Skip to main content

अधःपतनातील काळाच्या नोंदी

अललित

या वर्षाअखेर एकविसाव्या शतकाची पंचविशी उलटेल. शतकाच्या पहिल्या चतकोराचा गोषवारा घ्यायला एकच मथळा वापरायचा झाला तर? "सावध ऐका पुढल्या हाका" असा मथळा साऱ्या जगाबद्दल, तर "आर्थिक तेजी, लोकशाहीची मंदी" हा भारतासाठी योग्य ठरेल. महाराष्ट्राच्या बाबतीत सकारात्मक बाजू शोधायला संपादकांना बरेच कष्ट पडतील. "प्रगती ठप्प, अंधारवाटा सामोऱ्या" असा मथळा द्यावा लागेल.

 

महाराष्ट्राच्या वेगवान अधःपतनाचे बातमीमूल्य कधीचे सरले. महाराष्ट्र मागे पडतोय अशी हाकाटी उठवणे महाराष्ट्राची परंपरा आहे. पण गेल्या काही वर्षांत हा गलबला वाढला आहे. महाराष्ट्राच्या पिछेहाटीचे पडसाद वेगवेगळ्या क्षेत्रांत उमटत आहेत. अर्थतज्ज्ञ नीरज हातेकरांनी राज्याच्या आर्थिक कमजोरीचे विश्लेषण केले आहे, तर गिरीश कुबेर यांनी महाराष्ट्राची एकेकाळची औद्योगिक आघाडी उद्योगधंद्यांच्या स्थलांतरामुळे कशी लयाला गेली हे दाखवले आहेसुलक्षणा महाजन यांनी महाराष्ट्राच्या आणि एकूणच भारताच्या फसलेल्या नगर नियोजनाबद्दल लिहिले आहे, राजनीतीतज्ञ सुहास पळशीकर यांनी ढासळलेल्या राजकीय संस्कृतीवर प्रहार केले आहेतहेरंब कुलकर्णी यांनी शिक्षणक्षेत्राच्या चुकीच्या दिशांवर बोट ठेवले आहे, रमेश पाध्यांनी शेतकरी आत्महत्या आणि शेतीसमोरील आव्हाने पुढे आणली आहेत

 

तुलनेने कलाक्षेत्र मात्र गप्प आहे. कलावंतांचा समाजातील सर्व थरांशी जवळून संबंध येतो. समाजमनाची नस अचूकपणे पकडणे यशस्वी कलावंतांना जमते. पण अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर जोरदार हल्ले होत असताना, घोषित-अघोषित सेन्सॉरशिपचा (दुवा १दुवा २) विळखा घट्ट होताना ही शांतता भीषण वाटते. श्रीराम लागू, निळू फुले, विजय तेंडुलकर यांच्यासारखे सामाजिक जाणीव तीव्र असलेले रंगकर्मी काळाच्या पडद्याआड गेल्यावर महाराष्ट्राला अधिकारवाणीने सुनावणारे या क्षेत्रातील आवाज बंद पडले आहेत. 

 

मुखपृष्ठ
नाटकवाल्याचे प्रयोग

या पार्श्वभूमीवर नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांचे नाटकवाल्याचे प्रयोग हे पुस्तक उठून दिसते. नाटकवाल्याचे हे काही महाराष्ट्राच्या पीछेहाटीचे विश्लेषण नाही, ते आहे पेठ्यांचे अनुभवकथन. पण पुस्तक बारकाईने वाचल्यास महाराष्ट्रातील ढेपाळलेल्या व्यवस्थांचे आणि सामाजिक अनास्थेचे दर्शन होते. यावर्षी हे पुस्तक प्रकाशित होऊन दहा वर्षे उलटली तरी हे अवलोकन समकालीन वाटते. दुसरीकडे एका दशकाच्या अवकाशामुळे महाराष्ट्राच्या अधोगतीची चिन्हे स्पष्टपणे जाणवतात आणि पराभवाच्या पाऊलखुणा चरचरीतपणे उमटतात. महाराष्ट्रावर दाटलेले मळभ समजून घ्यायचे असेल तर या पुस्तकाचा आढावा घेणे सुसंगत ठरेल. या लेखात नाटकवाल्याचे तीन स्तरांत होणारे दर्शन मांडले आहे: अनुभव, प्रयोग, आणि चिंतन. सरतेशेवटी पेठ्यांची स्वतःची भूमिका या परिस्थितीत मार्गदर्शक होऊ शकेल का याची शहानिशा केली आहे. 

