ध्यानम् सरणम् गच्छामी (उत्तरार्ध)
जगाचे मॉडेल
माणूस नेहमीच आपल्याला जे जग हवे त्याचेच प्रतीरूप मनात साठवत असतो. त्यात त्या व्यक्तीची जाण, समज, अनुभव वैचारिक कुवत यांचेच प्रतिबिंब उमटलेले असते. त्याच्यातील मर्यादा व वैशिष्ट्ये यांचा शोध त्या प्रतीरूपात घेता येते. उदाहरणार्थ लहान मुलं परिकथेच्या जगात वावरत असतात. तरुण-तरुणींचे रोमॅंटिक जग इतराहून वेगळे असते. .....तसेच त्या प्रतीरूपात त्या त्या व्यक्तीच्या पूर्वानुभवाचा संग्रहही असतो. त्यामुळे त्या व्यक्तीला उमजलेले जग हे वास्तवापासून शेकडो कोस दूर असते.
याबाबतीतही एक प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात एका गल्लीतील रस्त्याचे, त्यातील घरांचे व झाडा-जुडपांचे एक चित्र काहींना दाखवण्यात आले. व असेच एक हुबेहूब रेखाचित्र काढण्यास सांगितले. यातील बहुतेकांच्या रेखाचित्रात दारे खिडक्या, घरांचे छप्पर, झाडे इत्यादींचे प्रमाण मूळ चित्राप्रमाणे नव्हत्या. चित्र काढणारे आपापल्या मनात साठलेल्या दारे-खिडक्यांचे चित्र काढत होते. मनात साठवलेल्या कल्पनांनाच चित्ररूप देण्याचा तो प्रयत्न होता. म्हणून त्यात अनेक लहान मोठे चुका राहिल्या होत्या.
एकाग्रता
इतरापेक्षा ध्यानोपासकांच्यात एकाग्रता जास्त असतो हा दावाही फोल ठरला आहे. मुळात एकाग्रता म्हणजे नेमके काय याचा अर्थ बोध होत नाही. एका शोधनिबंधात याविषयी माहिती आलेली आहे. या संशोधकाच्या मते इंद्रियाद्वारेच आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकतो. परंतु असे करताना एकाच वेळी एकाच ठिकाणी एकाग्र चित्त होण्याचा संभव फारच कमी असतो. कारण आपण नेहमीच एका वेळी अनेक गोष्टी (मल्टी प्रोसेसिंग) हाताळत असतो. मुळात आपली एकाग्रता आपल्या मानसिक जडण - घडणीवर जास्त करून अवलंबून असते. शेक्सपियरच्या मॅकबेथ नाटकातील मॅकबेथला 'आपण राजा होणार' ही वाणी कुठल्याही शारीरिक हालचालीविना पटली होती. म्हणूनच त्याच्या यानंतरच्या सर्व शारीरिक व मानसिक हालचाली, प्रतिक्रिया त्याच दिशेने होत होत्या. स्पर्धात्मक परीक्षेला बसलेला एखादा विद्यार्थी परीक्षा संपेपर्यंत शारीरिक व मानसिकरित्या तादात्म्य पावतो. त्यासाठी मानसिक तयारी असते. व त्याची मानसिक जडण - घडण त्याला मदत करते. अशा प्रकारे आपली मानसिक जडण घडण महत्वाची ठरत असून ध्यान करणारी व्यक्ती डोळे मिटते की डोळे उघडे ठेवते याला काही अर्थ उरत नाही.
ध्यान करण्यात व न करण्यात ध्यान सोडल्यास इतर कुठल्याही प्रकारे तुलना करण्यासारखे काहीही नसते, असा निष्कर्ष काढता येईल. पाश्चात्य देशातून आपल्या येथे ध्यान शिकण्यासाठीच आलेले व त्याच देशातील इतर यांची तुलना केल्यास फार वेगळे चित्र दिसणार नाही. या उलट ध्यान धारणा करणार्या परदेशातील व्यक्ती चिंताग्रस्त असतात असेच आढळले. इतरापेक्षा ध्यानधारणेसाठी उत्सुक असणारे जास्त समस्याग्रस्त असतात. इतरापेक्षा दुप्पट प्रमाणात ही मंडळी मादक पदार्थांचे सेवन करतात, असे दिसून आले आहे.
ध्यानधारणेचे दावे
गंभीर समस्यांची हाताळणी ध्यानोपासक एखादी गंभीर समस्या कशी हाताळतात याचाही काही संशोधकांनी अभ्यास केला आहे. यासाठी जास्त अनुभवी ध्यानधारक व अननुभवी ध्यानोपासक यांच्यातील अनुभवांची तुलना करणे योग्य ठरेल असे संशोधकांना वाटत होते. परंतु यातही गोची होती. कारण जरी ध्यानाची सुरुवात करणार्यांची संख्या भरपूर मोठी असली तरी मध्येच कुठेतरी सोडून जाणार्यांची संख्याही तितकीच मोठी असते. फारच कमी लोक शेवटपर्यंत टिकून राहतात. व ध्यानाचा सराव करतात. त्यामुळा ध्यानधारकांचा फार मोठा गट ध्यानानुभवापासून वंचितच राहतो. ध्यानाच्या परिणामाचा स्पर्षही त्यातील अनेकाना झालेला नसतो. मनोवैज्ञानिकांच्या मते ध्यानोपासनेतील अनियमितता ही मानसिक अनारोग्याचे लक्षण होय.. अशा व्यक्ती अंतर्मुख, ध्यानापासून फार कमी अपेक्षा ठेवणारी, अत्यंत टोकाची प्रतिक्रिया व्यक्त करणारी, प्रत्येक घटनेच्या कारणाचे बाह्य जगात शोध घेणारी असू शकते. अजून एका अभ्यासानुसार कादंबरी, चित्रपट वा दिवास्वप्न यामध्ये रमणार्यासारखी मानसिकता या अर्धवटपणे ध्यान करणार्यांची असते.सायकोसिस वा विषण्णता (डिप्रेशन) यांची लक्षणं असलेले ध्यानोपासना पूर्ण करण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यांच्यावर ध्यान पूर्ण करण्याची जबरदस्ती केल्यास आत्महत्या वा विमनस्क वर्तणुकीत पर्यावसान होण्याची शक्यता असते. या तुलनेने स्थिरचित्त प्रकृती असलेलेच ध्यान पूर्ण करू शकतात. यावरून एखादी गंभीर समस्या हाताळताना ध्यानधारणेचा उपयोग कितपत होतो याबद्दल ठामपणे काही सांगता येत नाही असे संशोधकांना वाटते. कारण ध्यानधारकांची प्रतिक्रिया व इतर स्थिरचित्त असलेल्या सामाऩ्यांची प्रतिक्रिया सारखीच असण्याचा संभव जास्त.
DHEA त वाढ (?)
नियमित ध्यानाने निरामय आरोग्य व मानसिक स्वास्थ्य लाभते, याला विदेशी अभ्यासकांनीही मान्यता दिली आहे. डोकेदुखी, पाठदुखी, अंगदुखी, शरीराच्या कोणत्याही अकारण भागात होणार्या वेदना अशा किरकोळ दुखण्यांपासून पासून ते उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह अशा गंभीर विकारांवरसुद्धा नियमित ध्यान करणे लाभकारक ठरते. काही दिवसापूर्वी ‘New American Scientists Journal’ मधील लेखाचा काही भाग वाचनात आला. त्यावरून एका प्रयोगाची माहिती मिळाली. आपल्या शरीरात DHEA नावाचे संप्रेरक तयार होत असते, जे शरीराची झीज रोखणे किंवा तारुण्य राखण्याचे काम करत असते. या प्रयोगात साठ लोकांचे DHEA तपासले. नंतर यापैकी तीस लोकांकडून तीन महिनेपर्यंत रोज दोन वेळा अर्धा अर्धा तास ध्यान करवून घेतले. यानंतर पुन्हा DHEA तपासणी केली असता असे आढळले की ध्यान न करणार्या लोकांची DHEA लेव्हल तीच राहिली परंतु ध्यान करणार्यांच्या DHEA पातळीत २२ ते २७ टक्के वाढ झाली आहे अन हे लोक पूर्वीपेक्षा जास्त आनंदी, उत्साही झाले आहेत.
