निरीश्वरवादाची ऐशीतैशी
निरीश्वरवादाची ऐशीतैशी
============
-राजीव उपाध्ये
’ऐसी...’ वर अलिकडेच एक निरीश्वरवादावर मुग्धा कर्णिक यांचा अत्यंत आवेशपूर्ण लेख प्रकाशित झाला आहे. मी असे आवेशपूर्ण लिखाण साधारणपणे ८-९वी मध्ये करत असे. तेव्हा त्याचे कौतूक पण होई आणि थोडे फार मार्क पण मिळत असत. पण नंतर लगेच दहावीमध्ये अशा लिखाणावर लाल वर्तूळे येऊ लागली. बोर्डाच्या परीक्षेत ’निबंध कसा लिहू नये’ याचे उदाहरण म्हणून माझ्या लिखाणाचे उदाहरण भर वर्गात सु० द० तांब्यांनी दिल्याचे स्मरते. सांगायचे तात्पर्य असे, प्रहार करणार्या लिखाणाने कितीही टाळ्या मिळवल्या, तरी मूळ प्रश्न न सुटल्याने अधिक चिघळतात आणि माणसे दुरावतात. सध्याच्या काळात अगदी साधे निरुपद्रवी लिखाण लोकांना पचत नाही, तिथे ’टोकदार’ लिखाण कुठून पचणार? हा मुद्दा सदर ’निरीश्वरवादीनी’ला किती पचेल माहित नाही. काही वर्षांपूर्वी त्यांना माझ्या एका अत्यंत साध्या प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने माझी एका ग्रुपमधून हकालपट्टी झाल्याचे अजुनही ताजे स्मरणात आहे.
एक आवश्यक घोषणा - सध्याचं माझं वैचारिक स्टेटस निरीश्वरवादी असलं तरी ते आयुष्याला स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर, भरपूर वाचन, श्रवण आणि अनेक वर्षांच्या ध्यानधारणेने मेंदूची लवचिकता वाढल्यानंतरच प्राप्त झाले आहे.
तर सांगत काय होतो की भारतातील कट्टर आस्तिकता आणि धार्मिकता या दोन्ही चिंतेचा विषय बनल्या आहेत.
कट्टर आस्तिकतेचा जेव्हा समाचार घेतला जातो तेव्हा यच्चयावत निरीश्वरवादी, विवेकवादी त्यातले जीवशास्त्रीय वास्तव सोईस्करपणे बेदखल का करतात, हे कोडे मला आजतागायत उलगडलेले नाही. मी माझा एक सिद्धान्त वारंवार सांगत असतो - निसर्गाने अनिश्चितता आणि अपरिहार्यता हाताळायची क्षमता सर्वांना समान दिलेली नाही. ज्यांना क्षमतांचे वितरण वास्तव जगात बेल कर्व्हच्या नियमानुसार होते, हे समजते त्यांनाच माझ्या सिद्धांताचे गांभीर्य कळेल.
धर्म आणि निरीश्वरवाद यांच्यातील वादाचा एक मूलभूत दोष असा आहे की दोन्ही बाजू हा प्रश्न केवळ तत्त्वज्ञानाचा किंवा तर्कशास्त्राचा आहे असे गृहित धरतात. प्रत्यक्षात तो मोठ्या प्रमाणावर संज्ञानात्मक विविधतेचा (cognitive diversity) प्रश्न आहे. निरीश्वरवाद्यांनी केवळ समाजशास्त्राचा अभ्यास न करता चेताशास्त्राचाही अभ्यास करणे आवश्यक आहे.
काही लोकांना अस्तित्वातील अनिश्चितता सहज पचते; काहींना ती अत्यंत अस्वस्थ करते. अशा वेळी धर्म ही व्यवस्था त्या अस्वस्थतेला एक चौकट देते—जी अर्थ, सांत्वन आणि सामाजिक आधार देते. त्यामुळे धर्माला केवळ अज्ञान म्हणून नाकारण्याची पद्धत वैज्ञानिकदृष्ट्या अर्धवट आहे.
सर्व निरीश्वरवाद्यांना मी ॲण्ड्र्यु न्युबर्ग या चेताशास्त्रज्ञाचे ’व्हाय गॉड वोण्ट गो अवे" हे पुस्तक वाचायला सांगतो [१]. पण माझ्या माहितील एकाही निरीश्वरवाद्याने हे पुस्तक वाचायचे कष्ट घेतल्याचे मला आजवर दिसलेले नाही. मानवी मेंदूची रचनाच ईश्वराच्या निर्मितीस कारणीभूत आहे, हे माणसाला विवेकाची देणगी लाभली आहे या विधाना इतकेच लखलखीत वास्तव आहे.
