्रियालीला पडलेला प्रश्न मलाही पडला आहे, खोबर्‍याचे लाडू किती दिवस टिकतात? मलाही डाळ भाजून दळून मिक्स करण्याची कल्पना आवडली.

हे म्हणजे काय की आमच्या लाडुत सुकामेवा आहे बरका अशी जाहिरात केल्या सारख झाल.

हा हा हा ... हे आवडलं.
उगाच नाही गणपा जातो तिथे "बाब्या" बनतो.

सानिया Thu, 27/10/2011 - 20:10

तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा!

'डागाळलेली डाळ' हा शब्द्प्रयोग आवडला.

भारताबाहेर काही देशांतील भारतीय दुकानांत लाडवाकरता खास भरड पीठ मिळते. अमेरीकेत मिळते हे मला माहिती आहे. ते मिळाल्यास डाळ घालायची गरज नाही. शिवाय अमेरीकेतली साखर सुद्धा पिठीसाखरेपेक्षा रवाळ असते, त्यामुळे केवळ नेहेमीचेच पीठ आणि नेहेमीचीच साखर घेतली तरी लाडू रवाळच होतात. मात्र हे पर्याय नसतील, तर डाळीची कल्पना छानच.

मी दुध लाडवाचे मिश्रण किंचीत कोमट झाल्यावर घालते.
खोबर्‍याचे लाडू कधी केले नाहीत. करून बघायला हवेत. माझं करंज्यांचं सारण उरलं आहे, त्यात जरा घट्टसर दुघ घालून आटवलं तर त्याचे लाडू बनवता येतील. जरा जास्त वेळ आटवायला लागेल इतकच.

पालवी Thu, 27/10/2011 - 21:19

एकदम जबरी लाडू आहेत. नेहमीप्रमाणे एकदम सुंदर आणि सचित्र वर्णन. आता तुमच एक पुस्तक काढा.
मग काय लेक खुश असेल एकदम. यावेळी लेकीचे फोटो टाकले नाहीत ते दिवाळीचे... त्याचीही वाट बघतो आहोत!