जगातलं पहिलं बेस्टसेलर : ट्रिलबी - हर्षवर्धन निमखेडकर
तो एक विलक्षण, गूढ, चमत्कारिक इसम होता. त्याच्याजवळ एक अद्भुत शक्ती होती. या शक्तीच्या जोरावर त्यानं एक अशक्यप्राय गोष्ट शक्य केली. जे कधी घडेल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नसतं, ते करून दाखवलं – स्वतःचं आणि जिच्यावर त्यानं तो प्रयोग केला होता तिचं, असं दोघांचंही नाव त्यानं अमर केलं!

त्याचं नाव होतं स्वेंगाली आणि तिचं नाव होतं ट्रिल्बी. १९९४मध्ये ही दोन नावं प्रथम इंग्रजी भाषेत वापरली गेली त्या घटनेला १०० वर्षं पूर्ण झाली. एकेकाळी विशेष नामं, प्रॉपर नाऊन्स, असणारे हे दोन शब्द या शंभर वर्षांच्या प्रवासात केव्हाच सामान्य नामं बनले आहेत. भाषेच्या अंतर्यामी एवढे खोलवर रूजून बसलेले हे दोन शब्द म्हणजे जॉर्ज द्यु मॉरिअर या लेखकानं इंग्रजी जगताला दिलेली एक अमूल्य देणगी आहे.
सन १८९४च्या ऑटम (शरद) ऋतूत ट्रिल्बी कादंबरी प्रसिद्ध झाली आणि तिला जी एकाएकी अचानक लोकप्रियता मिळाली. त्यामुळे तिचा लेखक जॉर्ज द्यु मॉरिअर उर्फ किकी हा स्वतःसुद्धा आश्चर्यचकित झाला. कारण आजवर कोणत्याही इंग्रजी कादंबरीच्या भाग्यात असा आणि एवढा इन्स्टंट मानसन्मान आला नव्हता. बेस्टसेलर्स या आधुनिक प्रकारात येणारी ही पहिलीच इंग्रजी कादंबरी.
जॉर्ज तसा एक लेखक म्हणून यापूर्वीच नावारूपाला आला होता. पण ट्रिल्बी या पुस्तकानं त्याला अभूतपूर्व-अश्रुतपूर्व ख्याती आणि पैसा मिळवून दिले. जागतिक इतिहासात एखाद्या पुस्तकामुळे एवढं प्रचंड वादळ उठण्याची, एवढा गाजावाजा होण्याची ही एक फारच दुर्मीळ व विरळा घटना होती. आपल्या जमान्यात सॅटॅनिक व्हर्सेस वा लज्जा यांनीही अशीच खळबळ माजवली आहे. पण ही विरोधी, नकारात्मक प्रतिक्रिया आहे. ट्रिल्बीची प्रसिद्धी, लोकप्रियता विलक्षण पॉझिटिव्ह होती. अल्पावधीतच ट्रिल्बीमुळे इंग्लंड, अमेरिकेतले वाचक मॅड, क्रेझी, खुळे बनले. या कल्पनातीत 'ट्रिल्बी बूम'मुळे स्वतः जॉर्जला ओशाळल्यागत होऊ लागलं.
रेबेका, हाऊस ऑन द स्ट्रॅन्ड या कादंबऱ्यांची, आणि बर्ड्स या कथेची जननी डेम डॅफ्नी द्यु मॉरिअर ही चालू शतकातली एक लोकप्रिय, मोठी लेखिका. जॉर्ज हा तिचा आजोबा. त्याचं टोपण नाव होतं, किकी. त्यानं ट्रिल्बीच्या माध्यमातून स्वेंगाली साकार केला आणि हॅम्लेट, शेरलॉक होम्स किंवा रॉबिनसन क्रूसोची नावं जशी प्रत्येक पिढीतल्या वाचकांना ठाऊक असतात, तसंच स्वेंगालीलाही अमरत्व प्राप्त झालं. पुढे तर या काल्पनिक स्वेंगालीनं आपल्या खऱ्या कर्त्यालाही ग्रासून टाकलं. आज जॉर्जचं नाव फार कोणाला माहीतही नसेल, पण इंग्रजी भाषा बऱ्यापैकी बोलणारी व्यक्ती सहजपणे 'स्वेंगाली' शब्दाचा वापर करून जाते. 'आर्ट ओव्हरशॅडोईंग लाईफ' याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. स्वेंगालीनं नुसतं आपल्या लेखकालाच मागे टाकलं असं नाही, तर ज्या पुस्तकातून तो प्रथम अवतरला होता, त्या पुस्तकालाही त्यानं विस्मृतीच्या गर्तेत ढकललं. आज या कादंबरीचं नाव आठवणारे वा ती वाचली असणारे फार थोडे वाचक आढळतील. पण तिची नायिका ट्रिल्बी व तिच्याहीपेक्षा खलनायक (की नायक?) स्वेंगाली यांची स्मृती त्यांच्या इंग्रजी भाषेतील वापरामुळे चिरंतन झाली आहे.
