Skip to main content

गद्य सूर्य प्रार्थना

1 minute
अन्यत्र पूर्वप्रकाशित


जयाच्या रथा एकची चक्र पाहीं।
नसे भूमी आकाश आधार काहीं।
असे सारथी पांगुळा ज्या रथासी।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी।।1।।

.
हे प्रभाकरा मी सूर्यफूल नाही जे की पराकोटीच्या भक्तीने आपले गोजीरवाणे मुख तुझ्याकडे करून तुझे दर्शन घेते.
.
हे कमलिनीनाथा मी कोमल कमलिनीदेखील नाही जी की तू उगवताक्षणी पाकळ्यारूपी बाहू फैलावून सस्मितवदनाने तुझे स्वागत करते.
.
हे हिरण्यगर्भा मी इवलीशी पणती नाही जी तुझ्याकडुनच तेजाचा अंश घेऊन जगाला तेजाचा संदेश देते.
.
हे दिनकरा किंवा मी कोणी ऋषीमुनीदेखील नाही की तुला मी अर्घ्य देऊ शकेन.
.
हे तेजोनिधये फार काय माझे आणि तुझे विपरीत भक्तीचे नातेसुद्धा नाही जे तुझे अंधःकाराबरोबर आहे. ज्याचे अस्तित्व केवळ तुझ्या आगमनाने मिटून, विरून जाते.
.
मी तर केवळ एक क्षुद्र मानव आहे.
.
पण मला एवढे माहीत आहे की मी रोज पहाटेतुझ्या आगमनाची अत्यंत आतुरतेने वाट पहाते.
क्षितीजावरील केशरी , लसलसते,कोवळे सूर्यबिंब माझ्या मनात अनामिक उल्हासाची लहर जागवते.
सर्वांगसुंदरा, तुझ्या तेजस्वी दर्शनाने माझ्या कणाकणात चैतन्याचा तेजोमय वर्षाव होतो.
हे भास्करा, तुझ्यामुळे माझ्या रोमरोमात निरामय उत्साह सळसळतो.
मी रोज नव्याने, तितक्याच नवलाईने तुझी वाट पहाते.
असे म्हणतात की तुझ्यापासून काही लपत नाही. तू सर्व सत्कर्मांचा अधिष्ठाता आहेस, तू सर्वसाक्षी आहेस.
हे सकलेश्वरा, भास्करा माझे मन जाणून घे, माझा प्रणाम स्वीकार कर.

Node read time
1 minute

ऋषिकेश Fri, 13/03/2015 - 10:01

तुम्ही खरंतर मराठी मालिकांची लेखिका व्हायला हवं!

हल्लीच्या मराठी मालिकांतील नायिका अशी स्तोत्र डोळे वगैरे मिटून एकाग्रवैग्रे असल्यासारखे म्हणताहेत (देव्हार्‍यातून मंद प्रकाश येत असतो की नाही पण छ! यांच्या घरात सर्वत्र फ्लड्स आहेत. वेळ कोणतीही असो एकाच अँगलने उगवणारा तोच तो सूर्य अनेकदा दाखवून सकाळ झाल्याचे सांगत दिवस बदलतो. प्रकाश तोच नी तितकाच! असो.) तर ती नायिका वरील स्तोत्र वैग्रे म्हणतेय (ते ही ओलेती नाही पण केस धुतल्याने किंचित कुरळे-दमट झाले असले तर शृंगार बोनस!) नी त्यांच्या मागे अतिशय भक्ती नी कवतिक ओथंबून खाली ठिबकु लागलेले भाव घेऊन तिच्या डायबेटिसला लाज वाटाअवी इतक्या अतिगोग्गोड सासवा/नवरे/बालगोपाळ वगैरे स्नेहार्द्र (कित्ती दिवसा वापरायचा होता हा शब्द) वगैरे नजरांनी तिच्या कडे बघताहेत असे दृश्य डोळ्यापूढे चमकले.

सुशेगाद Sat, 14/03/2015 - 21:50

हे सगळ वाचल्यावर आठवल कि बर्याच दिवसात सूर्यच दर्शन नाही घेतल आहे. आम्ही उठेपर्यंत सुर्य डोक्यावर आलेले असतात तेव्हा प्रसन्न नाही वाटत.
थान्क्स फॉर इन्स्पायरिंग मी टू वेक अप लिल अर्ली!

नगरीनिरंजन Sat, 14/03/2015 - 22:02

या प्रार्थना नवीन ज्ञानाबरोबर कधी बदलणार? सूर्याचे आगमन होत नसून पृथ्वी फिरल्याने आपण त्याच्या समोर येतो हे माहित असताना प्रार्थनेत तसा बदल आपण का करत नाही?

adam Sat, 14/03/2015 - 22:47

In reply to by नगरीनिरंजन

प्रार्थना ह्या प्रेरणांमधून , इंस्टिक्टमधून व खोलवर रुजलेल्या संकल्पना - संस्कार ( आणि बर्‍याचदा विशफुल थिंकिंगमधूनही ) बनत असाव्यात.
प्रार्थना तर्क व ज्ञान ह्यातून कशाला बनतील ?
पुरेसा तर्क व ज्ञान असणार्‍याची वृत्ती प्रार्थना करत अथवा बनवत बसण्याची असण्याची शक्यता बर्रीच कमी आहे.

ऋषिकेश Mon, 16/03/2015 - 09:38

In reply to by नगरीनिरंजन

+१ कृतज्ञता म्हणा व/वा प्रसन्नता म्हणा.
ललित लिहिताना चेतनागुणोक्ती अलंकार वापरला तरी माहित असलेल्या माहितीकडे दुर्लक्ष करून भाबडेच व्हावे हा अट्टहास नको.

चांगले ललित लिहिताना, इच्छा असल्यास तथ्यात्मक लेखन सुद्धा कमालीच्या काव्यात्म ढंगात लिहिता यावे असे वाटते

धनंजय Tue, 17/03/2015 - 03:27

In reply to by ऋषिकेश

जसे चक्र धावे भुईचे फिरूनी
तसा भेटितो मित्र पूर्वेकडूनी
त्वरा दर्शनाने करे चेतनेला
नमस्कार त्या सूर्यनारायणाला

ऋषिकेश Tue, 17/03/2015 - 09:27

In reply to by धनंजय

__/\__

हा श्लोक आता लेकीला शिकवणार आहे! :)

झालाच 'वायरल' तर कालांतराने रामदासांचा समजला जाईल नी याचा वापर होऊन त्यावेळीही भारतीय समाजाला कसे सत्य माहित होते हे ही सिद्ध करण्याचा प्रयत्न होईल नी मग अजून १०० वर्षांनी कोणीतरी तत्कालीन कोल्हटकर ऐसीचे उत्खनन करून हा श्लोक धनंजय नावक एका कवीने रचलाय असे सिद्ध करतील असे चित्र डोळ्यासमोर तरळले :P

वृन्दा Sun, 15/03/2015 - 16:36

In reply to by नगरीनिरंजन

सूर्याचे आगमन होत नसून पृथ्वी फिरल्याने आपण त्याच्या समोर येतो हे माहित असताना प्रार्थनेत तसा बदल आपण का करत नाही?

कारण त्यात काव्य नसते.

सुशेगाद Sun, 15/03/2015 - 00:16

हे बार्लेश्वरा मी कोणी आयरिश माणूस नाही की तुला बॉटम्सअप करू शकेन.
.
हे नशोनिधये फार काय माझे आणि तुझे विपरीत बुद्धीचे नातेसुद्धा नाही जे तुझे सोड्याबरोबर आहे. ज्याचे अस्तित्व केवळ तुझ्या आगमनाने मिटून, विरून जाते.
.
मी तर केवळ एक क्षुद्र मानव आहे.
.
पण मला एवढे माहीत आहे की मी रोज संध्याकाळी तुझ्या आगमनाची अत्यंत आतुरतेने वाट पाहतो.
बाटलीवरील लसलसते,कोवळे लेबल माझ्या मनात अनामिक उल्हासाची लहर जागवते.
सर्वांग सोमसुंदरा, तुझ्या तेजस्वी दर्शनाने माझ्या घश्यामध्ये चैतन्याचा दारूमय वर्षाव होतो.
हे ओल्ड मोन्का , तुझ्यामुळे माझ्या रोमरोमात निरामय उत्साह सळसळतो.
मी रोज नव्याने, तितक्याच हंगओवरमध्ये तुझी वाट पहातो.
असे म्हणतात की तुझ्यापासून काही लपत नाही. तू सर्व बेवड्यांचा अधिष्ठाता आहेस, तू सर्वसाक्षी आहेस.
हे रोमानावा , किंगफिशरा , रॉयल चलेन्जा माझे मन जाणून घे, माझा प्रणाम स्वीकार कर.

नितिन थत्ते Tue, 17/03/2015 - 12:25

चुकून मद्य सूर्य प्रार्थना असे वाचले.

-------
नवीन ज्ञान मिळून सूर्य उगवत नाही वगैरेबरोबर इतर माहितीसुद्धा (निर्जीव, वायूचा गोळा, पृथ्चीवर जीवन असण्यात सूर्याचा 'कॉन्शस' रोल नाही वगैरे) कळली असल्याने सूर्याची (नवी किंवा जुनी) प्रार्थना हवीच कशाला असा प्रश्न येतो.

adam Tue, 17/03/2015 - 12:34

In reply to by नितिन थत्ते

नवीन ज्ञान मिळून सूर्य उगवत नाही वगैरेबरोबर इतर माहितीसुद्धा (निर्जीव, वायूचा गोळा, पृथ्चीवर जीवन असण्यात सूर्याचा 'कॉन्शस' रोल नाही वगैरे) कळली असल्याने सूर्याची (नवी किंवा जुनी) प्रार्थना हवीच कशाला असा प्रश्न येतो.
+१
किंवा कोणतेही काव्य वगैरे किंवा भावनेशी संबंधित काहीही हवेच कशाला.
.
.
'ध्यानी मनी तुझाच चेहरा' असे म्हणू नये. ध्यान आणि मन ह्या बाबी पुरेशा स्पष्ट नाहित.
भावना फार्फार तर अ‍ॅड्रिनेलिन, टेस्टेस्टरोन , इस्ट्रोजन वगैरे वगैरे संप्रेरकांची/हार्मोन्सची नावे वापरुनच सांगाव्यात.
म्हणजे 'पहिल्यांदा हात हातात घेण्याचा काय थरार होता. अमुक इतके ग्राम अ‍ॅड्रेनॅलिन वाहिले असेल.'
किंवा ' कसला हॅण्डसम आहे तो !' म्हण्ण्याऐवजी ' टेस्टेस्टारोनची पातळी काय पर्फेक्ट असेल ना त्याच्यात !' हे असं म्हणावं.
'तिला दिवस गेले' म्हणूच नये. 'तिच्यातल्या बिजांडाचं अमक्याच्या शुक्राणूशी फलन झालं ' असलं काहीतरी म्हणावं.
.
.
अवांतर :-
इथे संप्रेरकांची नावं निव्वळ प्लेसहोल्डर म्हणून वापरलीत.
मला नेमकी कल्पना नाही; भावार्थ समजून घ्यावा.

नितिन थत्ते Tue, 17/03/2015 - 12:26

चुकून मद्य सूर्य प्रार्थना असे वाचले.

-------
नवीन ज्ञान मिळून सूर्य उगवत नाही वगैरेबरोबर इतर माहितीसुद्धा (निर्जीव, वायूचा गोळा, पृथ्चीवर जीवन असण्यात सूर्याचा 'कॉन्शस' रोल नाही वगैरे) कळली असल्याने सूर्याची (नवी किंवा जुनी) प्रार्थना हवीच कशाला असा प्रश्न येतो.

हे म्हणजे सूर्यमालेत नवा ग्रह आढळला म्हणून त्याला पत्रिकेत स्थान देण्यासारखे झाले.

अजो१२३ Tue, 17/03/2015 - 12:55

In reply to by नितिन थत्ते

हे म्हणजे सूर्यमालेत नवा ग्रह आढळला म्हणून त्याला पत्रिकेत स्थान देण्यासारखे झाले.

वैज्ञानिक लोक अध्यात्मिकांना जसे परके समजतात तसे अध्यात्मिक लोक त्यांना (किंवा कोणालाच) परके समजत नाहीत. वैज्ञानिक लोकांनी कितीही शोध लावले आणि अध्यात्मिकांवर कितीही टिका केली तरी नवे शोध आत्मसात करून उरलेल्या ज्ञानाबद्दल त्याच अंधश्रद्धा पुढे बाळगत राहणे ही अध्यात्मिकांची वृत्ती आहे.