अनाथ

#लायबेरिया #संकल्पनाविषयक #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

अनाथ

- शिल्पा केळकर

"Welcome my brothers and sisters to our manyatta, my name is James," असं म्हणत तो कृष्णकांत मसाई गोप दिलखुलास हसून, हस्तांदोलन करत आमचं स्वागत करतो. कोलगेट हास्याचे त्याचे पांढरेशुभ्र दात चमकतात. त्याच्या हस्तांदोलनातली ऊब त्याच्याशी माझे असलेले वैश्विक नाते माझ्यापर्यंत पोचवते. मसाई ही केनियामधली आदिवासी भटकी जमात. अम्बोसेलिच्या आवारात असलेली ही त्यांची वसाहत, मसाईंच्या ‘मा’ भाषेतील मन्याट्टा. बाहेरून बाभळीच्या काट्यांनी बनवलेले गोलाकार कुंपण. सिंह, हैना अशा हिंस्त्र जनावरांपासून संरक्षण करणारे. गायीचे शेण, गवत, झाडे यांपासून बनवलेली वीस-पंचवीस छोटेखानी इंकाजी म्हणजे त्यांची राहाण्याची घरं. मध्यभागी आणखी एक कुंपण आणि त्याच्या आतली जागा गायींसाठी.

मसाई

आमच्या स्वागताला जमलेले दहापंधरा मसाई. त्यांचा अंगावर चरबीचा जरासाही लवलेश नसतो. चवळीच्या शेंगेसारखे सडपातळ, उंचेपुरे आणि कृष्णवर्णीय. पांढरे शुभ्र दात आणि नितळ हसरे चेहरे. अंगावर भडक लाल, निळ्या, हिरव्या रंगाचे गुंडाळलेले कापड. त्यांच्या भाषेतले शुका. हातात तशीच सडपातळ काठी. एक पाय दुसर्‍या पायासमोर ठेवून, काठीवर भार देऊन उभे राहण्याची एक वेगळीच लकब. डोक्यावर मोतीमण्यांचे मुकुट. मोरपीस आणि बासरीचीच काय ती कमी. आमचे स्वागत म्हणून ते संगीत ऐकवण्यापासून सुरुवात करतात. वेगवेगळ्या पट्टीतल्या आवाजांनी बनलेले आणि कुठलेही वाद्य नसलेले ते संगीत आणि त्यांच्या उंच उड्यांचा नाच. सारेच आगळेवेगळे.

आमच्या टूर गाईड गोपाचे नाव जेम्स नक्कीच नसणार म्हणून मी त्याला त्याचे खरे नाव विचारते. तो म्हणतो, "नान्यानेलो." त्या नावाच्या उच्चाराचा ध्वनी आम्हा सर्वांना मोहावतो आणि नारायणाचा नान्यानेलो कधी होतो हे आम्हालाही समजत नाही. आणि मग पुढचे दोनतीन तास नान्यानेलो आम्हाला त्याच्या मन्याट्टात फिरवून एक वेगळेच विश्वदर्शन घडवतो.

मसाई

मन्याट्टा एक नांदते गोकुळच. दुभत्या गायी, वासरे, लहान मुले आणि मोत्याच्या दागिन्यांनी मढलेल्या गोपींनी भरलेले. एका गोपाच्या दोनतीन गोपी. बायका आणि पुरुष सर्वांनीच विविध प्रकारचे दागिने घातलेले. कुठलाच फरक नाही. कानाची भोके मुद्दाम मोठी करून त्यात घातलेले लोंबते दागिने. एक विशिष्ट प्रकारचा रोग टाळण्यासाठी म्हणून पाडलेले पुढचे दोन दात. त्यामुळे सर्वांचेच बोळके हसू. बायांची डोकी पूर्ण भादरलेली तर गोपांचे लांब केस वेण्यांत गुंफलेले. हे सगळे सौंदर्याच्या रूढ संकल्पना मोडत माझ्यासारख्या शहरी मनाच्या इस्त्रीला धक्का पोचवते.