 

रसरशीत नाट्यानुभव 

 

नाटक हे 'मराठी माणसाचा मानबिंदू' आहे असे मानण्याची पद्धत आहे. मराठी रंगभूमीला पावणेदोनशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. या परंपरेच्या अनेक पाईकांनी आपल्या कारकिर्दीचे सिहांवलोकन करणारी पुस्तके लिहिली आहेत. कालांतराने या पुस्तकांचा स्वतंत्र कानन झाला आहे : लमाण (श्रीराम लागू), माझा नाटकी संसार (मामा वरेरकर), झिम्मा (विजया मेहता). ही पुस्तके आत्मचरित्रे असली तरी त्यात नाट्यव्यवहाराबद्दल चिंतन आले आहे. मी कसा झालो आणि कऱ्हेचे पाणी या आचार्य अत्रे यांच्या आत्मकथनपर पुस्तकांतील नाटकाबद्दलचा भागही रोमांचकारी आहे. नाटककार-अभिनेत्यांच्या आयुष्याबद्दल कुतूहल-प्रेम असल्यामुळे या पुस्तकांना अजूनही मागणी असते.

 

'एका प्रख्यात रंगकर्मीचे अनुभवया प्राथमिक पातळीवर नाटकवाल्याचे वेधक आहे. पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा पेठ्यांचा नाटकाशी संबंध येऊन तीस वर्षांहून जास्त काळ उलटला होता. या प्रवासातील अनुभव पेठ्यांनी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मांडले आहेत. वाचनीयताकथनाची शैलीप्रवाही शैली या निकषांवर हे निरूपण समालोचन ठरते.

 

संहितानिवड असो किंवा तालमी, नेपथ्य किंवा प्रकाशयोजना, नाटककार-अभिनेत्यांबरोबर चर्चा किंवा दौऱ्यांचे नियोजन, पेठे नाटकाच्या प्रयोगांचा सर्वस्पर्शी परिचय देतात. पण त्यांचे निरूपण एक पाऊल पुढे जाते. नाटकाच्या अंदाजपत्रकाबद्दल त्यांचे गणित पाहून किंवा प्रयोगाचे भित्तीपत्रक-माहितीपत्रक ते स्वतःच का बनवतात याचे स्पष्टीकरण वाचून नाट्यसंस्कृतीच्या दुर्लक्षित बाबी सामोऱ्या येतात. रंगमंचाची काळजी घेणे हे त्यांना नेहेमीचेच: ज्याच्यावर पुढील दोन-तीन तास नाट्य रंगणार आहे, अभिनय फुलणार आहे, हालचालींना वेग येणार आहे त्या रंगमंचाची दुरावस्था त्यांना असह्य वाटते. 

 

अतुल पेठे

एका नाट्यगृहात थेट रंगमंचावर खालून कूलर लावले होते. थंड हवेचा सतत झोत असल्यामुळे येत असल्यामुळे अभिनेत्यांची धोतरे उडतील आणि सतत लघवी होईल याचे प्राथमिक ज्ञानही नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाला नव्हते. नाट्यगृहांतील संडासांची अवस्था वाचून ही अनास्था एक वेळ परवडली असे वाटते. 'संडास संस्कृती' हा लेख वाचून आधी शिसारी येते आणि मग करुणा वाटते. एका थिएटरमध्ये संडास विंगेत होता, त्यामुळे त्या संडासातूनच अभिनेत्यांना 'एंट्री' घ्यावी लागे. "आमच्या 'ग्रीन रूम'मध्ये संडासच नाही," हे सहकारी अभिनेत्रीचे वाक्य वाचून, संडासासाठी अंधाऱ्या जागेत फक्त वाळू पसरलेली असते हे कळून 'मराठी माणसाचा मानबिंदू' ही लिंगद्वेषी भाषा नसून सत्यपरिस्थितीचे वर्णन वाटते. 

