जंगलवाटांवरचे कवडसे - ३

मागील भागः
जंगलवाटांवरचे कवडसे - १
जंगलवाटांवरचे कवडसे - २




राशोमोन द्वार

"क्योटो*: बारावे शतक, दुष्काळ आणि लढाया यांनी उद्ध्वस्त झालेली राजधानी"**

धुवांधार पाऊस कोसळतोय. कधीकाळी भक्कम वाटावेत असे वासे असलेले छप्पर शिरी घेऊन एक वेशीसारखे द्वार उभे आहे. पण ते छप्पर आता विवर्ण झाले आहे. त्यातील छिद्रातून, भगदाडातून तो पाऊस बेलगामपणे आत घुसतो आहे. आजूबाजूला मोडून पडलेले वासे दिसतात नि शबल झालेल्या भिंती. कधीकाळी या वैभवशाली असलेल्या द्वाराला तोलून धरणारे चार-पाच पुरूष उंचीचे नि किमान दोघा-तिघांना मिळूनच कवेत घेता येतील असे भरभक्कम खांबही आता विदीर्ण झाले आहेत. छपराला दाद न देता आत घुसलेल्या पावसाच्या पाण्याने जमिनीवर तळी साचली आहेत. बाजूलाच या द्वाराचा कधीकाळी आधार असलेला एक भक्कम खांब पराभूत होऊन धराशायी झालेला दिसतो. द्वाराच्या डाव्या बाजूला एका वठलेल्या झाडाचे खोड एका बाजूला झुकलेले आहे. या भग्न द्वाराच्या छपराची एक बाजू हाडा-काडयांचा रुपात कशीबशी तग धरून उभी आहे. तुलनेने बर्‍या स्थितीत असलेल्या दुसर्‍या बाजूला पावसापासून बचाव करण्याच्या हेतूने आश्रयाला आलेले दोन पुरूष विसावले आहेत. लहानशी गोल टोपी घातलेला एकजण थेट जमिनीवर बसला आहे तर दुसरा विरलेला किमोनो परिधान केलेला पुरूष तिथल्या एका बैठकीच्या दगडावर - पहिल्यापासून थोडा उंचावर - विसावला आहे. जवळून पाहता दोघेही कुठेतरी शून्यात पहात कसल्याशा विचारात गढून गेलेले दिसतात. टोपीवाला एक सुस्कारा सोडतो नि म्हणतो ’मला समजत नाही.... मला अजिबातच समजत नाही.’

त्या दोघांपैकी टोपीवाला हा एक लाकूडतोड्या आहे तर दुसरा बौद्ध भिक्षू. ते तिथे बसलेले असतानाच दुरून एक तिसरा माणूस पावसापाण्याने झालेली तळी तुडवत त्या द्वाराकडे येतो. यावेळी पडद्यावरील दृष्य हे त्या धावत जाणार्‍या माणसाच्या पाठीमागून आपण पहात असतो. समोर असलेल्या त्या द्वाराकडे धावत जाणार्‍या त्या माणसाचा पाठलाग करत असताना पार्श्वभूमीवर ते द्वार हळूहळू पुरे दृश्यमान होत जाते. ज्या क्षणी ते पडद्यावर पूर्ण साकार होते त्या क्षणी एक विलक्षण दृश्य दिसते. आपल्या उजव्या बाजूला - ज्या बाजूचे छत विवर्ण झाले आहे - त्या बाजूला आकाशात पांढरे ढग दिसतात. उरलेल्या सार्‍या आकाशात मात्र काळ्याकभिन्न जलदांचे साम्राज्य दिसते आहे. यात काळे ढग पांढर्‍यांवर आक्रमण करताहेत की पांढरे काळ्यांचे साम्राज्य उलथण्याच्या निर्धाराने सामोरे जात आहेत हे सांगणे अवघड होऊन बसते.

राशोमोन द्वार - २

तिसरा माणूस द्वाराच्या छताखाली उभे राहून तो आपले ओले कपडे काढून पिळत असतानाच त्या लाकूडतोड्याचे पुन्हा एकवार ’मला काहीच समजत नाही’ हे उद्गार त्याच्या कानी पडतात. त्याचे लक्ष या दोघांकडे जाते. ’मला अजिबातच काही समजत नाही.’ लाकूडतोड्या पुन्हा पुन्हा म्हणत राहतो. तो माणूस लाकूडतोड्याजवळ येतो नि त्याला विचारू लागतो की ’तुला काय समजत नाही?’ ’मी अशी विचित्र गोष्ट कधीही ऐकली नाही’ लाकूडतोड्या सांगतो. भिक्षूही त्याच्या म्हणण्याला दुजोरा देतो. ’काय झाले आहे?’ माणूस भिक्षूला विचारतो. ’एका माणसाचा खून झाला आहे.’ भिक्षू प्रास्ताविक करतो. ’एकाच?’ तो माणूस उद्गारतो. ’त्यात काय मोठंसं, या द्वारावर एका वेळी पाच-सहा तरी बेवारस प्रेते पहायला मिळतात.’ तो तुच्छतेने उद्गारतो. भिक्षू खेदाने होकार देतो. त्याच्याच निवेदनातून तो काळ उलगडू लागतो.