वर उल्लेख केलेल्या पुस्तकात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत: ध्यान, प्रार्थना यावेळी मेंदूतील parietal lobe activity बदलते. ’मी आणि इतर’ या सीमा कमी जाणवतात, त्यामुळे एकात्मता किंवा भावातीत अनुभव निर्माण होतो. जेव्हा ध्यानधारणेद्वारे किंवा धार्मिकेतून येणार्या आध्यात्मिक अनुभवांमध्ये या भागाला मिळणारी संवेदी माहिती रोखली जाते, तेव्हा व्यक्तीला वेळेचे आणि जागेचे भान राहत नाही. अशा स्थितीत निर्माण होणाऱ्या 'ॲब्सोल्युट युनिटरी बीइंग' (Absolute Unitary Being) या अवस्थेलाच अनेक धर्मांमध्ये ईश्वराशी किंवा ब्रह्माशी एकरूप होणे असे संबोधले जाते. त्यामुळे धार्मिक अनुभव हे पूर्णपणे “भ्रम” म्हणून टाकून देता येत नाहीत तर ते मेंदूच्या कार्यपद्धतीशी सुसंगत असतात. म्हणूनच धार्मिकता ही केवळ अज्ञानाची उत्पादने नाही तर ती मानवी मेंदूच्या संरचनेतून निर्माण होणारी प्रवृत्ती आहे, हे वास्तव निरीश्वरवाद्यांनी स्वीकारणे त्यांच्या बौद्धिक परिपक्वतेचे निदर्शक ठरेल.
आता भारतातील कट्टर धार्मिकते वळू या! भारतातील अलिकडच्या काळात वाढलेली कट्टरता ही प्रतिक्रियात्मक आणि ’असुरक्षित’पणातून वाढलेली आहे, हे नाकारणे हे निधर्मी विवेकवाद्यांचे लाडके हत्यार आहे. लहान मुलांना पाण्याची किंवा किडे,पाली, झुरळे यांची भीति वाटते तेव्हा ती ’प्रहार’ करून नाकारून नाहीशी होत नाही, असे माझे निरीक्षण आहे.
धर्माचा प्रश्न केवळ तर्काचा नसून मानवी मेंदूच्या रचनेचा आहे; त्यामुळे धर्मावरील चर्चा जितकी वैज्ञानिक होईल तितकी ती अधिक संयमी आणि वास्तववादी होईल.
उत्क्रांतीवादी मानसशास्त्राच्या मते, कोणतीही मानवी प्रवृत्ती जर हजारो वर्षे टिकून राहिली असेल, तर तिचा मानवाच्या जगण्याला किंवा पुनरुत्पादनाला काहीतरी फायदा झालेला असतो. धर्माच्या बाबतीत दोन प्रमुख विचारप्रवाह जगात आहेत.
१. धर्म हे एक अनुकूलन (अडाप्टेशन) आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते, धर्मामुळे मानवी समुदायांमध्ये आणि एकता वाढली. सामायिक श्रद्धा आणि विधींमुळे मोठ्या समूहांना एकत्र ठेवणे सोपे झाले. रिचर्ड सोसिस यांच्या संशोधनानुसार, १९ व्या शतकातील धार्मिक समुदायांचे आयुष्य धर्मनिरपेक्ष (Secular) समुदायांपेक्षा जास्त होते, कारण धर्माने लादलेल्या शिस्तीमुळे आणि त्यागामुळे त्या समुदायांची वीण घट्ट होती.
२. धर्म हे एक उपोत्पादन आहे. या विचारप्रवाहानुसार, धर्म हा मेंदूच्या इतर उपयुक्त कार्यांचे एक 'बाय-प्रॉडक्ट' आहे. उदाहरणार्थ, 'हायपर-सेंसिटिव्ह एजन्सी डिटेक्शन' (Hyper-sensitive Agency Detection). आपल्या पूर्वजांना गवतात होणारी सळसळ ही केवळ वार्यामुळे नसून तिथे एखादा वाघ असू शकतो, असे मानणे उत्क्रांतीच्या दृष्टीने फायदेशीर ठरले. हीच प्रवृत्ती आपल्याला निसर्गातील प्रत्येक घटनेमागे एखादा अदृश्य हेतू किंवा देव शोधायला भाग पाडते. न्यूबर्ग यांच्या मते, मेंदूची दोन प्राथमिक कार्ये आहेत: स्व-संरक्षण आणि स्व-पलीकडे जाणे. धर्म या दोन्ही कार्यांना पोषक ठरतो.
सध्याच्या काळात हे कार्य धर्म करतो का, असा अवघड प्रश्न कुणाला पडला तर त्याचे उत्तर माझ्याकडे तरी नाही. जोपर्यंत मानवी मेंदूच्या मूलभूत रचनेत बदल होत नाही, तोपर्यंत ईश्वर आणि धर्म नष्ट होणे कठीण आहे.
संदर्भ:
[१] https://www.amazon.in/Why-God-Wont-Go-Away/dp/034544034X
.
विशिष्ट पूजा पद्धतीशी संबंधित धर्म प्रकार अब्राहीम स्थापित धर्म संकल्पनेत आहे. तिथेच कट्टरता वाढली आहे.
दक्षिणेत (आणि कदाचित काही अंशी सीमावर्ती दक्षिण महाराष्ट्रातसुद्धा) शैव आणि वैष्णव यांच्यात पराकोटीचे (अनेकदा अगदी हाणामाऱ्या होईपर्यंत वगैरे) वैमनस्य असते. इतके, की कट्टर वैष्णव लोक शंकराचे नावसुद्धा चुकूनदेखील घेत नाहीत. (कट्टर वैष्णवांत कपडे शिवत नाहीत, कपडे वैष्णवतात. किंवा, कोणाला स्पर्श करतानादेखील शिवत नाहीत, तर वैष्णवतात. आणि, वैष्णव कधी शिव्या देत नाहीत, हे निदान मी (जन्मपरंपरेने वैष्णव) तरी मानायला तयार नसल्याकारणाने, ते शिव्या नक्की कसे देत असतील, ते त्यांचे त्यांनाच ठाऊक!)
मग शैव आणि वैष्णव यांपैकी नक्की कोण इब्राहिमी धर्मपरंपरेचे उपासक आहेत, असे तुमचे म्हणणे आहे?
(अर्थात, मुसलमान हे शैवपरंपरेचे अनुयायी आहेत, असा कायसासा सिद्धांत मागे एकदा श्री. पु.ना. ओक यांनी मांडला होता खरा. त्यामुळे, कोणास ठाऊक, परंतु, शैव हे कदाचित इब्राहिमी धर्मपरंपरेतील असू शकतीलही. (अवांतर: चित्पावन हे मूलतः शैव असतात, असेही ऐकलेले आहे. (चूभूद्याघ्या.)) परंतु मग, तुमच्याच लॉजिकप्रमाणे, वैष्णव हे अधिक कट्टर कसे, हा प्रश्न उरतोच.)
(अतिअवांतर: संघोट्यांना हिंदू परंपरांविषयी काडीमात्र कल्पना नसते. मात्र, ‘हिंदुत्वा’च्या नावाखाली जेथे तेथे नि मिळेल त्या संधीला मुसलमानांना काहीही करून शिव्या घालणे एवढेच त्यांना ठाऊक असते. त्याचे ‘स्क्रिप्ट’ हे एक तर थेट ‘वरून’ नाही तर मग सकाळच्या ‘बौद्धिका’तून आलेले असते. ते डोळे झाकून, स्वतःचे डोके न वापरता, निर्लज्जपणे तथा निर्बुद्धपणे ओकणे, एवढेच त्यांना शिकवलेले असते. (यालाच ‘संघाची शिस्त’ म्हणतात.)
अर्थात, याबद्दल त्यांना सर्वस्वी दोष देणे योग्य नव्हे. स्वतःचे डोके वापरण्याकरिता मुळात स्वतःला डोके असावे लागते. आणि, डोके असलेला संघोटा हा अनाघ्रात वेश्येहूनही दुर्मिळ. किंबहुना, ‘डोके असलेला संघोटा’ हे ‘वदतो व्याघातः’चे उत्तम उदाहरण आहे.
चालायचेच.)
वैदिक काळापासून भारतात धर्म…
वैदिक काळापासून भारतात धर्म संकल्पनेचा संबंध विशिष्ट पूजा पद्धतीशी नाही. कोणत्याही देवतेची पूजा केली तरी कुणीही विरोध करत नव्हते. धर्माच्या दहा लक्षणेत कोणत्याही देवतेचे पूजेचे विधान नाही.
विशिष्ट पूजा पद्धतीशी संबंधित धर्म प्रकार अब्राहीम स्थापित धर्म संकल्पनेत आहे. तिथेच कट्टरता वाढली आहे. आमचाच मार्ग श्रेष्ठ आणि जो आमचा मार्ग मानीत नाही त्याला जीवंत राहण्याचा अधिकार नाही. ही पूजा पद्धतीवर आधारित धार्मिक संकल्पना एक दिवस मानव जातीला नष्ट करणार. सर्वात आश्चर्य म्हणजे अधिकान्श निरीश्वरवादी याच कट्टरतेला खत पाणी घालतात. या कट्टरतेचा विरोध करणे सोडून ज्यांनाच्या वर आत्याचार होतात, त्यांचाच विरोध करतात.