ध्यानम् सरणम् गच्छामी (पूर्वार्ध)
ध्यानधारणा ही कुणाच्याही गळी उतरवण्यास सुलभ गोष्ट आहे हे प्रथम मान्य करायला हवे. अनादी काळापासून ध्यानधारणा सर्वांच्या परिचयाची आहे. जगभरातील बहुतेक धर्मांनी ध्यानप्रकाराचा पुरस्कार केला आहे. धार्मिक मान्यतेमुळे हा एक चांगला संस्कार आहे असे वाटत आले आहे. अगदी 1-2 मिनिटापासून ते दिवसातील 16-18 तास वेळेची अपेक्षा करणारे विविध ध्यानप्रकार आहेत. परंतु अलिकडे ध्यानधारणेला बाजारी स्वरूप आल्यामुळे काही तरी भव्य दिव्य यातून निर्माण होते असे सुशिक्षिताना वाटत आहे. परंतु ध्यानधारणेमुळे खरोखरच काही ठाशीव फरक जाणवतो का? हा प्रश्न आता विचारावासा वाटतो. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी या प्रश्नाला अजून काही पदर आहेत, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. ध्यानधारणेच्या उपयुक्ततेबद्दलच्या विधानामध्ये काही तथ्य आहे का? याची वैज्ञानिकदृष्ट्या तपासणी करावी लागेल. तसेच ध्यानधारणेमध्ये वैज्ञानिक असे काही असू शकेल का? हाही प्रश्न विचारता येईल. वैद्यकीयदृष्ट्या त्याचे काही दुष्परिणाम होत असल्यास त्याची माहिती करून घ्यावी लागेल.
वैज्ञानिक संशोधन
गेली पन्नास वर्षे ध्यानधारणेवर वैज्ञानिक संशोधन केले जात आहे. ध्यानधारणेत अक्षरश: शेकडो प्रकार आहेत. त्यामुळे संशोधन पुढे सरकत नाही. जितक्या व्यक्ती तितके प्रकार असा काहिसा विचित्र अनुभव संशोधकांना येत आहे. तरीसुद्धा काही प्रमाणात संशोधन चालूच आहे. ढोबळ मानाने ध्यानधारणेचे दोन प्रकार करता येतात. एका प्रकारात मनात एखादी वस्तू - मूर्ती, मंत्र, शब्द वा असले काही तरी धरले जाते व त्याचेच स्मरण पुन्हा पुन्हा दिवसातून जमेल तेवढ्या वेळ केले जाते. यामुळे मनात इतर भावना वा विचार व बाहेर घडणार्या बारीक सारीक घटनांच्याकडे लक्ष न जाता एकाग्रता साधली जाऊ शकते. (या ध्यानधारणेत चित्त विचलित होऊ नये म्हणून डोळे बंद करणे अपेक्षित असते. ) दुसर्या प्रकारात असे एखाद्याच गोष्टीकडे मन केंद्रित न करता सर्व गोष्टींना मुक्त प्रवेश दिला जातो. मनपूर्ततेला महत्व देत मनात येणार्या अनुभवांना एकाग्रतेचे लक्ष मानले जाते. य़ा प्रकारची ध्यानधारणा करत असताना ध्यानोपासक एका ठिकाणी बसून डोळे उघडे ठेऊनच ध्यान करत असतो. तो आपल्या मनात उमटलेले विचार, डोळ्यासमोर दिसणारे दृष्य, ऐकू येणारे शब्द यात काहीही फरक करत नाही. त्यांना दूर सारत नाही. अशा प्रकारच्या ध्यानधारणेत अनुभवांचा प्रवाह अव्याहतपणे वाहत असतो. या अनुभवांचे वर्णन, विश्लेषण वा चिकित्सा करता येत नाही, अशी त्यांची ठाम समजूत असते.