DHEA (dehydroepiandrosterone) हे एक नैसर्गिकरित्या शरीरातील अँड्रेनॉल ग्रंथीत कोलेस्टोरॉलचा वापर करून तयार होणारे संप्रेरक आहे. पुरुषातील टेस्टोस्टेरोन व स्त्रियामधील एस्ट्रोजेन प्रमाणे रासायनिकरित्या हेसुद्धा संप्रेरक म्हणून कार्य करते. पुरुष व स्त्री या दोघांच्याही तारुण्यकाळात याचा मोठ्या प्रमाणात स्राव होतो व वयोमानाप्रमाणे ते हळू हळू कमी होत जाते. त्यामुळे वृद्धत्वाच्या काळातील बहुतेक व्याधींसाठी DHEA कमी होण्याला जबाबदार धरले जात असावे. DHEA चे पुरस्कर्ते वृद्धत्वातसुद्धा तरुण राहण्यासाठी यात वाढ करण्याचा आग्रह धरतात. व बाजारात या पूरक औषधाची रेलचेल आहे. परंतु वृद्धत्वातील व्याधींना कारणीभूत ठरणार्या कित्येक घटकामध्ये DHEA तील कमतरता महत्वाचे नाही असे वैज्ञानिकांचा दावा आहे. DHEA तील जास्त पुरवठा वृद्धत्वाकडून तारुण्याकडे नेतो याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. (स्केप्टिक व विकिपिडिया )
गेली अनेक वर्षे DHEA कडे सर्वरोगावर अक्सीर इलाज म्हणून बघितले जाते. हृदयासंबंधीच्या तकरारी, कर्करोग, मधुमेह, पार्किन्सन - अल्झेमेर सारखे रोग, नैराश्य, ऑस्टिओपोरोसिस, लठ्ठपणा इ.इ. या सर्व रोगावरील रामबाण उपाय म्हणून DHEAच्या कंपन्या हे ओषध विकून मोठ्या प्रमाणात पैसे कमावत आहेत. परंतु हे एका प्रकारचे snake oil आहे असेच तज्ञांचे मत आहे. (क्वॅक् वाच)
जीवनात यशस्वी होण्याच्या मंत्रसिद्धीवरील पुस्तक लिहिणारे वा इतर कुठलेही औषधोपचार न करता नैसर्गिक उपचारावर भरवसा ठेवणारेच फक्त अशा DHEA वर विश्वास ठेऊ शकतात. ध्यानधारणेतून DHEA त वाढ होते व त्यातून सर्व व्याधीवरील उपायांची गुरुकिल्ली सापडू शकते हे स्वप्नरंजन आहे असेच म्हणावे लागेल.
डीप मेडिटेशन स्टेट
ध्यानाची खोल अवस्था (Deep Meditation State ) ही डेल्टा अवस्था असते. म्हणजेच शरीर व मन पूर्ण विश्रांती अवस्थेत असते. चयापचय क्रिया जवळजवळ शून्य असते. म्हणून जितका वेळ ही अवस्था टिकून राहील तितका वेळ शरीराला अन मनाला गहन विश्रांती मिळते.
पूर्ण विश्रांती देणारी झोप ही किमयागार आहे. अशा झोपेमध्ये शरीराची झीज भरून काढली जाते. सर्व पेशींना रिसेट केले जाते. शरीरातील सर्व अनियमितता जसे की हृदयाचे स्पंदन, रक्ताभिसरण, जखमा भरून येणे, वेदना शमन हे नियमित व नियंत्रित केले जाते. म्हणून कोणत्याही दुखण्यामध्ये झोपेचे औषध दिले जाते.
वरील विधानात काही तथ्य असल्यास ध्यानाची ही खोल अवस्था (Deep Meditation State) मेंदूमधील कुठल्या न्यूरॉन्समुळे हे शक्य होणार यावर संशोधन करणे योग्य ठरेल. व या संशोधनातून मेंदूत बदल घडवू शकणारी (Mind Altering Medicine) औषधं बाजारात येऊ शकतील. या औषधामुळे अशा प्रकारच्या डेल्टा अवस्थेत आपण गेल्यास वर उल्लेख केलेले सर्व विकार नाहिसे होतील. परंतु हे स्वप्नरंजन ठरण्याचीच शक्यता जास्त आहे. काऱण मेंदूच्या कुठल्याही भागात किंचित बदल केले तरी त्यातून इतर ठिकाणी होणार्या दुष्परिणामांचा अंदाज लवकर येत नाही. त्यामुळे फार सावधपणे अशा प्रकारच्या औषधांकडे बघितले जाते. जैव-तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे शक्य होईल याबद्दल संशोधकांच्या मनात अनेक शंका - कुशंका आहेत.
केवळ ध्यानधारणेतूनच हे सर्व साध्य करण्याचे ठरविल्यास या डीप मेडिटेशन स्थितीला पोचण्यास किती काळ ध्यानधारणेचा सराव करावा लागेल याचाही अंदाज घेता येत नाही. कदाचित 5,10, 15 ,20... वर्षे, किंवा त्याहूनही जास्त. या सर्व कारणामुळे ध्यानधारणेतील फोलपणा लक्षात येऊ शकेल.
ध्यानोपासक जास्त सुखी
ध्यानोपासक जास्त सुखी असतात असेही सांगितले जात असते. ध्यानधारणेपासून खरोखरच सुख मिळत असेल का? मानसशास्त्रज्ञांच्या मते ध्यान हे सुख मिळवण्याचे तंत्र नसून एक प्रकारची भान निर्माण करणारी प्रक्रिया असते. सुख हे मानण्यावर अवलंबून असते. त्यात पैसा, प्रतिष्ठा, वंश, लिंग, प्रदेश, इत्यादींचा काहीही संबंध नसतो. अतीव दु:खाच्या प्रसंगातून माणूस गुजरताना बाह्य परिस्थितीपेक्षा त्याच्या मनातील आंतरिक शक्तीच त्याला उभारी देत असते. व्यक्तीच्या शारीरिक - मानसिक जडण घडणीतच सुखाचा शोध घेता येतो. ध्यानधारणा वेगळे काहीतरी करू शकते अशी समजूत करून घेणे भाबडेपणाचे ठरेल.
उपचार पद्धती
ध्यानधारणा ही उपचार पद्धती म्हणून योग्य आहे का? असा प्रश्नही अनेक वेळा विचारला जात असतो. काही मानसोपचारतज्ञ ध्यानाचा उपयोग आपल्या उपचार पद्धतीत करून घेत असतात. परंतु त्याच्याही काही मर्यादा आहेत. गंभीर मानसिक आजारावर ध्यानधारणेमुळे आजार कमी होण्याऐवजी आजार बळावण्याची शक्यता जास्त असते. त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. दाबून ठेवलेले आणि संघर्षात्मक विचार व भावना यांना तोंड देण्यासाठी यशस्वी न झालेल्यानी ध्यानाच्या मागे लागल्यास या गोष्टी उफाऴून येण्याची शक्यताच जास्त असते. व त्यातून शारीरिक - मानसिक यातनाच जास्त होतात. मानसशास्त्रीयदृष्ट्या स्थिरचित्त प्रकृतीच्या लोकानाच ध्यानधारणेचे सकारात्मक परिणाम दिसतात. परंतु हे कितपत, कुठल्या व्यक्तीत, व केव्हा दिसतात हे अजूनही गूढ आहे.
प्रतिक्रिया
लेख आवडला.
लेख आवडला.
लेख आवडलाच..मात्र तरीही
लेख आवडलाच..
मात्र आता स्नेहांकिता यांचा ध्यानावरील पुढिल लेखांकाच्या अधिकच प्रतिक्षेत आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१
ध्यान म्हणजे काय इथपासूनच मुळात शंका आहेत.
"काय ध्यान आहे?" असा वाक्प्रचार कुठून आला असेल?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अदिति, ध्यान या शब्दाचा
अदिति,
ध्यान या शब्दाचा इंग्रजी प्रतिशब्द Meditation असा दिला जातो. पण माझ्या मते तो चपखल नाही. त्याऐवजी Attention हा योग्य वाटतो. Attention to body and mind ! शरीर व मनाकडे १०० टक्के लक्ष देणे. याविषयी माझ्या लेखाच्या दुसऱ्या भागात तपशील देत आहे. थोडा लेट होत आहे, सॉरी !
इन्स्टंट उत्तर
आरशात (स्वत:चेच) थोबाड पाहिले असता (ज्यासत्यास/जीसतीस, स्वतःपुरते) या प्रश्नाचे उत्तर मिळावे, नाही का?
तुझे आहे तुजपाशी, पण लक्षात कोण घेतो? असो चालायचेच.
ऋषिकेश, खरे तर माझ्या लेखाचा
ऋषिकेश,
खरे तर माझ्या लेखाचा दुसरा भाग तयार आहे. पण प्रस्तुत लेखाच्या (ध्यानां सरणं )पहिल्या भागात काही अवांतर मुद्दे उपस्थित झालेले दिसले, त्यांचा परामर्श आधी घेणे सयुक्तिक ठरेल असे वाटल्यावरून मध्ये एक लेख देण्याचे ठरवले आहे. अर्धा तयार झालाही आहे. तथापि मार्च ळेहिन्या मध्ये कामाच्या व्यस्ततेमुळे लेख अद्यापी पूर्ण झाला नाही. लवकरच, प्रथम या व पहिल्या लेखातील काही बाबींचे विवरण व माझा लेख दोन्ही टाकत आहे. धन्यवाद.
