बावनपानी
पडदा उघडतो. स्टेजवर मंदसा प्रकाश. स्टेजच्या डाव्या बाजूला (stage left) एक झाड. त्याखाली टायर, पाने, टामी वगैरे गॅरेजची अवजारे पडली आहेत. स्टेजच्या मध्ये एक लाकडी बाकडे.
इथे वातावरण निर्मिती मोठ्या हमरस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकच्या अड्ड्याची हवी. कथानायकाच्या स्वगतांमधून आणि प्रसंगी अनेक संवादांमधून वाहनांचे आवाज, हॉर्न हवेत. रस्त्यावरच्या जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांचे लाईट्स दाखवून, नाटकात रस्त्याचा फील निर्माण करणं आवश्यक. जड वाहने, ट्रक्स इत्यादींचा फील नेपथ्य नि प्रकाश नि ध्वनितून कसा निर्माण करायचा ते बघणं आवश्यक.
एक मध्यमवयीन माणूस स्टेजच्या उजव्या बाजूने (stage right) प्रवेश करतो. काळी/निळी पँट, आणि पांढरा शर्ट. शर्टाच्या गळ्याच्या बाजूला मोठासा निळा डाग. शाईसारखा. माणसाच्या हातात, खांद्यावर इतर काहीही नाही.
तो माणूस स्टेजवर इथून तिथे, तिथून इथे असा हिंडतो आहे. (या वेळात “अमुक तमुक सादर करीत आहे…” वगैरे घोषणा करायच्या तर करून घ्याव्यात.) मध्येच तो चोरून प्रेक्षकांकडे बघतो. मग धीर चेपून आणखी बघतो. मग एक तर्जनी उचलून ‘चौथ्या भिंती’ला स्पर्श करतो.
अचानक चुर्रर्र…चर्रर्र असा इलेक्ट्रिक ठिणग्या पडल्यासारखा आवाज येतो. (प्रेक्षकांना चौकन्ना करून शांत करण्यासाठी याचा उपयोग होईल.)
माणूस : (प्रेक्षकांकडे बघत) येतंय? येतंय? ऐकू येतंय? हॅलो, हॅलो? अहो, येतंय का ऐकू?
माणूस : (सुटल्यासारखा चेहरा करत) हां! म्हणजे चालतोय हा प्रकार! तर मंडळी – नमस्कार, हॅलो, आदाब, सत श्री अकाल, आणि काय पाहिजे ते. इथे आलात, त्याबद्दल आभार, आणि माझ्याशी बोललात म्हणून दुप्पट आभार. पण खरं तर तुम्ही माझे आभार मानले पाहिजेत – कारण मेलेल्या माणसाशी बोलायचे प्रसंग किती येतात आयुष्यात? आं?
(उत्कंठावर्धक पार्श्वसंगीत)
माणूस : हो! खरं आहे ते. मी मेलो आहे. मी मेलेलो आहे. मरून गेलो आहे. मारून टाकलं आहे??
बहुतेक.
कोणी आणि का, मला माहीत नाही. तेच शोधायचं आहे, म्हणून मी इथे आलो आहे. आणि तुम्ही इथे आला आहात.
माणूस : (बाकड्यावर बसत) झालं असं, की मी मेलो हे मला सुरुवातीला कळलंच नाही. ब्लॅक औट झाला होता. आता तुम्हांला खरं सांगायचं तर त्या दिवशी जरा लिटिल लिटिल (अंगठा तोंडाकडे नेत) घेतली होती. अगदी लिटिल नाही, लिटिलपेक्षा थोडी जास्तच. कारणच तसं होतं. पण ते सगळं नंतर सांगतो, कारण त्या कारणाचा, आणि माझ्या मरणाचा – हाऊ पोएटिक! कारणाचा मरणाचा! – तर कारणाचा मरणाशी संबंध आहे. ते नंतर. तर इथून – या झाडाखालून जात असताना – माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली, मी बेशुद्ध पडलो. नंतर उठून बघतो तर मी हा असा – शरीराबाहेर, आणि बॉडी पडलेली पालथी झाडाखाली. पोलीसबिलीस. पंचबिंच. बाकी सगळं ते. आता सांगत बसत नाही.
मेल्यानंतर माणसाचं काय होतं, तुम्हाला उत्सुकता असेल. आणि आपली स्थिती आत्ता अशी आहे, की मी काहीही सांगितलं तरी तुम्ही विश्वास ठेवाल. स्वर्ग-नरक-जन्नत-जहन्नुम. यम-चित्रगुप्त. पण मी माझ्या अनुभवातलं खरं सांगतो. (पॉज घेतो.)
ते असं – की अजून मला माहीत नाही काय होतं मेल्यानंतर. कारण माझा देह मेलेला असला, तरी “मी” अजून संपलेलो नाही. “माझं” अस्तित्व अजून शिल्लक आहे. आत्मा किंवा जे काही असतं ते प्रवाहात मिसळलेलं नाही.
असं का व्हावं?
(पॉज घेऊन) तुम्हांला वाटेल आता मी काहीतरी तत्त्वज्ञान सांगणार. आत्मा – मुक्ती – भवसागर – मोक्ष वगैरे. पण नाही. मला कळलं आहे ते कारण अगदी साधं आहे. फालतूच म्हणा ना.
सध्या त्यांच्यावर कामाचा लोडच खूप आहे हो! फार माणसं मरताहेत. बघा ना – रोगरायाच किती आहेत – करोना झाला, डेंग्यू. डेंगी. मग चिकुन गुनिया. हल्ली काय, तर झिका. नवीन निघालाय मार्केटमध्ये. बरं मग अतिवृष्टीच होते. पूलच कोसळतात. काय न काय. बरं एक माणूस मेला, की त्याच्या पाप-पुण्याचा हिशोब. मग त्यावरून ते लोक ठरवणार पुढे काय ते. अशी सगळी प्रोसेस असते. तर अशी पोत्यानं माणसं मरायला लागली, तर प्रत्येकाला प्रोसेस करायला वेळ लागणार ना! मी ऐकलंय सात-आठ, कधी पंधरा दिवस सुद्धा लागतात. तोपर्यंत आम्ही असे मध्येच लटकून राहतो. आता तुम्ही याला काय म्हणाल? “भटकती आत्मा” वगैरे रामसे बंधू स्टाईल काहीतरी म्हणता येईल. पण बेसिकली परळ यष्टी आगाराच्या वेटिंग रूमसारखी स्थिती म्हणा.
पण वाईटातून चांगलं निघतं. निघू शकतं. माझंच बघा. पाच दिवस झाले मरून. का मारलं? माहीत नाही. कोणी मारलं? आजिबात माहीत नाही. ते सगळं शोधायला हा मधला वेळ वापरतो.
कसा मेलो, हे मात्र माहीत आहे. हे बघताय ना? (गळ्याकडे बोट दाखवत.) हे माझं रक्त. आपल्याकडे स्क्रीनवर सगळी रक्तं निळी दाखवतात. म्हणून हेही निळं आहे. ते जिथून येतंय त्याला म्हणतात डावी कॅरोटिड आर्टरी. आपल्या मेंदूला रक्त पुरवणाऱ्या दोन कॅरोटिड आर्टरीज् असतात – एक डावीकडे एक उजवीकडे. त्या रात्री कोणीतरी खचकन माझी डावी कॅरोटिड आर्टरी कापली. रक्त वाहिलं, शर्टावर पसरत चाललं. मी मेलो. हे रक्त संपायच्या आधी मला शोधून काढलं पाहिजे मला कोणी मारलं.
ही सगळी माहिती मला कोण देतं आहे? मला कसं कळतं आहे? हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. सिक्रेट आहे म्हणून नव्हे; मला सांगता येणार नाही म्हणून. टिपू सुलतानाला व्हॉट्सॲप कसं चालतं सांगता येईल का? तसं आहे हे. तुम्हाला स्वतः मेल्याशिवाय हे संदेशवहन कसं चालतं कळणार नाही.
असो, पण तुम्ही मला मदत करणार आहात. कारण… कारण…
(खिशात हात घालून पत्त्यांचा कॅट काढतो.)
कारण हे.
माणूस : मी मेलो तेव्हा माझ्या खिशात फक्त हा कॅट होता. बाकी काहीही नाही. चिठ्ठीचपाटी नाही, मोबाईल नाही, काहीच नाही. आणि हा कॅट मी ओळखतो. हा मी जिंकला आहे. होता. एका अर्थी बघायचं झालं तर हा माझ्या आयुष्याचा कॅट आहे.
आता तुम्हाला सगळं बयाजवार सांगायला लागणार.