पहिल्या ध्यान प्रकारात आपल्यासमोर असलेले जग पूर्णपणे नाहिसे झालेले आहे, या समजूतीला जास्त महत्व दिले जाते. परंतु दुसर्या प्रकारात आपल्यासमोर दिसणारे जग नाहिसे न होता अगदी नवे कोरे ताजे, यापूर्वी कधीच न पाहिलेले अशा स्वरूपात दिसते असा त्यांचा दावा आहे. बौद्ध धर्माशी संबंध जोडणारे झेन, विपश्यना यासारखे ध्यान प्रकार या दुसर्या प्रकारात मोडतात. गुरू परंपरेतील ध्यान पहिल्या प्रकारात मोडते.
या दोन्ही प्रकारात एखादा आगंतुक विचार मनात आला तरी त्याला मुद्दाम बाजूला न सारता किंवा त्याला दाबून न ठेवता नैसर्गिकरित्याच आपोआप मनातून निघून जावे अशी अपेक्षा केली जाते. काही वेळेपुरते का होईना मन स्थिर ठेवण्यासाठी थोडासा कालावधी त्यासाठी देणे हा उद्देश त्यामागे असतो. अनेक प्रकारचे विचार व भावना आपले लक्ष विचलित करण्यासाठी टपून बसलेले असतात. त्यात आपण गुंतत जातो, वाहवत जातो. केव्हा गुंतलो हेसुद्धा आपल्याला कळत नाही. त्यातून मनोविकाराची शक्यता असते. मनोविकारातून मनस्वास्थ्य बिघडते, बिघडलेले मनस्वास्थ्य शरीरस्वास्थ्य बिघडू पाहते. अशाप्रकारे हे चक्र चालू होते. परंतु त्या विचारांना व भावनांना मोकळीक देणे हा एक त्यावरचा उपाय असू शकतो. काही काळानंतर ते विचार व त्या भावना परत येणार नाहीत असे यात गृहित धरले जाते.
ध्यानधारणेत ध्यान करण्याचे कौशल्य हस्तगत करण्यावर नेहमीच भर दिला जात असतो. जसजशी ध्यानधारणेतील कुशलता वाढत जाते तसतसे आपल्याला 'अनुभव' येऊ लागतात. अतीव आनंद, देहाच्या हलकेपणाचा अनुभव, हवेत तरंगल्यासारखे वाटणे, आहे त्या परिस्थितीला जुळवून घेण्याची मानसिकता, त्रयस्थपणे जगाच्या घडामोडीकडे बघण्याची वृत्ती वगैरे प्रकारचे अनुभव विकसित होऊ लागतात, असे ध्यानधारणेच्या पुरस्कर्त्यांचे म्हणणे आहे. या अनुभवांचे वर्णन (म्हणजे नेमके काय कुणास ठाऊक!) शब्दात पकडता येत नाही असे त्यांचे म्हणणे असते. त्यातील नेमकेपणा प्रत्येक ध्यानपद्धतीप्रमाणे बदलत जातो. त्यातील अत्युच्च अनुभव म्हणजे समाधी (?) निर्वाणावस्था (?) वा साक्षात्कार (?) अशा गोष्टींचे उदात्तीकरण करत त्यांचे प्रलोभन सर्वासमोर ठेवले जाते. बहुतेक ध्यानपद्धतीत या सर्वांवर धार्मिकतेचा मुलामा चढवला जातो. धार्मिक मान्यतेमुळे ध्यानधारणेतील जास्त अनुभवी स्वत:ला इतरापासून वेगळे, श्रेष्ठ असे समज करून घेतात. काही ध्यानपद्धतीत मात्र अशा अनुभवांना विशेष महत्व दिले जात नाही. त्यांच्या मते हाही एक नैसर्गिक वाढीचाच प्रकार असून त्याबद्दल जास्त न बोलण्याची गरज नाही. बाजारीकरणामुळे ध्यानधारणेच्या अशा अनुभवांना प्रसिद्धी मिळत राहते. त्याची जाहिरात केली जाते. दुसरीकडे जपानच्या झेन पद्धतीसारख्या प्रकारात ध्यान म्हणजे केवळ (स्वस्थ) बसणे एवढ्या पुरतेच मर्यादित अर्थाने बघितले जाते.
