Skip to main content

सरकार

दानोळीचे दादासाहेब गायकवाड सरकार हे मोठं प्रस्थ होतं. वतनदारी संपुष्टात आली असली तरी गायकवाड सरकार गावाचे राजाच असल्यासारखे होते. फक्त सरकारांनाच नव्हे तर सगळ्या गावालाच तसे वाटत होते. गावातल्या पेठेच्या एका टोकाला सरकारवाडा होता. म्हणायला एका टोकाला, पण खरं तर गावातच. वाड्यासामोर मारुतीचं देऊळ होतं, चावडी होती, ग्रामपंचायतीचं ऑफिस होतं. वाड्याच्या पुढे उजव्या हाताला बारा महीने पाणी असणारी स्वामी विहीर होती. सरकारवाड्याचा लाकडी दरवाजा मोठा आणि तेलपाणी करून चांगला निगा राखलेला होता. दरवाज्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या ढेलजेत बैलांच्या झुली, घोड्याचा खरारा, दावी, वेसणी असलं सामान ठेवलेलं असे. आतल्या बाजूला सरकारांचा रंगीत टांगा ठेवलेला असे. ग्रामदैवत भैरोबाची जत्रा असली की दर्शनाला सरकार टांग्यातून जात. गावाचे पाटील, कुळकर्णी यांच्या घरात लग्नकार्य असलं की सरकारांचा टांगा वऱ्हाडी मंडळींच्या दिमतीला असायचा. एरवी तो टांगा आणि त्याला जुंपण्यात येणारा तो उंचच्या उंच घोडा हे वाड्यावरच असायचे. पण म्हणून तो टांगा कधी धुळकट होत नसे, की तो घोडा कधी पारोसा दिसत नसे. घोड्याची निगा राखायला, टांग्याची साफसफाई करायला, त्याच्या चाकांना तेलपाणी करायला वाड्यावर वेगळी माणसं होती. गावातली एकमेव अम्बॅसिडर सरकारवाड्यात होती. तिचा वापर भरपूर होत असे. सरकारांची कर्नाटकातही भरपूर जमीन होती. वर्षातून एकदोनदा त्या शेतावरचे आंबे खायला किंवा हिवाळ्यात हुरडा खायला सरकारांची स्वारी तिकडं जात असे. गाडीच्या पुढच्या आणि मागच्या चारी खिडक्यांना आतून रेशमी पडदे लावलेले होते. गाडी शेजारून गेली तरी मागच्या सीटवरच्या मंडळींचं नखसुद्धा बाहेरच्या लोकांना दिसत नसे. कधीतरी ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसलेले दादासाहेब त्यांच्या बाजूचा पडदा बाजूला करत आणि काच खाली घेत. हातात जळती विल्स नेव्ही कट धरलेला दादासाहेबांचा गोरापान पुष्ट हात त्या मोटारीच्या खिडकीतून दिसला की रस्त्यावर येणारा जाणारा प्रत्येक जण बाजूला सरकून मुजरा करत असे. दादासाहेब आपल्या हाताने त्याचा स्वीकार करत आणि त्यांच्या हातातल्या हिऱ्यामाणकांच्या अंगठ्या चमकून उठत. खेड्यात नीळ घातलेल्या कपड्यांनाच पांढरे समजण्याच्या दिवसांत दादासाहेबांच्या शुभ्र नेहरूशर्टाचे अप्रूप वाटत असे. खेड्यातल्या कळकट लोकांमध्ये काहीशा स्थूल बांध्याचे आणि रेहमानसारखे रेशमी सुळसुळीत केस असलेले दादासाहेब एखाद्या राजपुत्रासारखेच दिसत असत. दर बुधवार-रविवारी सरकारांची गाडी मटण आणायला कोल्हापूरला जात असे. कोल्हापूरचा सरकारांचा ठरलेला खाटीक सरकारांसाठी शेलकं मटण राखून ठेवत असे. मोठ्या चकचकीत स्टीलच्या डब्यातून मटण घेऊन सरकारांची गाडी लगोलग माघारी फिरत असे. कमीत कमी दहा किलो बोकडाचं मटण. हे बोकडही बदाम-काजू खायला घालून मुद्दाम पोसलेले असत अशी गावात वदंता होती. बुधवार-रविवारी खाशी पंगत बसत असे. पंगतीला कुणी ना कुणी शाही पाहुणा असेच. शिवाय वाड्यावरची गडी माणसे, आला-गेला अशी गर्दी असे. ‘उरलं तरी चालेल, पण वाड्यावरचं जेवण कमी पडता नये’ अशी सरकारांची सक्त आज्ञा होती. त्यांच्या शाही पंगतीत चकचकीत ग्लासांत मुंबईहून खास आणलेली इंग्लिश असे. सरकार मद्याचे शौकीन होते, पण ते त्याच्या आहारी गेलेले नव्हते. बुधवार आणि रविवार सोडून इतर दिवशी त्यांचे ते काचेचे कपाट बंदच असे.
