हाँटींग : मी रात टाकली...........

परवा नेहमीप्रमाणे हातातल्या रिमोटशी खेळत असताना झी मराठी चॅनेलवर क्षणभर थबकलो. प्रत्येक ब्रेकच्या आधी कार्यक्रमाच्या ब्रेकनंतर येणार्‍या भागाची थोडीशी झलक दाखवायचे आजकाल फॅड आहे. तर मी झी मराठीपाशी थबकलो, कारण गुप्त्यांच्या 'वंदनाताई' सांगत होत्या....

"अमृता, तू गाणं छानच गायलस. मुळातच हे गाणं अतिशय गोड आहे. खरेतर 'हाँटींग' आहे, त्यांनी अजुन एक दोन उदाहरणे दिली त्यात 'या डोळ्याची दोन पाखरे..." ही होतं. पण ज्या गाण्याबद्दल त्या बोलत होत्या ते गाणं होतं "जैत रे जैत" मधलं...

'मी रात टाकली, मी कात टाकली'

मी बावळटासारखा त्या गाण्याचा संबंध 'या डोळ्याची दोन पाखरे..." शी लावला आणि मनातल्या मनात आश्चर्य करायला लागलो. या गाण्यात वंदनाताईंना 'हाँटींग' असं काय आढळलं असावं? ब्रेक संपेपर्यंत कसाबसा दम धरला आणि 'सारेगमप' सुरु झालं. समोर आधी 'जैत रे जैत' मधले त्या गाण्याचे दृष्य झळकले. स्मिताचे ते ओझरते दर्शन आणि कॅमेरा वर्तमानात आला. अमृता सुभाष 'मी रात टाकली, मी कात टाकली' गात होती.पण माझे मन वर्तमानात यायला तयारच नव्हते. मी कुठेतरी तिथेच लिंगोबाच्या डोंगरावर, कदाचित स्मिताच्या त्या गहिर्‍या डोळ्यात हरवलो होतो. लताबाईंचा दैवी आवाज, बाळासाहेबांचं धुंद करणारं संगीत आणि त्यावर स्मिताची ती मुक्त, थोडीशी स्वैर भासणारी, नाग्यासाठी वेडी झालेली, त्याच्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावत म्हणत बेभान होणारी चिंधी.......

s

आणि महानोरांचे ते अप्रतिम शब्द...!

"मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली..."

मला क्षणभर वाटले की ते स्वर, ते सुर, ते संगीत , ते शब्द , स्मिताच्या चेहर्‍यावरचे ते उन्मुक्त, स्वैर भाव नकळत एखाद्या तीराप्रमाणे माझ्यावर झेपावताहेत, माझ्याही नकळत मी त्यांच्या आहारी जातोय. त्यांची शिकार बनतोय. त्याच क्षणी जाणवले 'आपण वंदनाताईंच्या हाँटींगचा अर्थ मुर्खासारखा 'हाँटेड' असा लावला होता चुकून. ते शब्द, ते सुर खरोखर हाँटींग होते. प्रचंड गर्दीतही बरोबर तुमचा वेध घेण्याची ताकद त्या सुरात होती. यापुर्वीही खुप वेळा ऐकलेय हे गाणे मी. पण काल वंदनाताईंनी त्या गाण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी दिली. भानावर आलो तेव्हा अमृताचा परफॉर्मन्स संपला होता. हो, मी त्याला परफॉर्मन्सच म्हणेन कारण ते अमृताचे स्वर कानावर पडत असताना माझ्या डोळ्यासमोर मात्र जैत रे जैतमधली 'स्मिता' होती आणि स्मिताच्या त्या रापलेल्या (चित्रपटातील) चेहर्‍यावरच्या अवखळ निरागसतेला अमृताचे स्वर कुठेच योग्य वाटत नव्हते. मला वाटले आता नेहमीप्रमाणे कौतुक करुन दोन्ही गुप्ते अमृताला 'नी' नाहीतर 'वरचा सा' असे काहीतरी गुण देणार. पण वंदनाताईंनी धक्काच दिला. मला खटकलेल्या गोष्टीच, म्हणजे नको त्या ठिकाणी शब्दांवर दिलेला जोर, शब्दांचे चुकीचे उच्चार, काही ठिकाणी घसरलेला सुर याबद्दल सांगत वंदनाताईंनी अमृताला शुभेच्छा दिल्या.

