न्यूरॉन - कुत्रं नव्हे, मित्र

न्यूरॉन - कुत्रं नव्हे, मित्र

लेखक - राजेश घासकडवी

न्यूरॉन हे एक अखिल मानवजातीला पडलेलं कोडं आहे. अखिल म्हणजे आमच्या घरातली मानवजात - मी, माझी बायको आणि माझा सात वर्षाचा मुलगा. बाकीची मानवजात आम्ही तरी फारशी विचारात घेत नाही. ते एक वेगळंच महाप्रचंड, जगड्व्याळ कोडं आहे. पण विचार करायला घेण्यासाठीसुद्धा आत्तापर्यंत दवणे, वपु वगैरेंसारखे लेखक सोडले तर इतर कोणाला न सुटलेलं कोडं का घ्यावं? त्यापेक्षा आपल्या घरचं छोटंसं पंधरा पौंड वजनाचं, केसाळ आणि काळ्याभोर डोळ्यांच्या बारक्याशा हालचालींनी अखिल मानवजातीवर ताबा ठेवणारं आमचं कुत्रं घेणं सोपं.

एकशेचाळीस अक्षरांपेक्षा जास्त वाचण्याची सवय गेलेल्यांनी इथेच वाचन थांबवलं असेल बहुधा. पण अजूनही ज्यांना वैचारिक ट्विटरायटिस झालेला नाही अशा सुज्ञ वाचकांनी ओळखलं असेलच की मी वरच्या परिच्छेदाची सुरुवात न्यूरॉन या शब्दाने केली, आणि शेवट ’आमचं कुत्रं’ने केला. म्हणजे आमच्याकडे कुत्रं आहे, त्याचं नाव ’न्यूरॉन’ आहे, आणि ते एक गमतीदार कोडं आहे हे सांगण्यासाठी वरच्या परिच्छेदाची रचना केली होती. आणि या परिच्छेदाची रचना अर्थातच जे सुज्ञ नाहीत त्यांनाही समजावं अशांसाठी केलेली आहे.

असो, आमच्या कुत्र्याचं नाव न्यूरॉन का आहे हेही एक विचार करण्याजोगं कोडं आहे. आमच्या घरातल्या अखिल मानवजातीसाठी नाही अर्थातच. कारण ते नाव आमच्या सुविद्य पत्नीने ठेवलं. तिचा मानसशास्त्राचा अभ्यास. पण तो साधासुधा - माणसांचा - नाही, तर मेंदूंचा. त्यामुळे फूल ना फुलाची पाकळी या न्यायाने मेंदू ना मेंदूची पेशी - म्हणून तिने त्याचं नाव न्यूरॉन ठेवलं. न्यूरॉन नाव ठेवण्यामागे दुसरंही एक कारण आहे. ते, म्हणजे आमचं कुत्ररत्न, हे पूडल जमातीतलं आहे. ही जात प्रचंड हुशार असते असं माझ्या बायकोचं म्हणणं होतं. न्यूरॉनला पाळून दीड वर्ष झाल्यावर त्या काचेसारख्या कठीण मताला किंचित तडे गेले आहेत. पण म्हणून अर्थातच ती ते मत सोडायला तयार आहे, असं नाही. त्याबद्दल तिला काही म्हटलं तर ती लगेच म्हणते, 'लग्नापूर्वी तसा तूही बाकी काही नसलास तरी हुशार आहेस वगैरे ऐकलं होतं'. मग मी विषय बदलतो.

न्यूरॉन आमच्या घरी कसा आला हे अजून एक कोडं. खरं तर तो इतकी वर्षं का आला नाही हे कोडं म्हणता येईल. कारण आमचं लग्न झाल्यानंतर हनीमून नवा-नवा असतानाच माझ्या बायकोने 'आपण एक कुत्रा घेऊ या. मला फार आवडतात कुत्रे.' असं म्हटलं होतं. आणि मी त्या गोड काळाच्या भरात हो म्हणून गेलो. प्रेम आंधळं असतं हेच खरं. माझ्या डीएनएच्या दोन्ही साखळ्यांतून माझ्याकडे वारशाने प्राणिद्वेष आलेला आहे. माझे वडील कोणाकडे कुत्रा आहे म्हटल्यावर त्यांच्याकडे जाण्याचा विचारही टाळत. आई आणि एकजात सर्व मावश्या कुत्रा पाहिला की अंगावर झुरळ चढल्यासारखं करतात. मला स्वतःला कुत्र्यामांजरांबद्दल भीती नसली तरी प्रेम कधीच नव्हतं. लोकांकडे गेल्यावर त्यांच्या घरी कुत्रं असलं तर आपलं एखादवेळेला पाठीवरून हात फिरवायचा इतपतच. फार अंगचटीला येणारी कुत्री आवडत नसत. 'अरे, काही करत नाही तो' असं मालकांनी कितीही आत्मविश्वासाने सांगितलं तरी डीएनएच्या साखळ्यांमध्ये ठासून भरलेली भीती किंचित प्रमाणात बाहेर यायचीच. पण ते दिवसच हनिमूनी होते. लव्ह कॉंकर्स एव्हरीथिंग या न्यायाने त्या भीतीवरही विजय मिळाला. खरं तर प्रेम विजय मिळवतं यापेक्षा प्रेमाच्या आंधळेपणापोटी किंवा प्रेमाच्या नशेत गुंग राहून ते शत्रुसैन्याशी लढायलाच बाहेर येत नाही. तो हॅंगोव्हर उतरला की मात्र पंचाइत होते. तर सांगायचा मुद्दा असा की मी आतून नकार असला तरी माझ्या ओठांतून गोड होकार कधी निघून गेला हे कळलंच नाही.

आंधळ्या प्रेमाच्या भरात जी काही वचनं देऊन जातो ती नंतर कधीतरी भोवतातच. काही महिन्यांनी अचानक माझ्या होकाराची मला आठवण झाली. आणि माझ्या पोटात एक किंचितसा खड्डा पडला. खड्डा नाही, खरं तर खड्डुलाच म्हणावं. कारण बायकोने आत्तापर्यंत काही विषय काढलेला नव्हता. त्यामुळे सध्या तरी सुरक्षित होतो. पण बाहेर जाताना एखादं गोग्गोड कुत्रं त्याच्या गोग्गोड मालकिणीला कुठे खेचून नेत असेल, तर माझ्या पोटात तो खड्डुला पुन्हा यायचा. आणि अचानक मोठा मोठा व्हायला लागायचा. मग मी त्या मालकिणीकडे बघण्याचाही मोह टाळत असे. बायकोला विरुद्ध दिशेला तोंड करून 'तो सूर्यास्त काय छान दिसतो आहे ना?' किंवा 'त्या फुलाचा रंग किती गोड आहे नाही?' असं म्हणत असे. एरवी अरसिक असणार्‍या आपल्या नवऱ्याला बाहेर फिरायला गेल्यावर अचानक सौंदर्यपिपासू झटके कसे येतात, असा प्रश्न तिला पडला आहे हे मला तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसे. पण त्याने फारसं बिघडणार नव्हतं. फारतर ती मला शांतपणे घरी बसू देण्याऐवजी बाहेर फिरायला ओढून घेऊन जाईल हा लॉंग टर्म धोका होता. पण शॉर्ट टर्म फायद्यापुढे लॉंग टर्म तोटे फारच तुच्छ असतात.