स्वेंगालीचं इलम
कोण होता हा स्वेंगाली? अशी काय जादू त्यानं केली? ट्रिल्बी कोण होती? या दोघांच्या कथेचा काही भाग शॉच्या पिग्मॅलियनशी मिळताजुळता आहे. (खरं तर हे उलट म्हणायला पाहिजे.) म्हणजे एका मठ्ठ, खेडवळ मुलीला एकदम सुसंस्कृत, राजेशाही, घरंदाज बनवणं. अर्थात केवळ एवढ्यापुरतंच हे साम्य मर्यादित आहे. पिग्मॅलियनमध्ये प्रा. हेन्री हिगिन्स् एलायझावर मेहनत घेतो, तिला शिकवितो, अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं तिला हाताळतो आणि मगच ती एक कुलीन स्त्री म्हणून वावरू शकते. मात्र ट्रिल्बी ओ' फेरॉल या अशाच सुंदर पण गावंढळ मुलीवर स्वेंगाली कसलीही मेहनत घेत नाही, तिला तो शिक्षण देत नाही आणि तरीही गाण्याचं काहीही अंग नसलेली, बेसुऱ्या आवाजाची ही टोन डेफ कावळी एकाएकी, अकस्मात स्वरकोकीळा बनते, रातोरात जगभरात प्रसिद्धीस येते. स्वर्गीय आवाजाची मलिका म्हणून सारं विश्व तिला कुर्निसात करतं. हे सारं घडतं त्या स्वेंगालीमुळे. असं काय इलम असतं त्याच्यात?
त्याची ही जादू असते, संमोहन किंवा मेस्मेरिझम. यामुळे तो तिच्या अंतर्मनाचा ताबा घेऊ शकतो. तिच्या देहाचा ताबा घेऊ शकतो आणि तिच्या माध्यमातून स्वतःची अद्भुत संगीतविद्या तो जगजाहीर करतो. इतर कितीही दोष त्याच्यात असले तरी तो एक असामान्य प्रतिभेचा संगीतज्ञ होता. खूप दिवस त्याचे हे ट्रिल्बीवरचे प्रयोग चालतात. ट्रिल्बीला प्रचंड सन्मान व पैसा मिळतो. हा पैसा तिच्यावर हुकूमत चालविणारा स्वेंगालीच गडप करतो हे सांगायला नकोच आणि मग अचानक त्यांचं हे बिंग फुटतं. स्वेंगालीच्या अनुपस्थितीत गाण्याची पाळी एकदा ट्रिल्बीवर येते, आणि बस्स! त्यांची सारी पोल आपोआप खुलते. त्यांचा खेळ खलास होतो.
वरवर पाहिलं तर ही अशीच एक साधी, सरळ कथा आहे. पण जॉर्जनं ज्या पद्धतीनं ती लिहिली, त्याहीपेक्षा ज्याप्रकारे त्यानं स्वेंगालीच्या शक्तीचं चित्रण केलं – ती सारी १८९४ मध्ये चमत्कार वाटणारी घटना होती. आजवर असं कधी कोणी लिहिलं नव्हतं. कल्पनाविश्वातच का होईना पण असा जादूचा प्रयोग कधी कोणी केला नव्हता. जॉर्जच्या कादंबरीनं वाचकांना एक नवं खाद्य मिळालं. त्यांच्या विचारांना चालना मिळाली. असं कधी काही प्रत्यक्षात घडू शकेल का यावर घराघरांतून रस्त्यांवर, क्लब्स्, पार्लर्स, ऑफिसेसमध्ये, वर्तमानपत्रं व मासिकांतून अहमहमिकेनं चर्चा होऊ लागल्या. वाद रंगले आणि कोणाला काही कळायच्या आतच स्वेंगाली कादंबरीच्या पानांमध्ये मरूनही, खऱ्या जगात खऱ्या अर्थानं अजरामर झाला.
दोन प्रती
स्वेंगाली कादंबरीच्या दोन प्रती आहेत. पहिल्या प्रतीत काही मजकूर गाळलेला आहे व दुसऱ्या, सुधारित प्रतीत हा आधी गाळलेला मजकूरही समाविष्ट आहे. हे असं का करावं लागलं वाचा खुलासा व एकूणच १८९४ साली ट्रिल्बी कादंबरीनं जगाला कसं वेड लावलं याविषयी एक प्रस्तावनावजा उत्तम टिपण, माझ्या संग्रही असलेल्या या दुसऱ्या सुधारित प्रतीच्या छापील आवृत्तीत वाचायला मिळालं. ही प्रस्तावना पीटर अलेक्झांडर याने लिहिली आहे. (मात्र हे म्हणे त्याचं टोपणनाव आहे. खरं नाव दिलेलं नाही.) या आवृत्तीचे प्रकाशक आहेत डब्ल्यू. एच. ॲलन ॲण्ड कंपनी (१९८२).
स्वांगाली किंवा स्वेंगालीचा आजचा शब्दकोशातला अर्थ काय?
ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत, 'One who exercises a controlling or mesmeric influence on another, frequently for some sinister purpose.' अशी त्याची व्याख्या दिली आहे. (मूळ कादंबरी निघाल्यावर २० वर्षांनी हा शब्द इंग्रजीत प्रथम वापरला गेला. १९१४ साली किपलिंगने हा वापर केला असं या व्याख्येखाली, उताऱ्यांच्या नोंदीत बघायला मिळतं). स्वतः अलेक्झांडर यानं स्वेंगाली शब्दाचा अर्थ असा सांगितला आहे –
"Anyone possessed of the power to manipulate others towards achievements that in the normal way would be beyond their natural abilities."
थोडक्यात (बहुधा काही वाईट कामासाठी) दुसऱ्यावर प्रभाव पाडण्याची, त्याचा ताबा घेण्याची आणि एरवी जे करणं त्याला अशक्य वाटलं असतं ते त्याच्याकडून करवून घेण्याची शक्ती असलेला एखादा इसम म्हणजे स्वेंगाली.