मी लगेचच वाहिनी बदलुन टाकली आणि पुन्हा रिमोटशी खेळायला लागलो. पण आता त्या खेळण्यात अजिबात मजा येत नव्हती कारण डोळ्यासमोरच्या विस्तृत कॅनव्हासवर चिंधी आणि कानावर हळुवारपणे येत मनावर कब्जा करणारे ना.धो. महानोरांचे शब्द पिच्छा सोडायला तयारच नव्हते.

कसं होतं ना, बर्‍याच वेळा आपली अवस्था 'देता किती घेशील दो कराने' अशी होवून जाते. म्हणजे बघा ना, मी म्हणतो मी लताबाईंच्या आवाजाचा भक्त आहे, तेवढ्यात मला जाणवतं की अरे याला बाळासाहेबांचं संगीत आहे जी आपल्यासाठी नेहमीच एक पर्वणी वाटत आलेली आहे, त्या संगीतात रमतोय न रमतोय तोवर लक्षात येतं की अरे हे आपल्या आवडत्या कविचे शब्द आहेत. आपण नकळत त्या शब्दात गुरफटायला लागतो आणि तेवढ्यात डोळ्यासमोर उभा राहतो तो जिवंत, नैसर्गिक अभिनयाचा मुर्तीमंत आविष्कार साक्षात स्मिता पाटील, जरा कुठे स्मिताच्या डोळ्यात हरवून जायला बघावं तर मागे स्क्रीनवरची लिंगोबाची हिरवीगार झाडी, निसर्गाचं ते मनोहारी, नयनरम्य दृष्य खुणावू लागते. अरे माझी झोळी एवढी मोठी नाहीये रे परमेश्वरा. तू देता है तो छप्पर फाडके देता है ये तो सुना था, पण सगळ्या जाणिवांना भेदूनही असं काही हवंहवंसं देवून जातोस हे पहिल्यांदाच अनुभवतोय. मग अलगद मन हळू हळु मागे जायला लागतं. 'जैत रे जैत' बद्दल संबंधित दिग्गज कलावंतांकडून ऐकलेल्या, वाचलेल्या अनेक गोष्टी डोळ्यासमोर फेर धरायला लागतात.

या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळचा अनुभव सांगताना श्री. रवींद्र साठे यांनी सांगितलं होतं ...

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या चालींचं वैशिष्टय़ म्हणजे ती चाल कितीही अवघड वाटली, तरी गाण्याच्या गाभ्याशी किंवा गाण्याच्या भावाशी कधीच हटकून नसते. पण त्यांनी केलेलं प्रत्येक गाणं हटकेच आहे. मी जैत रे जैत या चित्रपटासाठी त्यांच्याकडे पहिल्यांदा गायलो. मी आणि चंद्रकांत काळे आम्ही घाशीराम कोतवाल या नाटकात गात असू आणि जब्बार पटेल यांनी आमचं नाव पंडितजींना सुचवलं. मी रात टाकली या गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं त्यावेळी माझं वय २७ र्वष आणि अनुभवही कमीच. पण ते गाणं झाल्यानंतर खुद्द लतादीदींनी सांगितलं की, खूप दिवसांनी एवढा सुरेल कोरस ऐकला. जैत रे जैत या एका चित्रपटातील गाणी ऐकली, तरी पंडित हृदयनाथांच्या श्रेष्ठत्वाबद्दल कल्पना येते.

गंमत बघा हे गाणं अजरामर झालं त्यात लताबाईंचा वाटा सिंहाचा होता. पण त्यांना मात्र कौतुक गाण्यातल्या कोरसचं. ही सगळी मोठी माणसं इतकी साधी, विनम्र कशी काय राहू शकतात बुवा?

चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. जब्बार पटेल यांनी या चित्रपटाच्या निर्मीती प्रक्रियेबद्दल सांगताना सांगितलं होतं...

काही दिवसांनी बाळासाहेबांचा पुन्हा फोन आला, ‘तुम्ही गो. नी. दांडेकरांची ‘जैत रे जैत’ ही कादंबरी वाचली आहे काय? नसल्यास जरूर वाचा. त्या कथानकात संगीताला उत्तम वाव मिळेल असं मला वाटतं. हवं तर आपण अप्पासाहेब दांडेकरांशी बोलू या.’

