एका खडूस फॅशनिस्टेचे स्मरणरंजन

अलीकडेच 'प्राडा' नावाच्या फॅशन ब्रँडनं १८५ डॉलरची एक चांदीची पेपरक्लिप बाजारात आणली. अपेक्षेप्रमाणे, ट्विटरादी मतमाध्यमांवर यावर तातडीनं टिप्पणी झाली. त्या समुद्रमंथनातून असं निष्पन्न झालं की ती क्लिप खरंतर नोटा एकत्र ठेवण्यासाठी आहे. माझ्या भारतीय नजरेसमोर लगेच वाणसामानाच्या दुकानातल्या गल्ल्यावरचे पुरुष आले. पाश्चात्य देशांत कुणी नोटा मोजत गल्ल्यावर बसल्याचं फार बघितलं नाही. पण भारतात एवढे पैसे देऊन ती क्लिप घेण्यापेक्षा तेवढे पैसे त्या गठ्ठयातच ठेवून, पाच रुपयाला पन्नास मिळणाऱ्या रबरबँडनंच बांधून ठेवतील. ती क्लिप बाजारात आणून 'प्राडा'ला जे साध्य करायचं होतं ते झालं. असं असलं तरी तिचा वापर त्यांनी सांगितला आहे तसाच केला पाहिजे असं काही नाही. समजा, मांजरपाट वापरून एक झगा शिवला आणि खांद्यावर शिलाई न मारता अशा दोन पेपरक्लिपा लावल्या तर तीस हजार खर्चून, आजकालचे लोक कसे न परवडणाऱ्या दिखाऊपणाच्या आहारी गेले आहेत असं दाखवता आलं असतं.

या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या 'पॅरिस कुत्च्युअर वीक'मध्ये स्केपरेली (Schiaperelli) नावाच्या ब्रँडनं अशीच व्हायरलता मिळवली. त्यांची एक मॉडेल कमरेवर एक छोटं रोबोट मूल घेऊन धावपट्टीवर आली. हे मूल सर्किट बोर्ड, दागिन्यांमध्ये वापरायचे चकचकीत खडे, वायरी अशा गोष्टींचं बनवलं होतं. आणि ती बाई त्याला मोठ्या वात्सल्यानं घेऊन चालत होती. पहिल्यांदा ते बघितल्यावर, त्यातून नेमकं काय सांगायचं आहे याबद्दल माझ्या मनात अनेक विचार येऊन गेले. आपलं यंत्रांवरच अधिक प्रेम जडलं आहे का? किंवा, आधुनिक स्त्रीला नैसर्गिक मातृत्वाचा कंटाळा आला आहे का? किंवा, आपल्या यंत्रांतून तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचा वारसा आपण मुलांना देतो आहोत का? असे विचार त्या चित्राकडे बघून केल्यावर, मी त्या संकल्पनेमागच्या पुरुषाला नेमकं काय म्हणायचं होतं ते जाऊन वाचलं. त्याला ते परग्रहावरून आलेलं बाळ आहे असं दाखवायचं होतं. त्याचा आवडता सिनेमा 'एलियन' आहे असं त्यानं सांगितलं. इतक्या तरल कलाकृतीचं इतकं मठ्ठ, पुरुषी आणि हॉलीवूडी स्पष्टीकरण वाचून माझ्यातली कलासक्त ललना काही क्षण मरून गेली.

Schiaperelli

'फॅशन' फक्त तथाकथित ‘नटमोगऱ्या’ बायकांचा प्रांत आहे, आणि त्याबद्दल बुद्धिमान स्त्रीपुरुषांनी बोलू नये असा एक समज रूढ आहे. कॉलेजात जाताच 'फॅशनी' करण्याऱ्या मुली, लग्नकार्यात मेकअप आणि दागिन्यांचे थर चढवलेल्या बायका, उच्चभ्रू लोकांची थेरं ते नव्वदच्या दशकात केबलवर येणारा एफटीव्ही (जो आता चाळीशीत असलेले पुरुष आईबाबा घरी नसताना चोरून बघायचे) – यांपैकी काहीही फॅशन म्हणल्यावर मध्यमवर्गीय मराठी लोकांच्या डोक्यात येईल. फॅशन म्हणजे आपणच करायचं काही असतं असाही एक समज आहे. अर्थात स्केपरेली, प्राडा, ईव्ह सां लोराँ वगैरे लोक आपल्याला काही 'करायची' संधीच देत नाहीत. 'द डेव्हिल वेअर्स प्राडा' नावाचा एक चित्रपट २००६ साली आला होता. इतर कुठल्या 'बुद्धिजीवी' मासिकांत नोकरी मिळत नाही म्हणून नाईलाजानं एका 'फॅशन' मासिकात नोकरी करणाऱ्या आणि नंतर तिथेच स्थिरावणाऱ्या एक मुलीची (अँडी) ही गोष्ट आहे. सुरुवातीला स्वतःच्या कामाकडे एका सुप्त तुच्छतेने बघणाऱ्या अँडीला तिची बॉस (मिरँडा) कशी जागेवर आणून ठेवते तो प्रसंग पुन्हापुन्हा बघण्यासारखा आहे. फॅशन उद्योगाची आर्थिक उलाढाल; एकाच वेळी जगभरात एकच फॅशन आणायचा, आणि ती लोकांच्या गळी उतरवायचा रेटा (ज्यांना फॅशन उद्योगात काहीही रस नाही, त्यांच्याही!); या उद्योगामुळे पर्यावरणाची होणारी हानी, तसंच गरीब देशांतल्या लोकांचं आर्थिक शोषण - हे सगळं एकीकडे ठेवून दिलं तरी फॅशनमध्ये रस असलेल्या लोकांना या उद्योगात का रस आहे याचं एक कारण उरतंच. एखादं चित्र बघताना जे वाटतं तशाच प्रकारचं काही फॅशन शो बघताना वाटतं.

फॅशन, आणि आपण ज्याला 'सिरीयस' कला म्हणू या दोन क्षेत्रातल्या सहकार्याचीही अनेक उदाहरणं आहेत. १९३७ साली, स्केपरेलीची मालकीण एल्सा स्केपरेली आणि प्रसिद्ध चित्रकार साल्व्हादोर दाली एकत्र आले आणि त्यांनी एक 'लॉबस्टर' ड्रेस तयार केला.

Lobster Dress

त्या काळात दालीच्या इतर कामांतही हा 'लॉबस्टर' टप्पा चालू होता. या ड्रेसच्या नंतर अनेक आवृत्त्या झाल्या आणि अगदी अलीकडे, आत्ताच आणि भारतात - नक्कलही झाली.

Mondrian

१९६५ साली ईव्ह सां लोराँनं (Yves Saint Laurent) त्याच्या आवडत्या पीट मोन्द्रियान या चित्रकाराच्या काही कलाकृतींचा वापर त्याच्या 'शिफ्ट ड्रेस'वर केला. १९६० च्या दशकात 'मिनीस्कर्ट' रस्त्यांवर दिसू लागले. तो काळ स्त्रीमुक्ती चळवळीचा होता. या दशकात पहिल्यांदाच स्त्रियांसाठी गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध झाल्या आणि त्यांचा वापर झपाट्यानं वाढला. स्त्रीमुक्ती चळवळीतला हा एक महत्वाचा टप्पा होता. या स्वातंत्र्याचं प्रतिबिंब स्त्रियांच्या पेहरावातही दिसू लागलं. लांब स्कर्ट, त्याखाली स्टॉकिंग असे अंगभर कपडे घालणं सोडून देऊन, स्त्रिया, गुडघ्याच्या थोडे अलीकडेच संपणारे मिनीस्कर्ट घालू लागल्या. 'मिनीस्कर्ट' एका अर्थी स्त्रीमुक्तीचं दृश्य प्रतीक झाला होता. त्यामुळे १९६६ साली 'दिओर' फॅशन शोमध्ये मिनीस्कर्ट नव्हता म्हणून, 'ब्रिटिश सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ मिनीस्कर्ट्स' या संस्थेतल्या बायकांनी मोर्चा (अर्थात मिनीस्कर्ट घालूनच!) काढला! 'शिफ्ट ड्रेस' मिनीस्कर्टपेक्षाही अधिक मोकळा आणि सोयीचा असतो. त्याची लांबी थोडी कमी करून आणि मोन्द्रीयानची चित्र वापरून सां लोरँनं मॉडर्न आर्ट आणि मॉडर्न स्त्री एकाच वस्त्रात आणले. तो ड्रेस इतका लोकप्रिय झाला; आणि त्याची इतकी नक्कल केली गेली, की शेवटी सां लोराँलाही त्याचा कंटाळा आला.