त्यांची लहानगी कुतुहलाने आमच्याभोवती जमतात. नान्यानेलोला मी विचारते ह्यांचे खाणेपिणे काय असते. तो म्हणतो, त्यांना आम्ही रोज सकाळी गायीचे रक्त आणि दुपारी दूध देतो. ते ऐकून माझे शहरी मन अचंबित. गायीच्या मानेला विशिष्ट ठिकाणी टोचून रक्त काढले जाते आणि ते गोळा करून लहाने मुले, म्हातारी आणि आजारी माणसे यांना दिले जाते. शिवाय जेव्हा गाय नैसर्गिकरीत्या मरते, त्या वेळी तिचे मांस खाल्ले जाते, कातडे कपड्यांसाठी वापरतात. शेपूट आणि नख्या दागिन्यांमधे. अशा रीतीने गाय ही त्यांची कशी सर्वार्थाने माता आहे हे तो समजावू लागतो. माझे पापभीरू मन "माता समजणार्‍या गायीचे मांस खाल्ले जाते" हे ऐकून तिथेच अडकलेले असते. मी नान्यानेलोला आमच्या संस्कृतीतही गाय पूजनीय असते हे सांगते. पण, "गायीचे मांस नाही खात, फक्त दूध पितो," हे ऐकल्यावर आता अचंबित होण्याची वेळ नान्यानेलोची असते. तो इतरांच्या कानात काही कुजबुतो आणि सारेच माझ्याकडे पाहू लागतात. "माता मानता तर तिचे मांस टाकून कसे देता, तिचे सगळेच आपले नाही का?" या सवालाला माझ्याकडे उत्तर नसते. पुस्तकातून नुसते वाचलेले असते की, प्रत्येक समाज वेगळ्यावेगळ्या भौतिक परिस्थितीत वाढतो. वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड देत त्यांचे रीतिरिवाज बनतात. त्याचे हे वास्तववादी रूप माझ्या मनातल्या निषिद्धअनिषिद्धच्या संकल्पनांना मोडू लागते.

एव्हाना आभाळ भरून आलेले असते. संध्याकाळ होत आल्याने गायीही रानातून चरून आलेल्या असतात. नान्यानेलो गायीचे दूध काढणार का विचारतो आणि मी लगेच तयार होते. अगदी तशीच कपिला गाय. तिच्या आचळाला हात लावताच तिच्या शरीराची ऊब माझ्या शरीरात पसरते. धारोष्ण दूधाची पिचकारी फेस करत उडते. आणि मी अफ्रिकेतून एकदम कृष्णाकाठच्या पांजरपोळात पोचते. कच्च्या मातीची आणि दगडधोंड्यांनी भरलेली पायाखालची जमीन. त्यावर कित्येक दिवसांपासून साठलेल्या शेणाची अगदी गालिच्यासारखी वाटणारी मऊशार गादी. दूध आणि शेणाचा उग्र दर्प, गायीचे खर्जातले दीर्घ व्याकूळ हंबरणे, लहानपणच्या आठवणींनी माझे मन भरून टाकते. आणि दुधाच्या फेसाने भांडे भरत राहाते.

झोपडी

भरून आलेल्या आभाळाने आता आम्हांला रानातला पाऊस दाखवण्याचा चंग बांधलेला असतो, आणि पाऊस ओतायला सुरुवात होते. इथला पाऊसही शहरी पावसापेक्षा निराळा. शहरातला पाऊस इमारतींमधून जागा शोधत अंग चोरत पडणारा, तर इथला मोकळाढाकळा. मालकीहक्काने कोठूनही प्रवेश करणारा. नान्यानेलो आणि त्याचे सहकारी पावसाने आनंदित होतात. त्यांची शरीरे आणि मनेही चिंब भिजून निघताता. तर आमचे शहरी चेहरे चिंताक्रांत आणि मने कोरडीच. पावसात मनसोक्त भिजण्याऐवजी महागड्या कॅमेऱ्यांना पाणी लागून खराब होणार या काळजीपोटी आडोसा शोधायला पहातात. शेवटी नान्यानेलोला कीव येते आणि तो एका घरात सर्वांना घेऊन जातो. कमरेत वाकून घरात प्रवेश करावा लागतो. इंग्रजी एस आकाराचे ते लहानसे खोपटे. ओंजळीत भरून घेता येईल इतका दाट काळोख आत. एका कोपर्‍यात धगधगते निखारे. ते स्वयंपाकघर आहे हे नंतर समजते. छपरावर पडणारा पाऊस, आतला दाट काळोख आणि धुराचा मंद वास. प्रदूषणाला निर्ढावलेले आमचे शहरी जीव झोपडीत कोंदटतात. आम्ही सगळे पटापट बाहेर पडतो. आता आम्हा सगळ्यांनाच मस्त खरपूस वास येऊ लागलेला असतो.