यातच ध्यान प्रकारातील विसंगती दडली आहे. उद्देश स्पष्ट नाही, उद्देशाच्या मार्गाचा पत्ता नाही, एकवाक्यता नाही. ध्यानधारणेच्या पुरस्कर्त्यांना खोदून खोदून विचारल्यास अनुभवांच्या मार्गाने जातानाच प्रगती होत राहील, असे संदिग्ध काही तरी सांगितले जाते. ही संदिग्धता नकारात्मक असते. उद्देश साफल्यासाठी निश्चित असा एकच मार्ग असावा लागतो. उदाहरणार्थ, एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी हजारो मार्ग असू शकतील. परंतु सर्वात कमी अंतराचा मार्ग एकच असतो. कुठल्याही मार्गाने जा कुठलेही ठिकाण येईल त्याच ठिकाणी तुला जायचे होते असे कुणी म्हणू लागल्यास त्यात नक्कीच तार्किक विसंगती आहे असे म्हणता येईल. ध्यानधारणेत प्रयत्न करताना मार्ग बदलत गेल्यास यातला नेमका योग्य मार्ग कोणता व योग्य बदल कोणते याची पूर्व कल्पना असणे गरजेचे आहे. जाणीवेची एखादी उन्नतावस्था किंवा मोजमाप करण्यासारखे एखादे कौशल्य किंवा जगाकडे वेगळ्या प्रकाराने पाहू शकणारी अंतर्दृष्टी असले काहीही ध्यानधारणेतून निश्चित प्रयत्नानंतर साध्य होईलच असे ठामपणे सांगता येत नाही. सर्व काही बेभरवशाचा व्यवहार, संदिग्ध, धूसर!
ताण-तणाव
ध्यानधारणेमुळे मानसिक ताण-तणाव कमी होतो व असाधारण परिस्थितीचा सामना करण्याचे बळ प्राप्त होते असा पुरस्कर्त्यांचा दावा असतो. इतरांच्या तुलनेत ध्यानोपासक जास्त खंबीरपणे परिस्थिती हाताळू शकतात यावर त्यांचा विश्वास असतो. ध्यानधारणेसाठीच म्हणून पगारी रजा देण्याची आयएएस, आयपीएस दर्जाच्या अधिकार्यांच्या मागणीमुळे महाराष्ट्र शासनाने रजा देण्यास अनुमती दर्शविली. जबाबदार पदावर काम करत असताना ताण वाढू नये, मनस्वास्थ्य लाभावे, मनाचा समतोल बिघडू नये, योग्य निर्णय घेता यावे व त्यासाठी विपश्यना या ध्यानधारणा मार्गाचा अंगीकार करावा अशीही शासनाची सूचनावजा आज्ञा होती.
ध्यानधारणेमुळे मानसिक ताण तणाव कमी होतो याबाबतीत मात्र सर्व प्रकारच्या ध्यानांच्या पुरस्कर्त्यात एकमत आहे. हायपरटेन्शन, दमाविकार, दाढदुखी, व्यसनाधीनता, निद्रानाश, मधुमेह, इत्यादी विकारावर ध्यानधारणा एक उपचार पद्धती म्हणून सुचवली जाते. सुरुवातीच्या काही चाचण्यामध्ये ध्यानामुळे हृदयाचे ठोके, घाम, श्वासोच्छ्वास, रक्तदाब इत्यादी शारीरिक लक्षणावर परिणाम होऊ शकतो हे आढळले. परंतु या प्रयोगात काही त्रुटी होत्या. यात प्रामुख्याने ध्यानाच्या अगोदर व ध्यानानंतर या लक्षणांची मोजणी केली होती. विज्ञान प्रयोगात अगदी महत्वाची मानलेली नियंत्रित प्रयोगाची पद्धत वापरली नव्हती. नियंत्रित प्रयोग करताना ध्यान करणारे व ध्यान न करणारे अशा दोन्ही गटांना विश्रांती घेण्यास सांगितले. त्यानंतर ताण तणावाच्या लक्षणांचे मोजमाप करण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही गटांच्या लक्षणात काही फरक दिसून आला नाही. यावरून थोडीशी विश्रांती घेतल्यास ध्यानाची गरज भासणार नाही असे निष्कर्ष काढण्यात आले. व्यसनाधीनता वा दम्यासारख्या रोगांसाठी दिवसातून काही वेळा विश्रांती घ्या असा सल्ला दिल्यास कुणी ऐकून घेतील का?