 

त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत पेठ्यांचा अनेक मातब्बर रंगकर्मींशी जवळून संबंध आला. नाटकवाल्याचेमध्ये सविस्तर व्यक्तिचित्रण अभावाने आले आहेपण छोट्या-छोट्या प्रसंगांतून पेठ्यांनी अनेक नाट्यकर्मींच्या स्वभावाचे कंगोरे पुढे आणले आहेत. सौमित्र या समकालीनापासून ते आलोक राजवाडे, ओंकार गोवर्धन, पर्ण पेठे (त्यांची मुलगी) यांच्या अभिनयाबद्दल ते भरभरून लिहितात. पण सर्वात जास्त आदर त्यांना डॉक्टर श्रीराम लागूंबद्दल वाटतो.

 

नाटकाच्या आर्थिक ताळेबंदाची माहिती देणारा पेठ्यांचा लेख (जो या संग्रहात समाविष्ट आहे) वाचून लागू-पेठ्यांचे नाते सुरू झाले. लागूंच्या प्रोत्साहनामुळे पेठ्यांनी त्यांच्या दीर्घकालीन सहकारी मकरंद साठ्यांचे सूर्य पाहिलेला माणूस हे नाटक रंगभूमीवर आणले. या नाटकाचा उल्लेख 'मी पाहिलेला सूर्य' या लेखात वाचून लागू आपल्या भूमिकांसाठी घेत असलेल्या अपार कष्टांची कल्पना येते. आपल्या प्रत्येक भूमिकेवर लागू किती बारकाईने मेहनत घेत, ती उत्कृष्टपणे वठावी यासाठी सम्यक विचार करत तिच्या गाभ्यापाशी कसे जात हे वाचून कोणालाही स्वतःच्या व्यावसायिक जीवनात तशीच मेहनत घ्यायची प्रेरणा मिळेल. नाट्यगृहांच्या, व्यवस्थापनाच्या अनास्थेचा झुंझारपणे सामना करत सूर्यसारखे प्रायोगिक नाटक शंभरावा प्रयोग साजरा करते तेव्हा त्याचा आनंद वाचकांनाही होतो.

 

प्रयोग प्रथमा

 

पेठ्यांची मुख्य ओळख प्रायोगिक नाट्य दिग्दर्शक अशी असल्यामुळे 'प्रायोगिक नाटकाबद्दलचे चिंतन' या दुसऱ्या पातळीवर पुस्तक वाचता येते. आपल्याला प्रायोगिक नाटकच का करावेसे वाटते याची पेठ्यांची मीमांसा मार्मिक आहे. मराठी रंगकर्मींच्या पुस्तकांच्या परंपरेत नाटकवाल्याचे स्थान महत्त्वाचे ठरते, कारण समांतर नाट्यव्यवहाराबद्दल मूलभूत चिंतन त्यांनी केले आहे. नाट्यव्यवहाराच्या सर्व अंगांना हे चिंतन खोलवर स्पर्श करते. 

 

उदाहरणार्थ, नाटक निवडतानाचे त्यांचे निकष. नाटकाचा विषय-आशय, पुरोगामी विचार, लक्ष्य, इत्यादी सर्वसाधारण प्रश्न पेठ्यांना पडतातच. त्याचबरोबर नाटक एकूणच नाट्यपरंपरेच्या कुठल्या टप्प्यावर आहे, त्याच्या संवादातून उभे राहणारे राजकारण कुठले, निवडलेले नाटक आणि स्वतःचे जगणे यातील संबंध यांच्यासारखे प्रश्न पेठ्यांना निर्णायक वाटतात. नाटक ही 'टाइमपास', 'डोक्याला ताप नको' यासारखी गोष्ट नसून जाणीवपूर्वक निवडलेली जबाबदारी आहे याचे भान पेठ्यांना वारंवार असते :

 

“नाटक किंवा कुठलीही कला ही गंभीरपणे करता येते आणि ती केल्याने आयुष्याला सघनता, सौंदर्य, आणि सृजनत्व येते हे आपल्या कोणाच्याच अजूनही ध्यानी येत नाही. त्यामुळे नाटक किंवा कुठलीच कला आपल्या आयुष्याच्या आणि समाजाच्या कधीच केंद्रस्थानी नसते. त्यातून नाटक म्हणजे बिनडोक करमणूक हे रुजवण्यात आपली मध्यमवर्गीय स्थितीप्रिय जाणीवच कारणीभूत आहे. कुठलीही कला ही किती 'डेंजरस’ असू शकते याची जाण असल्यानेच कदाचित ही जाणीव मुद्दाम अंगीकारली गेली असेल.”