मी कादंबरी वाचली. चित्रपटाच्या दृष्टीनं मला ती आवडली. पण मला ही कादंबरी जशीच्या तशी पडद्यावर आणायची नव्हती. मी मुळात नाटकातला माणूस असल्यामुळे त्याचा फॉर्म बदलावा असं मला वाटलं. त्या आधी केलेल्या घाशीराम, तीन पैशाचा तमाशा या नाटकांमुळे या चित्रपटाला पाश्चात्य देशातील संगीतिकेचा फॉर्म देता येईल काय, यावर मी विचार केला. ‘जैत रे जैत’ ची कथा आदिवासी ठाकर समाजात घडते. पाश्चात्य संगीतिकांमध्ये ज्याप्रमाणे सूत्रधार असतो त्या धर्तीवर या चित्रपटात ठाकर समाजातल्याच दोघांना सूत्रधार म्हणून ठेवावं असा विचार झाला. दीदी आणि उषाताई यांनादेखील ही कल्पना आवडली. त्यांनी काम सुरू करायला सांगितलं.

संगीतिकेचं रूप चित्रपटाला द्यायचं असेल तर किमान वीसएक गाणी तरी चित्रपटात घ्यावी लागणार होती. गीतलेखनासाठी ना. धों. महानोर यांना सांगायचं ठरलं. त्या नंतर महानोर आणि बाळासाहेबांसोबत बैठका सुरू झाल्या. ‘प्रभुकुंज’मधल्या छोटय़ाशा खोलीत बाळासाहेब हार्मोनिअम घेऊन बसायचे. महानोर झराझरा गाणी लिहून द्यायचे. बाळासाहेब गाण्याच्या ओळीवर विचार करत डोळे मिटून बसलेयत.. मधूनच त्यांची बोटं हार्मोनिअमवर फिरतायत आणि एकेक चाल ते गुणगुणतायत.. अधूनमधून दीदी, उषाताई याही लक्षपूर्वक ऐकतायत.. चहाचे कप, खाण्याचे पदार्थ यांच्या साथीनं तासनतास कसे निघून जातायत हे कळत नाही. मधूनच बाळासाहेबांनी दुसऱ्या एखाद्या अल्बमसाठी केलेल्या चाली ऐकविल्या की मला हेवा वाटायचा आणि ती चाल आपल्याला वापरता येईल का, असं मी विचारायचो. पण बाळासाहेबांचं उत्तर असे, ‘नाही नाही, तुम्हाला या चालींवर मी तुम्हाला डल्ला मारू देणार नाही.’ तरीदेखील एक चाल मी अक्षरश: ‘ढापली’च.

दीदींसाठी केलेल्या ‘मी रात टाकली’ या गाण्यात एक कोरसचा तुकडा आहे, ‘हिरव्या पानात, हिरव्या पानात..’ ही चाल बाळासाहेबांनी दुसऱ्या एका अल्बमसाठी राखून ठेवली होती, पण ती या गाण्यात वापरावी असा हट्टच मी धरला. अखेर ते राजी झाले.

हे गाणं जर नीट ऐकलं असेल तर त्या कोरसची जादु तुम्हालाही नक्कीच जाणवली असेल. हे गाणं ऐकता ऐकता आपण नकळत त्या सुरात, स्मिताच्या त्या गावरान रुपात स्वतःला हरवत जातो आणि मग त्यातल्या एका एका शब्दाची ताकद आपल्याला कळायला लागते. इथे तर पं. हृदयनाथजींच्या हाताशी महानोरांसारखा शब्दप्रभूच होता. काही म्हणा, पण काही काही योग असे जुळूनच यावे लागतात आणि ते जेव्हा जुळून येतात तेव्हा इतिहास घडतो. 'जैत रे जैत' च्या गाण्यांनी असाच इतिहास घडवला. गोनिदांनी जेव्हा ही कादंबरी लिहीली तेव्हा त्यांना वाटले तरी असेल का? की ही कादंबरी पुढची कित्येक दशके चित्रपटाच्या माध्यमातुन रसिकांना विलक्षण आनंद आणि तृप्ततेची जाणिव देत राहणार आहे. असे म्हणतात की या चित्रपटासाठी महानोरांनी एकुण १९ गाणी लिहीली होती. मला खात्री नाही पण यापैकी प्रत्यक्ष चित्रपटात बहुदा १२ च गाणी वापरली गेली. निदान माझ्या माहितीत तरी तेवढीच आहेत. ही बारा गाणी तुम्हाला खालील दुव्यावरून उतरवून घेता येतील.