असे बरेच महिने गेले. कुत्र्याविषयी ती आता विसरून गेली आहे अशा समजुतीने माझ्या पोटात पडणारे खड्डे कमी झाले होते. पण एके दिवशी घरी परतलो आणि जागोजागी इतस्ततः विखुरलेली पुस्तकं पसरलेली दिसली. 'तुम्ही कुत्रा पाळण्याआधी...' हे अर्धवट वाचून कोचावर उघडं पडलं होतं. 'पाळीव कुत्र्याची निगा कशी राखावी' हे शेजारच्या टीपॉयवर होतं. आणि 'तुमच्या लाडुल्या कुत्र्याला काय काय पक्वान्नं करून घालाल?' हे स्वयंपाकघरात ओट्यावर होतं. शिवाय डायनिंग टेबलवर आणखीन चारपाच पुस्तकांचा ढीग होताच. आणि कोलटकरांच्या कवितेतल्या रखुमाईला जसं अठ्ठावीस युगांचं एकटेपण हाका मारत धावून आलं तसं माझ्या पोटात गेल्या आठ महिन्यांतले नसलेले खड्डे अचानक हाका मारत एकत्रितपणे उमलायला लागले. त्या सगळ्यांचा क्रिटिकल मास तयार होऊन माझ्या पोटात एक इंप्लोजन होणार की काय अशी भीती वाटायला लागली. तरीही मी मन खंबीर करून तिला सामोरा गेलो. ती पलंगावर पसरून अजून एक पुस्तक वाचत होती 'कुठचा कुत्रा तुमच्यासाठी सर्वात चांगला?'. माझ्याकडे बघून तिने हसून म्हटलं,
"मी कुत्रा घ्यायचा विचार करते आहे."
"का? माझा एवढ्यातच कंटाळा आला का?" मी माफक विनोद करण्याचा प्रयत्न केला.
"काहीतरी काय, तू कुठे, कुत्रा कुठे... काही तुलना आहे का?" त्यापुढे तिने जे चेहऱ्यावर भाव आणले त्यावरून 'नवरा वगैरे ठीक आहे. एखादा असायला हरकत नाही. पण कुत्रा असायलाच हवा.' असं त्यातून स्पष्ट दिसत होतं. मी काही बोललो नाही.
"पण मला कुठला कुत्रा घ्यायचा ते कळत नाही." मग तिने वाचलेली माहिती घडाघडा सांगितली. सगळ्यात हुशार कुत्रे म्हणजे बॉर्डर कॉली, पूडल आणि जर्मन शेपर्ड डॉग (म्हणजे अल्सेशियन). पण बॉर्डर कॉलीला प्रचंड व्यायाम लागतो, आणि पूडल थोडं बायकी दिसतं, आणि जर्मन शेपर्डला हर्डिंग इन्स्टिंक्ट असतात. त्यांच्या आहाराची काळजी घेण्यासाठी त्यांना लो-ग्रेन फूड द्यावं लागतं. अमुक कंपनीचं खाणं स्वस्त असतं, पण त्यात मांसाऐवजी सोय प्रोटीन घातलेलं असतं. वगैरे वगैरे वगैरे. मी गुणी नवऱ्यासारखा हे सगळं ऐकत होतो. त्यावरून एकंदरीत कुत्रं पाळणं म्हणजे कुठूनतरी एक प्राणी आणून बांधून ठेवायचा आणि त्याला दिवसातून दोनदा दूधपाव द्यायचा इतकं सोपं प्रकरण नाही हे माझ्या लक्षात आलं. 'कुत्र्यासारखी जबाबदारी घ्यायची म्हणजे असा भरपूर विचार करायला हवा खरा' असं म्हणून एका दगडात बरेच पक्षी मारून घेतले.

ती कुत्र्यांची पुस्तकं तिने लायब्ररीत परत करून टाकली त्यालाही बरेच दिवस उलटून गेले. तिचा विचार चालूच होता. मध्ये एकदा आम्ही कोणाकडे तरी जेवायला गेलो असताना कुत्र्यांचा विषय निघाला. ती म्हणाली 'मलापण पाळायचा आहे कधीतरी. पण सध्या नवरा आहे तेवढं पुरेसं आहे. नवऱ्याचं एक बरं असतं, त्याचं शी-शूचं ट्रेनिंग आधीच कोणीतरी करून ठेवलेलं असतं.' यावर मला स्वतःविषयी कौतुक वाटून घ्यायचं, की कुत्रा अजून आलेला नाही म्हणून बरं वाटून घ्यायचं हे कळलं नाही. पण इतर लोक हसले त्यात माझं कसनुसं हसू मिळवून दिलं.

असेच बरेच महिने गेले. किंबहुना वर्षं गेली. आणि अजूनही तिने कुत्रा घेतलेला नव्हता. म्हणजे पुस्तकं आणणं, इंटरनेटवर कुत्र्यांबद्दल माहिती मिळवणं वगैरे चालू असायचं. एकदोनदा तिने मला कुठेतरी नेऊन खास कुत्रे दाखवलेही होते. येताजाताना कुठचातरी देखणा कुत्रा दिसला की तिचं कुत्रापुराण चालू व्हायचं. कुत्रा घ्यावा ही इच्छा पुन्हा डोकं वर काढत असे. पण कुत्रा प्रत्यक्ष घेण्याची वेळ कधी आली नाही. त्याची दर वेळी काही ना काही कारणं असायची. आत्ता काय, मला सध्या जबाबदारीशिवाय राहतो आहोत ते छान वाटतं आहे; नंतर काय, माझा सध्या मास्टर्सचा अभ्यास चालू आहे त्यात कुठे कुत्रा घ्यायचा... आणि 'मला कुत्रा घ्यायचा तर तो परफेक्ट असायला हवा. आपल्याला त्याचं सगळं जमलं पाहिजे. नाहीतर उगाच घ्यायचा आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं यात काय अर्थ आहे? शेवटी तोही आपल्या कुटुंबाचा भाग बनतो.' कधी कधी वाटायचं ती गणपत वाण्यासारखी विचारांच्या काड्या चावून नुसत्याच टाकून देते. कुत्रा असण्यापेक्षा 'कुत्रा असावा, घ्यायचा झाला तर मी तो असा घेईन' अशी मनोराज्यंच जास्त आकर्षक वाटतात. खऱ्या कुत्र्यापेक्षा मनातल्या कुत्र्यांची गोष्ट चांगली असते, कारण कुठच्याही जबाबदारीशिवाय तो पाळता येतो, मनातल्या मनात त्याचे लाड करता येतात, त्याला ट्रेन करता येतं, त्याला कुत्र्यांच्या शोजमध्ये घेऊन जाता येतं. आणि त्याच्या शी-शूच्या ट्रेनिंगची पण गरज पडत नाही.