ही जाणीव झुगारल्यामुळे पेठ्यांचे प्रायोगिक नाटक त्याच्या विशेषणाला पुरेपूर जागते. सत्यशोधक या नाटकाची निर्मितीप्रक्रिया उलगडून दाखवणारी त्यांची मुलाखत त्यांचे मनन उलगडून दाखवते. महात्मा फुले यांच्या जीवनावरचे हे नाटक पेठ्यांनी पुणे महानगरपालिकेच्या कामगारांना घेऊन केले. सफाई कर्मचाऱ्यांच्या आयुष्याला भिडणारे नाटक प्रचारकी थाटाचे न करता त्यांना करायचे होते. (कर्मचाऱ्यांचे जबरदस्त आवाजही ह्या निवडीमागचे एक कारण असल्याचे पेठे नमूद करतात). ज्योतिबांच्या प्रखर जीवनाने पेठे भारावले होते. ज्योतिबांच्या जीवनावर गो. पु. देशपांडे यांचे नाटक करायची अस्पष्ट जाणीव पेठ्यांच्या मनात होती; ती मग त्यांनी वास्तवात आणली. 

 

या अस्फुट जाणिवेपासून ते प्रत्यक्ष प्रयोगापर्यंतचा भाग मुलाखतीत रोमहर्षकपणे आला आहे. या तालमीला आलेल्या कामगार स्त्रिया पहिल्या पाच मिनिटांतच डुलक्या घेऊ लागतात, दिवसभराच्या श्रमानंतर त्यांची झोप अनावर झालेली असते. पेठे त्यांना झोपू देतात. तालमी पुढे जातात आणि ४०-५० जणांतील दहा-बारा कर्मचारीच उरतात. अनंत अडचणींचा सामना करून नाटक एकदाचे तयार होते. नुसत्या स्पर्धा-महोत्सवांत सादर करून धन्यता मानण्याऐवजी पेठ्यांना सत्यशोधकचे प्रयोग महाराष्ट्रभर करायचे होते. त्यामुळे मूळ संहितेशी प्रामाणिक राहत पेठ्यांनी नाटक जास्त 'सजग, सधन' केले –

 

"बाहेरगावी रस्त्यावर मैदानात प्रयोग करत असताना मध्यंतर कुठे देणार? आणि दिला तरी आमचा बघणारा प्रेक्षक वर्ग कुठला वडा-थम्सअप घ्यायला जाणारत्याला परत बांधून आणणं हे कठीण होणार हा माझा विचार होता. म्हणजे नाटक करण्यापूर्वीच ते कोण पाहतील आणि किती जण पाहतील याचा आम्हांला अंदाज होता."

सत्यशोधकला उदंड यश मिळाले. नाटकाचे शंभरहून जास्त प्रयोग झालेमहाराष्ट्रभर तर नाटक गेलेचपण दिल्ली-कलकत्ता-मैसूर-बेंगलोर येथे प्रयोग झाले. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्यासारख्या मान्यवरांनी प्रयोगांचे कौतुक केले. नाटकाची डीव्हीडी झालीनाटककार देशपांडे यांनी 'भरून पावलो’ अशी पावतीही पेठ्यांना दिली.

 

जळो जिणे लाजिरवाणे

 

पण या साऱ्या प्रवासात पेठ्यांना अजूनही काहीतरी खोल जाणवले – महाराष्ट्राचे दारिद्र्य आणि समाजातील भयाण विषमता. आपली समज अर्धीमुर्धी आहे हे पेठ्यांना समजले. किंवा असेही म्हणता येईल, की सुप्त खदखदणाऱ्या अस्वस्थतेचा स्फोट सत्यशोधकद्वारे झाला. सजगपणे, डोळसपणे पेठे सभोवताल अवलोकू लागले. म्हणूनच महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या अवगतीबद्दलचे प्रत्यक्षदर्शी निरीक्षण या दृष्टीने नाटकवाल्याचे वाचता येते. संथगतीने होणाऱ्या महाराष्ट्राच्या वाताहतीच्या या नोंदी वाचून विषाद दाटून येतो.

