भारत आणि ए०आय०
भारत आणि ए०आय०
===========
--राजीव उपाध्ये
आय०आय०टी० मुंबई चे सध्याचे संचालक प्रा० शिरीष केदारे आणि मी आय० आय० आय० टी० त असताना चांगले "अरे-तुरे"तील मित्र होतो. आम्ही एकाच वयाचे, पण वेगवेगळ्या शाखा आणि हॉस्टेल. संस्कृतप्रेम आणि गिर्यारोहण हा तेव्हा आमच्या मधला समान दुवा होता. आमचे कधी वाद आणि भांडणे झाली नाहीत, तसेच त्यांच्यामुळे माझे वैयक्तिक नुकसान पण झालेले नाही. त्यामुळे माझा त्यांच्यावर वैयक्तीक राग पण अजिबात नाही. उलट आपला मित्र आय०आय०टी० सारख्या जगप्रसिद्ध संस्थेचाचा संचालक झाला हे कळले तेव्हा अंगावर मूठभर मांसच चढले होते.
आज अचानक माझ्या या मित्राची एक मुलाखत [१] युट्युबवर बघितली आणि बरीच चिंता, अस्वस्थतता निर्माण झाली. त्यांच्या मुलाखतीमध्ये प्रा० केदारे यांना ए०आय०बद्दल काही प्रश्न विचारले गेले त्यासाठी मुलाखतीचा 25:30 मि० ते 28:00 मि० हा बघावा.
ते म्हणतात -
25:57The real things of AI yet to arrive according to me.
26:47 AI can only tell you about what
26:55 is known in a very systematic, comprehensive way. But it can't tell you
27:01 what the humankind doesn't know. And that is what innovation is, right?
हे ऐकल्यावर मनात प्रश्नांचे आणि विचारांचे मोहोळ उठले आहे. real things of AI म्हणजे प्रा० केदारे यांना काय अपेक्षित आहे? सध्याचा ए०आय० "पुरेसा रिअल" नाही असे सुचवायचे आहे काय?
पुढे ते म्हणतात, "ए०आय० फक्त जे अगोदरच माहित असलेले पद्धतशीर पणे सांगतो. पण तो मानवजातीला माहित नसलेल्या गोष्टी सांगू शकत नाही." पुढे ते आणखी एक धक्कादायक विधान करतात - "हीच कल्पकता (नवनिर्मिती) नव्हे काय?"
या विधानांचा प्रतिवाद करण्यासाठी तर ए०आय० निर्मित कलेचे उदा० योग्य ठरेल - आज ए०आय० मुळे आकार, रंग, प्रकाश यांच्या एकत्रीकरणामुळे जी अभिव्यक्ती साध्य झाली आहे ती मानवीकल्पनेतून जन्म घ्यायला किती वर्षे वाट बघावी लागली असती, याची कल्पना करता येत नाही. आज ए०आय० ची वेगवेगळ्या क्षेत्रात जी आगेकूच चालू आहे, त्याचा पहिला दणका प्रथम शेअरबाजाराला बसतो. युद्ध, संशोधन, आरोग्यसेवा आणि निदान अशा अनेक क्षेत्रात निर्विवादपणे पाय रोवूनही प्रा० केदारे यांना ए०आय० पुरेसा रिअल वाटत नसेल तर त्यांना अपेक्षित असलेला ए०आय० कोणता हे त्यांनी स्पष्ट करणे आवश्यक होते. शक्यता-शोधनाची ए०आय० ची अचाट क्षमता मानवाला माहित नसलेल्या वास्तवाचे दर्शन घडवते, याकडे प्रा० केदारे दुर्लक्ष का करतात, हे कळायला मार्ग नाही. दुसरी एक न टाळता येणारी गोष्ट ए०आय० तंत्रज्ञानाने चीनमध्ये परमोत्कर्ष गाठला आहे, याकडे पण प्रा० केदारे दुर्लक्ष करतात.
एक गमतीदार आठवण - चॅटजीपीटीने अवतार घेतल्यावर मला ए०आय०ला वेडेवाकडे प्रश्न विचारायची सवय लागली. एकदा मला घरी कुळथाचे पिठले बनवायची अनिवार इच्छा झाली. पण घरातली आमसुले संपल्यामुळे चिंच घालावी का असा विचार मनात डोकावला. पण ए०आय० ही समस्या कशी हाताळतो हे तपासायची इच्छा निर्माण झाली. मग मला चॅटजीपीटीने चिंच घालून कुळथाचे पिठले अत्यंत चविष्ट बनते असे सांगितले, तेव्हा मात्र मला स्वत:ला चिमटा काढावा लागला. कारण कुळथाच्या पिठल्यात चिंच घालतात हा निर्णय चॅटजीपीटीने कसा केला हे कोडे मला अजुनही सुटलेले नाही.