आम्हांला मूल झालं तेव्हा तिचा पुन्हा दोन्ही बाजूंनी विचार सुरू झाला. लहान मुलाबरोबर कुत्रं असणं हे मुलाच्या वाढीच्या दृष्टीने चांगलं, पण खूपच लहानपणी आणू नये. मला एक मूल आत्ता झेपत नाही, कुत्रं काय झेपणार अशा विचारांत बरीच वर्षं गेली. मुलगा मोठा झाला तरीही कुत्रा अजून घ्यायचाच होता. मग शेवटी वैतागून पण प्रेमाने तिला म्हटलं, की इतकी वर्षं तुला कुत्रा घ्यायचा आहे, आत्ता नाही तर मग म्हातारपणी घेणार का तू? कधी नव्हे ते नवऱ्याचं पटलं आणि संशोधनाची चक्रं वेगाने हलायला लागली. तिने अनेक ब्रीडर्सकडे चौकशा केल्या. मुलाच्या लग्नाच्या वेळी कुंडल्या तपासून बघतात तशा कुत्र्यांच्या पेडिग्र्या, त्यांचा आकार, रंग, हुशारी, स्वभाव असे छत्तीस गुण जमवून पाहिले. आणि शेवटी एक कुत्रा घेण्याचं ठरवलं. पूडल. मीनिएचर पूडल.

ब्रीडरच्या घरून ती कुत्रा घेऊन आली त्याला आज दीड वर्ष झालं. त्या वेळी चार महिन्याचं पिल्लू होतं. ती घेऊन आली तो दिवस मला अजून आठवतो आहे. मी घरीच होतो, ती लांबवर ड्राइव्ह करून त्याला घेऊन आली आणि कुत्र्याच्या पोर्टेबल पिंजऱ्यातून त्याला किचनमध्ये बाहेर काढलं. तपकिरी रेशमाचा नुसता गोळा होता. अगदी नव्या जन्मलेल्या बाळाप्रमाणे सात पाउंड वजनाचा. तसाच प्रचंड घाबरलेला. ’आपण इथे कुठे येऊन पडलो’ हे बघत होता. किचनच्या शेजारी जो डायनिंग एरिआ आहे तिथे चौकोनात घुटमळत होता. पलीकडची बाहेरची खोली आणि डायनिंग एरिया यांना विभागणारी एक साधी लाकडी पट्टी आहे. उंबरा वगैरे नाही. ती पट्टी म्हणजे आपली मर्यादा आहे असं त्याने ठरवून टाकलं होतं. आम्ही तिघंही त्याचे लाड करत होतो. माझा मुलगा त्याला आपलं एक खेळणं देऊ करत होता. न्यूरॉनला ते कळावं म्हणून जमिनीवर ठेवून तो आपल्या नाकानेही पुढे ढकलत होता. तो एवढासा कुत्रा या माऱ्याने बिचकत होता. बिचारा सगळं करून घेत होता. आम्हांला सगळ्यांनाच खूप आनंद झालेला होता. माझ्या मुलाला अतोनात कुतूहल आणि किंचित भीती वाटत होती. बायकोच्या चेहऱ्यावर आपलं इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान होतं. मी त्या पिल्लाकडे कितीतरी वेळ बघत होतो. त्याला हाताळत होतो. त्याचे लाड करत होतो. या दिवसापासून माझं आयुष्य बदलून जाणार आहे असं मात्र वाटल्याचं आठवत नाही.

त्यानंतरचे बरेच दिवस त्याला घराची सवय होण्यात गेले. पण त्याला हळूहळू लक्षात आलं की हे लोक काही वाईट नाहीत. उलट चांगलेच आहेत. तसा तो थोडा सैलावला. पण तेही आधीच्या अलिप्तपणाच्या तुलनेत बरं, इतकंच. कुत्रं घेताना माझी अट होती की ते लहान आणि तरतरीत हवं. बायकोला ते शहाणंसुरतं, मऊ स्वभावाचं हवं होतं. ब्रीडरला चाळीस वर्षांचा अनुभव असल्यामुळे तिने सांगितलं की हा अगदी शांत आहे. आणि खरोखरच तसा तो होता. कायम तो आपली मर्यादा पाळून असे. मुलाने त्रास दिला तरी चावायला जायचा नाही. अनेक लहान कुत्री यॅप्पी असतात. मियां मूठभर दाढी हातभर या म्हणीप्रमाणे एवढ्याशा जिवातून प्रचंड कचाकचा भांडल्यासारखा आवाज करत असतात. पण हे कुत्रं खरंच शांत स्वभावाचं होतं.

पहिल्यांदा त्याने स्वतः होऊन आवाज काढला तो म्हणजे आमच्या दाराची बेल वाजल्यावर. तो धावत धावत दाराकडे गेला आणि जिवाच्या आकांताने भुंकला. मग आमच्याकडे आला आणि भुंकत भुंकत दाराकडे गेला. शेवटी दार उघडल्यावर कोणीच दिसलं नाही म्हटल्यावर त्याची हवा थोडी गेली. दारावर यूपीएसचा माणूस पॅकेज ठेवून गेलासुद्धा होता. पण आमच्याकडे बघून थोडंसं शिल्लक राहिलेलं भुंकणं न्यूरॉन घशातल्या घशात भुंकला. तावातावाचं भांडण भांडून परत आल्यावर जसं स्वतःशीच शिव्या देणं चालू राहतं तसं. 'हे कोणीतरी स्साले आपल्या घरावर येतात...... लाज वाटत नाही त्यांना. हरामखोर...' असं काहीतरी म्हणत असावा. फूटभर उंचीचा आमचा राखणदार इतका इमानदारपणे आपल्या घराचं रक्षण करतो हे पाहून आम्हांला दोघांनाही कौतुक वाटलं. एरवी कितीही शांत राहिला तरी त्यानंतर दर वेळी बेल वाजली की तो आपल्या घरावर संकट आल्याप्रमाणे भुंकून हैराण करतो. त्यासाठी त्याला घराचीच बेल वाजण्याचीही गरज नाही. टीव्हीवर बेल वाजल्यावरसुद्धा ही स्वारी धावत भुंकत जाते. माझ्या मुलाला याची गंमत वाटल्याने त्याने फोनवर डोअरबेलचा आवाज वाजवला तरी न्यूरॉन येडपटासारखी दाराकडे धाव घेतो. पूडल हुशार असण्याबद्दल मला शंका येण्याची अनेक कारणं आहेत त्यांपैकी हे एक.

