पाकिस्तान-९

.
“काश्मिरी कॅसेट ऐकत असत. मग कंटाळून किंवा भारतीय गस्तीपथकाला घाबरून ते कॅसेट फेकून देत. तो टेपरेकोर्डर ताब्यात घेत नी पर्यटकांना विकत.” - एका काश्मिरीचं विधान.
युद्धाचे अर्थ आता बदलले आहेत. अमेरिकेला एखाद्या देशात घुसून तो देश ताब्यात घ्यायचा असला तरी ते आता शक्य नाही. तसे असते तर इराक आणि अफगाणिस्तानात अमेरिकन निवडणुकांचे मतदान होत असते. पाकिस्तानकडे अफाट सामर्थ्य असते आणि त्यांनी काश्मीर काबीज केले असते तरी काश्मीर त्यांच्या नावावर नसता, आंतरराष्ट्रीय एजन्सीनी युद्धविराम घोषीत करवला असता आणि सीमा निश्चित केल्या असत्या. कोणाला किती मिळेल हे तिथेच ठरवले गेले असते. जसे कच्छमध्ये घडले. कच्छमधील सुरुवातीच्या लढाईनंतर भारतीय सैन्याने त्या दलदलीत पुढे जाणे आवश्यक समजले नाही. भारतीय लष्कर घाबरून पळून गेल्याचे पाकिस्तानी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते. इंग्लंडच्या पंतप्रधानांनी युद्धबंदी केली आणि भारताने लढाई न चालू ठेवता जवळजवळ संपूर्ण कच्छचे रण मिळवले. पाकिस्तानसाठी हा केवळ वृत्तपत्रांचा विजय ठरला. पण पाकिस्तानने या युद्धाला आपला आधार मानले काश्मीरमध्येही अशीच परिस्थिती असेल तर कदाचित पुन्हा युद्धविराम होईल, आंतरराष्ट्रीय संस्था हस्तक्षेप करतील आणि यावेळीहा हा वाद संयुक्त राष्ट्र सोडवतील, असा विचार केला. केवळ अमेरिका आणि चीनच नाही तर सोव्हिएत युनियनही आपल्याला साथ देईल असा विश्वासही त्यांना होता. झुल्फिकार अली भुट्टो हे केवळ अर्धे कम्युनिस्टच नव्हते तर त्यांचे सोव्हिएतशीही चांगले संबंधं होते, जे संबंध पूढे ताश्कंदमध्ये स्पष्टपणे दिसले.
असे म्हणता येईल की कबड्डीच्या खेळाप्रमाणेच पाकिस्तान भारताच्या बाजूला येऊन हात लावून गेला असता तरीही संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप केला असता. काश्मीरचा पुनर्विचार झाला असता आणि निश्चितच असा काही निर्णय घेतला गेला असता ज्यामुळे पाकिस्तानला कश्मीरची जमीन मिळाली असती.
अनेक शतकांपूर्वी मुस्लिमांनी आफ्रिकेतून जिब्राल्टरची सामुद्रधुनी पार करून पोर्तुगाल आणि स्पेनवर हल्ला केला होता. अशीच काहीशी घुसखोरी करण्याचा प्रयत्न होता. त्यांना कोणतेही मोठे युद्ध लढावे लागनार नव्हते, फक्त गुप्तपणे काश्मीरमध्ये घुसून तेथील लोकांना पाकिस्तानमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करायचे होते.
