नायट्रोजन वापरून मृत्यूदंड: योग्य पर्याय की चुकीचं पाऊल?

अमेरिकेच्या अलाबामा राज्यानं जानेवारी महिन्यात केनेथ स्मिथ नावाच्या गुन्हेगाराच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची कार्यवाही केली. त्यासाठी प्रथमच जी पद्धत वापरण्यात आली त्यामुळं ही कार्यवाही वादग्रस्त ठरली. याबद्दल 10 फेब्रुवारीच्या लोकमत मध्ये लिहिलेला लेख.

-------------

नायट्रोजन वापरून मृत्यूदंड: योग्य पर्याय की चुकीचं पाऊल?

२५ जानेवारी, संध्याकाळचे ७.५३. मृत्यूदंड कक्ष आणि पाहण्याच्या खोलीमध्ये असलेला पडदा उघडण्यात आला. पांढऱ्या कपड्यात लपेटलेल्या केनेथ स्मिथला एका खाटेवर बांधून झोपवण्यात आलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर रेस्पिरेटर मास्क लावण्यात आला होता. मास्कला शेजारच्या खोलीतून आलेली एक नळी जोडली होती. स्मिथला त्याचं डेथ वॉरंट वाचून दाखवण्यात आलं. माईकमधून तो शेवटची वाक्यं बोलला. ७.५६ ला त्याची मृत्यूदंडाची शिक्षा सुरु झाली. ७. ५८ पासून पुढची किमान दोन मिनिटं तो प्रचंड थरथरत होता, अंगाला जोरजोरात वेडेवाकडे झटके देत होता. त्यामुळं त्याची खाट गदागदा हलत होती. मग त्यानं भराभर श्वास घ्यायला सुरुवात केली. त्याची छाती धपापू लागली. हळूहळू श्वासांचा वेग मंदावत गेला. ८.०८ पर्यंत त्याचा श्वासोच्छ्वास चालू आहे की नाही हे न कळण्याइतपत मंदावला. ८.१५ वाजता मधला पडदा पुन्हा बंद करण्यात आला. ८.२३ वाजता स्मिथ मरण पावल्याचं घोषित करण्यात आलं.

१९८८ मध्ये केलेल्या मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी स्मिथला अमेरिकेतल्या अलाबामा राज्यानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. २५ जानेवारी २०२४ या दिवशी ही शिक्षा अंमलात आणण्यात आली. पण त्यासाठी वापरलेल्या पद्धतीमुळं ही कार्यवाही वादग्रस्त ठरली आहे. या शिक्षेसाठी अमेरिकेत, किंबहुना जगात पहिल्यांदाच Nitrogen Hypoxia ही पद्धत वापरली गेली. म्हणजे कैद्याला हवेऐवजी फक्त नायट्रोजन वायूचं श्वसन करायला लावायचं. हवेतला ७८% नायट्रोजन जरी बिनधोक्याचा असला तरी १००% नायट्रोजनचं श्वसन धोकादायक असतं. त्यामुळं शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडून प्राण गमावले जाऊ शकतात. एक मृत्यूदंडाची पद्धत म्हणून Nitrogen Hypoxia वरचं संशोधन फारच मर्यादित आहे. तरीही अलाबामानं हा पर्याय का निवडला?