Van Gogh

या चित्रातली जाकिटंही एका प्रसिद्ध चित्रकाराच्या दोन कलाकृतींवर बेतलेली आहे. कोण ते ओळखणं सोपं आहे. सां लोराँनं १९८८ साली तयार केलेली ही जाकिटं मात्र तितक्या झपाट्यानं पसरली नाहीत कारण त्यावर असलेल्या बारीक भरतकामामुळे ती तयार करायला एकूण सहाशे तास लागले होते. सां लोराँनं अशी फक्त चार तयार केली. २०१९ साली, यातल्या सूर्यफुलांच्या जाकिटाची एका लिलावात साडेतीन कोटी रुपयाला खरेदी झाली. १९८८ साली, ते घालून दाखवणारी मॉडेल, नेओमी कॅम्पबेलही पुढे तितकीच 'आयकॉनिक' ठरली.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या न्यू यॉर्क फॅशन वीकमध्येदेखील थॉम ब्राउन नावाच्या एका डिझायनरनं एडगर ॲलन पो या प्रसिद्ध अमेरिकन कवीची एक कविताच सादर केली. प्रेमिकेच्या मृत्यूनंतर तिला विसरू पाहणाऱ्या कवीच्या खोलीच्या खिडकीत एक रेव्हन (कावळ्यासारखा दिसणारा पण आकारानं थोडा मोठा पक्षी) येऊन बसतो. त्या पक्ष्याच्या ओरडण्यात कवीला, 'नेव्हरमोर' (nevermore) हा शब्द ऐकू येत राहतो. कवितेतलं वातावरण प्रेक्षकांसमोर जसंच्या तसं उभं करून, अतिशय नाट्यमय प्रकारे ब्राउननं ती सादर केली.

ही उदाहरणं काहीशी टोकाची आहेत. म्हणजे, फॅशनउद्योग आणि दृश्यकलेचा जवळचा संबंध असू शकतो हे दाखवून देण्यासाठी मी ती वेचली आहेत. एरवी, येणाऱ्या प्रत्येक नवीन फॅशनची चलती असताना, तिला स्वस्तात बाजारात आणू पाहणारे धंदेवाईकच जास्त असतात. पण हे सगळ्याच व्यवसायांबद्दल खरं असावं. रेस्तराँ व्यवसायापासून ते बांधकाम व्यवसायापर्यंत – एकीकडे लोकस्मृतीतून कधीच न पुसल्या जाणाऱ्या, कालजयी कलाकृती, तर दुसरीकडे सतत बदलणारी आणि उच्छाद मांडणारी, 'फॅडं' असं वर्गीकरण करणं सहज शक्य आहे. पण ही अल्पजीवी 'फॅडं' भूतकाळाकडे बघण्याचे संदर्भ देतात.

आपण आपल्याच घरातले जुने फोटोअल्बम काढून बघितले तर लक्षात येतं की आपण किंवा आपल्या आधीचे तथाकथित 'साधे' लोकही यापासून फारसे अलिप्त नव्हते. माझ्या आईबाबांच्या लग्नाआधीच्या फोटोंत बाबा एका स्कर्टसदृश वस्त्रात दिसतात. घालणाऱ्याने पायांची एकदम तीव्र विश्राम स्थिती घेतली तरच ती पॅन्ट आहे हे लक्षात येईल. आईही त्याच प्रकारच्या 'बेलबॉटम'मध्ये दिसते. काही फोटोंत नीतू सिंग इत्यादी नट्या घालायच्या तश्या मिडी ड्रेसमध्येही दिसते. हीच आई माझ्या लहानपणी 'छोटी सी बात'मध्ये दिसणाऱ्या, कोबीच्या गड्ड्यांच्या आकाराची फुलं असलेल्या नायलॉनच्या साड्या नेसायची आणि त्या काळी मध्यमवर्गीय बायका लगेच नाक मुरडतील अशी "बिन बाह्यांची पोलकी" घालायची (आठवा, दीप्ती नवल!). भारतीय सिनेमानं नित्यनेमानं पाश्चात्य फॅशन अंगिकारली आणि ती झिरपत झिरपत सामान्य माणसांपर्यंत पोचत राहिली. कोणत्या दशकांत कसे कपडे घालायची चलती होती हे भारतीय सिनेमातली काही गाणी बघूनही लक्षात येईल.

उदाहरणार्थ, गुरु दत्तच्या, 'कभी आर कभी पार' या गाण्यात १९५० साली जगभरात काय घालायची फॅशन होती ते दिसतं. त्यातल्या टपोरी लहान मुलानंदेखील पन्नासच्या दशकातल्या फॅशनचे नियम पाळणारे कपडे घातले आहेत. नायिकेची कमरेवर उंच बसणारी पॅन्ट आणि अंगभर असलेला, तरीही तिचा बांधा पुरेसा कमनीय आहे हे दाखवून देणारा शर्ट – १९५०च्या दशकातली खास फॅशन होती. या दशकात कमरेला घट्ट असलेले मिडीड्रेसही घातले जायचे. मिस्टर अँड मिसेस ५५ मधल्या 'जाने कहाँ मेरा जिगर गया जी' या गाण्यात नायिकेनं तसा ड्रेस घातला आहे. जॉनी वॉकरची काहीशी ढगळ, चुण्या असलेली पॅन्टही त्या दशकातल्या जागतिक फॅशनला धरूनच आहे. १९६०-१९७० या दशकात कशा प्रकारची फॅशन होती हे बघायचं असेल तर शम्मी कपूर आणि मुमताजचं 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे' बघावं. मुमताज जरी साडीत असली, तरी तिच्या मागे नाचणाऱ्या सगळ्या बायका साठच्या दशकात पाश्चात्य देशांत घातल्या जाणाऱ्या कपड्यांत दिसतात. गुडघ्यापर्यंत असलेले, बोट नेकचे रंगीबेरंगी ड्रेस घालून! मुमताजची केशरी साडी आणि ब्लाउजही त्या काळातल्या फॅशनशी सुसंगतच आहे. आशा भोसले आणि किशोर कुमारचं, "जाने जान, ढूँढता फिर रहा" असं एक (जरासं भयानक) गाणं आहे. त्यातला रणधीर कपूरचा पोशाख १९७०च्या दशकाचं प्रतिनिधित्व करतो असं म्हणता येईल. पोलका डॉट किंवा तत्सम नक्षी असलेला मोठ्या कॉलरचा शर्ट, त्यावर जॅकेट आणि गडद निळ्या रंगाच्या बेलबॉटम अशी सत्तरीची छाप होती. इथे जया बच्चननं साडी नेसल्यानं स्त्री पोषाखासाठी आपल्याला डॉन या चित्रपटातली झीनत अमान बघावी लागणार आहे. या दशकात पॉलिस्टर अधिकाधिक वापरलं जाऊ लागलं, आणि सिनेमात त्याचं प्रतिबिंब साड्यांमध्ये लगेचच दिसायला लागलं. या गाण्यातली जयाची साडी अशाच सिंथेटिक कापडाची आहे. "चकचकीत इव्हनिंग ड्रेस" या दशकात वापरले जाऊ लागले. याचं उदाहरण थोडंसं उशिरा, १९८२ मध्ये आलेल्या 'नमक हलाल'मधल्या परवीन बाबीचं घेता येईल. धातूच्या अनंत टिकल्या गुंफून हे 'सीक्वेन' ड्रेस तयार केले जायचे. 'रात बाकी' या गाण्यात परवीन बाबीनं असा ड्रेस घातलेला दिसतो. तोपर्यंत, १९६०च्या दशकातली 'बूफॉ' (डोक्यावर घरटं) जाऊन सत्तरच्या दशकातील, सरळ आणि लांब मोकळ्या केसांची 'हिप्पी' केशरचना रूढ झाली होती. यावरून पुढचं, १९८०च्या दशकातलं उदाहरण घेता येईल. काही फॅशन प्रकार लवकरात लवकर कालबाह्य व्हावे अशी 'उरलेले बघे' प्रार्थना करत असतात. अशा प्रकारचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ऐंशीच्या दशकातील 'मलेट' केशरचना होती. डेव्हिड बावी, बॉन जोव्हीसारख्या प्रसिद्ध लोकांकडून प्रेरणा घेऊन ऐंशीच्या दशकात ती आधी मिथुननं प्रसिद्ध केली आणि नव्वदी संपेपर्यंत पुरली. कपाळावर केसांचा झुपका आणि मागे काहीसे वाढवलेले केस. अक्षय कुमार, अमीर खान, शाहरुख खान, गोविंदा, संजय दत्त – सगळ्यांनी २००० उजाडेपर्यंत अशा केशरचना मिरवल्या.