जैत रे जैत मधील गाणी

मुळात हा चित्रपट म्हणजे एक छान प्रेमकथा आहे. त्याबरोबरच ती एक सुडकथाही आहे, त्याबरोबरच ती एक सामान्य माणसाच्या जिद्दीचीही कथा आहे. राणीमाशीला नमस्कार केल्यानंतरही ती नाग्याचा डोळा फोडते म्हणून राणीमाशीला उध्वस्त करायच्या जिद्दीने पेटलेला नाग्या, मला पुण्येवंत व्हायचय या इच्छेन पछाडलेला नाग्या, लग्न करीन तर स्वतःला आवडलेल्या पुरुषाशीच म्हणून जिद्द करणार्‍या, त्यासाठी ठरलेल्या नवर्‍याला सोडून येणार्‍या, राणीमाशीने डोळा फोडल्यावरही कुरुप झालेल्या नाग्यासाठी आपले सर्वस्व शेवटी प्राणही पणाला लावणार्‍या चिंधीची कथा !

असो, थोडा भरकटलोच मी. आपण बोलत होतो... चिंधीबद्दल, खरेतर मी रात टाकली.." या अजरामर गाण्याबद्दल....!

शब्द अर्थातच ना.धों.महानोरांचे, संगीत पं. हृदयनाथ, स्वर साक्षात कोकिळेचे पण या गाण्यात आपल्याला वेड लावतो तो रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यांचा कोरस !

मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली

लताबाई बेधुंद करत गात असतात. आपल्या डोळ्यासमोर असते चिंधी. मुक्त आणि मनस्वी स्त्रीचा एक मुर्तीमंत आविष्कार. मला आवडेल त्या पुरुषांचीच होणार अशी ठामपणे सांगनारी चिंधी. आपल्या नवर्‍याला सोडून आपल्या प्रियकराच्या शोधात निघालीय. आपला भुतकाळ तीने मागेच कुठेतरी सोडून दिलाय. जो कधी आपला वाटलाच नाही, त्या मोडक्या संसाराबद्दलची आसक्ती, लाज कधीच सोडून दिलीय. जुनाट झालेली कात टाकून देवून नागीण जशी नव्या रसरशीतपणाने पुढचे आयुष्य जगायला सिद्ध होते तशी तिने आपली जुनी जिनगानी त्यागून टाकलीय. तिला जगाची फिकर नाही, तथाकथित रुढी परंपराची चाड नाही. या क्षणी ती फक्त एक प्रिया आहे, आपल्या प्रियकराकडे मिलनाची मागणी करणारी एक प्रेमवेडी प्रेयसी.

इथे आपण लताबाईंच्या सुरात गुंतत जात असताना अचानक कानावर कोरसचे सुर घुमायला लागतात. स्पेलबाऊंड म्हणजे नेमके काय असते त्याचा जिवंत अनुभव देणारी ती जाणिव असते. जैत रे जैत हा संपुर्ण चित्रपट पटेलांनी सुत्रधाराच्या नजरेतुन आपल्यासमोर मांडलाय. हे सुत्रधारच आपल्यालाच नाग्या आणि चिंधीची कथा गाण्यांमधुन सांगत जातात. एखाद्या संगीतीकेसारखी ही कथा आपल्यापुढे उलगडत जाते.

हिरव्या पानांत, हिरव्या पानांत
चावंळ चावंळ चालती...
भर ज्वानीतली नार
अंग मोडीत चालती....

खुपदा कसं होतं ना... काही गोष्टी अगदी अलवारपणे आपल्याला येवून भिडतात. त्या आपल्याला येवुन बिडेपर्यंत आपल्याला त्यांची जाणिवही होत नाही. हिरव्या गवतात नाही का, कसली तरी सळसळ कायम जाणवत असते, कुठलीतरी चाहूल कानावर येत असते, पण दिसत मात्र काहीच नाही. एखादी नागिण आपल्या शरीराला नागमोडी झोके देत सळसल करत गवतातून निघुन जाते, आपल्याला दिसत नाही पण तिचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवत राहते. इथे महानोरांनी चिंधीच्या चालण्यात तीच अदा, तीच नजाकत तर जाणवली नसेल. खरेतर गाण्याचे बोल पाहता हा प्रसंग खुप मादक करता येवु शकला असता. स्मितासारखी देखणी, रुपगर्विता त्यात अभिनयसम्राज्ञी जब्बारजींच्या दिमतीला हजर होती. पण जब्बारजींनी तो मोह आवरलाय. इथे स्मिता 'चिंधी'च वाटते. तिच्या चालण्या-बोलण्यातून चिंधीची गावरान तरीही अवखळ अदाच समोर येत राहते. त्यामुळे चिंधी कुठेही मादक वाटली तरी अश्लील वाटत नाही. हे जब्बार पटेलांच्या दिग्दर्शनाचे आणि स्मिताच्या अभिनयाचे यशच म्हणावे लागेल.