सर्वसाधारणतः अमेरिकेत मृत्युदंडाच्या शिक्षेसाठी तीन वेगवेगळ्या रसायनांची इंजेक्शन्स क्रमानं दिली जातात (Lethal injection). पण ही रसायनं बनवणाऱ्या कंपन्यांनी त्यांचा मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी वापर करण्यावर निर्बंध आणल्यामुळं किंवा त्यांचं उत्पादनच बंद केल्यामुळं राज्यांना ही रसायनं मिळणं अवघड झालंय. शिवाय ही इंजेक्शन्स देताना ‘आयव्ही’ (intravascular) यंत्रणा नीट काम न करणं, इंजेक्शनसाठी योग्य शीरच न सापडणं, कैद्याच्या शरीरातून सुई निघून येणं किंवा बुजून जाणं असे अनेक गोंधळ झाल्यानं कार्यवाहीला उशीर आणि कैद्यांना त्रास झाल्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांत घडल्यायत. २०२२ मध्ये खुद्द स्मिथच्या शिक्षेची कार्यवाही जवळजवळ दोन तास त्याला सुया टोचूनही आयव्ही यंत्रणेनं नीट काम न केल्यानं रद्द झाली होती. म्हणूनच यावेळी अलाबामा राज्यानं Nitrogen Hypoxia चा मार्ग निवडला. अलाबामाच्या अधिकाऱ्यांच्या मते Nitrogen Hypoxia ही मृत्यूदंड द्यायची अतिशय सुरक्षित, झटपट आणि सहृदय पद्धत आहे. स्मिथच्या मृत्यूनंतर अलाबामाच्या अधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितलं की कार्यवाही अतिशय ‘टेक्स्टबुक’ पद्धतीनं पूर्ण झाली, Nitrogen Hypoxia हा इंजेक्शन देऊन मारण्याला एक उत्तम पर्याय आहे हे अलाबामानं आज सिद्ध केलंय, आणि बाकीच्या राज्यांना मदत करायला आम्ही सज्ज आहोत. पण तिथं हजर असलेल्या मोजक्या लोकांचा वृत्तांत अगदीच वेगळा आहे. त्यांच्या मते स्मिथला झटपट आणि वेदनारहित मरण अजिबात आलं नाही. उलट सुरुवातीला वर्णन केल्याप्रमाणं कित्येक मिनिटं चालू असलेल्या या प्रक्रियेत त्याचा छळच झाला. शेवटपर्यंत स्मिथसोबत असलेले त्याचे आध्यात्मिक मार्गदर्शक रेव्हरंड हूड म्हणाले की त्याला होणाऱ्या यातना मला बघवल्या नाहीत! ही कार्यवाही व्हायच्या आधी आणि नंतरही तज्ज्ञानी Nitrogen Hypoxia मधले धोके सांगितले होते - नायट्रोजन शुद्ध नसेल किंवा मास्क नीट बसला नसेल तर कैद्याला मरण न येता तो जीवनमृत्यूच्या मधल्या निष्क्रिय अवस्थेत जाऊ शकतो. चुकून नायट्रोजनची गळती झाली तर आजूबाजूच्या लोकांना धोका उद्भवू शकतो. म्हणूनच अशा पद्धतीचा वापर प्रायोगिक तत्वावर कैद्यांवर करणं हे क्रौर्य आहे असं त्यांचं म्हणणं होतं. मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या कैद्याला मरताना त्रास झाला तर बिघडलं कुठं असा प्रश्न मनात येऊ शकतो. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की रीतसर खटला चालल्यानंतर आरोपीला शिक्षा झालेली असते ती मृत्यूची - छळ होऊन येणाऱ्या मृत्यूची नव्हे! त्यामुळं त्याला बिनत्रासाचं मरण देणं हा कर्तव्याचा भाग आहे.

जर मृत्युदंडाची शिक्षा देण्यासाठी योग्य पद्धत शोधणं इतकं अवघड आहे तर ही शिक्षा द्यायचीच कशाला हा प्रश्न पडतोच . मृत्यूदंडाची शिक्षा देणारा अमेरिका हा प्रगत पाश्चात्य देशांपैकी एकमेव देश आहे. स्मिथच्या शिक्षेबद्दल युरोपियन युनियन आणि यूएनच्या मानवी हक्कांच्या कार्यालयानं तीव्र खेद व्यक्त केला आहे. खुद्द अमेरिकेत ५० पैकी २३ राज्यांत मृत्युदंडाची शिक्षा अवैध आहे. बायडेन प्रशासनानंही स्मिथची शिक्षा ज्या प्रकारे अंमलात आणली गेली त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मृत्युदंडाची शिक्षा ही माणसाच्या जगण्याच्या हक्काची पायमल्ली आहे, या शिक्षेमुळं समाजातली गुन्हेगारी कमी होत नाही; जे लोक गुन्ह्याचे बळी ठरलेले असतात त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांनाही खरं समाधान किंवा ‘क्लोजर’ लाभत नाही, त्यामुळं ही शिक्षा देणं बंद केलं पाहिजे असं याचे विरोधक म्हणतायत.

‘आज अलाबामामध्ये मानवतेचं एक पाऊल मागं पडतंय’ हे स्मिथचे शेवटचे शब्द होते. त्याला त्याच्या दुष्कृत्याची अंतिम सजा मिळाली. पण ती योग्य मार्गानं मिळाली का हे मात्र सांगता येत नाही!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एक रसायनशास्त्रात काम केलेला म्हणून मी सांगेन की ही पद्धत अमानुष आहे. नायट्रोजन हा गॅस विषारी नसला तरी ऑक्सिजनच्या अभावी तडफडुन म्रुत्यु येतो. ज्या कुठल्या पद्धतीने क्षणार्धात म्रुत्यु येऊ शकेल तीच पद्धत कमी वेदनादायी असेल. म्रुत्युदंड असावा की नसावा हा पुन्हा वेगळा विषय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही मुद्यांशी सहमत. निरोगी व्यक्तीचा एका ठरलेल्या दिवशी अनैसर्गिक किंवा कृत्रिम मार्गाने घडवून आणलेला मृत्यू हा कधीच खऱ्या अर्थाने वेदनारहित किंवा विना त्रास असणे शक्य नाही. तो आणण्यास लागणारा वेळ कमीतकमी असणे हे त्यातल्या त्यात जमवता आले तर तुलनेत कमी वेदनादायक मार्ग असे म्हणता येईल.

त्या दृष्टीने आगोदर बेशुद्धीचे औषध आणि मग हृदयक्रिया थांबवणारी द्रव्ये असा मार्ग थियरीदृष्ट्या तरी कमी त्रास देणारा वाटतो. पण त्यात सुई नीट न लावणे, औषध डोस योग्य न देणे अशा मानवी चुका होत असतील तर कसे चालेल?

दुसरा मुद्दा मृत्युदंड असावा किंवा नाही. हा तर फारच मोठा विषय आहे.

गुन्हेगाराला सुधारण्याची संधी देणे हे शिक्षेचे आणि न्याय व्यवस्थेचे एक ध्येय असते असे म्हटले जाते. ते तसे असेलही. पण तेच एकमेव ध्येय नसावे. तेच एकमेव ध्येय नसले पाहिजे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना इतर समाजापासून विलग ठेवणे (मग ती प्रवृत्ती कोणत्याही कारणाने निर्माण झालेली का असेना ) हे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे. सुधारणेची शक्यता नसलेल्या, कोणताही पश्चात्ताप नसलेल्या, विशिष्ट प्रकारचे गुन्हे केलेल्या, मोठ्या संख्येने मानवी बळी घेणाऱ्या संघटित प्रवृत्ती अशा अनेक प्रकारच्या केसेसमध्ये त्या व्यक्तीला तुरुंगात ठेवून उपयोग असतो हे तर्कदृष्ट्या योग्य वाटत नाही. तुरुंगात अशा व्यक्तीवर होणारा खर्च आणि ती व्यक्ती अतिरेकी किंवा अधिक संघटित गुन्हेगार असेल तर तिच्या सुटकेसाठी होऊ शकणारे अनेक प्रयत्न , हायजॅक, ओलीस ठेवणे या सर्व शक्यता ओपन राहतात.

मृत्युदंडाला पर्याय असलाच तर तो आजन्म कारावास हाच असू शकतो. त्यातही एकांतवास. इतर inmates ची सुरक्षा देखील महत्त्वाची.

आता नीट विचार केला तर मरेपर्यंत उरलेले आयुष्य एकांतवासात खोलीत बंद होऊन काढणे ही देखील एक दीर्घकाळ चालणारी क्रौर्यपूर्ण शिक्षा / वागणूक आहे. तेव्हा क्रौर्य, गुन्हेगाराचा शिक्षा भोगतानाचा कंफर्ट वगैरे गोष्टी थोड्या गहन आहेत.

लेखात म्हटलेले एक वाक्य, की मृत्युदंड मिळाला तरी गुन्ह्याच्या बळीचे जे नातेवाईक असतात त्यांना क्लोजर मिळत नाही.. हेही फार सब्जेक्टिव वाटतेय. आतापर्यंत जेव्हा जेव्हा फाशीची शिक्षा घोषित झाली किंवा दिली गेली तेव्हा संबंधित बळी/ त्यांचे नातेवाईक यांनी "अखेरीस आज न्याय मिळाला" अशीच भावना जाहीरपणे व्यक्त केल्याचे दिसत आले आहे. क्लोजर मिळत नाही असे सरसकट म्हणवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सखोल प्रतिक्रिया.

हो ते वाक्य सबजेक्टिव्ह आहे, म्हणजे त्या शिक्षेला विरोध करणाऱ्या लोकांची ही अर्ग्यूमेंट आहे की तात्पुरतं बरं वाटतं, खरं क्लोजर मिळत नाही. त्यातही बरेचदा गुन्हा घडणे ते मृत्यूदंड मिळणे यात इतकी वर्षं जातात की बहुदा तोवर ती धार बोथट झाली असते? माहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुन्हेगार ज्या क्रूर पद्धतीने गुन्हे करतात ,ते बघता अशा गुन्हेगार लोकांना बिलकुल मानवी हक्क देण्याची गरज नाही
पण जो पर्यंत कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही तो पर्यंत कोणताही गंभीर आरोप असला तरी त्या लोकांचे मानवी हक्क पूर्ण जपले पाहिजेत.
तुरुंगात पण सर्व सुविधा असल्या पाहिजेत त्या पण उत्तम दर्जा चया.
पण कोर्टात एकदा गुन्हा सिध्द झाला की कोणतेच मानवी अधिकार देण्याची गरज नाही..

फक्त भीती ह्याचीच वाटते निरपराधी व्यक्ती अपराधी ठरवला तर ह्या शिक्षा खूप क्रूर आहेत असे मी म्हणेन.
निरपराधी व्यक्ती ल अपराधी ठरवण्यात जे कोणी सहभागी असतील त्यांना गुन्हेगार ठरवण्याची नवीन पद्धत सुरू केली पाहिजे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण निरपराधी व्यक्तीला अपराधी ठरवल्यावर ती पुन्हा निरपराधी आहे हे कसं कळणार? अपील मध्ये का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपील परत केल्यावर आणि कोर्टाने अजून सखोल चोकशी चे आदेश दिले तर ज्याला शिक्षा केली तो तर अपराधी च नव्हता हे सिद्ध झाल्याची जगात उदाहरणे आहेत.
पण अपील करणारा आणि त्याची दखल घेणार कोणी तरी असला पाहिजे.

कधी ज्यांनी खोट्या आरोपात अडकवलेले असते ,ज्यांनी खोट्या साक्षी दिलेल्या असतात,तपास अधिकाऱ्यांनी त्यांचे कर्तव्य नीट पूर्ण केलेले नसते त्यांना पश्र्वताप होतो आणि ते खरे सांगतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विषय अत्यंत अप्रिय असला तरीही लेख आवडला.

सवांतर : एरवी बाजार काय ती काळजी घेईल, असं म्हणणारे अमेरिकी उजवे, कंपन्यांनी असे निर्णय घेतले - मृत्युदंडासाठी आम्ही तयार केलेली रसायनं देणार नाही - की त्याबद्दल मूग गिळतात. किंवा फ्लोरिडात डिस्नीच्या LGBTQI+ लोकांच्या समर्थनाविरोधात तर खुनशी भूमिकाच घेतली रॉन डिसँटिसनं. डिस्नी त्याला सध्यातरी पुरून उरलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मृत्यूदंड वैध किंवा अवैध असणारी राज्येसुद्धा बहुदा party line प्रमाणे विभागली असावीत असा अंदाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0