संत एकनाथांच्या रचना

काल एकनाथषष्ष्ठी म्हणजे संत एकनाथ महाराजांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्याने त्यांच्या काही अप्रतिम रचनांचा थोडक्यात परिचय या लेखात करून देत आहे.

संत बहिणाबाईंनी आपल्या प्रसिध्द अभंगात म्हटले आहे, संतकृपा जाली | इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवें रचिला पाया | उभारिले देवालया ।। नामा तयाचा किंकर | तेणे रचिले तें आवार ।।
जनार्दन एकनाथ | खांब दिधला भागवत ।। तुका जालासे कळस | भजन करा सावकाश ।।

ज्ञानेश्वर, नामदेव आणि तुकाराम या संतश्रेष्ठांच्या समवेत संत बहिणाबाईंनी या यादीमध्ये संत एकनाथांचाही समावेश केला आहे. एकनाथ हे भागवत सांप्रदायाच्या किंवा वारकरी पंथाच्या इमारतीतले स्तंभ आहेत. 'ओवी ज्ञानेशाची' आणि 'अभंगवाणी प्रसिध्द तुकयाची' हे पद्यांच्या त्या दोन वृत्तांमधले (गेल्या कित्येक शतकांमधले) सर्वश्रेष्ठ साहित्य म्हणून नावाजले गेले आहे. संत नामदेव विठ्ठलाचा अत्यंत लाडका भक्त होता. विठ्ठलावरील त्यांच्या प्रेमाचे दर्शन अनेक आख्यायिकांमधून होतेच, त्यांच्या अभंगामधून ते प्रतीत होते. शीखांच्या गुरू ग्रंथसाहेबामध्ये नामदेवांच्या काही रचना दिल्या आहेत. या तीन संतश्रेष्ठांच्या मानाने संत एकनाथ किंचित कमी प्रसिध्द असतील, पण त्यांनी केलेल्या रचनासुध्दा आजही खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या रचनांमधील विविधता हे त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.

संस्कृत भाषेमध्ये असलेली भगवद्गीता लोकांना समजावी म्हणून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत लिहिलेली ज्ञानेश्वरीसुध्दा तात्विक दृष्ट्या फार उच्च पातळीवर आहे. संत तुकाराम आणि संत नामदेव महाराजांचे अभंग सर्वसामान्य लोकांच्या ओठावर सहज बसावेत असे सोपे आणि सुंदर आहेत. संत एकनाथ महाराजांनी ओवीबध्द ग्रंथरचना केली, भजनामध्ये गायिले जाणारे अभंग लिहिले, त्याशिवाय मनोरंजक अशी भारुडे, गवळणी वगैरे लिहिल्या. घरातल्या देव्हार्‍यासमोर बसून ज्ञानी पंडित लोकांनी वाचावे असे आध्यात्मिक वाङ्मय, ओसरीवर बसून श्रोत्यांना वाचून ऐकवण्यासाठी पोथ्या, देवळातल्या सभामंटपात भक्तजनांनी टाळमृदुंगाच्या साथीवर भजन करतांना म्हणावेत असे भक्तीपूर्ण आणि रसाळ अभंग आणि लोकगीतांच्या मंचावर शाहीरांनी डफ झांज आणि तुणतुण्याच्या साथीने गाव्यात अशी भारुडे, गवळणी वगैरे अशा विविध जागी संत एकनाथांच्या रचना ऐकायला मिळतात. त्याशिवाय गेल्या शतकातल्या मान्यवर संगीत दिग्दर्शकांनी संत एकनाथांच्या रचनांना सुमधुर चाली लावून त्या दृक्श्राव्य माध्यमांमधून घराघरात पोचवल्या आहेत. अशा काही अत्यंत लोकप्रिय रचना या लेखात दिल्या आहेत.