माझं नाव … जाऊ दे, नाव ऐकून काय कराल तुम्ही. मी काय करायचो ते जास्त महत्त्वाचं आहे. मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होतो. आणि इन्शुरन्स एजंटचा साईड बिझनेस केला. लग्न केलं, मुलगी आहे एक मला. माझं घरच्यांशी कधी फार पटलं नाही. कारण? कारण (कॅट उंचावून) हे.
आपल्याला कार्ड्सची सवय आहे.
(संगीत)
माणूस : माणूस एक विचित्रच असतो. एकदा मला एक ड्रायव्हर भेटला होता. ताजं ताजं टक्कल केलेलं, नुकताच जवळच्या व्यक्तीच्या मयताला जाऊन आलेला असावा. मी आपलं विचारलं, कोण ऑफ झालं? मला म्हणाला, सासरे. म्हटलं, अरेरे, वाईट झालं. कशानं गेले? तर म्हणाला, त्यांना जरा “लिक्विडचा प्रॉब्लेम” होता! मला बराच वेळ कळलंच नाही, की “लिक्विडचा प्रॉब्लेम” म्हणजे काय! शेवटी त्याने असं करून दाखवलं (अंगठा तोंडाकडे नेतो) – तेव्हा कळलं!
तर मुद्दा काये, की समाजाला मान्य नसणाऱ्या गोष्टींसाठी आपण हलका शब्द वापरतो. रंडीबाज माणसाला ‘रंगेल’ म्हणतो. दारुड्याला ‘लिक्विडचा प्रॉब्लेम’! तशी माझी ‘कार्ड्सची सवय’ म्हणजे काय ते तुम्हाला कळलं असेलच! (पत्त्यांचा टर्रर्र टर्रर्र आवाज करतो.)
आता प्रश्न असा पडेल तुम्हाला, की बालबच्चेवाला, व्यवस्थित नोकरीधंदा असलेला माणूस जुगार का खेळत असेल? तर नाटकाच्या संकेताप्रमाणे मी तुम्हांला काहीतरी लंबा गॅस द्यायला पाहिजे. स्वतःचं समर्थन करायला पाहिजे. उदाहरणार्थ, (नाटकी आवाज लावून) “ही बावन्न पानं म्हणजे जीवनाचं प्रतीक आहेत, आपल्याला कोणता हात येईल माहीत नसतं, तसं जिंदगीचंही आहे.”
पण मी असलं काही करणार नाहीये. प्रामाणिक माणूस आहे मी. मी जुगार खेळलो कारण मला जुगार खेळायला आवडायचा. खतम. दी एन्ड.
पण बहुधा या पत्त्यांनीच माझा दी एन्ड केला. आणि तेच आपल्याला शोधायचं आहे.
माणूस : सिच्युएशन अशी आहे : आमच्या 'रघुवीर पोल्ट्री सेंटर'मधून मी सोमवारी रात्री १०ला निघालो. 'रघुवीर पोल्ट्री' म्हणजे आमचा जुगाराचा 'अड्डा'. तुम्हाला वाटेल काय डेंजर जागा आहे ही! तसं काहीही नाही – एकदम साधं ठिकाण आहे. दिवसा इथे खरोखर अंडी चिकन वगैरे मिळतं. संध्याकाळी सातनंतर मालक – कोतवाल त्यांचं नाव – गेम लावतात. तीन पानी, पोकर, ब्लॅक जॅक.
(दिग्दर्शकाला सुचवणी : इथे एका कोपऱ्यात पोल्ट्रीवाला कोतवाल संवादविरहित अवस्थेत, काहीतरी करताना दाखवता येईल. त्याला काही वैशिष्ट्यपूर्ण ॲक्शन देता येईल. पोल्ट्री चालवतो आहे तर त्याच्या प्रकाशमान कोपऱ्यात पोल्ट्रीचं नेपथ्य दाखवता येईल. माईम बघितली की हसायला हवं अशी ममवची एक धारणा असते. इथे हास्यकल्लोळ अर्थातच अभिप्रेत नाही. त्यामुळे ती माईम पुरेशा गांभीर्यानं यायला हवी.)
पण – आमच्यासारख्या – खास लोकांसाठी एक खास गेम असतो. त्याचं नाव 'काना राजा'. म्हणजे असतो आपल्या साध्या तीन पत्तीसारखा, पण त्याचा कॅट वेगळा असतो. बदाम राणीऐवजी एक एक्स्ट्रा चौकट राजा असतो. म्हणजे एका कॅटमध्ये दोन चौकट राजे. तुम्ही पत्त्यांतले चारी राजे बघा – चौकट राजा सोडून इतर राजांना दोन डोळे आहेत. पण चौकट राजाला एक डोळा. त्यामुळे तो 'काना राजा'. तर असे दोन्ही काणे राजे, आणि इस्पिक एक्का हा या डावातला सगळ्यात मोठा हात. ट्रम्प. सगळं घेऊन जाणार तो माणूस. मोठे स्टेक, मोठा पैसा, मोठी एन्ट्री फी. आणि जिंकलो तर तेही मोठंच. आमच्या रघुवीर पोल्ट्रीच्या इतिहासात कोणालाच काना राजा लागला नाहीये.
पण सोमवारी रात्री मला काणा राजा लागला! चौकट राजा, चौकट राजा, आणि इस्पिक एक्का असा हात आला! सहासष्ट हजार तीनशे वेळा पत्ते वाटलेत तर एकदा असा हात लागतो! आणि तेही नक्की नसतं. जबरदस्त कमाई झाली. पॉट कितीचा होता आता आठवत नाही. हिशोब असतात त्याचे. कोतवालसाहेब लगोलग कॅश देत नाहीत – डेंजरस हो! एकदोन दिवसांनी वेगळ्याच ठिकाणी कॅश हातात मिळते. पण कोतवालसाहेब खुश झाले एकदम. दोन पेग पाजले, आपल्या खात्यात. निघताना वर मला हा कॅट देऊन टाकला. आठवण म्हणून ठेवा, म्हणाले. मान आहे तुमचा. तोच हा कॅट.
कॅट खिशात टाकून मी निघालो. आणि … आणि पुढचं काही आठवत नाही. मेलोच. खिशात हा कॅट सोडून काहीच नाही सापडलं.
या रस्त्यावरून मी गेली वीस वर्षं जवळजवळ रोज येतो आहे. पहिल्यांदा आलो तेव्हा माझ्या मुलीचा नुकताच जन्म झाला होता. आज ती … (आवंढा गिळतो. विषय बदलत.)
तर मुद्दा काये, माझ्या मरणाचं रहस्य या कॅटशी संबंधित आहे. आणि ते उलगडायला मला तुमची मदत लागणार आहे. माझ्या आयुष्याच्या कॅटमध्ये 'काणा राजा' लागला, कोटकल्याण व्हायची स्थिती आली. पण पैसे हातात येण्यापूर्वीच जिंदगीच संपली. काय कारण? हे मला हे पत्तेच सांगू शकतील. आयुष्याचा कॅट.
तर आता मी इथे ठेवतो हा कॅट. (चुर्रर्र आवाज.) पिसून ठेवला आहे.
बघतो एक रँडम पान काढून. काय नशिबात लिहिलं होतं ते तरी पाहतो… (पान काढतो, प्रेक्षकांना दाखवतो.)
(फालतू पान असलं तर) – आयला जित्तेपणी एक पान कधी धड नाय निघालं तं मेल्यावर काय निघणारे?
(एक्का राजा राणी असलं तर) --- आयला जित्तेपणी एक पान कधी धड नाय निघालं तं मेल्यावर निघून काय फायदा?
पण चला पाहूया तरी ह्या पानामधे काय नशीब लिहिलं होतं ते.
(संगीत. प्रकाशाच्या रंगात बदल. आता ‘माणूस’ रंगमंचाच्या एका कोपऱ्यात उभा आहे – दिसेल न दिसेल असा. त्या बाजूला मंद प्रकाश. मुख्य स्टेजवर स्वच्छ प्रकाश. एक तरुण मुलगी येते. पंजाबी ड्रेस घातला आहे. दोन्ही खांद्यांवरून ओढणी. हातात मोबाईल, खांद्याला पर्स. इकडेतिकडे शोधक नजरेने बघते. कोणाची तरी वाट पाहते आहे. बाकावर येऊन बसते, मोबाईलमध्ये मग्न होते.)
माणूस : मुलगी माझी! कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. कथकची विशारद होईल. की झाली आहे वाटतं, नक्की आठवत नाही आता.
मुलगी : (मोबाईलला फटाफटा फटके मारते) अरे ए! किती स्लो आहे हा. खरं तर बदलून टाकायला पाहिजे, पण… (थांबते)
(स्टेजच्या दुसऱ्या बाजूने एक तरुण येऊन उभा राहतो. तिचं बोलणं ऐकतो. हळूच तिच्या शेजारी येऊन बसतो.)
तरुण : कोण मी का?!