 

वानगीदाखल 'सहाव्या गावाची गोष्ट' हा लेख. माहितीचा अधिकार २००४ साली अस्तित्वात आल्यावर या कायद्यामुळे सडलेली व्यवस्था स्वच्छ होईल असा आशावाद देशभर पसरला होता. या कायद्यावर आधारित दलपतसिंग येती गावा हे नाटक पेठ्यांनी कसे बसवले याचा प्रवास या लेखात आला आहे. जालना जिल्ह्यातील जांबसमर्थ या गावातील तांगडे बंधू हे शेती सांभाळून नाटकाबद्दल रुची जोपासणारे तरुण. या दोघांना साथीला घेऊन पेठ्यांनी सहा महिने तालीम घेऊन नाटक बसवले. सुरुवातीची कार्यशाळा घेणे ते तालमीचा हॉल मिळवणे ते स्त्री-कलाकार मिळवणे हा आलेख प्रवाही पद्धतीने पेठ्यांनी मांडला आहे. या नाटकाच्या निमित्ताने पेठ्यांनी महाराष्ट्रातील अंतरायाबद्दल केलेली भेदक निरीक्षणे आजही लागू पडतात. 

 

पेठे सुरुवात करतात ते जांबसमर्थमध्ये संडास बांधण्यापासूनइतकेच नव्हे तर गावातील गवंड्याला संडास बांधण्याचे ते प्रशिक्षण देतात आणि लोकांना संडासाचे फायदे शिकवतात.  कार्यशाळेत मग मुलांचा पेठ्यांशी सूर जळतो, मुले खुलतात. प्रयोगासाठी मुली शोधायला पेठे जातात तेव्हा मात्र त्यांना विदारक परिस्थितीचा बोध होतो

 

"इथल्या मुलींबाबत शंभर दोनशे वर्षांपूर्वी सारखीच परिस्थिती आहे. हुंड्यामुळे समाज किती पोखरला गेलाय हे तिथे लक्षात आलंघराघरात चिंतेचे वातावरण आणि हे इसवी सन २०१०मध्ये! ...  तिथल्या बायकांचे प्रश्न पाहिले तर हे २०१०च्या महाराष्ट्रात राहत आहेत की अफगाणिस्तानात असा प्रश्न पडायचा." (जाड ठसा लेखकाचा.)

 

पुढे पेठ्यांना कर्जबाजारीपणा दिसतो आणि बुवाबाजी. भ्रष्टाचार तर सर्वव्यापी असतो. पेठे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ऑफिसमध्ये शिरताच झुंडीने लोक पैसे मागायला पेठ्यांकडे येतात. संध्याकाळी या ऑफिसमध्ये पेठे आणि त्यांचे सहकारी झोपायला जातात. त्याआधी पेठ्यांनी ऑफिसमधला संडास साफ केलेला असतो. दमले-भागलेले पेठे झोपायला जातात तर उशीखाली कोणीतरी गुटखा खाऊन थुंकलेले असते. खचलेल्या पेठ्यांना 'मोठ्या समाजाचे दर्शन झाले, किडलेले कवठ आतून बघायला मिळाले' असे वाटते. बीड-जालना हा महाराष्ट्रातील बिहार आहे असे २०१०च्या आधीपासूनच लोक त्याचवेळी म्हणत. 

 

नाटकवाल्याचेमधील जग २०१५पर्यंतचे आहे. २०२५ साली काय परिस्थिती आहे? बीडमधील परिस्थिती अजूनच धोकादायक झाली आहे हे तिथल्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडांतून दिसते. सत्यशोधकला पाठिंबा देणाऱ्या डॉ. दाभोळकर-पानसरे यांची हत्या करण्यात आली आहे. हुंडाबळी अजूनही घडत आहेत, तेसुद्धा पुण्यासारख्या शहरात. कुमाहिती-दुमाहितीचा अधिकार सर्वांना आहे, माहितीचा हक्क मात्र स्वप्नवत आहे. पुरोगामीपण मिरवणाऱ्या राज्याच्या विधिमंडळ संकुलात मारामाऱ्या होत आहेत. 'मराठी कोणालाच धडपणे बोलता येत नाही' ही परिस्थिती सुधारण्याऐवजी हिंदीसक्ती करून महाराष्ट्रातील उरलीसुरली मराठीही कशी संपवता येईल याकडे सत्ताधारी पक्षाचे लक्ष आहे. २०१५ साली मरगळलेला महाराष्ट्र आता २०२५ साली खचून गेला आहे.