हळूहळू त्याला थोडा कंठ फुटला. आमच्याबरोबर राहायची, आमच्याकडून लाड करून घेण्याची सवय लागली. किंबहुना त्याचे लाड करायची त्याने आम्हांला सवय लावली असंच म्हणता येईल. मी बाहेरून घरी आलो आणि गराजचा दरवाजा उघडल्याचा आवाज झाला की लगेच तो असेल नसेल तिथून धावत यायचा. अजूनही येतो. मग जिना चढत असताना तो दाराला नाक लावून उभा. आत शिरलं रे शिरलं की अंगावर उड्या आणि भुंकणं. मला बूट काढायचाही अवसर न देता माझ्या अंगाचा वास घेणं, हात चाटणं, भुंकणं, मागच्या दोन पायांवर उभं राहणं, जीभ बाहेर काढून ल्हाय ल्हाय करत डोळ्यात आर्जवं आणत बघणं अशी अष्टावधानं साधत तो माझ्याकडून लाड वसूल करून घेतो. म्हणजे मी किंचितही त्याच्या दिशेने झुकलो तर क्षणार्धात पाठीवर आडवा, आणि पोट बाहेर काढून छाती आणि पोट खाजवून घेण्यासाठी तयार. छातीशी दुमडून घेतल्यामुळे चिकन विंगसारखे पाय फताडे पसरलेले. मान एका बाजूला झुकवून शरीराचा आकार इंग्लिश C सारखा केलेला. डोळे अधूनमधून माझ्याकडे वळलेले, मी खाली वाकून खरंच लाड करणार आहे का यावर नजर ठेवत. आणि मी पोट खाजवून द्यायला लागलो की तो C चा आकार आणखीन घट्ट करत ब्रह्मानंदी टाळी लागल्याप्रमाणे डोळे मिटून घेतो. मी जर लक्ष न देता जॅकेट काढणं, बूट काढणं, पाकीट-चावी जागेवर ठेवणं अशा निरुपयोगी कृती करायला लागलं तर ’मी त्याचं देणं लागतो’ हे माझ्या मागे माझ्या अंगावर उड्या घेत ओरडून सांगतो. शेवटी एखाद्या पठाणाने कर्जाचा हप्ता वसूल करावा तसा त्याचा लाडांचा हप्ता वसूल केल्याशिवाय तो काही शांत होत नाही.

त्याचा सकाळचा दिनक्रम तसा सोपा आहे. तो बहुतेक वेळा आमच्या आधी उठतो. पण बिचारा सोशीक असल्यामुळे पिंजऱ्यात बसून राहतो. एकदोन वेळा कूं कूं करतो. मधूनच भुंकून बघतो. मग परत गप्प बसतो. आम्ही वेळेच्या बाबतीत तसे भरपूर माया बाळगणारे असल्यामुळे हे लोक केव्हा बाहेर काढतील याची त्याला खात्री नसते. मग काही वेळाने त्याचं घशातून उम्म्मम्म्म.. आवाज काढणं वाढत जातं. पिंजऱ्यातून बाहेर काढल्याकाढल्या त्याचा लाडांचा हप्ता वसूल करतो. मग काही काळ थोडासा शांत होतो. पण पूर्णपणे नाही. खिडकीतून बराच वेळ बाहेर विस्टफुली बघत बसतो. मग हाताला दातांनी अलगद धरतो. थोडक्यात ’मला बाहेर ने’ असं त्याला सांगायचं असतं. उठल्यापासून सुमारे पहिल्या तासाभरात त्याला बाहेर नेऊन आणणं आवश्यक असतं. त्याला बाहेर नेणं हा एक समारंभच असतो. दिवसभर घरात बसून एकतर तो कंटाळलेला असतो. त्याला बाहेरचे ताजे, इतर कुत्र्यांचे वास घ्यायचे असतात. त्यामुळे त्याला कधी एकदा बाहेर जातो याची घाई असते. पण मी शांतपणे ब्रेकफास्ट करत किंवा नेटसर्फिंग करत असेन तर त्याला स्वस्थ बसवत नाही. मग मधूनच माझ्या अंगावर येऊन, डावली मारून घशांतून उम्म्म्म्म आवाज काढत मला माझ्या जबाबदारीची आठवण करत असतो.

एकदा का मी बाहेर निघण्यासाठी उठलो अशी खात्री झाली की त्याचं लक्ष केवळ माझ्याकडे लागतं. अर्जुनाचं लक्ष जसं त्या पोपटाच्या डोळ्यावर केंद्रित झालेलं होतं तसं. मी कपडे घालायला वरच्या खोलीत गेलो की जिन्याच्या पायाशी तो बसून राहतो. कपडे बदललेले दिसले की त्याचे कान किंचित टवकारतात - पूडलचे जितके टवकारू शकतात तितके. त्याच्या शरीरात एक थरथर असते. प्रत्येक पाऊल उतरल्यावर त्याचे स्नायू स्फुरण पावतात. मी त्याची गंमत करायला कधीकधी हळू उतरतो. किंवा एखाद्या पायरीवर थांबून राहतो. मग त्याच्या चेहऱ्यावर असे प्रतारणेचे भाव येतात. मी बूट घालायला लागलो की तो भक्ष्यावर तुटून पडण्याच्या तयारीत असल्याप्रमाणे माझ्या बाजूला दबा धरून राहतो. त्याचा पट्टा कपाटातून बाहेर काढला की मात्र त्याचा बांध फुटतो. त्याचं अंगावर उड्या मारणं सुरू होतं. जणू काही तो म्हणत असतो की 'हा पट्टा माझा आहे. माझा आहे. इतर कोणाच्या गळ्यात घालायचा नाही. लवकर ने. लवकर ने.' त्याची लीश जर गंमत म्हणून माझ्या मुलाच्या शर्टला लावली तर तो भुंकून भुंकून घर डोक्यावर घेतो. लीश गळपट्ट्याला जोडेपर्यंतही त्याला धीर धरवत नाही. तिथे क्लिक आवाज झाला की तो दाराकडे धावत सुटतो. आणि दार उघडल्यावर मला खेचून नेतो.

त्याचं बाहेर शू करणं हेही एक कोडंच आहे. आमच्या घराच्या बाहेर पडल्यावर लगेच नाक जमिनीला लावून भराभरा जातो. शू करण्यासाठी जागा शोधणं हा त्याचा मोठा कार्यक्रम असतो. आमच्या घराच्या आसपास जी घरं आहेत तिथे जवळपास प्रत्येक घरात कुत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी अनेकांनी आमच्या लॉनवर आपला मूत्रदानाचा विधी केलेला असतो. त्यापैकी नक्की कोणाच्या सादेला प्रतिसाद द्यायचा, कोणाच्या आव्हानाला प्रतिआव्हान द्यायचं याचा अभ्यास न्यूरॉन नाकाने करतो. आणि योग्य जागा सापडली की तो थोडंसं तीर्थ शिंपडतो आणि धावत धावत पुढे जातो. प्रत्येक घराच्या समोर असलेले मेलबॉक्सचे खांब हे त्या सर्व कुत्र्यांची आवडती स्थळं आहेत. फेसबुक उघडल्यावर आपल्याला अनेक आकर्षक पोस्ट्स दिसतात. काहींना आपण लाइक करतो, काहींकडे दुर्लक्ष करतो, काहींना व्यवस्थित प्रतिसाद देतो. तसंच न्यूरॉन या 'पोस्ट्स'ना करतो. ही त्याची प्रभातफेरी आटपली की तो समाधानाने घरी येतो, पाणी पितो, इच्छा असेल तर खाणं खातो. मग त्यानंतर त्याचा दिवस तसा शांत जातो.