ऐंशीच्या दशकातल्या केशरचनांमध्ये केसांचाच अतिरेक होता असं त्या दशकातल्या नमुन्यांकडे बघितल्यावर लक्षात येतं. शिवाय, स्त्रिया 'शोल्डरपॅड' नामक भयावह प्रकार असलेले कपडे घालू लागल्या होत्या. 'एरोबिक्स' या व्यायामप्रकाराला आणि डिस्को या नृत्यप्रकाराला लोकप्रियता मिळाल्यामुळे - टाईट्स+लिओटार्ड+हेअरबँड लावलेले अनावर केस – असं काहीसं ऐंशीच्या दशकातल्या स्त्रीचं प्रारूप होतं असं म्हणता येईल. सुदैवानं चालबाझ चित्रपटातल्या 'नाम मेरा प्रेमकली' या गाण्यात हे सगळंच असल्यानं कल्पनाशक्तीला ताण द्यावा लागणार नाही.

नव्वदच्या दशकात, आधीच्या डिस्को युगाचा चकचकीतपणा जाऊन काहीसा साधेपणा आला. चौकड्यांचा मिडी स्कर्ट-ब्लाउज आणि नाजूक, फिकट रंगांचे, लेस, सॅटिन वापरून शिवलेले ड्रेस साधारण ऐंशीच्या दशकाच्या शेवटाकडे लोकप्रिय होऊ लागले. सहज कॉलेजला घालून जाता येतील असे ए-लाईन ड्रेसही दिसू लागले. नव्वदच्या दशकातील बहुसंख्य नट्यांचं यौव्वन एकतर त्रिकोणी-चोळ्या असलेले घागरे नाहीतर मग अत्यंत सुमार स्कर्ट/फ्रॉक घालण्यात वाया गेलं. याला काही सुसह्य अपवाद म्हणजे 'आशिकी' सिनेमातली अनु अगरवाल, 'डर/राजू बन गया जेंटलमन/हम है राही प्यार के' मधली जुही चावला रंगीलामधली उर्मिला आणि 'दिल है के मानता नहीं' मधली पूजा भट.

२००० उजाडता मिनीस्कर्ट पुन्हा लोकप्रिय झाला. आणि करिझ्मा कपूरच्या सुंदर देहावर तो आपल्याला नियमितपणे बघायला मिळाला. त्या आसपास राणी मुखर्जी, प्रीती झिंटा इत्यादी नट्याही मिनीस्कर्टमध्ये दिसल्या पण करिझ्मा ज्या सहजतेनं मिनीस्कर्ट घालून गोविंदाबरोबर नाचायची, तसा सहज वावर नंतर कुणालाच जमला नाही. करिझ्मा कपूरच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये तिलाही नव्वदीच्या फॅशनचं ग्रहण लागलं होतं. पण सुदैवानं ते मिनीस्कर्टनं घालवलं. या दशकात बेलबॉटमही नव्या रूपात परत आल्या 'बूटकट' या नवीन नावानं. याच दशकात 'लो वेस्ट जीन्स' या वस्त्रप्रकाराने वात आणला होता. स्त्रिया आणि पुरुष अंतर्वस्त्र दिसावीत या हेतूने पॅन्ट कुठे बांधायची हे ठरवू लागले होते. हे सहज सोपं व्हावं म्हणून शर्टही लहान झाले होते. 'दोस्ताना' नावाच्या सिनेमात जॉन अब्राहमच्या देहावर अनेक ठिकाणी अशी जीन्स बघायला मिळते. पण तो जॉन अब्राहमचा देह आहे. त्या काळी रस्त्यावरून चालत जाताना परपुरुषाची चड्डी बघावी लागणार नाही यासाठी विशेष प्रयत्न करावे लागायचे. मध्यंतरी ती फॅशन आता परत येणार आहे असं कुठेतरी वाचलं तेव्हा स्वतःची काळजी वाटली होती.

२०१०-२०२०मध्ये बायकांचे कपडे अधिकाधिक 'अघळपघळ' होऊ लागले. 'लेगिंग' आणि 'स्किनी जीन्स' या वस्त्रप्रकारांनी उच्छाद मांडला होता. पण यादरम्यान भारतात पारंपरिक भारतीय, सुती कपड्यांचे अनेक ब्रँड येऊ लागले आणि ते सामान्य भारतीयांना परवडूही लागले. त्या काळात भारताबाहेरून भारतात आल्यावर, तरुण मुलींचे कपडे बघून – "हे जे काही आहे ते बाहेरच्या देशांपेक्षा जास्त फॅशनेबल वाटतंय" – असं वाटायचं. इथून कपडे विकत घेऊन भारताबाहेर गेलं की तिथल्या लोकांकडूनही हेच ऐकायला मिळायचं. या दशकातल्या चित्रपटांमध्ये या दोन्हींचे 'फ्युजन' बघायला मिळते. स्किनी जीन्स आणि वेगेवेगळ्या कुडत्यांचे प्रकार मुली घालू लागल्या, आणि अर्थात सिनेमातही हे दिसू लागलं. २००९च्या 'लव्ह आज कल'मधल्या दीपिकानं येणाऱ्या दशकाची काहीशी झलक दाखवली होतीच पण पुढे 'शुद्ध देसी रोमान्स', 'पिकू' सारख्या सिनेमांतून, भारतीय कापडांपासून तयार केलेले पाश्चात्य वाटणारे कपडे दिसू लागले. २०१६ साली आलेल्या 'ए दिल है मुश्किल' नावाच्या अत्यंत कंटाळवाण्या सिनेमातल्या माझ्या एका अत्यंत लाडक्या गाण्यात या 'फ्युजन' फॅशनचा सुंदर अविष्कार दिसतो. प्रियकराशी ब्रेकअप केल्यानंतर काय काय केलं, ते ब्रेक-अप कसं हाताळलं याची कहाणी सांगणारं 'ब्रेक अप साँग'.

Piku

या दशकात असं ‘फॅशन फ्युजन’ करणाऱ्या आणि पुरुषांना फाट्यावर मारणाऱ्या नायिका दिसू लागल्या. उदाहरणार्थ, क्वीन सिनेमातली लग्न रद्द झाल्यावर स्वतःच्या हनिमूनला एकटी जाणारी 'रानी'. वडिलांचा सांभाळ करण्यासाठी म्हणून एकटी राहणारी 'पिकू' – या सगळ्या व्यक्तिरेखा बघता भारतीय आणि पाश्चात्य कपड्यांचा हा मेळ साठच्या दशकातल्या मिनीस्कर्टसारखाच वाटतो. शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशांत जा-ये करणाऱ्या अनेक मुली या दशकात दिसू लागल्या. मीदेखील याच पिढीतली. ब्रेकअप, लाँग डिस्टन्स, कमिटमेंट फोबिया वगैरे शब्द आमच्या रोजच्या वापरात येऊ लागले. एकाच माणसावर एकदम देवदास टाईप उत्कट प्रेम करायची ऊर्जा पंचविशीच्या आतच संपून गेली! त्यामुळेच कदाचित ते दशक आणि तसे कपडे माझ्यापुरते कायम फॅशनमध्ये राहतील.