 

तोचि रंगधर्म जाणावा 

 

भारतात अनेक ओळखी एकाचवेळी एकमेकांना छेद देत असतात – जात, धर्म, प्रांत, लिंग. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांत हे आंतरछेद ठसठशीत असतात आणि राजकीय हितसंबंध ते खोलवर कसे जातील हे पाहतात. राजकीय पक्षांची अनास्था, मध्यमवर्गाची गावातील लोकांपासून झालेली फाळणी, स्त्रियांचे शोषण, चिरफळ्या पडलेल्या मराठी समाजाचे जवळून घेतलेले दर्शन पेठ्यांना अंतर्बाह्य हलवते. 

 

या निरगाठी उकलायला पेठ्यांनी महाराष्ट्राचा एकेकाळचा लाडका कलाप्रकार निवडला आहे. पण नाटकाची रंजनप्रधान शाखा यासाठी निरुपयोगी आहे हे त्यांनी ताडले आहे. आपण संक्रमणकाळात वावरतोय याचे त्यांना भान आहे. पारंपरिक फॉर्म निवडत पण प्रस्थापित निकष झुगारत त्याचे नव्याने आकलन करत पेठे नवीन आयाम शोधतात. 

 

पेठ्यांची भूमिका पुस्तकाच्या पहिल्या आणि शेवटच्या भागात सविस्तरपणे आली आहे, त्यातून त्यांच्या प्रेरणा स्पष्ट होतात. प्रायोगिक नाटक करणे ही स्वतःची गरज आहे हे पेठ्यांना लवकर उमगले. नाटक करताना आनंद मिळणे, स्वतःच्या कृतीवर विश्वास असणे, या बाबी त्यांना मुख्यभागी वाटतात. त्यांचे कौशल्य असे की व्यवस्थेने दडपलेल्या ओळखी ते सामोऱ्या आणतात – शेतकरी, कामगार, मजूर अभिनेते ते निवडतात. समाजाच्या जाणिवांच्याही बाहेर असणाऱ्या आदिवासी स्त्रियांची दुःखे त्यांना कळतात. नंदुरबारमधील आदिवासींच्या ढोलाची आर्तता त्यांना हलवते. पेठे दडपलेल्या समूहांचा टाहो ऐकतात, त्याचा प्रतिध्वनी त्यांच्या अंतरंगात घुमतो. 

 

हा अंतर्नादाच्या तालावर पेठे आणि त्यांचे सोबती झोकून नाचतात. कधी ही ऊर्जा त्यांना राज्यभर आरोग्य संवाद घ्यायला लावते तर कधी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यशाळा. सफाई कर्मचाऱ्यांबरोबर काम करताना त्यांना अनेक सत्ये उलगडत जातात – सफाई कर्मचाऱ्यांना व्यसनांत आणि अंधश्रद्धेत समाजाने जाणूनबुजून आपल्या सोयीसाठी अडकवलेले असते. 'प्रकाशबीजे रुजवीत निवांत युगाच्या वाटा वळवीत' पेठ्यांचा प्रवास चालतो. कळकळ आणि संताप पेठ्यांनी विधायक ऊर्जेत रूपांतरित केला आहे. 

 

या प्रखर ऊर्जेच्या बळामुळे पेठे हताश होत नाहीत. एका मराठी दूरचित्रवाणी वाहिनीचा मुख्य अधिकारी पेठ्यांना 'वैचारिक कार्यक्रमी करू या' असे सुचवतो. त्याच्या आग्रहामुळे पेठे उत्साहाने अनेक महिने खपून सूचना तयार करतात. अधिकाऱ्याचे उत्तर येत असल्यामुळे पेठे पाठपुरावा करतात. अधिकाऱ्याला आता 'डोक्याला त्रास नको'छाप कार्यक्रम हवे असतात. दर्जेदार कार्यक्रमांसाठी मराठी कलाविश्वात मामुली निधीसुद्धा उपलब्ध कसा नसतो याचा अनुभव त्यांना वारंवार येतो. 

 

पण या परिस्थितीने त्यांना हतबल केलेले नाही, उलट शक्ती दिली आहे. भरकटलेल्या वातावरणात पेठे चित्तभ्रांत होत नाहीत, त्यांचा नैतिक सुकाणू त्यांना दिशा सुचवतो. ते स्वतःला रंगधर्मी संबोधतात: व्यक्तीने जसे वागणे योग्य असते तसे वागणे हा तिचा धर्म ही व्याख्या त्यांना येथे अभिप्रेत आहे. 

