Skip to main content

प्रकल्प : मराठी

प्रकल्प : मराठी 

याच महिन्यात मराठी दिवस होता. यावर्षीही मराठी दिवस आला, नि गेला, कोणाला कळलं सुद्धा नाही. खरं तर माझ्या सतरा वर्षांच्या जीवनकाळातील या दिवसाच्या आठवणी तश्या मोजक्याच आहेत, कारण आता मराठी दिनाचं कौतुक असणारे लोकही तसेच मोजकेच आहेत. मी, काही महिन्यांमध्ये पूर्णपणे प्रौढ होणारी किशोरवयीन व्यक्ती या दृष्टिकोनातून हा लेख लिहीत आहे. 

बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल की पिढीतल्या मुलांची मराठी इंग्रजीची सरमिसळ न करता बोलली जाऊ शकते! आमच्या मराठीत ही हिन्दी आणि इंग्रजी शब्दांची भेसळ असते, त्यामुळे ती ‘दूषित’ आहे असे म्हटले जाते. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की हे ‘दूषितीकरण’ नक्की काय असतं? मराठीचा उगम संस्कृतपासून झाला. पण मराठीत असे कित्येक शब्द आहेत, जे इतर भाषांकडून भेट म्हणून आपल्याला मिळाले आहेत! कलम, खुर्ची, दरवाजा, अननस, असे दैनंदिन वापरातले अनंत शब्द मराठी माणसांनी अरेबियन, पर्शियन, पोर्तुगीज सारख्या परप्रांतीय व परदेशीय भाषांकडून घेतले आहेत. मग आत्ताच आपल्याला या परभाषीय शब्दांचा द्वेष का वाटू लागलाय? त्याचं मुख्य कारण हे, की ही सरमिसळीचं प्रमाण आपल्या भाषेसाठी घातक आहे. बघा, जिथे पूर्वी हे परभाषीय शब्द आपल्या भाषेत येऊन घर करून राहत होते, तिथे आत्ता ते वसाहतवाद करून व्याकरणाचे नियम न पाळता आपली भाषा फोडू पाहत आहेत. 

मग मराठीच्या या नियमांच्या अपहरणात नक्की चूक कोणाची? मी स्वतःच्या अनुभवातून सांगते, माझी जडणघडण ही बहुतांशी मराठीतच झाली. माझ्या पालकांनी आणि शाळेने तीनही भाषांच्या वाढीकडे नीट लक्ष दिलं.  लहानपणीच मला पुस्तकांमध्ये आणि साहित्यात रस येऊ लागला. मराठी पुस्तकांमुळे माझा भाषिक पाया आणखी भक्कम झाला. पण जसा मी किशोर वयात प्रवेश केला, तसं माझं मन इंग्रजी साहित्यात लागू लागलं. पुस्तक, गाणी या सगळ्यांमुळे माझा इंग्रजीकडचा वळसा वाढला, तेव्हा ते मजेशीर वाटायचं. पण आता मागे वळून बघता विचार येतो, का बरं असं झालं असेल? मग हळूहळू कळू लागतं, मराठी साहित्य जे एकेकाळी अतिशय रम्य व सगळ्यांना समाविष्ट करून घेणारं होतं, ते आता तितकंसं भव्य राहिलेलं नाही. आधुनिक मराठी लेखक हे एकतर प्रौढांसाठी नाहीतर लहानांसाठी लिहितात. पण किशोरवयीन लेखकांवरती लक्ष केंद्रित करणारे लेखक मोजकेच आहेत. या विषयात मग रिक्तपणामुळे मुलांना पाश्चात्त्य संस्कृतीकडे वळावंच लागतं. कारण इंग्रजी साहित्यात 'हॅरी पॉटर', 'पर्सि जॅकसन' असे कित्येक किशोरवयीन मुलांच्या भावनांवरती लक्ष केंद्रित साहित्याचे  करणारे नमुने  आहेत. 

याच मुद्द्यावरती खोलवर विचार केला तर लक्षात येतं की आपले मराठी 'शुद्ध' ठेवण्याचा नादात तिचा प्रवाहीपणा आपण हिरावून घेत आहोत. कुठलीही संस्कृती, भाषा ही तेव्हाच टिकून राहते, जेव्हा ती काळानुसार स्वतःला बदलून घेते, स्वतःची वाढ होऊ देते. सध्या जी मोठी माणसं मराठीचा जयजयकार करतात, तीच मोठी माणसं लहानांकडून आलेले भावनिक बदल स्वीकारत नाहीत, यामुळे  आम्हाला आमचा भावना व्यक्त करण्यासाठी इंग्रजी हा एकच पर्याय उरतो. मी काही मराठी भाषेची निंदा करत नाही, उलट मराठी भाषेला एक भल्यामोठ्या संस्कृतीचा इतिहास आहे. आता ‘गजर’ हा शब्दच घ्या ना! सकाळी मंदिरात ज्या गायन-वादनाने जाग यायची, त्याला गजर म्हणत. एवढा लांबलचक संदर्भ ‘alarm’ या शब्दात मावू शकणार नाही. पण आपण काळानुसार या शब्दांच्या व्युत्पत्ती तर विसरत चाललो आहोतच, पण भाषेला नवीन छटा देण्यातही कमी पडू लागलो आहोत.आपली मराठी जेव्हा पुन्हा सर्वसमावेशक बनेल, तेव्हाच ती पुढे जाईल. म्हणूनच  आपल्या भाषेच्या या प्रवाही नदीवर आपण जी नियमांचे धरण बांधली आहेत, त्यांची दारं आफत उघडा! या नदीला देशभर, किंबहुना जगभर फिरू द्या, तिला स्वतःच्या अनेक प्रकारांची जाणीव घडवून द्या! मराठी प्रमाणभाषेसह आपल्या बोलीभाषेची ही जाण अख्ख्या जगाला  होऊ द्या.

 मी कुठली विशेष तज्ज्ञ नाही, पण एक जागरूक भाषा प्रेमी आणि साहित्य रसिक आहे आणि त्याच नात्याने मी माझी मतं व्यक्त केलीत. आपली भाषा ही एक अत्यंत सुंदर आणि थेट व्यक्त होणारी भाषा आहे. या भाषेचं जतन व्हावं, अशीच आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. पण तिची खरंच प्रगती कशी होईल ही आपण सर्वांनी मिळून विचार करण्याची बाब आहे. शेवटी आपल्याला मराठीचे शुद्धीकरण नाही, तर तिचे बलाढ्यीकरण करायचे आहे.