मुलगी : (त्याच्याकडे वळून बघत लटक्या रागाने) हो! तूच, हर्षद, तूच. तू स्लो आहेस. किती वेळ थांबले मी. बदलून टाकणार आहे तुला.
तरुण : (हसत) माऊ! बघ हां? नक्की? नाही, म्हणजे तुझे वेडे चाळे सहन करणारा दुसरा कोणी मिळाला तर कर बुवा. आपल्याला काय…
माणूस : (पुढे येत) हायला! बॉयफ्रेंड दिसतोय मुलीचा! बघू जरा… (निरखून बघतो) चांगला दिसतोय पोरगा. हर्षद नाव म्हणाली ना? आडनाव कळलं नाही. काय असेल? आपल्याला व्याह्यांचं नाव काहीतरी मजबूत हवंय. वेदपाठक, राजोपाध्ये, सुभेदार, जहागीरदार, वगैरे असलं काही. अमुकसिंह तमुक पाटील वगैरेही सहन करू वाटलं तर.
तरुण : मेसेज का नाही केलास? लौकर आलो असतो इथे.
मुलगी : अरे तोच करत होते, पण हा मोबाईल माहीत आहे ना तुला? व्हाट्सॲप उघडण्यासाठी टॅप केलं की पाच मिनिटं थांबायचं. इकडेतिकडे फिरून यायचं. मग ते उघडणार. मग तुझं नाव शोधा. परत पाच मिनिटं. मग मेसेज टाईप करा. परत पाच…
तरुण : अगं हो हो, कळलं कळलं. माऊमॅडम, बदला आता तो मोबाईल.
मुलगी : (वेडावल्यासारखं तोंड करत) बदला म्हणे. बापाचाच माल आहे ना माझ्या. (विचार करत) बापाकडे माल नाही म्हणूनच हा सगळा राडा आहे. आता बघ ना – एवढी विशारद झाले, पण क्लास घेऊ शकत नाही. कारण अरंगेत्रम झालं नाही. त्याला खर्च दीड दोन लाख रुपये. कोण देणार? बापाकडे मागू?
माणूस : (पुढे येत) अरे मागून तर बघ! काणा राजा!
तरुण : माझ्याकडे पण इतका…
मुलगी : तुझ्याकडे मागत नाहीये रे राजा! मी काय तुला तसली पोरगी वाटले का? तुला माहितीय, माझ्या मैत्रिणींचे बॉयफ्रेंडस त्यांना पॉकेट मनी देतात. तुला ती शिल्पा माहीत आहे ना?
तरुण : हो, मला कल्पना आहे. बुआची मुलगी आहे ना – झरीन – तिला तिचा बॉयफ्रेंड महिन्याला पंधरा देतो.
मुलगी : पंधराशेत वडापावचा खर्च तरी निघेल का?
तरुण : पंधरा हज्जार! मी तर बघूनच राहिलो.
मुलगी : आणि ती बदल्यात त्याला काय देते हे विचारलंस का झरीनबीला?
तरुण : (हसत) आता सगळंच विचारू काय! तिच्या बॉयफ्रेंडला भेटलो आहे मी. स्टेशनजवळ मोबाईल रिपेअर शॉप आहे. अच्छा लडका है. तुझा मोबाईल त्याला दाखवू या का?
मुलगी : काही गरज नाही! माझ्या मोबाईलची गॅलरी अशी कोणाच्याही हातात देणार नाही! उद्या आपली क्लिप व्हायरल व्हायची. (दोघेही हसतात. बाकड्यावर जवळ सरकतात. मुलगी तरुणाच्या खांद्यावर डोकं टेकवते.)
माणूस : एक मिनिट – एक मिनिट – एक मिनिट. क्लिप? व्हायरल? अरे भड… (थांबत) काय ऐकू जाणार आहे यांना!
तरुण : माऊ, एक बोलायचं होतं? जरूरी आहे.
मुलगी : (खांद्यावरून डोकं उचलत) तरीच! विचारच करत होते हर्षदसाबनी इतक्या तातडीने का बोलावून घेतलं असेल. काय आता नवीन? “माझे यूपीएससीचे क्लास असतात, आपण आठवड्यात एकदाच भेटू या का?” की “मौसीकडे शादी आहे, त्यामुळे तीन महिने जरा बिझी असेन?” काय बोलायचंय?
तरुण : असंच नाही अगदी. जरा महत्त्वाचं आहे.
मुलगी : बोल.
तरुण : (पॉज घेत, शब्दांची जुळवाजुळव करत) आपण .. म्हणजे आपलं .. सिरीयस आहे ना? लॉन्ग.. टर्म.. (तिच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेत वाक्य अर्धवट सोडत थांबतो.)
मुलगी : (हसत सुटते) हर्षदसाब! प्रपोज करता आहात का? असं नाही काही. (चेष्टेच्या सुरात) आमच्यात वेगळं पडतं. अम्मी-अब्बूना घेऊन रीतसर घरी या. मी आणि आई कांदेपोहे करून ठेवतो, आणि चहा. बापही असेल. कुंडल्या जुळवल्या जातील. तो जुगाड करू आपण. ए तुझी जात काय आहे रे? मग देण्याघेण्याच्या गोष्टी होतील. आमचा बाप आहे खंक लोगों का सरदार. म्हणेल, आम्ही गरीब लोक आहोत. नारळ आणि मुलगी देतो. (आवाज हळवा होतो) हर्षदसाब, तुम्ही म्हणा, नारळ ठेवून घ्या, मुलगी मात्र द्या. लगेच घेऊन जातो. मग मी अशी बॅग घेऊन बाहेर येईन, आणि आपण आमच्या महालातून निघून जाऊ. कायमचे.
तरुण : मला माहितीय – तुला वाटतं असं घडावं. पण हे इम्पॉसिबल आहे माऊ. सजदा करून कपाळावर झबीबा उठलेले अब्बू. फुलाफुलांचा हिजाब घातलेली अम्मी. हे लोक तुझ्या घरी येणार? आले तरी तुम्ही त्यांना कांदे-पोहे देणार? आणि दिले तरी मुलगी देणार त्या घरी? सोपं आहे का हे?
माणूस : एक मिनिट, एक मिनिट. हा .. हा .. (आवाज खाली पाडून) मु-स-ल-मा-न आहे?? (नेहमीच्या आवाजात.) हर्षद? की अर्शद? माझ्या पोरीला चांगलंच जाळ्यात ओढलंय की! लग्न करून निघून जाणार म्हणते! हल्ली काय काय वाचायला मिळतं हॉटसॅपवर. लव्ह जिहाद.
अहो आमचं घराणं इतिहासात प्रसिद्ध आहे. राघोबादादा पेशव्यांच्या खाजगी पुजाऱ्यांपैकी एक आमचे पूर्वज. राघोबा बाकी कसाही असला तरी धर्मपरायण पुरुष हो. त्याचं काही अनुष्ठाण असलं की दर्भासन घालण्यापासून आपोष्णी देण्यापर्यंत जबाबदारी आमच्या पूर्वजाची. आणि ही .. ही दिवटी .. साली छिनाल ..
मुलगी : हर्षद – मला कल्पना आहे रे. पण करायला लागेल. माझा बाप .. फार चक्रम आहे. लहानपणापासून बघत्येय – तो कधीच घरी नसायचा रे. सांगायला काय – फिरतीची नोकरी आहे. लोकांना भेटल्याशिवाय ना औषधं विकता येत ना इन्शुरन्स. सकाळी गेलेला संध्याकाळी परत घरी येईलच असं नाही. हस्ते परहस्ते निरोप द्यायचा – “साहेब चाळीसगावला गेलेत, दोन दिवसांनी येतील.” किंवा “कोकणात दौरा निघाला” – की थेट आठवड्यानंतर! आईनं एकटीनं वाढवलं मला जवळजवळ.
तरुण : पण शहरातल्या एमआरला फिरती का असेल? त्यांच्या टेरिटरी त्याच शहरात असतात ना?
मुलगी : अरे होच की! पण आम्हांला कळायला हवं ना! आई अंबरनाथसारख्या गावात वाढलेली. अनाथ मुलगी. काकानं एकोणिसाव्या वर्षी उजवून टाकली आणि स्वतःला जबाबदारीतून सोडवून घेतलं. तिला ना कसा अनुभव ना समाज. नवरा म्हणेल ते खरं! नवरा देव. तो चुकणं शक्यच नाही. भक्ती.
बापानं घरी फार पैसे कधीच आणले नाहीत. किंवा असं म्हण – जितके पैसे आणले तितक्यात आईनं संसार चालवला. पण कधी आईनं तोंड वर करून विचारलं नाही, की तुम्हाला पगार किती? पगाराच्या वर कमिशन मिळतं का? एवढे दिवसचे दिवस फिरतीवर असता, मेहनत करता, पण यातून पैसे मात्र येत नाहीत, हे कसं?