 

समारोप 

 

नाटकवाल्याचे प्रयोग प्रसिद्ध होऊन दहा वर्षे झाली आहेत. आज पेठ्यांना पूर्वीइतकेच आशावादी वाटत असेल का? पेठ्यांच्या जाणिवा ज्या नव्वदोत्तरी काळात घडल्या-वाढल्या त्या काळाचे संदर्भ गेल्या दशकात पूर्णपणे बदलले आहेत. १९९०च्या दशकात जागतिकीकरणाने वेग घेतला, भारतात खाजगीकरण आणि उदारीकरण ही लहान भावंडेही त्यात मिसळली. खाउजा धोरणांचा समाजावरील वेगवेगळ्या घटकांवर होणारा परिणाम शोधणे हा प्रयत्न नव्वदोत्तरी जाणिवांच्या मध्यभागी होता. लोकशाही, आचार-विचारस्वातंत्र्य, वैविध्यातील एकात्मता ही मूल्ये अबाधित राहतील हे या जाणिवांत गृहीत होते. झुंडशाहीप्रणित पॉप्युलिझम अजून उगवायचा होता. तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या मूलभूत बदलांची चाहूल लागत होती, मात्र त्यांची व्याप्ती कळायची होती. 

 

प्रत्यक्षात २००० सालानंतरच हे संदर्भ बदलायला सुरुवात झाली होती आणि २०१४-१६नंतर या प्रक्रियेने विलक्षण वेग घेतला. आज लोकशाहीच्या घसरणीला तीव्र मंदीचे स्वरूप आले आहे. उरल्यासुरल्या विचारस्वातंत्र्यावर अतिउजव्या-अतिडाव्या बाजूंनी हल्ला झालाय आणि आपले जीवन ज्याने व्यापले आहे त्या डिजिटल तंत्रज्ञानाचे विषारी रूप उघड झाले आहे. वैचारिक परंपरा न जोपासल्यामुळे, भेदभाव वाढवल्यामुळे, बौद्धिक स्तर खालावत गेल्यामुळे आणि स्वभाषेची हेतुपुरस्सर हानी केल्यामुळे या सोसाट्यात महाराष्ट्राची आधीच असलेली नाजूक परिस्थिती दयनीय झाली या नवल कोणते? 

 

महाराष्ट्राच्या व्यापक सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी नाटक, तेसुद्धा प्रायोगिक, पुरेसे नाही हे पेठ्यांना माहीत आहे. पेठ्यांची श्रद्धा असलीच तर दीर्घकालीन सामाजिक परिणाम साधण्यावर आहे. नाटकवाल्यातील अनुभव नव्वदोत्तरी जाणिवांवर बेतलेले असले तरी वास्तवाला भिडल्यामुळे पेठ्यांच्या निरीक्षणांना काळाच्या सीमा ओलांडून जाण्याचे सामर्थ्य आहे. परिस्थिती अजूनच बिकट झाली असली, सामान्य माणसाने हतबुद्ध व्हायला अनंत कारणे असली तरी पेठ्यांनी साकारलेली कृतिशील विचारवंताची भूमिका अजूनही चिरतरुण आहे. नाटकवाल्याचे प्रयोग पुढील पंचवीस वर्षेही तितकेच कालसुसंगत वाटेल, या प्रयोगांना सतत 'वन्स मोअर' मिळेल हे या पुस्तकाचे सामर्थ्य आहे … आणि महाराष्ट्राची शोकांतिका. 

 

निवडक संदर्भपुरवणी वाचन

 

  • मकरंद साठे यांची ऐसी अक्षरेच्या २०१५ अंकातील मुलाखत नव्वदोत्तरी आणि समकालीन जाणिवांवर सखोल भाष्य करते.
  • दलपतसिंग येती गावा (नाट्यनिर्मिती प्रक्रिया (साधना प्रकाशनया पुस्तकात नाटकाच्या निर्मितिप्रक्रियेविषयी सविस्तर माहिती आली आहे.
  • अतुल पेठे यांनी Quora या संस्थळावर अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत्यातून त्यांच्या नाट्यचिंतनाचे अनेक पैलू सामोरे येतात.
  • धर्माची व्याख्या मे. पुं. रेगे यांच्या हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन (प्राज्ञपाठशालामंडळवाई, २००२) या पुस्तकातून.