घारगावातल्या न्हावी महिलेची दुर्दम्य इच्छाशक्ती - प्रा. सुमीत गुहा
लेखामागची पार्श्वभूमी – मराठी जगतानं ब्रिटिशपूर्वकालीन भारतातल्या दैनंदिन जीवनाची माहिती देणारी कागदपत्रं मोठ्या प्रमाणावर मागे ठेवली आहेत. यामागच्या कारणांचा ऊहापोह मी माझ्या पुस्तकात – History and Collective Memory in South Asia, c.1200-2000, पर्मनन्ट ब्लॅक, रानीखेत, २०१९ – केला आहे. ही कथा ३०० वर्षांपूर्वीचं सामान्य लोकांचं आयुष्य दाखवते. - प्रा. सुमीत गुहा.
उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमध्ये निम्नस्तरीय (सबाल्टर्न) न्हावी समुदायातल्या एका महिलेच्या बोलतेपणाचं आणि कर्तेपणाचं दुर्मीळ उदाहरण पाहायला मिळतं, त्याबद्दलचा हा लेख आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगांच्या वरच्या बाजूला असणारा पठारी प्रदेश शेतीच्या दृष्टीनं काहीसा जिकिरीचा आहे. मान्सूनचे वारे अरबी समुद्राकडून पश्चिमेला वाहत येतात आणि किनारपट्टीचा भाग संपल्यावर उभ्या असलेल्या या उंच पर्वतांवर त्यांना एक प्रकारे चढाई करावी लागते. या वाऱ्यांसोबत येणाऱ्या ढगांमधला जलसाठा पर्वतांच्या पश्चिम व पूर्व बाजूंनी कोसळतो. रिकामे पावसाळी ढग पूर्वेला पठारी प्रदेशाच्या दिशेनं प्रवास करू लागल्यावर पावसाचं प्रमाण संथपणे खालावतं. या तीन प्रदेशांना पूर्वापार अनुक्रमे कोकण, मावळ आणि देश अशी संबोधनं वापरली गेली आहेत.
देशावर जमीन सपाट आणि सुपीक असली तरी उपलब्ध आर्द्रतेमध्ये येणाऱ्या पिकाचं प्रमाण मर्यादित असायचं. पावसानं माती ओलसर झाल्यावर योग्य वेळेतच शेतकऱ्यांना जमिनीची मशागत करून पेरणी करावी लागत असे. इथे ज्वारी-बाजरी यांसारख्या तृणधान्यांचंही तुटपुंजं पीक येत होतं. त्यामुळे गावकऱ्यांची माफक गरज भागवण्याकरता, तसंच राजाला सारा म्हणून द्यायचा वाटा बाजूला काढण्याकरता मोठ्या प्रमाणात जमीन मशागतीखाली आणावी लागली. हे सर्व कष्टाचं काम हातानं करत राहणं अशक्य होतं, त्यामुळे बैलांचा वापर आवश्यक ठरला.
गावकऱ्यांना याची चांगलीच जाण होती. त्यामुळे ‘पोळा’ हा या भागातला पहिला मुख्य पारंपरिक सणसुद्धा गावातल्या गायीगुरांच्या सन्मानार्थ सुरू झाला. श्रावणात अमावास्येच्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या या सणामध्ये बैलांना विशेष चारा दिला जातो; त्यांची शिंगं रंगवली जातात आणि फुलांचे हार घालून त्यांची मिरवणूक काढली जाते. बैलांना कष्ट करण्यासाठी लागणारं सुदृढ आरोग्य आणि बळ लाभावं, याकरता प्रार्थना केली जाते. शेतकऱ्याची मिळकत, ‘किंबहुना, शेतकऱ्याचं सगळं अस्तित्वच’ गायीगुरांवर अवलंबून असतं, त्याच्या घराचा काहीएक भागच गायीगुरांनी व्यापलेला असतो, असं या जगण्याविषयी सहानुभूती राखणाऱ्या एका इंग्रज निरीक्षकानं लिहिलं आहे. ‘शेतकऱ्याच्या कुटुंबाइतकंच त्यांच्याकडच्या गायीगुरांचंही संगोपन होत असतं’, असं दुसऱ्या एका निरीक्षकानं १८१९ साली नोंदवल्याचं दिसतं. पण कोरड्या हंगामाच्या अखेरीला गुरं चाऱ्याअभावी बारीक आणि दुबळी होतात, असंही त्यानं नमूद केलं.
यावरील निकडीचा उपाय म्हणून नियमितपणे गावातल्या गायींना आणि बैलांना काही दिवसांसाठी पश्चिमेकडच्या डोंगरांमधल्या कुरणांच्या दिशेनं पाठवलं जात असे. डोंगररांगांमध्ये पडणारा जास्तीचा पाऊस आणि तिथल्या झाडांची वाढ यांमुळे तिथे कोरड्या मोसमातही काही चारा उपलब्ध होत असे. अजून शेतीच्या कामासाठी पुरेशी ताकद न कमावलेल्या लहान मुलांना या जनावरांसोबत पाठवलं जात होतं. याच दरम्यान घडलेला एक प्रसंग इथे नोंदवतो आहे.