तरुण : मग? हा प्रश्न तू विचारलास का?
मुलगी : तर! दोन वर्षांपूर्वी. बारावी झाली, आणि शाळेत करियरबद्दल भाषणं झाली त्यात अॅनिमेशनबद्दल होतं. मला वाटलं, हे जमेल आपल्याला. मन में लड्डू फूटा. पण फीचा आकडा ऐकून तो फुटका लड्डू मी परत कागदात बांधून ठेवला. बापानं वर्षभर दिलेले पैसे एकत्र केले तरी फीच्या निम्मीच रक्कम होत होती. (पॉज घेत) पण त्यानं एक झालं – मला एक दृष्टी आली. पर्स्पेक्टिव्ह आला. बाप घरी आणतो ती रक्कम किती चिरकुट आहे ते तेव्हा लक्षात आलं. आईला सांगण्यात काही अर्थ नव्हता. तिच्या मनात ती अजून अनाथच आहे, आणि बाप त्यातून तिला सोडवून स्वतःचं घर देणारा हिरो. मग शेवटी एक दिवस मीच विचारलं.
तरुण : आवडलं नसेल त्यांना.
मुलगी : अरे! काय बोलतोस. पट्ट्यानं मार खाल्ला त्या दिवशी! तेव्हापासून त्याला 'बाप' म्हणायला सुरुवात केली. तोंडावर आणि मागेपण. ते सुद्धा “तो बाप”. साला (तोंडातल्या तोंडात शिव्या पुटपुटते. डोळ्यांत अश्रू. तरुण तिला जवळ घेत थोपटतो.)
माणूस : (गडबडीने प्रकाशात येत) खोटं आहे हे, साफ खोटं आहे. साली, कुत्री, भडवी. पट्ट्यानं मारलं नाही मी. पट्टा उगारला होता फक्त. उलट्या हाताच्या दोन दिल्या सन् सन्. चिप पडली रांड. तोंड सोडते!
तरुण : पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का?
मुलगी : पैशाबद्दल? ह्या.. तो दिवस फक्त पट्ट्याचा आणि रट्ट्याचा होता. पण मी मूर्ख नाहीये. हळूहळू सगळं शोधून काढलं. मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा फारच अतरंग निघाला रे. इथून पुढे गेलं की डाव्या हाताला रघुवीर पोल्ट्री. आईच्या हक्काचे पैसे इथे पत्त्यांच्या एकेका फेकीत धूर झालेत. आणि उजवीकडे वळलास की.. (एकाएकी ब्रेक लागल्यासारखी थांबते.)
जाऊ दे रे हे सगळं – बापाची घाण उपसावी तितकी कमीच. साला ढपकनी मेला तर बरं होईल. जाऊ दे. तू बोल, काहीतरी महत्त्वाचं आहे म्हणत होतास.
तरुण : हो. ते असं झालंय – मला नोकरीची ऑफर आली आहे, माऊ. कंबोडियामधून.
मुलगी : अब्रॉडहून?! बीकॉमच्या डिग्रीवर? आणि तू अप्लाय केला होतास का? कंबो.. कुठे आलं हे? तुला यूपीएससी करायचं होतं ना? त्याचं काय?
तरुण : यूपीएससी करायचंच आहे गं माऊ. पण घरी कसं आहे तुला माहीत आहेच. अब्बू दुकान फार काळ चालवू शकणार नाहीत. फार तर अजून तीन वर्षं. तोपर्यंत यूपीएससी झालं तर ठीक, पण त्याची काही खात्री नाही. त्यापेक्षा तीन वर्षं नोकरी करतो, अब्रॉडमध्ये. पैसे साठवतो. अभ्यास पण करतो, साईड बाय साईड. अब्बू रिटायर झाले की परत येईन. तेव्हा अटेम्ट घेईन.
मुलगी : आणि या सगळ्यात मी कुठे येते? (पॉज घेऊन, शंकेनं) की येतच नाही? आणि तेच सांगायला… (दूर सरकते.)
तरुण : अगं, अगं माऊ! तेच बोलायचं होतं. हे बघ – तुला आता फॉर्मली प्रपोज वगैरे करत नाही. गरज नाही. आपण या विषयावर बोललो नाही तरी आपण एकमेकांशी लग्न करणार हे चार वर्षांपासून आहे आपल्या डोक्यात. पण मी आता तीन वर्षं नाही. त्या काळात तुझी शादी फिक्स केली तर? मी काय म्हणतो, जाण्याआधी एकदा मी तुझ्या आईबाबांशी बोलू का? अम्मीअब्बूला घेऊन येतो. अतिफचाचाही येईल. त्याची बायको भंडारी आहे. त्याच्याकडे बघून तुझ्या बाबांना खात्री पटेल, की आम्ही डिसेंट लोक आहोत. शादी सावकाश करू, पण आपली एक छोटी मंगनी की तकरीब…
मुलगी : (हसत सुटते) तू वेडू आहेस, हर्षद. ठार वेडू. तुला काय वाटतं – हे सगळं करून बाप मान जायेगा? अरे हाड! राघोबा पेशव्याच्या पुजाऱ्याच्या घरातली पोर मुसलमानाला देणार? “ओव्हर माय डेड बॉडी” – बाप म्हणेल. (पॉज)
हर्षद, तसं झालं ना, तर सगळेच प्रॉब्लेम सुटतील बघ. आईला मी कसंही गुंडाळेन. बाकी कोणी नातेवाईक आले चोंगेपणा करायला, तर सांगेन घरात झालाय मृत्यू. तर आता तीन वर्षं लग्न होऊ शकत नाही. बघ करायचा विचार तसा?
(Disgusted and horrified, तरुण पडद्यात निघून जातो. मुलगी “हर्षद… हर्षद…” करत त्याच्या मागे धावते. स्टेजवर प्रकाश मंदावतो. अंधारातून माणूस जोरजोरात टाळ्या वाजवत बाहेर येतो.)
माणूस : शाब्बास! बेटी हो तो ऐसी! स्वतःच्या बापाला मारून टाकण्याची फुल तयारी आहे. बाप गेला एकदा, की याराच्या गळ्यात गेले घालायला मोकळ्या. आई आली मध्ये, तर तिचाही गळा चिरायला कमी करणार नाही साली.
(थांबून, हळव्या आवाजात) अशी नव्हती हो माझी पोर. गोंडस होती. लाघवी. शेजारच्या जानकर वाहिनी म्हणायच्या, गरीब गाय आहे तुमची मुलगी. ठीक ए, मी कधी फार पैसे नाही दिले घरी. राहायला मोठ्ठ्या गेटबंद सोसायटीत फ्लॅट नाही देऊ शकलो. नेपाळच्या ट्रिपला नाही जाता आलं शाळेत असताना. मैत्रिणींना घेऊन कधी हॉटेलात जाता आलं नाही, वाढदिवसाला बोलावता आलं नाही. अरंगेत्रमला दीड लाख मागितले. कशाला म्हणतात हो, दीड लाख! पण माझं फार प्रेम होतं हो तिच्यावर. बदललं, सगळंच बदललं. त्या दिवशी तिला पट्ट्यानं फोडली. (आवाज कडक, अमानुष होतो) म्हणजे मघाशी म्हणालो तुम्हाला की पट्टा फक्त उगारला म्हणून – पण ते खरं नाही. असल्या रांडांना पाहिजे चौदावं रत्न! तेव्हापासून सगळीच नवती पालटली.
(शांत होत, विचार करत) तीन वर्षं झाली. त्याच सुमारास हा भेटला असणार तिला. हल्लीतच हॉटसॅपवर वाचलं होतं. लव्ह जिहाद. (तिरस्काराने भरलेल्या आवाजात) “हे” लोक असतात ना, ते चांगल्या घरातल्या मुलींना फूस लावतात. वरून एकदम सभ्य दिसतात, डिसेन्ट. गोग्गोड बोलतात. मुलीलाही वाटतं, मेरा अबदुल अयसा नहीं हय. मग 'हे' लोक या पोरींना घरच्यांशी भांडायला भाग पाडतात. घरून पळून जायला लावतात. आणि मग.. आणि मग.. वाचतच असाल तुम्ही. (हवेत hacking motion करतो.) हॉटसॅप आहे ना तुमच्याकडे?
