त्याला जागं करा, सध्या तो स्वप्नात अडकलाय
'कालचा दिवस खरा होता की स्वप्न?'
आजकाल, रोज सकाळी उठल्यावर त्याला हाच प्रश्न पडतो.
आपलं जगणं हे केवळ एक स्वप्न बनलंय आणि आपण केवळ त्या स्वप्नासाठी जगतोय, बाकी माझ्या जगण्याला काही अर्थ नाहीये हीच गोष्ट त्याच्या मनात येत राहते. दिवस रात्र तो याच गोष्टीचा विचार करत राहतो आणि त्याला ही गोष्ट कुणाला सांगताही येत नाही कारण तो काय बोलतोय हे कुणाला कळतच नाही.
त्याला लोकांचा सल्ला नको आहे कारण त्याला माहितीये की लोक जो सल्ला देतात – मग सल्ला देणारं कुणीही असो, त्याचे पालक असोत, परिवारातले लोक असोत, मित्र असोत, शिक्षक असोत किंवा इतर कुणीही असो – तो सल्ला, ते ज्या नजरेतून जगाकडे बघतात आणि त्यांना जे अनुभव आलेले असतात त्याला अनुसरून देत असतात.
त्याची अपेक्षा इतकीच असते की लोकांनी, त्याला कोणत्याही प्रकारे जज न करता, केवळ त्याचं म्हणणं ऐकून घ्यावं.
एरवी ज्या लोकांशी तो बोलतो, जे लोक त्याच्या क्रिएटिव्हिटीला खतपाणी घालतात, जे लोक त्याला समजून घेतात अशी त्याची समजूत आहे (किंवा होती), ते लोक आज त्याच्या जवळ नाहीत. सगळे एक तर आभासी जगात कुठेतरी हरवून गेलेत किंवा त्याच्यापासून दूर, इतक्या लांब निघून गेलेत की तो त्यांच्यापर्यंत फिजिकली पोचू शकत नाही.
माणसा-माणसांतलं अंतर इतकं कसं वाढू शकतं?
सर्व्हायव्हल माणसाला इतकं स्वमग्न, स्वार्थी कसं काय बनवू शकतं?
जे लोक आनंदात आहेत, ते इतके आनंदी कसे काय आहेत?
लोकांना त्यांच्या आजूबाजूला, एक प्रचंड मोठा बदल घडला आहे हे समजतंय की नाही?
या व्यवस्थेमध्ये आपण कुठे फिट बसतो?
प्रश्नांचा भडिमार सुरू होतो आणि एक क्षण येतो, जेव्हा तो सुन्न पडतो.
कधी कधी झोपताना, तो नुसताच आढ्याकडे बघत राहतो आणि विचार करत राहतो.
'जे आपण बदलू शकत नाही, जे बदलणं आपल्या हातात नाही त्याबद्दल कशाला चिंता करायची?'
नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, डिस्नी हॉटस्टार अशा अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मची सब्स्क्रिप्शन त्याच्याकडे आहेत आणि तो त्याच्यावर अनेक सिनेमे, सीरिअल बघतो पण एकही सिनेमा किंवा सीरिअलमध्ये त्याचं मन गुंतत नाही. एका मागून एक, ते सगळं तो नुसतं बघतो आणि कंटाळा आला किंवा मेंदू थकला की तो झोपून जातो.
दुसऱ्या दिवशी जेव्हा तो उठतो, तेव्हा आदल्या रात्री एखादं स्वप्न बघितल्याप्रमाणे, तो सगळं काही विसरून गेलेला असतो.
आजकाल हेच त्याचं आयुष्य बनलं आहे.
तो जेव्हा सुन्नपणे टीव्ही वर काहीतरी बघत असतो, तेव्हा त्याची कुत्री त्याच्याकडे एकटक बघत असते. तिच्या डोळ्यात बघितल्यावर त्याला वाटतं की ती कधीही अचानक बोलायला लागेल.
'जे काही तुझ्या डोक्यात जे चाललंय, ते माझ्या समोर ओक एकदाचं. मनातल्या मनात कुढत बसू नकोस.'