हे सगळं उत्साहाने बायकोला सांगितल्यावर तिच्या चेहऱ्यावर या कुत्र्याने आपल्या नवऱ्याचं काय करून ठेवलेलं आहे असा काहीसा भाव आला. माझं प्राण्यांविषयीचं प्रेम किती होतं हे तिला आधीपासूनच माहीत होतंच. कुत्रा घरी आणल्यावर कदाचित मला थोडा लळा लागेल अशी तिला आशा होती. मात्र मी इतका गुंतून जाईन असं मात्र तिला वाटलेलं नव्हतं.

एकदा आम्ही असेच बाहेर फिरायला गेलो होतो. मी आणि न्यूरॉन. बाहेर पडलो तेव्हा किंचित रिपरिप पाऊस पडत होता. एरवी या स्वारीला पाण्याचं वावडं. पण बाहेर जाण्याचं आकर्षणही तेवढंच प्रचंड. आणि दाट केसांमुळे सुरुवातीला पाऊस फारसा जाणवला नसावा. त्यामुळे तुरूतुरू बाहेर निघाला. त्याआधी नेहमीप्रमाणे 'मला ने नं बाहेर फिरायला. बघ, मी घरी बसून किती कंटाळतो' असे भाव चेहऱ्यावर आणून कळवळून सांगून झालं होतं. तो साने गुरुजी टाईप चेहरा पाहून मीही निघण्याची तयारी केली. मग तेच नेहमीचं पट्ट्यावर उड्या मारणं, पट्टा गळ्यात बांधेपर्यंत धीर न धरवणं झालं होतं. त्यामुळे बाहेर पडल्यावर तिथे मिळणाऱ्या सर्व वासांचा आनंद घ्यायचा या उत्साहाने तोही निघाला. आमच्या नेहमीच्या फेरीच्या निम्म्या अंतरावर पोचल्यावर मात्र त्याला काहीतरी काळंबेरं असल्याचं जाणवायला लागलं. दरम्यानच्या काळात पाऊसही किंचित वाढला होता. अंगावर पडणारे थेंब केस भिजवून त्वचेपर्यंत पोचत होते. ते त्याला निश्चितच आवडलं नव्हतं. मग मध्ये थांबून जिवाच्या आकांताने अंग झटकून पाणी उडवून अंग सुकं करण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण आभाळच फाटल्यावर त्याला ठिगळ तरी किती लावणार? रस्त्याच्या बाजूने सर्व घरांची लॉन्स - त्यामुळे आडोशालाही जागा नाही. जसजसा तो भिजत गेला तसतसा त्याचा माझ्यावरचा संशय आणखीनच बळावत चालला. 'याच, याच हरामखोराने आपल्याला त्रास देण्यासाठी आंघोळ घालण्याची ही नवीन युक्ती शोधून काढली. आता पुढच्या वेळी मी याच्याबरोबर बाहेर जाणारच नाही जा.' असा विचार त्याच्या मनात सुरू झाल्याचं मला स्पष्ट जाणवत होतं. कादंबऱ्यांमध्ये अकाली विधवा झालेलीची बहीण तिला परगावाहून भेटायला येते, आणि एकमेकींना पाहिल्याबरोबर त्या दोघींचा बांध फुटतो तसं काहीसं न्यूरॉनचं घरी आल्यावर झालं. गळ्यातला पट्टा काढल्यावर त्याने ताबडतोब आपला माझ्यावरचा आणि एकंदरीत जगावरचा राग दाखवायला सुरुवात केली. सर्वसाधारण प्राण्यांना फ्लाइट ऑर फाइट रिस्पॉन्स असतो. एकतर मारामारी करायची किंवा शेपूट घालून पळून जायचं. आमच्या या कुत्ररत्नाकडे हे किंवा ते नाही. तो दोन्ही गोष्टी आलटून पालटून करतो. म्हणजे गुरगुरत अंगावर येऊन राग दाखवतो. तर मध्येच कारपेटवर आडवा होऊन सरकत सरकत अंग पुसायला जातो. किंवा अचानक मी जवळ दिसलो की घाबरून पळून घरातच एक धावत धावत फेरी मारून येतो.

त्याला आंघोळ घालणं हा एक विधीच असतो. एरवी 'न्यूरॉन, कम हिअर' म्हटल्यावर धावत येणारा हा प्राणी मी आंघोळ करणार आहे अशी शंकाही आली तरी अंग चोरून बसतो. तशी शंका यायला काहीही पुरतं - मी बाथरूमजवळ असणं, मी कंबरेला फक्त टॉवेल गुंडाळलेला असणं, किंबहुना मी कपडे काढत असल्याची शंकाही पुरते. मग तो आपल्या पिंजऱ्यात अंग मुडपून शक्य तितक्या कोपऱ्यात जाऊन बसतो. हा माझा एरिया, आणि इथे मी सुरक्षित आहे अशी त्याला एक व्यर्थ आशा वाटते. तिथे आत शिरून त्याला काढायला लागल्यावर तो डोळ्यांत शंभर सशांचं केविलवाणेपण आणतो. मी हात लावायला लागल्यावर शेवटचा उपाय म्हणून 'मी बघ रे किती गोड आहे' असे भाव आणत आपल्या पाठीवर पडून पोट पुढे काढतो. 'माझे लाड कर ना. बघ, तू त्यात गुंतून जाशील, आणि आंघोळ वगैरे घालण्याचं सगळं विसरून जाशील.' असं काहीसं म्हणण्याचा प्रयत्न होतो. पण याचा परिणाम न होता मी त्याला उचलून बाथरूममध्ये नेलं की मग आपली धडगत नाही हे त्याच्या लक्षात येतं. तरीही शॉवर स्टॉलपासून शक्य तितक्या लांबवरच्या कोपऱ्यात जाऊन तो अंग मुडपून बसून राहतो. आशा नामक शृंखलेने बद्ध पडलेला असतो. पण मी जेव्हा त्याला उचलतो तेव्हा ही मजबूत साखळी तुटते. आणि मी जेव्हा त्याला शॉवरमध्ये नेतो तेव्हा ’मुक्तस्तिष्ठति’ पंगुवत उभा राहतो. आलिया भोगासी असावे सादर म्हणून मुकाट्याने अंग भिजवून घेतो. त्यातही शॉवरपासून दूर जाण्याची केविलवाणी धडपड चालू असतेच. पण अंगाला साबण लावून, चोळून घेतानासुद्धा त्याला शॉवरच्या दाराच्या कडेला नाक लावून आपली सुटका कधी होणार याची वाट बघतो. एकदा का बाहेर सोडलं की आपल्या अंगाला चिकटलेला हा ओलेपणा कसा घालवू आणि कसा नको असं त्याला होतं. संपूर्ण घरभर धावत तो कार्पेटला अंग घासत बसतो. मध्येच माझ्याजवळ येऊन दात विचकतो, गुरगुरतो. आणि पुन्हा अंग सुकवण्यासाठी कार्पेट पाठीने, कानांनी घासत चालतो. ही मजा बघायला मला भयंकर आवडतं. त्यामुळे त्याच्या आठवड्याच्या आंघोळीचं काम आता मीच अंगावर घेतलेलं आहे. माझ्या बायकोला याचंही खूप आश्चर्य वाटतं. पण तेवढंच एक काम कमी झाल्यामुळे तिलाही बरंच वाटतं.