या वैज्ञानिक प्रयोगाचे निष्कर्ष स्वीकारणे ध्यानोपासकांना जड वाटू लागले. परंतु आणखी काही प्रयोग केल्यानंतरसुद्धा पहिल्यांदा काढलेल्या निष्कर्षांनाच पुष्टी मिळाली. तरीसुद्धा ध्यान जरी ताण तणाव कमी करत नसले तरी ध्यान असाधारण परिस्थितीचा सामना करण्यासाठी शक्ती देते असा दावा ध्यानोपासक करू लागले. याबद्दलच्या तपासणीसाठी काही प्रयोग सुचवण्यात आले. एका प्रयोगात ध्यानधारकांना व ध्यान न करणार्यांना एक चित्तथरारक चित्रपट दाखवण्यात आला. चित्रपट पाहून झाल्यानंतर त्यांच्या मनस्थितीचा अंदाज घेणारे काही प्रश्न विचारण्यात आले. त्यांच्या बुद्ध्यांकाची चाचणी घेण्यात आली. त्यानी दिलेल्या उत्तरावरून काही निष्कर्ष काढण्यात आले. चित्रपट बघत असताना ध्यानधारकांची प्रतिक्रिया ध्यान न करणार्यांच्या तुलनेने सौम्य होती. परंतु प्रत्यक्ष चित्रपट बघण्यापूर्वी ध्यानधारकांची प्रतिक्रिया तीव्र होती हे मात्र संशोधकांना बुचकळ्यात टाकणारे वाटले. ध्यानधारकांची अस्वस्थता कमी होती हे जरी खरे मानले तरी त्यांच्या अजिबात अपेक्षा नव्हत्या असे म्हणणे रास्त वाटणार नाही.
दुसर्या एका प्रयोगात तीन गट निवडण्यात आले. एक गट नित्या नियमाने ध्यान करणार्यांचा होता. दुसरा गट चार महिने स्नायूंच्या शिथिलतेसंबंधी व्यायाम करणार्यांचा होता. व तिसरा गट मात्र या दोन्ही प्रकारात न बसणार्यांचा होता. या तिन्ही गटांना प्रयोगाच्या वेळी कानठळ्या बसवणारा मोठा आवाज ऐकवण्यात आला. आवाज ऐकवण्यापूर्वी, आवाजाच्या वेळी व आवाजानंतर गटातील सर्वांच्या हृदयाचे ठोके मोजण्यात आले. ध्यानधारकांच्या गटातील ध्यानस्थांच्या हृदयाचे ठोके आवाज ऐकण्यापूर्वी व आवाज ऐकून झाल्यानंतर जास्त जोरात होते. परंतु प्रत्यक्ष आवाज होताना मात्र इतरांपेक्षा अगदी कमी प्रमाणात पडत होते. यावरून ध्यानधारकामध्ये ताण तणावाच्या प्रसंगात अस्वस्थता व चिंतेची भावना कमी आहे असे वाटत असले तरी ताण तणावामुळे उद्भवलेल्या शारीरिक लक्षणामध्ये काही फरक पडत नाही हेच दिसून येते. ध्यान धारणा ताण तणावापासून आपल्याला मुक्त करू शकत नाही हेच यावरून सिद्ध होते.