देशावरच्या काही गावांमधल्या गायीगुरांना १७३६ सालच्या उन्हाळ्यात कुरणाच्या शोधात खूप दूरवर दरमजल करत जावं लागलं. त्यामुळे घारगाव आणि पारगाव या गावांमधली गुरांसोबत गेलेली मुलं डोंगरांमध्येच तात्पुरती राहत होती. करमणुकीसाठी त्यांनी ‘मुघल’ आणि ‘मराठे’ असे दोन संघ करून खेळ सुरू केला. मुघल साम्राज्याला महाराष्ट्रातून माघार घ्यायला लावणाऱ्या काही दशकांपूर्वीच्या लढाया ते नाटकीपणे खेळत होते. त्याच खेळाचा भाग म्हणून ते या दोन गावांमध्ये उद्भवणाऱ्या वादांचीही तालीम करत होते.
हा खेळ पाच दिवस चालला. दरम्यान, कोणत्यातरी अज्ञात घटनेमुळे हे खेळणारे मुलगे संतापले. त्यामुळे खेळातलं युद्ध प्रत्यक्ष हातघाईवर आलं आणि पारगावच्या ‘मराठ्यां’नी घारगावच्या ‘मुघलां’ना सळो की पळो करून सोडलं. या गडबडीत घारगावचा एक मुलगा धावताना कड्यावरून खाली पडला. त्याचं डोकं फुटलं. लगेच त्याला घरी नेण्यात आलं, पण पंधरा-वीस दिवसांनी तो मरण पावला. या मुलाचे पालक घारगावात पारंपरिक न्हावीकाम करणारे होते. महाराष्ट्रातल्या ग्रामसमाजात न्हावी हा महत्त्वाचा भाग होता. सर्वसाधारणपणे हे काम वडिलोपार्जित पेशाचा भाग म्हणून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत असे. त्यांची ठरलेली कामं होती आणि मानधनही ठरलेलं असायचं. गावच्या कारभारातही त्यांची काहीएक भूमिका होती.
थॉमस कोट्स यांनी १८१८च्या दरम्यान पिढीजात न्हाव्याच्या विहित कामांचं वर्णन केलं होतं. दर पंधरा दिवसांनी गावकऱ्यांचे केस भादरणं आणि त्यांची नखं कापणं; हे काम शुभ दिवशी केलं जाईल याची काळजी घेणं, हे न्हाव्याचं काम होतं. शिवाय, सुट्टीच्या दिवशी पाटील आणि कुलकर्णी यांची, तसंच गावात येणाऱ्या प्रतिष्ठित प्रवाशांची मालिश करून देणं, सांधे मोडून देणं, इत्यादीही कामं त्याच्याकडे असायची. तो गावातला शल्यविशारदही होता, आणि लग्नांमध्ये सनई व तंबूर१ वाजवण्याची जबाबदारी त्याच्याकडे असायची. तसंच, पाटील परगावी जात असताना न्हावी त्याची तांब्याची भांडी घेऊन सोबत जात असे.
घारगावातल्या न्हाव्याची पत्नीही अशाच रीतीनं गावातल्या स्त्रियांना सेवा पुरवत असे. त्यातून हे जोडपं ग्रामसमुदायाचे मान्यताप्राप्त सदस्य झालं. या गावात फक्त त्यांचंच न्हावी कुटुंब होतं. स्वाभाविकपणे हा पेशा वंशपरंपरागतरीत्या त्यांच्याकडेच राहिला.
पण उल्लेखनीय बाब म्हणजे खेळताना मरण पावलेल्या मुलाची आई तिच्या पतीपेक्षा आणि बहुधा तिच्या गावातल्या उर्वरित समाजापेक्षाही स्वतंत्रपणे वागली. आपल्या मुलाचा चुकीच्या रीतीनं मृत्यू झाल्याचं तिचं स्पष्ट मत होतं, त्यामुळे या घटनेबाबतीत काहीएक न्यायनिवाडा व्हायला हवा, असा निर्धार तिनं केला. हा बहुधा तिचा एकुलता एक मुलगा होता. आधी तिनं अहमदनगरला जाऊन मुस्लीम न्यायाधीशाची (‘काझी शरा’ची) भेट घेतली आणि पारगावानं आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत खुलासा करावा अशी मागणी केली. न्यायाधीशानं तिची बाजू ऐकून घेतली. पण, मुलांमधील खेळादरम्यान भांडण झालं आणि त्यात या मुलाचा मृत्यू झाला, त्यामुळे याबाबत कोणताही खटला उभा राहू शकत नाही, असा लेखी निकाल सदर न्यायाधीशानं दिला. मुलाच्या आईला हे पसंत पडलं नाही. मग ती ठिकठिकाणी जाऊन विविध अधिकारी संस्थांकडे पारगावाविरोधात तक्रारी नोंदवू लागली, असं उपलब्ध कागदोपत्री नोंदींवरून समजतं. प्रत्येक वेळी किमान पारगावचा पाटील धावजी मडका याला प्रतिवादी म्हणून बोलावण्यात आलं असावं, आणि त्यानं निश्चितपणे सोबत एक वा दोन सहकारीही सुनावणीवेळी सोबत नेले असतील.
त्या काळी अगदी दुय्यम न्यायालयातही अशा सुनावणीसाठी कोणाला बोलवायचं असेल तर अधिकृत निरोप्याला गावात पाठवलं जायचं. त्याच्या खाण्यापिण्याची सोय करावी लागत असे आणि ‘मसाला’ म्हणून संबोधलं जाणारं शुल्क द्यावं लागत असे. न्यायालयापर्यंतच्या प्रवासाचा खर्च, तसंच तिथे बाजू मांडण्यासाठी दीर्घ काळ किंवा थोडा काळ थांबावं लागण्यास त्यात होणारा खर्च, हे सगळं गावप्रमुखालाच स्वतःच्या खिश्यातून भागवावं लागत होतं. शिवाय, गावाची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी त्याला स्वतःची दैनंदिन कामं बाजूला ठेवावी लागत. त्यामुळे आजच्याप्रमाणे तेव्हाही निव्वळ न्यायिक संस्थेसमोर हजर राहण्याचा अनुभवच शिक्षेसारखा असायचा. अखेरीस हताश होऊन धावजी मडगा पहिले शाहू छत्रपती महाराज यांच्याकडे गेला (१७०८ ते १७४९ या दरम्यान त्यांचं राज्य होतं). महाराजांना साकडं घालण्याची प्रक्रिया सोपी नव्हती.
मुघलांच्या न्यायालयीन व्यवस्थेपेक्षा मराठ्यांची न्यायालयं सर्वसामान्य लोकांसाठी तुलनेनं अधिक खुली होती. पण त्यासाठी कोणत्याही याचिकाकर्त्याला इतर अनेक याचिकाकर्त्यांशी झटापट करून आणि दुय्यम कर्मचाऱ्यांची खुशामत करून पुढे जावं लागत असे. धावजी पाटलानं त्याच्या गावातल्या किंवा पंचक्रोशीतल्या कोणाच्यातरी माध्यमातून महाराजांपर्यंत पोचण्यासाठीचा मार्ग शोधला असेल. कदाचित त्याच्या भागातली काही महत्त्वाची माणसं मराठा सैन्यातून लढली असतील, त्यामुळे त्यांची काही मदत त्याला झाली असेल.
कसं का असेना, शेवटी धावजीनं या प्रकरणात छत्रपतींसमोर स्वतःची बाजू मांडली. अहमदनगरमधल्या काझीनं दिलेल्या निकालाची दखल घेत महाराजांनी या मृत्यूचा कोणताही दोष पारगावावर येत नसल्याचा अधिकृत निकाल दिला. इतकंच नव्हे तर महाराजांनी धावजी पाटलाला पागोटं आणि पोशाख देऊन त्याचा मानसन्मान केला. या घटनाक्रमाचं वर्णन करणारं पत्र घारगावच्या मुकादमाकडे पाठवण्यात आलं (पत्रावर त्याचा नावानिशी उल्लेख नाही). तो बहुधा सुनावणीवेळी हजर नव्हता. हे प्रकरण आता पुढे न्यायालयीन कार्यवाहीसाठी लावून धरू नये, अशी सूचना संबंधित न्हावी दाम्पत्याला करावी, असा आदेश या पत्रात दिलेला होता. त्यात प्रचलित रीतीनं समज दिली होती – "या बाबतीत आणखी तक्रार केल्यास तुमच्यासाठी ते हितकारक ठरणार नाही."
यानंतर गावकऱ्यांनी मृत मुलाच्या आईवर चाप ठेवावा, असा स्पष्ट इशारा पाटलाच्या माध्यमातून गावकऱ्यांना देण्यात आला. या पत्राची प्रत धावजी पाटलाकडेही देण्यात आली.
या इशाऱ्यानंतर मृत मुलाची आई निश्चितपणे निराश झाली असेल. तिनं न्यायासाठी दीर्घ आणि कष्टप्रद लढा दिला. या घटनेचा विचार करताना शोकाकुल मातेच्या धाडसानं आपण चकित होतोच; शिवाय ती बहुधा स्वतःच्या नवऱ्याची किंवा इतर कोणा पुरुषाची मदत न घेताच दीर्घ काळ आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत हरकत घेणारा सूर लावत होती, हेही विलक्षण वाटतं. तिच्या या प्रयत्नाची अखेर तिला अपेक्षित होती तशी झाली नसली तरी तिच्या या निर्भीड निषेधाचे सूर दूरवर ऐकू गेले, एवढं निश्चित!
प्रा. सुमीत गुहा.
इंग्रजीतून भाषांतर – अवधूत डोंगरे
१. तंबूर - एक चर्मवाद्य; ढोल. (संदर्भ : मोल्सवर्थ शब्दकोश, दाते शब्दकोश.)