ज्याला पाकिस्तानमध्ये आझाद काश्मीर म्हणतात तिया पाकव्याप्त कश्मिरात काश्मिरी लोकांचे कौटुंबिक संबंध आहेत, माझे काही आझाद काश्मिरी ओळखीचे आहेत ज्यांचे भारतीय काश्मीरमध्ये काका किंवा काकू आहेत. त्यांची भाषा आणि संस्कृतीही एकच होती. फाळणीपूर्वी ते एकाच छताखाली राहत होते. फाळणीनंतर ते अनेकदा सीमेवर भेटत असत. आता सीमेवर एवढा कॉरिडॉर आहे की फक्त आरडाओरडा करूनच संवाद साधता येतो आणि अनेक ठिकाणी दुर्बिणीनेच नीट बघता येते.
ऑपरेशन जिब्राल्टरनुसार, सुमारे पंचवीस हजार मुजाहिदीन (गनीमी काव्यावाले धर्मयोध्दे) तयार केले जाणार होते, जे दहा तुकड्यांमध्ये विभागले जातील आणि काश्मीरच्या वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश करतील. त्यांनी शस्त्रे बाळगली पाहीजेत असे गरजेचे नव्हते.ते प्रचाराचे साहित्य ठेवनार होते जसे पोस्टर्स, मासिके, कॅसेट, टेपरेकॉर्डर इ. ते काश्मिरींमध्ये वाटनार होते आणि रस्त्यांवर स्वत:चे आझाद काश्मीर कार्यालय उभारनार होते. हे सर्व जुलै-ऑगस्ट 1965 मध्ये सुरू होनार होते. ही देखील सीआयएची युक्ती असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातो. त्यांनी यापूर्वी क्युबा, तिबेट आणि व्हिएतनाममध्ये अशीच युक्ती वापरली होती.
घटनादुरुस्तीनंतर काश्मीर अस्वस्थ झाले होते यात शंका नाही. स्वायत्तता गमावल्यानंतर काश्मिरींना विश्वासघात झाल्यासारखे वाटले आणि त्यांना चिथावणी देणे सोपे होते. विशेषत: जेव्हा 1963 मध्ये हजरतबल दर्ग्यातून मू-ए-मुकाद्दश (हजरत मुहम्मद यांचे केस) चोरीला गेले तेव्हा हजारो काश्मिरी रस्त्यावर आले. त्यावेळी शेख अब्दुल्ला स्वत: नाराज होते. पण पाकिस्तानातून काही हजार लोक येऊन संपूर्ण काश्मीरचे ‘ब्रेन-वॉश’ करतील, हे इतकेही सोपे नव्हते. याउलट त्यांनी भारतीय लष्करासाठी माहिती देणारे म्हणूनही काम केले. ऑपरेशन जिब्राल्टर इतके गुप्त राहिले की पाकिस्तानच्या सर्वोच्च लष्करी अधिकारी आणि मंत्र्यांना याची माहिती दिली गेली नाही आणि ही बातमी भारताच्या संसदेत पोहोचली. ही पाकिस्तानची अशी घोडचूक होती की त्यांच्यासाठी काश्मीरचे स्वप्नच स्वप्नच राहिले. बऱ्याच अंशी ही चूक झुल्फिकार अली भुत्तो यांचीही होती. तो ऑगस्ट महिना होता, जेव्हा दोन्ही देशांत स्वातंत्र्याचा झेंडा फडकवण्याची तयारी सुरू होती... (क्रमशः) मूळ लेखक - प्रविण झा.

पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.
https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

देश ताब्यात घेवून त्यांच्या समस्या डोक्यावर घेण्यात कोणत्याच देशाला इंटरेस्ट नाही.
इराक ,अफगाणिस्तान,पाकिस्तान आणि इतर गरीब देश ताब्यात घेवून काय करायचे.

रक्ताच्या नात्यात आई वडील नको असतात पण संपत्ती हवी असते.

हाच नियम देशांना पण लागू असतो.
कोणत्या ही देशाची नैसर्गिक संपत्ती हवी असते येथील लोकांचे लोढणे कोणीच गळ्यात बांधून घेत नाही

ती प्रचंड lawless वागणूक असणारी जनता कोण सांभाळलं ..

फक्त त्या देशातील खनिज संपत्ती शीच संबंध असतो.
गरीब,गुन्हेगारी वृत्तीची, कायदे न पाळणारी,बेशिस्त लोक ताब्यात घेवून करणार काय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“काश्मिरी कॅसेट ऐकत असत. मग कंटाळून किंवा भारतीय गस्तीपथकाला घाबरून ते कॅसेट फेकून देत. तो टेपरेकोर्डर ताब्यात घेत नी पर्यटकांना विकत.” - एका काश्मिरीचं विधान.

ऑपरेशन जिब्राल्टरनुसार, सुमारे पंचवीस हजार मुजाहिदीन (गनीमी काव्यावाले धर्मयोध्दे) तयार केले जाणार होते, जे दहा तुकड्यांमध्ये विभागले जातील आणि काश्मीरच्या वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश करतील. त्यांनी शस्त्रे बाळगली पाहीजेत असे गरजेचे नव्हते.ते प्रचाराचे साहित्य ठेवनार होते जसे पोस्टर्स, मासिके, कॅसेट, टेपरेकॉर्डर इ. ते काश्मिरींमध्ये वाटनार होते आणि रस्त्यांवर स्वत:चे आझाद काश्मीर कार्यालय उभारनार होते. हे सर्व जुलै-ऑगस्ट 1965 मध्ये सुरू होनार होते. ही देखील सीआयएची युक्ती असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातो. त्यांनी यापूर्वी क्युबा, तिबेट आणि व्हिएतनाममध्ये अशीच युक्ती वापरली होती.

१९६५ साली कॅसेट टेपरेकॉर्डर हा प्रकार अस्तित्वात कदाचित जरी असला, तरी बाल्यावस्थेत असणार. (मला वाटते, त्या काळात स्पूल तंत्रज्ञान सर्वप्रचलित असावे.) आणि, कॅसेट टेपरेकॉर्डर ही चीज (निदान भारतीय उपखंडात तरी) माझ्या कल्पनेप्रमाणे बऱ्याच नंतर सामान्य झाली असावी.

‘बाल्यावस्थेत’ = ‘प्रचंड महाग’ असे समीकरण मांडावयास, मला वाटते, हरकत नसावी. (तसे खरे तर तत्कालीन सर्वप्रचलित स्पूल टेपरेकॉर्डर तथा त्यांची स्पूले हा प्रकारदेखील फारसा स्वस्त असावा, अशातला भाग नाही.)

माणसोमाणशी प्रचार करण्यासाठी पोस्टर्स, मासिके, याचबरोबर कॅसेट्ससुद्धा दरमाणशी (किंवा दर पाच माणशी/दर दहा माणशी/अगदी दर पंचवीस माणशीसुद्धा) वाटणे हे कल्पना म्हणून ठीकच आहे. (पंचविसाहून अधिक माणसांमागे एक कॅसेट हे प्रमाण ‘औटरीच’च्या दृष्टिकोनातून फारसे उपयुक्त असण्याबाबत साशंक आहे.) शिवाय, कॅसेटा जरी वाटल्या, तरीसुद्धा त्या ऐकण्यासाठी प्लेयर जर सामान्य कश्मीरी लोकांजवळ नसतील आणि/किंवा त्यांना विकत घ्यायला परवडण्यासारखे जर नसतील (हे १९६०चे दशक होते, ही गोष्ट विचारात घेणे येथे प्राप्त आहे.), तर कॅसेटबरोबरच ती वाजविण्याकरिता प्लेयरसुद्धा वाटणे आवश्यक आहे, हेही ओघानेच आले. आता, कॅसेटप्लेयर जरी (फुकटात) हातात आला, तरीही (या प्रचारकी कॅसेट्सव्यतिरिक्त) त्यावर ऐकण्यासारखे काही (भारतीय आणि/किंवा कश्मीरी) बाजारात फारसे जर उपलब्ध नसेल आणि/किंवा स्थानिक माणसाला परवडण्यातले जर नसेल (पुन्हा, हे १९६०चे दशक होते, ही गोष्ट विचारात घेणे येथे प्राप्त आहे.), तर अशा प्लेयरधारकाचा कल हा तो महागातला प्लेयर (ज्याला त्याचा उपयोग आहे, आणि परवडण्यासारखे आहे, अशा) परदेशी पर्यटकास, त्या प्लेयरच्या खऱ्या किमतीच्या तुलनेत पुष्कळ स्वस्त परंतु विकणाऱ्याकरिता तरीही स्थानिक परिस्थितीच्या तुलनेत मुबलक दाम देईल अशा किमतीत विकण्याकडे राहील, हे उघड आहे. म्हणजे, पुढील प्रचारकी कॅसेट वाटते वेळी ती ऐकण्याकरिता त्याच्याकडे प्लेयर नसण्याची शक्यता अधिक. म्हणजे, थोडक्यात, प्रत्येक कॅसेट वाटतेवेळी त्याबरोबर एक कॅसेटप्लेयरसुद्धा वाटावा लागणार. एकंदरीत, या मोहिमेमागील पैसा हा पाकिस्तानच्या लष्करी बजेटातून किंवा अगदी सीआयएच्या (पक्षी: अमेरिकन सरकारच्या) बजेटातून (पर्यायाने, अमेरिकन करदात्याच्या खिशातून) आला, असे जरी मानले, तरीही, एकंदरीत बरेच खर्चिक पडले असणार हे प्रकरण. आणि, परतावा? शून्य, किंवा नगण्य! (डिस्क्लेमर: या प्रकल्पामागे सीआयएचे बजेट होते, किंवा कसे, याबाबत मला काडीमात्र कल्पना नाही. परंतु, जरी समजा सीआयएचा पैसा नसला, पाकिस्तानी लष्करी (पर्यायाने पाकिस्तानी सरकारी) बजेटातून जरी आला असला, तरीसुद्धा, एकंदरीत ‘अपने बाप का पैसा अपनी जेब से थोड़ना जा रहा है?’ ही मानसिकता प्रस्तुत योजना कल्पिण्यात नि राबविण्यात कामी आली असणार, हे उघड आहे.)