पूर्वग्रह
जगात चाललेला ध्यानावरील अभ्यास बघता त्याचे फायदे जास्त लक्षात येत चालले आहेत, ध्यानाच्या प्लेसहोल्डरमधे अनेक चांगल्या गोष्टी उघड होत चालल्या आहेत, त्याकडे नकारात्मक दृष्टीने पहाणे आस्तिकतेबद्दलच्या पूर्वग्रहामुळे होत असावे असे वाटते, निदान नकारात्मक दृष्टीकोन न पसरवता डोळे उघडे ठेवून फायद्यांची चिकीत्सा करणे गरजेचे आहे.
संदर्भ - खाली दिलेल्या लिंक मधे बर्यापैकी संदर्भ दिले आहेत.
http://blog.ted.com/2013/01/11/4-scientific-studies-on-how-meditation-ca...
मेडिटेशनवर संशोधन
या विषयावरील विकिपिडियातील निवडक उल्ले़ख:
1. Since the 1950s, 3,000 studies on meditation have been conducted and yet many of the early studies had multiple flaws and thus yielded less conclusive data. More recent reviews have pointed out many of these flaws with the hope of guiding current research into a more fruitful path. More reports assessed that further research needs to be directed towards the theoretical grounding and definition of meditation.
2. Potential adverse effects of meditating
The following is an official statement from the US government-run National Center for Complementary and Alternative Medicine:
Meditation is considered to be safe for healthy people. There have been rare reports that meditation could cause or worsen symptoms in people who have certain psychiatric problems, but this question has not been fully researched. People with physical limitations may not be able to participate in certain meditative practices involving physical movement. Individuals with existing mental or physical health conditions should speak with their health care providers prior to starting a meditative practice and make their meditation instructor aware of their condition.
Adverse effects have been reported, and may, in some cases, be the result of "improper use of meditation". The NIH advises prospective meditators to "ask about the training and experience of the meditation instructor... [they] are considering."
As with any practice, meditation may also be used to avoid facing ongoing problems or emerging crises in the meditator's life. In such situations, it may instead be helpful to apply mindful attitudes acquired in meditation while actively engaging with current problems.According to the NIH, meditation should not be used as a replacement for conventional health care or as a reason to postpone seeing a doctor.
3. In June, 2007 the United States National Center for Complementary and Alternative Medicine (NCCAM) published an independent, peer-reviewed, meta-analysis of the state of meditation research, conducted by researchers at the University of Alberta Evidence-based Practice Center. The report reviewed 813 studies involving five broad categories of meditation: mantra meditation, mindfulness meditation, yoga, T'ai chi, and Qigong, and included all studies on adults through September 2005, with a particular focus on research pertaining to hypertension, cardiovascular disease, and substance abuse.
The report concluded, "Scientific research on meditation practices does not appear to have a common theoretical perspective and is characterized by poor methodological quality. Firm conclusions on the effects of meditation practices in healthcare cannot be drawn based on the available evidence. Future research on meditation practices must be more rigorous in the design and execution of studies and in the analysis and reporting of results." It noted that there is no theoretical explanation of health effects from meditation common to all meditation techniques.
संदर्भ
वस्तुनिष्ठपणे या विषयाकडे बघितल्यास अजून फार मोठा टप्पा गाठावयाचा आहे, हे लक्षात येईल.
+१
बिंगो.
एक जुनीच प्रतिक्रिया
आपला उपक्रम दिवाळी अंकातील मूळ लेख वाचून त्यावेळी मी त्यावर एक प्रतिसाद दिला होता. तोच लेख संपादित करुन इथे प्रकाशित केला आहे असे दिसते. माझ्या तेंव्हाच्या प्रतिक्रियेवर आपले काहीच उत्तर आलेले नव्हते. उत्तर देण्याच्या योग्यतेची ती प्रतिक्रिया आपल्याला वाटत नसेल, तरी इथल्या इतर वाचकांच्या दृष्टीस ती पडावी म्हणून मी इथे माझी तेंव्हाची प्रतिक्रिया (संपादित न करता) इथे देत आहे -
***********
तर्कविसंगत
थोडा काळ (पाटी कोरी ठेऊन) समोरच्याचे म्हणणे ऐकून घेऊन दहा दिवस काय सांगतात ते ‘ट्राय’ करणे याला स्वत:ची बुद्धी गहाण ठेवणे म्हणतात हे आज समजले. असो. बडगा म्हणजे नेमका काय त्रास होतो, नुकसान होते हे लेखात स्पष्ट व्हायला हवे.
एका ध्येयाकडे जाण्याचे अनेक मार्ग असू शकतात असे म्हणण्यात काय तार्किक विसंगती आहे? मुंबईहून दिल्लीला जायला अनेक मार्ग उपलब्ध आहेत. निरनिराळे ट्रॅव्हल एजंट आपापली जाहिरात करत असतात. काहीजण फसवे असतात. काहीजणांची सेवा समाधानकारक नसते. काहीजणांशी आपले चांगले जमते, प्रवास चांगला होतो. ध्यानाचा उद्देश स्पष्ट नाही असे इथे म्हणले आहे. जगण्याचा उद्देश स्पष्ट असतो का? मार्गाचा पत्ता असतो का? उद्या काय होणार आहे ते माहीत असते का? आयुष्यात काय काय प्लॅनिंग लोक करतात, तसे तेवढे जगू शकतील, निश्चित प्रयत्नांनंतर साध्य करतीलच असे ठामपणे सांगता येते का? आयुष्य म्हणजे सर्व काही बेभरवशाचा व्यवहार, संदिग्ध, धूसर! अनुभवांचे वर्णन शब्दांत पकडता येत नाही असे म्हणण्यात काय आक्षेपार्ह आहे? गोड, लाल, सुंदर म्हणजे नेमके काय? हे शब्दांत पकडता येते का? लेखकाला कधी वर्णन करता येणार नाही असा आनंद झालेलाच नाही का? असे दु:ख वाटलेलेच नाही का? सगळे काही शब्दांत पकडता आलेच पाहिजे का? जे शब्दांत सांगता येणार नाही ते सगळे खोटे का? आणि सगळ्यांनी एकाच प्रकारचे ध्यान सांगितले पाहिजे, तरच ते तर्कसंगत, असे का? सगळ्यांनी एकसारखाच विचार केला पाहिजे. एकाच वेळी उठले पाहिजे, एकाच वेळी झोपले पाहिजे. एकाच मापाचे कपडे घातले पाहिजेत. एकाच चवीचे जेवण घेतले पाहिजे. तरच आपले जगणे वागणे तर्कसंगत. विविधता म्हणजे तार्किक विसंगती!
वास्तवापासून दूर म्हणजे काय? वास्तव जग म्हणजे काय? कुठलेही जग हे कुणाच्यातरी कल्पनेतीलच जग असणार. कुणाच्याच कल्पनेत नसणारे जग असू शकेल काय? आणि जरी असले, तरी त्याचे वर्णन करणे शक्य आहे काय? ज्याक्षणी वर्णन सुरू होते, त्याक्षणी ते वर्णनकर्त्याच्या कल्पनेतील जग बनते.
एकाग्रता म्हणजे नेमके काय याचा अर्थबोध होत नसेल, तर मानसिक जडण-घडण म्हणजे नेमके काय याचाही अर्थबोध व्हायला नको. इतरांपेक्षा ध्यानोपासकांच्यात एकाग्रता जास्त असते असा एखादा दावा (असलाच तर) घेऊन त्याला फोल ठरवून ध्यान कसे बिनकामाचे आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. हे म्हणजे असे म्हणण्यासारखे आहे – अमन आणि चमन हे दोन भाऊ आहेत. अमन नियमित व्यायाम करतो, चमन करत नाही. पण चमन हा अमनपेक्षा अधिक निरोगी आहे, शक्तिशाली आहे. व्यायामाने शक्ती वाढते, आरोग्य राहते हा दावा फोल आहे. मुळात आरोग्य म्हणजे नेमके काय याचा अर्थबोध होत नाही. या गोष्टी शारीरिक जडण घडणीवर जास्त करुन अवलंबून असतात.
ध्यान करणारी व्यक्ती डोळे मिटते की डोळे उघडे ठेवते याला काही अर्थ उरत नसेल असे समजू. ध्यानाला अर्थ उरतो असा यातून अर्थ घ्यायचा का? विद्यार्थी शारीरिक व मानसिकरित्या तादात्म्य पावतो म्हणजे नेमके काय? त्याचे काय कशाशी तादात्म्य पावते? त्यालाच एकाग्रता म्हणायचे, ध्यान म्हणायचे, की अजून एखादा “वैज्ञानिक” शब्द शोधायचा? जी गोष्ट नाकारायची, तीच गोष्ट दृष्टांत म्हणून द्यायचा हा प्रकार आहे.