बौद्ध ध्यानपद्धतीचा हिरीरीने पुरस्कार करणारे वर उल्लेख केलेले निष्कर्ष वाचून आपलेच तत्वज्ञान बरोबर असल्याचे जाणून कदाचित सुखावत असतील. कारण त्यांच्या ध्यानपद्धतीत जग जसे आहे तसे स्वीकारणे अपेक्षित असते. ध्यान केल्यामुळे काही तरी मिळू शकते याची अपेक्षा करणे निरर्थक असते असा त्यांचा सिद्धांत आहे. जग आहे तसे स्वीकारल्यामुळे मानसिक गोंधळ नाही, कुठलाही भ्रम नाही, असे बौद्ध ध्यानोपासकांना वाटते. दु:खाचे मूळ शोधण्यास ध्यानाचा हातभार लागतो असेही त्यांना वाटते. परंतु जग आहे तसे स्वीकारणे म्हणजे नेमके काय हे स्पष्ट होत नाही. मानसशास्त्रज्ञांच्या मते माणसांचा मेंदू ज्ञानेंद्रियांच्या इनपुट्सवरून जगाचे प्रतिरूप (मॉडेल) तयार करतो. हे प्रतीरूप त्यांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करणार्या असतात. म्हणजेच त्यातील बहुतेक गोष्टी सकारात्मक असतात. त्यांच्या आवाक्याबाहेरची कुठलीही गोष्ट त्या प्रतिरूपात नसते. ते एक त्यांचे स्वतंत्र जग असते. परंतु याचा अर्थ बाहेर असलेल्या वास्तव परिस्थितीतील खर्या जगाचे ते प्रतीरूप असते असे म्हणता येणार नाही. या प्रतीरूपाचा पाया इंद्रियगम्य माहितीवर आधारित असल्यामुळे इंद्रियांना - त्यांच्या न कळत - त्यांना न जाणवलेल्या माहितींची त्यात सरमिसळ होऊ शकते. म्हणजेच त्या व्यक्तीला समजलेले जग व वास्तवात असलेले जग यामध्ये नक्कीच तफावत असते.
यासंबंधी एक प्रयोग करताना रोज 15-16 तास नियमितपणे ध्यान करणारे व फक्त 2 तास ध्यान करणारे असे दोन गट निवडण्यात आले. त्यांना लांबून 2 ते 4 वेळा प्रखर दिव्याची ज्योत दाखवण्यात आली. काही वेळा दिव्याची उघड झाप करण्यात येत होती. परंतु या दोन्ही गटात प्रकाशाच्या आकलनाविषयी विसंगती आढळली. म्हणजेच इंद्रियाद्वारे मिळालेली सर्व माहिती अचूक असेलच याची खात्री देता येणार नाही.
(पूर्व प्रसिद्धी: संपादित लेख, उपक्रम दिवाळी २०१०)
प्रतिक्रिया
एकीकडे स्नेहाकिंता तैंचा लेख
एकीकडे स्नेहाकिंता तैंचा लेख आणि दुसरीकडे हा... असे दोन्ही लेख वाचुन डोक्यात तयार होणारा गुंता सोडवायला ध्यान लावावे काय?
बाकी लेख आवडला हे वे सां न
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पेस्टवतोय....
त्रागा धाग्यावरून इकडे पेस्टवतोय.
)
उर्वरित त्रागा भाग ५ : अध्यात्म, मनः शांती आणि ब्रँडिंग....
इशारा :- धार्मिक म्हणवून घेणार्यांपैकी काहिंच्या भावना दुखावू शकतात. खालील ओळींतील भावार्थ लक्षात घ्यावा. जमल्यास शांतपणे एकदा वाचून पाहिलेत तर आभारी राहिन.
.
हल्ली अध्यात्म, "योगा" ह्याला ग्लॅमर आलेलं आहे. काही आध्यात्मिक व अधार्मिक किंवा निधर्मी संघटनांबद्दल आमचे हे मत आहे. "आम्ही धार्मिक नाही पण आध्यत्मिक आहोत" असेही म्हणणारी बरीच मंडळी आहेत. अनेकानेक ब्रँडचे ते ग्राहक आहेत. ह्यातले सर्वात जोरात चालणारे माझ्या माहितीतले पुण्यात मला दिसलेले ब्रँड सांगतो:-
१.श्री श्री १००८ रविशंकर --Art of Living
२.इगतपुरीचे विपश्यनावाले गोयंकाजी
३.सद्गुरु परिवाराचे आपले सद्गुरु वामनराव पै.