थोडक्यात, अजिबात मार्केट रिसर्च न करता, केवळ पैसा हाताशी आहे (किंवा, कोणाच्या तरी खिशातून उचलता येण्याजोगा आहे), म्हणून अत्यंत बिनडोकपणे नि वाटेल तसा राबविलेला प्रकल्प म्हणता येईल हा! फसला असल्यास अजिबात आश्चर्य वाटण्यासारखे नाही.

त्यापेक्षा, ‘आज़ाद कश्मीर रेडियो, मुज़फ़्फ़राबाद’ हा (बहुधा त्या काळी अगोदरच अस्तित्वात असलेला) प्रकल्प अधिक स्वस्तात अधिक लोकांपर्यंत पोहोचून अधिक प्रभावी ठरला नसता काय?

(‘आज़ाद कश्मीर रेडियो’ हे पाकिस्तानचे पाकव्याप्त कश्मीरमधील म्हटले तर प्रचारकी ‘फ्रंट ऑपरेशन’ होते; कदाचित अजूनही असेल. (मुज़फ़्फ़राबाद (पाकव्याप्त कश्मीरची तथाकथित ‘राजधानी’) आणि (बहुधा) मीरपूर अशी केंद्रे होती. (पैकी मुज़फ़्फ़राबादचे केंद्र मी स्वतः ऐकलेले आहे.)) वरकरणी पाकव्याप्त कश्मीरमधील स्थानिक रहिवाश्यांकरिता असलेल्या या केंद्रांचा खरा ‘टार्गेट ऑडियन्स’ हा भारतीय प्रशासनाखालील जम्मू-कश्मीर हा होता. कार्यक्रम बहुतांशी उर्दूतून असत, नि बातम्या तेवढ्या रेडियो पाकिस्तानवरून ‘सहक्षेपित’ करीत. एरवी, देखावा सगळा हे ‘आज़ाद कश्मीर’चे ‘स्वतंत्र’ रेडियोकेंद्र असल्याचाच असे. रात्री रेडियोकेंद्र बंद करतेवेळी (साइनऑफ) रेडियो पाकिस्तानच्या केंद्रांवर ‘ख़ुदा हाफ़िज़, पाकिस्तान ज़िंदाबाद’ (नंतरनंतरच्या काळात ‘अल्लाह हाफ़िज़, पाकिस्तान ज़िंदाबाद’) ही घोषणा आणि त्यानंतर (‘पाक सरज़मीन शादबाद’ हे) पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजविण्याची प्रथा आहे, त्याजागी ‘अल्लाह हाफ़िज़, आज़ाद कश्मीर ज़िंदाबाद’ ही घोषणा होऊन त्यानंतर मग (‘वतन हमारा आज़ाद कश्मीर’ हे, साडेतीन मिनिटे चालणारे, उर्दू भाषेतील) ‘आज़ाद कश्मीर’चे तथाकथित ‘राष्ट्रगीत’ वाजवीत. थोडक्यात, नावापुरते जरी ‘आज़ाद कश्मीर रेडियो’ असले, तरी त्याचा बोलविता धनी पाकिस्तान होता, हे उघड होते.)