नाय. माझ्या पोरीला यानंच फूस लावली आहे. बहुधा त्या हर्षद की अर्शदला समजलं असेल की मला काना राजा लागला. असल्या लोकांचे फार कॉन्टॅक्ट असतात इकडेतिकडे. त्यानं ठरवलं असणार, की याला संपवायचं. माझ्या पोरीला पटवून ठेवलंच होतं. तीही फसली जाळ्यात. अलगद. बापाला संपवू म्हणाली. साला आता असं दाखवतोय की सगळा तिचाच प्लॅन होता. त्या संध्याकाळी हे दोघे इथेच जवळपास होते – आपण पाहिलं. मौका था, दस्तूर था, आणि चक्कू तो होगा ही. (आपल्या गळ्याला हात लावतो, आणि निळ्या रंगात रंगलेला हात प्रेक्षकांना दाखवतो.)
माणूस : पण एक मिनिट. अजून पत्ते बाकी आहेत. पूरी स्टोरी तभी पता चलेगी. (कॅट काढतो.)
बघतो एक रँडम पान काढून. काय नशिबात लिहिलं होतं ते तरी पाहतो… (पान काढतो, प्रेक्षकांना दाखवतो.)
(फालतू पान असलं तर) – आयला जित्तेपणी एक पान कधी धड नाय निघालं तं मेल्यावर काय निघणारे?
(एक्का राजा राणी असलं तर) – आयला जित्तेपणी एक पान कधी धड नाय निघालं तं मेल्यावर निघून काय फायदा?
पण चला पाहूया तरी ह्या पानामधे काय नशीब लिहिलं होतं ते.
(संगीत. प्रकाशयोजनेत बदल.)
(बाकड्यावर एक मध्यमवयीन बाई येऊन बसली आहे. दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर, कपाळावर ठसठशीत कुंकू. हातात पिशवी. चेहऱ्यावर unfathomable भाव. या हायवेशेजारच्या गॅरेजच्या वातावरणात ही व्यक्ती अस्थानी आहे. मोबाईलची रिंग वाजते. पिशवीतून मोबाईल काढून ती बघते, कट करते. परत रिंग वाजते. परत कट करते, आणि सावरून बसते. स्टेजच्या दुसऱ्या बाजूनं एक मवाली दिसणारा मनुष्य येतो. [याच्या लूकसाठी मेट्रोसेक्श्युअल पण छपरी टिकटॉक स्टार बघावेत.] तिला बघून चपापून थांबतो.)
बाई : ये, ये. घाबरू नकोस. नाव काय तुझं?
(माणूस गप्प. खिळल्यासारखा.)
नाव. नाव. मराठी येते का? (स्वगत) रामा, आता हिंदी नको बोलायला लावूस. (प्रकट, मराठी उच्चारात) हिंदी आती हय क्या? आं? आवो इधर आवो बाबा. डरो मत.
मवाली : (हाताची हालचाल करत) चन्न्या बोल्ला इतं औजार भेटल म्हणून आलो. (थांबून तिचा अदमास घेतो.) पण हितं औजार वेगळंच भेटलं. (कंबर सूचकपणे पुढेमागे हलवत)
बाई : आं? (बारीक निरीक्षण करते आहे.)
मवाली : नाय काय नाय. येतो माई. (जायला वळतो.)
बाई : ए, ए, थांब. शुत शुत.
मवाली : (थांबत, आशेने) मी इतं कशासाठी आल्तो..
बाई : कशासाठी 'आल्तास' ते मी सांगते ना. तुझा मित्र चन्न्या – म्हणजे तुमच्यात मित्रबित्र असतात की नाही माहीत नाही मला – पण चन्न्या तुला म्हणाला तुला इथे 'काहीतरी' मिळेल. माझ्याकडे आहे ते 'काहीतरी'.
मवाली : (विस्मयानं) माई! तुमच्याकडे?! (तिला निरखून बघतो) औजारे तुमच्याकडं? कुडाय? पिशवीते का?
बाई : ए बाबा, तुझं 'औजार' म्हणजे काय मला माहीत नाही. पण काहीतरी घाणेरडं असणार लिहून देते. अर्थात तुला वाचता येतं की नाही हा एक प्रश्नच आहे. पण बघता तरी येतं ना. हे बघ. (मोबाईल त्याच्या हाती देते.) कर इथून प्ले.
(मवाली भयचकित होऊन मोबाईल बघतो आहे. बाई कमरेवर हात ठेवून त्याच्यासमोर उभ्या आहेत. माणूस अंधारातून बाहेर येतो. घाबरला आहे.)
माणूस : तुम्ही… (घाम पुसत) तुम्ही विचार करत असाल हे कोण आहेत. ही माझी बायको. धर्मपत्नी. अंगणातली तुळस वगैरे. तो प्रकार.
(आवंढा गिळत)
आणि हा… हा… अं. 'मित्र' आहे माझा. म्हणजे. आम्ही. म्हणजे. (काही निरर्थक हातवारे करून सोडून देतो. स्टेजवर क्षणभरासाठी uncomfortable शांतता.)
मवाली : (बघून मोबाईल परत देतो.) हा. बोला. ह्येच्याबद्दल विचारत असाल तर धंदाय ह्यो. पैशे भेटतात मला. तुमचे मालक पंधरा दिवसातून एकदा बोलावतात. कधी रूपरानी लॉज, कधी हॉटल महाल. कधी सरळ ओयो. जागा सेफ असतात तशा, पण इतं (मोबाईलकडे बोट दाखवत) कोनाच्यातरी गांडीला दात आलेत. कोन दिली ही क्लिप?
बाई : कधीपासून सुरू आहे हे?
मवाली : माझ्याबरबर? दोन वर्षं. त्याआधी दुसरा कोनी असेल. या दोन वर्षांत इतरबी कोनी असेल. काय..
बाई : आता माझं एक काम करायचं. करणार?
मवाली : (अचंब्यानं) माई! (हात जोडत) आपण ट्रिपल सीट घेत नाही. मापी करा. तुम्हाला पायजेल तर नंबर देतो एक. दोस्ते आपला, एकदम क्लीन. दोनी बाजूला बॅटिंग करतो. ट्रिपल त्याची खासियते.
बाई : ए बाबा. तसलं काही नकोय मला.
मवाली : (सैलावत) हां मंग इतर काम असेल तर बेशक सांगा. आनी हा – तुमचा सायबांशी काय मॅटर होईल तो आपापला बघायचा, मला त्यात कुठे नाही…
बाई : अरे साहेबांचाच मॅटर करायचा आहे.
(धक्कानिदर्शक संगीत. माणूस कोपऱ्यात धक्क्याने फ्रीज होतो. मवाली उठून सावरून बसतो.)
मवाली : व्हंजे?
बाई : म्हणजे एकदम दी एन्ड. (गळ्यावरून बोट फिरवत.) साहेबांचा. लौकरात लौकर. आजच. फार तर उद्या.
आणि हे बघ बाळा, आता तू मला येडं बनवू नकोस की तू काय करतोस काय नाही. मघाशी एक ठीक होतं – वेश्या पब्लिकमध्येही काही नियमबियम असतील. हे काम तू करतोस हे मला नक्की माहीत आहे. ये, इथं ये. अरे ये, हे बघ. (मोबाईलमध्ये काही दाखवते.) समजलं हे कोणे? यांनी पाठवलं तुझ्याकडे. (मवाली समजल्यासारखी हळूहळू मान हलवतो.)
मवाली : (काही विचार करून, मोबाईलकडे निर्देश करत) या शेठच्यासाठी वेगळा रेट अस्तोय. पूर्ण मॅटरला…
बाई : हो, ते एक आहे. माझ्याकडे पैसे नाहीत.
मवाली : (हताश होऊन) आवं .. साला फालतू टाइम खराब केला. माई, असल्या गोष्टी..
बाई : अरे गप राहा ना. ऐक तर मी काय सांगते आहे. तुला तुझे पैसे मिळणार आहेत. आणि त्यापेक्षा जास्तच मिळणार आहेत. नीट ऐक, प्लॅन. आज साहेबांना भेटायला बोलवायचं. तुमच्या नेहेमीच्या जागी. ते कसं करायचं तुला माहीत आहेच. साहेब येतील. खुश असतील आज साहेब. थोडी प्यायली पण असेल. लगेच चड्डी काढून सुरू नको होऊ. मॅटर कर, आणि निघ तिथून.
साहेबांना जेव्हा .. जेव्हा .. (गळ्यावरून बोट) करशील तेव्हा त्यांचे खिसे तपास. त्यात एक गुलाबी कागद मिळेल. तो कागद या (मोबाईल नाचवत) शेठला नेऊन द्यायचा. शेठ बघतील पुढे.
मवाली : (मान डोलावतो.) माई, एक विचारू का?
बाई : एकच विचार, आणि लौकर विचार. मला कुकर लावायचा आहे जेवणाचा.
मवाली : तुम्ही त्यातल्या बाई दिसत नाही. म्हणजे … मला म्हनायचंय एकदम अलका कुबल टाईप 'माई' दिसता. माहेरची साडी नेसून आलाय इथे. (स्वतःच्याच विनोदावर खुश होऊन हसतो.) आनी एकदम नवऱ्याची सुपारी देताय? ती पन त्याच्याच याराला? काय म्हंजे…
बाई : भाऊ, सोड ना. आपलं काम कर.