पण तिची भाषा त्याला येत नाही.
त्याला वाटतं की आपणही भुंकावं.
'मला या आभासी जगण्याचा, सगळ्या जबाबदाऱ्या घेण्याचा, सगळ्यांना खुश ठेवण्याचा, सतत स्वतःला प्रूव्ह करण्याचा, या स्पर्धात्मक व्यवस्थेमध्ये पळत राहण्याचा कंटाळा आलाय आणि मला पुन्हा एकदा पूर्वीसारखं जीवन जगायचंय. स्वच्छंदी, विदाउट एनी कंट्रोल, विदाउट एनी स्पर्धा'.
मग ती एक पाऊल पुढे येते आणि त्याच्या मांडीवर बसते.
तिचे डोळे भेदक आहेत.
तिच्या डोळ्यांत त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं.
तिला मानवी भाषा येत नाही पण तरीही ती त्याच्याशी संवाद साधते.
'पूर्वी तर तुझ्यावर कुणाची जबाबदारी नव्हती. तू स्वच्छंदी होतास. तुझ्या आईवडिलांनी तुला हवं ते दिलं. हवं तितकं स्वातंत्र्य दिलं. पैसा, अडका, उत्तम लाईफस्टाईल कशाचीही तुझ्याकडे कमतरता नव्हती. तरीही तू आनंदी नव्हतास. तेव्हाही तुला आत्तासारखा एम्प्टीनेस जाणवायचा. आजही तुझ्याकडे सगळं आहे. तू खात्यापित्या उत्तम घरात राहतोस, धडधाकट आहेस, कामही करतोस, तुला बरे पैसे मिळतात तरीही तू आनंदी नाहीस.'
मग तो पुन्हा भुंकतो.
'तेच तर कळत नाहीये. असं का होतंय? माझ्या संपूर्ण आयुष्यात, कोणत्या टप्प्यावर, असं काय घडलं ज्यामुळं आयुष्य इतकं कॉम्प्लिकेटेड झालं?'
बहुतेक या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नसावं म्हणून ती शांतपणे उठते आणि खुर्चीखाली जाऊन बसते पण मनातून ती दुःखी असते कारण तिला समजत असतं की हा, जो आपल्याला रोज फिरवून आणतो, खायला देतो, आपल्याशी खेळतो, आपल्याशी गोड बोलतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मैत्रीला रेसिप्रोकेट करतो, त्याचं मन आजकाल थाऱ्यावर नाही. त्याला असे काही प्रश्न पडलेत, ज्याचं उत्तर त्यालाच शोधायचंय पण आत्ता त्याची मनःस्थिती ठीक नाहीये.
कधी कधी, जेव्हा त्याला काहीच करायची इच्छा नसते तेव्हा तो खुळ्यासारखा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फिरत बसतो आणि उगाच काही ना काही काम उकरून काढतो. मध्येच एखादं पुस्तक उचलतो पण ते वाचत नाही. टीव्ही लावतो, काहीतरी बघायचा प्रयत्न करतो पण त्यातही त्याचं मन रमत नाही. त्याला माहीत असतं की तो वाचन करू शकतो, लिहू शकतो अगदी काहीच नाही तर काहीच न करता एका जागी स्वस्थ बसून राहू शकतो पण तरीही या सर्व गोष्टी करण्याचा त्याला कंटाळा आलेला असतो.
'तुला कुणासारखं बनायचंय?'
अचानक एक धीरगंभीर, खर्जातला आवाज त्याला ऐकू येतो. तो इकडं तिकडं बघतो तेव्हा त्याला खोलीतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात, खुर्चीवर पाय ताणून बसलेल्या एका पुरुषाची आकृती दिसते.
त्यानं निळ्या रंगाचे, हमालाचे कपडे घातलेत.
त्याचे पाय लांब आहेत आणि त्यानं ते समोरच्या मेजावर ठेवले आहेत. त्याच्या चेहऱ्यावर अंधार आहे पण ती आकृती, त्याचा आवाज, बोलण्याची स्टाईल, त्याला ओळखीची वाटते. त्याच्या खांद्यावर असलेला बिल्ला त्याला दिसतो ज्यावर नंबर आहे ७८६.
