Skip to main content

श्रीविठ्ठलः एक महासमन्वय — माझे आकलन

रा. चि. ढेरे यांचे “श्रीविठ्ठलः एक महासमन्वय” हे पुस्तक वाचल्यानंतर झालेले माझे आकलन थोडक्यात मांडण्याचा हा प्रयत्न आहे. हा लेख पुस्तकाचा सारांश नाही; तो वेगळा कधीतरी लिहिता येईल. पुस्तकातील अनेक प्रकरणे इतकी गहिरी आहेत की त्यावर स्वतंत्र लेख लिहिता येतील. हे माझे वैयक्तिक आकलन असून, त्यात काही चुका वा अतिसुलभीकरण असण्याची शक्यता मान्य करतो. या विषयावर इतर संदर्भग्रंथ सुचविल्यास मी मनापासून आभारी राहीन.

विठ्ठल संशोधनाचा प्रवास

विठ्ठलावर स्वातंत्र्यपूर्व काळापासून संशोधन सुरू आहे. वि. का. राजवाडे, पा. वा. काणे, डॉ. तुळपुळे, ग. ह. खरे आणि शोभना गोखले या विद्वानांनी वेळोवेळी त्यात भर घातली आहे. परंतु दुर्गा भागवत यांनी “पंढरीचा विठोबा” (पैस) या ललित लेखात प्रथम सुचवले की विठ्ठल हे धनगर समाजाचे मूळ आराध्य दैवत असावे. त्या दृष्टिकोनाने पुढील संशोधक — डॉ. दलरी आणि डॉ. सोंथायमर — यांना त्या दिशेने संशोधन करण्यास प्रेरणा दिली. मात्र या संशोधकांनी स्थलपुराणांकडे ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून पाहिले नाही, म्हणून अपेक्षित निष्कर्ष ठोसपणे निघाला नाही. ढेरे यांनी या सर्व संशोधकांचे प्रांजळपणे आभार मानले आहेत, कारण त्यांच्या शोधसाधनेच्या पायावरच ढेरे यांना आपली नवी, सुसंगत मांडणी उभारता आली.

वीरतेपासून दैवत्वापर्यंत

वैष्णवीकरण समजून घेण्याआधी मला कुरुंदकरांचे “व्यासांचे शिल्प” आठवते. त्या पुस्तकातून माझे आकलन असे की — आपल्या ज्ञात इतिहासातील वीरपुरुष काळाच्या ओघात गौरव, अभिमान आणि शेवटी दैवत्व या पायऱ्यांवर चढत जातात.
इसवी सनपूर्व चौथ्या शतकात पाणिनीच्या अष्टाध्यायि आणि चाणक्याच्या अर्थशास्त्रावरून असे दिसते की त्या काळी श्रीकृष्ण आणि अर्जुन हे वीरपुरुष म्हणूनच प्रसिद्ध होते; त्यांच्या दैवीकरणाची शक्यता मात्र अल्प होती. नंतरच्या शतकांत केवळ कृष्णाचे दैवतीकरण झाले, आणि गीतेचे तत्त्वज्ञान नावारूपास आल्यावर कृष्णाच्या मुखी त्या तत्त्वज्ञानाचे सार घालून “श्रीमद्भगवद्गीता” जन्माला आली, जिने कित्येकांना आध्यात्मिक वाटचालीस मार्गदर्शन केले.
अर्थात, वेदांचे तत्त्वज्ञान नाकारून प्रामुख्याने जैन आणि बौद्ध यांनी आपली स्वतंत्र वाट निवडली.

बौद्ध प्रभाव आणि सामाजिक संस्कार

सुरुवातीच्या मौर्य राजसत्तेच्या काळात बौद्ध धर्माला मिळालेल्या राजाश्रयामुळे बुद्धाच्या करूणा, दया, क्षमा आणि शांती या विचारांचा जनमानसावर खोल परिणाम झाला. या विचारांचा प्रभाव पुढे बसवेश्वर, ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या संतसाहित्यात उमटलेला दिसतो; संतांना श्रीविठ्ठलाच्या मूर्तीत अनेकदा बुद्धाचेच दर्शन झाले. मौर्य राजसत्ता संपुष्टात आल्यावर, इसवी सनाच्या चौथ्या–पाचव्या शतकात गुप्त राजवटीत जेव्हा पुराणे लिहिली गेली असावीत, तेव्हा नववा अवतार म्हणून बुद्धाची दखल घेणे अपरिहार्य ठरले असावे. गुप्तकालीन पुराणांत बुद्धाला विष्णूचा नववा अवतार मानण्यात आले — हे त्या काळातील सांस्कृतिक समन्वयाचे प्रतीक आहे.

आर्येतर राजसत्ता आणि संस्कृतीकरण

गुप्त साम्राज्यानंतर दक्षिण पठारावर सातवाहन, वाकाटक, चालुक्य, यादव, होयसळ ते विजयनगर अशा अनेक राजसत्ता उदयास आल्या. या पैकी बऱ्याच राजसत्तांचे मूळ आर्येतर होते आणि क्षत्रियवर्ण स्वीकृतीसाठी त्यांनी हिरण्यगर्भ यज्ञ केलेल्याचे उल्लेख आढळतात. या राजांच्या नावांचे संस्कृतीकरणही झाले: बिट्ट, बिट्टरस, बिट्टराज या प्राकृत नावांचे विष्णुवर्धन असे संस्कृत रूप झाले; विजयनगरच्या हक्क–बुक्क बंधूंपैकी हक्कचे रूपांतर हरिहर झाले. अशा रूपांतरणांतून त्यांच्या नावांतच सामाजिक अभिजनत्वाची छटा निर्माण झाली. या राजांनी श्रीकृष्णाच्या “यादव” कुळाशी स्वतःला जोडून अभिजन संस्कृतीत स्थान मिळवले. याडव किंवा कुरब या शब्दांचा अर्थ महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या पट्ट्यात “मेंढीपालक” असा होतो. त्यामुळे श्रीकृष्णाच्या “यादव” कुळाशी स्वतःची “याडव” ओळख जोडणे हे या राजांना जास्त सोपे होते आणि ते सामाजिक मान्यता तसेच सांस्कृतिक अभिजातता प्राप्त करून देणारे ठरले.

ही प्रक्रिया केवळ त्या काळापुरती मर्यादित नव्हती — आजही तिचे प्रतिबिंब दिसते. बहुजनवादी समाजातील लोकांचे “सोवळे” नेसून पूजाविधी करणे हे त्याच मानसिकतेचे द्योतक आहे. त्या काळात राजांनी आपले कुळ अभिजनत्वाशी जोडले, तरी आपल्या ज्ञातीच्या — आता दैवत्वास पोहोचलेल्या — एकेकाळच्या वीरपुरुषांवरील प्राचीन श्रद्धा संपली नाही. म्हणूनच त्यांच्या ज्ञातीच्या देवतांचे उन्नयन इतिहासाच्या प्रवाहात स्वाभाविक ठरते; आणि अशा लोकप्रिय देवतांना अभिजन समाजही काही काळाने आपलेसे करतो — आजही जसे काही जैन धर्मीय गणेश चतुर्थीला घरात गणपती आणताना दिसतात.

वैष्णवीकरणाची प्रक्रिया आणि संघर्ष

या उन्नयन प्रक्रियेला काही गटांकडून टोकाचा विरोधही झाला. ज्ञानेश्वरपूर्व काळातच, इ. स. ११९४ मध्ये गुजरातजवळील सोलंकी राजवटीत चक्रधरस्वामींचा महानुभाव पंथ नावारूपाला आला. या पंथाला विठ्ठलाचे वैष्णवीकरण मान्य नव्हते. लीळाचरित्रात विठ्ठलाला गायी चोरणाऱ्या जमातीतील वीरगळी म्हणून वर्णन आहे; त्यांच्या अनुयायांनी ज्ञानेश्वरादी भावंडांवर अश्लाघ्य टीकाही केली. पुढे काही शतकांनी तुकारामांनाही अशा विरोधाचा सामना करावा लागला.

जसा वैष्णवांचा कृष्ण, तसा जैनांचा नेमिनाथ — म्हणून जैन पंथीयांनी बहुजनांच्या लोकप्रिय देवतेला नेमिनाथाशी जोडण्याचा प्रयत्न केला; परंतु नेमिनाथाशी संबंध जोडण्याऐवजी यादवकूलीन कृष्णाशी जोडण्यात राजाला फारशी कसरत करावी लागत नव्हती.