"हीच कल्पकता (नवनिर्मिती) नव्हे काय?" या प्रा० केदारे यांच्या विधानाचा समाचार घेण्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
भारत ए०आय० तंत्रज्ञानाचा उपभोक्ता म्हणूनही मागे पडेल असे माझे ठाम मत बनले आहे, ते अशाच दृष्टीकोनामुळे...पण माझे ऐकणार कोण?
संदर्भ-
...
'चॅटजीपीटीने (चिंच घातलेले) कुळथाचे पिठले नक्की कधी चाखून बघितले? (की, (चॅटजीपीटीने) (नेहमीप्रमाणेच) दिले ठोकून?)' हा प्रश्न येथे अगदीच अस्थानी ठरावा काय?
(याला एक पळवाट अशी असू शकते, की चॅटजीपीटीला ट्रेनराने जे शिकविले, ते त्याने सांगितले. म्हणजे, या ठिकाणी, हे चॅटजीपीटीचे प्रतिपादन नसून (मानवी) ट्रेनराचे प्रतिपादन होय, नव्हे काय? (चॅटजीपीटीला चिंच घातलेले कुळथाचे पिठले फर्स्टहँड अनुभवण्याचा कोणताच मार्ग उपलब्ध नसल्याकारणाने? (चूभूद्याघ्या.))
परंतु मग याचाच अर्थ, चॅटजीपीटीच्या प्रस्तुत प्रतिपादनावर भरवसा ठेवून कुळथाचे पिठले चिंच घालून करण्याचा निर्णय (मग त्याचे अंतिम फलित बरेवाईट कसेही निघो, परंतु) 'आपल्या आयुष्याचे नियंत्रण दुसर्या कोणत्या तरी माणसाच्या (या ठिकाणी, चॅटजीपीटीच्या ट्रेनराच्या) हातात देण्या'तलाच प्रकार नव्हे काय?
मग यात आणि 'सनातन धर्मा'त नक्की फरक तो काय राहिला?
पण लक्षात कोण घेतो?)
असो चालायचेच.
.
गेले अनेक दिवस हे कुळथाचे पिठले माझ्या आयुष्यात सतत येत आहे. पण मी अजून एकदाही ते खाल्ले नाही (यामुळे मी विशेष काही गमावलेले नाही असं काही जणांनी सांगितलं आहे). माझ्याकडे एक खऱ्या खुऱ्या करंदीकर आडनाव असलेल्या माणसाने, अतिशय प्रमाणबद्ध अशी पाककृती मला दिलेली आहे. त्यात आमसूल हा घटक अत्यावश्यक आहे. तर ती पाककृती वाचून मी बाजारातून कुळीथ पिठी आणली. पण दुर्दैवानं ती कुठेतरी गायब झाली.
आमच्या मित्राच्या म्हणण्याप्रमाणे. कुळथाचे (आमसूल घातलेले) गरम गरम पिठले + पहिल्या वाफेचा भात आणि पोह्याचा पापड/मिरगुंडं हीच खरी पाकसिद्धी आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही एआयची परीक्षा घेणार नाही.
>> 'आपल्या आयुष्याचे नियंत्रण दुसर्या कोणत्या तरी माणसाच्या (या ठिकाणी, चॅटजीपीटीच्या ट्रेनराच्या) हातात देण्या'
मुळात आपल्या आयुष्याचे नियंत्रण आपल्या हातात आहे हाच एक मोठा गैरसमज आहे. आता बघा ना. पाककृती आहे, तेल, तिखट, लसूण, आमसूल सगळं आहे. पण कुळीथ हरवलं!
.
गेले अनेक दिवस हे कुळथाचे पिठले माझ्या आयुष्यात सतत येत आहे. पण मी अजून एकदाही ते खाल्ले नाही (यामुळे मी विशेष काही गमावलेले नाही असं काही जणांनी सांगितलं आहे).
मी खाल्लेले आहे. जेवायला दुसरे काही केलेले नसले, तर आयत्या वेळेस चटकन काहीतरी म्हणून आमच्यात ते करतात.१ बरे लागते, परंतु, त्याकरिता मरावे, इतकेही काही थोर लागत नाही, हे खरेच आहे. (अर्थात, याबद्दल मतभेद असू शकतात.)