ध्यान धारणा करणाऱ्या व्यक्ती जास्त समस्याग्रस्त असतात, चिंताग्रस्त असतात, मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या असतात असे म्हणून काय सिद्ध करायचे आहे? ध्यान केल्यामुळे चिंताग्रस्त होतात; की चिंताग्रस्त असतात, म्हणून ध्यानाकडे वळतात? ध्यान केले म्हणून व्यसनी होतात, की व्यसनातून सुटायचे असते म्हणून ध्यान करण्याचा प्रयत्न करतात? ध्यान केले म्हणून समस्याग्रस्त होतात, की समस्याग्रस्त असतात म्हणून ध्यानाकडे वळतात?
कारण जरी ध्यानाची सुरुवात करणार्यांची संख्या भरपूर मोठी असली तरी मध्येच कुठेतरी सोडून जाणार्यांची संख्याही तितकीच मोठी असते. फारच कमी लोक शेवटपर्यंत टिकून राहतात. व ध्यानाचा सराव करतात.
यात कुठेतरी असे गृहीत धरलेले आहे की ध्यानधारणांविषयी अवास्तव दावे म्हणजेच ध्यानधारणा, आणि म्हणून ध्यानधारणाच त्याज्य. काही ध्यानोपासक ध्यानधारणा मधूनच सोडून देत असतील, म्हणून ध्यानधारणा चुकीची ठरते का? मानसशास्त्रज्ञांच्या मते ध्यान ही एक प्रकारची भान निर्माण करणारी प्रक्रिया असेल, तर अशा प्रकारची प्रक्रिया, म्हणजेच ध्यान, त्याज्य ठरावे का? भान निर्माण झाल्याने दु:ख कमी होत असेल, तर ध्यान केल्याने सुख मिळते असे म्हणू शकतो का? मानसिक आजारावर ध्यानधारणेमुळे आजार कमी होण्याऐवजी बळावण्याची शक्यता जास्त असते हे बरोबर आहे. पाठदुखी गंभीर असेल, तर व्यायामाने बरी होण्याऐवजी बळाऊ शकते, तसेच आहे हे. पाय मुरगळलेला असताना पळायची सक्ती केली जाऊ नये हा कॊमन सेन्स आहे. त्यासाठी पळणे शरीराला/ प्रकृतीला घातक आहे असा निष्कर्ष निघू शकत नाही. फिटनेस नसणाऱ्यावर व्यायामाची सक्ती केल्यास गंभीर इजा होऊ शकते. यावरुन आरोग्य सांभाळण्यासाठी व्यायामाचा कितपत उपयोग होतो याबद्दल ठामपणे काही सांगता येत नाही. कारण व्यायाम करणारांचे आरोग्य आणि एरवी व्यायाम न करता निरोगी राहिलेल्यांचे आरोग्य सारखेच असण्याचा संभव जास्त; असे म्हटल्यासारखे आहे.
व्यायामशाळेत न जाता निरोगी राहता येते, आणि आजारी माणसाने व्यायाम केल्यास दुखापत होते, यावरुन व्यायामाचा फोलपणा सहजपणे लक्षात येईल.
सामाजिक दृष्ट्या विपश्यनेचे काय परिणाम होतात असे लेखकाला वाटते? यावर काही वैज्ञानिक संशोधन झाले असल्यास त्याचा दाखला दिलेला नाही. एक सामाजिक परिणाम ऐकण्यात आहे. तिहार तुरुंगात झालेल्या सुधारणा. विपश्यनेतील/ ध्यानधारणेतील “व्यक्तीकेंद्रीत” विचार ठसवल्यामुळे समाजाच्या बांधिलकीमध्ये, समाजाच्या देण्याघेण्यामध्ये काही अडचणी आल्याचे कुठे दिसून आलेले नाही. उलट, या तत्त्वज्ञान/ दर्शनावर आधारीत बौद्ध संघाने समाजाची सेवाच केलेली आहे. सगळ्या समस्यांचा आमच्याकडे (आणि आमच्याकडेच) रामबाण उपाय आहे असे मी तरी विपश्यना शिबिरात कधी ऐकले नाही. असा रामबाण उपाय असू शकत नाही, असेच ते सांगत असताना मी ऐकले आहे. स्वत:ला बदला, जग बदलेल हा कॉमन सेन्सशी सुसंगत विचार मी त्यांच्याकडून ऐकलेला आहे. आपल्या प्रतिक्रियांना योग्य, विधायक वळण देण्याचे शिक्षण घेतल्याने समाजाला कसा काय अपाय होऊ शकतो? परिस्थिती शरणता तर दूर दूरवर फिरकत नाही. जबरदस्त आशावाद, आणि परिस्थितीवर मात करण्याची जिद्द निर्माण करणारी ही पद्धत आहे. दहा दिवस शिबिर अटेण्ड करुन बुद्धांच्या बॅचेस बाहेर पडल्या तरच विपश्यनेला अर्थ आहे अशी काहीशी लेखकाची समजूत दिसते.
विपश्यना शिबिरात काय होते याचा गोषवारा लेखकाने दिलेला आहे. ते वाचून एवढेच समजले की लेखकाने एकतर स्वत: शिबिराचा अनुभव घेतलेला नसावा, किंवा घेतला असेल, तर दहा दिवस वाया घालवले आहेत. विपश्यना आयुष्यभर मौनव्रत बाळगायला सांगत नाही. “साधकबाधक” चर्चांचे व्यसन असणाऱ्या लोकांना थोडा काळ गप्प राहून समोरचा काय सांगत आहे ते ऐकून घेणे, त्यावर विचार करणे, थोडा वेळ काय करायला सांगतात ते (पाटी कोरी ठेऊन) करुन बघणे ही गोष्ट किती अवघड असते हे यातून समजले. तिथले वातावरण उदास असते, उत्साहवर्धक नसते असे लेखक म्हणतात, हे “उदास” पणाचे वर्णन “वास्तव” म्हणायचे की लेखकाचा स्वत:चा (कपोलकल्पित) अनुभव म्हणायचा?
विपश्यनेचे तत्वज्ञान व त्याचे तंत्र अजब असून उपकारक नाही असे म्हणण्यासाठी विपश्यना वरती दिलेल्या उपकारक सामाजिक गोष्टींच्या विरुद्ध आहे असे दाखवावे लागेल. माझ्या मते विपश्यना (तसेच इतर अनेक ध्यानधारणा पद्धती) जगाला सामोरे जायला शिकवतात. या वरती दिलेल्या (पर्याय नसलेल्या) गोष्टी नीट करायला शिकवतात. विपश्यनेत असे कुठेही सांगत नाहीत की सगळे धंदे सोडून आयुष्यभर मांडी घालून डोळे मिटून (आर्य)मौन धारण करुन (कपोलकल्पित) अनुभूतीची वाट बघत बसा.
याला आधुनिक बुवाबाजी का म्हणायचे हेही लेखात स्पष्ट केलेले नाही. बुवाबाजीमध्ये शोषण हा अपरिहार्य घटक असला पाहिजे. अशी तथाकथित बुवाबाजी करुन कुणाचे आणि कसे शोषण होते हेही स्पष्ट होत नाही. दहा दिवस तुम्हाला फुकट रहायला, जेवायला मिळते. यात कसले शोषण आले आहे? कॅसेट्सची विक्रमी विक्री होते म्हणे. किंमती अव्वाच्या सव्वा असतात, की विकत घ्यायची सक्ती होते? आणि अशा कॅसेट्समध्ये कोणते समाजविघातक संदेश असतात? कत्तलखान्यांची इकॉनॉमी चालावी म्हणून रेड मीट कसे आरोग्यदायी आहे याची “वैज्ञानिक” संशोधने प्रसिद्ध केली जातात. जाहिरातींमधून पद्धतशीररीत्या सिगारेट, दारु ग्लॅमरस बनवली जाते. या शोषणाविषयी कुणी वैज्ञानिक चिकित्सेने लेख लिहिताना दिसत नाही.
शेवटी आपण आपला वेळ कशा प्रकारे घालवावा हा पूर्णत: वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु सामाजिक प्राणी म्हणून प्रत्येकावर काही जवाबदार्या आहेत. काही कर्तव्य आहेत. यांची जाण ठेऊनच विपश्यनेच्या आहारी जावे की नाही याचा निर्णय घेणे योग्य ठरेल. माकडाबरोबर झाडाखाली बसून फळे खावीत. परंतु माकडांच्या सारखे झाडावर चढून एका फांदीवरून दुसर्या फांदीवर उड्या मारण्याच्या फंदात पडू नये हेच शहाणपणाचे ठरेल.