ढेरे यांच्या मते विठ्ठल आणि व्यंकटेश यात कमालीचे साम्य आहे. व्यंकटेश शैव की वैष्णव? — हा वाद थेट राजदरबारात गेला. माझ्या मते राजपंडित रामानुजन हे निमित्तमात्र असावेत; खरी इच्छा राजाचीच असावी. राजाच्याच इच्छेनुसार देवतेच्या हातात शंख–चक्रासारखी विष्णूचिन्हे ठेवून वैष्णव निर्णय देणे सहज झाले असावे. ढेरे मात्र या वैष्णवीकरणामागे रामानुजनांच्या प्रभावाकडे निर्देश करतात.

तरीही, विठ्ठल–विरोबा (कर्नाटकात बिरप्पा) या जोडगोळीतील विरोबा याचे रूपांतर वीरशैवांच्या “विरभद्र” या देवतेत करण्यात यश आले.

वैष्णवीकरण ते वैदिकीकरण

वैष्णवीकरणानंतर प्रश्न उरतो — या नव्या “चोविसांवेगळां आणि सहस्त्रांआगळा” विष्णूरूपाची सोय कुठे लावायची? (विष्णूची चोवीस रूपे आणि सहस्रनामे तर आधीच प्रचलित.) यासाठी संस्कृत भाषेत “स्कांद पांडुरंगमहात्म्य” या नव्या पुराणाची रचना करण्यात आली. १३व्या शतकातील यादव दरबारातील विद्वान हेमाद्री (ग्रंथ: चतुर्वर्गचिंतामणी) यांच्या संदर्भावरून असे सूचित होते की “स्कांद पांडुरंगमहात्म्य” हे हेमाद्रीपूर्वकालीन आणि ज्ञानेश्वरादी संतांपूर्वीचे असून त्या काळातच नावारूपास आले होते. यानंतर त्याच्या वैदिकीकरणाची — म्हणजे यज्ञ–याग आणि कर्मकांडांच्या विधींची — सविस्तर सोय संस्कृत ग्रंथांतून करण्यात आली. विठ्ठल–गीताही नंतर रचली गेली.

इतिहासाच्या खूणा

भूतकाळातील या खुणा कधीच पूर्णपणे नष्ट होत नाहीत. ज्ञानेश्वरांच्या काही शतकांपूर्वीच पंडरिगे (पंढरपूरचे मूळ नाव) येथे विठोबाचे वैष्णवीकरण झाले होते आणि त्यास जनमानसाची मान्यताही मिळाली होती. तरी, वैदिक कर्मकांडांच्या चतुर समावेशामुळे मूळ भक्तांना हा देव काहीसा “पारखा” वाटू लागला.

इष्टापूर्त कर्मांमधील मधल्या इष्टाचे (यज्ञ, याग इ.) स्वातंत्र्य नव्हते; आणि पूर्त कर्मे (मंदिरे बांधणे इ.) करण्याची ऐपतही नव्हती. म्हणून संतांनी लोकांसाठी संस्कृतमधील “तीर्थरूपी” तत्त्वज्ञान प्राकृतरूपी घाट बांधून सहज उपलब्ध केले —

“तीरें संस्कृताची गहनें | तोडुनि मर्‍हाटियां केली शब्दसोपानें”ज्ञानेश्वरी ११.८–१०
“एथ भक्ति गा एक सरे | जाति अप्रमाण” ज्ञानेश्वरी ९.४४८
“तिर्थी धोंडापाणी | देव रोकडा सज्जनी” तुकाराम

बुद्धाचे अस्तित्व संपून शतके उलटली तरी त्यांच्या वाङ्मयात विठ्ठल कधी कधी बुद्धरूपातच दिसतो. विठ्ठल हा पुरुष देव असूनही शाक्तांच्या श्रद्धेतील “माऊली” ही भावना त्यात सहज मिसळते; करूणा–दया–क्षमेला वारकरी संप्रदायात नवा आकार मिळतो.

वैष्णवीकरणाच्या प्रक्रियेत मूळच्या पंडरिगेच्या पुंडरिकेश्वराचे — जो शैव मंदिरातील अधिष्ठाता देव — पुंडलिक या काल्पनिक वैष्णव भक्तात रूपांतर झाले. तरी पुंडलिकाच्या मंदिरात समाधीऐवजी पिंडी दिसते, आणि त्या पूजेचे मान आजही कोळी समाजाकडे आहेत.

