Skip to main content

एक फसलेली टूलकिट

2 minutes

फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एखाद्या व्यक्तीच्या प्रचारासाठी किंवा एखाद्या प्रकल्पाच्या विरोधात 'टूलकिट'चा वापर केला जातो, हे सर्वश्रुत आहे. अनेक बनावट आयडींद्वारे त्या व्यक्तीचा प्रचार केला जातो आणि त्या पोस्ट कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. निश्चितच या पोस्ट प्रायोजित असतात, अन्यथा आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या पोस्ट आपल्या अनुयायांपर्यंतही नीट पोहोचत नाहीत, मग कोट्यवधींपर्यंत पोहोचणे तर दूरच.

अशाच एका टूलकिटद्वारे राघव चड्ढाचा प्रचार जोरात सुरू होता. मी राघवला फॉलो करत नाही, त्याच्या एकाही पोस्टला लाइक केलेले नाही, तरीही गेल्या काही महिन्यांपासून दररोज फेसबूकवर राघवची स्तुती करणाऱ्या किमान सहा-सात वेगवेगळ्या आयडींच्या पोस्ट दिसत होत्या. दोन महिन्यांत असे किमान पन्नास-साठ वेगळे आयडी मी पाहिले असतील. सर्व पोस्टचा एकच सूर होता, राघव संसदेत जनतेचे प्रश्न मांडतो आहे; राघवमुळेच विमानतळांवर चहा-समोसे स्वस्त झाले, कर कमी झाले, मोबाइल लूट थांबली, वगैरे वगैरे.

आणि मग एक दिवस अचानक सगळे थांबले. जणू "अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले!” पोस्ट येणे एकदम बंद झाले. राघवचे फॉलोअर्स वीस लाखांनी कमी झाले. नक्की काय घडले होते?

माझ्या अंदाजाप्रमाणे अश्याच एका टूलकिटने केजरीवालांना एक लोकप्रिय नेता म्हणून उभे केले होते, तश्याच प्रकारच्या टूलकिटने राघवचाही प्रचार हाती घेतला असावा. परंतु केजरीवाल हे राजकारणात मुरलेले आहेत. आपल्या विरोधात शिजत असलेले कारस्थान त्यांनी वेळीच ओळखले आणि राघवचे पंख तातडीने कापले. राज्यसभेच्या उपनेतापदावरून त्याची हकालपट्टी केली.

दुसरीकडे, आपमधील बंडखोर खासदारांचा कार्यकाळ २०२८मध्ये संपणार आहे. त्यांना हे उमगले की यापुढे आपकडून तिकीट मिळणे कठीण आहे. मग पुढे राजकीय कारकीर्द कशी सावरायची, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. राघवने भाजपविरोधात खूप आक्रमक भाषणे केली होती, हे खरे; परंतु एकदा पराभवाची चाहूल लागली की टूलकिटही पाठ फिरवते, हे राघवला कळून चुकले असावे.

आपली राजकीय कारकीर्द वाचवायची असेल, तर राघवपाशी एकच पर्याय उरला होता तो म्हणजे “भाजप- म्हणजे निरमापेक्षा जास्त सफेदी देणारी वॉशिंग मशीन, ज्यात गेले की सगळेच चमकदार, उजळ, आणि एकसारखे दिसू लागतात. भाजप मध्ये जाण्याचे अनेक फायदे राघवला दिसले. भाजपमध्ये गेल्यावर पुन्हा राज्यसभेचे तिकीट मिळू शकते; पंजाबात भाजपच्या जागा वाढल्या तर मंत्रिपदही दृष्टिपथात येऊ शकते. आपले राजनीतिक अस्तित्व वाचविण्यासाठी राघव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजपलाही पंजाबात एक चेहरा हवाच होता. त्यांनी लगेच सर्वांना पक्षप्रवेश देऊन राज्यसभेतील आपली संख्या बळकट करून घेतली. येत्या निवडणुकीत भाजपला फायदा झाला तर उत्तमच; नाही झाला तरी काही फरक नाही. कारण जे आले आहेत त्यांचे राजकीय अस्तित्व तर आधीच वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यासारखे नाहीसे होईल.

राघवने पक्ष बदलला आणि टूलकिटला मोठा धक्का बसला. त्यांनी राघवसाठी केलेली सारी गुंतवणूक एका झटक्यात वाया गेली. गेल्या एका आठवड्यात राघवची स्तुती करणारी एकही पोस्ट माझ्या फेसबूकवर दिसली नाही. उलट, त्याच्या विरोधातील काही पोस्ट मात्र दिसल्या.

या टूलकिटचे मालक नक्की कोण असतील? स्वत: राघव की आणिक कोणी ... या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप मला सापडलेले नाही.

Node read time
2 minutes

'न'वी बाजू Sat, 02/05/2026 - 15:50

(शीर्षकावरून) अगोदर वाटले, की पटाईतकाकांच्या आगामी आत्मचरित्रातील एखादे प्रकरण (वानगीदाखल) आगाऊ छापले असावे, म्हणून. परंतु, हे काहीतरी वेगळेच निघाले.

असो चालायचेच.