४.स्व पांडुरंगशास्त्री आठवल्यांचा स्वाध्याय परिवार
५.एका नामांकित वर्तमानपत्रात आयुर्वेदाच्या नावाने धुमाकूळ घालणारे एक महाराज आता अध्यात्मावर अन् गीतेवर भाषणे,चेहर्यावर अष्टसात्विक भाव आणून व्याख्याने,कथने व वैचारिक नर्तने करताना दिसतात.
.
ह्यापैकी क्र.१ वाल्याकडे जाउन आलेली माणसे उगीच "हमारे गुरुदेव्,जय गुरुदेव" म्हणत झीट येइस्तोवर त्यांच्या पंथात सामील व्हायचा आग्रह करत आर्जवी स्वरात पैसे मागत सुटतात(शिबिरात ये म्हणून).बरे, एकदा काहीतरी रौप्यमहोत्सवी वर्ष का काहितरी म्हणून शिबीर फुकट होते म्हणून तिकडे गेलो तर डोक्याल इतका शॉट्ट बसला की फुकटातलेही पूर्ण करवले नाही. बुद्धीवाद्यांचे, स्वातंत्रयाव्दी तर्ककर्कश विचारवंतांपेक्षाही त्यांचे बकणे अधिक वैतागवाणे होते.
.
क्रमांक दोनवाले पैसे मागत नाहित. पण गेल्यावर मानगुटीला धरुन १० दिवस १००% टक्के मौन करायला लावतात.हे झेपणेबल न वाटल्याने गेलो नाही.(तिथल्या सूतकी कळा घेउन वावरणार्यांशी बोलायचं नाही हे ठिक आहे हो, पण एखादा फोनही कधीमधी कुणाला करायचा नाही, गरज पडल्यास पानटपरीवरही अजिब्बात जायचं नाही, हे आमच्यासरख्या उतवळ्या माणसाला भयंकर क्रूर,अमानवी वगैरे वाटले.) जायला बिचकलो. शिवाय सलग दहा दिवस सुट्टी जॉबला लागल्यापासून आजतागायत कधीच घेतली नाही.(बॉसला कुठल्या तोंडाने सुट्टी मागायची? मग आम्हास दाखवल्या जाणार्या ऑनसाइटच्या गाजराचे काय होइल??)
.
क्रमांक तीनवाल्यांचे भक्त त्यांच्यकडे हरिपाठ वगैरे ठेउन जेवायला बोलावतात म्हणून जाम आवडतात.बाकी कर्मकांड वगैरे ह्यांच्यात फार आहे असे वाटले नाही, पण सतत उपदेशा देण्याच्या पवित्र्यात उभ्या असलेल्या मंडळींकडे जाणे म्हणजे डोक्यावर आधीच विरळ झालेले केस स्वतःच्या हाताने संपवून घेणे, म्हणून त्यांच्या नादी लागलो नाही.
(प्रामाणिक् रहा, मेहनत् करा, स्त्रीचा आदर करा, क्रोध व व्यसनाच्या आहारी जाउ नका,लोकांशी चांगले वागा ह्या आणि अशा (खरंतर कॉमनसेन्सच्या) गोष्टी ह्यांचे सद्गुरु सांगतात. पण ह्या "जगावेगळ्या शहाणपणाच्या", अद्भुत, असामान्य व "जीवनाचे सार" ह्या गोष्टी मीही सांगायला तयार् आहे हो. पण मला ह्यांच्यासारखे कुणी पैसे का देत नाही ह्या विचाराने नेहमीच उदास् होतो
.
क्रमांक चार वाल्यांनी समाजोपयोगी बरीच कामे केल्याचे ऐकले आहे.(तळी खोदणे, श्रमदान वगैरे) पेप्रात त्यांच्या स्वाध्याय परिवाराच्या इस्टेटीवरुन काही वाद झाल्याचे वाचल्याचेही आठवते आहे. पण अजून त्यांचे कुणी (सुदैवाने?)बोलवायला आले नाही.
.
क्रमांक पाच हे पेप्रातूनच इतके भंडावून सोडतात की त्यांच्याकडच्या थंड हवेच्या ठिकाणी जायची हिम्मत होत नाही.(कधी हिम्मत झालीच तरी त्यांच्या पंचतारांकित सुविधा परवडणार नाहित हेही खरेच.)