त्या त्या काळाचे चष्मे लावून या कपड्यांकडे बघितलं तर आपला जन्मही झाला नव्हता त्या काळाबद्दलही कधीकधी नॉस्टॅल्जिया वाटायला लागतो. आणि बदलणाऱ्या फॅशनमधूनही काही कालजयी पेहराव सापडतात. नूतनबरोबर कुतुबमिनारच्या पायऱ्या उतरत येणाऱ्या देवानंदला कधीच त्या एकाच काळात बंदिस्त करून ठेवता येणार नाही. 'आज फिर जीने की तमन्ना है' म्हणत फिकट हिरवी सॅटिनची साडी नेसून उंटावरून जाणारी वहिदा, उंटावरून उतरून आजच्या एखाद्या पार्टीत सहज जाऊ शकेल. 'अच्छा जी मै हारी'मधल्या मधुबालाची ब्रूच लावलेली साडी किंवा 'ब्रेकफस्ट ॲट टिफनीज' मधल्या ऑड्री हेपबर्नचा तो प्रसिद्ध काळा ड्रेस - या कधीच जुन्या न होणाऱ्या गोष्टी आहेत. कोणत्यातरी थंड हवेच्या ठिकाणी खांद्यावर स्वेटर टाकून त्याच्या बाह्या पुढे बांधणे हादेखील एक कालजयी पोशाख असावा. कारण देवानंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, शत्रुघन सिन्हा, ऋषी कपूर, शाहरुख खान, रणबीर कपूर - यांपैकी कुणीही शोधल्यास अशा पेहरावात सापडू शकेल. अशा संपूर्ण कपडे घालून स्वेटर लटकवलेल्या पुरुषांबरोबर त्याच थंड हवेच्या प्रदेशांत वावरणाऱ्या शिफॉन साडीतल्या स्त्रियाही (दुर्दैवानं) कालजयी आहेत. अलीकडे सामान्य स्त्रियादेखील स्वित्झरलंड किंवा तत्सम युरोपीय देशांत जाऊन अशा साड्या नेसून रीळ बनवतात. अशी रिळं बनवता येतील इतकी सुबत्ता, वेळ आणि सुडौल बांधा मला कधीच मिळू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फॅशन हा फार फार आवडीचा विषय असून मी ही स्वत:ला फॅशनिस्टा समजतो.
त्यामुळे लेख फार फार आवडलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फॅशनच्या बाबतीत मी अत्यंत गयीगुजरी आहे. मला छानछोकीचा मनापासून कंटाळा आहे. तरीही लेख वाचायला मजा आली. आणि शेवटच्या वाक्यातली उत्कट भावना मनाला भिडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तो लाल-निळ्या-पिवळ्या-पांढऱ्या चौकटींचा ड्रेस भयंकर आहे, इतकीच धारणा लेख वाचूनपेक्षासुद्धा सोबतची चित्रे पाहून झाली.

आणि, चित्रांत दाखवलेल्या वेगवेगळ्या ड्रेसांबद्दलच बोलायचे, तर, I wouldn’t be seen dead in a ditch wearing any one of them to please a dying grandmother, and not just because they all happen to be feminine dresses.

बाकी, फॅशन हा एकंदरीत स्वतःची अक्कल गहाण टाकून प्रवाहपतित बनण्यातला प्रकार आहे. केवळ बाकीचे करतात, म्हणून आपणही तस्सेच करायचे! यात फायदा फक्त एका एंटिटीचा होतो – या तथाकथित फॅशन डिझायनरांचा. परंतु, दुनिया झुकती है, वगैरे वगैरे.

परंतु, तारुण्यात अक्कल अर्थात कमीच असते (किंवा नसते म्हटले तरी चालेल), त्यामुळे फॅशनच्या आहारी जाण्याकडे कल असतो. (आणि, फॅशन जितकी atrocious, तितकी ती अधिक आकर्षक, असा काही rule of thumb असावा. आता, लेखात निर्देश केलेली बेलबॉटमचीच फॅशन घ्या. काय ते खूळ होते, परमेश्वरास ठाऊक! रस्ते झाडीत जायला सोयिस्कर, याहून अधिक काहीही merit त्यात नव्हते. आणि, in retrospect, अतिशय भयंकर दिसणारा प्रकार होता तो! (वास्तविक, हे तांत्रिकदृष्ट्या आमच्या तारुण्यातले खूळ नव्हे. शाळकरी वयात होतो आम्ही तेव्हा. आणि, आम्ही कॉलेजात पोहोचेपर्यंत हे खूळ बाजारातून गायबसुद्धा झालेले होते. परंतु, वयाने थोड्या मोठ्या अशा कझिनावळीत या प्रकाराचे प्रस्थ तेव्हा पुष्कळ पाहिलेले आहे. आणि, त्यांच्याच अनुकरणाने म्हणा किंवा influenceखाली म्हणा, किंवा आणखीही कशामुळे म्हणा, आम्हीही हा प्रकार तेव्हा पुष्कळ केलेला आहे. Craze, अजून काय! आणि, peer pressure हा अत्यंत वाईट प्रकार असतोच.) पण, जसजसे वय वाढते, नि जसजशी maturity येऊ लागते, तसतसे या असल्या गोष्टींचे आकर्षण हळूहळू कमी होत असावे. (विशेषतः, मला वाटते, त्याचे पैसे आपल्या स्वतःच्या (as opposed to आईबापांच्या) खिशातून जात असतील, तर.) असो.

बाकी, चित्रविचित्र फॅशनी, बेलबॉटम, वगैरेंचा ज़िक्र झालाच आहे, तर आणखी एका जुन्या (आणि त्याहूनही चमत्कारिक) फॅशनीकडे अंगुलिनिर्देश केल्यावाचून राहवत नाही: (news)paper print. बोले तो, वर्तमानपत्र जर कागदाऐवजी कापडावर छापले, नि त्या कापडाचे जर कपडे शिवले, तर जे काय होईल, तो प्रकार. Now, why on earth anybody would want to do that, is, honestly, beyond me, परंतु, असाही एक प्रकार अस्तित्वात होता खरा. ही नक्की कधीची फॅशन असावी, हे सांगणे कठीण आहे, परंतु, आमच्या लहानपणी (१९७०च्या दशकात) तसली कापडे दुकानांत पाहिलेली आहेत. त्या तसल्या कापडांचे प्रत्यक्षात कपडे शिवून ते घालून हिंडणारा जिवंत मनुष्य आजतागायत माझ्या पाहण्यात आलेला नाही, परंतु, ज्या अर्थी तसली कापडे बाजारात होती, त्या अर्थी, कोणी ना कोणी त्यांचे कपडे शिवून घालीत असले पाहिजे. (आणि, नाही! त्या मूर्ख वयातसुद्धा असले काहीतरी भयंकर घालण्याचा विचार माझ्या मनाला शिवला नसता.)

(तसेच पाहायला गेले, तर बाटिकचीही एके काळी क्रेझ होती. But at least that made sense somewhat, and it was not exactly atrocious; just somewhat different.) असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न.बा,
तुमचे फॅशनबद्दलचे आकलन तद्दन पुरुषी आहे असं म्हणून मी खाली बसणार नाही. मला पुढेही बोलायचं आहे.
तुम्हाला असं वाटतं की इतर लोक अमुक एका गोष्टीच्या आहारी जातात. पण तुम्ही शरीरावर जे कपडे घालता ते कोणत्या ना कोणत्या ट्रेंडमध्ये बसणारेच असतात.
उदाहरणार्थ, रोज काय घालायचं हा विचार करायला नको म्हणून स्टीव्ह जॉब्सनं एक डझन काळे टर्टलनेक टीशर्ट घेतले (असं आपल्या ओळखीतल्या कुणी केलं असतं तर तो कपडे धुवत नाही म्हणून त्याला वाळीत टाकलं असतं. पण स्टीव्ह जॉब्स तसं करू लागला म्हणून सगळेच तसं करू लागले.) त्यामुळे उद्या तुम्ही स्वयंप्रेरणेने जरी काळा टर्टलनेक घातला तरी तुम्ही जॉब्सचे अनुयायी आहात असा समज कोणीतरी करून घेईलच.