शेवटी आपण कसा विचार करायचा हा पूर्णत: वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु सामाजिक प्राणी म्हणून प्रत्येकावर काही जवाबदाऱ्या आहेत. काही कर्तव्ये आहेत. वैज्ञानिक चिकित्सेच्या आवरणाखाली काही चांगल्या, समाजाला उपकारक असणाऱ्या उपक्रमांना विरोध करायचा, अभ्यास न करता पूर्वग्रहित दृष्टीने वरवरची माहिती गोळा करून प्रतिक्रिया द्यायची; किंबहुना प्रतिक्रिया मनामध्ये ठरवूनच एखादी गोष्ट पहायची, आणि ज्यांना विशेष माहिती नसेल त्यांचा बुद्धिभेद होईल असे पहायचे हे सामाजिक जवाबदारीचे लक्षण नाही.
इथे मी विपश्यनेचा पुरस्कार करतो आहे असे वाटू शकेल. मी तसा अवश्य करतो. पण तोच एक चांगला मार्ग आहे असे माझे आजिबात म्हणणे नाही. तो अपकारक आहे, असे कुणाचे म्हणणे असेल, तर ते तर्कदुष्ट आहे. एका चांगल्या मार्गापासून लोकांना परावृत्त करण्याचा हा प्रयत्न आहे, तो चिकित्सेच्या आवरणाखाली केला गेलेला आहे. असा प्रयत्न अंधश्रद्धा पसरवणे जितके निंद्य आहे, तितकाच निंद्य आहे. लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत असा परिचय वाचल्यामुळे याचा जास्तच खेद वाटतो.
+११११११११११११११११११११. सगळा
+११११११११११११११११११११.
सगळा प्रतिसादच भारी आहे-मल्टिपल श्रेण्या देण्याची सोय पाहिजे होती इतकेच तूर्तास सांगतो.
शेवटचे काही परिच्छेद म्हंजे सारभूत आहेत एकदम.
अधोरेखितांशी विशेष सहमत आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शंका....
माझा बेंबट्या झालाय हे आधीच जाहिर करतो. कुणीही पानभराच्या वर लेख लिहिला आणी त्यालाअ दीडपान प्रतिसाद दिला की मला लेखकाचे आणी प्रतिसादकाचे विरुद्ध विचारही ठामपणे पटायला लागतात.
.
तुम्ही योगसाधनावाले पूर्वी लै भारी दावे करायचात हे खोटे आहे का?
जसेजसे क्यामेरा तंत्रज्ञान प्रगत झाले; नोंदणीकरण नि निरिक्षण ; जिवंत सिद्धता प्रगत पावली; तसेतसे तुमचे धागे अधिकाधिक intangible; बरेचसे अप्रैमेय; "आतल्या आत अनुभवायचे" अशा ष्टायलित का गेले?
.
योगसाधनेने सूक्ष्मदेह प्राप्ती का काहीतरी करुन स्थूलदेहाबाहेर जाता येते. गावबह्र; विश्वभर संचार करता येतो म्हणे. हे दावे पूर्वी खरोखर केले जात होते;मॅच्युअर्ड म्हणवणार्यांकडूनही.
.
किंवा पाठीवर मांडे वगैरे भाजायचे दावे केले जायचे.
.
आता ह्याच गोष्टी ऑन क्यामेरा करुन दाखव म्हटलं की सगळे चुप्प का बसतात? "आम्ही तसे दावे करीतच नाही" असे सगळे म्हणतात. पण परवापर्यंत तसे दावे जे करीत होते; ते कुठे गेले मग?
.
दूर कशाला जा खुद्द विवेकानंदांच्या लिखाणात "तमक्याकडे पाण्यावर चालायची सिद्धी आहे. मी स्वतः अनुभव घेतलाय. ढमका अमुक एक वर्षे उपाशी आहे; बिन अन्नपण्याचा हठयोगी आहे. अमुक शतके जगला आहे." असे थोर्थोर विचार मांडलेत. ही मंडळी अशी विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंतच होती का? आता कुठे गेली ? भिंत चालवून दाखवा की आता. गेलाबाजर उघड्या अंगानं पळून दाखवा गाथेतल्या प्रमाणे एक्स्प्रेस ट्रेनपेक्षा फाष्ट; नायतर पाण्यावर दिवे लावून दाखवा. दरवेळी "अमक्या योग्यानं तमक्या काळात केलं होतं" इथेच गाडी का थांबते?
.
"योगानं मनःशांती मिलते. एकाग्रता वाढते" इतकाच दावा असेल; म्हणायचं असेल तर आमचा आख्खा प्रतिसाद बाद समजावा.
फक्त जमलच तर त्या विषयाबद्दलही तुम्हाला काय वाटतं हे ही सांगावं.
.
आता विज्ञानवाद्यांना :-
"ह्यांचं सगळच झूट " असं तुम्ही म्हणता; पण कित्येक गोंधळवून टाकणार्या गोष्टी समोर आल्या की तुम्हीही तोंड लपवून दुर्लक्ष करता. यकाही योगप्रकारांनी शरीरांतर्गत भागांवर असामान्य नियंत्रण मिळवून दाखवल्याचे किस्से आहेत. कित्येक mysteries आहेत. त्याबद्दल तुम्ही मौन ठेवता. तो नेपाळ मध्ये लहान बुद्ध अवतरला होता. कित्येक महिने अन्न्-पाणी न घेता ध्यानस्थ बसून राहिला. हे कसे शक्य आहे; ह्याबद्दल तुम्ही काहिच बोलत नाही.
डिस्कवरीने त्याअच्यावर एक डॉक्युमेंटरीही बनवलेली आहे. कित्येक मान्यवरांच्या उपस्थितीत तो तिथे बिना अन्न पाण्याचा कित्येक दिवस बसून (ध्यान करत?) राहिलेला आहे. यूट्यूबवरही धडधडित त्याचे विडियोज उप्लब्ध आहेत :-
http://www.youtube.com/watch?v=wGMwa4yZLL4
इतरही कित्येक कोडी तशीच आहेत. "असे काही होत नसते" अशी टिपिकल टेप वाजवण्यापेक्षा "हे असे का होत असावे" हा प्रश्न तुम्हाला पडेल तो सुदिन.
असे काहीही दिसले की "नाही असे होतच नाही. नसतेच तसे. दे सोडून." इतकच तुम्ही बुद्धीवादी बोलता. पूर्वग्रहदूषित नसलेला; त्रयस्थ चिकित्सक दृष्टीकोन का ठेवला जात नाही?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
विचारप्रवर्तक
प्रतिक्रिया वाचून दमलो. विचार करायला लावणारी आहे खरी! इथे दिली ते एक बरे केले. तिकडे वाचली नव्हती.
विपश्यना हा श्रद्धेचा प्रांत आहे त्यामुळे नानावटींसारख्या अश्रद्ध माणसांना कशी काय अनुभूती येणार? मानला तर देव नाहीतर दगड हे जसे आहे तसेच या विपश्यनेचे आहे. विपश्यना ह्या ज्याच्या त्याच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे असे म्हटले कि सर्वांना सोपे जाते. पण प्रतिक्रियाकर्त्याने ती पण सोय ठेवली नाही.
अश्रद्ध व सश्रद्ध माणसांना सहजीवन जगायचे आहे हे मात्र खरे
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
बापरे! दमलो! मात्र मस्त
बापरे! दमलो!
त्यामुळे सुरवातीच्या विविध मुद्द्यांच्या खंडनावर कोणत्याही बाजूने बोलण्याची कुवत नाही.
मात्र मस्त प्रतिसाद आहे. एकूणच ध्यान, मेंदूची कार्ये वगैरे माझ्यासाठी देव आहेत
मात्र शेवटी निष्कर्षाप्रत जे लिहिले आहे ते "घाऊक" वाटले आणि म्हणूनच असहमती नोंदवावी लागेल.
याच्याशी असहमती अशी की 'अश्या' बाबतीत "समाजाला उपकारक" ही टर्म सापेक्ष ठरते. काहि व्यक्ती ज्या गोष्टी समाजाला उपकारक आहे समजतात तेच इतर अनेकांना मान्य नसते. ही यादी विपश्यना वगैरे पुरती नसून नाडीचिकित्सेपासून ते एखाद्या बाबा-बुवापर्यंत आहे. बरं, एखादी गोष्ट खरच उपकारक आहे का? याची काही कसोट्यांवर चिकित्सा केली की अशी टिका होते. हे दुर्दैवी वाटते.