सरकारवाड्याच्या दरवाज्याच्या बाहेरून आतली बाग दिसत असे. सरकारवाड्यात गुलाबाचे शंभर प्रकार आहेत असा बोल होता. ते काय खरं का खोटं कुणाला माहीत, पण सरकारांना बागेचा शौक होता. कारखान्यांची बिलं आणायला दिवाणजी कोल्हापूरला जात तेंव्हासुद्धा येताना ते कारखान्याच्या नर्सरीमधून कधी चाफा, कधी जास्वंद अशी कलमं आणत असत. सरकारांच्या वाड्यात कधी प्रवेश मिळालाच तर त्यांच्या भल्यामोठ्या दिवाणाखान्यातल्या टेबलवर ठेवलेली ताजी सुगंधी फुले लक्ष वेधून घेत. खेड्यातल्या एकंदर कुबट वातावरणात ती फुले फारच उठून दिसत. सरकारांच्या दिवाणखान्यात मोजक्या लोकांनाच प्रवेश होता. इतरांना भेटण्यासाठी ढेलजेच्या आतल्या बाजूला एक लांबट खोली होती. तिथल्या टेबलाशी फिरत्या खुर्चीवर बसून किंचित पुढंमागं हेलकावत सरकार जनतेला भेटत. टेबलावरचा आतमध्ये रंगीत फुलं असलेला काचेचा पेपरवेट फिरवत फिरवत लोकांशी बोलण्याची त्यांची लकब होती. सरकारांचा तो दरबारच होता. दादासाहेब खानदानी खरे, पण ते मस्तवाल नव्हते. लोकांबद्दल त्यांच्या मनात कणव होती. सरकारांना भेटायला गावातले नाना प्रकारचे लोक येत असत. बहुतेक वेळा कसली तरी नड घेऊनच लोक सरकारांकडे येत. जुना काळ होता, लोक परिस्थितीने फार गांजलेले असत. कुणाच्या बँकेचा तगादा आलेला असे, कुणाच्या आईला थोरल्या दवाखान्यात न्यायचं असे आणि त्याच्याकडे तर दातावर मारायला सुद्धा पैसा नसे, कुणाची व्यायला झालेली पैलारू रेडी रेडकू आडवं आल्यानं मरून गेलेली असे, कुणाच्या लेकीला तिचा नवरा नांदवत नसे, तर कुणाची बायकोच नांदायला तयार नसे. एक ना दोन. सरकार काही प्रत्येकाला उचलून रोख देत नसत, पण त्यांच्याकडे आलेला माणूस तसाच परत आला असंही होत नसे. त्यांच्या शब्दांना पंचक्रोशीत मान होता. बऱ्याच वेळा त्यांच्या शब्दाने काम होत असे. शेजारी शेजारी असलेल्या दोन शेतकऱ्यांत शिवेवरून वाद होत असे. ‘सरकार, नामाचा जुलूम झाला सरकार. जर वर्सी फूट दोन फूट सरी आपल्या बाजूला सरकवून घेत हुता ह्यो नामा. शेजारी माणूस, कुठं तक्रार करत बसा म्हणून बोललो न्हाई मी, पर आता गुंठाभर रान खाऊन बसलाय बगा. का रं बाबा असं असं इच्यारल्यावर म्हनतो की तालुक्याची सरकारी मोजणी आण म्हून. आता लावण आली तोंडावर सरकार. मी लावणीचं बगू का तालुक्याला खेटं घालू सांगा बरं. आता तुमीच न्याव करा. तुमी काय कराल ते खरं. मी काय तुमच्या शब्दाभाईर न्हाई, सरकार’ असं म्हणत कुणी रामजी सरकारांच्या दरबारात येत असे. सरकार मग रामजीला बसायला सांगत आणि नामाला बोलावून घेत. आपली तक्रार रामजीने सरकारांच्या दारात आणली हे बघून नामा तरबत्तर होऊनच येत असे, पण सरकारांच्या समोर आवाज चढवायची त्याची छाती नसे. सरकार नामाला आधी बसायला सांगत. सगळ्यांसारखं त्याला प्यायला पाणी, कपभर गरम चहा येत असे. सरकारांच्या वाड्यावरचा चहा घेतला की त्याची गोडी दिवसभर तोंडात राहाते अशी प्रसिद्धी होती. घरातून चहा घेऊन सरकारांकडे आलेला माणूससुद्धा वाड्यावरच्या चहाला नाही म्हणत नसे. तसं गावाचं वळणच होतं. सरकारांच्या वाड्यावरच्या चहाला नाही म्हणणे म्हणजे सरकारांचा अनमान केल्यासारखंच होतं, आणि तसं करायचं धाडस कुणी करत असे. सकाळ-संध्याकाळ सरकारांच्या वाड्यात चहाचं आधण उकळत असे. येणाऱ्या-जाणाऱ्याला चहापाणी देणे या एकाच कामासाठी सरकारांनी भूपाल जुगळ्याला वाड्यावर ठेवून घेतलेलं होतं. वेलदोड्याच्या स्वादाचा गोड चहा सोनेरी कडा असलेल्या पातळ कपबशीतून पिताना नामाचा निम्मा आवेश उतरत असे. सरकारांची आणि आपली कपबशी एकसारखीच आहे हे लक्षात आल्यावर तर नामा शरमूनच जात असे.