त्यात आमसूल हा घटक अत्यावश्यक आहे.
आमच्या घरात (कधीकाळी आणून ठेवलेली) आमसुले बाटलीत भरून ठेवलेली कोठेतरी पडून आहेत, याची मला (आणि बायकोलाही) कल्पना आहे. मात्र, प्रत्यक्षात ती बाटली आणि ती आमसुले ऐन वेळेस सापडणे अशक्य. त्यामुळे, त्या आमसुलांऐवजी कुळथाच्या पिठल्यात बायको नक्की काय घालते, हे तिचे तिलाच ठाऊक!
त्यामुळे, कुळथाच्या पिठल्यात आमसूल हा घटक अत्यावश्यक आहे, याच्याशी मी सहमत नाही.
(किंबहुना, कुळथाच्या पिठल्यात (कुळथाची पिठी वगळता) बाकी काहीही अत्यावश्यक आहे, याबद्दल मी साशंक आहे. (Anything and everything can be substituted.) (हं, तेवढे लसूण असल्यास मात्र शक्यतो बरे.))
तर ती पाककृती वाचून मी बाजारातून कुळीथ पिठी आणली. पण दुर्दैवानं ती कुठेतरी गायब झाली.
(आमच्या घरातल्या आमसुलांप्रमाणेच! चालायचेच.)
उत्तम झाले!
मुळात आपल्या आयुष्याचे नियंत्रण आपल्या हातात आहे हाच एक मोठा गैरसमज आहे.
हे बरीक खरे बोललात!२
किंबहुना, जगातल्या किमान एका हिंदू मनुष्याच्या आयुष्याचे नियंत्रण ज्या दिवशी त्याच्या/तिच्या स्वतःच्या हातांत येईल, त्या दिवशी (१) जगबुडी होईल, आणि (त्याहूनही भयंकर म्हणजे) (२) हिंदुधर्म रसातळास जाईल, असा (हिंदुधर्मास) शाप आहे. त्यामुळे, हे कदापि खपवून घेतले जाणार नाही.
असो चालायचेच.
१ म्हणजे, बायको बनवते.१अ (मला बनवता येत नाही, आणि मी त्या फंदात पडतही नाही.)
१अ बायकोचे कार्यस्थळ घरापासून (वाहनाने) पाच मिनिटांच्या अंतरावर असल्याकारणाने, ती शक्यतो दुपारच्या जेवणाला घरी टपकते. मी वर्कफ्रॉमहोम करीत असल्याकारणाने, ती घरी येईपर्यंत (माझ्या कार्यस्थळाची बाकीची कामे आटोपून) मी शक्यतो काहीतरी बनवून ठेवतो.१अ१ मात्र, कधीकधी फारच कामात नाहीतर सकाळसकाळच्या मीटिंगांत जर अडकलो, तर ती घरी टपकल्यावर नेमके ऐन वेळेस काहीही बनवलेले नसते. अशा वेळेस फॉलबॅक ऑप्शन म्हणून कुळथाचे पिठले कामी येते, इतकीच काय ती कुळथाच्या पिठल्याची (आमच्यात) महती. चालायचेच.
१अ१ एखादी भाजी, वगैरे.१अ१अ, १अ१ब किंवा, एखादे वेळेस अगदीच नाही जमले, तर गेला बाजार वरणभातबटाट्याचीभाजी. (त्याला काही जास्त अक्कल लागत नाही. कारण शेवटी आम्ही भटेच, त्याला काय करणार, असे पु.ल. म्हणून गेलेलेच आहेत.)
१अ१अ पोळ्या आमच्यात विकतच्या आणतात. यंत्रावर लाटून भाजलेल्या देशी पद्धतीच्या ताज्या गरमागरम चपात्या१अ१अ१ घाऊक भावात पुरविणारे हवे तेवढे देशी पुरवठादार आमच्या अटलांटात आहेत. पंचवीस चपात्यांची दोनतीन पाकिटे आणून फ्रीजमध्ये टाकायची. ती दोन ते तीन आठवड्यांपर्यंत खराब न होता आरामात टिकतात. गरजेप्रमाणे आयत्या वेळेस गरम करून घ्यायच्या. डोक्याला ताप नाही.
१अ१अ१ तॉर्तिय्या नव्हेत. गव्हाच्या देशी चपात्या. (ताज्या गरमागरम!)