(किंबहुना, भारतानेसुद्धा आपल्या प्रशासनाखालील जम्मू-कश्मीरमध्ये याहून फारसे वेगळे असे काही केले, अशातला काही भाग नाही. अगदी परवापरवापर्यंत तेथे ‘आकाशवाणी’ किंवा ‘ऑल इंडिया रेडियो’ या नावाखाली कार्यरत असलेले कोठलेही रेडियोकेंद्र नव्हते. श्रीनगर आणि जम्मू येथे (कदाचित आणखी ठिकाणीही असू शकतील.) जी रेडियोकेंद्रे होती (आणि अजूनही आहेत), ती अगदी परवापरवापर्यंत ‘रेडियो कश्मीर’ या नावाने प्रसारण करीत. ‘रेडियो कश्मीर’ हा (निदान कागदोपत्री तरी) जम्मू आणि कश्मीर राज्यसरकारचा उपक्रम होता; भारतीय केंद्रसरकारचा नव्हे. (माझी माहिती जर चुकीची नसेल, तर स्वातंत्र्यानंतरच्या अगदी सुरुवातीच्या काळात — जेव्हा भारतीय जम्मू-कश्मीरला ‘सद्र-ए-रियासत’ नि ‘वज़ीर-ए-आज़म’ अर्थात ‘अध्यक्ष’ नि ‘पंतप्रधान’ असत, तेव्हाच्या काळात — खुद्द श्री. शेख अब्दुल्लाह यांनी श्रीनगरमध्ये त्याची स्थापना केली होती. (चूभूद्याघ्या.)) किंबहुना, अगदी सुरुवातीच्या काळात जम्मू आणि कश्मीर राज्यसरकार ही केंद्रे प्रत्यक्ष चालवीत असेलही, कल्पना नाही. परंतु लवकरच, ‘हा जम्मू-कश्मीर सरकारचा स्वतंत्र कारभार आहे; ‘रेडियो कश्मीर’ आहे, ‘ऑल इंडिया रेडियो’ नव्हे’ असा देखावा कागदोपत्री कायम ठेवून, या केंद्रांचे प्रत्यक्ष नियंत्रण तथा संचालन ‘ऑल इंडिया रेडियो’ अर्थात ‘आकाशवाणी’द्वारे केले जाऊ लागले, नि अगदी परवापरवापर्यंत केले जात असे. रेडियोवरील घोषणा तथा सूचना ‘रेडियो कश्मीर’च्या नावाने असत, नि स्थानिक कार्यक्रम हे उर्दू (जम्मू-कश्मीर राज्याची अधिकृत राजभाषा), कश्मीरी आणि जम्मू-कश्मीरमधील इतर लोकभाषा, तथा हिंदी(विशेषतः जम्मू भागांत), या भाषांतून चालत असत. मात्र, बातम्या तथा सर्व राष्ट्रीय प्रसारणे ही आकाशवाणीवरून ‘सहक्षेपित’ केली जात, केंद्रांची ‘सिग्नेचर ट्यून’ (प्रसारण सुरू होण्यापूर्वी वाजणारी तथा केंद्राची ओळख दर्शविणारी धून) ही आकाशवाणीचीच होती, नि केंद्रांतील अधिकारी (विशेषेकरून उच्चाधिकारी) तथा अनेकदा तांत्रिक स्टाफ हा आकाशवाणीहून ‘डेप्युटेशन’वर बदली होऊन गेलेला असे. (टेंडरे तथा अधिकृत पत्रव्यवहार मात्र ‘रेडियो कश्मीर’च्या नावाने चाले.) आकाशवाणीवर स्टेशन बंद होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजविण्याची पद्धत तशी फार पूर्वी बंद झाली, त्यामुळे ‘रेडियो कश्मीर’वरसुद्धा ते वाजत नसे; परंतु, वाजविले जरी असते, तरी ‘जन गण मन’च वाजविले असते, याबद्दल संदेह बाळगण्याचे काही कारण निदान मला तरी दृग्गोचर होत नाही. शिवाय, नक्की खात्री नाही, परंतु, सकाळचे ‘वंदे मातरम’ तथा शेवटचे ‘जय हिंद’ दोन्ही बहुधा होत असत. (चूभूद्याघ्या.) थोडक्यात, नाव फक्त ‘रेडियो कश्मीर’चे होते; कारभार सगळा ‘आकाशवाणी’चा होता.