हे मात्र सहमत. आणि हे विज्ञानवाद्यांबरोबरच, त्यांच्या विरोधकांनाही तितकेच लागु आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
उत्तम प्रतिवाद...
उत्तम प्रतिवाद...
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
उच्चशिक्षित सश्रद्ध!
आ.रा. यांचा हा प्रदीर्घ प्रतिसाद उपक्रम या संस्थळाच्या 2010च्या दिवाळी अंकावरील लेखाच्या संदर्भातला आहे. ऐसी अक्षरेतील या दोन लेखाबरोबरच माझ्या स्वत:च्या विपश्यना शिबिराबद्दलच्या अनुभवाबद्दलही त्या लेखात वर्णन होते. व त्यातील प्रत्येक शब्दाचा, वाक्याचा व परिच्छेदाचा आ.रा. यानी पोस्ट मार्टेम करून फोरेन्सिक अहवालच वाचकासमोर ठेवलेला आहे. ऐसी अक्षरेच्या वाचकांना विपश्यनेसंबंधीच्या उतार्यांची कदाचित कल्पना नसेल. परंतु आ.ऱा. यांच्या प्रतिसादात त्यांचा ठामपणे उल्लेख केलेला असल्यामुळे या संबंधातील अजून एक लेख लिहिण्याचे प्रयोजन नाही असे मला वाटते. अशा प्रकारच्या वकिली बाण्याच्या उलटतपासणीला सामोरे जाण्याइतकी माझ्यात कुवत नसल्यामुळे त्यांच्या या प्रतिसादाबद्दल मला थोडक्यात काय सांगावेसे वाटते ते शब्दात पकडण्याचा हा लहानसा प्रयत्न:
सश्रद्धांना तुम्ही एखाद्या बाबा-बुवाच्या भोंदूगिरीबद्दल काही सांगण्याचा प्रयत्न केल्यास इतर बाबा बुवा भोंदू आहेत; परंतु आमचे बाबा तसे नाहीत हे एक नेहमीच्या पठडीतील उत्तर आपल्या तोंडावर फेकले जात असते. त्यातही उच्चशिक्षित सश्रद्धांना तर त्याच्या श्रद्धास्थांनाना किंचितही धक्का लावलेले सहन होत नाही. अशा प्रसंगी आकाश पाताळ एक करत विरोधकांना 'सळो की पळो' करण्याची त्यांची तयारी असते. जर एखाद्या वाचकाला सर्वसंमत अशा गोष्टीबद्दल काही शंका असल्यास त्यानी ते व्यक्त करू नये असे त्यांना मनापासून वाटत असते. तरीसुद्धा यांचा विरोध पत्करून 2 -4 शब्द लिहिल्यास त्याला नामोहरम करण्यात धन्यता मानणार्यांची संख्याही कमी नाही. त्यामुळे वाचक यानंतर काही लिहिण्याच्या प्रयत्नात असल्यास लिहिण्याअगोदर शंभर वेळा विचार करतील व शेवटी नको ती भानगड म्हणून सोडून देतील. कुठल्याही गोष्टीची चिकित्सा न करता सकारात्मकतेच्या नावाखाली उदो उदो करणारे लेखन वा प्रतिसाद असल्यास इतरांनाही बरे वाटेल व त्यातून सगऴीकडे आनंदच आनंद!
म्हणूनच संमोहन, स्वयं संमोहन, रेकी, कुंडलिनी, सहज योग, ग्रीन मेडिटेशन, TM, प्रचारात असलेले पर्यायी उपचार पद्धती, आधुनिक वैदूबुवांच्या जडीबुटी, फलजोतिष, नाडी जोतिष, ....दीपक चोप्रा, गोयंका, आसाराम बापू, रामदेव बाबा, बालाजी तांबे,..... इत्यादींची चलती आहे. व अशा गोष्टींना तात्विक मुलामा चढवणार्या उच्च शिक्षितांची संख्याही कमी नाही, हे मुद्दाम सांगावेसे वाटते. (टीव्ही चॅनेलवरील उबग आणणार्या त्यांच्या सत्संग-दर्शनातून कधी आपण मुक्त होऊ शकतो याचीच आमच्यासारखे वाट पाहत आहेत.)
सुज्ञास जास्त सांगणे न लगे!
तुमची ती चिकित्सा. आमचे ते पोस्टमार्टेम.
तुमची ती चिकित्सा. आमचे ते पोस्टमार्टेम. वकिली बाण्याचे. काय करणार. आम्ही पडलो (अंध)श्रद्धाळू. बाकी निदान माझे तरी विशेष उच्चशिक्षण वगैरे झालेले नाही. मी आपला साधा सर्वसामान्य शिक्षित सश्रद्ध आहे झालं.
असो. प्रतिसादाची (दोनेक वर्षांनी का होईना) दखल घेतल्याबद्दल कृतज्ञ आहे.
जाता जाता - विपश्यना या संदर्भात हा प्रतिसाद असल्याने बुवाबाजी, भोंदूगिरी यात आणण्याचे काही कारण नाही. विपश्यना याच्या विरोधातच आहे. आणि विपश्यनेचा कोणीही "बाबा" नाही. त्यामुळे आमचा बाबा आणि दुसर्याचा भोंदू असला प्रश्नही इथे येत नाही. असो. आपली या विषयावर सामोरे जाण्याची कुवत नसल्याचे आपणच जाहीर केल्याने अधिक वेळ दवडण्यात अर्थ नाही. धन्यवाद.
नानावटी म्हणतात, "उलटतपासणीला
नानावटी म्हणतात, "उलटतपासणीला सामोरे जाण्याइतकी माझ्यात कुवत नसल्यामुळे..."
कुवत नाही, हे मान्य करायचे झाले तर विवेकवादाचा, तर्कनिष्ठेचा लेखात असलेला समावेश हा आव ठरतो, आणि हा संपूर्ण लेख बाष्कळ बडबड ठरतो. दुर्दैवी आहे (येथे दैव या शब्दाचा योजन हा भाषेच्या माझ्या मर्यादेचा भाग आहे).
अशा स्वरूपात लेखन करून घाऊक आक्षेप नोंदवायचे आणि त्याविषयी प्रश्न केल्यानंतर कुवत नाही, असा पवित्रा घ्यायचा यामुळे अशा विषयांच्या चिकित्सेचेच महत्त्व संपून जाते. चिकित्सक असेच असतात, असे म्हणणे ज्याची चिकित्सा होते आहे त्याच्या अनुयायांना सोपेच जाते.
चिकित्सा करायची असेल तर त्यासाठी पूर्ण तयारीनेच उतरावे हे उत्तम. एरवी चिकित्सेचा अवकाश कमी करण्याचा दोष आपल्यावरच येत असतो. आरांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याला तर्कशुद्ध उत्तरे देता येत नसल्याने ती नानावटींच्या तर्काची मर्यादा मानायची की तर्कशास्त्राचीच मर्यादा मानायची, असे प्रश्न यातून निर्माण होतात. कोणत्याही एका प्रश्नाचे होकारार्थी उत्तर अशा स्वरूपाच्या चिकित्सेकडे दुर्लक्ष करण्याकडे नेते, आणि मग ज्यांची चलती होते त्याविषयी उबग येणे वगैरे वैयक्तिक ठेवणे उत्तम. त्याचे सार्वत्रिकीकरण न करणेच चांगले. अर्थात, अभिव्यक्त होण्यास हरकत नाही. अभिव्यक्त झाल्यानंतर होणाऱ्या टीकेलाही सामोरे गेले पाहिजे - उत्तर देऊन किंवा दुर्लक्ष करून, आपापल्या मगदुरानुसार.
+१०^१००००००००!!!!!!!*फ्याक्ट
+१०^१००००००००!!!!!!!*
*फ्याक्टोरियल किंवा उद्गारचिन्ह, आयदरमार्गी भाव तोच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
थोडी वेगळी बाजू
नानावटींचे लेखन बरेचे ब्रॉडकास्ट या स्वरुपाचे असते. म्हणजे असे कि माझे म्हणणे असे असे आहे पटत असेल तर घ्या अन्यथा सोडून द्या! नानावटींनी जरी असे म्हटले आहे कि उलट तपासणीला सामोरे जाण्याची माझी कुवत नाही तरी माझ्या मते हा एकीकडे विनयाचा भाग आहे व दुसरी कडे तो इच्छा नसल्याचा भाग आहे. नानावटींची कुवत नक्की आहे हे मी जाणतो पण प्रतिक्रियाकर्त्यांशी / वाचकांशी संवादी रहाण्याचा त्यांचा पिंड नाही. हा त्यांचा दोष आहे असे मी मानत नाही. तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे.
माझ्या मते हा मर्यादापेक्षा मतभिन्नतेचा भाग आहे.