न्यूरॉनला घरी आणल्यानंतर सुरूवातीचे काही आठवडे आम्ही त्याला काही ट्रिक्स शिकवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सिट म्हटल्यावर बसणं, डाउन म्हटल्यावर पोटावर बसणं, कम म्हटल्यावर ताबडतोब येणं वगैरे वगैरे. मात्र तो अगदी जुजबी शिकलेला आहे. त्याच्यासमोर काही त्याला आवडती गोष्ट ठेवलेली असली की मुकाट्याने सगळं काही ऐकतो. म्हणजे बसायला शिकवताना काही बिस्किटचा तुकडा दिला की पुढच्या वेळी सिट म्हणायच्या आधीच बसून दाखवतो. लगेच तुकडा मिळाला नाही की डाउनदेखील करून दाखवतो. त्या बिस्किटाच्या लालचेपोटी तो काहीही करायला तयार असतो. मात्र जेव्हा हातात बिस्किट नसतं तेव्हा तो बसून दाखवेलच असं नाही. कधी कधी तो आम्हाला बिस्किट द्यायला ट्रेन करतो आहे की काय असा प्रश्न पडतो. त्याची तऱ्हा तशी इतर कुत्र्यांपासून थोडी वेगळीच आहे. कुत्र्यांना काठी किंवा बॉल फेकला तर तो परत आणून द्यायला आवडतो म्हणतात. न्यूरॉनला या खेळाबाबत काही तात्विक प्रश्न आहेत. एकदा बॉल टाकल्यावर त्याने आपल्या जमातीच्या इन्स्टिंक्ट्सप्रमाणे त्याकडे झेप घेतली. तो तोंडात पकडला. मग त्याला कम हिअर म्हणून बोलावल्यावर आलाही. मात्र तोंडातला बॉल माझ्याकडे देण्याबाबत त्याची काहीशी नाराजी होती. मी तो काढून घेऊन पुन्हा फेकला. त्याने तो पुन्हा भक्ष्यावर उडी मारण्याच्या ष्टायलीत हौसेने पकडला. असं अजून एकदोनदा झाल्यावर मात्र त्याला या खेळातलं वैफल्य जाणवायला लागलं असावं. तो कोणीतरी ग्रीक महापुरुष प्रचंड धोंडा टेकडीवर घेऊन जायचा आणि तो पुन्हा खाली घरंगळत यायचा. ती शिक्षा स्वतःला लावून घेण्याइतका मी बुद्दू नाही असं स्वतःशीच म्हणत तिसऱ्या वेळी न्यूरॉनने बॉल पकडला आणि खुर्चीच्या खाली सुरक्षित जागी घेऊन तो समोर घेऊन बसला. "मी बॉल आणलाय आता हा माझा. उगाच काढून घेऊन सारखा सारखा आणायला लावू नका" असे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट होते.

न्यूरॉन भयंकर सोशिक आहे हे खरं आहे. पण वर्गात सज्जन, शांत दिसणारी पोरंही कधी उचापत्या करतात तसा तो गपचूपपणे चॅप्टरगिरी करतो. त्याला सगळ्यात आकर्षण वाटतं ते कागदांचं. जमिनीवर कुठे हात पुसायचा पेपर नॅपकिन पडला असेल तर त्याचा एक तिरका डोळा त्यावर रोखलेला राहतो. संधी साधून तो हळूच, दबक्या पावलांनी तिथे जातो. आणि कोणाचं लक्ष नसेल की प्रचंड वेगाने उचलून तो आपल्या सुरक्षित जागी म्हणजे टेबलाखाली किंवा खुर्चीखाली जाऊन तो ते फाडत बसतो. लहानपणी रुमालपळवीचा खेळ खेळताना कसं रुमालाच्या भोवती हळू हळू फिरायचं आणि चट्टदिशी उचलून आपल्या हद्दीत जायचं तसं. त्यामुळे काही महत्त्वाचा कागद चुकून खाली पडलेला असेल तर घासकडवी दप्तरातल्या रुमालातले दस्तऐवज गायब होतात. आणि मग इतिहासाच्या तुकड्यांची पुनर्रचना करावी लागते.

त्याचा वात्रटपणा, बंडखोरपणा खरा दिसून येतो तो बाहेर पळून गेल्यावर. घरात बसून तो कंटाळतो. मग कधी चुकून पुढचं किंवा मागचं दार उघडं राहिलं की सुळ्ळकन बाहेर पडतो. आणि लांब निघून जातो. पहिल्यांदा पळाला तेव्हा मी त्याच्यामागे गेलो. तो पुढे जाऊन थांबायचा, मी येतो आहे की नाही याचा अंदाज घ्यायचा. आलो की अजून पुढे जायचा. मग मी एकदा मुद्दामच पाठ वळवून परत फिरलो. तो काळजीने माझ्या मागे आला. मात्र ही ट्रिक पुढच्या वेळी चालली नाही. यावेळी त्याला त्याची लीश दाखवली. मग तो आपल्याला फिरायला मिळणार या आशेने धावत आला आणि फसला. पुढच्या वेळी मग लीश दाखवून फायदा झाला नाही. मग त्याला खायला देण्यासाठी सॉसेजचा तुकडा दिला. आता तीही युक्ती पुरत नाही. विषाणू, जीवाणू आणि डास जसे औषधांना जुमानेनासे होतात तसं - प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन करायला लागतं. आता तो पळाला तर काय करायचं हेही एक कोडंच आहे.

माझ्या लक्षात यायला लागलेलं आहे की गेलं दीड वर्ष मी त्याचे अतोनात लाड करायला लागलेलो आहे. बऱ्याच वेळात त्याने माझ्याकडे लाड करण्याची भीक मागितली नाही तर मलाही चुकल्यासारखं वाटतं. त्याचे केस विंचरून देणं, त्याला आंघोळ घालणं, ड्रायरने केस फ्लफ करणं, ट्रिमरने भादरून बारीक करणं ही कामं मी मोठ्या आनंदाने करतो. कंगवा आणल्यावर त्याचं नाचणं, आंघोळीच्या शंकेने अंग चोरणं या सगळ्या सोपस्कारांचीही सवय झालेली आहे. तसा आहेच तो लळा लावणारा. माझी आई जी गेली सत्तर वर्षं कुत्र्यांपासून घाबरून, फटकून राहिली तिनेसुद्धा पहिले दोन दिवस हृदयावर दगड ठेवून प्रयत्न केला. मग तिला त्याची सवय झाली इतकंच नाही, तर ती समोर आल्यावर तो हक्काने जमिनीवर पोट वर करून पडायला लागला. तीसुद्धा काठीवर भार देत म्हणायची, 'न्यूरॉन, अरे आजीला आता वाकायला त्रास होतो' पण तरीही खाली वाकायची आणि लाड करून द्यायची. तो इतका लळा कसा लावतो हे एक कोडंच आहे.