ह्या पंखांवरती , मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई , चांदन्यात न्हाती

सगळे पाश मागे सोडून चिंधी निघालीय आपल्या प्रियकराला भेटायला. जणू चांदण्याचे पंख लावून त्यावर नीळेशार आभाळ पांघरून. आता त्या संसाराच्या चार भिंतींची बंधने नाहीयेत, उंबरठ्याचा अडसर नाहीये. एखाद्या मुक्त मोरणी (लांडोरी) किंबहुना आनंदाने बेधुंद होवून नाचणार्‍या मोरासारखी ती आपल्या प्रियाशी मिलनाच्या आनंदाच्या शीतल चांदण्यात न्हातेय. विरहाचे उन्ह कधीच ओसरलेय आता फक्त त्याच्या मिठीत लाभणारी गोड, आश्वासक शीतलता.

अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगर भिवरी, त्याची गो माल्हन झाली
मी बाजिंदी , मनमानी , बाई फुलांत न्हाली ....

s

तिच्या तना-मनात, गात्रा-गात्रात तिचा साजण भिनलाय. इथे नाग्या हा ठाकरवाडीचा ढोलिया आहे. म्हणजे देवाचा प्रतिनिधी. चिंधी पुर्णपणे नाग्यामय झालीय. स्वतःचे असे काही अस्तित्वच उरलेले नाहीये. गंमत बघा स्वतःच्या नवर्‍याला, स्वतःच्या संसाराला सोडून येण्याची प्रचंड हिंमत असलेली ही भिंगर भिवरी प्रत्यक्षात मात्र आपल्या प्रियकरासाठी सर्वस्व सोडायला निघालीय. चिंधीचं हेही एक वैशिष्ठ्य आहे. प्रत्यक्षात ती अतिशय स्वतंत्र मनोवृत्तीची, बंडखोर स्वभावाची स्त्री आहे. आपल्या विचारांसाठी, आवडी निवडीसाठी सगळ्या जगाशी झुंजण्याची ताकद तिच्यात आहे. पण हि सगळी ताकद, हे सामर्थ्य तिला तिच्या नाग्यावरच्या प्रेमाने दिलेले आहे. त्याच्या प्रेमासाठीच ती एवढी हट्टी, मनमानी करणारी झाली आणि आता त्याच्याच प्रेमामुळे ती स्वतःला विसरून त्याच्यात सामावून जाऊ पाहतेय.

ना. धों. तुम्ही खरोखरच ग्रेट आहात. मुळात चिंधीचे हे जगावेगळे पात्र उभे करणारे गोनिदा महान. त्या चिंधीला तिचा खराखुरा चेहरा देण्यासाठी धडपडणारे जब्बार पटेल महान, तिला तिचं अस्तित्व मिळवून देणारी स्मिता महान.....

" जैत रे जैत" च्या माध्यमातून ही संगीतमय मेजवानी आपल्याला देणारे मंगेशकर कुटूंबीय महान ! तुम्ही लेख वाचा, कसा वाटला ते सांगा, मी जातोय पुन्हा एकदा 'शिकार' व्हायला, या 'हाँटींग' गीताची !

हा अनुभव हवाच असेल तर ....

आपलाच,

विशल्या

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

बरीच माहिती आहे. वेळ काढून वाचेन! तुर्तास पोच

बाकी, ठरवून 'चान चान' म्हणणारे सारेगम्पा अजूनही बघणारे कोणी आहे हे बघुन सखेद आश्चर्य वाटले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

<<<बाकी, ठरवून 'चान चान' म्हणणारे सारेगम्पा अजूनही बघणारे कोणी आहे हे बघुन सखेद आश्चर्य वाटले>>>>

परवा नेहमीप्रमाणे हातातल्या रिमोटशी खेळत असताना झी मराठी चॅनेलवर क्षणभर थबकलो. प्रत्येक ब्रेकच्या आधी कार्यक्रमाच्या ब्रेकनंतर येणार्‍या भागाची थोडीशी झलक दाखवायचे आजकाल फॅड आहे. तर मी झी मराठीपाशी थबकलो, कारण गुप्त्यांच्या 'वंदनाताई' सांगत होत्या....>>> हे लेखाचे पहिलेच वाक्य आहे. म्हणजे तुम्ही लेखाचे पहिले वाक्यही न वाचता निष्कर्षापर्यंत येवुन पोचायची सवय लावून घेतलीत तर Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हीही प्रतिसाद पूर्ण वाचलेला दिसत नाहिये. लेख केवळ चाळला आहे. संपूर्णात वाचलेला नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इरसाल म्हमईकर मित्रवर्या,

जैत रे जैत पुन्हा एकदा अनुभवून दिलास तुझ्या लेखाने.
पडद्याआडच्या अनेक कलावंतांचे मोल जैत रे जैत च्या तुझ्या या लेखामुळे उलगडले आहे.

जैत रे जैत चा सुरेख प्रवास तू उलगडून दाखवला आहेस. गोनीदांच्या कादंबरीपासून, ते चित्रपटाच्या निर्मिती पर्यंत.
कोरस गायक, जब्बारांचं अफलातून दिग्दर्शन, प्रधानांचं छायांकन, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, वर्षा भोसले, रविंद्र, चंद्रकांत काळे या सर्व गायकांचे कौशल्य तर कोरसचा प्रभाव जाणवणारी गाणी, ना.धों.महानोर यांचे हृदयात पाझरणारे नितांत सुंदर शब्द
लास्ट बट नॉट लीस्ट हाँटींग चा अनुभव भारीच Wink

सगळे वर्णन अगदी समोर उभे करुन ठेवले आहेस तू. अगदी सुंदर Smile

अवांतरः अमृता सुभाष आप्ली आवडती नटी हाय बरं का? Wink ती एवढ्यांत गायिकेसारखा गाण्याचा प्रयत्न करते आहे एवढेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेखच लिहिले आहे.

पण जरा अरबी वैग्रे गाण्यांबद्दल लिहित चला, हिंदी गाण्यांचे मराठीकरण करत चला. उगाच काय आपले त्या मराठी गाण्यांना चिकटून बसता बरे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

'मी बाजिन्दी मनमानी' या ओळीतील 'बाजिन्दी' या शब्दाविषयी..

महानोराञ्च्या कवितेत अनेक शब्द गावाकडचे असल्याने मूळ अर्थ शहरी माणसाला कळले नाहीत तरी त्याञ्चे ध्वनीमाधुर्य असे असते की त्याञ्चा विचार करावासा वाटत नाही, ते सहज आपल्यात भिनून जातात. असे असले, तरी मूळ शब्दाचा अर्थ कळल्यावर गाण्याची खुमारी अधिकच वाढते.

बाजिन्दी या शब्दाचे माझ्या बाबतीत असेच झाले. हे गाणे महानोर-मड्गेशकराञ्च्या इतर अनेक गाण्याम्प्रमाणे खरे तर कोळून प्यायलेले, आणि इतर अनेक न कळलेल्या शब्दांसहीत वर्षानुवर्षे भिनलेले. मग कधीतरी एकदा विवेक पराञ्जपे आणि त्याञ्च्या सोबत्यान्नी अपार मेहनतीने प्रकाशित केलेल्या 'आपली सृष्टी आपले धन' या अप्रतीम कामातील तिसरा खण्ड - पक्षी वाचताना अचानक एका रुबाबदार पण निव्वळ नजरेने जरब बसवणार्‍या पक्ष्याचे छायाचित्र समोर आले. खिळवून टाकणार्‍या त्या पक्ष्याचे नाव होते 'बाजिन्दा'. इङ्ग्रजीत 'Goshawk' असे होते असे आठवते. हा 'Hawk' पक्ष्याच्या जातकुळीतला. बाजिन्दी अर्थातच त्याचे स्त्रीलिङ्गी रूप. ते चित्र पाहिल्यावर एका क्षणात मन या गाण्यात शिरले.. नुकत्याच काडीमोड घेतलेल्या आणि कुणाची भीड न बाळगता मुक्तपणे रानावनात सञ्चार करत असलेल्या चिन्धीचे कल्लोळ, तिचे रूप, तिचा आवेश त्या एका शब्दात कसे चपखल बसले आहे याची प्रचिती आली. महानोराञ्च्या भूल/झपाटून टाकणार्‍या (haunting) शब्दकळेचा आणखी एक प्रत्यय आला.

पुढील दुव्यात बाजिन्द्याचे चित्र आहे - http://redbuttecanyon.net/avian_images/a_gentilis_goshawk.jpg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर लिहीलेत हो एकदम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

लेखन आवडले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या चालींचं वैशिष्टय़ म्हणजे ती चाल कितीही अवघड वाटली, तरी गाण्याच्या गाभ्याशी किंवा गाण्याच्या भावाशी कधीच हटकून नसते.

अगदी खरं आहे किंबहुना त्यांचे संगीत हे प्रत्यक्ष गाण्याचा मूडच अधिक अधोरेखित करते.
___
हे रसग्रहण अतिशय आवडले.
इन फॅक्ट आपल्या "घन तमी" लेखानंतर आपले अन्य लिखाण (अगदी ब्लॉगपासून ते ऐसीपर्यंतचे) वाचून काढते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हृदयनाथ यांच्या चाली रेडिओवर पहिल्यांदा वाजायला लागल्या तेंव्हा संगीतातल्या ढुढ्ढाचार्यांनी पहिल्यांदा नाकं मुरडली. नंतर त्या चाली लोकप्रिय होत आहेत हे दिसल्यावर म्हणायला लागले, 'हंम्म, अहो, सगळं लताच करुन देते त्याला, भावाला पुढे आणायचा आहे तिला.' त्यानंतर त्यांचे स्वतंत्र आस्तित्व निर्माण झाल्यावर ही कुजबुज बंद झाली. पण परवा एका समारंभात पुन्हा एक दिग्गज भेटले. हृदयनाथचा विषय निघाल्यावर असे उसळले! 'अहो, ही 'पंडित' पदवी दिली कोणी त्यांस ? स्वतःचे असे काय काँन्ट्रीब्युशन आहे हो याचे ? तो 'के. महावीर' सगळ्या ग्रेट चाली करुन ठेवायचा. त्याच्या चाली ढापून हे वर आले. तो काय, एक बाटली दिली की खूष! के. महावीर च्या जीवावर हे मोठे झाले. तो बिचारा गुणवान कलाकार! दारुपायी वाया गेला.
या भडिमाराने मी हतबुद्ध झालो. खरे काय नं खोटे काय? केवळ आतल्या गोटातलेच सांगू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या गाण्यातला विशेष म्हणजे ताल धरायला चक्क अकॉस्टिक् गिटार वापरले आहे. 'झनंक झनं, झनंक झनं' या बोलांचा ताल सतत मागे चालू असतो नि तरी या 'गावरान' गाण्यातल्या इतर चौघडा, दिमडी, पुंगीसारख्या वाद्यांत ते बेमालूमपणे मिसळून जाते.
धृवपदातल्या 'मी रात टाकली' या शब्दांनंतर एक निरव क्षण नि एकदम 'झ्रन्न' म्हणत ते झंकारत येते आणि 'हिरव्या पानांत' हे बोल सुरू होतात. हेडफोन लावून ऐकलेत तर स्पष्ट ऐकू येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या अत्यंत आवडत्या गाण्याबद्दल एवढी माहीती आणि एवढे सुरेख रसग्रहण मी याआधी कधीच वाचले नव्हते. पंडितजींनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याप्रमाणेच किंबहूना त्याहूनही श्रेष्ठ लताबाईंनी आनंदघन या नावाने संगीत दिलेली गाणी आहेत. "मराठा तितूका.." मधलं 'वाट पाहूनी जीव शिनला' ऐकलयंत का कधी? त्याबद्दलही एखादे रसग्रहण लिहावे ही विनंती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद किसनभौ, लिहीन सवडीने Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय सुंदर लिहिलय तुम्ही
कमाल आहे
हे गाण माझ अत्यंत आवडत यातील कोरस या गाण्याहुन अधिक आवडायचा
पण त्याच्या मागची नाव हा सगळा इतिहास हि माहीती काहीच नव्हती
ग्रेट यार इतक सुंदर लिखाण
फार दिवसांनी वाचल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद मारवा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0