'तुला कुणासारखं बनायचंय?', ती आकृती पुन्हा विचारते, 'माझ्यासारखं?'
'की माझ्यासारखं?'
आणखी एक आवाज येतो आणि ओळखीची आकृती दिसते. या आकृतीनं झब्बा, पायजमा घातला आहे, अंगावर शाल पांघरली आहे आणि दोन्ही हात दरवाजाच्या चौकटीला टेकवून, जीजस क्राईस्टसारखे, ती आकृती उभी आहे.
त्याला वाटतं, आपल्या डोक्यात केमिकल लोचा झालाय. आपण जे क्षेत्र आपलं मानलं, ज्या क्षेत्रावर मनापासून प्रेम केलं त्या क्षेत्रानं आपल्याला आता वेडं केलंय.
फिक्शनल पात्रं आपल्याशी बोलतायत. आपण त्यांच्याशी स्वतःला रिलेट करतोय आणि वास्तवात जे अस्तित्वात आहेत, ज्यांनी आपल्याशी बोलणं अपेक्षित आहे, त्यांच्याशी आता आपण कनेक्टच होऊच शकत नाही आहोत.
'हे असं का होतंय?' पुन्हा एक प्रश्न पडतो ज्याचं उत्तर त्याच्याकडे नाहीये.
'These characters are the manifestation of your thoughts when you see yourself in the mirror', तिसरा आवाज. पण यावेळी फक्त आवाजच आहे.
'आता तू कोण?' तो त्या आवाजाला विचारतो.
'मी तुझ्या मनातला, तुझाच आवाज आहे.'
'मग तू इंग्लिशमध्ये का बोलतोयस?'
'कारण मराठीमध्ये बोललं की गंमत येत नाही. सगळे फाडफाड इंग्लिश बोलून स्वतःचं मार्केटिंग करतात.'
त्याच्या चेहऱ्यावर तुच्छतापूर्ण भाव येतो. 'हा काय सांगतोय मला?'
पण तो आवाज खरं बोलतोय. एका बाजूला आहे अँग्री यंग मॅन, ज्याला व्यवस्थेबद्दल चीड आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे चांगलं-वाईट काहीही झालं तरी दुःखी असणारा आणि आतून, खूप खोलवर काहीतरी चुकतंय, काहीतरी राहून गेलंय अशी भावना असलेला, स्वतःवरच नाखूष असलेला कलाकार.
'द मॅनिफेस्टेशन ऑफ माय थॉट व्हेन आय सी मायसेल्फ इन द मिरर.'
तो त्याच्या कुत्रीकडे बघतो.
तिला लक्षात येतं की हा काहीतरी टोकाचं करणार आहे. तो घरात जिथे जिथे जातो, तिथे तिथे ती त्याच्या मागे मागे जात राहते. शेवटी न राहवून तो तिला म्हणतो, 'माझ्या मागं मागं फिरू नको. मी काहीही एक्स्ट्रीम करणार नाहीये. तेवढी माझ्यात हिंमतही नाहीये.'
पुन्हा एकदा भेदक डोळ्यांनी ती त्याच्याकडे बघते आणि शांतपणे खुर्चीखाली जाऊन बसते.
मग तो घराबाहेर पडतो आणि समोरच्या रस्त्यानं चालत चालत जाऊ लागतो. तो किती वेळ चालतोय हे त्यालाही कळत नाही पण चालत चालत तो एका डोंगरावर पोचतो जिथून पुढे एक प्रचंड मोठी दरी आहे आणि खाली एक कोरडी पडलेली नदी आहे. त्याच्या मनात विचार येतो.
'जर मी इथून उडी मारली तर मी एखाद्या स्वच्छंदी पक्षाप्रमाणे उडू शकेन का?'
तो दरीच्या अगदी टोकापाशी जातो आणि क्षणाचाही विलंब न करता तिथून उडी मारतो.