त्याचं उत्तर सापडलं नाही तरी काही क्लू हाताशी गवसल्यासारखे वाटतात. माझी एक मैत्रीण माझ्या घरी आलेली असताना तिच्याकडेही त्याने असाच लोचटपणा केलेला होता. त्यावर ती त्याला दोनतीनदा म्हणाली, 'न्यूरॉन, गेट सम सेल्फ रिस्पेक्ट!' साधू संत जसे राग लोभ मोह मत्सर टाकून निर्विकार होतात तशी न्यूरॉनने लाज पूर्णपणे टाकलेली आहे. 'मी बघ किती गोड आहे, माझे लाड करणार नाहीस का? कर ना. कर ना.' असं तो निर्लज्जपणे सतत म्हणत राहतो. आपण दुर्लक्ष केलं तर धीर सोडत नाही. परत दुप्पट जोमाने लघट करतो. टेबलावर जेवण करताना काही आकर्षक वास आला तर नाक वर करकरून 'मला दे' म्हणतो. अशा सरळ मागणीने त्याला जे हवं ते मिळालं नाही तर समोर पायाशी बसून डोळ्यात केविलवाणेपणाचा अर्क आणतो. एका अर्थाने त्याला लुब्रेपणाचा माजच आहे जणू. आपण कितीही नाही म्हटलं तरी त्याचे डोळे तसेच प्रतारणेच्या भावनेने भीक मागत राहतात. कथा-कादंबऱ्यांमधून जसा व्हीलनच्या डोळ्यात खून चढतो, तसा त्याच्या डोळ्यात लुब्रेपणा आणि केविलवाणेपणा चढतो. त्याने एक शब्दही न भुंकता 'डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे' म्हणण्याचं कसब आत्मसात केलेलं आहे.

मी त्याचे थोडे अतिरेकी लाड करतो. म्हणजे त्याला शिस्त लावण्याऐवजी त्याला हवं ते खायला देणारा मीच. बायको जरा त्याला हेल्थी, हाय मीट, लो ग्रेन वगैरे खायला देते. ताटातनं त्याच्या तोंडात भरवलं की ओरडते. पण त्याने मला इतकं चांगलं ट्रेन केलेलं आहे की मी अनेक वेळा त्याच्या तोंड वेंगाडण्याला बळी पडतो. त्यात घरी मांस मीच जास्त नियमाने खात असल्यामुळे त्याची माझ्यावर विशेष मर्जी आहे. एकदा कधीतरी सकाळी तिने त्याच्या पिंजऱ्याचं दार उघडलं. पण तो मला शोधत दुसऱ्या खोलीत आला. तेव्हा माझ्या बायकोने मला काहीशा कौतुकमिश्रित रागाने म्हटलं 'माझा कुत्रा तू चोरलास'. पण तिनेही अनेक वेळा म्हणून दाखवलं आहे, की मी तुझ्याबरोबर इतकी वर्षं राहिले पण तू असा प्राण्यांवर इतका जीव लावू शकशील असं वाटलं नव्हतं. मी त्यावर म्हणतो की मलाही वाटलं नव्हतं. हे या काळ्याभोर डोळ्याच्या केसाळ पिल्लाने कसं घडवून आणलं हेच खरं मोठं कोडं आहे.

रेखाचित्र - राजेश घासकडवी

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3.6
Your rating: None Average: 3.6 (10 votes)

प्रतिक्रिया

भारी आहे.. मोठाही आहे अघळपघळ छान..

कारण आमचं लग्न झाल्यानंतर हनीमून नवा-नवा असतानाच माझ्या बायकोने 'आपण एक कुत्रा घेऊ या. मला फार आवडतात कुत्रे.' असं म्हटलं होतं.

तरी बरं..

"तुझ्यापेक्षा मला कुत्रा जास्त आवडतो.." असं म्हणून नवर्‍याचा कोसळता चेहरा पाहून सावकाश स्पष्टीकरण देणं ("तुला कुत्रा जितका आवडतो त्यापेक्षा मला कुत्रा जास्त आवडतो") असा प्रकार न घडल्याबाबत काउंट युअर लकी स्टार्स राघा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. (फराळातल्या जमून गेलेल्या चकलीसारखा खुसखुशीत, ही उपमा जिभेच्या टोकावरून परतवून लावली आहे Lol

फेसबुक उघडल्यावर आपल्याला अनेक आकर्षक पोस्ट्स दिसतात. काहींना आपण लाइक करतो, काहींकडे दुर्लक्ष करतो, काहींना व्यवस्थित प्रतिसाद देतो. तसंच न्यूरॉन या 'पोस्ट्स'ना करतो.

हाहाहा, एक नंबर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शीर्षक पाहिल्यावर न्यूरॉन विषयी वैज्ञानिक माहिती आहे असे वाटले. लेख व हा न्यूरॉन भुभु जाम आवडला. आमच्या बिट्टू भुभुची आठवण आली. " या बिट्ट्याला जरा आंघोळ घातली पाहिजे" असे स्वगत जरी म्हटले तरी आंघोळ शब्द ऐकल्यावर जवळ बसला असेल तर लगेच कल्टी मारायचा.
एकूण लेख वाचल्यावर एकदम फ्रेश वाटल. रेखाचित्र आवडल. तळहाताचा शंकू करुन त्याच चुचकुळ्या नाकावर ते सरकवून झाल मनातल्या मनात. अस केल्यावर मस्त त्याच गारगार नाक तळहाताला लागत. मस्त शहारा येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कुत्रे स्वतः पाळले नसले तरी कुत्र्याचे विभ्रम जवळून पाहिले आहेत कोणे एके काळी. त्यामुळे लेख आवडला, भिडला. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान लेख!
भुभुचे रेखाचित्रही छान फक्त डोळे माणसाचे वाटताहेता

स्वगतः पलिकडल्या दिवाळी अंकात एका संपादिकांबैंनी मांजरीवर असाच छान लेख लिहिला होता. आता या साहेबांनी भूभुंवर.
इथे व्यवस्थापक होण्यासाठी ही (प्राणी पाळणे आवडायची/पाळायची) अट घातलेली नाही हे नशीबच म्हणायचे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अय्या हो? मग थोरल्या मालकांनी काय पाळलंय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भुभुचे रेखाचित्रही छान फक्त डोळे माणसाचे वाटताहेता

मी एक भटके भुभु पाहिले होते. त्याचे डोळे चक्क अस्सल कोकणस्थी होते. आन डौल ही तस्साच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अनुभव मासिकात लेखन करणारे डॉ समीर कुलकर्णी यांचा या विषयावर एक लेख वाचनात आला होता. एका श्वानद्वेष्ट्याचे झालेले अंतरंगातील बदल त्यांनी लेखात लिहिले आहेत.
लेखाचे शीर्षक मात्र अवघड आहे. धर्म... धारणा.. परधर्मॉ.. भयावहः
https://drive.google.com/file/d/0B2X6bSru0D7ISUhKLUhNT3pzTGI0MWd6Z252UXQ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