जॉर्जनं प्रथम रंगवलेला हा स्वेंगाली त्यानं प्रत्यक्षातल्या कोणा माणसावर बेतला होता काय? आज ट्रिल्बी कादंबरीविषयी काहीही ठाऊक नसणाऱ्यांनाही स्वेंगालीची लिजेंड दंतकथा ठाऊक असते व त्यांना ती होल्म्सप्रमाणेच खरी वाटते, स्वेंगालीचं सोडा. पण या कादंबरीतील इतरही पात्र प्रत्यक्षावर आधारित होती आणि पहिल्या छापील प्रतीत काही भाग गाळावा लागला होता.
पण हे सारं बघण्याआधी थोडी माहिती जॉर्जबद्दल. जॉर्ज लुई पामेला ब्युसों द्यु मॉरिअर याचा जन्म पॅरिसमध्ये ६ मार्च १८३४ साली झाला. त्याचा बाप फ्रेंच होता पण तो जन्मला आणि वाढला होता लंडनमध्ये. जॉर्जची आई एलीन क्लर्क नावाची इंग्रज बाई होती. एलीनची आई मेरी ॲन क्लार्क ही नटी होती आणि नंतर ती ड्यूक ऑफ यॉर्कची रखेल बनली. 'खूप पैसे दे नाहीतर तुझी प्रेमपत्रं जाहीर करते', असं ब्लॅकमेलिंग करून तिनं ड्यूकला खूप छळलं. सन १८१० साली हे एक मोठं स्कॅन्डल झालं. जॉर्जचे आईबाप दोघंही नाट्यकर्मी, नाट्यप्रेमी होते; तेच गुण त्याच्यातही उतरले. बापाचंच गायनप्रेमही त्याला उपजतच मिळालं होतं. तो बापासारखाच भरदार आवाजाचा धनी होता. पीटर आयबेटसन, द मार्शियन, आणि विशेषतः दिल्बी या त्याच्या तिन्ही कादंबऱ्यांमध्ये संगीताची भूमिका फार महत्त्वाची आहे, ती बहुधा याचमुळे. जॉर्जला फ्रेंच व इंग्रजी या दोन्ही भाषा उत्तमरीत्या अवगत होत्या.
तरुण वयात तो केमिस्ट बनला. पण या धंद्यात काही त्याचं मन नव्हतं. फावल्या वेळात (जो त्याला खूप मिळायचा) तो एकतर गायचा, नाहीतर चित्रं काढायचा. गाण्यासारखीच याही बाबतीत त्याला जन्मजात आवड होती. धंदेवाईक गायक वा चित्रकार व्हायची तो स्वप्नं बघायचा. पुढे १८५६मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला पॅरिसला परतावं लागलं. त्यानं केमिस्टचा धंदा सोडला आणि आपल्या चित्रकलेवर लक्ष केंद्रित केलं. पॅरिसच्या त्या प्रख्यात, बोहिमियन, स्वैर, स्वच्छंदी लॅटिन क्वार्टरमध्ये तो लीर नावाच्या स्विस चित्रकाराकडे धडे घेऊ लागला. या क्वार्टरमधील वास्तव्याचा तेथील अनुभवांचा आणि तेथील वातावरणाचा त्याच्यावर झालेला परिणाम तो कधीच विसरू शकला नाही. (ट्रिल्बीत हेच सारं वाचायला मिळतं) या त्याच्या चित्रशिक्षणात त्याचे जे सहाध्यायी होते त्यांपैकी अनेकजण त्याचे जवळचे मित्र बनले. कालांतरानं त्यातील अनेकांना आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली. यामधलं एक नाव होतं, जेम्स मक्नील व्हिसलर.
पुढच्याच वर्षी जॉर्जला अचानक डाव्या डोळ्यात आंधळेपण आलं. त्याचा उजवा डोळा मात्र शाबूत होता. या एकाच डोळ्याचा वापर करत तो चित्रं काढू लागला. (या काळातील त्याच्या दुर्दैवाचं वर्णन त्याच्या मार्शियन या कादंबरीत सापडतं.)
१८६०मध्ये तो लंडनला परतला. तिथे पंच मासिकासाठी तो चित्रं, व्यंगचित्रं, रेखाचित्रं काढू लागला. लवकरच त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली आणि त्यातून आणखी काम मिळालं. या काळात तो व्हिसलरसोबत राहत असे. नंतर १८६३ साली त्यानं एमा वॉईटविक हिच्याशी लग्न केलं.