'मी उडतोय!' तो जोरात ओरडतो. त्याच्या डोळ्यात आणि स्वरात अपरिमित आनंद आहे पण त्याला ऐकायला आजूबाजूला कोणीच नाहीये. पण जो आनंद तो अनुभवत आहे त्याच्या समोर, त्याला ऐकणारं कोणीच नाहीये ही भावना काहीच महत्त्वाची नाहीये. खाली दिसणारं शहर, शहरातले लोक, ट्रॅफिक, रस्ते सगळं एका वेगळ्याच पर्स्पेक्टिव्हमध्ये तो बघतोय.
त्याला ते सगळं भकास झालंय असं वाटतं.
सगळे एकमेकांशी रेस करतायत, कुणालाच, कुणासाठी वेळ नाहीये. खाली दिसणारं सगळं खोटं आहे, आभासी आहे आणि माझी इच्छा नसताना, मी पण या आभासी जगाचा एक भाग बनलोय. हा विचार त्याच्या मनात येतो आणि त्याला किळस येते. त्याला खाली उतरण्याची इच्छाच होत नाहीये. कुणालाही भेटायची, बोलायची इच्छा होत नाहीये फक्त उडत राहण्याची एकच इच्छा, आत्ता त्याच्या मनात आहे.
तो उडतउडत त्याच्या स्वतःच्या फ्लॅटच्या बाहेर येतो तेव्हा त्याला त्याची कुत्री, गॅलरीमध्ये त्याची वाट बघताना दिसते. त्याला बघून ती अतिशय आनंदी होते आणि स्वतःभोवती गोलगोल चकरा मारू लागते. तिला बघून त्याच्या उडण्यातला आनंद द्विगुणित होतो.
तो तिला म्हणतो, 'चल, माझ्या पाठीवर बस. मी तुला फिरवून आणतो'.
क्षणात ती त्याच्या पाठीवर बसते आणि तो पुन्हा उंच झेप घेतो. तो खूप वेळ तसाच उडत राहतो, सगळं जग बघतो. त्याला वेगवेगळे लोक दिसतात पण त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव एकसारखे आहेत.
निर्विकार!
त्याला पुन्हा किळस येते.
तो एका जंगलापाशी पोचतो. त्याच्या पाठीवर त्याची कुत्री नाहीये.
'कुठं गेली ही? पडली तर नाही ना?' त्याच्या मनात प्रश्न येतो पण तो काहीच फरक पडला नसल्याप्रमाणे जंगलात जातो.
कुत्री गायब झाल्याबद्दल त्याला काहीच वाटत नाहीये. आजकाल जनावरांबद्दल, खासकरून कुत्र्यांबद्दल, निसर्गाबद्दल, जंगलांबद्दल जे प्रेम त्याला आधी वाटायचं, जी काळजी त्याला वाटायची ती वाटायची बंद झाली आहे. कारण ते सर्व काही नष्ट होणार आहे हे त्याला माहितीये. सगळ्यांना मोठेमोठे रस्ते बांधण्यात आणि त्यावरून आधुनिक गाड्या घेऊन फिरण्यात जास्त रस आहे. हे थांबवण्यासाठी तो काहीच करू शकत नाही किंबहुना करू इच्छित नाही कारण त्याला माहिती आहे की ते तो करू शकत नाही किंबहुना कुणाला तो काय करतोय, करू इच्छित आहे यामध्ये काहीही रस नाही. मग त्याबद्दल वाईट वाटून घेण्यात आणि स्वतःचं उरलं सुरलं आयुष्य डिप्रेस होऊन जगण्यात काय अर्थ?
जंगलातली सगळी जनावरं गायब झाली आहेत.
फक्त एक झोपडी दिसतीये.
'हं… हं… मला गरम रक्ताचा वास येतोय.'
झोपडीतून एक आवाज येतो.
'हा तर बाबा यागाचा आवाज आहे. पण ती तर रशियन लोककथांमध्ये असते. इथे कशी काय?' त्याच्या मनात येतं.