एकंदरीत, ‘भारतात जम्मू-कश्मीरला आपले असे अस्तित्व आहे, आपला असा आवाज आहे, आणि (/मात्र तरीही) जम्मू-कश्मीर भारताबरोबर एकमुखाने, एकवाक्यतेने बोलतो’ असा देखावा तथा प्रचार (विशेषेकरून इतरदेशीय आणि त्यातसुद्धा पाकिस्तानी आणि त्यातूनही पाकव्याप्त कश्मीरी जनतेप्रति) करण्यासाठी ही अत्युत्तम तथा अत्युपयुक्त यंत्रणा होती. आणि, ‘आता लवकरच, कधीही पाकव्याप्त कश्मीर स्वखुशीने भारतात विलीन होणार आहे, होऊ इच्छितोय’ असा जो माहौल हल्ली उठविला जातोय, त्या परिप्रेक्ष्यात, खरे तर निदान असे विलीनीकरण प्रत्यक्षात होईपर्यंत तरी हा देखावा चालू ठेवणे हे फायद्याचे ठरले नसते काय? एक तर, लवकरच हे विलीनीकरण होणार आहे, म्हटल्यावर, आणखी फार दिवस हा देखावा करावा लागलाही नसता. आणि, तेवढ्या वेळात, पाकव्याप्त कश्मीरींना विलीनीकरणासाठी अधिक प्रोत्साहनही मिळाले असते. परंतु, नाही. मोदी सरकार आल्यावर त्याने (भाजपच्या नेहमीच्या पद्धतीने) मागचापुढचा फारसा विचार न करता घाई केली, आणि (एवढ्यातच कधीतरी; नक्की कधी, याबद्दल खात्री नाही, परंतु बहुधा ३७० कलम हटविण्याच्या भानगडीत कधीतरी) ‘रेडियो कश्मीर’ बदलून त्याचे अधिकृतरीत्या ‘आकाशवाणी’ केले.

