आजोबाचे पत्र

p1

तू जेव्हा जन्माला आलास तेव्हा सौरमालेतील ग्रह-नक्षत्रांची एक विशिष्ट स्थिती होती. परंतु त्याचा तुझ्या भावी जीवनावर कुठलाही परिणाम होणार नाही. तुझ्या नावामधील अक्षरावरूनसुद्धा तुझ्या पुढील जीवनातील घटनांचा क्रम लावता येणार नांही. कारण त्या चार-सहा अक्षरांचा शब्द तुला हाक मारण्यासाठी आहे. तुझी ओळख करून देणारे ते एक लेबल आहे. त्या शब्दात वा जन्मवेळेत किंवा जन्मस्थळात गूढ, अतींद्रिय किंवा काही तरी महत्त्वाचे दडले आहे असा समज तू करून घेऊ नकोस .

तुझ्या तळहातावरील रेषा तुझ्या शरीररचनेतील भाग असून त्यामधून काही तरी अर्थ काढणे चुकीचे ठरेल. तू अमुक ठिकाणी, अमुक वेळेला किंवा अमुक आई- वडिलांच्यापोटी जन्माला येणार व पुढील आयुष्यात तू काय काय करणार याची नोंद कुणाजवळही असण्याची शक्यता नाही.

ज्या ग्रहावर तुझी वाढ होणार आहे तो ग्रह करोडो वर्षांचा असून विश्वाचा एक भाग आहे. या पृथ्वीवर अनेक प्राणी-वनस्पतींच्या जाती असून तू मानवजातीचा एक घटक आहेस. पृथ्वी केवळ तुझ्या जातीच्या मालकीची आहे असा गैरसमज करून घेऊ नकोस.

रंगी-बेरंगी मणी-माळा, किंवा गंडे-दोरे-ताईत इत्यादी वांधल्यामुळे तुझ्या बालपणातील छोटे-मोठे आजार बरे होणार नाहीत, हे तुझ्या आई-वडिलांना कळू दे. देव-देवता भूत-पिशाच अशा काल्पनिक गोष्टींचा नवस करूनही तुझे आजार बरे होणार नाहीत, हे तुझ्या आई-वडिलांना माहीत असेलच. इतर प्राणि-जातींच्या तुलनेत मानवजातीचे बाळपण प्रदीर्घ काळाचे आहे, त्यामुळे तुझ्या आई-वडिलांनी वेळीच काळजी घेतली पाहिजे. तुझ्या सुदृढ प्रकृतीवरच तुझे पुढील जीवन अवलंबून राहील.

काही विशिष्ट परिस्थितीमुळे मानव जातीच्या मेंदूची वाढ होऊ लागली. त्यामुळे त्याची बुद्धी वाढत गेली. विचार करण्याची शक्ती मिळाली. याचा अर्थ, ही जात एका विशिष्ट कारणासाठी जन्माला आली किंवा अंतराळातील काही अतिमानवी शक्तींनी अनेक प्रयोग करून या मानव जातींची निर्मिती केली, असेही तू समजू नकोस. याच अतीमानवी शक्तीला परमेश्वर समजून सर्व जगभर त्याचा उदो-उदो केला जातो, त्याची पूजा-अर्चा केली जाते, जाता येता त्याचा कोप होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते, त्याच्यासाठी भव्य मंदिरं बांधली जातात, उत्सव साजरे केले जातात. परंतु तू थोडासा विचार केल्यास त्यात कुणाचे हितसंबंध गुंतले आहेत, हे तुझ्या लक्षात आले असेलच.

मानव जातीच्या प्रचंड बौद्धिक सामर्थ्यामुळे तू इतर प्राणिमात्रांचा, जीवजंतूंचा, वनस्पतींचा विनाश घडवू शकतोस. परंतु त्यांच्या विनाशातच तुझाही विनाश असेल हे विसरू नकोस. या पृथ्वीवरील संसाधनं ओरबडून कदाचित तू ऐष-आरामाचे जीवन जगू शकशील. परंतु ही संसाधनं कधी ना कधी तरी संपून जातील, याचीसुद्धा तुला जाण असू दे.

तू ज्या जगात वाढणार आहेस ते जग फार गुंतागुंतीचे व अनाकलनीय आहे. अनेक प्रकारच्या चित्र-विचित्र श्रद्धा, भीती, क्रौर्य, द्वेष, असूया, विषमता, धर्मांधता, टोकाच्या अस्मिता इत्यादी क्लेशदायक गोष्टींचा तुला सतत सामना करावा लागेल. परंतु त्याचबरोबर ज्ञान-विज्ञान, प्रेम, आनंद, निसर्गसौंदर्य, मित्र-मैत्रिणी, मैदानी व बैठे खेळ, विविध प्रकारची लोकसंस्कृती यांच्याशीही तुझा संबंध येऊन तुला तुझे जीवन फुलविता येईल व आयुष्य सार्थकी करून घेता येईल.

मला आशा वाटते की जगातील प्रत्येक गोष्ट तू पारखून बघशील. अविवेकीपणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून तुझे सदा सर्वकाळ रक्षण होईल ते केवळ पारखून बघण्याच्या सवयीमुळे!

तुझ्या या सर्व प्रयत्नांमध्ये माझ्याकडून जितके साध्य होईल तेवढे साहाय्य मी करीन. कारण . . . मग आजोबा असंतात तरी कशासाठी?

field_vote: 
0
No votes yet