मवाली : ते ठीक ए, ते तर करेलच. पन माई, नवरा होमो निघाला म्हणून लै कावला राव तुम्ही. जरा धक्का निघू द्या, मग समजंल की पती परमेश्वर शेवटी पती परमेश्वर असतोय. चड्ड्या धुवाव्या तर…
बाई : (अचानक हिंस्त्र होत) ए झाट्या, विचारलं तुला मी? चल निघ इथून.
(मवाली तिच्या अंगावर चालून येतो. तिला हेडलॉकमध्ये धरतो. गळ्याशी पातं लावतो. बाई झटापट करते. चिवट आहे – हार जात नाही. संगीत. अंधारातून माणूस बाहेर येतो.)
माणूस : मार तिला, सोनी. मारून टाक. सुपारी देती भडवी. आमचा सोनीभाई चित्ता ए.
(झटापट चालूच राहते. शेवटी दोघेही दमतात. बाकावर टेकतात. मागून माणसाचे “मार सोनी, काप तिला”चे चीत्कार सुरू राहतात. या दरम्यान बाईची पिशवी फेकली जाऊन कागद उधळले आहेत. सोनी त्यातला एक कागद उचलतो.)
बाई : आण इकडे, आण. इंग्लिश आहे, तुला कळणार नाही.
मवाली :
(कागद संपूर्ण वाचून परत देतो.) साहेबांची लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी. दीड वर्षापूर्वी काढलेली आहे. तुम्हीच नॉमिनी आहात, माई. (तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत) एवढं दचकायला काय झालं? आय स्टडीड इन अ कॉन्व्हेंट स्कूल, यू नो. आम्ही गरीब होतो, माई, भिकारी नाय. पुढे पण शिकलो, डबल ग्रॅज्युएट आहे मी. आता धंदा म्हणून हे रूप घ्यायला लागतं, काय करणार. त्यातून आमचे दोन दोन धंदे. येडा बन के पेडा खाना अच्छा रहताय.
पण हा पेडा चांगलाच जमवलाय तुम्ही, माई. मान गये. बाहेर तोंड मारणाऱ्या आपल्या नवऱ्याला हटवला, तोही कुणाच्या हातून तर त्याच्याच याराच्या. पकडला तर जाणार नाही, आणि गेला तरी सुपारी अलका कुबलने दिली होती असं कोन मानेल? दोन होमो आपापसांत नडले आणि एकानं दुसऱ्याला मारलं, इतकंच काय ते. मग सुमडीत कोमडी इन्शुरन्सचा माल गपकन खिशात.
(परत टपोरी बेअरिंग घेत) पन त्या कोतवालशेठचं काय लफरं आहे? त्यो खुडून आला मध्येच? शेठला फोन लावा? काय माई? ओ माई.. (“दीदी, ओ दीदी” या चालीवर.)
(स्टेजवर बदल होऊ लागतात. बाकावरचा प्रकाश कमी कमी होत जातो. दुसऱ्या बाजूला माणसावरचा वाढत वाढत जातो. त्याने डोकं हातात गच्च पकडलं आहे. स्टॅटिकसारखा आवाज येतो, आणि वाढत जातो.)
माणूस : अरे… अरे… काय… डोकं भिन् झालं. माझी बायको? दारची तुळस? दारचीच सुपारी? आणि सोनी मादर.. डिसगस्टिंग. साला जिंदगीसोबत खेळता खेळता काय हात आला शेवटी शेवटी!
नाही! पण तसं नाही. हे काहीच खरं नसू शकतं. मी कॅट पिसला, आणि हा हात आला. परत पिसतो, आपण परत सुरु करू.
किती वेळ उरला आहे? (अंगरख्याकडे बघतो. निळा डाग बराच पसरला आहे.) पिसतो परत. हे बघा. (जोरजोरात पत्ते पिसतो.)
(बाकड्यावर परत प्रकाश पसरतो. तिथे आता एक वेगळाच इसम बसला आहे. तिशीच्या आत बाहेर. निळी जीन्स आणि कॉलरवाला टीशर्ट. रेघांचा असल्यास उत्तम.)
माणूस : अँ? तू कोणे भाऊ? पत्ता अजून काढला नव्हता. मी आत्ताच पिसला कॅट. माझ्या मृत्यूचं रहस्य…
यमाचा : झालं ते, संपलं आता. चला माझ्याबरोबर.
माणूस : अरे, पण तू कोण आहेस ते तर सांग ना.
यमाचा : मी? मी यमाचा.
माणूस : यमाचा? यमाचा काय? म्हणजे अर्थ काय याचा? ते वृत्त वगैरे प्रकारांत असतं ते का? (हात जोडत, चालीत.) सदा सर्वदा भक्तिपंथेचि जावे. यमाचा यमाचा यमाचा यमाचा. भुजंगप्रयात.
यमाचा : (मनःपूत हसतो.) एक नंबर. “जिवा कर्मयोगें जनीं जन्म जाला। परी शेवटीं काळमूखीं निमाला॥ महाथोर ते मृत्युपंथेंचि गेले। कितीएक ते जन्मले आणि मेले॥” मग पुन्हा “मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी। जितां बोलती सर्वही जीव मी मी॥”
धिस गाय वॉज समथिंग एल्स यार. पण नाही. मी यमाचा म्हणजे यम माझा मालक.
माणूस : म्हणजे रेडा?
यमाचा : मी रेडा दिसतोय का?! वजन कमी करायला झालंय हे खरंय. टिंडरवर प्रोफाइल आहे माझी. (माणूस चिडून हातवारे करतो.) ओ, नाही नाही. यम काय फक्त रेडाच बाळगून असतो असं नाही हो. मोठं डिपार्टमेंट असतं आता. आम्ही त्यातच काम करतो. तुमचं प्रोसेसिंग फास्ट ट्रॅकवर घेतलं आहे. तुम्हाला यायला लागेल माझ्याबरोबर.
माणूस : अहो, पण माझा प्रश्न तसाच आहे अजून.
यमाचा : कसला प्रश्न? तुम्ही मेलात कसे हा ना? कळेल की प्रोसेसिंगमध्ये. एक रिपोर्ट असतो पूर्ण. पण तुमची केस मी नीट पाहिली. अशा इंटरेस्टिंग केसेस नेहमी नेहमी येत नाहीत.
माणूस : बरे भेटलात. सांगूनच टाका आता. मी त्यासाठीच कॅट परत पिसला.
यमाचा : तेच करायला नको होतंत. सगळं रिसेट केलंत. म्हणून फास्ट ट्रॅकवर घ्यायला लागलं. चला आता.
माणूस : सांगताय ना?
यमाचा : प्रोसेसिंगमध्ये ना?
माणूस : नाही, आत्ताच सांगून टाका की. काये, तुम्हाला वेळ लागत होता म्हणून मी इथे हा खेळ मांडला. आता हे प्रेक्षक लोकही त्यात अडकले आहेत. (प्रेक्षकांना उद्देशून) काहो – अडकलायत की नाही? (प्रेक्षक – “हो, हो!”) आणि रहस्यकथा अशी अर्धवट सोडून देत नाहीत. रूल असतो हा. प्लीज, यमाचा साहेब. माझ्यासाठी नाही तर या मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी?
यमाचा : (विरघळत) हं.. बरोबर आहे तसं तुम्ही म्हणताय ते. नाही तर हे सगळे लोक त्यांच्या त्यांच्या वेळेला प्रोसेसिंगला आले की या रहस्याबद्दल विचारत बसायचे. लोकांना इतरांच्या गोष्टींत नाक खुपसायचं फार असतं. जिवंतपणी आणि मेल्यावरही. शिवाय आमच्या कोड ऑफ कॉन्डक्टप्रमाणे आम्ही खोटं बोलू शकत नाही. फार प्रॉब्लेम होतो – काहीही विचारत बसतात. सदाशिवभाऊंचा तोतया खरा कोण होता? जॅक द रिपर. डी बी कूपर. दगड न् धोंडे.
आम्ही आता लायब्ररी केली आहे. संदर्भ ग्रंथालय. कोणी विचारलं तर देतो फाईल चिकटवून. वाच लेका, घे कोंबून. त्यात आता तुमच्या फायलीची भर नको. बोला काय सांगू?
माणूस : मला कोणी मारलं?
यमाचा : (साळसूदपणे) तुम्हाला कोणावर संशय आहे का?
माणूस : अहो काय खेळताय माझ्याशी? सांगून टाका.