आणि, ‘स्थानिक नागरिकांच्या सोयीकरिता रेडियोकेंद्र’ याव्यतिरिक्त, पाकव्याप्त कश्मीरी जनतेप्रति प्रचार करणे हेदेखील ‘रेडियो कश्मीर’च्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक होते, हे ‘रेडियो कश्मीर’चा इतिहास लक्षात घेतल्यास सहज लक्षात यावे. किंबहुना, ‘आज़ाद कश्मीर रेडियो’च्या प्रचाराला कौंटर हा या (भारतीय) केंद्रांमागील एक महत्त्वाचा हेतू होता, असे म्हटल्यासही वावगे ठरू नये. अनेक वर्षे, अगोदर एका अर्ध्या तासाच्या स्लॉटमध्ये ‘आज़ाद कश्मीर रेडियो’ने भारतीय कश्मीरींप्रति एक प्रचारात्मक कार्यक्रम प्रसारित करावा, नि त्यापुढील अर्ध्या तासाच्या स्लॉटमध्ये ‘रेडियो कश्मीर’ने पाकव्याप्त कश्मीरींप्रति प्रतिप्रचारात्मक असा दुसरा कार्यक्रम ‘जवाबी हमला’ या नावाने प्रसारित करावा, हाही प्रकार चालत असे, असे वाचलेले आहे. (किंबहुना, आजसुद्धा, शनिवारच्या एका स्लॉटमध्ये (हल्लीचे) ‘आकाशवाणी श्रीनगर’ केंद्र हे खास ‘पाक मक़बूज़ा कश्मीर’मधील ‘समाईन’साठी विशेष कार्यक्रम प्रसारित करते.) थोडक्यात काय, तर ‘आज़ाद कश्मीर रेडियो’ काय, किंवा ‘रेडियो कश्मीर’ (आता अधिकृतरीत्या ‘आकाशवाणी’) काय, दोघेही एकमेकांप्रति प्रचार/प्रतिप्रचार करण्यात सर्रास कार्यरत होते, एवढाच याचा अर्थ.)

म्हणण्याचा उद्देश एवढाच, की एवढ्या स्वस्तात काम होण्यासारखे असताना, घाऊक भावात कॅसेटा नि प्लेयर वाटण्याचा मूर्ख नि खर्चिक उपक्रम कोणी नि का हाती घेतला असेल?

असो चालायचेच.

——————————

तळटीपा:

दुसरी गोष्ट अशी, की मला जर कोणी कॅसेट दिली, आणि ती वाजविण्याकरिता जर माझ्याकडे कॅसेट प्लेयर नसेल, तर कॅसेट प्लेयर विकत घेणे समजा मला परवडत जरी असले, तरी एका कॅसेटकरिता मुद्दाम मी प्लेयर विकत घ्यायला कशाला जाईन? आफ्टर ऑल, मी तो प्रचार ऐकणे ही प्रचारकाची गरज आहे, माझी नव्हे! त्यामुळे, मी तो प्रचार ऐकावा, असे जर प्रचारकास वाटत असेल, तर त्याने मला कॅसेटबरोबर प्लेयरही पुरवावा, अशीच (एक ग्राहक म्हणून) माझी अपेक्षा राहील, नव्हे काय?

अशीही काही चीज अस्तित्वात आहे, हा शोध मला काहीश्या अपघातामुळे आणि बऱ्याच उशिरा लागला. माझ्या कॉलेजच्या दिवसांत (१९८०च्या दशकात), वसतिगृहावर (आणि घरापासून, किंबहुना महाराष्ट्रापासून, पुष्कळ दूर) असताना, कधी होमसिक वाटले, तर मी रात्रीच्या वेळी रेडियोवर आकाशवाणीची महाराष्ट्रातली केंद्रे पकडून ऐकण्याचा प्रयत्न करीत असे. (मीडियमवेवची पोच दिवसा जरी फारशी नसली, तरी रात्रीच्या वेळेस अनेकदा दूरवरपर्यंत असू शकते. जळगाव, रत्नागिरी वगैरे केंद्रे आरामात मिळायची. अनेकदा मुंबई, औरंगाबादसुद्धा. पुणे केंद्राच्या बाबतीत मात्र तितकेसे यश शक्यतो सहज मिळत नसे, किंवा, मिळालेच, तर अत्यंत धूसर ऐकू येत असे.) तर असाच एकदा आकाशवाणी पुणे केंद्र पकडण्याच्या डेस्परेट प्रयत्नांत असताना, पुणे केंद्राच्याच फ्रीक्वेन्सीच्या खूपच जवळच्या फ्रीक्वेन्सीवर चुकून ‘आज़ाद कश्मीर रेडियो, मुज़फ़्फ़राबाद’ ऐकू आले होते. म्हटल्यावर, त्यानंतरसुद्धा अनेकदा केवळ कुतूहल म्हणून त्यावर लक्ष ठेवून असे. असो.