मी दर उन्हाळ्यात माझ्या पोरासाठी फुले मंडईजवळच्या शालगर नामक दुकानातून उन्हाळी बंड्या घेते. मला त्या पोशाखाचा इतिहास वगैरे काही माहित नव्हता. मुलाला घामोळं येऊ नये म्हणून सुती कपडे असावेत इतकाच उद्देश. पण एकदा उन्हाळ्यात माझ्या सासरी गेलो असता, माझे एक संघिष्ट चुलत सासरे माझ्या मुलाकडे बघून म्हणाले, "आता फक्त एक काठी द्या हातात आणि घेऊन जा संघात याला!". माझी साधी-सुधी-सुती निवड पर्सेप्शनवाईज इतकी जहाल निघेल असं मला कधीच वाटलं नव्हतं.

तसंच हल्ली हॅन्डलूम कापडाचे कपडे घालणाऱ्या, पांढरे केस न लपवता मिरवणाऱ्या, उदारमतवादी बायकांचे जथ्थे पुण्यात दिसतात. त्यांपैकी प्रत्येकीनं हा पेहराव आणि विचारधारा आत्मप्रेरणेतून निवडलेली असते. तरीही या अशा पेहरावाला हल्ली "समाजवादी बायकांची फॅशन" म्हणायची पद्धत आहे. पूर्वी युपीएच्या काळात काही गुन्हे घडले की ठराविक वर्गातल्या बायका मेणबत्त्या घेऊन यायच्या. त्यांनाही, "बिंदीवाल्या" बायका म्हणून हिणवलं जात असे.

त्याचप्रमाणे, पुण्यातील कोथरूडमध्ये असलेल्या किमया नावाच्या हॉटेलात कधी वीकडेला सकाळी दहा वाजता गेलात तर खूप सारे आजोबे दिसतात. त्यांनी सगळ्यांनी रंगीबेरंगी आडव्या पट्ट्यांचे शर्ट घातलेले असतात. आता ते आजोबे डोसा खाताखाता, "काय ही हल्लीची पोरं, फाटक्या जीन घालून फिरतात! आणि पोरीतर कहर! सिगरेटही ओढतात!" अशी चर्चा करत असताना, त्या सगळ्यांच्या शर्टांवर आणि शर्करावर्धक डोश्यांवर अशाच प्रकारची टिप्पणी केली जाऊ शकते.

मी आजकाल नवऱ्याला आडव्या पट्ट्यांचे शर्ट घालू देत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण तुम्ही शरीरावर जे कपडे घालता ते कोणत्या ना कोणत्या ट्रेंडमध्ये बसणारेच असतात.

ते महत्त्वाचे नाही. (म्हणजे, ते व्हायचेच. बाजारात जे आहे, त्यापैकीच तुम्ही विकत घेणार. स्वतः कापड विणून, त्यावर काहीतरी रंग/डिझाइन रंगवून (वा न रंगवून), त्याचे कपडे स्वतः आपल्याला हवे तसे शिवणारे लोक फार कमी असावेत. आणि, फार कशाला, या हिशेबाने, मुळात कपडे घालणे हीसुद्धा एक फॅशन म्हणता येईल. सगळेच घालतात, म्हटल्यावर…)

परंतु, केवळ ट्रेंडमध्ये बसणे doth not a fashion make. Intent महत्त्वाचा आहे. Intentशिवाय फॅशन होऊ शकत नाही. तुम्ही जोवर ‘ट्रेंडचे अनुकरण करायचे’ या विशिष्ट उद्दिष्टानिशी ट्रेंडचे अनुकरण करीत नाही, तोवर ती ‘फॅशन’ ठरत नाही. (उलटपक्षी, तुम्ही जर ट्रेंडपेक्षा वेगळे असे जर काही केले, आणि तुमचे अनुकरण करण्याच्या विशिष्ट उद्दिष्टाने लोक जर तुमचे अनुकरण करू लागले, तर (आणि तरच) ती फॅशन. एक उदाहरण देऊन हे स्पष्ट करता येईल. समजा, उद्या मला हुक्की आली, की कपडे काय, सगळेच घालतात; आपण काहीतरी वेगळे करावे, म्हणून. म्हणून मी कपडे न घालताच सगळीकडे हिंडू लागलो. या परिस्थितीत काय(काय) होऊ शकते? शक्यता क्र. १ तथा २: लोक माझ्याकडे ‘वेडा मनुष्य आहे’ म्हणून दुर्लक्ष करू शकतात. किंवा, मला रस्त्यात दगड मारू शकतात. या दोन्ही शक्यता (कितीही मोठ्या असल्या, तरीही) प्रस्तुत अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या नाहीत; सबब, त्या सोडून देऊ. आता, शक्यता क्र. ३: (निदान काही) लोक म्हणतात, की ‘अरे वा! (चक्क) ‘न’बा कपडे न घालता रस्त्यातून हिंडत आहेत! आपण त्यांचे (बिनडोकपणे) अनुकरण केलेच पाहिजे.’ आणि मग एके दिवशी अचानक डझनभर लोक भर लक्ष्मीरोडवरून नागडे हिंडताना आढळू लागतात, दुसऱ्या दिवशी पाच डझन, तिसऱ्या दिवशी लक्ष्मीरोडबरोबरच मेनस्ट्रीटवरसुद्धा, आणि असे करत करत कारवाँ बनत जातो, आणि अशा रीतीने पुण्याची (आणि कालवशात् अखिल विश्वाची) न्यूडिस्ट कॉलनी बनून जाते. ही खरी फॅशन! (थोडक्यात काय, ‘घटं भिंद्यात् पटं छिंद्यात् कुर्यात् वा रासभध्वनिं। येन केन प्रकारेण फॅशनिस्टा पुरुषः भवेत्॥’ नागडे हिंडा, नाहीतर ‘युरेका! युरेका!’ असा ध्वनि करीत रस्त्यातून धावत सुटा. फक्त, अनुकरणकर्ते तेवढे पाहिजेत.) परंतु, याउलट, शक्यता क्र. ४: लोक मला रस्त्यातून विवस्त्रावस्थेत हिंडताना पाहून त्यापासून प्रेरणा घेऊन म्हणा, किंवा कर्मधर्मसंयोगाने अशीच काही कल्पना अथवा हुक्की अनेकांच्या डोक्यात एकसमयावच्छेदेकरून आल्यामुळे म्हणा, परंतु, दिगंबरावस्थेत काही दम आहे, काही फायदा आहे, अशी काही धारणा अनेकांच्या ठायी निर्माण होऊन ते सर्वजण स्वखुशीने तथा स्वयंप्रेरणेने (हे महत्त्वाचे आहे!) जळीस्थळीकाष्ठीपाषाणी अुल्लिंगावस्थेत हिंडू लागतात. ही फॅशन म्हणता येईल काय? तर, माझ्या मते, नाही! हा ट्रेंड अवश्य म्हणता येईल, परंतु फॅशन नव्हे. कारण, यामागे ‘न’बांची प्रेरणा असेलही, किंवा नसेलही, परंतु, या परिस्थितीत हे जे लोक करीत आहेत, ते स्वेच्छेने, स्वयंप्रेरणेने, तथा स्वतःच्या आवडीने करीत आहेत. ‘न’बांचे म्हणा, किंवा चालू ट्रेंडचे म्हणा, निव्वळ अनुकरणासाठी अनुकरण करणे, हे त्यामागील विशिष्ट उद्दिष्ट नाही. सबब, ही ‘फॅशन’ खाशी नव्हे! असो. हे उदाहरण येथेच थांबवू या. (हुश्श!))