यमाचा : असं कसं. एव्हरी कारकून ह्याज हिज डे. मघाशी बघत होतो मी. पार डिटेक्टिव्ह असण्याचा आव आणत होतात. लावा डोकं आता. चला, गाईड करतो. मोटिव्ह, अपॉर्च्युनिटी, अँड रिसोर्सेस. बोला आता पुढे.
माणूस : मला सुरुवातीला वाटलं तो .. तो अर्शद जिहादवाला.
यमाचा : सिरियसली? मला विचाराल तर त्याच्याकडे शून्य मोटिव्ह होता. त्याला तुमच्या लेकीशी लग्न करायचंय, पण ते तीन वर्षांनी. जी गोष्ट तुमच्या पीठपीछे चार वर्षांपासून चालू आहे ती आणखी तीन वर्षं चालवायला तुम्हाला मारायला कशाला लागेल?
माणूस : पण तो शेवटी… या लोकांचं काही सांगता येत नाही.
यमाचा : ओह कमॉन. फ्रीज रिपेअर करणाराचा मुलगा आहे तो. मेहनती आहे. लंबा चलेगा. आणि तुम्ही बघाल तर मघाशी तुम्हाला मारून टाकण्याचा विषय तुमच्या मुलीनं काढला. तिच्यावर पहिला संशय असायला हवा होता तुमचा.
माणूस : मुलगी आहे हो माझी. रक्त आहे माझं. तीच..
यमाचा : फार कर्तव्यं निभावलीत ना, बापाची. पट्टा कुठे आहे तुमचा? मरतेवेळी होता का कमरेवर? असो, जजमेंटल होणं माझं काम नाही. मी फक्त फॅक्ट्समध्ये खेळतो.
पण नाही – तुमच्या मुलीला मोटिव्ह असला तरी अपॉर्च्युनिटी नव्हती. तुम्ही पुढे बघितलं नाही; हर्षदबरोबर ती निघून गेली. त्याच्या घरी गेले दोघे. तुमच्या जवळपासही नव्हते. या दोघांना मी बाद करीन.
माणूस : बरं. ठीक. (पुढे यमाचा काय बोलणार याने जरा धास्तावला आहे.)
यमाचा : (गालात हसत) आता? पुढे? बोला, बोला. हा जबरी किस्सा आहे. तुमच्याच तोंडून ऐकायचा आहे. सगळे तुकडे तुम्ही जुळवलेच असणार. सांगा जरा, executive summary.
माणूस : (मन घट्ट करत) मी – आयुष्यभर जुगार खेळला. 'रघुवीर पोल्ट्री'चे कोतवालांकडे. कोतवालांचा विश्वास मिळवला, आणि 'काना राजा' गेममध्ये एन्ट्री झाली.
मापात खेळला. स्वतःच्या पैशाने खेळला. कधी उधारी केली नाही. या भानगडीत घरी आबाळ झाली. रघुवीरचं देणं देऊन उरणार किती?
यमाचा : कधी काहीच जिंकलं नाहीत?
माणूस : जिंकलं ना. पण माझी दुसरी आदत आड आली. पंधरा दिवसांतून एकदा. तेच लॉज, नवा पोरगा. नवं लॉज, तोच पोरगा. स्वस्त नाही हो हे. चारेक वर्षांपूर्वी सोनी भेटला. तेव्हापासून मग फक्त सोनीच.
यमाचा : मग? पुढे?
माणूस : पुढे काय. बायकोला कधीतरी कळलं. ती गरीब आहे स्वभावानं, भोळसट नाही. माझा कंटाळा आला असणार. माझ्याबरोबर फार चांगलं नाही गेलं तिचं आयुष्य. त्याच दोन खोल्या, चाळीतल्या – मोरी आत, संडास कॉमन. पैसे कमी. वीस वर्षांपूर्वी आमची पोर झाली, त्यानंतर .. आम्ही फार जवळ आलोच नाही. ती मुलीत रमली, मी बाहेर रमलो. पण कधीतरी तिचा कडेलोट झाला असणार.
यमाचा : (होकारार्थी मान हलवत) वर्षापूर्वी अंदाजे.
माणूस : बघा. तर काय झालं, तिने माझी लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी काढून पाहिली. मागे कधीतरी काढली होती टर्म पॉलिसी – बहुधा टार्गेटला कमी पडत असणार. तिला नॉमिनी केलंय. मी मेलो की मोठी रक्कम मिळेल तिला. मग काय ... नकोसा नवरा, विमा पॉलिसी. मोटिव्ह झालाच बघा.
यमाचा : ठीक. अपॉर्च्युनिटी?
माणूस : सुपारीच दिली हो. तीही कोणाला, तर माझ्याच याराला. काय तो – पोएटिक जस्टीस बघा. पण नाही, ते तितकं सोपं नाही. लटकला तर तो. फायदा आपला. अशी स्कीम आहे.
यमाचा : यात एकच प्रॉब्लेम आहे. रिसोर्सेस. सुपारी द्यायला पैसे? या लोअर मिडल क्लास बाईकडे इतके पैसे?
माणूस : (खदाखदा हसायला लागतो) ज्ञान झालं, ज्ञान! सुपारी द्यायला कॅश कुठून असणार? बरोबर ए. पण त्याचा दिवशी मी काय जिंकलो होतो? काना राजा! त्याचे पैसे मिळाले नव्हते, पण कोतवालशेठची गुलाबी चिठ्ठी होती. ती शेठकडे नेऊन दिली की शेठ पैसे सोडणार. सिम्पल.
यमाचा : थांबा थांबा, मला नीट समजून घेऊन दे. तुम्हाला म्हणायचंय तुमची बायको – माई, दारची तुळस, अलका कुबल इत्यादी इत्यादी – तुम्हाला ठार मारू इच्छित आहे कारण तुम्ही जुगारी आहात, बाहेरख्याली आहात, आणि घरच्यांची आबाळ करता. त्यासाठी ती एकाला सुपारी देते. त्या सुपारीचे पैसे परस्पर तुमच्या जुगारातून वळते होतील असा दिवस निवडते. हे कसं शक्य आहे? दारच्या तुळशीला स्वप्न पडणार होतं का की तुम्ही आज काना राजा जिंकणार आहात? आणि हे – तथाकथित – स्वप्न पडल्यावर तिने सुपारी किलर शोधला, सुपारी दिली, आणि त्याच रात्री एक्सिक्युट केली?
म्हणजे मी ना पोलीस आहे ना कोर्ट, पण ही जरा फार ओढूनताणून बसवलेली थियरी आहे. दहापैकी तीन मार्कं.
माणूस : (खिशातून कॅट काढून यमाचापुढे ठेवतो) मी पिसला मघाशी. करायला नको होतं, नाही?
बिना पिसता चुपचाप तिसरं पान काढलं असतं तर सगळं उलगडलं असतं. पण मी पिसून काशी केली. नाही?
यमाचा : (कृत्रिम हास्य चेहेऱ्यावर आणत) अगदीच. पिसायला नको होता.
माणूस : (एकाएकी उठून यमाचाची गचांडी धरतो, आणि ओरडतो) चूक! चूक! मी सांगू तिसरं पान कोणतं होतं? सांगू? किल्वर एक्का. (गचांडी सोडत विकट हसतो.) कोतवालशेठ, कोतवालशेठ.
यमाचा : कोतवालशेठ? मोटिव्ह, अपॉर्..
माणूस : गरजच नाही. रिसोर्सेस! जुगार रिसोर्सेसचा असतो. ज्याच्याकडे जास्त रिसोर्सेस तो शेवटपर्यंत टिकतो. म्हणजेच जिंकतो. जिंकण्यासाठी तुमच्याकडे जगातला सर्वोत्तम हात – काना राजा – असायची गरज नाही. काना राजा ज्याच्याकडे आहे त्याच्यावर मालकी असली की तुम्हीच जिंकलात, शेवट. आहे की नाही!
यमाचा : म्हणजे काय?
माणूस : कोतवालशेठ माझ्यावर फार काळ लक्ष ठेवून होते. मी काही स्पेशल नाही, अर्थात. काना राजा खेळणाऱ्या सगळ्यांवर लक्ष ठेवून होते. कामच आहे त्यांचं, नाही का. जस्ट इन केस. कोणावर उधाऱ्या आहेत, कोण कर्जात आहे, कोणी ऑफिसमध्ये अफरातफर केली, कोणाला बापाच्या आजारपणासाठी पैशे हवे आहेत. सगळी माहिती. लोकांची मालकी गरज पडली तर घेता यावी म्हणून सोय.
पण मी वेगळा होतो. उधाऱ्या करत नव्हतो. आपल्या पैशानं खेळायचो, पैसे संपले की उठून घरची वाट पकडायचो. अशा माणसानं काना राजा जिंकला तर? याच्यावर मालकी कशी मिळवायची? प्रश्नच आहे, नाही? माझ्याबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल खडान्खडा माहिती ठेवून होते शेठ. मला वाटतं बायकोला त्यांनीच सांगितलं असणार – जुगाराबद्दल, सोनीबद्दल. ते वर्षभरापासून – कदाचित जास्तच काळ – तिच्या संपर्कात होते एवढं नक्की.