लेखनाची सुरुवात
चित्रकार म्हणून त्याची ख्याती लेखकांच्या कानावरही गेली व त्याला विल्यम थॅकरेच्या हेन्री एस्मंड आणि बॅलडस् या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या सजवायचं काम मिळालं. मिसेस गॅस्केल आणि इतर काही लेखकांसाठीही त्यानं काम केलं. मग त्यानं स्वतःही लेखक बनण्याचं ठरवलं. १८६४ साली तो पंचमध्ये नोकरीला लागला आणि चित्रांसोबतच अधूनमधून लिहूही लागला. एव्हाना त्याला खूप पैसा-प्रसिद्धी मिळाले होते. आता लेखक म्हणून नाव कमवण्याची त्याची इच्छा होती. या कामात त्याला खरं प्रोत्साहन दिलं त्याचा मित्र आणि इंग्रजीतला मोठा लेखक हेन्री जेम्स यानं. जॉर्जच्या पूर्वायुष्यातील चढउतारांवर, दुःख-आनंदाची सरमिसळ असलेल्या अनुभवांवर त्यानं लिहावं असं जेम्स्नं त्याला सुचविलं. जॉर्जनं हा सल्ला शब्दशः पाळला. परिणामी जेम्सच्याच शब्दांत त्याच्या लेखनाचं वर्ण होतं, 'जॉर्जच्या तिन्ही कादंबऱ्या त्यानं फक्त लिहिल्या नसून त्यात तो प्रत्यक्ष जगला आहे.' त्याचं पहिलं पुस्तक, पीटर आयबेटसन. ही त्याच्या बालपणाची कथा आहे. ते पुस्तक १८९१मध्ये प्रसिद्ध झालं. सर्वप्रथम जून ते नोव्हेंबर १८९१ या काळात हार्पर्स न्यू मंथली मॅगझिनमध्ये दरमहा ती कादंबरी क्रमशः छापून आली; आणि नंतर पुस्तकाच्या स्वरूपात. त्या काळात या मासिकाला आणि हार्पर ब्रदर्स या त्याच्या मालक-प्रकाशकांना खूप भाव होता. त्यामुळे तर जॉर्जचाही भाव आणखी वधारला. त्याचं पुस्तक चांगलंच गाजलं. विशेषतः त्यानं स्वतःच काढलेल्या चित्रांनी तर अधिकच रंगत आली होती.

लवकरच वाचकांच्या व प्रकाशकांच्या मागणीखातर त्यानं दुसरी कादंबरी लिहिली. या लेखनाला व चित्रकारीला त्याला दोन वर्षं लागली. त्याला यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागले. पण शेवट मोठा चांगला झाला. ट्रिल्बी हीच ती दुसरी कादंबरी. तिच्या जन्मापासूनच ती जनप्रिय झाली. हार्पर्स मासिकातून सन १८९४मध्ये दरमहा क्रमशः तिचं दर्शन वाचकांना होऊ लागलं. पहिल्या झटक्यातच तिच्यामुळे या मासिकांचा खप एक लाखानं वाढला. काही दिवसांत साऱ्या अमेरिकेला ट्रिल्बी मेनियानं ग्रासलं.
इंग्लंडमध्येही लवकरच हाच अनुभव आला. त्यापूर्वीचे पुस्तकांच्या खपाचे सर्व विक्रम ट्रिल्बी जेव्हा पुस्तकरूपात प्रसिद्ध झाली तेव्हा मोडले गेले. ट्रिल्बीवर नुसत्याच चर्चा, वाद झाले असं नाही, तर अनेक गोष्टींना ट्रिल्बीचं नाव देऊन तिच्या लोकप्रियतेचा फायदा धूर्त उत्पादक आणि इतर व्यावसायिकांनी घेतला. एका विशिष्ट सॉफ्ट फेल्ट हॅटला ट्रिल्बी असं नाव देण्यात आलं. ट्रिल्बी पार्ट्या होऊ लागल्या. (भिशी पार्टी वा किटी पार्थ्यांसारख्या नाही, तर या कादंबरीचे वाचन तिथे होत असे; लोकांना ट्रिल्बीवर प्रश्न विचारले जात.) ट्रिल्बी शूज निघाले. एका मिठाईलाही ट्रिल्बीचं नाव मिळालं. हार्पर्सना याचा एवढा फायदा झाला की त्यांनी जॉर्जसोबत केलेला आपला जुना करार रद्द केला आणि त्याला नवीन दरानं जास्त रॉयल्टी दिली. या पुस्तकाच्या विक्रीतून त्याला (त्यावेळचे) एकूण वीस हजार पाऊंड एवढी कमाई झाली.
व्हिसलर का चिडला?
नाव, पैसा तर जॉर्जला मिळालेच पण ट्रिल्बीमुळंच त्याला एका संकटालाही तोंड द्यावं लागलं. हे संकट उद्भवलं, त्याचा एकेकाळचा परममित्र चित्रकार व्हिसलर याच्यामुळे. मार्चमध्ये, ट्रिल्बीचा तिसरा भाग मासिकात छापून आला. व्हिसलरनं ताबडतोब आपल्या वकीलाला निरोप पाठवला की हार्पर्स व जॉर्जवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करा. ट्रिल्बी कादंबरीत जॉर्जने ज्यो सिब्ली नावाचं पात्र रंगवलं आहे ते हुबेहुब आपल्यावर आधारलेलं आहे आणि यामुळे आपली बदनामी झाली असं व्हिसलरचं म्हणणं होतं. एव्हाना, व्हिसलर एक बडा व ख्यातनाम चित्रकार म्हणून गाजत होता. मार्च महिन्यात या मजकुरासोबत जॉर्जनं एक स्केचही छापलं होतं – त्याला त्यानं 'टू अप्रेन्टिसेस' असं शीर्षक दिलं होतं. ते बघून तर व्हिसलर अधिकच चवताळला. सिब्लीचं वर्णन त्याला फिट्ट लागू पडत होतंच, पण या चित्रातला गर्विष्ठ चित्रकारही त्याच्यावरच बेतला होता. त्यानं इतर कशाचाही विचार केला नाही. सिब्लीत अनेक चांगले गुण होते हेही तो विसरला आणि संतापाच्या भरात त्यानं जॉर्जला कोर्टात खेचायचं ठरवलं. सुदैवानं उभयपक्षी तडजोड होऊन प्रकरण कोर्टात गेलं नाही; पण त्यातून खूप कडवटपणा आला आणि या दोन मित्रांची घनिष्ठ मैत्री एका फटक्यात संपुष्टात आली. जॉर्ज आणि हार्पर्स या दोघांनाही व्हिसलरच्या या भूमिकेबद्दल, त्याच्यातील विनोदबुद्धीच्या अभावाबद्दल फार वाईट वाटलं. त्यांनी त्याला खूष करण्याचा खूप प्रयत्न केला; जाहीर माफी मागितली. मार्च महिन्याच्या त्या अंकाची विक्री बंद केली. एवढंच नाही तर पुढे ट्रिल्बी जेव्हा पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध झाली तेव्हा व्हिसलर ज्या संदर्भ आणि उताऱ्यांमुळे नाराज झाला होता, ते सगळे त्यातून गाळण्यात आले. सिब्लीचं जे वर्णन त्यात आता होतं, ते पूर्वीपेक्षा अगदीच सपक होतं. ट्रिल्बीची हीच ती पहिली प्रत. नव्या प्रतीच्या प्रकाशनाच्या वेळी मात्र, ना जॉर्ज जिवंत होता, ना व्हिसलर. अनेक वर्षांचा काळ मूळ घटनेला लोटला होता. म्हणूनच या दुसऱ्या प्रतीतला मजकूर म्हणजे हार्पर्स मासिकात छापून आलेला मूळ मजकूर आहे.