हॅहॅ यावरुन अंनिसतला एक किस्सा आठवला. दाभोलकरांनी म्हटले होते जेव्हा पुरुष असे म्हणतो कि मी भीती ने अगदी गर्भगळीत झालो. तेव्हा तू पुरुष आहे तुला कसला आलाय गर्भ? असे आपण म्हणतो का? भाषेतले अनेक शब्दप्रयोगांचे शब्दशः अर्थ घ्यायचे नसतात. बाकी शब्द योजना करताना अंनिस वार्तापत्रात शुभेच्छा ऐवजी जाणीवपुर्वक सदिच्छा हा शब्द वापरला जातो. दिवाळी अंका ला दिवाळी अंक न म्हणता वार्षिक विशेषांक म्हटले जाते. असे नाही केले तर आपणच अंधश्रद्धा ठरु कि काय अशी भीती वाटते की काय कोण जाणे. बाकी चिकित्सेविषयीची आपली मते मान्य आहेत.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
नानावटी
नानावटींविषयी तुम्ही जे लिहिले आहे, त्याची मला त्यांच्यासमवेतच्या एकमेव भेटीतून कल्पना आली आहे. या माणसाविषयी पूर्ण आदर आहे. तरीही मी इथे असा प्रतिसाद का दिला?
हा लेख 'उपक्रमा'वर आला होता. तिथे त्यावेळीच आरांनी त्यांचा प्रतिसाद दिला. त्यानंतर नानावटींनी त्याला उत्तर दिले नाही. त्यानंतर आरांनी पुन्हा हा विषय काढला नव्हता. म्हणजे, विषय संपला होता.
हाच लेख नानावटींनी आता येथे पुन्हा टाकला. येथे हा लेख याआधी प्रकाशित झालेला नाही, या कारणास्तव तो टाकलेला आहे, असे मानण्यास अजिबात जागा नाही, कारण हे संस्थळ सुरू झाल्यानंतरच्या काही काळाने नानावटींचे येथे इतर लेखन आले आहे. त्या काळात ते हा लेख येथे पुनःप्रकाशित करू शकले असतेच. तसे झालेले नाही. त्याचा अर्थ या लेखाच्या पुनःप्रकाशनामागे असलेले टायमिंग बुद्ध्याच आहे. स्नेहांकिता यांचे ध्यानविषयक लेखन येथे येऊ लागले आणि नानावटींनी हा लेख आणला. हे सरळ दिसते आहे, त्यामुळे लेखन आणि त्याचे प्रकाशन म्हणजे निखळ ब्रॉडकास्टिंग आहे, असे मानता येत नाही. आणि खरे तर वैज्ञानिक विचारधारा रुजवणे ही नानावटींची मिशन आहेच, असे म्हणण्यास त्यांच्या एकंदर लेखन प्रवासावरून दिसू शकते.
स्नेहांकिता (किंवा इतर कोणाच्याही) लेखनानंतर नानावटींनी त्यांचा पूर्वप्रकाशित लेख पुनःप्रकाशित करू नये का? जरूर करावा. पण ती प्रक्रिया (लेख - प्रतिक्रियात्मक प्रकाशन - उत्तरांची जबाबदारी...) पूर्ण केली पाहिजे. ती ते करत नाहीत म्हणून मी त्यांची मर्यादा आहे का, असा प्रश्न केला आहे. नानावटींची कुवत आहे की नाही, त्यांची मर्यादा आहे का, या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत, आणि त्याचवेळी सार्वजनिक हिताच्या मुद्यांविषयीच्या लेखन-प्रकाशन व्यवहारात त्यांचा पिंड वाचकाशी संवाद ठेवण्याचा नाही, असे जेव्हा असते तेव्हा व्यक्तिमत्वाविषयी अधिक प्रश्न निर्माण होतात. सार्वजनिकांमध्ये आणि संवादी माध्यमात थेट मतांची अभिव्यक्ती करावयाची, त्याआधारे मूल्यात्मक भाष्ये करावयाची, आणि त्याविषयी जबाबदारी आली की ('विनया'ने) कुवत नाही म्हणणे, हा बौद्धीक उद्दामपणा ठरतो. ही गोष्ट नानावटींच्या वर्तणुकीत कुठेही नसते, पण त्यांच्या लेखनव्यवहारात होते आहे, असे म्हणायचे नसेल तर त्यांनी कुवत नाही वगैरेऐवजी उत्तरे दिली पाहिजेत किंवा मतभिन्नता मान्य केली पाहिजे. आणि मतभिन्नता असते तेव्हा 'सूज्ञांस अधिक सांगणे न लगे' वगैरे मूल्यात्मक भाष्ये आपल्यापुरती मर्यादित ठेवावीत हे अधिक लाभाचे नाही का?
नानावटींनीच याचा विचार केला पाहिजे, कारण ते ब्रॉडकास्टिंग करून का होईना चिकित्सा सुरू करतात (जी स्वागतार्ह आहे). आणि चिकित्सा ही अशी एकतर्फी असता कामा नये. (असत नसतेही). आपले व्यक्तिमत्व चिकित्सा करण्याचे नसेल, तर त्यात किमान सार्वजनिक हितसंबंधांचे विषय सार्वजनिक स्वरूपात संवादी माध्यमांमध्ये घेऊ नये. हे ब्रॉडकास्टिंग बंदिस्त गटांमध्ये ठेवावे.
(नानावटी ना... माहितीये. विचारजंत आहेत. भारतीय ते ते हिणकस दाखवणे हा छंद/कंड आहे त्यांचा... अशा स्वरूपात त्यांच्याविषयीची प्रतिमा होणे, आणि त्यातून त्यांचे लेखन जोखले जाणे हे त्यांच्यापुरते होत नसते. आता अशी प्रतिमा ज्यांच्या मनात असेल ती माणसे ध्यानाच्या कोणत्याही चिकित्सेकडे असेच पाहतील. हे नानावटींना कळत नाही, असे म्हणावे लागते आहे. यातून चिकित्सेच्या अवकाशाचा ते संकोच करताहेत. अंनिसचेही वर्तन असे झालेले आहे याआधी. अर्थात, विचारांचा एकारलेपणा एकदा का रुजला डोक्यात की मग स्वतःच्या पायावर धोंडे मारून घेत राहणे हे अटळ 'प्रारब्ध' असते.)
इथे दुर्दैवाने नानावटी या माणसाविषयी लिहावे लागते आहे, कारण त्यांचे लेखन हा संदर्भबिंदू आहे. पण विषय व्यापक आहे. चिकित्सा, तिचा अवकाश, त्याचा आपल्याच कृत्यातून होणारा संकोच असे मुद्दे त्यात आहेत. नानावटी ही व्यक्ती केवळ या लेखनामुळे संदर्भबिंदू ठरली आहे, इतकेच.
दैवविषयी मला तसे लिहावे लागले हाही अशा चिकित्सेच्या प्रांतात अनेकदा जे घडते त्याचाच पुरावा आहे. तर्ककर्कश्शपणे जे चालते, त्यावरची ती प्रतिक्रिया आहे.
एकूण, ज्ञान आणि शहाणपणा यात बहुतेकदा अंतर असतेच.
बहुतांशी सहमत
असहमत.या माध्यमाची ताकद संवादी आहे हे मान्यच. त्यामुळे लेखनव्यवहाराचे स्वरुपही तसेच असावे हेही मान्य. (म्हणजे ते विचारव्यासपीठाला साजेशे होते ) पण तसे ते नसल्यास ब्रॉडकास्टिंग स्वरुप बंदिस्त गटात रहावे हे अमान्य. सार्वजनिक भाषणांमधे बर्याचदा वक्त्याला प्रश्न विचारण्याची मुभा नसते तरी पण आपण ते ऐकतोच ना? ( बोअर झाल्यावर उठून जातात ती गोष्ट वेगळी
)
बाकी प्रतिक्रियेशी सहमत आहे.
नानावटींनी तिरशिंगरावांच्या प्रश्न या धाग्यात उत्तरे देउन संवादी रहाण्याचा प्रयत्न केला आहे. तिथे मतभिन्नता असू शकते. माझी काही अंशी आहेच पण टंकाळा आला आहे.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
बंदिस्त
ब्रॉडकास्टिंग बंदिस्त ठेवणे अमान्य आहे - ठीकच. त्यामुळेच मी तेथे निवडीचे सूचन केले आहे. त्यानंतर, "अभिव्यक्त झाल्यानंतर होणाऱ्या टीकेलाही सामोरे गेले पाहिजे - उत्तर देऊन किंवा दुर्लक्ष करून, आपापल्या मगदुरानुसार" हे मी आधीच्याच प्रतिसादात लिहिले आहे. तितके झाल्यानंतर, अभिव्यक्तीचा संकोच, चिकित्सेचा संकोच वगैरे होत असतोच. त्याचाही सामना करण्यास सज्ज रहावे. अशा व्यक्ती आदरणीयच राहतात.