तेच ते. गीतेचे सार्. गीता, आध्यात्म ह्यावर ते आयुर्वेदाकडून् अचानकच् आलेत. त्यांचा प्रचंड उदोउदो वर्तमानपत्रातून काळजीपूर्वक् होतोय्."जीवन ह्यांना कळले हो" नावाने त्यांचा कुठलासा मुलाखतीचा का कसलातरी कार्यक्रम् होता.
आता काही दिवसात ते योगाचीही (आतडी) फाडून ठेवणार असा डौट येतो. (म्हणजे, योगाचे अंतरंग् उघडे करणार, योगाच्या पोटात शिरून आपणास ज्ञान वगैरे देणार असे म्हणायचे आहे.)
.
तुम्ही सुशिक्षित म्हणवणारी माणसे प्रामुख्याने "मनाला उभारी यावी", "आत्मबळ मिळते" वगैरे कल्पना घेउन नवनवीन ठिकाणी जाता.(आर्ट् ऑफ लिव्हिंग गँगवाले).जरा साय-फाय्, तात्विक् व आध्यात्मिक पॉलिशचे आवरण असलेली ठिकाणे पसंत करता. सुशिक्षित व् त्यातही मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्ग ह्यात् अधिक. विशेषतः शहरी.
हे ज्यांच्याकडे जातात त्या गुरुंकडे ह्यांच्याकडे अफाट शाब्दिक ताकत असते. समोरच्याला अजिबात् कळणार् नाही असे बोलण्याची एक अद्भुत सिद्धी ह्यांच्याकडे असते. "चित्तमात्रेतून समष्टी निर्माण होते. नासिकाग्रे ध्यान् करत त्राटक केल्याने मनोर्जा जागृतीने अष्टचक्रे फिरु लागतात" असे काहिसे हे बोलू लागले, की मराठीच बोलताहेत् असा भास होतो, पण् तासंतास ऐकूनही अजिब्बात समजत् नाही.
.
मरणोत्तर काही मागत सुटणारे काही अल्पसंख्यही आहेत;ते वेगळे . ते "अलौकिक् दर्शन" वगैरे घेउन् कृतकृत्य होतात. कुणी बापूंच्या अन् त्यांच्या पत्नी व् भावाच्या दर्शनाने होतो, कुणी अम्मा भगवानच्या अनुग्रहाने फलित होतो. आमच्यकडे काही लोक् आधीच अशा प्रकारे सातही जन्माची पापे धुवून् बसली आहेत. पुन्हा करणयसही तयार् आहेत्,आध्यात्मिक धोबी ती त्यांना धुवून देतीलच.एकाने तर निव्वळ दर्शनाने स्वतःची कुंडली व पर्यायाने नियती आख्खीच बदलून् मिळू शकते व तसे बदलायची त्यांच्या केंद्रात एक्स्चेंज ऑफर अजूनही सुरु असल्याचे सांगितले आहे.
.
जबरदस्त पैसा असल्यावर्/मिळाल्यावर मनुष्य् असा धास्तावल्यासारखा का करतो व कशाच्याही कच्छपी का लागतो ते न कळे.
.
तुम्ही वेगवेगळ्या लोकांच्याकडे गेल्यावर आम्ही तुम्हाला फारसे समजावू शकत नाही. "आम्हाला अनुभव आलाय्." हेच एक स्टिरिओअटाइप् सतत ऐकावे लागते.प्रामाणीक पणे मी वेगवेगळ्या मंडळींना भेटूनही मलाच कसा कधी कुठला "अनुभव" आला नाही हे कळत नाही. अजूनही जाण्यास तयार आहे. पण कुणी असे खरोखरीचे पावरफुल सापडतच नाहित. ते नेहमीच "कोणे एके काळी होउन गेले" , "आमच्या ह्याच्या त्याला भेटले" असेच किस्से असतात. भाविकांच्या गराड्यात राहणे म्हणजे म्हटले तर गंमम्तीशीर म्हटले तर् गोंधळवणारा व् म्हटले तर वैतागवाडी/क्रूर अनुभव असतो. ढोंगी,बिनडोक,प्रामाणिक,लबाड,समजूतदार ह्या सर्वच प्रकारचे श्रद्धावंत भेटलेत. पण बुद्धीवाद्यांत इतकी व्हरायटी नाही. बुद्धीवंत म्हणवून घेणारे बव्हंशी एकसुरी असतात. ते बहुतांशी प्रामाणिक असतात; पण समजूतदार तर फारच क्वचित असतात.