याच सुमारास जॉर्जवर वाङ्मयचौर्याचाही आरोप झाला. ट्रिल्बीची कथा त्यानं एका फ्रेंच साहित्यकृतीवरून चोरली असा कांगावा केला गेला. खरं असं होतं की त्यानं फक्त ट्रिल्बी हे नाव उचललं होतं. शार्ल नोंदिए याच्या कथेतल्या एका माणसाचं हे नाव होतं.
ट्रिल्बीला जे प्रचंड यश मिळालं त्यानं जॉर्ज जसा आश्चर्यचकित झाला तसाच या वादळांनी तो अस्वस्थही झाला. पण लवकरच ही वादळं शमली; उरली ती फक्त निखळ प्रसिद्धी. मात्र या साऱ्यांचा परिणाम जॉर्जवर झाला आणि तो अधिक एकांतप्रिय झाला. यानंतर त्यानं तिसरी कादंबरी – मार्शियन – लिहिली. हा सबंध काळ त्यानं खूप डिप्रेशनमध्ये घालविला होता. त्याचं प्रतिबिंब या कादंबरीत उमटलं आहे. ट्रिल्बीच्या यशामुळे त्याच्यावर पत्रकार, वाचक, मुलाखतकार, सहज भेटायला येणारे पत्रलेखक अशा साऱ्यांचा हल्ला होत होता; या दरम्यान तर तो शिगेला पोहचला होता. अख्ख्या अमेरिकेत त्याचं नाव गाजत होतं. आपल्या तिसऱ्या पुस्तकाचं नाव 'Soured by Success' (यशामुळे विटलेला) असं आपण ठेवणार आहोत असं तो कधीकधी म्हणायचा. यश, प्रसिद्धीनं इतका गांजलेला माणूस क्वचितच बघायला मिळेल. मार्शियन कादंबरी १८९६च्या उन्हाळ्यात पूर्ण झाली आणि हार्पर्स मासिकातूनच ती क्रमशः येऊ लागली. ऑक्टोबर १८९६मध्ये तिचा पहिला भाग प्रसिद्ध झाला. त्याच महिन्यात सहा तारखेला जॉर्ज हृदयविकारानं मरण पावला. हार्पर्सच्या नोव्हेंबरच्या अंकात कादंबरीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला, सोबत जॉर्जच्या मृत्यूची बातमीही.
हॅम्पस्टेड येथे त्याचं थडगं आहे. त्यावर हे शब्द कोरले आहेत, "A Little trust that when we die we reap our sowing. And so goodbye!"
जॉर्जच्या मृत्यूनंतर ट्रिल्बी व स्वेंगालीची ख्याती कमी तर झालीच नाही, उलट अधिकच वाढली.
सत्यावर आधारित
व्हिसलरनं निर्माण केलेल्या वादळाच्याच अनुषंगानं, जॉर्जचा एक जवळचा मित्र आल्फ्रेड आईनगर यानं जॉर्जच्या मृत्यूनंतर या वादळाला एक नवा आयाम जोडला. त्याचं म्हणणं असं होतं की ट्रिल्बीतील प्रत्येक व्यक्ती व घटना सत्यावर आधारित आहे आणि हे आपल्याला स्वतः जॉर्जनं सांगितलं आहे. यामुळे जगात एक नवीन उत्सुकता उत्पन्न झाली. ट्रिल्बीच्या पहिल्या प्रतीच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघाल्या. ट्रिल्बी नावाची गीतं, जोडे, टोप्या, मिठाया, नाच, साबण, टूथपेस्ट निघाल्या. फ्लोरिडा राज्यात एका नव्या गावाला ट्रिल्बी हे नाव देण्यात आलं. 'ट्रिल्बी' नावाच्या या कमर्शियलायझेशनचा, व्यावसायिकरणाचा हा विक्रम आजवर बहुधा कोणी मोडला नसावा. फरक एवढाच आहे की गेल्या शतकात कॉपीराईट कायद्याच्या आधुनिक स्वरूपाचा जन्म व्हायचा होता. त्यामुळे बिचाऱ्या जॉर्जला वा त्याच्या वारसांना या सर्व बूमचा काहीच फायदा झाला नाही.
