जाणीव भान भाग -7

मला माहित आहे हे माहित असणे किती चांगले!

इतर प्राण्यांच्या पेक्षा माणूस प्राणी वेगळा आहे याची प्रचीती माणसातील स्व-भानामुळे (self-awareness) आली. आपल्या घरातील पाळलेल्या कुत्र्याला अनेक गोष्टी समजत असतील – भूक लागली, फिरण्याचा कंटाळा आला, शी-शू आली, वा स्वयंपाक घरात काही चविष्ट पदार्थांचा वास येत आहे, (मोबाइलचा रिंग टोन वाजल्या वाजल्या मोबाइल आणून देतो) इ.इ. परंतु या कुत्र्याच्या मालकाला या प्रकारच्या संवेदनाबरोबरच आणखी वरच्या पातळीवरील क्रिया-प्रक्रियांचीसुद्धा ज्ञान असते. माणूस म्हणून आपल्याला यासंबंधातील इतर अनेक गोष्टी समजत असतात – भूक लागली असली तरी ही वेळ खाण्याची नाही, फिरण्याचा कंटाळा आला असला तरी घरी जाऊनच विश्रांती घ्यावी लागणार, शी-शूसाठी योग्य आडोसा शोधावे लागणार, चविष्ट पदार्थ तुम्हाला वाढेपर्यंत वाट पहावी लागणार, इ.इ. – या गोष्टीसुद्धा आपल्याला माहित असतात. व यातूनच आपल्या भावना व्यक्त होतात व योग्य निर्णय घेतले जातात.

एवढा वेळ फिरून आल्यामुळे मला थकवा जाणवत आहे. एक पाऊलही मी यापुढे ठेऊ शकत नाही. परंतु रात्रीच्या पार्टीला मात्र मी जरूर जाईन. हे फक्त माणसांच्या बाबतीतच घडू शकते. कारण शारीरिक उणीवावर मात करण्यासाठीचे मनोधैर्य माणसात असते. माणसातील या गुण विशेषाला अंतर्निरीक्षण (meta-cognition) असे म्हटले जाते. स्वतःच स्वतःबद्दलचा माहिती मिळवणे यात अंतर्भूत असते.

p1

जाणीव विषयाच्या अभ्यासकांच्या मते स्वतःबद्दलची माहिती असणे, स्वतःचे विश्लेषण करणे या संबंधात माणूस हा एकमेव अपवाद नसेलही. परंतु मानवी मानसिकतेचा विकास या self-awareness मधूनच होत गेला असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. यापूर्वीच्या संशोधकांनी केवळ माणूस प्राण्यातच हे स्वभान असते की इतर काही बुद्धीमान समजल्या जाणाऱ्या प्राण्यातसुद्धा आहे याचा अभ्यास केला आहे. काही अभ्यासकांच्या मते डॉल्फिन वा वानर प्राणीवंशातील काही प्राण्यामध्ये self-awarenessचे अंश सापडतात. परंतु काही चिकित्सक या निष्कर्षास संमती देण्यास तयार नाहीत.

स्वभानाविषयी माणूस विचार करत असताना त्याच्या मेंदूचे स्कॅनिंग केल्यास डोक्याच्या समोरील भागातील Prefrontal कॉर्टेक्समध्ये हालचाली दिसू लागतात. परंतु त्याचे मोजमाप करणे जिकिरीचे ठरत आहे. चाचणीच्या वेळी दिलेल्या उत्तराबद्दल कितपत खात्री आहे, या प्रश्नाचे उत्तर चाचणीला सामोरे जाणाऱ्या व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून असू शकते. त्यामुळे आपण स्वभानाचे मोजमाप करत आहोत की बौद्धिक क्षमतेचे हा संभ्रम निर्माण होतो. एका अभ्यासगटाने यासंबंधीचे प्रयोग करताना करड्या रंगाच्या अनेक छटा असलेल्या पट्ट्यांचे चित्रं काढून दाखविण्याची व्यवस्था केली. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार रंगाच्या छटामध्ये काही सूक्ष्म बदल केल्यामुळे त्यांच्यातील दृष्टीदोषाचा चाचणीवर होणाऱ्या परिणामाला वगळणे शक्य झाले. त्यामुळे चाचणीच्या या भागासाठी प्रत्येकाला शंभरपैकी 70 पेक्षा जास्त गुण मिळाले. आता उरलेला प्रश्न म्हणजे प्रत्येकाची खात्रीपणाविषयी केलेले भाष्य. यात मात्र फार मोठा फरक जाणवला. चाचणीच्या वेळी प्रत्येकाच्या मेंदूचे स्कॅनिंग केले जात होते. त्यावरून ज्यांच्यात स्वभान जास्त कार्यक्षम आहे त्याच्या anterior prefrontal cortex जवळील ग्रे मॅटर जास्त आहे हे लक्षात आले. यावरून इतर प्राण्यांपेक्षा माणसातच हा फरक जाणवत असेल का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