.
असो. खूप काही मनातून स्क्रीनवर सांडते आहे. आवरते घेतो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
द एज ऑफ ग्रिफ
कंटाळा, नैराश्य आणि ताण ही आधुनिक जीवनशैलीची देणगी आहे, पण त्यात बदल करण्याऐवजी हे ध्यानादि 'स्ट्रेस मॅनेजमेंट' प्रकारांचं खूळ काढलेलं आहे असं मलाही वाटतं.
गूगलसारख्या कंपन्या कामाच्या ठिकाणी खूप कायकाय गमतीदार करतात, बर्याच कंपन्यांमध्ये 'वर्क-लाइफ बॅलन्स वीक' साजरा केला जातो आणि मग वर्षाच्या शेवटी 'बॉटमलाईन' मनासारखी नसेल तर सगळ्या कर्मचार्यांची ठासली जाते.
आजकाल पारंपारिक प्रकारांबरोबरच चेअर योगा वगैरे प्रकारही लोकप्रिय होत आहेत. होवोत बापडे.
ध्यानात तर काय, मनातले विचार अलिप्तपणे बघायचे. यात पारंगत झालं म्हणजे मला आत्ता खुर्चीवरून उठून बाहेर समुद्रकिनारी फिरायला जावं वाटतंय तर त्या विचाराकडे अलिप्तपणे बघता आलं पाहिजे म्हणजे कार्यक्षमता वाढेल, म्हणजे जास्त पैसे मिळतील, म्हणजे मला न लागणार्या जास्त वस्तू मी घेऊन येऊ शकेन!
+१
+१
ह्यांना पोसते कोण?
१६ तास ध्यान करणार्यांना पोसते कोण? इतके पैसे जास्त असतील तर आम्हाला ही पोसा.
थोथांड आहे ध्यान वगैरे.
अवांतर प्रतिसाद
दुसर्या धाग्यात म्यूरिएल स्पार्कच्या कथेची शिफारस झाली म्हणून तिच्या 'समग्र कथां'चं पुस्तक आणलं, त्यात एक छोटीशीच गोष्ट आहे. "The girl I left behind me."
एक स्त्री संध्याकाळी नेहेमीप्रमाणे ऑफिसातून निघते. बसस्टॉपवर येते. ऑफिसातच काहीतरी विसरलंय असं तिला वाटत रहातं. बस येते, ती नेहेमीप्रमाणे भरलेलीच असते. तिचा पाय एका पुरुषाच्या पायावर पडतो. ती माफी मागते, पण तो पुरुष लक्ष देत नाही. एका हातात तिकीटापुरती सुटी नाणी धरून उभी असते पण कंडक्टर तिकीटासाठी विचारत नाही. डोक्यात सतत भुंगा, ऑफिसात काहीतरी राहिलंय.
पुढचं फार लिहीत नाही. ती कथा मुळातूनच वाचण्यासारखी आहे.
काही (बहुसंख्य) लोकांवर हिप्नॉटीझम होऊच शकत नाही असं सिद्ध करणारा एक कार्यक्रम काही काळापूर्वी सायन्स चॅनलवर पाहिला होआ.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लेख आवडला.
लेख आवडला.
लेख
अशा प्रकारच्या लेखाची अत्यंत आवश्यकता होती. 'आम्हाला अनुभव आलाय' या वाक्याचा आपण प्रतिवाद करु शकत नाही ,इतपत धूर्तपणा या भाविकांच्या ठायी असतो.
लेख संग्रही ठवला आहे.