“नामा,” सरकार पेपरवेट फिरवत मृदू आवाजात म्हणत. “तुझ्या काकीला जास्त झालं होतं, ते तुला आठवतंय काय रे बाबा?”
नामाला ते आठवत असे. पण तो शरमून काही बोलत नसे.
“आमच्या चंद्राबाईचा, बरं का, नामाच्या काकीचा, ताप हटत नव्हता.” सरकार खाली सतरंजीवर दाटीवाटीनं बसलेल्या लोकांना सांगत असत. हे असं करायला त्यांना फार आवडत असे. आपण सांगतोय आणि सगळे लोक कान देऊन ऐकताहेत या भावनेने त्यांचा चेहरा फुलून येत असे. “बाईनं दुखणं अंगावर काढलं आणि एके दिवशी ती डोळे पांढरे करून पडली.” सरकार पुढे सांगत. “नामाचा चुलता पायावरनं वारं गेल्यासारखा खाली बसला. त्याला काय सुधरंना. घरात दुसरं कोण माणूस ना काणूस. मी मुंबईला गेलो होतो आणि मला यायला रात्र होणार होती. रामजीचा बाप शेतावरनं घराकडं आला होता. त्याला बातमी कळली तसं पाणीसुद्धा न पिता त्यानं गाडी जुंपली. तासाभरात चंद्राबाईला तालुक्याच्या दवाखान्यात घेऊन गेला आमचा काशिनाथ. रामजीचा बाप. तालुक्याचे डॉक्टर मला दुसऱ्या दिवशी म्हणाले की वेळेवर आणलं त्या बाईला तिच्या भावानं म्हणून बाई वाचली. त्याचं नाव गाव काही माहीत नव्हतं बरं का त्या डॉक्टरांना , पण तिच्या भावानं तिला दवाखान्यात आणलं असं म्हणाले ते. एवढ्या काळजीनं घेऊन आला गडी, म्हणजे तो भाऊच असणार असं वाटलं त्या डॉक्टरला. नामाची काकी शुद्धीवर आली आणि आमच्या काशीनाथच्या पायावर पडून नामाचा चुलता म्हणाला की रक्ताचा भाऊ पण करणार नाही एवढं केलासा, आता तुमचं रीण कसं फेडावं आम्ही?”
रामजीला तीन वर्षांपूर्वी खरचलेल्या आपल्या भल्या बापाची आठवण येई. तो पटक्याच्या शेमल्याने डोळे पुसे.
“नामा, हेच घेऊन तिकडं जायचं आहे रे गड्या.” सरकार नामाकडे बघत म्हणत. “गुंठाभर रान घेऊन जायचं नाही का गुंजतोळा सोनं घेऊन जायचं नाही तिकडं. काशीनाथ जाऊन आता तीन वर्षं झाली. अजूनही गाव नाव काढतो त्याचं. हेच कमवायचं असतंय रे. सगळं काय तू भल्या-बुऱ्या मार्गानं मिळवशील ते सगळं एका झटक्यात सोडून जायचं आहे बघ.भांडशील, तक्रार करशील तर तू, तुझी पोरंबाळं भोगतील. चार लोकांचं बरं करशील, तर पुण्य बांधून घेशील. काय करायचं ते तू ठरव.”
“सरकार,” नामा हात जोडत असे. “आता ह्याच्या म्होरं काही बोलू नका, सरकार. चुकी झाली. एकडाव माफी करा.” चहाची कपबशी खाली ठेवून तो शरमून एका कोपऱ्यात उभा राहात असे. रामजी आणि नामा यांचा तंटा आपसात मिटत असे. आमचा काशीनाथ, आमची चंद्राबाई असं सरकार म्हणायचं म्हणून म्हणत नसत. त्यांची तशी भावनाच असे. रामजी पुढच्या बुधवारी दोन मोठ्या पिवळ्याजर्द पपया घेऊन सरकारवाड्यावर येत असे. गुऱ्हाळाच्या दिवसांत नामा कुणाच्या तरी हातनं किटलीभर काकवी सरकारांकडे पाठवून देत असे. सरकारांना मळ्याकडं चालत जाताना बघून रामजी अदबीनं रस्त्याच्या कडेला होत असे. सरकार हसून विचारत, “काय रामजीबाबा, खुशाल?”