ट्रिल्बी कादंबरीनं वाचकांवर एवढी मोहिनी घातली याचं काय कारण असावं? त्याचं एक उत्तर असं आहे की तिच्यात बोहेमियन, रंगेल, जवान, मुक्त पॅरिसची माहिती होती. जी आजवर फार कोणाला नीटशी ठाऊक नव्हती. तसंच भिकारणीची राणी झाल्याची व्हिक्टोरियन वाचकांची आवडती थीम ट्रिल्बीत होती. जॉर्जची शैली आणि ही कथा सांगण्याची पद्धत वेगळी होती, सर्वांत मुख्य म्हणजे स्वेंगाली आणि त्याची अद्भुत शक्ती यांचा तिला आधार होता.
आज ज्याला आपण सरसकट हिप्नॉटिझम म्हणतो त्याला जॉर्जनं ट्रिल्बी लिहिली त्याकाळी मेस्मेरिझम याच नावानं लोक जास्त ओळखायचे. फॅन्झ ॲन्टोन मेस्मेर (१७३४-१८१५) या डॉक्टरचं नाव या विद्येला दिलं होतं, कारण त्यानंच सर्वप्रथम या क्षेत्रात संशोधन केलं होतं. लोकांना या गूढ कलेचं खूप कुतूहल व आकर्षण होतं. जॉर्जनं त्याच आकर्षणाचा फायदा घेऊन ही दिशा किती टोकापर्यंत ताणता येते याचं एक उत्कृष्ट उदाहरण ट्रिल्बीत रंगवलं आणि म्हणूनच ती लोकांना भावली. योग्य माध्यमातून ही शक्ती विद्या जाणणारा एखादा तज्ज्ञ जवळपास अमर्यादित यश मिळवू शकतो, काहीही करू शकतो हे जॉर्जला सुचवायचं होतं. लवकरच ट्रिल्बीची नक्कल करणारं खूप साहित्य बाजारात आलं. तिचं नाव मेस्मेरिझमशी समानार्थी ठरलं.
मोशेल्सचा प्रभाव
या विद्येत जॉर्जला रस कसा वाटला? त्यानं स्वतःच त्याच्या तारुण्यात मेस्मेरिझमचा अभ्यास केला होता व वापर करून पाहिला होता. याची माहिती त्याचा तत्कालिन मित्र फेलिक्स मोशेल्स (Moscheles) यानं सन १८९७ साली लिहिलेल्या इन बोहिमिया विथ द्यु मॉरिअर या आज विस्मृतीत गेलेल्या एका छोट्या पुस्तकात दिली आहे. हा फेलिक्स एक गूढ इसम होता. त्याला चित्रकला आणि गूढविद्या यांत रस होता. तो रंगेल गडी होता. जॉर्जची त्याची ओळख बेल्जियममध्ये झाली आणि फेलिक्समुळेच तो मेस्मेरिझमकडे ओढला गेला. स्वतः फेलिक्सनं पॅरिसमध्ये ही विद्या शिकली होती आणि तिचे खूप प्रयोगही केले होते. या कामात व्हिर्जिनी मार्सीदों नावाची बाई त्याचं माध्यम किंवा सब्जेक्ट म्हणून काम करायची. या बाईचा या विद्येवर विश्वास नव्हता परंतु तिच्यावर फेलिक्स जेव्हा आपल्या विद्येचे प्रयोग करायचा तेव्हा ती अतर्क्य असे करिश्मे करून दाखवायची. जॉर्जनं तिची कहाणी फेलिक्सला खोदूनखोदून विचारली. पुढे फेलिक्स हे प्रयोग जॉर्जला करून दाखवू लागला. यावेळी त्यांच्या दिमतीला होती, एका तंबाखू विकणारीची मुलगी, ऑक्टाव्ही. तिला हे दोघं कॅरी या नावानं हाक मारायचे. तिच्याच आईच्या दुकानात मागच्या खोलीत त्यांचे हे प्रयोग चालत. त्यांना तिचं एकूणच रूप आणि निळे डोळे खूप आवडायचे; तर तिला या दोघांच्या कला. एक चित्रकार होता, गायक होता तर दुसरा जादूगार. दोघंही तिची खूप तारीफ करायचे आणि तीही त्यांच्या आजूबाजूला घुटमळायची. या संपूर्ण प्रयोगांचा व अभ्यासाचा जॉर्जवर खूप प्रभाव पडला, परिणाम झाला. त्यानं आणि फेलिक्सनं या विद्येकडे अत्यंत गांभीर्यानं पाहिलं. मानवी कल्पनेच्या आणि आकलनाच्या पलिकडे असलेल्या, ज्ञानाच्या सीमेबाहेरील अज्ञात, गूढ, अतर्क्य अशा शक्तींचं दर्शन घ्यायची, त्यांचा अनुभव घेण्याची त्यांची ही धडपड होती असं फेलिक्स म्हणतो. या सर्व प्रयोगांचा, अनुभवांचा जॉर्जनं कालांतरानं ट्रिल्बी लिहिण्यासाठी वापर करून घेतला असंही फेलिक्सचं अनुमान आहे.
मात्र स्वतः कॅरीवर त्यांचे हे प्रयोग कधीच यशस्वी झाले नाहीत. तरीही, ट्रिल्बीची नायिका म्हणजे तीच आहे असं फेलिक्स म्हणतो. डॅफ्नी द्यु मॉरिअर हिनंही आपल्या दी द्यु मॉरिअर्स या १९३७च्या पुस्तकात याला दुजोरा दिला आहे. आणि स्वतः स्वेंगाली? जॉर्जनं फेलिक्स मोशल्सवरच स्वेंगालीला बेतलं होतं, असा तर्क आपण करू शकतो. फेलिक्सच्या पुस्तकात जॉर्जनं काढलेली काही स्केचेस दिली आहेत. त्यातील एका स्केचमधील माणूस स्वेंगालीशी मिळताजुळता आहे. हे स्केच फेलिक्सचं आहे व त्याखाली 'मोशेल्स की मेफिस्टोफेलिस?' असं जॉर्जनं लिहून ठेवलं आहे.
जॉर्जवर फेलिक्सचा खूपच प्रभाव असल्यानं हे अशक्य नाही. पण अलेक्झांडरच्या मते, फेलिक्सचा फार थोडा अंश स्वेंगालीत आहे. सिनिस्टर, दुष्ट, खुनशी, क्रूर, दिसायला भयंकर पण प्रतिभासंपन्न स्वेंगालीला मुख्यत्वे आधार मिळाला आहे, चार्ल्स बोशा या माणसाचा. त्यानं ॲना रिव्हर बिशप नावाच्या एका सामान्य गायिकेचं रूपातंर एका नामवंत प्रिमा डॉना मध्ये केलं होतं. (प्रिमा डॉना म्हणाजे ऑपेरातली मुख्य गायिका.) संडे वर्ल्ड नावाच्या साप्ताहिकाच्या १० मार्च १८९५च्या अंकात (म्हणजे हार्पर्समध्ये ट्रिल्बीचा शेवटचा भाग प्रसिद्ध झाल्यानंतर सहा महिन्यांनी) या दोघांची कहाणी फ्रेडरिक लीस्टर या संगीतकारानं सांगितली. बोशा आणि बिशप या दोघांच्या कथेत आणि स्वेंगाली-ट्रिल्बी यांच्या कथेत खूप साम्य आहे. ॲनाचा नवरा सर हेन्री रॉली बिशप हा जॉर्जचा जवळचा दोस्त होता. बोशाच्या मार्गदर्शनाखाली ॲनाचा सामान्यत्वापासून आश्चर्यापर्यंत झालेला प्रवास जॉर्जनं जवळून पाहिला होता. बोशाचा आवाज जाड, guttural होता; त्याचा वर्ण गडद होता; तो भडक कपडे घालायचा; खूप नाटकी हातवारे करायचा. दिसायला तो कुरूप, विचित्र, चमत्कारिक होता. ॲनाचं परिवर्तन करायला तो हिप्नॉटिझम वापरायचा असं काहींना वाटायचं; काहींना ते चेटूक वाटायचं. बोशा समोर असेपर्यंतच ती गाऊ शकत असे. एकदा सिडनीमध्ये कार्यक्रम चालू असताना तो चक्कर येऊन पडला, तेव्हा तिनं गाणं थांबवलं, ते तो पुन्हा परतेपर्यंत.
स्वेंगाली ट्रिल्बीवर हीच जादू करतो. त्याच्याशिवाय ती असहाय्य बनते; तो समोर असताना मात्र ती आजवर कधी कोणी गायलं नसेल अशा स्वर्गीय आवाजात गाते. मात्र एकदा स्वेंगाली कार्यक्रम चालू असताना अचानक मरतो आणि ट्रिल्बीचा आवाज कायमचा बंद होता. जॉर्जनं बोशा-बिशपचीच कहाणी आपल्या कादंबरीत वापरली आहे. ॲना बिशप अन ट्रिल्बी या दोघीही गात असताना स्वप्नात वा झोपेत वावरल्यासारख्या दिसायच्या, हे विशेष. स्वतः जॉर्जनं या मताचं कधी खंडनही केलं नाही वा ते मान्यही केलं नाही. तो गप्प बसला.
याशिवाय या कादंबरीचा खरा नायक लिटल बेली हा जॉर्जचा लंडनमधला चित्रकार मित्र फ्रेड वॉकर याच्यावर आधारलेला आहे. (जॉर्जनं स्वतःलाच बेलीच्या रूपात रंगविलं असा एक चुकीचा समज आहे.) बेलीचा मित्र द लेअर्ड याला टॅमी लॅमन्ट या स्कॉट माणसाचा तर बेलीचाचा दुसरा मित्र टॅफी याला ज्यो रॉली या पहेलवानाचा आधार होता. हे दोघंही जॉर्जसोबत पॅरिसला ५३, रु नोत्र दाम् दे शाँ या पत्त्यावर असणाऱ्या स्टुडिओत राहायचे. कादंबरीत बेली, लेअर्ड व टॅफी यांचं त्रिकूट असतं. या खऱ्या स्टुडिओची दरवान मादाम विनो कादंबरीत मादाम विनार बनली आहे तर डोडोर (दोदो) या पात्राला जॉर्जचा धाकटा भाऊ पुजिन याचा आधार आहे.
यांपैकी कोणीही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या अशा वापराबद्दल जॉर्जवर व्हिसलप्रमाणे राग धरला नाहीच, उलट त्याचा अभिमानच बाळगला. टॉम आर्मस्ट्राँग या मित्रानं आपल्याला का वगळलं यासाठी जॉर्जशी लटकं भांडण केलं!
नाटकं आणि चित्रपट
ट्रिल्बी कादंबरीला एवढं यश मिळाल्यावर तिचं नाट्यरूपांतर झालं नसतं, तरच नवल. १८९५मध्ये ट्रिल्बीवर पहिलं नाटक पॉल पॉटर यानं लिहिलं. स्टेजवर या नाटकाचा प्रयोग मॅन्चेस्टर येथे त्याच साली झाला. स्वेंगालीचा रंगमंचावरील हा पहिला अवतार सर हर्बर्ट बीरबॉम ट्री (१८५३ - १९१७) या थोर इंग्रज नटानं रंगविला. डोरोथिया बेअर्ड, ट्रिल्बी बनली होती. या नाटकाला इंग्लंड, अमेरिका, ऑस्टेलियातही खूप यश मिळालं.
सर हर्बर्ट ट्रीचं आणखी कौतुक म्हणजे त्यानं, तसं काही कायदेशीर बंधन त्याच्यावर नसतानाही, पॉटर आणि जॉर्ज मॉरिअर यांना बरीच रॉयल्टी दिली. याच प्रयोगात जॉर्जचा मुलगा जेरल्ड यानं डोडोरचं (म्हणजे त्याच्या काकाचंच) काम केलं. जेरल्ड पुढे एक अभिनेता म्हणून खूप नावारूपाला आला; पुढे त्याला नाईटहूडडी मिळाला. ट्रिल्बीची नंतर जेवढी नाट्यरूपांतरं व प्रयोग झाले त्या सर्वांनी सर हर्बर्ट आणि बेअर्ड यांचीच नक्कल केली, इतकी ही कृती उत्कृष्ट झाली होती. किकीला स्वतः मात्र हे सारं यश अनावश्यकच वाटलं. पण त्याची इच्छा असो वा नसो, एव्हाना स्वेंगाली आणि ट्रिल्बी अमरत्वाच्या दिशेनं वाट चालू लागले होते.
ट्रिल्बीची खूप नाट्यरूपांतरं झालीत, एक संगीतिकाही निघाली. १९१२मध्ये सर हर्बर्टनं तिच्यावर मूकचित्रपट काढला. १९१४मध्ये आणि १९१७मध्येही दुसरा असे वेगवेगळे चित्रपट निघाले. १९२५मध्ये स्वेंगाली नावाचा एक दीर्घ चित्रपट फर्स्ट नॅशनलसाठी रिचर्ड टलीनं काढला. त्यात एडमंड कॅचूनं काम केलं होतं. १९३१मध्ये स्वेंगालीचा पडद्यावरील सर्वोत्तम आविष्कार जॉन बॅरिमोरनं वॉर्नर ब्रदर्ससाठी पेश केला. १९५४मध्ये एमजीएमनं डॉनल्ड वुल्फिटला घेऊन रंगीत स्वेंगाली पडद्यावर आणला. १९८२ साली पीटर ओ' टूलनं स्वेंगालीला चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांसमोर आणले.
शेवटी स्वेंगालीचा परिणाम खऱ्याखुऱ्या जीवनात काही झाला आहे का हे बघणं मोठं मनोरंजक ठरेल. बोशाची कथा स्वेंगालीच्या पूर्वीची आहे. १८९८ साली आल्बेर द रोशा या फ्रेंच हिप्नॉटिस्टनं लिना नावाच्या मॉडेलवर प्रयोग करून तिला झोपेच्या अंमलात नाचायला, गायला लावलं आणि ट्रिल्बीची कथा प्रत्यक्षात घडू शकते हे दाखवून दिलं. १९०३ ते १९०६ या दरम्यान एमिल मानें यानं मॉज्दलेन जी. नावाच्या मॉडेलवरही असेच प्रयोग करून दाखविले. १९०२मध्ये सॅन फ्रान्सिको येथे प्रा. लिऑन सिल्व्हानी यानं व्हिओला वेस्ट नामक टोनडेफ मुलीला हिप्नॉटिझमद्वारे गानकोकीळा (सिंगिंग नाइटिंगेल) बनवल्याचा दावा केला. पण त्याचा हा प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही.
प्रत्यक्षात काय झालं ते राहू द्या. काल्पनिक आणि गूढ स्वेंगाली, त्याची गुलामसुंदरी ट्रिल्बी यांची दंतकथा केव्हाच सत्यत्वास पोहोचली आहे. मर्यादित क्षमतेच्या माणसाला संमोहनाद्वारे अतीकार्यक्षम करता येऊ शकतं का हे निर्विवादपणे जरी आजही सांगणं कठीण असलं तरी कलाकाराच्या संवेदनांना आणि प्रतिभेला संमोहनाद्वारे चालना देता येते, त्यांच्याकडून अधिक उत्तम काम करवून घेता येतं असं मानलं जातं. पण यासाठी मुळात थोडा तरी कलेचा अंश हवाच. अगदीच बथ्थड, कोऱ्या डोक्याच्या माणसावर स्वेंगालीसुद्धा परिणाम करू शकणार नाही.
स्वेंगालीचं गूढ आकर्षण आजही जनसामान्यांच्या मनात कसं घर करून पक्कं बसलं आहे हे सांगताना अलेक्झांडरनं बो डेरेक या आधुनिक सेक्सी चित्रपट-अभिनेत्रीचं उदाहरण दिलं आहे. बो तिच्या नवऱ्याची, जॉन डेरेकची निर्मिती आहे असं मानतात. या दोघांनी काढलेल्या कंपनीचं नाव आहे स्वेंगाली इन्कॉर्पोरेटेड आणि बो म्हणते,
"In some ways I suppose Derek has been a Svengali to me but I was always willing to listen. जणू काही प्रत्यक्ष ट्रिल्बीच तिच्या मुखातून बोलली.
एकूण, स्वेंगाली आणि त्याचा निर्माता जॉर्ज द्यु मॉरिअर या दोघांनाही एवढ्यातच मरण यायचं नाही!
(पूर्वप्रकाशित : ‘अंतर्नाद’)