यडूरच्या विरभद्र पूजेचे मान लिंगायतांकडे आहेत; लेपाक्षीच्या शिलालेखांत विठ्ठलेश्वर आणि विरेश्वर अशी दोन नावे आढळतात.

अशा उन्नत अवस्थेत लोकप्रिय झालेल्या श्रीविठ्ठल आणि विरभद्र यांची नाळ मूळच्या विठोबा/बिट्टू आणि विरोबा/बिरप्पा यांच्याशी जोडलेली असल्याचे भान विजयनगर साम्राज्याच्या राज्यकर्त्यांनाही होते. म्हणूनच हंपीसारख्या ठिकाणी श्रीविठ्ठल आणि विरभद्र (विरुपाक्ष) यांची मंदिरे इतर देवतांच्या तुलनेत अधिक भव्य दिसतात; शिल्पसंपदेत घोंगडी पांघरलेला, काठीवर हात ठेवून त्यावर हनुवटी टेकवलेला धनगर आजही दिसतो.

श्रीविठ्ठल, व्यंकटेश आणि विरभद्र (शैव) अशी उन्नत रूपे असूनही त्यांच्या मूळ लोकदेवतारूपांची छटा आजही स्पष्ट आहे. विठोबा–विरोबा अजूनही महाराष्ट्रातील काही ठिकाणी एकत्र नांदतात (पट्टणकोडोली–कोल्हापूर, पोखरापूर–सोलापूर, कुरोली–सातारा). मंदिरात जरी समिष नैवेद्य नसला तरी मंदिराबाहेर तो प्रथा म्हणून आजही दिला जातो.

धनगरी लोकगीत–परंपरांतही या देवतांच्या कथा जिवंत आहेत; त्यांच्याही देवता दिंडीरवनात (चिंचेच्या झाडांच्या वनात) दिसतात. विठ्ठल आणि व्यंकटेश दोघांनाही कांबळे प्रिय आहेत; तिथेही वारी आहे, दिंड्या आहेत, मानाचा क्रम आहे, आणि प्रत्येक पालखी–दिंडीमागे एखाद्या निष्ठावंत भक्ताची कथा सांगितली जाते.

एकोणविसाव्या शतकात अपघातामुळे मूळ मूर्ती बदलून नवीन वैष्णव मूर्तीची स्थापना झाली, तरी पांडुरंगमहात्म्य व संतसाहित्यात वर्णिलेली — छातीवरील कूटमंत्र, हातातील काठी आणि दिगंबर स्वरूप — अशी मूर्ती आजही म्हाडा (सोलापूर) येथे दिसते.

एक ‘महासमन्वय’

“हिंदू हा धर्म नसून एक जीवनपद्धती आहे” — हे विधान आपण वारंवार ऐकतो. त्यामागचा ऐतिहासिक संदर्भ या पुस्तकातून सखोल उलगडतो. आजच्या काळात ही कल्पना काहींना अवघड वाटू शकते; परंतु ऐतिहासिक सत्य असे दिसते की येथे विविध पंथांच्या धारणा, श्रद्धा आणि उपासना पद्धती भिन्न होत्या. त्यांच्या परंपरांत समन्वय नव्हताच — उलट स्पर्धा, मतभेद आणि कटुता होती.

मराठी संतांनी या विभाजित परंपरांना विठ्ठलभक्तीच्या माध्यमातून एकत्र आणले. विठ्ठल हे केवळ एका पंथाचे दैवत राहिले नाही, तर सर्व पंथांच्या समान श्रद्धेचे केंद्र बनले. संतांनी वैदिक–अवैदिक, शैव–वैष्णव–शाक्त अशा विविध परंपरांतील मतभेद मिटवून केवळ ‘समन्वय’ नव्हे, तर ‘महासमन्वय’ साधला.

विठ्ठलाचे हे सर्वसामावेशक सामर्थ्य “वैष्णव” तुकारामांच्या या ओळीत सुंदरपणे प्रकट होते —

“वेद आम्हांवरी रुसोनिया गेला,
आम्ही त्याच्या बा ला धरिले कंठी.” — तुकाराम

(टीप: या लेखातील विचार माझे स्वतःचे आहेत; भाषाशुद्धी व सुधारण्यासाठी ChatGPT ची मदत घेतली आहे.)