आमची भेटीची वेळ संपत आलेली असते. नान्यानेलो आम्हाला सोडून दुसर्‍या प्रवासी लोकांच्या समूहाचे स्वागत करण्यासाठी वसाहतीच्या प्रवेशद्वारापाशी जातो. लांबून त्याला आणखी एक टूरिस्ट लोकांच्या गाडीचा जथा येताना दिसतो. नान्यानेलो आता हरणाच्या गतीने त्यांच्याकडे धावतो. ते मला पाहावत नाही. खरे तर त्याचे हे दिमाखदार धावणे असायला हवे मोकळ्या रानात, एखाद्या प्राण्यामागे. पण आता परिस्थिती बदललेली असते. खरे तर स्वयंपूर्ण असलेली ही भटकी जमात. आपल्या गायी, शेळ्या सांभाळत फिरणारी. हा सारा मुलूख तर त्यांच्याच मालकीचा. त्यांच्या जनावरांना कुठेही चरण्याचा मान. सिंहाने हल्ला केलाच तर त्याच्यापासून स्वसंरक्षण करण्याची ताकद, बळ आणि धाडसही ह्यांच्याकडे. पण आधुनिकीकरणाने त्यांचे हे हक्कच हिरावून घेतलेले. कातडी, मांस, दात याच्या विक्रीसाठी शहरी माणसाने हत्या केल्याने प्राणी संपत आल्यावर जागे झालेले शासन. मग प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी जंगलाचे नॅशनल पार्क केले गेले. त्यातून उत्पन्न मिळेल असा मार्ग दिसताच मसाई लोकांना त्यांच्याच हक्काच्या जागेतून बाहेर काढले गेले. आता त्यांना तिथे जायला आणि त्यांच्या गायींना जंगलातून चरायचीही परवानगीही नाही. स्वत:च्या घरातून हाकलवून दिलेले हे अनाथ. इथे प्राणी पाहायला येणार्‍या प्रवासी लोकांवर आपली गुजराण करू लागले. आपल्या वसाहती दाखवून, मोत्यामण्यांचे दागिने विकून आणि संगीत-नॄत्याचे प्रात्यक्षिक करून एका जमातीचे बाजारीकरण केले गेले. सिंहाशी धाडसाने एकहाती मुकाबला करणाऱ्या मसाईंनी प्रगती नावाच्या सिंहासमोर मात्र शरणागती पत्करली. बहुधा हा जगरहाटीचा नियमच असावा. बदलाची रेषा अंश एकदा इकडे, एकदा तिकडे. प्रत्येक व्यक्ती, समाज हा त्या बदलाचा बिंदू. आणि त्यात सतत बदल होत जाणारी गतिमान स्थिरता.

पाऊस आता थांबलेला असतो. शेवटच्या घटका मोजत असलेल्या मरणप्राय जंगलच्या राजावर गिधाडे जशी न घाबरता उतरतात, तसा नव्या टूरिस्टांचा थवा, खिशातल्या डॉलरच्या नोटा सांभाळत या मन्याट्टावर उतरतो. आणि नान्यानेलो त्यांचे तरीही अगदी मनापासून हसून स्वागत करत म्हणतो, "Welcome my brothers and sisters to our manyatta, my name is James."

field_vote: 
0
No votes yet