डॉ. कुलकर्णींचा लेख आवडला. वाचताना अनेक ठिकाणी दि.बा.मोकाशींची 'आता आमोद सुनासि आले' कथा आठवून गेली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! डॉ. कुलकर्णी यांचा हा लेख आजच वाचला. खूप आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इयत्ता अकरावी इंग्रजी युवकभारती मधील(आताच्या सिलबसच्या एक खेप मागचा सिलबस) रीडिंगमध्ये असलेला एक लेख आठवला.
नेमके नाही आठवत, पण अलेक्स की काय नाव होते.खूप आवडलेला तो.
मला हा लेख वाचताना काही क्षण आपण एखादा अनुवादच (त्यातही लेखकाद्वितीय श्री नवनीत यांच्या युवकभारती नवनीत मार्गदर्शकातील अनुवाद) वाचतोय असे वाटत होते. अश्या प्रकारचे पालन कदाचित माझ्या परिचयाचे नाही म्हणून असावे. पण कोलटकरादिंच्या संदर्भानी बहार आणल्या वर तो तुमच्याच झोळीतला आहे हे पटले.
लेख आवडलाय हेवेसांगत नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखकाद्वितीय श्री नवनीत

हा हा हा, एकच नंबर. मलाही या लेखकाबद्दल अतीव आदर वगैरे होता कोणे एके काळी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"२१अपेक्षित"चेही भक्त का आपण आमच्याप्रमाणेच?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२१ अपेक्षित जरी आमच्या पारायणांत समाविष्ट नसले तरी या सद्गृहस्थांची गायडे गुरुचरित्र से कम नहीं थी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त लेख! न्युरॉनचा फोटू पाहिल्यावर तो सॉफ्ट टॉयच वाटलेला. बर्याच नंतर कळलं की खराखूरा कुत्रा आहे. बादवे तो चित्रातला भुभु जरा बेरकी वाटतोय. न्युरॉन तसा नसावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झकास!

न्यूरॉनऐवजी टफी नाव घातलेत तर तो लेख जसाच्या तसा आम्हालाही लागू पडावा (पूडलऐवजी गोल्डन रिट्रीवर एवढा माफक * फरक) !!

खेरीज योगायोग असा की लेख वाचताना आमचा टफी शेजारीच लुडबूड करीत होता. त्याचे लाड करीतच लेख वाचला.

* माफक म्हणजे फक्त २५ किलो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मजा आली.
हव्वा(ईव्ह)ने नामकरण केले आणि आदमाला नादाला लावले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घासूगुर्जींचा लेख असून ही त्यात विदा आणि आलेख नसल्याने लेख योग्य जागी मारण्यात आलेला आहे.

(स्वगत: च्यायला मालकाचं कुत्रं म्हणून कवतिक चाललंय. शिवाय त्या तद्दन फालतू शाळकरी चित्राचं सुद्धा कवतिक. समर्थाघरचे श्वान या म्हणीचा अर्थ पुन्हा एकदा पटला. आम्ही आमच्या बोक्याविषयी लिहिलं तर कुणी वाचणार सुद्धा नाही).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

घासूगुर्जींचा लेख असून ही त्यात विदा आणि आलेख नसल्याने लेख योग्य जागी मारण्यात आलेला आहे.

उलट त्याचमुळे तर तो (त्यातल्या त्यात) वाचणेबल झाला आहे.

(नाहीतर उगाच 'पर क्यापिटा कुत्रा', 'गेल्या दहा वर्षांत सरत गेलेले जागतिक भुंकण्याचे प्रमाण' असले काही(बाही) आले(ख) असते, तर वैताग आला असता.)

शिवाय त्या तद्दन फालतू शाळकरी चित्राचं सुद्धा कवतिक.

अलबत! या संस्थळावर शाळकर्‍यालाही लाजवतील असली तद्दन फालतू चित्रे ('मी पाहीलेला सूरयोदय'-छाप) काढण्याची मोनॉपली आमची आहे. तिला तडा देण्याबद्दल निषेध!

आम्ही आमच्या बोक्याविषयी लिहिलं तर कुणी वाचणार सुद्धा नाही

हे बरीक खरे.

पण म्हणूनच लिहा.

नव्हे, आता लिहाच. अंडरक्याटचा आवाज दडपला जाता कामा नये. त्याला वाचा फोडाच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही आमच्या बोक्याविषयी लिहिलं तर कुणी वाचणार सुद्धा नाही

मी वाचीन. वाचीन इतकेच नाही तर बोका चावरा नसल्यास तुमच्या घरी जेवायला येताना(बोक्यासाठी)एक मासा सुद्धा घेऊन येईन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नको नको.

आमच्या बोक्याला स्वतः कमावून खायला कसं उद्युक्त करावं याच्या चिंतेत आम्ही आहोत आणि तुम्ही आणखी फुकटचा मासा आणून देणार !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

छ्या:, आम्हाला वाटलं तुम्ही निवडणूकांच्या निकालाचं चिंतन करत असाल! ते सोडून हे बोक्याच चिंतन???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ते झालं करून.

अदरवाइजसुद्धा राजकारण्यांबद्दलचे चिंतन म्हणजे बोक्यांबदलचेच चिंतन ना? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेख जितका ओघवता वाटला, तितकं रेखाचित्र नाही वाटलं. Sad

पण लेख मस्तच. विशेषतः न्यूरॉननी गुर्जींना दिलेलं ट्रेनिंग! तुमच्या दुसर्‍या लेकाचे न्यूरॉनशी संबंध कसे आहेत हो? त्याबद्दल अजून वाचायला आवडेल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

त्याला आंघोळ घालणं हा एक विधीच असतो....
..............हा परिच्छेद वाचून 'टर्नर् अ‍ॅन्ड् हूच'मधला आंघोळीचा प्रसंग आठवला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लेख. कुत्री आवडत नसली तरी लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सारे भुभु से अच्छा न्युरॉन भुभु हमारा|
अवांतर- दुसरे भुभु भेटले को तो भुभु हमारा म्हणायचे. या भुभुचे त्या भुभुला कळू द्यायचे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अतिशय वाचनीय लेख आहे. विशेषतः फेसबुकवर आपण काही जणांच्या पोस्ट्स लाइक करतो तर काही पोस्ट्स्कडे दुर्लक्ष करतो तद्वत न्युरॉनची प्रभारफेरी व तीर्थवाटप असते हा भाग म्हणजे कुत्र्याची सायकॉलॉजी व्यवस्थित जाणल्याची पावतीच आहे.

माझे- कुत्र्याची भीती वाटते पण कुत्री आवडतात असे काहीसे विचीत्र "तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना" त्रांगडे आहे. तुमच्यावर विनाअट, संपूर्ण निष्ठेने प्रेम करणारा असा कुत्रा हा एक प्राणी आहे.

कुत्र्यांना चॉकलेट द्यायचे नसते असे ऐकले आहे.

लेख भारी आहे. खूप आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0