उदाहरणार्थ, रोज काय घालायचं हा विचार करायला नको म्हणून स्टीव्ह जॉब्सनं एक डझन काळे टर्टलनेक टीशर्ट घेतले (असं आपल्या ओळखीतल्या कुणी केलं असतं तर तो कपडे धुवत नाही म्हणून त्याला वाळीत टाकलं असतं. पण स्टीव्ह जॉब्स तसं करू लागला म्हणून सगळेच तसं करू लागले.) त्यामुळे उद्या तुम्ही स्वयंप्रेरणेने जरी काळा टर्टलनेक घातला तरी तुम्ही जॉब्सचे अनुयायी आहात असा समज कोणीतरी करून घेईलच.

हे म्हणजे, माझ्या घरातल्या मंगलकार्याच्या आमंत्रणपत्रिकेवर स्वस्तिक सापडते, यावरून मी हिटलरचा अनुयायी आहे, असा समज कोणीतरी करून घेण्याइतके मूर्खपणाचे आहे! (हिटलर हिंदू संस्कृतीचा अनुयायी होता, असा निष्कर्ष कदाचित त्याहूनही बहारदार ठरेल. फार फार तर, हिटलर हे सर्व बिनडोकपणे करीत होता, हे लक्षात घेता, हिटलर स्वस्तिकाच्या फॅशनीचे अनुकरण करीत होता, इतकेच काय ते (म्हणता आलेच, तर) म्हणता येईल. (परंतु, त्याबद्दलही खरे तर साशंक आहे.) असो.)

सांगण्याचा मतलब, लोक काय समजतात (लोक माझ्यावर कोणते उद्दिष्ट लादतात), हे महत्त्वाचे नाही; माझे उद्दिष्ट प्रत्यक्षात काय होते, is all that really matters.

दुसरी गोष्ट अशीही पाहा, की ज्या अर्थी स्टीव्ह जॉब्स घाऊक भावात काळे टर्टलनेक टीशर्ट विकत घेऊ शकला, त्या अर्थी, कोणीतरी बाजारात काळे टर्टलनेक टीशर्ट घाऊक भावात अगोदरच विकत असले पाहिजे. (हे काळे टर्टलनेक टीशर्ट मेड-टू-ऑर्डर खासे नसावेत; चूभूद्याघ्या.) मग स्टीव्ह जॉब्सने ते विकत घेऊन जगावेगळे असे नेमके काय केले? थोडक्यात, स्टीव्ह जॉब्स हा येथे फॅशनीचा कारक नसून, एका चालू ट्रेंडचा म्हणा किंवा फॅशनीचा म्हणा, अनुयायी होता, असे म्हणता येईल फार फार तर, नव्हे काय?

(थोडक्यात काय, तुमच्या मुलाला घामोळे होऊ नये, म्हणून जर सुती कपडे घ्यायचे असतील, तर अवश्य घ्यावेत. लोक त्यावरून त्याला संघी समजतील, किंवा कसे, याची अजिबात पर्वा करू नये. लोक काय, काहीबाही समज तसेही करून घेत असतातच; त्याला कितीसा भाव द्यायचा?)

मी आजकाल नवऱ्याला आडव्या पट्ट्यांचे शर्ट घालू देत नाही.

हा तुम्ही आणि तुमचा नवरा यांच्यातील वैयक्तिक प्रश्न असल्याकारणाने, आपला पास! (काय ते, Consenting adults, वगैरे.)

बाकी चालू द्या.

——————————

तळटीप:

हा शब्द सावरकरांकडून साभार, आणि म्हणूनच, सावरकरी पद्धतीने लिहिलेला आहे. मात्र, वरील विवेचनानुसार, हा शब्द सावरकरांपासून प्रेरणा घेऊन तथा सावरकरी पद्धतीने जरी लिहिलेला असला, तरीसुद्धा, येथे मी सावरकरी फॅशनचे अनुकरण करीत आहे, असे (निदान मला तरी) वाटत नाही. कारण, एक तर प्रेरणा सावरकरांपासूनची जरी असली, तरी मी जिथेतिथे असे शब्द अशा पद्धतीने लिहीत सुटत नाही. दुसरे म्हणजे — आणि, हे महत्त्वाचे आहे — येथे मी हे असे बुद्ध्याचि लिहिले आहे; अंधतेने नव्हे. सावरकरांचे अनुकरण करण्याचे यामागे कोणतेही अुद्दिष्ट (अिरादा) नाही (पाहा: वरील शक्यता क्र. ४.); किंबहुना, सावरकरांच्या अेक्सपेन्सावर (expense) येथे मी फन (fun) करून घेत आहे, असाही दावा मला करता येईल. (तिसराही एक मुद्दा या निमित्ताने लक्षात येतो. एखाद्या गोष्टीचे विडंबन हे त्या फॅशनीचे अनुकरण म्हणता यावे काय? उदाहरणादाखल, ‘झेंडूची फुले’मध्ये अत्र्यांनी ‘रविकिरणमंडळा’च्या फॅशनीचे अनुकरण केले, असे म्हणणे कितपत सयुक्तिक आहे? मुद्दा लक्षात आला असेल, अशी आशा आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला जे म्हणायचं आहे ते मला म्हणता आलेलं नाही हे खरं. पण आता खूप उशीर झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"त्याचप्रमाणे, पुण्यातील कोथरूडमध्ये असलेल्या किमया नावाच्या हॉटेलात कधी वीकडेला सकाळी दहा वाजता गेलात तर खूप सारे आजोबे दिसतात. त्यांनी सगळ्यांनी रंगीबेरंगी आडव्या पट्ट्यांचे शर्ट घातलेले असतात. आता ते आजोबे डोसा खाताखाता, "काय ही हल्लीची पोरं, फाटक्या जीन घालून फिरतात! आणि पोरीतर कहर! सिगरेटही ओढतात!"

हे ननम्रपणे नमूद करू इच्छितो की
किमयात वीकडेला सकाळी तिथे असणाऱ्या नानाविध आजोबांचे चर्चेचे विषय नानाविध असतात.
शिवाय तिथे त्यावेळी फक्त आजोबे नसतात.झोळीवाले,दाढीवाले, वीस वर्षापूर्वीचे क्रांती करू इच्छिणारे उजवे डावे कलाकार लोक, तसेच कॉरोपोरेटे लोकही तिथे पोहे उपमे उत्तप्पे नाखुशीने हादडत असतात. शिवाय तिथे साठीतील तेजस्वी (उदा:राहुल सोलापूरकर) ध्येयवादी राष्ट्रभक्त तरुणही असतात. आणि कॉलेजातील निवृत्त मास्तर लोक.

उगा त्यांच्यावर उडू नका.
सकाळी दहाच्या किमयाची बदनामी थांबवा.

किमया भिकार आहे.
पण ते रुपाली नाही.
बाकी चालुद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झोळीवाले,दाढीवाले, वीस वर्षापूर्वीचे क्रांती करू इच्छिणारे उजवे डावे कलाकार लोक, तसेच कॉरोपोरेटे लोकही तिथे पोहे उपमे उत्तप्पे नाखुशीने हादडत असतात

तुम्हाला (आणि कदाचित नाबांनादेखील) जसा क्रेप, जॉर्जेट आणि शिफॉनमधला फरक सांगता येणार नाही, तसाच आम्हाला या झोळीवाल्या, दाढीवाल्या, एक्स क्रांतिकारी, डाव्या, सेमीउजव्या/सेमीडाव्या लोकांमधला फरक कळत नाही. पांढरे केस आणि चट्टेरीपट्टेरी टीशर्ट -पुण्यात इतकेच आजोबा-स्पॉटिंगचे निकष आहेत.

चर्चेतून या जगात काही tangible बदल घडत नसेल तर इकॉनॉमी, महेशकाळे, सिंगलमाल्ट, ए२ दूध, सार्त्रकाम्यूगोदार काय किंवा कुणाची फाटकी जीनपॅन्ट काय एकच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या सगळ्या कपड्यांपैकी मला तोच चौकडीचा झगा आवडला. 'न'बा, लोकांच्या कपड्यांबद्दल एवढं उखडू नये. ते संघिष्ट दिसतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(किंवा, हिंदीत, ढेंचूं. मराठीत काय, ते दुर्दैवाने (मराठी असूनही) लक्षात येत नाही.)