“व्हय जी, व्हय सरकार.” रामजी हात जोडून म्हणत असे. सरकार समाधानाने हसत.
सरकारांची बऱ्याच ठिकाणी जमीन होती. नक्की किती होती ते दादासाहेबांनाही सांगता आलं नसतं. ते सगळं खातं दिवाणजी बघत असत. वाटेकरी, त्यांचे हिशेब, वाटण्या, कुठल्या जमिनीत काय पिकं घ्यायची याचं नियोजन, बी-बियाणं, मशागत, बैलजोडी, गडीमाणसं हे सगळं दिवाणजींच्या अखत्यारीत येत असे. हे सगळं शेतीच्या कामाचं, पण याच्याशिवाय पण हजार भानगडी असत. एखाद्या वाटेकऱ्याच्या घरात त्याच्या मुलीचं लग्न ठरलेलं असे आणि त्याची पैशांची जुळणी होत नसे, त्याला आगाऊ रक्कम पाहिजे असे, एखाद्याची म्हातारी आजारी असे, तिच्या दवापाण्यासाठी त्याला उचल पाहिजे असे, एखाद्याच्या घराची भिंत सुटलेली असे, त्याला ती सोडवून बांधून घ्यायची असे. शिवाय रोजच्या मीठ मिरचीला उचल लागतच असे. दानोळीचा बाजार बुधवारचा. मंगळवारी सगळे वाटेकरी दिवाणजींना भेटायला येत. दिवाणजींनी हिशेब करून पैसे काढून ठेवलेले असत. काढून म्हणजे आडत्याकडून आणूनच . सगळा शेतीमाल शेजारच्या गावात आडत्याकडे लावलेला असे. सौदा झाला की आडत्याकडची पट्टी येत असे. पण बहुदा त्याच्या आधीच पैशांची नड भागावायला उचल केलेली असे. उत्पन्न जेमतेमच होतं पण सरकारांनी त्याची कधी फारशी फिकीर केली नाही. त्यांच्या शेतातले वाटेकरी वाटणीत लबाडी करत. सरकार येणार अशी खबर लागली की आदल्या दिवशी फडातली शेलकी वांगी, मिरच्या काढून गुपचूप बाजाराला पाठवत. वेलींवरचे दोडके, भोपळे तोडून डालग्यात घालून आपल्या खोपीत नेऊन ठेवत. नारळाच्या झाडाचे नारळ उतरवून आपल्या घराकडे लावून देत. धान्याची मळणीसुद्धा सरकारांच्या नजरेसमोर करत नसत. दोन दिवस आधी किंवा दोन दिवस नंतर. पण सरकार शेतावर येणार म्हटलं की त्यांच्यासमोर पळून खेळत. सरकारांना, वहिनीसाहेबांना बसायला स्वच्छ कांबळं किंवा जेन, टेकायला भाताचं नाहीतर गव्हाचं काड भरलेला तक्क्या, आल्याआल्या गूळपाणी, मग भाजलेल्या किंवा उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, मक्याची कणसं, त्याला तोंडी लावायला तळलेल्या तिखट मिरच्या, गुळाची चिक्की, वहिनीसाहेब चहा पीत नसत म्हणून त्यांच्यासाठी म्हशीच्या दुधात केलेली कॉफी असला सगळा थाट करत. सरकार खूष होत. उकडून वाळवलेली एखादी शेंग फोडताना त्या वाटेकऱ्याला सहज म्हणून विचारत,“गणपा, रामफळाच्या झाडाला यंदा काही फळ नाही होय रे?”
“न्हाई वो सरकार, माकडं काय टिकू दीनात. शेवग्याच्या शेंगा म्हून न्हाई, पाला म्हून न्हाई. आंब्याचं, रामफळाचं एक म्हून एक फळ टिकू दीनात बगा”
“एवढी कुठली माकडं आली रे?”
“काय कळंना वो सरकार. कुटनं आली बैदा काय कळंना. पंचविसाची टोळी हाय बगा. दोन दांडगं हुप्प्या हायती पुरूसभर आनि बाकी माकडिनी. पोटाला पोरं बांदून घ्यून दनाना उड्या मारतात बगा. ही कनसं पन तुमी येनार म्हून राखान करून टिकवलो बगा” गणपाने दोनच दिवसांपूर्वी शेडबाळच्या बाजारात गाडीभर कणसं विकलेली असत.
परत जाताना गाडीत वहिनीसाहेब सरकारांना म्हणत,”गणपा लबाड मनुष्य आहे. माकडं काय फक्त आपल्याच शेतावर आली असतील होय? येता जाताना आपण बघितलंच की. लोकांच्या रानात पेरू आहेत, आंबे आहेत, सगळं आहे ..”
सरकार गालातल्या गालात हसत. हातातल्या सिगारेटचा झुरका घेऊन म्हणत,” अहो, ते आमच्या लक्षात आलं नसेल असं तुम्हाला वाटलं का? गणपानं कणसं काढली असणार, फळं उतरवली असणार, सगळं केलं असणार. पण असं बघा, आपल्याला, आपल्या मुलाबाळांना काही कमी पडतंय का? समजा त्यानं दिली असती पोतंभर कणसं, तर आपण काय ती सगळी खाणार होतो का? बिचारा गरजू माणूस आहे. पोराबाळांचं मोठं लेंढार आहे. त्याची आपली अशी काही जमीन नाही. आपली जमीन करतोय बिचारा. रान स्वच्छ आहे, भांगलंण, औत वेळेवर करतोय, तर आपण बाकीचं सोडून द्यावं. गरीबी अशी लबाडी करायला लावते माणसाला. चार कणसं त्याच्या पोराबाळांच्या मुखात गेली म्हणून काय बिघडलं? सोडून द्यावं झालं.”
“तर तर! गरीब म्हणे!” वहिनीसाहेब ठसक्याने म्हणत. चोरी करायची ती करायची आणि वर हा साळसूदपणा...”
“आणि असं बघा,” सरकार सिगारेट ओढत म्हणत, “तो जे चोरतो, त्यातला निम्मा हिस्सा त्याचाच असतोय की नाही. बिचारा भाबडा आहे. आपल्याच मालकीतली आपण चोरी करतो आहोत हे त्याला कळत नाही.”
“मला काही तुमची विचार करण्याची पद्धतच कळत नाही.” वहिनीसाहेब म्हणत. “जरा म्हणून हिशेबीपणा करायचा नाही..”
पण सरकारांनी खरेच कधी हिशेबीपणा केला नाही. त्याच्या घरी सकाळ संध्याकाळ मळ्यातून म्हशीचं दूध येत असे. त्या किती म्हशी आहेत, त्यातल्या दुभत्या किती, गाभ किती आणि भाकड किती, किती म्हशी दूध देतात, किती नाही याची सरकारांनी कधी पंचाईत केली नाही. वाटेकरी वर्ष-सहा महिन्यांतून कधीतरी वाड्यावर येई आणि ढेलजेत हात जोडून उभा राही. सरकारांना त्याची वर्दी गेल्यावर ते सिगारेट ओढत बाहेर येत. त्यांना बघून वाटेकरी मुजरा करी.
“काय काय बाबू?” सरकार विचारत.
“काय न्हाई, काय न्हाई जी.” बाबू संकोचून म्हणत असे.
“काय सगळं आराम?”
“व्हय जी, व्हय सरकार.” बाबू म्हणत असे. दोनपाच मिनिटं अशीच शांततेत जात. सरकार सिगारेट विझवून थोटूक बाजूला फेकून देत.
“का आलावतास बाबू?”
“सरकार, म्हस येली काल, गिन्ना घ्यून आलतो.”
“बरं बरं. आनंद आहे. काय झालं रे? रेडी का रेडा?”
“रेडी झाली, सरकार.”
“बरं झालं. घरची म्हैस झाली.” सरकार संतोषानं म्हणत.
“खरं सरकार, आता रेडीला म्हशीचं एक थान दूद सोडायला लागणार.” बाबू म्हणत असे.
“मग?”
“न्हवं, मग वाड्यावर दूद फुरणार न्हाई, सरकार.”
“मग काय करावं म्हणतोस, बाबू?”
“एक यायला झालेली म्हस घ्यावी सरकार. तरणी असावी, पर एकदम पैल्या येताची नको. आमच्या जनवाडच्या पावण्याची गवळारु म्हस हाय बगा. दोन येतं झालेली हायेत, तिसऱ्याला आता गाब हाये. तुमी म्हनत असला तर इचारुन बगतो मी.” बाबू म्हणत असे.
“बघ. तू आणि दिवाणजी मिळून ठरवा. एक चांगला दिवस बघा आणि जाऊन बघून या म्हैस. चांगली असेल तर घेऊन टाकू आपण. दिवाणजी बघतील ते पैशाचं वगैरे.”
मग ती म्हैस विकत घेतली जाई. किती पैसे, बाजारभाव किती हे सगळं बाबू आणि दिवाणजी बघत. सरकार फार फार तर कधीतरी बाबूला विचारत असत. “बाबू, त्या आपल्या रेडीला दूध कमी पडत नाही ना रे, बाबा?” त्यापलीकडे काही बोलणं नाही की चालणं नाही.
सरकारांची काही कोर्टकचेरीची प्रकरणं होती. त्यांसाठी त्यांना वरचेवर मुंबईला जावं लागे. सरकार कधीही एकटे गेले नाहीत. कायम दोन माणसं बरोबर. सगळे रेल्वेच्या फर्स्टक्लासने जात. सरकारांचा वेगळा कूपे असे. सगळे लोक एकाच हॉटेलमध्ये राहात. सरकारांची एक खोली, इतरांची दुसरी. त्यातही कधी उजवं डावं नसे. जशी सरकारांची खोली, तशीच त्यांच्या बरोबर असलेल्यांची. सगळ्यांचं खाणं-पिणं एकत्रच. एकदा कधीतरी त्यांच्या दिवाणजीने त्यांच्यासमोर हा विषय काढला होता. “खर्च फार होतोय. सरकार” ते म्हणाले होते.
“दिवाणजी, आपल्या कामासाठी आपण लोकांना बरोबर घेऊन जातो, मग आपण फर्स्टक्लासनं जायचं आणि त्यांना सेकंड क्लासमधनं यायला सांगायचं हे बरं दिसतं का सांगा बरं? आपण एका ठिकाणी राहायचं, जेवायचं आणि त्यांनी दुसऱ्या ठिकाणी हे काही योग्य आहे का? खर्च होतोय तर होऊ द्या. आपली कामं महत्त्वाची आहेत, कामापेक्षा आपली माणसं महत्त्वाची आहेत.”
दिवाणजी काही बोलले नाहीत.
त्या महत्त्वाच्या माणसांनी सरकारांच्या दिलदारपणाचा, बेहिशेबीपणाचा फार फायदा घेतला. सरकारांची मुलं कोल्हापूरला शिकायला होती. त्यांना द्यायला म्हणून सरकारांच्याकडून पाच हजार रुपये घ्यायचे आणि त्यातले पोचवायचे चारच हजार असंही लोकांनी केलं. बेबीसाहेबांना वाटे, तेवढेच पाठवले असतील, सरकारांना वाटे, पाठवले तेवढे पोचले असतील. त्या दोघांची रुजवात होईपर्यंत दोघेही ते विसरून गेलेले असत. सरकारांच्या कोर्टाच्या कामात तर वकील मागतील तेवढे पैसे द्यायचे एवढंच सरकारांना माहीत होतं. भाऊबंदकीतलं जमीनीचं एक मोठं प्रकरण सगळे कागद त्यांच्या बाजूने असूनही खालच्या कोर्टात त्यांच्या विरोधात गेलं तेंव्हा वरच्या कोर्टात अपील करायला सरकारांनी नकार दिला. घरच्यांनी सांगितलं, वकिलांनी सांगितलं, पण सरकार आपल्या निर्णयापासून ढळले नाहीत. “आपल्या नशीबात नव्हतं म्हणायचं ते रान. आता जखम झालीच आहे, ती चिघळवण्यात काही अर्थ नाही” असं ते त्या वेळी म्हणाले. “आपण काही अगदी रस्त्यावर बसलो नाही. जेवढं आहे ते आपल्याला गरज आहे त्यापेक्षा जास्तच आहे” असंही ते म्हणाले. पण आता दिवस बदलत चालले होते. नामा आणि रामजी आता अंथरूणाला खिळले होते आणि त्यांची मुलं शीवेवरून एकमेकाला तोडण्याची भाषा करत होती. मटण आणायला गाडी कोल्हापूरला जायची तर लोकांनी त्या गाडीच्या पेट्रोलच्या खर्चातनं गाळा काढायला सुरुवात केली होती. दिवाणजींचं आता वय होत आलं होतं. सगळे हिशेब आता त्यांच्या लक्षात येत नसत. लोकांनी त्याचाही फायदा घ्यायला सुरुवात केली. वाड्यात वावरणाऱ्या नोकरा-चाकरांनी घरातल्या लहानसहान गोष्टी लांबवायला सुरुवात केली. या गोष्टी सरकारांच्या लक्षात आल्या नसतील, किंवा त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं असेल, काय झालं कुणास ठाऊक. त्याच दरम्यान वहिनीसाहेबांची तब्येत बिघडली. त्यांना गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. कोल्हापूरच्या डॉक्टरांनी ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं. ऑपरेशन कोल्हापुरात होईल, आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, इथं करूया, मुंबईपेक्षा कमी खर्च येईल असं डॉक्टरांनी सरकारांना परोपरीनं सांगून बघितलं. पण सरकार ऐकायला तयार नव्हते. वहिनीसाहेबांचं ऑपरेशन होऊन त्या खडखडीत बऱ्या होईपर्यंत सहा महीने सरकार आणि त्यांची दोन्ही मुलं मुंबईच्या एका तारांकित हॉटेलात राहिले. दिवाणजी महिना-पंधरा दिवसांतून रोख रक्कम घेऊन येत, सरकारांच्या चेक आणि इतर कागदांवर सह्या घेत. सरकार ते काय कागद आहेत हे न बघताच त्यांच्यावर सह्या करत. दिवाणजी घराशी, शेतीशी संबंधी काही गोष्टी सरकारांना सांगण्याचा प्रयत्न करत. सरकार कधी ऐकल्यासारखं करत, कधी तेही नाही.
वहिनीसाहेब बऱ्या झाल्या आणि त्यांना घेऊन सरकार दानोळीला परत आले तेंव्हा सरकारवाड्याचा चेहराच बदलला होता. आता खर्च झेपत नाही म्हणून दिवाणजींनी वाड्यावरच्या निम्म्याहून अधिक नोकरांना रजा दिली होती. वाड्यावरचा चहा बंद झाला होता आणि भूपाल जुगळे आता दुसऱ्यांच्या शेतावर मजुरीला जात होता. घोडा होता, पण तोही आता कितीतरी दिवस खरारा न केल्यासारखा दिसत होता. गाडी नादुरुस्त होऊन पडली होती. वाड्यासमोरची बाग सुकल्यासारखी झाली होती.. वहिनीसाहेबांच्या उपचाराला कर्नाटकातली सगळी जमीन गेली होती. दानोळीच्या आसपासच्या जमिनींच्या सातबारावर कर्जाच्या नोंदी झाल्या होत्या. घरातल्या बऱ्याच मौल्यवान वस्तू दिसेनाशा झाल्या होत्या. सरकारही आता थकल्यासारखे झाले होते. कधी नव्हे ते त्यांच्या चेहऱ्यावर दोन दोन दिवसांची पांढरी दाढी दिसू लागली होती. त्यांचा मुळातला देखणा चेहराही आता थकलेला, सुजट दिसू लागला होता. ते त्यांच्या त्या लांबट खोलीमध्ये ते येऊन बसत, पण त्यांचा दरबार काही जमत नव्हता. एखाद-दुसरा माणूस कधी येत असे, कधी नाही.
बँकेच्या कामासाठी कोल्हापूरला जायचं होतं. गाडी असून नसल्यासारखीच होती. सरकारांनी दिवाणजींना गावात दुसऱ्या कुणाची गाडी आहे का त्यांची चौकशी करायला सांगितलं. आता गावात दोन गाड्या होत्या, पण त्यातली एकही मोकळी नव्हती. मोकळी नव्हती म्हणा किंवा त्यांच्या मालकांना द्यायची नव्हती म्हणा.
“आता?” सरकारांनी विचारलं.
“दुसरी काही व्यवस्था होणार नाही, सरकार. दहाची एस्टी आहे.” दिवाणजी सरकारांची नजर टाळत म्हणाले. सरकार काही बोलले नाहीत. निमूटपणे ते आंघोळीला उठले. आयुष्यात पहिल्यांदाच सरकार चालत एस्टी स्टँडवर आले. काही लोक नमस्कार करत होते पण सरकारांचं त्याकडे लक्षच नव्हतं. दहाची एस्टी आली. तोबा गर्दी होती. बोजा सावरत सरकार कसेतरी एस्टीत चढले. त्यांचे कपडे आता मळल्यासारखे दिसत होते. बसायला जागा नव्हती. सरकार उभेच राहिले. त्यांनी बसलेल्या लोकांकडे बघितलं. हा आप्पा चौगुले. याच्या पोराला अटक झाली होती तेंव्हा त्याला जामीन मिळवून द्यायला आपणच मदत केली होती. आप्पा सरकारांची नजर टाळत होता. हा जहांगीर शेख. सायाकलचं दुकान काढायला भांडवल पाहिजे होतं तेंव्हा आपण बँकेत फोन केला होता. हा अशोक कांबळे. याच्यामागे तर त्याच्या भावकीतले लोक तलवार घेऊन लागले होते. आपल्या मध्यस्थीमुळं तो वाचला. किती ओळखीचे लोक, किती अनोळखी लोक. त्यांच्यातलं कुणीही उठलं नाही.
सरकारांना कोल्हापूरपर्यंत बसायला जागा मिळाली नाही.