अध्यक्ष झिया-उल-हक यांच्या कारकीर्दीत कधीतरी हा बदल घडविण्यात आला. किंबहुना, हा झिया-उल-हक यांच्या वैयक्तिक खुळाचा भाग म्हणता येईल. पाकिस्तानी मुसलमानाचा भारतीय उपखंडातील हिंदूंशी कसलाही वांशिक वा सांस्कृतिक संबंध नसून तो अरबांचा सच्चा वंशज आहे, ही (निखालस चुकीची) संकल्पना पाकिस्तानी जनतेच्या मनात बिंबविण्याच्या३अ हेतूने पाकिस्तानमधील अधिकृत उर्दू भाषेतून फार्सी मूळ असलेल्या शब्दांचे उच्चाटन करून (कारण, कितीही म्हटले, तरी फार्सीभाषक लोक हे ‘बाटगे’ मुसलमान, तथा त्यांची भाषा ही त्यामुळे विटाळलेली, ‘शुद्ध’ नव्हे!) त्याजागी अरबी शब्दांचा भरणा करण्याचा त्यांनी जो सपाटा लावला३ब, त्याचाच हा भाग होता. (‘ख़ुदा’ हा शब्द फार्सी, तर ‘अल्लाह’ हा शब्द ‘शुद्ध’ अरबी आहे. हा केवळ एक भाग झाला. त्याव्यतिरिक्त, ‘ख़ुदा’ हा फार्सीतील शब्द सर्वसाधारण ईश्वरसंकल्पना सुचवितो, मग तो अल्लाह असो, वा पारश्यांचा अहुरामाझदा असो वा शिखांचा वाहेगुरू असो वा (अल्लाह फॉर्बिड) हिंदूंचा ईश्वर असो; याउलट, ‘अल्लाह म्हणजे अल्लाह म्हणजे (एकमेव) अल्लाह असतो (आणि मुहम्मद (पत्याशांदे) हा त्याचा प्रेषित असतो)’, असाही काही फंडा या बदलामागे असल्याबद्दल सांगितले जाते. असो.)

३अ They would rather be proud bastards of Arabs than legitimate progeny of Hindus.

३ब यावरून श्री. झिया-उल-हक यांना ‘पाकिस्तानचे सावरकर’ म्हणता यावे काय?

या ‘राष्ट्रगीता’त, ‘अहल-ए-वादीं’ना (म्हणजे (कश्मीर) खोऱ्यातील जनतेला) जागृत हो(ऊन (स्वातंत्र्यासाठी) लढ)ण्याचे आवाहन आहे, आणि (त्याकरिता) ‘अल्लाह तुमच्या पाठीशी आहे’ असे आश्वासनही आहे. त्याव्यतिरिक्त, (भारताचे नाव न घेता) भारताला (अप्रत्यक्षपणे) ‘सैतान’ असे संबोधून, ‘लालच करून तुला आम्ही आमचे हृदय तथा इमान काय म्हणून विकू? आम्ही पाकिस्तानबरोबर वाढलो आहोत, नि कुराणाचा हुकूम हीच आमची इज्जत तथा प्रतिष्ठा आहे’ असा (भारताला) ‘संदेश’सुद्धा आहे. चालायचेच! (गंमत म्हणजे पाकिस्तानच्या राष्ट्रगीताचा जनक हाच यासुद्धा ‘राष्ट्रगीता’चा जनक आहे.)

पाकव्याप्त ‘आज़ाद कश्मीर’ला आजही ‘अध्यक्ष’ नि ‘पंतप्रधान’ असतात, ही वेगळी गोष्ट.

की रविवारच्या? नक्की आठवत नाही, परंतु असेच सप्ताहांती कधीतरी गाडी चालविताचालविता हा कार्यक्रम एकदा ऐकलेला आहे. अमेरिकेतल्या दुपारी म्हणजे भारतात तथा पाकिस्तानात तेव्हा रात्र असणार. (‘प्रसारभारती’च्या संकेतस्थळावरून तथा मोबाइल अॅपवरून आकाशवाणीची वाटेल ती केंद्रे आजकाल लाइव ऐकावयास मिळतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुप छान माहिती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0