प्रश्न/शंका
"...
कारण जरी ध्यानाची सुरुवात करणार्यांची संख्या भरपूर मोठी असली तरी मध्येच कुठेतरी सोडून जाणार्यांची संख्याही तितकीच मोठी असते. फारच कमी लोक शेवटपर्यंत टिकून राहतात. व ध्यानाचा सराव करतात."
"मध्येच" सोडून देण्याची सर्वसाधारणपणे कारणं काय असतात? आणि "शेवट" पर्यंतं टिकतात म्हणजे नक्की कुठपर्यंतं (आयुष्य संपेपर्यंतं?, अनेक वर्ष ...दहा वीस वर्ष वगैरे?)?
शंका
प्रभाकर नानावटीः कुठल्याही मार्गाने जा कुठलेही ठिकाण येईल त्याच ठिकाणी तुला जायचे होते असे कुणी म्हणू लागल्यास त्यात नक्कीच तार्किक विसंगती आहे असे म्हणता येईल.
आळश्यांचा राजाः एका ध्येयाकडे जाण्याचे अनेक मार्ग असू शकतात असे म्हणण्यात काय तार्किक विसंगती आहे? मुंबईहून दिल्लीला जायला अनेक मार्ग उपलब्ध आहेत.
ही दोन्ही वाक्ये एकमेकांशी संबंधित नाहीत असे वाटते. आळश्यांचा राजा यांनी दिलेल्या उदाहरणात मुंबईहून निघून दिल्लीला जायचे अशी प्रवासाच्या सुरुवातीचे व अखेरचे ही स्थानके निश्चित आहेत. मात्र अशी निश्चिती नानावटी यांनी कुठेही लिहिलेली नाही. ध्यानकर्त्यांचा दावा 'कुठूनही निघा आणि कुठेही पोहचा. जिथून निघालात ती मुंबई व पोचलात ती दिल्ली असेल.' असा आहे असे दिसते. याबाबत ध्यानकर्त्यांचे मत ऐकायला आवडेल.
लय भारी....
शेवटची दोन वाक्ये लय भारी.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ही दोन्ही वाक्ये एकमेकांशी
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.
पण नानावटींनी म्हटलेले वाक्य हे त्यांचेच वाक्य आहे. "कुठूनही निघा, कुठेही पोहोचाल..." हे असले म्हणणार्यांचे (असे कुणी असलेच तर - असे कोण म्हणतो ते त्यांनी सांगितलेले नाही. विपश्यनेत तरी असे काही सांगत नाहीत) दाखले देऊन सरसकट सगळ्याच ध्यान पद्धतींना झोडपून काढायचे ह्यात कसलीही वैज्ञानिक शिस्त दिसत नाही. एकाच ध्येयाकडे जाण्याचे अनेक मार्ग असू शकतात हे तर्कसंगत विधान मी अनेक ध्यान पुरस्कर्त्यांकडून ऐकलेले आहे, आणि मला ते पटते. नानवटी या तर्कसंगत विधानाचा उल्लेख करत नाहीत. कुणी कधी काही "कुठूनही निघा कुठेही पोहोचा..." थाटाचे तर्कविसंगत विधान केले असलेच, तर तेवढे धरुन त्यांनी विपश्यनेला झोडपलेले आहे. पुन्हा त्यांच्या या असल्या सिलेक्टिव्ह कोट्सवर आक्षेप घेतला की म्हणतात "आमचे 'बाबा' तसले नाहीत, दुसरे असतील" अशी भूमीका उच्चशिक्षित सश्रद्ध घेतात. मी तरी अशी भूमीका घेतलेली नाही. त्यांनी एक लेख लिहिला. त्यातल्या मला न पटणार्या बाबी मी सांगितल्या. त्यावर बोलणे दूर, दुसरेच काहीतरी (मनात एक ठरवून घेऊन) बोलायचे यात कसलाच वैज्ञानिक विचार दिसत नाही. केवळ हट्ट दिसतो, आपल्या मतांचा.
तर्कदुष्ट कसे?
तर्कदुष्ट कसे? मी स्वतः ताणतणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी ध्यानधारणा करण्याचा काही महिने प्रयत्न केला होता. त्यानंतर हायपरवेंटिलेशन आणि (ध्यानधारणा सुरु करण्यापूर्वी अत्यंत सहज होणारी श्वासोच्छवासाची क्रिया याबाबत) ओवरकॉन्शस होण्याचा त्रास झाला. शेवटी भीक नको पण कुत्रे आवर या न्यायाने ताणतणावाऐवजी या हायपरवेंटिलेशनसाठी बीटा ब्लॉकर वगैरे रासायनिक औषधांचा सहारा घ्यावा लागला. अर्थात मला ध्यानधारणा करायला सांगणाऱ्या तज्ज्ञांची यावर प्रतिक्रिया अशी की मी ते चुकीच्या पद्धतीने केले असेल. थोडक्यात चुकीच्या पद्धतीने केल्यास ध्यानधारणा अपायकारक ठरु शकते हे सांगितले तर त्यास तर्कदुष्ट मानावे काय?
रोचक मुद्दा आहे.
रोचक मुद्दा आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तर्कदुष्टता
असे कोण म्हणतो? नानावटींच्या विपश्यनेवरील लेखाला मी तर्कदुष्ट म्हटले आहे. विपश्यनेला त्यांनी अपकारक मार्ग म्हटले आहे/ तसे सुचवले आहे. ते तर्कदुष्ट कसे आहे हे मी सविस्तर लिहिले आहे. त्यांनी "चुकीच्या पद्धतीने केलेली विपश्यना अपकारक असते/ योग्य पद्धतीने केलेली नसते" असे म्हटलेले नाही.
बाकी तुमचा ध्यानधारणेचा अनुभव असेच सिद्ध करतो की ध्यानाने "काहीतरी" होते नक्की. नुसताच वेळ वाया जात नाही. मग ते "काहीतरी" तुमच्या बाबतीत वाईट झाले, तसेच आणखी कुणाच्या बाबतीत चांगले होऊ शकते असे मानणे तर्कदुष्ट ठरणार नाही. चुकीच्या पद्धतीने वजने उचलण्याचा व्यायाम केला तर शेवटी भीक नको पण कुत्रे आवर या न्यायाने तो व्यायाम बंद करणेच योग्य.
वकिलीबाणा
पुन्हा एकदा...!
तुम्ही सुधारण्याची शक्यता जवळपास शून्य आहे!
प्रतिसाद
थोडक्यात ध्यान हे जसे हितकारक आहे तसेच ते (तथाककथित अयोग्य प्रकाराने केल्यास) अपायकारकही आहे. शिवाय ही चुकीची पद्धत कोणती याचे documentation किंवा दाखले सहजगत्या सर्वसामान्यांना उपलब्ध होणारे नाहीत. त्यामुळे एखाद्याला critical position घेऊन ध्यानाचे तोटे दाखवावेसे वाटणे हे तर्कदुष्ट असल्यास ते ध्यानाचे केवळ फायदे अधोरेखित करण्याइतकेच तर्कदुष्ट आहे त्यापेक्षा अधिक नाही.
हे पटले नाही. एखाद्या गोष्टीमुळे अपाय झाला तर ते केवळ वेळेचेच नव्हे तर पैशाचे, श्रमाचे असे अनेक गोष्टींचे नुकसान - किंवा वाया जाणे - होते.
इथे एक फरक असा की चुकीच्या पद्धतीने वजने उचलणे हे बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव असते. प्राथमिक ज्ञान असलेले फिजिओथेरपिस्ट किंवा जिम इनस्ट्रक्टर लोक योग्य पद्धतीने कसे उचलायचे हे चोख सांगू शकतात. ध्यानाच्या बाबतीत सगळाच मामला सबजेक्टिव असा माझा अनुभव आहे. (इतरांचा अनुभव वेगळा असू शकतो.) ध्यानाबाबत योग्य पद्धत कोणती याबाबत अनेक ध्यानकर्ते पूर्णपणे वेगवेगळे सल्ले देऊ शकतात.
कोणतीही वैज्ञानिक शिस्त न
कोणतीही वैज्ञानिक शिस्त न पाळता केलेले लिखाण.
आधुनिक तंत्र वापरल्यास ध्यानात ५ ते १० मि. मध्ये शिरता येते. अधिक माहितीसाठी माझ्याशी संपर्क साधावा. तसेच
http://www.amazon.com/Train-Your-Mind-Change-Brain/dp/0345479890
हे पुस्तक वाचावे. तसेच प्रा. रिचर्ड डेव्हिडसन यांचे हे व्याख्यान पाहावे
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या