आता सरकार वाड्याबाहेर पडेनासे झाले होते. पैशांची तंगी आता जाणवायला लागली होती. उत्पन्न कमी झालं होतं, पण खर्च तेवढाच होता. सरकारांचं पिणं बेसुमार झालं होतं. खाणं काय कधी खाल्लं तर खाल्लं, नाही तर नाही असं झालं होतं. मुळात स्थूलसर असलेल्या सरकारांचं वजन आता फार वाढलं होतं. निगा नसल्यामुळं वाडा आता भकास दिसायला लागला होता. गाडी-घोडं सगळं नाहीसं झालं होतं. दिवाणजी आता फारसे येत नसत. आले तर सरकारांच्या समोरच्या खुर्चीत बसून राहात. दोघेही तासनतास एक शब्दही बोलत नसत. शेवटी डोळे टिपत दिवाणजी उठत. “येतो सरकार.” म्हणत. सरकार एक हात उंचावत. दिवाणजी काठी टेकत हळूहळू पावले टाकत वाड्याबाहेर पडत. वाटेकरी येत, कधी एखादं चुंबडं ज्वारी, गहू, हरभरा आणत. कधी भाजी बाजारात विकली, कडबा शेजाऱ्याला विकला असला हिशोब सांगून चुरगाळलेली दहा रुपयांची, वीस रुपयांची नोट सरकारांच्या समोर ठेवत. सरकार निरिच्छपणे त्या नोटांकडं बघत आणि टेबलाचा ड्रॅावर उघडून त्यात ती नोट ढकलत. सरकारांना भेटायला आता फारसं कुणी येत नसे. त्यांना कामं सांगायला तर कुणीच नाही. काही लोक येत. सरकार मनात आलं तर त्यांच्याशी बोलत, नाही तर नाही. त्यातल्या त्यात नेहमी येणाऱ्या माणसांपैकी एक म्हणजे दत्ताजीराव कुलकर्णी. दत्ताजीराव सरकारांच्या खास मर्जीतले मित्र होते. सरकारांच्या इतक्या जवळचे संबंध असूनही ज्यांनी सरकारांकडून कसलाही लोभ ठेवला नाही अशा मोजक्या लोकांपैकी एक. सरकार परत आल्यानंतर दत्ताजीराव सरकारांना बऱ्याच वेळा भेटायला येऊन गेले होते. आज ते सरकारांना भेटायला आले होते. भेट हे एक कारण होतंच, दुसरंही एक होतं.
दत्ताजीराव त्यांच्या पत्नीला घेऊन आले होते. आले, बसले. सरकार दिवाणखान्यात बसले होते. वहिनीसाहेबही बाहेर येऊन बसल्या. सरकार थकल्यासारखे दिसत होते. राजघराण्यातले हे राजबिंडे लोक, आता यांची सगळी रयाच गेली.. दत्ताजीरावांच्या मनात आलं. त्यांनी पिशवीतून टोपी काढली, घातली. आपल्या पत्नीसह ते सरकारांच्या समोर आले. सरकारांच्या हातात त्यांनी पत्रिका ठेवली, नमस्कार केला.
सरकार थोडा वेळ काही बोलले नाहीत. त्यांनी पत्रिका उघडून बघितली. वाचली. मग टेबलवर ठेवली.
चहा आला.
सरकार उठले. “दत्ताजीराव, एक मिनिट.”ते म्हणाले.
दत्ताजीराव सरकारांच्याबरोबर त्या लांबट खोलीत आले. सरकारांनी खोलीचं दार ओढून घेतलं. “बसा.” ते म्हणाले.
“दत्ताजीराव, तुम्ही आमचे मित्र.” सरकार म्हणाले. “तुमच्या मुलाचं लग्न ठरलं आहे, तेही थोरल्या मुलाचं. खरं तर आम्ही तुम्हाला, तुमच्या मंडळींना, मुलांना आमच्या वाड्यावर जेवायला बोलवायला पाहिजे. केळवण केलं पाहिजे, तुम्हाला सगळ्यांना आहेर केला पाहिजे. सगळं शिस्तीत व्हायला पाहिजे. आमची शान सांभाळली गेली पाहिजे.सगळं असं व्हायला पाहिजे, दत्ताजीराव ”
दत्ताजीराव संकोचल्यासारखे झाले होते. ते काहीच बोलले नाहीत.
“पण तुम्हाला आमची परिस्थिती दिसतेच आहे.” सरकार म्हणाले. “बडा घर पोकळ वासा असंतरी कसं म्हणणार? आता घरसुद्धा बडं राहिलं नाही. आता नुसतेच पोकळ वासे राहिले आहेत. आम्ही काही सांगावं आणि ते व्हावं असे दिवस राहिले नाहीत, दत्ताजीराव. दिवस बदलले आता ” सरकारांचा आवाज कापल्यासारखा झाला होता.
“तेंव्हा, आम्हाला माफ करा, दत्ताजीराव.” सरकारांनी हात जोडले. त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहायला लागले होते. दत्ताजीराव लगबगीनं उठले. त्यांनी सरकारांचे हात आपल्या हातात घेतले. भव्य पण जुन्या, पडायला आलेल्या त्या वाड्याच्या अवशेषांत ती दोन सज्जन माणसे हातात हात घेऊन काही न बोलता थोडा वेळ उभी राहिली.

Node read time
15 minutes
15 minutes