मेंदूचे कार्य कसे चालते यासाठी अजून एका प्रकारे चाचणी करणे शक्य आहे. आपल्याला नेहमीप्रमाणे/नीटपणे काम करता येत नाही असे वाटत असताना मेंदूचे कुठले भाग कार्यरत असतात ही माहिती मिळवता येईल. याचे अंधदृष्टी वा blind-sight असे तांत्रिक नाव आहे. मेंदूला इजा झाल्यामुळे डोळे असूनसुद्धा काहींची दृष्टी गेलेली असते. परंतु काळजीपूर्वक चाचणी घेतल्यास अगोचरपणे त्यांना वस्तूंचे ज्ञान आहे हे लक्षात येते. जेव्हा त्यांच्या हातात एखादी वस्तू देऊन ओळखण्यास सांगितल्यास यदृष्टपणे वस्तू न ओळखता विचारपूर्वक सांगितल्याची उदाहरणं नक्कीच सापडतील. खरे पाहता त्यांच्यात दृष्टीदोष असूनसुद्धा अनकॉन्शियसली त्या वस्तूबद्दलची माहिती स्मृतीपटलातून ते मिळवत असावेत.

अंधदृष्टी हा प्रकार मेंदूच्या पाठीमागे असलेल्या visual cortex ला काही इजा झाल्यास होऊ शकतो. कारण येथे डोळ्यातील optical nerves मधून आलेला माहिती साठवली जाते. मेंदूतील प्रतिमांच्या अभ्यासात prefrontal cortex ला जोडणाऱ्या nerves नासुद्धा इजा झालेले असल्यास त्यांच्यातही हा दृष्टीदोष असू शकतो हे आढळले. त्यामुळे अंतर्निरीक्षण (meta-cognition) हा प्रकार असू शकतो या संकल्पनेला पुष्टी मिळाली.

मेटा-कॉग्निशनच्या प्राथमिक पातळीवर delusions, hallucinations वा schizophrenia चे केसेस सापडतील. एका प्रयोगात संगणकातील कर्सर हलवण्यासाठी काही रुग्णांना व इतरांना प्रशिक्षण दिले. या सर्वांना आपण कर्सरवर नियंत्रण ठेऊ शकतो याची खात्री पटल्यानंतर प्रयोगकर्तीने त्यांच्या न कळत कर्सरची हालचाल करू लागली. रुग्णांना नेमके काय होत आहे हे कळेनसे झाले व सर्व जण गोंधळले. परंतु रुग्ण नसलेले मात्र न गोंधळता काही तरी गडबड आहे हे ओळखत होते.

छिन्न मानसिकतेच्या रुग्णांना त्यांचे नियंत्रण दुसरेच कुणी तरी करत आहेत, त्यांच्या वर्तनात बदल घडवणारे दुसरेच कुणी तरी आहेत असे वाटत असते. उदाहरणार्थ प्रयोगाच्या वेळी लावलेला प्रोब काढून टाकला तरी आपले नियंत्रण प्रोब करत आहे अशी एक दाट शंका त्यांच्या मनात असते.

मेटा-कॉग्निशन या गुणविशेषाचा वापर करून अशा रुग्णांच्यावर उपचार करता येते असे लक्षात आले आहे. 7 ते 11 वर्षे या वयोगटातील अशा रुग्णांच्यावर हे उपचार केल्यानंतर अंतःप्रेरणेतून निर्णय घेणे त्यांना शक्य झाले. परंतु त्याची कारणमीमांसा करणे त्यांना जमत नव्हते. ज्या गोष्टी त्यांना माहित होत्या तेथेच ते जास्त वेळ घुटमळत होते. परंतु नवीन काही शिकविल्यास ते घाबरत होते. याप्रकारच्या प्रयोगात भर घालून किंवा काही नाविन्यपूर्ण प्रयोग करून असा रुग्णांच्यामध्ये सुधारणा करणे सहज शक्य आहे, असे अभ्यासकांना वाटत आहे. परंतु रुग्ण नसलेल्यांना मात्र या प्रकारचे प्रशिक्षण दिल्यास त्यांच्यातील जाणीव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे का? हेही अजमावण्यात आले. तुमच्यातील जाणीवा अगोदरच तांबड्या रंगाबद्दल खात्री बाळगून असल्यास अशा प्रशिक्षणातून हाती काही लागणार नाही. परंतु तुम्ही जे बघत आहात किंवा त्यासंबंधात एका निर्णयाप्रत पोचत आहात तेव्हा मात्र या स्वभानाच्या प्रयोगांचा खात्रीशीर उपयोग होऊ शकतो.
क्रमशः
या पूर्वीचेः
बुद्धीमान रोबो: जाणीव भान – 1 https://aisiakshare.com/node/8827
मेंदू’ नावाचे मशीन: जाणीव भान – 2 https://aisiakshare.com/node/8837
बदलत्या स्थितीतून शिकण्यासारखे... जाणीव भान – 3 https://aisiakshare.com/node/8845
बधिरावस्थेचे गूढ: जाणीव भान – 4 https://aisiakshare.com/node/8852
मेंदूतील क्रिया – प्रक्रियांचे निरीक्षण: जाणीव भान – 5 https://aisiakshare.com/node/8887
जाणीव प्रारूप जाणीव भान भाग – 6 https://aisiakshare.com/node/8904

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet