रामायण व महाभारत - भाग ५

रामायण व महाभारत – कथानकाचा काळ

सुधीर भिडे

मागील भाग इथे.

विषयाची मांडणी
लिखाणाचा काल आणि कथानकाचा काळ
अतिप्राचीन घटनांचा काल ठरविण्यासाठी खगोलशास्त्राचा वापर
निलेश ओक यांचे संशोधन – महाभारत
निलेश ओक यांचे संशोधन – रामायण
ओकांच्या मतात कितपत सत्यता?
ओकांसारखे इतरही प्रयास
पुरातत्व संशोधन
निष्कर्ष
---

लिखाणाचा काल आणि कथानकाचा काळ
भाग एकमध्ये आपण खालील माहिती पाहिली -

वि. स. खांडेकर यांनी ययाती ही कादंबरी विसाव्या शतकात लिहिली. या कादंबरीचा लिखाणाचा काल विसावे शतक तर कथानकाचा काल चार हजार वर्षांपूर्वीचा.

समजा १९५० साली एका लेखकाने माधवराव पेशव्यांच्या जीवनावर कादंबरी लिहिली. दुसऱ्या लेखकाने २०२० साली शहाजी राजांच्या जीवनावर कादंबरी लिहिली. मागून लिहिलेली कादंबरी आधीच्या कालाचा इतिहास सांगते.

असाच काहीसा प्रकार महाभारत आणि रामायण या बाबतीत झाला असावा. दोन्ही ग्रंथांची निर्मिती बुद्धाच्या कालानंतर झाली. दोन्ही ग्रंथांतून ज्या समाजाचे वर्णन आले आहे तसा समाज बुद्धपूर्व ५०० वर्षात म्हणजे आजपासून साधारणपणे ३००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असावा. आता असा प्रश्न निर्माण होतो की या दोन काव्यांपैकी कोठले काव्य आधीच्या समाजाचे चित्रण करते?

वर पाहिल्याप्रमाणे रामायणाचा लिखाणाचा काल सन २५० आणि महाभारताचा सन ३५०.

निरनिराळ्या प्रकारे विचार केला तर महाभारतातील समाज रामायणातील समाजाच्या आधीचा असावा.

समजण्यासाठी असे म्हणू की महाभारताच्या कथानकाचा काल ख्रिस्तपूर्व १००० तर रामायणाच्या कथानकाचा काल ख्रिस्तपूर्व ८००, हे सर्व काल अर्थातच ढोबळ मानाने लिहिले आहेत. हा कालखंड वेदकालानंतर आणि बुद्धकालाआधी येतो.

महाभारताच्या कथानकाचा काल रामायणाच्या कथानकाच्या आधीचा वाटतो याचे एक कारण भौगोलिक विस्तार. महाभारताची कथा सप्तसिंधूच्या प्रदेशात घडते. इंद्रप्रस्थ ही जागा पण ओसाड असे वर्णन येते. तेथे नाग लोकांची वस्ती होती. त्यांना तेथून घालवून लावून पांडवांनी आपले राज्य स्थापले असा उल्लेख येतो. या उलट अयोध्या सप्तसिंधूपासून पुष्कळ पूर्वेकडे आहे. आणि रामकथा तेथून दक्षिणेला जाते.

महाभारतात कुटुंबरचना विस्कळीत आहे कोणाचा कसा जन्म झाला याला महत्त्व नाही. रामायणात लग्न आणि कुटुंब ही कल्पना सुनिश्चित आहे.

अतिप्राचीन घटनांचा काल ठरविण्यासाठी खगोलशास्त्राचा वापर
गुंडाळलेल्या दोरीतून भोवरा सोडला की प्रथम भोवऱ्याचा अक्ष – अक्सिस – axis – सरळ असतो. गती कमी झाली की अक्ष तिरपा होतो आणि भोवरा फिरत असताना डगमगतो. पृथ्वीचे असेच आहे. पृथ्वी स्वत:भोवती फिरत असताना तिचा अक्ष गोल फिरत असतो. याला इंग्रजीत प्रीसेशन म्हणतात.


Earth's precession

याचे दोन परिणाम दिसतात –
ज्याला आपण ध्रुव तारा म्हणतो – जो पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या वर असतो – तो बदलतो. १४००० वर्षांनी किंवा १४००० वर्षांपूर्वी ज्याला आपण उत्तर ध्रुव म्हणतो – तो व्हेगा नावाचा तारा होता/ असेल. जेव्हा इजिप्त मध्ये पिरामिड्स बांधले गेले तेव्हा उत्तर ध्रुवाच्या वर थुबन नावाचा तारा होता.

अर्थात हे पूर्ण सत्य नाही. कारण १४००० वर्षात पृथ्वीच्या सापेक्ष ताऱ्याची जागा थोडी बदललेली असते.

दुसरा परिणाम म्हणजे जशी शतके जातात तसे सूर्य उगवताना निराळ्या नक्षत्राच्या जवळ असतो.

याचा अर्थ असा झाला की एखाद्या जुन्या ग्रंथात नक्षत्रांची स्थिती नोंदविली असेल तर त्या काळाचे अनुमान करता येते.

निलेश ओक यांचे संशोधन – महाभारत

निलेश ओक अमेरिकेत असतात, ते केमिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी रामायण आणि महाभारत यांचा कालखंड या विषयावर बरेच संशोधन केले आहे. 'निलेश ओक - रामायण आणि महाभारत' असे युट्यूबवर शोधले की त्यांचे पुष्कळ व्हिडिओ मिळतात. महाभारत आणि रामायण आपला इतिहास आहे असे ओक यांचे मत आहे.

महाभारताविषयी त्यांचे संशोधन काय आहे?
महाभारत काव्यात ३०० पेक्षा जास्त वेळेला खगोलशास्त्राचा उल्लेख येतो – जसे की नक्षत्रे आणि तारे यांची स्थिती, ग्रहणे, ग्रहांची स्थिती. खगोलशास्त्राच्या अभ्यासकांना वर्णन केलेली स्थिती केव्हा असावी याचा अंदाज बांधता येतो. एक उदाहरण म्हणजे सप्तर्षी आणि ध्रुव तारा. सप्तर्षी (आणि इतर नक्षत्रे) ध्रुव ताऱ्याभोवती घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरताना आकाशात दिसतात. या प्रवासात वशिष्ठ ताऱ्यामागे अरुंधती तारा जाताना दिसतो. महाभारतात एक श्लोक असा आहे की अरुंधती तारा वशिष्ठ ताऱ्याच्या पुढे जातो. अशी स्थिती केव्हा असण्याची शक्यता आहे?


Vashishth behind Arundhati

ओक यांच्या संशोधनाप्रमाणे ख्रिस्तपूर्व ५५६१ या वर्षी अशी स्थिती आली होती आणि त्यानंतर कधीच येणार नाही. यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की महाभारत युद्धाचा काल ख्रिस्तपूर्व ५५६१, म्हणजे ७५०० वर्षापूर्वीचा आहे. या शिवाय महाभारतात इतर खगोलशास्त्रीय संदर्भ आले आहेत त्यावरूनही हाच निष्कर्ष येतो असे ते म्हणतात.

खगोलशास्त्राशिवाय पुरातत्व, भूविज्ञान, हवामान शास्त्र, समुद्रशास्त्र अशा निरनिराळ्या शास्त्रांत कालाविषयी पुरावे शोधता येतात. समुद्रशास्त्राच्या पुराव्याची ओक अशी माहिती देतात.

हिमयुग जेव्हा उच्च श्रेणीवर होते, तेव्हा समुद्राची पातळी खाली होती. जसे हिमयुग संपत चालले तशी समुद्राची पातळी वाढू लागली. परंतु ही वाढ एकाच वेगाने होत नाही. काही कालापर्यंत संथ रितीने वाढ होते. पण काही हजार वर्षांनी अचानक फार वाढ होते. असा प्रसंग बरोबर ख्रिस्तपूर्व ५५०० वर्षांपूर्वी आलेला दिसतो. त्या काळात सर्व जगात आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावरही अशी वाढ नोंदविली गेली. अर्थातच हा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना महाभारताविषयी न काही माहिती होती ना त्यांना ख्रिस्तपूर्व ५५०० हे वर्ष काही विशेष वाटत होते. अशा प्रकारे ते एक पूर्वग्रहदोषाशिवायचे संशोधन होते.

महाभारताच्या शेवटी द्वारका पाण्यात गेली असे उल्लेख आहेत. अशा प्रकारे महाभारत युद्धाच्या काळाला समुद्रशास्त्राप्रमाणे पण आधार मिळतो.

निलेश ओक यांचे संशोधन – रामायण

महाभारताप्रमाणे रामायणातही खगोलशास्त्राचे संदर्भ येतात. त्यातील काही संदर्भ असे -

  • हेमंत ऋतूत पुष्य नक्षत्राजवळ सूर्यास्त होतो
  • अश्विन महिन्यात वसंत ऋतू असतो.
  • ब्रह्मराशी पोल स्टार होता.

या प्रकारच्या विधानांचा खगोलशास्त्रीय अभ्यास केल्यावर ओक यांनी ठरविले की हा काल ख्रिस्तपूर्व १२२०९ असला पाहिजे. या पुराव्याला पूरक असे दोन पुरावे ओकांनी विचारात घेतले.

भरत जेव्हा आपल्या आजोळहून अयोध्येस परत येत असतो तेंव्हा तो पश्चिम वाहिनी सतलज नदीचे वर्णन करतो. ही घटना १४००० वर्षापूर्वी घडली. त्या आधी सतलज दक्षिणवाहिनी होती आणि सरस्वतीस मिळत असे.

समुद्राची उंची वाढत असताना ज्या प्रकारे द्वारका पाण्यात गेली त्याच प्रमाणे रामसेतू पाण्यात गेला.

ओकांच्या मतात कितपत सत्यता?

ओकांच्या लिखाणाला प्रश्न करणारे लिखाण आहे. त्यातील दोन लेखकांचा उल्लेख करतो.
Blog refuting Nilesh Oak's dating of Ramayana to 12209 BCE, Dr. Raja Ram Mohan Roy | Apr, 2021 | Medium

डॉक्टर जयश्री सारनाथान यांनी ओक यांच्या प्रतिपादनाची सत्यता प्रश्नांकित केली आहे (Challenging Nilesh Oak's dates of Mahabharata and Ramayana. "Mahabharata 3136 BCE: Validation of the Traditional Date")

डॉक्टर सुचेता परांजपे यांचा महाभारताचे वास्तव हा कार्यक्रम युट्यूबवर पाहता येतो.

महाभारताच्या रचनेविषयी त्या लिहितात –

युद्धानंतर युधिष्ठिराने व्यासांना विनंती केली की त्यांनी युद्धाची हकिगत लिहावी. व्यासांनी युद्धाचे वर्णन करणारा आठ हजार श्लोकांचा ग्रंथ लिहिला आणि त्यास जय असे नाव दिले. या ग्रंथाची चार हस्तलिखिते करून भारतात चार दिशांना पाठविण्यात आली.

यानंतर पांडवांचा खापरपणतू जनमेजय याने कुलगुरू वैशंपायन यांना विचारले की माझ्या पूर्वजांनी मोठे युद्ध लढले. त्याची काय पार्श्वभूमी होती? वैशंपायनांनी जी कथा सांगितली ती भरतवंशाची कहाणी. या कथेत २४००० श्लोक होते. या कथेला भारत असे नाव देण्यात आले. अर्थात भारताची रचना युद्धानंतर सुमारे १०० वर्षांनी झाली.

त्यानंतर दीडशे वर्षांनी शौनक नावाच्या ऋषींनी एक यज्ञ केला. या यज्ञासाठी देशातून ऋषी आले होते. यज्ञ चालू असताना संध्याकाळी मंडळी एकत्र जमत. उग्रश्रव नावाचा एक भाट त्याना भारताची गोष्ट सांगे. त्या वेळी जमलेले ऋषी त्यांना जे वाटे ती कथा सांगत. ते सर्व लिहून घेतले जाई.
अशा प्रकारे मूळचा ३२००० श्लोकांचा ग्रंथ एक लाख श्लोकांचा झाला. हा ग्रंथ बनविण्यात अनेकांचा हात होता. या ग्रंथाला महाभारत असे नाव दिले गेले. व्यासांनी लिहिलेला मूळ ग्रंथ ‘जय’, त्याचे स्वरूप भारत आणि शेवटी महाभारत झाले. महाभारत युद्धानंतर किमान २५० वर्षांनी रचले गेले.

ओकांसारखे इतरही प्रयास

The Scientific Dating of the Ramayana, Did Rama exist? Rakesh Krishnan Simha @ByRakeshSimha, India facts 15-11-2015.

रामायणात लिहिल्याप्रमाणे रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला पुनर्वसू नक्षत्रात झाला. त्या वेळी सूर्य, मंगल, गुरु, शुक्र कोणत्या राशीत होते ते लिहिले होते. यावरून रामजन्म ९३०० वर्षांपूर्वी झाला असा निष्कर्ष हे अभ्यासक काढतात.

ट्रिब्युन इंडियात २५/४/२०१७ रोजी आलेल्या बातमीनुसार, गुरु जम्बेश्वर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तंकेश्वर कुमार यांनी एका भाषणात सांगितले की खगोलशास्त्रीय गणिते आणि प्लॅनेटेरीयम सॉफ्टवेअरचा वापर करून हे सिद्ध झाले आहे की रामायण ७००० वर्षापूर्वी घडले.

पुरातत्व संशोधन
स्वराज्यच्या २०/६/२०१९च्या अंकात पुरातत्व विभागातर्फे उत्खनन चालू होते त्याचा वृत्तांत आला होता. दिल्लीपासून ६८ कि मी अंतरावर सनौली येथे उत्खनन चालू आहे. उत्खननात एका रथाचे अवशेष मिळाले आहेत. त्याच बरोबर धनुष्यबाण आणि काही शस्त्रे मिळाली आहेत. रथाच्या अवशेषावरून महाभारतात रथांचे जे वर्णन येते तसेच अवशेष आहेत. या अवशेषांवरून असा निष्कर्ष काढता येतो की महाभारत युद्ध १५०० ते २००० या काळात झाले असावे.

उत्तर प्रदेशात मीरत जवळ बर्नावा गावात झालेल्या उत्खननाचा रिपोर्ट हिंदुस्तान टाइम्समध्ये ८/४/१८ रोजी प्रसिद्ध झाला. महाभारतात लाक्षागृहाचा उल्लेख येतो त्या जागेजवळ हे गाव आहे.


Lakshagriha Excavation Project ASI Barnava, Uttar Pradesh.

उत्खननात मिळालेली मातीची भांडी आणि थाळ्या हस्तिनापुर आणि कुरुक्षेत्र या ठिकाणी उत्खननात मिळालेल्या वस्तूंसारख्या आहेत. प्रोफेसर लाल यांनी इंद्रप्रस्थ आणि कुरुक्षेत्र या ठिकाणी केलेल्या उत्खननावरून असा निष्कर्ष काढला होता की महाभारत काल ८०० बी सी असा असावा. लाल यांनी केलेल्या उत्खननात या भागात मोठा पूर आल्याचे दिसते. तशाच पुराचा पुरावा बर्नावा गावात झालेल्या उत्खननात मिळाला. याचप्रमाणे काही शस्त्रांचे अवशेष मिळाले.

महाभारताच्या दृष्टीने द्वारकेजवळ समुद्रात केलेले संशोधन महत्त्वाचे आहे.

Marine Archaeological Exploration off Dwarka by S R Rao, Indian Journal of Marine Sciences Vol 16 , 1987 (पीडीएफ)


Olpin (bottle from Dwarka)
Late Indus type seal, Dwarka
Stone Anchors, Dwarka

द्वारकेजवळच्या समुद्रात बुडालेल्या बंदराचे आणि धक्क्याचे अवशेष मिळाले आहेत. दगडाचे अवजड लंगर सापडले आहेत. याशिवाय सिंधू सरस्वती संस्कृतीमध्ये वापरले जाणारे शिक्के मिळाले आहेत. ३४०० वर्षापूर्वी हे बंदर पाण्याखाली गेले असावे.

२००७ साली या ठिकाणी एक लाकडाचा ओंडका मिळाल्याची बातमी आली. त्यानंतर असे प्रसिद्ध झाले की हा ओंडका ९५०० वर्षांपूर्वीचा आहे. यानंतर या बातम्या एकदम गायब झाल्या. गेल्या १५ वर्षात या बाबतीत पुढे काहीच लिखाण आले नाही. यावरून या बातमीची विश्वसनीयता वाटत नाही.

रामायण

महाभारताच्या दृष्टीने उत्तर भारतातील आणि द्वारका येथे केलेल्या उत्खननाविषयी आपण माहिती घेतली. महाराष्ट्रात मिळालेले अवशेष रामायणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. रामायणाच्या दृष्टीने महाराष्ट्र म्हणजे दंडकारण्याचा भाग. येथे रानटी वस्त्या होत्या असे उल्लेख येतात. हा राक्षसांचा भाग. परंतु उत्खननात निराळे दृश्य पुढे येते.

भुसावळपासून ७० किमी अंतरावर निंबाळकर गढी येथे झालेल्या उत्खननात सिंधू सरस्वती संस्कृतीच्या सारखे अवशेष मिळाले आहेत. जी खापरे मिळाली आहेत त्यावर सिंधू सरस्वती संस्कृतीच्या लिपीसारखे लिखाण आहे.

आर्यांना लिखाण माहीत होते याचे काही पुरावे नाहीत. ही वस्ती ३५०० वर्षांपूर्वीची आहे.
पुण्यापासून ९० किमी अंतरावर इनामगाव खेड्याच्या जवळ उत्खननात एका पूर्ण गावाचे अवशेष मिळाले आहेत.

ही वस्ती पण ३५०० वर्षांपूर्वीची आहे. मातीची खापरे, दगडी वस्तू, तांब्याच्या वस्तू , मणी अशा वस्तू मिळाल्या आहेत. हे लोक शेती करत असत असा पुरावा आहे. एक भट्टी मिळाली आहे ज्याचा उपयोग निश्चित झालेला नाही. २६६ दफनस्थाने मिळाली आहेत. निश्चितच ही आर्यांची वस्ती नव्हती. रामाने दक्षिणेत येऊन रानटी राक्षसांना सुसंस्कृत बनविले या सिद्धांताला काही आधार राहत नाही.

(दुर्दैवाची कथा अशी की वीस वर्षापूर्वी झालेल्या उत्खननानंतर ही साईट उजाड पडली आहे. मिळालेल्या अवशेषांचे जतन करणे कोणाला महत्त्वाचे वाटत नाही. नुकतेच या जागेला कुंपण घालण्यासाठी निधी देण्यात आला असे ऐकले. कुंपणासाठी किती खरोखर खर्च करण्यात येईल याविषयी काही सांगता येत नाही.

या बाबतीत तमिळनाडू सरकारकडून महाराष्ट्राने शिकण्यासारखे आहे. तामिळनाडूचे असे मत आहे की उत्तरेकडील आर्यांची बी जे पी पार्टी तामिळनाडूच्या इतिहासाकडे दुर्लक्ष करते आणि या कामासाठी फंड देत नाही. यासाठी तामिळनाडू सरकारने या उत्खननासाठी पैसे उपलब्ध करून दिले आहेत. तामिळनाडू सरकार येथे एक वस्तुसंग्रहालय बांधत आहे. आपल्या देशात प्रत्येक गोष्टीचे राजकारण केले जाते.)

निष्कर्ष

पहिल्या भागात आपण पाहिले की ढोबळ मानाने या महाकाव्यांच्या रचनेचा काल समजायचा तर मनुस्मृती – सन १५०, रामायण – सन २५०, महाभारत – सन ३५०. भौगोलिक आणि सामाजिक कारणांचा विचार केला तर महाभारताचा सामाजिक काल रामायणाच्या आधीचा वाटतो.

ओकांचे लिखाण या मताला पूर्ण छेद देते. ओक त्यांच्या लिखाणात घटनांचा काल आणि ग्रंथलेखनाचा काल यात अंतर असावे असा विचारही करत नाहीत. किमान महाभारताच्या बाबतीत डॉक्टर परांजपे यांच्या मताप्रमाणे लिखाणाचा काल आणि कथानकाचा काल एक नाही. पण डॉक्टर परांजपे यातील अंतर केवळ २५० वर्षे समजतात. जर आपण घटनांच्या कालासंबंधी ओकांचे मत ग्राह्य धरले तर घटना आणि लिखाण – महाभारत ७५०० वर्षापूर्वी आणि रामायण १४५०० वर्षांपूर्वी.

डॉक्टर परांजपे सांगतात की व्यासांनी जय नावाच्या पुस्तकाची चार हस्तलिखिते बनविली. भारतात बुद्धकालाच्या आधी लिपी दिसत नाही (मोहेन्जोदारोची लिपी विचारात न घेता). जर ओक किंवा इतर अभ्यासकांनी सांगितलेला घटनेचा काल मानला तर त्या काळात लिहिण्याची कला अवगत नव्हती.

डॉक्टर परांजपे यांच्या मताचा विचार केला तर खगोलशास्त्रावर अवलंबून महाभारताचा काल ठरविणे शंकास्पद होते. कारण महाभारताचे लिखाण युद्धानंतर २५० वर्षांनी झाले.

समुद्रशास्त्रावर आधारित माहितीप्रमाणे द्वारका आणि रामसेतू समुद्रात जाणे हे विश्वास ठेवण्यासारखे आहे.

ओकांच्या प्रमाणे इतरही अभ्यासकांनी खगोलशास्त्राचा वापर करून आपले निष्कर्ष काढले आहेत. ओक रामायणाचा काळ १४००० वर्षांपूर्वीचा सांगतात, राकेश सिंह ९३०० वर्षांपूर्वीचा सांगतात तर तंकेश्वर कुमार ७००० वर्षांपूर्वीचा सांगतात. हे तिघेही आपली पद्धत ‘शास्त्रीय’ असल्याचे लिहितात. अर्थातच या तीन विद्वानांत कोणी तरी चूक करीत आहेत.

या अभ्यासकांच्या विचारात जर सत्यता असेल तर ते भारतीय संस्कृतीकडे पाहण्याचा एक नवीन परिप्रेक्ष सुचवत आहेत. यासाठी एखाद्या विद्यापीठाला या कामात अंतर्भूत करून त्यांच्या विधानांची सत्यता पारखून घेतली पाहिजे. हे काम केंद्रीय सरकारला करता येणार नाही. यासाठी न्यायालयाच्या मार्फत हे काम करणे चांगले, जसे की आज ज्ञानवापी मशि‍दीबाबत होत आहे.

समुद्रशास्त्रावर आधारित माहितीप्रमाणे द्वारका आणि रामसेतू समुद्रात जाणे हे विश्वास ठेवण्यासारखे आहे. द्वारकेजवळ समुद्रात केलेल्या उत्खननात जे अवशेष मिळाले आहेत त्यांचा संबंध सिंधू सरस्वती संस्कृतीशी जातो. या संशोधनावरून ३५०० वर्षांपूर्वी असलेले बंदर पाण्याखाली गेले असे दिसते. या ठिकाणी पाण्याखाली लोखंडाच्या वस्तू मिळाल्या आहेत. यावरून भारतात ३५०० वर्षापूर्वी लोखंड बनविण्याची कला माहीत होती. जर महाभारतकाल त्यानंतरचा असेल तर युद्धातील शस्त्रे लोखंडाची होती .

आता आपण दुसऱ्या बाजूनी या कथानकाचा काल निश्चित करण्याचा प्रयत्न करू.

वेदांचा काल
ख्रिस्तपूर्व ४०००-२००० From : Cultural History of Ancient India, By R.N. Gaidhani, V.G. Rahurkar, Continental Prakashan, 1955
ख्रिस्तपूर्व २०००-१००० Principal Upanishads, by S Radhakrishnan, George Allen and Unwin UK 1953, Harper Collins India, Fifth Impression 1997
ख्रिस्तपूर्व २०००-५०० ढवळीकर
ख्रिस्तपूर्व ४०००-१०००, भारतरत्न पां वा काणे

वरील चार विद्वानांच्या अंदाजाप्रमाणे वैदिक काल ख्रिस्तपूर्व १०००मध्ये संपलेला होता. वैदिक काळात कुरु आणि इक्ष्वाकूसारखी मोठी राजघराणी दिसत नाहीत. याशिवाय या दोन्ही घराण्यांचा मागचा इतिहास सांगितला जातो. यावरून असे म्हणता येईल की या कथानकांचा काल ख्रिस्तपूर्व १०००पेक्षा मागे असू शकत नाही. म्हणून पहिल्या भागात असे लिहिले होते – समजण्यासाठी असे म्हणू की महाभारताच्या कथानकाचा काल ख्रिस्तपूर्व १००० तर रामायणाच्या कथानकाचा काल ख्रिस्तपूर्व ८००, हे सर्व काल अर्थातच ढोबळ मानाने लिहिले आहेत. हा कालखंड वेदकाळानंतर आणि बुद्धकाळाआधी येतो.

पुरातत्व उत्खननाच्या निष्कर्षावरून हा कालखंड ख्रिस्तपूर्व १००० असावा असेच दिसते. महाराष्ट्र्रात झालेल्या उत्खननावरून असे म्हणता येईल की या काळात राम दक्षिणेत येण्यापूर्वी येथे प्रगत समाज अस्तित्वात होता.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

महाभारताचा काळ काही लोक जयद्रथ वधाच्या प्रसंगी खग्राससूर्यग्रहण झाले होते हे गृहीत धरून काढण्याचा प्रयत्न करतात.
तसा कृष्णाचा आणि रामाचा काळ ठरवण्यासाठी काही आधार घेता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुसत्या खग्रास सूर्यग्रहणाच्या काळावरुन कसे सिद्ध होईल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- अहिरावण

काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...

महाभारताचा काळ काही लोक जयद्रथ वधाच्या प्रसंगी खग्राससूर्यग्रहण झाले होते हे गृहीत धरून काढण्याचा प्रयत्न करतात.

कथानकातील एखाद्या घटनेवरून त्या कथानकाचा काळ ठरवणे फारसे तर्कसंगत वाटत नाही. एकतर रामायण आणि महाभारतात अनेक गोष्टी नंतर घुसडलेल्या आहेत. त्यामूळे मूळ काय आणि प्रक्षिप्त काय, ते आधी ठरवावे लागेल. खेरीज, मूळ कथानकातही एखादी भौगोलीक घटना retrofit करून टाकणे, हे अगदीच अशक्य नाही!

इंडो-युरोपीय भाषी Steppe Pastorals हे १९०० BCE नंतरच भारतात आले, हे जागतीक स्तरावर सिद्ध झाले आहे. तेव्हा रामायण किंवा महाभारताचा काळ त्यानंतरचाच असणार हे उघड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंचित सुधारणा - इसपू ३५०० ते इसपू१००० हा साधारण टोळ्यांचा येण्याचा कालावधी मानला जातो. इसपू२००० ते इसपू २५०० मोठ्याप्रमाणात.

मानवी अवशेष उपलब्धता इसपू१९०० ते इसपू २००० चे मिळाले आहेत म्हणुन तोच कालावधी किंवा त्यानंतरच आले असे मानणे चूक ठरेल.

महाभारत काल लेखन कालावधी इसपू २०० ते इसपू४०० असावा. महाभारत जसे लिहीले आहे तसेच असण्याची शक्यता शून्य कारण ती एक विविध ऐतिहासिक घटनांवर आधारीत एक काल्पनिक कथा आहे असे माझे मत आहे. हेच रामायणाला लागू

अर्थात मी जाणकार नाही आणि माझे मत गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- अहिरावण

काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...