बाकी तुमचेही चालू द्याच!

——————————

यावरून गाण्याकरिता कल्पनाबीज सुचले. ‘अंग्रेज़ी में कहते हैं हीऽहॉऽ, हिंदी में बोले ढेंचूं ढेंचूं…’ होतकरूंनी कल्पनाविस्तार करून गानपंक्ती पूर्ण कराव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> अशी रिळं बनवता येतील इतकी सुबत्ता, वेळ आणि सुडौल बांधा मला कधीच मिळू नये 

इतकी वर्षं मराठी बोलत असूनही अशा प्रकारच्या वाक्याविषयी काय भूमिका घ्यावी हे मला नीट समजलेलं नाही. सुबत्ता स्त्रीलिंगी आहे, पण वेळ आणि (सुडोल) बांधा पुल्लिंगी आहेत. त्यामुळे ‘इतकी’ किंचित का होईना खटकतं. पण ‘इतकी सुबत्ता, इतका वेळ आणि इतका सुडोल बांधा’ असं लिहिणं अर्थात शक्य नाही. मी ‘इतकी’ ऐवजी ‘इतक्या प्रमाणात’ असं लिहून समस्येला बगल दिली असती. भावना माझ्यापर्यंतही पोहोचल्या, पण असे प्रश्न राहतातच.

> इतक्या तरल कलाकृतीचं इतकं मठ्ठ, पुरुषी आणि हॉलीवूडी स्पष्टीकरण …

त्याने तुम्हाला बनवलं. त्याची मूळ कलात्मक प्रेरणा व्यामिश्रवजा संदिग्ध किंवा संदिग्धवजा व्यामिश्रच असणार. पण तरलता हा पुरुषांचा प्रांत नव्हे हा गैरसमज तसाच टिकून राहावा याकरिता आम्ही पुरुष अधूनमधून स्त्रियांची दिशाभूल करतो.

----

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

माझं मराठी व्याकरण कच्चंच आहे. पण तरी मला "इतक्या प्रमाणात" हा प्रयोग खटकतो.

त्याची मूळ कलात्मक प्रेरणा व्यामिश्रवजा संदिग्ध किंवा संदिग्धवजा व्यामिश्रच असणार. पण तरलता हा पुरुषांचा प्रांत नव्हे हा गैरसमज तसाच टिकून राहावा याकरिता आम्ही पुरुष अधूनमधून स्त्रियांची दिशाभूल करतो.

Yeah Right!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> अशी रिळं बनवता येतील इतकी सुबत्ता, वेळ आणि सुडौल बांधा मला कधीच मिळू नये
इतकी वर्षं मराठी बोलत असूनही अशा प्रकारच्या वाक्याविषयी काय भूमिका घ्यावी हे मला नीट समजलेलं नाही. सुबत्ता स्त्रीलिंगी आहे, पण वेळ आणि (सुडोल) बांधा पुल्लिंगी आहेत. त्यामुळे ‘इतकी’ किंचित का होईना खटकतं. पण ‘इतकी सुबत्ता, इतका वेळ आणि इतका सुडोल बांधा’ असं लिहिणं अर्थात शक्य नाही. मी ‘इतकी’ ऐवजी ‘इतक्या प्रमाणात’ असं लिहून समस्येला बगल दिली असती. भावना माझ्यापर्यंतही पोहोचल्या, पण असे प्रश्न राहतातच.

चांगला प्रश्न आहे.

या प्रश्नाचे निश्चित उत्तर मलाही ठाऊक नाही, परंतु, माझ्या परीने माझ्यापुरता हा प्रश्न सोडविण्याकरिता मी जो तोडगा वापरतो, तो येणेप्रमाणे:

विशेषणानंतर सर्वात पहिले जे कोणते (विशेष्य) नाम येईल, त्याच्या लिंगाप्रमाणे विशेषण योजावे. त्यानंतर मग त्यापुढील उर्वरित तमाम (विशेष्य) नामे ही भले चौऱ्याऐशी लक्ष लिंगांच्या फेऱ्यातून जरी गेली, तरी त्याकडे अजिबात लक्ष देऊ नये. (त्या हिशेबाने, लेखिकेची वाक्यरचना ठीक वाटते.)

मात्र, या तमाम नामावलीच्या नंतर एखादे क्रियापद जर आले, आणि (वाक्याच्या प्रयोगावर अवलंबून) त्या नामांप्रमाणे त्या क्रियापदाचे लिंग बेतण्याची जर वेळ आली, तर मात्र नामावलीपैकी क्रियापदाच्या अगोदरच्या सर्वात शेवटच्या नामाप्रमाणे क्रियापदाचे लिंग योजावे. (प्रस्तुत वाक्यात अशी वेळ येत नाही, परंतु कदाचित एक वेगळे उदाहरण पुढीलप्रमाणे घेता येईल: ‘अशी रिळं बनवता येतील इतकी सुबत्ता, वेळ आणि सुडौल बांधा मला कधीतरी मिळावा.’ यात विशेषण आणि क्रियापद यांच्या लिंगांचा ताळमेळ बसत नाही खरा, परंतु, that is the least of all possible evils in this case.)

(अर्थात, हा माझा तोडगा आहे. कितपत बरोबर आहे, याबद्दल तज्ज्ञांच्या मतांच्या प्रतीक्षेत आहे; परंतु, Works for me!)

पण तरलता हा पुरुषांचा प्रांत नव्हे हा गैरसमज तसाच टिकून राहावा याकरिता आम्ही पुरुष अधूनमधून स्त्रियांची दिशाभूल करतो.

अं… दिशाभूल होण्याकरिता प्रथम दिशा असावी लागते, ही बाब आपण जमेस धरली आहेत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फॅशन एक industri आहे तो एक व्यवसाय .

विविध प्रकारे जाहिरात करून, प्रसार माध्यम वापरून त्याचा प्रसार होतो.
बळी पडणारे बळी पडतात.
पण फॅशनेबल कपडे वापरल्या मुळे ना सौंदर्य वाढत,ना फॅशनेबल कपडे घातलेल्या व्यक्ती ची किंमत वाढत.

बिल गेट्स धोतर आणि कुर्ता आणि वरती पगडी बांधून गेला तरी त्याची किंमत , मान कुठेच कमी होणार नाही.

पण बाकी कोणताही कर्तुत्व नसणारा व्यक्ती जगातील सर्वात महागडे फॅशनेबल कपडे परिधान करून गेला तरी त्याची किंमत एक पैशाने न पण वाढणार नाही.
कर्तुत्व महत्वाचे आहे.
सौंदर्य हे नैसर्गिक च उत्तम वाटते.
ते लाख लोकात उठून पण दिसते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सौंदर्य हे नैसर्गिक च उत्तम वाटते.
ते लाख लोकात उठून पण दिसते

आता नैसर्गिकरित्या नागवे फिरावे का? लाख लोकांत उठून दिसेल याबद्दल मात्र सहमत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

लाख लोकांत उठून दिसेल याबद्दल मात्र सहमत!

लाख लोकांत नक्की काय उठून दिसेल, हा प्रश्न प्रस्तुत धागाविषयाकरिता अवांतर असल्याकारणाने (तथा सभ्यतासंकोचभयास्तव) तूर्तास विचारीत नाही.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्याशन करने हे काही वेळा चांगलें असू शकते पण नेहमी च तसे नसू शकते

चांगले दिसणारे कापडे घालने हे चांगले आहे पण ते कापडे खुप महाग असु नये .

म्हनुन केस वाढऊन देवानन्द होण्या पेक्षा बुद्धी वाढऊन विवेकानन्द व्हावे

असे आमचे सर सांगितले होते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फॅशन फक्त कपड्यांची नसते.

कपडे,दागिने ,सौंदर्य प्रसाधन,शरीराचा आकार,शरीराचे वजन.

बोलत असलेली भाषा,करत असलेले भोजन,वापरत असलेल्या वस्तू ह्या सर्व फॅशन मध्येच येतात

मी बाकी लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे वेगळा आहे है दाखवण्यासाठी पहेराव,आहार,बोलणे, आधुनिक वस्तू बाकी लोकांपेक्षा वेगळ्या पद्धत नी वापरण्याचं कृती .
म्हणजे
लोक नागडी फिरत असतील तर मॉडर्न व्यक्ती कपडे घालून फिरतो.