संतांच्या जीवनावरील चित्रपटांमध्ये त्यांच्या सोज्ज्वळ भूमिका साकारणा-या विष्णुपंत पागनीस या गायक नटाच्या आवाजातले हे गीत किती मनोरंजकसुध्दा आहे पहा. देवाबरोबर इतकी सलगी साधून बोलणारे एकनाथ लटक्या तक्रारीच्या सुरात सांगतात.
असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा ॥१॥
शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो । करी दही-दुधाचा रबडा ॥२॥
वाळवंटी जातो कीर्तन करितो । घेतो साधुसंतांसि झगडा ॥३॥
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥४॥

कवी जयदेव आणि सूरदास यांनी राधाकृष्णामधील मधुरा भक्तीवर केलेल्या अनेक गीतरचना लोकप्रिय आहेत. मराठी भाषेत याबद्दल काव्य करणारे संत एकनाथच लगेच डोळ्यासमोर येतात. संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबध्द केलेली ही दोन गीते अजरामर झाली आहेत. पहिल्या गीतात ते राधेच्या भूमिकामधून अलगदपणे एकनाथांच्या भूमिकेत जातात.
कशि जांवू मी वृंदावना । मुरली वाजवी ग कान्हा ॥धॄ॥
पैलतिरीं हरि वाजवी मुरली । नदि भरलीं यमुना ॥१॥
कासे पीतांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥
काय करू बाई कोणाला सांगूं । नामाची सांगड आणा ॥३॥
नंदाच्या हरिनें कौतुक केलें । जाणे अंतरिच्या खुणा ॥४॥
एका जनार्दनी मनी म्हणा । देवमहात्म्य कळेना कोणा ॥५॥

दुसर्‍या गाण्यामध्ये राधा आणि कृष्ण या दोघांचेही देहभान हरपल्यामुळे ते कसे चाळे करत आहेत असे सांगता सांगता एकनाथ महाराज स्वतःच देवाशी एकरूप होतात.
वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले ।।
राधा पाहून भुलले हरी, बैल दुभवी नंदाघरी ।।
फणस जंबिर कर्दळी दाटा । हाति घेऊन नारंगी फाटा ।।
हरि पाहून भुलली चित्‍ता । राधा घुसळी डेरा रिता ।।
ऐसी आवडी मिनली दोघा । एकरूप झाले अंगा ।।
मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना ।।

आर. एन्‌. पराडकर या गायकाच्या प्रसिध्द भक्तीगीतांमधले संत एकनाथांचे हे गाणेसुध्दा राधाकृष्णाच्या प्रीतीबद्दलच आहे.
नको वाजवू श्रीहरी मुरली ।
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे ।।
खुंटला वायुचा वेग, वर्षती मेघ, जल स्थिरावली ।।
घागर घेऊन पाणियासी जाता, डोईवर घागर पाझरली ।।
एका जनार्दनी पूर्ण कृपेने, राधा गौळण घाबरली ।।

बाळकृष्णाने आपल्या बासरीमधल्या जादूने सर्व चराचराला कशी मोहिनी घातली होती याचे सुंदर वर्णन या गीतात आहे.
भुलविले वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदे ॥१॥
पांगुळले यमुनाजळ । पक्षी राहिले निश्र्चळ ॥२॥
तॄणचरे लुब्ध झाली । पुच्छ वाहुनिया ठेली ॥३॥
नाद न समाये त्रिभुवनी । एका भुलला जनार्दनी ॥४॥

भारतरत्न स्व.पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या या अभंगाची संगीतरचना राम फाटक यांनी केली आहे.
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
भाव-भक्‍ति भीमा उदक ते वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
दया क्षमा शांती हेंचि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद । हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
देखिली पंढरी देहीं-जनी-वनीं । एका जनार्दनी वारी करी ॥६॥

किशोरी आमोणकर या शास्त्रीय संगीतामधील श्रेष्ठ गायिकेने थोडी सुगम संगीतातली गीते दिली आहेत यातले एक प्रसिध्द गीत संत एकनाथांच्या रचनांमधून घेतले आहे. पं. रघुनंदन पणशीकर यांनी या गीतात किशोरीताईंना आवाजाची साथ दिली आहे.
कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥
कानडा विठ्ठल नामें बरवा । कानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा ॥२॥
कानडा विठ्ठल रूपे सावळां । कानडा विठ्ठल पाहिला डोळां ॥३॥
कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी । कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥
कानडा विठ्ठल कानडा बोले । कानड्या विठ्ठलें मन वेधियेलें ॥५॥
वेधियेलें मन कानड्यानें माझें । एका जनार्दनीं दुजें नाठवेचि ॥६॥

या दोन श्रेष्ट गायकांच्या नंतर आलेल्या पिढीमधील संगीतकार श्रीधर फडके आणि स्वराची देणगी लाभलेले आजचे आघाडीचे गायक सुरेश वाडकर यांनी तयार केलेल्या आल्बममध्ये त्यांनी संत एकनाथांचे अभंग घेतले आहेत.
गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥
देव तयाचा अंकिला । स्वयें संचरा त्याचे घरा ॥२॥
एका जनार्दनी गरुदेव । येथें नाही बा संशय ॥३॥

माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥
तेणो देह ब्रम्हरूप गोविंद, नित्य गोविंद ।
नि जसे रामरूप, नित्य गोविंद ॥२॥
तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ।
निरसेल गोविंद, नित्य गोविंद ॥३॥
गोविंद हा जनी-वनी ।
म्हणे एका जनार्दनी ॥४॥

येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥
महाराजाचे राऊळी । वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥
लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥
एका जनार्दनी नाम । पाहता मिळे आत्माराम ॥४॥

रुपे सुंदर सावळा गे माये ।
वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिता ॥१॥
रुणझुण वाजवी वेणु ।
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥
गोधने चारी हती घेऊन काठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥
एका जनार्दनी भुलवी गौळणी ।
करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था ।
अनाथाच्या नाथा, तुज नमो ।
तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥
नमो मायबापा, गुरुकृपाघना ।
तोडी या बंधना मायामोहा ।
मोहोजाळ माझे कोण नीरशील ।
तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥
सद्गुरुराया माझा आनंदसागर ।
त्रैलोक्या आधार गुरुराव ।
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ।
ज्यापुढे उदास चंद्र-रवी ।
रवी, शशी, अग्‍नि, नेणति ज्या रूपा ।
स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥
एका जनार्दनी गुरू परब्रम्ह ।
तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥
ॐकार स्वरूपा या गाण्याने तर एका काळात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. आजही हे गाणे निरनिराळ्या कार्यक्रमांमधून, अगदी नृत्यामधूनसुध्दा सादर केले जातांना दिसते.

उपहास आणि विनोदामधून परमार्थाचा मार्ग दाखवता येतो यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण संत एकनाथ महाराजांनी पाचशे वर्षांपूर्वी रचलेल्या भारुडांमधून हे काम करून ठेवले आहे. शाहीर साबळे यांनी त्यांच्या काही भारुडांना आकर्षक चाली लावून आणि आपल्या बुलंद आवाजात गाऊन 'भारुड' या लोकगीताच्या प्रकारालाच एक महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे. 'विंचू चावला' या सर्वात जास्त लोकप्रिय भारुडामध्ये त्यांनी 'अगगगगग, देवा रे देवा, काय मी करू' वगैरे बरीचशी पदरची भर घालून त्याला अधिक उठाव आणला आणि काँटेंपररी बनवले असले तरी एकनाथ महाराजांची मूळ शब्दरचना तशीच राखली आहे. मूळ भारुड खाली दिले आहे. काम, क्रोध इत्यादि तमोगुणांचा विंचू चावल्यामुळे शरीराची (खरे तर मनाची) आग आग झाली. तिला शांत करायचे असेल तर वाईट गुण सोडून सद्गुणांची कास धरावी, त्यातून मनःशांती मिळेल असे या भारुडात सांगितले आहे.
विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥
सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥

माणसाच्या अंगातले (मनातले) काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू त्याचा ताबा घेतात, त्याच्यावर सत्ता गाजवतात, त्यांच्या तालावर नाचवतात हे संत एकनाथांनी सासरच्या घरात सुनेवर सत्ता गाजवणार्‍या किंवा सासुरवास करणार्‍या नातेवाईकांच्या रूपकामधून सुरेख मांडले आहे. यांच्या जाचामध्ये माणूस इतका गुरफटून जातो की त्याला देवाचे स्मरण करायला भान आणि वेळच उरत नाही. त्यामुळे या सगळ्यांना बाजूला करून मला एकटेच राहू दे, म्हणजे मी तुझी भक्ती करू शकेन असे खाली दिलेल्या भारुडात भवानी आईला सांगून तिला साकडे घातले आहे.

सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर ग तिला ॥४॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥
दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥६॥
एकाजनार्दनी सगळेचि जाऊं दे । एकटीच राहू दे मला ॥७॥

अशाच प्रकारच्या भावना वेगळ्या रूपकामधून खाली दिलेल्या भारुडात व्यक्त केल्या आहेत. आपल्याला हतबल करणार्‍या, परमेश्वरापासून दूर ठेवणार्‍या परिस्थितीला यात 'दादला' म्हणजे नवरा असे संबोधून "तो नको" असे म्हंटले आहे. ईश्वरासी समरस होण्यासाठी या दादल्याच्या तावडीमधून सुटायला पाहिजे असे ते सांगतात.
मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने । रांज्यात लेणे नाही ॥५॥
एकाजनार्दनी समरस झाले । तो रस येथे नाही ॥६॥

खाली दिलेल्या भारुडात संत एकनाथांनी तत्कालिन समाजामधील लुच्चेपणावर सणसणीत कोरडे ओढले आहेत, पण हे आजच्या सामाजिक परिस्थितीलाच उद्देशून लिहिले असावे असे वाचतांना आपल्याला वाटते. याचा अर्थ असा की पाचशे वर्षांपूर्वीची माणसेसुध्दा आतापेक्षा फारशी वेगळी नसावीत. त्यांनी कोणता अविचार किंवा हावरेपणा करू नये हे संत एकनाथ सांगतात, याचाच अर्थ त्यांच्या अवती भंवती वावरणारी माणसे तशी स्वार्थबुध्दीने नेहमी वागत असावीत असा होतो. विवेक आणि संयम बाळगण्याबद्दल सगळे सांगून झाल्यावर अखेरीस ते पुन्हा अध्यात्माच्या मुख्य मुद्द्यावर येतात आणि 'असा कोणाला दाखवण्यातून देव दिसत नसतो, त्याला ज्याने त्याने अंतरात (गुप्तपणे) ओळखायचे असते' हे सांगतात. यातल्या अनेक ओळी आतापर्यंत म्हणी किंवा वाक्प्रचार झाल्या आहेत.

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ?
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे?
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे?
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे?
भगवी वस्‍त्रे केली म्हणून काय जगच नाडावे?
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे ?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
परस्‍त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी?
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी?
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना।।
सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा?
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा?
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा ?
एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा ?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।

एकाद्या माणसाला भुताने पछाडले की तो भान हरपलेल्या वेड्यासारखे वागायला लागतो. परमेश्वराचा ध्यास लागल्यानेसुध्दा कोणाकोणाची अशीच अवस्था कशी झाली हे त्यांनी 'भूत' या भारुडामध्ये मनोरंजक पध्दतीने दाखवले आहे. त्यातसुध्दा अखेरच्या ओळीमध्ये हे भूत (परमेश्वर) जगात सर्वत्र भरलेले आहे अशी त्याची खूण सांगितली आहे.
भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥
सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिली केशी ॥२॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥
भूत लागले नारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥
भूत लागले ध्रूवबाळाला । उभा अरण्यात ठेला ॥५॥
एकाजनार्दनी भूत । सर्वांठायी सदोदित ॥६॥

एकनाथ महाराजांना या अजब भुताने भारलेले होतेच, त्यांनी स्वतःच ते कबूल केले आहे. त्यामुळे त्यांची दशासुध्दा इतरेजनांपेक्षा वेगळी झाली होती. ते सामान्य राहिले नव्हते. त्यांच्या असामान्यत्वाची 'उलटी खूण' ते या भारुडामध्ये दाखवतात. यातला गूढ अर्थ समजून घेणे मात्र तितके सोपे नाही.
नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥
आंत घागर बाहेरी पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥
आजी म्या एक नवल देखिले । वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥
शेतकऱ्याने शेत पेरिले । राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥
हांडी खादली भात टाकिला । बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥
एकाजनार्दनी मार्ग उलटा । जो तो गुरुचा बेटा ॥६॥

पूर्वीच्या काळात ज्योतिषांना 'जोशी' म्हणत असत. घरोघरी फिरून किंवा जो जो त्यांच्याकडे येईल त्याला त्याचे भविष्य सांगायचे काम ते करत असत. संत एकनाथांनी मात्र कोणालाही लागू पडेल असा एकच होरा सांगून ठेवला आहे. हे भविष्य खरे ठरण्यासाठी कुठल्याही ग्रहाची किंवा नक्षत्राची गरजही नाही किंवा त्यांची बाधाही होणार नाही. यातली मन आणि वासना यांची रूपके विचार करण्यासारखी आहेत.
मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥
तेथूनि पुढे बरे होईल । भक्‍तिसुखें दोंद वाढेल । फेरा चौऱ्यांशीचा चुकेल । धनमोकासी ॥१॥
मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा । हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारीण । झगडा घाली मोठी दारूण । तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३॥
एकाजनार्दनी कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी । जा शरण सद्‍गुरुसी । फेरा चुकवा चौऱ्यांयशी ॥४॥

'बुरा मत सुनो, बुरा मत बोलो' वगैरे आपण महात्मा गांधीजींच्या संदर्भात ऐकले आहे, पण पाचशे वर्षांपूर्वी संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भारुडांमध्ये असे लिहिले आहे की 'मी वाईट ऐकल्यामुळे बहिरा झालो आणि वाईट बोलल्यामुळे मुका झालो'. कान आणि जीभ असून त्यांचा चांगला उपयोग केला नाही तर ते नसल्यातच जमा नाही का? पण अखेरीस गेलेली वाचा आणि श्रवणशक्ती परत मिळवण्याचा मार्गही त्यांनी दाखवला आहे.

बहिरा झालो या या जगी ॥धृ॥
नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥
नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥
माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता । एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥

मुका झालो वाचा गेली ॥धृ॥
होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥
जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना । निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥
साधुसंतांची निंदा केली । हरिभक्‍तांची स्तुती नाही केली । तेणे वाचा पंगू झाली । एकाजनार्दनी कृपा लाधली ॥३॥

'अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम' हाच सर्वधर्मसमभावाचा संदेश संत एकनाथांनी 'फकीर' या भारुडामध्ये कसा दिला आहे पहा.
हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥१॥
सब घरमो सांई बिराजे । करत है बोलबाला ॥२॥
गरीब नवाजे मै गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥३॥
अपना साती समजके लेना । सलील वोही अल्ला ॥४॥
जीन रूपसे है जगत पसारा । वोही सल्लाल अल्ला ॥५॥
एकाजनार्दनी निजवद अल्ला। आसल वोही बिटपर अल्ला ॥६॥

संत एकनाथांच्या इतक्या विविध प्रकारच्या उद्बोधक तितक्याच मनोवेधक रचना वाचून आपल्याला सर्वथा दिग्मूढ करतात.

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

मस्त माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

ज्ञानेश्वरांची भाषा आजच्या मराठीपेक्षा खूपच वेगळी असल्याने समजण्यास थोडी कठीण जाते. नामदेव ज्ञानेश्वरांचे समकालीन, पण त्यांची भाषा समजायला सोपी. दासबोध सरळ साधा, पण तुकारामांचा गाथा मात्र काही ठिकाणी अर्थ लावून तळटीपांचा आधार घेऊन वाचावा लागतो. नाथांची उलटी खूण खरीच. भाषा सोपी पण आशय गहनगंभीर. ज्ञानेश्वरीचे भाषेच्या अंगाने रसग्रहण धोंड सरांनी केले आहे तसे इतर संतांचेही झाले आहे की कसे याबद्दल कुणास माहिती आहे काय? ऐ.अ.वर तुकारामांच्या हिंदी/दक्खनी अभंगाविषयी एक धागा आहे. नामदेव पंजाबात गेले होते म्हणून त्यांना हिंदी अवगत असावी. एकनाथांचा चांग बोधलेमुळे हिंदी/दक्खनीशी परिचय असावा. प्रश्न मनात असा येतो की त्या काळी महाराष्ट्रात हिंदी इतकी सार्वत्रिक बोलली जात होती का की या संतांना हिंदीतही आपले विचार व्यक्त करावेसे वाटले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! छान आणि नवीन माहिती मिळते आहे. आभार!
बाकी, "अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना" ही रचना माझ्या आई आणि बायको दोघींनाही पाठ होती पण तिचा उगम इथे एकनाथ-साहित्यात आहे माहित नव्हते.

बर्‍याच दिवसांनी लिहिलेत इथे.. येत रहा.. लिहित रहा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्त माहिती. एकनाथांच्या बर्‍याच रचना वाचावयास मिळाल्या या निमित्ताने, बहुत धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त माहिती. लेख आवडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घालावा आवर कसा वेगळाच सूर माझा
माझ्या तहानेच्यासाठी वेगळा पाऊस माझा.