यमाचा : मग?
माणूस : मग काय – वो दिन आज आ ही गया! सहासष्ट हजार तीनशे योनींनंतर मुक्ती मिळालीच शेवटी, कान्या राजाला. आमच्या हस्ते. क्षणात धुऊन निघाले असणार कोतवालसाहेब! कोट्यवधींचा पॉट असतो तो. मग आपली मालकी दाखवायची वेळ आली. त्यांनी बायकोला सांगितलं, बायको सोनीला भेटली. आणि पुढे प्लॅन ठरला आणि बघा आता काय झालंय.
(पॉज घेतो.) यमाचा भाऊ, चला आता, काढा तुमचा रेडा. निघू या इथून. प्रेक्षकहो, समजलं सगळं. मी निघतो, तुम्ही पण टळा आता. जेवणबिवण करा, घरी जा. तुमची वेळ येईल तेव्हा प्रोसेसिंगला कमी वेळ लागेल अशी प्रार्थना करा.
यमाचा : (उठून उभा राहातो) तुम्ही म्हणत असलात तर चलू या. पण..
माणूस : आता पण ना बिण ... ए चला रे, पडदा पाडा.
यमाचा : त्याआधी तुम्हाला पुढची घडामोड सांगतो. ती तुम्ही पाहिली नाहीत. सोनी तुमच्या बायकोला घेऊन कोतवालशेठकडे गेला. तिथपर्यंत तुम्ही पाहिलं असेल. पण पुढे काय झालं ते इंटरेस्टिंग आहे. तुम्ही आधीच मेला होतात. आणि खिशात कान्या राजाचे पैशे क्लेम करायची गुलाबी चिठ्ठी नव्हती.
माणूस : हँ?? म्हणजे…
यमाचा : ऐका तर. कोतवालशेठनं तुमच्या बायकोवर संशय घेतला. तिनं सोनीवर. सोनीनं कोतवालशेठवर. फुल धमाल राडा.
माणूस : (अधीरपणे) पुढे?
यमाचा : असं समजा, तुम्ही जगला-वाचला असतात या प्रकारातून, तर तुम्ही विधुर असता. मन रिझवायला बॉयफ्रेंडही नवा शोधायला लागला असता. पण 'रघुवीर पोल्ट्री सेंटर'च्या मालकाचं एकाएकी दुःखद निधन झाल्याने ते बंद असतं, आणि तुम्हाला ती गुलाबी चिठ्ठी फार तर नाक पुसायला वापरता आली असती! मुलीनं पळून जाऊन मुसलमानाशी लग्न केलं असतं. तुमच्या नातेवाईकांत तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरली नसती. तुमची जिंदगी फार खराब होऊन गेली असती हो. वेळेत मेलात बघा. सुटलात.
माणूस : (Stuttering) पण .. पण .. (further stuttering) म्हणजे.. पण.. मी मेलो कसा?
यमाचा : (खाली वाकून मघाचा धातूचा तुकडा माणसाहाती देतो) तुम्ही आपले शांतपणे घरी जात होतात. शेजारून मोठा ट्रक वेगात गेला. त्याच्या टायरमुळे धातूचा तुकडा उडाला, आणि कॅरोटिड आर्टरी चिरून गेला. अपघात. असं होण्याची शक्यता सहासष्ट हजार तीनशेमध्ये एक अशी आहे बरं का!
काय आहे साहेब, हे पत्ते पिसणं वगैरे सोडा आता. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या ह्या फालतू आयुष्यातल्या फालतू पत्त्यांच्या फालतू पिसण्या-न पिसण्यावरनं तुमच्या आयुष्यातल्या घटना घडतात? सूर्य काय तुमच्या फाटक्या पँटच्या भोकातून उगवतो? अरे हाड. उंबरातले किडे मकोडे, उंबरी करती लीला असली तुमची गत सगळ्यांची. आतापर्यंत हजारो कोटी लोकांना बाहेर काढलंय आम्ही. यम नियंता सकळ जगा। तोही कामाच्या लगबगां।
माणूस : (त्याची गचांडी धरून ) काय रे झाटू! स्वत:ला काय सार्वभौम रेडासनारूढ परमप्रतापी यमदेव समजायला लागला होय रे तू? राजाच्या नाकातला मेकूड आहेस चोंग्या तू. मला काय ऐकवतो रे.
त्या इहलोकामधे जिवंत होतो तेव्हा तुमच्यासारख्यांना हात लावायची काय तुम्हाला पाहायची पण पावर नव्हती. पण जन्ममरणाच्या ह्या मधल्या अवस्थेमधे तुला मी पाहतोय. आमचा गेम बजावणारे आणि मयत झाल्यावर आमचा लेखाजोखा करणारे लोकसुद्धा आमच्यासारखेच चिरकूट असतात. फक्त पाचव्या सहाव्या डायमेन्शनचं ग्रीनकार्ड मिळालं म्हणून आम्हा नेटीव्हांवर गमजा मारता. आँ? आता मी पण आलोय रे तुझ्या डायमेन्शनमधे. दादरच्या प्लॅटफॉर्मवर उभा नाहीये. कर्जत-कसारा सारख्या खच्चून भरलेल्या का होईना, पण लोकलमधे आलोय. इथे माझा गुद्दा पोचतो तुझ्या थोबाडापाशी.
(दोघांची झटापट होते. माणूस यमाचाची गचांडी जोरात धरतो आणि त्यामुळे यमाचा धारातीर्थी पडतो. हलत नाही.)
साला घरात नाही बाहेरही नाही, अंगणात नाही नि परसात पण नाही, दिवस नाही नि रात्रही नाहे, भूमीवर नाही नि आकाशातही नाही, अशी ही हिरण्यकश्यपूने मागितलेल्या वराची अवस्था आहे साली आपली. जोवर जिवंत होतो तोवर एक फालतूतला फालतू माणूस म्हणून जगलो खरा पण निदान काहीतरी गोडगुलाबी कल्पना उराशी बाळगून. बायको-मुलीला आयुष्यभर पोसलं तर काय मिळालं? चारचौघांसमोर अन्य पुरुषांबद्दल जे प्रेम वाटत आलं – जे कुणाला सांगताही येत नाही – ते त्या सोनीसारख्यामधे शोधलं. चार-पाच वर्षं त्याच्याबरोबर झोपल्यावर तोही आपला वाटत होता. काय केलं त्यानं? साला बाकी काही नाही तर किमान एक जुगारी दुसऱ्या जुगाऱ्याला लुबाडत नाय यार. चोरों का भी अपना ईमान होता हैं! तर तो भोसडीचा कोतवाल पण असा निघतो! आता मेल्यावर परत तर जाता येत नाहीच पण साला हे पाहिल्यावर परत कोणाला जावंसं वाटणार आहे! आणि जगतानाची ही फालतूगिरी तर निदान मेल्यानंतर? नरकात तर कोणालाच जायचं नाहीये पण.. तो स्वर्ग, त्या रंभा नि उर्वशा आणि त्या जन्नत की हूर असलेल्या भात्तर दासी.. छट साला, तो पण एक फ्रॉड. सगळे साले एक नंबरचे हर्षद मेहता आहेत.
आपण कशाला त्या इंद्राची नि त्या स्वर्गाची चाटायला जातोय. अरे हाड. ना मला त्या बायकापोरांच्या खोट्या नाटकात परत जायचंय, ना मला तेहतीस कोटींच्या विरार लोकल स्वर्गात जायचंय. आयुष्य काढलं नशीबावर भरवसा असलेल्या गोष्टीवर. सगळ्या आयुष्याचाच जुगार केला. आता मला इथेच राहायचंय. जन्ममरणाच्या मधल्या स्पेसमधे. या पोटमाळ्यामधे. नाही पुण्याची मोजणी नि नाही पापाची टोचणी. अनिश्चितता नकोय. पत्ते नकोत. जुगार नको. जिंकण्याची झिंग नको, हरल्यावर होणारा रंडीरोना नको.
(अस्पष्ट शिव्या घालत माणूस कॅट मोकळा करतो, आणि प्रेक्षागारात उधळून देतो. रंगमंचावरचा प्रकाश मंदावत जातो. धीरगंभीर आवाजात खालील मनाचे श्लोक ऐकू येतात)
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केलें।
तयासारिखें भोगणें प्राप्त झालें॥
विवेकें देहेबुद्धि सोडूनि द्यावी।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी॥
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगीं।
बळें लागला काळ हा पाठिलागी॥
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे॥
(पडदा.)