लोक कपडे घालून फिरत असतील तर आधुनिक समजणारा व्यक्ती नागडा फिरती आणि त्याला मॉडर्न जीवन शैली समजतो.

कोणत्या ही मॉडर्न म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या.
पेहराव.
आहार पद्धती.
विचार श्रेणी.
इत्यादी इत्यादी.
ह्याला हे मॉडर्न उच्च दर्जा च आहे ह्याचा बिलकुल शास्त्रीय पुरावा नाही

भर उन्हाळ्यात फिट जीन्स पँट खालून खाज खूजली निर्माण करणारा पेहराव आधुनिक होवूच शकत नाही.

थंडी चे दिवस आहेत आणि .
शॉर्ट कपडे खालून जो मिरवत आहे तो मूर्ख आहे त्याला मॉडर्न मानव म्हणता च येत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फॅशन फक्त कपड्यांची नसते.

>>कपडे,दागिने ,सौंदर्य प्रसाधन,शरीराचा आकार,शरीराचे वजन.

बोलत असलेली भाषा,करत असलेले भोजन,वापरत असलेल्या वस्तू ह्या सर्व फॅशन मध्येच येतात

मी बाकी लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे वेगळा आहे है दाखवण्यासाठी पहेराव,आहार,बोलणे, आधुनिक वस्तू बाकी लोकांपेक्षा वेगळ्या पद्धत नी वापरण्याचं कृती

सहमत आहे. आपल्याकडे लोकांचं लक्ष जावं म्हणून बाह्यरूप आकर्षक ठेवणं ही मानवाची अंतःप्रेरणा आहे असंही म्हणता येईल.
पण माणूस यासाठी बुद्धीचाही वापर करतो. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असं दाखवण्यासाठी व्यासंग, संगीत, कला, स्वयंपाक अशाही गोष्टींचा उपयोग करतात.
चांगले कपडे घातल्यानं लोकांवर छाप पडते तसंच बहुश्रुत असल्यानेही पडते.

यावर तुमचं काय म्हणणं आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी बाकी लोकांपेक्षा वेगळा आहे हे दाखवणे ,समजणे ही माणसाची वृत्ती आहे.

मानव आहेत म्हणजे त्यांच्या शरीराची ठेवण,मेंदू ची क्षमता, शारीरिक क्षमता जवळ जवळ एक सारखीच असते.
पण मी बाकी लोकांपेक्षा वेगळा आहे श्रेष्ठ आहे ही भावना प्रतेक व्यक्ती मध्ये असते.
आणि त्या पेक्षा ती दाखवण्याची खुमखुमी खूप असते.

मार्केटिंग करणाऱ्या लोकांनी माणसाच्या ह्याच भावनेचा उपयोग करून व्यवसाय उभे केले आहेत.
विविध क्षेत्रात .
त्यांना फक्त पैसे कमवायचे असतात.त्यांचे उद्दिष्ट अगदी साफ असते.

आणि गमंत म्हणजे सौंदर्य ची परिमाणं हजारो वर्षापासून एकसारखीच आहेत त्या मध्ये बदल झालेला नाही.

पुरुष दणकट असावा ,पोट नसावे दंड ,छाती भरदार असावी .
हेच मोजमाप आहे आणि म्हणून पुरुषांसाठी जॅकेट ची जास्त फॅशन आहे .
जॅकेट मुळे शारीरिक दुबळे पण झाकले जाते.
स्त्री ही नाजूक च असावी असे मोजमाप आहे म्हणून.
हजारो cream, lotion , हे बाजारात फॅशन च्या नावाखाली स्त्रियांसाठी उपलब्ध आहेत .
ह्या सर्व cream lotion फक्त स्किन नाजूक,नितळ करण्यासाठी च असतात.
पण पुरुषांसाठी असे प्रॉडक्ट नसतात कारण पुरुषांचे सौंदर्य म्हणजे काय ह्याचे मोजमाप जे हजारो वर्षापासून आहे त्या मध्ये पुरुषाने नाजूक दिसले पाहिजे हे परिमाणं च नाही.
लिंग भेद इथे पण आहे आणि तो सर्वजण जपतात.
लहान बालकांचे जे प्रॉडक्ट बाजारात आहेत त्या मध्ये मुलींसाठी वेगळे आणि मुलांसाठी वेगळे असे कोणतेच प्रॉडक्ट नाही.

कारण लहान बाळ ही वयाच्या काही वर्षापर्यंत लिंगभेद विरहित असतात.

ज्या सौंदर्य च्य व्याख्येत आपण बसत नाही त्याची कमी कपड्यातून दूर केली जाते
कर्तुत्व ,नेहमीच श्रेष्ठ असते आणि कर्तुत्व च तुम्हाला खरी ओळख देत असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फॅशनखाली मरा, असं माझे आजोबा त्यांच्याकाळीही म्हणत असत. त्यांचेच गुण अंगी आल्यामुळे, कॉलेजातही मी कधी फॅशन केली नाही. जो कपडा अंगाला आरामशीर वाटेल तोच आयुष्यभर घातला. टाईट पँटस मला कधीच आवडल्या नाहीत, त्यामुळे मी पँटीही (पँटचं अनेकवचन) पायजम्यासारख्या ढगळ शिवुन घेत असे. पुढे बेलबॉटम पँटस शिवल्या कारण त्यांत पाय सहज जात असे. कोणीतरी खेचलॉनचं कापड भेट दिलं होतं म्हणुन त्याची पँट शिवली. कायम हाफ ढगळ शर्ट आणि ढगळ पँट, अशा अवतारामुळे कॉलेजमध्ये मुली माझ्याकडे बघत नसत. हाय हील्सच्या चपला/बुट पाहुन, या मुलींचं म्हातारपणी काय होणार अशी चिंता मला वाटे. तर ते एक असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आदर वाढला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फॅशन फक्त कपड्या पुरतीच असती तर ते जास्त गंभीर पने घेण्याची गरज पण वाटली नसती.
पण प्रसिद्ध माध्यमांनी आणि उत्पादक कंपन्यांनी प्रतेक क्षेत्रात ती आणली आहे.

मोठी मोठी उदाहरणे.
१) चमचे वापरून खाणे म्हणजे मॉडर्न पना आणि हाताने खाणे म्हणजे मगासले पना.

हात स्वच्छ साबणाने धुवून हाताने जेवले तर स्वच्छतेला कुठेच बाधा पोचत नाही.
हे सत्य.

त्या मुळे रोज हाताने जेवणसऱ्या माणसाला कथित मॉडर्न लोकांच्या पंक्तीत चमचा वापरून जेवण करण्याची जीवा वरची कसरत करावी लागते.
२) ओट्स, energy drink, जास्त ह्या मधले प्रकार माहीत नाहीत पण ते नाश्त्यात असणे म्हणजे मॉडर्न पना.

पोहे ,शिरा,उपमा हा दळभद्री मागास लोकांचा नाश्ता.
लोक मन मारायला लागलेत त्या मुळे .
लहान बालकांच्या पोटात नको ते खाद्य पदार्थ त्या मुळे आई वडील पोचवत असतात.
३) पारंपरिक व्यायाम प्रकार म्हणजे मागास पना आणि gym मधील आधुनिक महागडी उपकरण वापरून केलेला व्यायाम म्हणजे मॉडर्न पना.

लोकांनी पारंपरिक व्यायाम प्रकार सोडले त्या मुळे भरमसाठ fees भरून gym लावतात महिन्यातून चार दिवस च फक्त जातात.
फॅशन नी आपल्या घरातील किचन पासून अगदी बेड रूम पासून टॉयलेट मध्ये पण प्रवेश केला आहे
आणि जॅकेट पासून under garment पर्यंत ह्या फॅशन ची पोच वाढली आहे.
अशी काही उदाहरणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह ! मस्त लेख ! शनिवारच्या दिवसाची मजेदार सुरुवात झाली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed