जाणीव भान – भाग 3

बदलत्या स्थितीतून शिकण्यासारखे...

a1
आज तुम्ही हेच कपडे का घातले? कधी नव्हे ते आजच तुमच्या शेजाऱ्याशी तुम्ही का बोललात? आजच तुम्ही दिवसभराच्या कामांची यादी का केली? तुम्हाला यासारख्या प्रश्नांची सयुक्तिक कारणं माहित आहेत असे वाटत असले तरी ते काही खरे नाही. या गोष्टींचा अभ्यास करत असताना संशोधकांना काही आश्चर्यकारक गोष्टी दिसल्या. मुळात हा अभ्यास मेंदूवरील शस्त्रक्रिया झालेल्यांच्या संदर्भात करण्यात आला होता. मेंदूच्या दोन्ही भागांना जोडणाऱ्या स्नायूंच्या गठ्ठ्यात बिघाड झाल्यास एपिलेप्सी हा मेंदूचा आजार होतो. अशा काही रुग्णांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतरच्या चाचणीत या रुग्णांना समोर धरलेली वस्तू प्रत्येक डोळ्याला वेगवेगळी जाणवत होती. वरवरून पाहता हे रुग्ण चारचौघासारखे दिसत होते. परंतु वस्तू ओळखण्यात ते कमी पडत होते. एका रुग्णाला खड्डा खणत असलेल्या कामगाराचे चित्र दाखविले. चित्रातील कामगाराच्या उजव्या हातात फावडा होता. तरी त्याला ते डाव्या हातात आहे असे वाटत होते. याबद्दलचे स्पष्टीकरण विचारल्यानंतर तो आणखीन जास्त गोंधळला. मुळात सामान्यपणे डाव्या डोळ्याचे व डाव्या हाताचे नियंत्रण उजव्या मेंदूकडे असते. आणि स्पष्टीकरणाच्या भाषेचे नियंत्रण डाव्या मेंदूकडे असते. परंतु या रुग्णाच्या डाव्या मेंदूला उजव्या मेंदूतील गोष्टींचे आकलन होत नव्हते. त्यामुळे हा रुग्ण खड्ड्याशी संबंधित नसलेल्या गोष्टी बोलत होता. फावडा सूप पिण्यासाठी असते असे काही तरी असंबद्ध तो बोलत होता.

हा अभ्यास interpretive brain या सिद्धांताला पुष्टी देणारा ठरला. या सिद्धांतात आपण करत असलेल्या कृतीचे समर्थन करत भोवतालच्या जगात काय घडत आहे याचा नेमका अर्थ लावण्याचे काम आपला मेंदू करत असतो, अशी मांडणी आहे. कदाचित ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया असण्याची शक्यता असू शकते. मेंदूवर शस्त्रक्रिया केलेल्यांना एखाद्या चित्राची निवड करण्यास सांगितल्यास त्यांच्या मनात गोंधळ उठतो. काही क्षणापूर्वी निवडलेले चित्र त्यांना आठवत नाही. मात्र यासाठी त्यांना दिलेले स्पष्टीकरण खात्रीशीर असते. परंतु हे सगळे काल्पनिक आहे, हेच त्यांच्या लक्षात येत नाही. आपली जाणीवसुद्धा काही प्रमाणात चलाखी तर करत नसेल ना?

अगदी मादकद्रव्यांचा सेवन न करतासुद्धा बदललेल्या जाणिवाचा आपल्याला अनुभव येत असतो. तो एक संधीकाल असतो. त्या संधीकालात आपण जागे आहोत की झोपेत की बेशुद्धावस्थेत हेच आपल्याला कळेनासे होते. अर्धनिद्रावस्थेत असलेल्यांचे नीटपणे निरीक्षण केल्यास याबद्दलच्या काही गोष्टी समजतील. त्या काळात ती व्यक्ती जवळ जवळ संवेदन संभ्रमावस्थेत (hallucinoid) शिरली आहे असे म्हणता येईल. याचे नेमके कारण कळत नसले तरी मेंदूचा काही भाग इतर भागापेक्षा लवकर निद्रितावस्थेत पोचत असावा. यावरून मेंदूचे भाग वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या अवस्थेत असू शकतात असे म्हणता येईल.

परंतु हीच संवेदन भ्रमावस्था काहींच्यातील सर्जनशीलतेला उद्युक्त करू शकते. फ्रेड्रिक ऑगस्ट केकुलीला बेंझीनची रचना अर्धनिद्रितावस्थेच असतानाच सुचली. प्रसिद्ध चित्रकार सॅल्व्हाडोर दाली झोपेतून उठण्यासाठी ग्लासच्या कडेला चमचा अधांतरी ठेवल्यासारखे ठेवत होता. चमचा खाली पडला की पडला तो जागा होत असे. त्या छोट्याशा अवधीत पडलेल्या स्वप्नातील दृश्याचे तो चित्र काढत होता.

a2

ही संवेदन भ्रमावस्था मौज मजेची गोष्ट नाही. यामुळे sleep paralysis होण्याची शक्यता असते. झोप यायच्या अगोदरच माणूस स्वप्नावस्थेत पोचतो. या स्थितीला hypnagogia असेही म्हटले जाते. हा आजकाल एक संशोधनचा नवीन विषय असून संशोधकांना अजून फार मोठा टप्पा गाठावयाचा आहे.

हाच धागा पकडून डुलकी घेत असलेल्यांच्या मेंदूतील विद्युत प्रवाहाची EEG द्वारे नोंद करण्यात आली. या व्यक्तींना स्वप्नाची सुरुवात झाल्यानंतर बटन दाबण्यास सांगितले होते. परंतु त्यांना हे शक्य झाले नाही. कारण संभ्रमावस्था, स्वप्न आणि झोप यातील सीमारेषा अगदीच पुसट होत्या.

अगदीच अपवाद असला तरी काहींच्या बाबतीत उजव्या बाजूचे नियंत्रण उजव्या मेंदूकडे असू शकतो. त्यांना नको असतानासुद्धा ते काही वस्तू हातात पकडतात. दुसऱ्या हाताने ते थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होत नाही. डॉक्टरांच्याकडे सल्ल्यासाठी जातानासुद्धा हात बांधून घेऊन त्यांना जावे लागते. कदाचित मेंदूतील Supplementary Motor Area (SMA) ला इजा झाल्यामुळे बाहेरच्या दृश्यानुसार कृती होत असावी. मेंदूतील दोन्ही भागातील SMA निकामी झालेले असल्यास त्यांच्या दोन्ही हातावरील नियंत्रण तुटलेले असते त्यामुळे ते काहीही करत सुटतात. भोवतालच्या दृश्याचे ते बळी ठरलेले असतात.

ही अवस्था माणसातील free will ला छेद देणारी ठरेल. आपण करत असलेली कुठल्याही छोट्या – मोठ्या कृतीला आपण जवाबदार असतो. आपल्यातील जाणीव कृतीचे नियंत्रण करत असते. परंतु SMAला इजा झालेले चेतनाशून्य, अबोध या अवस्थेत कृती प्रवण झालेले असतात. ही अवस्थाच कृतीचे नियंत्रण करत असते. जाणिवेला तेथे स्थान नाही.

हे जरा विचित्र वाटत असल्यास तुम्ही तुमचे अनुभव तपासून बघू शकता. सुट्टीच्या दिवशीसुद्धा तुमची कार आपोआपच ऑफिसच्या दिशेने जात आहे, हे तुमच्या आयुष्यात अनेक वेळा जाणवलेले असेल. अशा प्रकारचे नियंत्रण तुमच्या मेंदूतील premotor cortex करते व त्याला भोवतालचे दृश्य तसे करण्यास भाग पाडते.
क्रमशः
या पूर्वीचेः
बुद्धीमान रोबो जाणीव भान भाग - 1
मेंदू’ नावाचे मशीन जाणीव भान भाग - 2

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फ्री विल वरचा हा ५ मि. टेड शो लक्षात राहिला होता.
लेखमाला माहितीपूर्ण आहे, अधिक वाचनासाठी संदर्भ दिलात तर आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0