१अ१ब एखादी गिळता येण्याजोगी भाजी बनवण्याइतपत मला जमते. (किंवा, बायको चालवून घेते, म्हणू या.)
२ म्हणजे, एरवी खोटे बोलता, असे सुचविण्याचा उद्देश नाही, परंतु तरीही.
अक्वायर्ड टेस्ट
आमच्या मित्राच्या म्हणण्याप्रमाणे. कुळथाचे (आमसूल घातलेले) गरम गरम पिठले + पहिल्या वाफेचा भात आणि पोह्याचा पापड/मिरगुंडं हीच खरी पाकसिद्धी आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही एआयची परीक्षा घेणार नाही.
भरपूर लसूण आणि थोडे आमसूल घातलेले पिठले खाल्ले आहे. ते मऊ भाताबरोबर (+ तूप) खायला (मला तरी) चांगले लागले. आमच्या घरी ते कधीच होत नसे, पण पुण्यात आल्यावर काही मैत्रिणींच्या कृपेने खायची संधी मिळाली. कुळथाची चव ही अक्वायर्ड टेस्ट असावी असा अंदाज. यू आर नॉट मिसिंग मच वगैरे म्हणणार नाही, ते त्यामुळे.
चूक!
या संकेतस्थळाचे अद्याप संपूर्ण एआयीकरण झालेले नाही. मात्र, 'जणू काही एआयलाच वाहून घेतलेले संकेतस्थळ आहे, असा भास होतो', अशा अर्थाने, 'एआय-सी अक्षरे' हेच नाव संकेतस्थळाकरिता उचित आहे.
(एका मराठी संकेतस्थळाच्या नामकरणातील हिंदीचा हा प्रभाव चिंताजनक आहे खरा. पण लक्षात कोण घेतो?)
तुम्हाला पडलेला प्रश्न रास्त…
तुम्हाला पडलेला प्रश्न रास्त आहे, पण प्रा. केदारे यांचा मुद्दा वेगळ्याच लेव्हलवर आहे.
ते सध्याच्या AI ला कमी लेखत आहेत असं वाटत नाही. त्याचं म्हणणं इतकंच की आजचा AI मुख्यतः आधीपासून उपलब्ध डेटावर आधारित आहे. तो त्या माहितीचं व्यवस्थित रसग्रहण ऊर्फ अर्क साठवणे असे करून पुढील शब्द, अक्षर, पिक्सेल किंवा आकडा, निर्णय प्रेडिक्ट करतो. हे सर्व आगोदर माहीत असलेल्या माहितीवरून काढलेले निष्कर्ष असतात. ती सर्व माहिती तुम्हाला आणि मला किंवा कोण्या एकट्या मनुष्याला एकत्रित माहीत नसल्याने आपल्याला ते निर्णय किंवा आऊटपुट खूपच आकर्षक वाटतात. आणि असतात देखील.
पण अद्याप AI पूर्णपणे नवीन, मानवाला अजिबात माहित नसलेलं ज्ञान स्वतःहून शोधत नाही. प्राध्यापक केदार यांच्या मते खरी नवनिर्मिती (innovation) तिथेच होते.
ए आय निर्मित चित्रं, कविता, गाणी, चॅट.. , मेडिकल फिल्डमधली कर्तबगारी, हे सगळं खूप इंप्रेसिव्ह आहे पण ते “intelligent use of existing knowledge” आहे, “discovery of unknown” नाही.
VL JEPA बद्दल वाचले नसेल तर अवश्य वाचा. व्हिजन लँग्वेज मॉडेल्स ही देखील अजून उपलब्ध माहितीवरच शिकतात पण तो त्या पुढच्या पायरीकडे जाण्याचा प्रयत्न आहे जिथे AI जग समजून घेऊन अंदाज बांधतो. फक्त पुढचे टेक्स्ट प्रेडिक्ट करण्या ऐवजी आऊटकम प्रेडिक्ट करतो.
पण अजूनही पूर्णपणे स्वतंत्र शोध (true discovery) करणारा AI तयार झालेला नाही.
म्हणून त्यांच्या “real AI yet to arrive” या विधानाचा अर्थ असा घेता येईल की हा पुढचा टप्पा अजून बाकी आहे.
आपण एकवेळ/तात्पुरते तुमचे…
आपण एकवेळ/तात्पुरते तुमचे म्हणणे सत्य मानू या! पण आज मला आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे. मी स्वत: जे ट्रेडींग मॉडेल तयार करून वापरतो. त्यात वापरलेल्या फिचर्सचा अर्थ ग्रोकला विचारला तेव्हा त्याने ९५% अचूक उत्तरे दिली. आपण परम-बुद्धीमत्तेजवळ पोचलो आहोत की काय, अशी दाट शंका येत आहे. कारण फिचर्स मी स्वत: तयार केलेली असल्याने ती ग्रोकला माहित असण्याची शक्यता शून्य! एकच शक्यता आहे, ए०आय० व्यक्तीगत संगणकावरील डेटा उचलून तो ट्रेनिंग साठी वापरत असेल तर हे होणे शक्य आहे.
श्री० गवि आजचे वैद्यकीय…
श्री० गवि
आजचे वैद्यकीय ज्ञान मृतव्यक्तीला जिवंत करू शकत नाही, म्हणून आपण नाकं मुरडत नाही किंवा असे ही म्हणत नाही की "रिअल मेडीकल नॉलेज इज यट टू कम". आपण उपलब्ध ज्ञान जास्त उपयोगात कसे आणता येईल यावर लक्ष केंद्रित करतो. मला ए०आय० बद्दल पण हेच अपेक्षित आहे.
"ए०आय० फक्त जे अगोदरच माहित…
"ए०आय० फक्त जे अगोदरच माहित असलेले पद्धतशीर पणे सांगतो. पण तो मानवजातीला माहित नसलेल्या गोष्टी सांगू शकत नाही.>>> हे तितकेसे खरे नाहीये. तसे असते तर chatGPT ने आजवर मानवाला न सुटलेले काही गणिती कूट प्रश्न सोडवले नसते.
अजून एक गंमत
कुत्र्यांची हजारो चित्रे पाहून शिकलेला chatGPT कुत्र्याचे चित्र ओळखू लागला. त्याला च्यु बनवणे अगदी सोपे आहे. chatGPTला कसे हॅक करता येते ते मी इथे सांगणार नाही, पण जे चित्र पाहून लहान मुलगा/मुलगी सहय सांगतो हे चित्र कुत्र्याचे आहे त्याच चित्राला chatGPT पांडा म्हणून ओळखतो.
याचा अर्थ सरळ आहे कि chatGPT मानवा सारखा विचार करत नसावा,
तो कसा विचार करतो हे ही आपल्याला माहित नाही.
आपण ज्याची निर्मिती केली त्याची बुद्धी आपल्याला कोडं झालेले आहे.
हे खरोखर भीतीदायक आहे.
तसे असते तर chatGPT ने आजवर…
तसे असते तर chatGPT ने आजवर मानवाला न सुटलेले काही गणिती कूट प्रश्न सोडवले नसते.
कॉम्प्यूट.. ताकद असंख्य पटीने वाढल्याने गाणिती प्रश्न सुटतात. त्यात मूलभूत नवीन विचार आहे असे मानू नये.
तो कसा विचार करतो हे ही आपल्याला माहित नाही.
आपण ज्याची निर्मिती केली त्याची बुद्धी आपल्याला कोडं झालेले आहे.
असं नाहीये हो..
जानेवारी २०२६ मध्ये आता…
जानेवारी २०२६ मध्ये आता ए०आय०च्या मदतीने अनेक दशके न सुटलेल्या एर्डश कोशातील ३ महत्त्वाच्या समस्या ए०आय० च्या मदतीने सुटल्याचे जाहिर करण्यात आले. नील सोमाणी या संशोधकाने एर्डश समस्या क्र० ३९७ जीपीटी ५.२ हे मॉडेल वापरून काही मिनीटात सोडविली. केव्हीन बॅरेटोने आपल्या एका सहकार्याबरोबर एर्डश समस्या क्र० ७२८ आणि ७२९ या समस्या सोडविल्या. गणितातील नोबेल मानले गेलेले फिल्ड पारितोषिक विजेते टेरेन्स टाओ यांच्यामते स्वयंचलित ए० आय० च्या मदतीने मिळवलेले हे यश लक्षणीय आहे.
ref
तर्कतीर्थ ह्यांच्या लेखातून
जानेवारी २०२६ पर्यंत संगणक AI च्या पाशी जसे होते तसेच इतरांच्या पाशीही होते!
.
होमो डेअस आणि नेक्सस वाचल्यानंतर माझी अशी समज होती की एआय मॉडेल जसं ट्रेन केलंय तसं वागेल. लिबरल-डेमॉक्रॅटिक व्हॅल्यूज दिल्या असतील तर ते तशाच प्रकारची उत्तरं देईल; पण एखादं चायनीज मॉडेल कदाचित वेगळी उत्तरं देईल. गाडी चालवणारी मॉडेल्सही नैतिक प्रश्नांना कसं हाताळायचं हे ज्या पद्धतीने शिकवलेलं असेल त्यानुसार वागतील. त्यामुळे शीतयुद्धातल्या "आयर्न कर्टन" प्रमाणे जगात एकप्रकारचे "सिलिकॉन कर्टन्स" निर्माण होतील असा हरारीचा दावा आहे.
पण मागच्या धाग्यात प्रभुदेसाईंनी सुचवलेलं Anyone Builds It, Everyone Dies हे पुस्तक मात्र ही समज चुकीची आहे असं म्हणतं. त्यात अगदी खोलात जाऊन सांगितलंय की मॉडेल्स शेवटी येतात ग्रेडियंट डिसेंटवर. त्यांची रिझनिंग ही माणसांसारखी नसते. ती ग्रेडियंट डिसेंटच्या नियमांनुसार घडते.
त्यामुळे त्यांचे उत्तर शोधण्याचे मार्ग माणसाच्या विचारशक्तीपेक्षा पूर्ण वेगळे असतात. आणि त्या लाखो कोट्यवधी वेट्सच्या मॅट्रिक्समध्ये नेमकं काय दडलंय हे समजण्याचा आपल्याकडे कोणताही मार्ग नाही. असे हे पुस्तक सांगतं.
सिट्रीनीचा रिपोर्ट तरी इकॉनॉमिक डिझास्टरची भविष्यवाणी करतो. पण हे पुस्तक तर (अगदी उद्याच नाही) पण भविष्यात मानवसमूहच नष्ट होऊ शकतो अशी शक्यता मांडतं. प्रथमदर्शनी हे अवास्तव वाटतं. आणि एक्स्ट्रीम आउटकम किंवा आउटलायर प्रेडिक्शन्स सहसा चुकीच्या असतात असं आपल्याला वाटतं.
या पुस्तकाबद्दलही तसंच वाटतं. एकदम साय-फाय वाटते. पण कदाचित काही तथ्य असेलही. सुरुवातीचा भाग मल्टीडिसिप्लिनरी अॅप्रोचवर आधारित आहे. आणि त्यावर काउंटर आर्ग्युमेंट करायला जीवशास्त्रापासून हॅकिंगपर्यंतचं ज्ञान असावं लागेल. त्यामुळे माझं स्वतःच काही ठोस मत नाही.
पण या पुस्तकामुळे ASI alignment(*) या विषयावर कळलं. एआय कंपन्यांसमोर हे एक मोठं चॅलेंज आहे हेही लक्षात आलं.
(*)"Artificial Superintelligence (ASI) alignment" म्हणजे मानवी बुद्धिमत्तेपेक्षा जास्त क्षमतेचा एआय मानवाच्या उद्दिष्टांनुसार, नैतिकतेनुसार आणि सुरक्षिततेनुसार वागेल याची खात्री करण्याचं आव्हान. कारण ASI माणसांपेक्षा जास्त विचार करू शकतो, जास्त शक्तिशाली होऊ शकतो; त्यामुळे त्याचे उद्दिष्ट जर चुकले तर त्याचे परिणाम अपरिवर्तनीय आणि विनाशकारी ठरू शकतात.
आणि त्या लाखो कोट्यवधी…
आणि त्या लाखो कोट्यवधी वेट्सच्या मॅट्रिक्समध्ये नेमकं काय दडलंय हे समजण्याचा आपल्याकडे कोणताही मार्ग नाही. असे हे पुस्तक सांगतं.
हे समजून घेणं कठीण आहे हे मान्य. पण याचा अर्थ आपण आऊटकम तपासू शकत नाही आणि ड्रिफ्ट किंवा हॅल्युसिनेट होत चाललेले मॉडेल वेळीच ओळखून ते थांबवू शकत नाही असे नव्हे. ह्यूमन इन द लूप महत्वाचा.
कुळथाचे पिठले ..... >>"मला…
कुळथाचे पिठले .....
>>"मला चॅटजीपीटीने चिंच घालून कुळथाचे पिठले अत्यंत चविष्ट बनते असे सांगितले.">>
- बरं.
एआइ अंतिम उत्तर देतो यावर विश्वास ठेवल्यास बरोबर.
बाकी आडात नाही तर पोहऱ्यात कुठून? ही म्हण आठवली.