'अगं बाबा यागा, मला ओळखलंस का? मी तुझ्या गोष्टी ऐकत मोठा झालोय. तू तुझ्या वाचकालाच मारणार काय? इवान छोटा बुद्धीनं मोठ्याला जशी आंघोळ घातलीस, खाऊपिऊ घातलंस तसं मलाही खाऊपिऊ घाल की!', तो झोपडीच्या बाहेर उभं राहून म्हणतो.
पण समोरची झोपडी गायब झालेली असते. जंगल गायब झालेलं असतं आणि त्याठिकाणी एक उंच पंचवीस मंजली इमारत उभी असते.
काही काळानंतर 'नॉस्टॅल्जिया' हा शब्द डिक्शनरीमधून गायब होईल.
ती इमारत भकास आहे. तिथं कोणीच रहात नाही. ती फक्त उभी आहे. लोक जसे निर्विकार चेहऱ्यानं त्यांना दिलेलं काम करत असतात, तशी ती इमारत रिकामी, निर्विकार उभी आहे.
तो इमारतीच्या अगदी टोकाशी जातो आणि पुन्हा आकाशात झेप घेतो.
पण आता त्याला उडण्याचा कंटाळा आलाय.
'उडत उडत कुठं जाणार?'
'जिथं जाईन तिथं एकसारखी परिस्थिती असेल.'
'निर्लज्ज, कुचकामी, फसवे नेते, त्यांच्या फसलेल्या नीती आपल्यावर लादतायत.'
'धर्म, जात, एथनिसिटी, पूजा-अर्चा या सगळ्याला जास्त महत्त्व आलंय.'
'टीव्ही, सिनेमा, इंटरनेट, साहित्य, न्यूज हे सगळं प्रोपोगांडा आणि ब्रेन वॉश साठी वापरलं जातंय.'
'आपल्या नेत्यांची खोटारडी वचनं ऐकत, लाखो, करोडो लोक, डोळ्यांवर पट्ट्या लावून त्यांच्या मागे मागे चालतायत.'
'आपण ज्या व्यवस्थेमध्ये जगतोय, ती व्यवस्था आज ना उद्या आपली सगळी स्वप्नं पूर्ण करेल असा आभास निर्माण केला जातोय.'
'आणि इच्छा नसताना, आपणही अशा व्यवस्थेचा भाग बनलोय ज्या व्यवस्थेनं आपल्याला कुचकामी बनवलंय.'
'आय अॅम अ फ्री सोल अँड कॅन डू व्हॉटएव्हर आय लाईक टू डू इज अ मिथ जस्ट लाईक डेमॉक्रसी इज अ मिथ'.
'उडत उडत कुठं जाणार?' त्याच्या मनात पुन्हा प्रश्न येतो आणि तो एका पठारावर उतरतो.
दिवस मावळायला लागला आहे. त्याचं शरीर आणि मन थकलेलं आहे. त्याला झोपेची गरज आहे पण तो डोळे मिटू शकत नाही कारण डोळे मिटल्यावर त्याला स्वप्नं दिसू लागतात. त्या स्वप्नांना काही अर्थ नसतो. ती त्याला रँडमली, फक्त एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जातात. कधी कधी त्या जागा त्याला ओळखीच्या वाटत पण कधी कधी त्या जागा अगदीच अनोळखी असतात.
कशालाच, काहीच लॉजिक नसतं. सगळं फक्त रँडम असतं.
'ही जागा, हे पठार, जिथं मी आत्ता उतरलोय, ती पण अशीच एक जागा आहे ज्या जागेला माझ्या जागृतावस्थेत काहीच स्थान नाहीये'.
त्याच्या मनात विचार येतो आणि तो एका वाळलेल्या झाडाखाली बूड टेकवतो आणि शांतपणे डोळे मिटतो.
दुसऱ्या दिवशी जेव्हा तो डोळे उघडतो तेव्हा त्याची कुत्री त्याच्या छातीवर बसून त्याच्याकडे एकटक बघत असते.
तिला फिरायला जायचं असतं.
'कालचा दिवस खरा होता की स्वप्न?'
आजकाल, रोज सकाळी उठल्यावर त्याला हाच प्रश्न पडतो.
!
कधीपासून होतंय हे असं?
काळजी घ्या!