युद्ध, रोगराई, भूकंप, वादळाच्या एकामागून एक आलेल्या अरिष्टांमुळे आधीच उद्ध्वस्त झालेली नगरी नि त्यात दरोडेखोरीचे थैमान त्यामुळे जगण्यावरील विश्वास हरवून बसलेली, कडवट झालेली सामान्य माणसे. भिक्षूही किड्यामुंग्याप्रमाणे, चिलटांप्रमाणे माणसे चिरडली गेल्याचा नि त्याला आपण साक्ष असल्याचा उल्लेख करतो. पण ही जी अविश्वसनीय वाटणारी घटना आहे त्यानंतर आपण माणुसकीवरचा, माणसाच्या अंतरात्म्यावरचा विश्वास गमावल्याचे सांगतो. जे घडले ते आधी उल्लेख केलेल्या अरिष्टांपेक्षाही भयानक होते असा त्याचा दावा आहे. इतक्या सार्‍या विध्वंसक घटनांपेक्षाही या घटनेत विदारक असे काय असावे की त्या तांडवातही न गमावलेला माणुसकीवरचा विश्वास एका व्यक्तीच्या मृत्यूने त्याने गमवावा? तिसरा माणूस 'पुरे करा तुमचे प्रवचन' म्हणून त्याला डाफरतो, बिनदिक्कतपणे त्या द्वाराच्या दोन फळ्या तोडून घेतो नि शेकोटी पेटवतो. (यातून त्या द्वाराच्या विदीर्ण अवस्थेला नैसर्गिक र्‍हास जसा कारणीभूत आहे तशीच माणसाची करणीदेखील याची अप्रत्यक्ष नोंद केली जाते.) मनावरील ताण असह्य झालेला लाकूडतोड्या त्याच्याकडे धावतो नि त्याला म्हणतो ’कदाचित तू यातून काही अर्थ सांगू शकशील. मला त्या तिघांचे काही समजतच नाही.’ ’खाली नीट बैस नि मला शांतपणे नीट समजावून सांग’ तो माणूस म्हणतो. लाकूडतोड्या त्याच्या शेजारी जमिनीवर बसतो नि सांगू लागतो. ’ती दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, मी जंगलात लाकडे आणायला गेलो होतो....’

इथेही सत्यान्वेषणाबाबत एका प्रचलित पद्धतीचा आधार लाकूडतोड्या घेऊ पाहतो. सत्य काय ते मला ठाऊक नाही, पण दुसर्‍या कोणाला ते ठाऊक असावे अथवा उमगावे नि त्याने ते आपल्याला उलगडून सांगावे अशी मूलभूत इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली आहे. इथे ज्याच्याकडून ती अपेक्षा आहे त्याचा पूर्वेतिहास अथवा लाकूडतोड्या जे सांगतो त्यातून योग्य अर्थ काढण्याची त्याची गुणवत्ता (इलिजिबिलिटी) दोन्ही याबाबत लाकूडतोड्याला काहीही पूर्वकल्पना नाही. समाजात मान असलेला नि सर्वसामान्य जनतेला मार्गदर्शक म्हणून मान्य असलेला भिक्षूही ज्या समस्येपुढे हतबुद्ध झाला आहे त्याबाबत हा सर्वस्वी तुच्छतावादी दिसणारा माणूस काही उलगडून दाखवू शकेल असे लाकूडतोड्याला का वाटावे हे वरकरणी अनाकलनीय वाटेल. परंतु हा मनुष्यस्वभाव आहे. ’दोघांपेक्षा तिसरा शहाणा’ या उक्तीचा परिणाम आहेच शिवाय या निमित्ताने त्याला घटनाक्रमाची पुन्हा उजळणी करता येईल, नि त्या दरम्यान स्वतःकडून दुर्लक्षले गेलेले काही तपशील पुन्हा बारकाईने तपासता येतील हा एक संभाव्य फायदाही त्याच्या मनात असावा.

लाकूडतोड्याच्या कथनाची सुरवात होते ती जंगलात, सूर्यावर कॅमेरा रोखून. पण हा कॅमेरा स्थिर नाही, तो एका निश्चित गतीने पुढे सरकतो आहे. त्यामुळे वृक्षराजीतून त्याला दिसणारा सूर्य लपंडाव खेळताना दिसतो. त्याचे पुरे दर्शन कधीच घडत नाही, अधूमधून नि खंडशः दिसणार्‍या त्याच्या प्रकाशाच्या तुकड्यांवरून त्या विशाल वृक्षांच्या पर्णराजीपलिकडे वर त्याचे स्थान असावे इतके नक्की सांगता येते. त्यानंतर दिसतो तो एका व्यक्तीचा खांदा नि त्यावरील कुर्‍हाड, जिचे पाते एका चामड्याच्या तुकडयाने अवगुंठित केले आहे. सुरुवातीला दिसणारे सूर्य नि अवगुंठित कुर्‍हाड ही कुरोसावाने पुढील कथेची केलेली नांदीच आहे. खांदा खुद्द निवेदक लाकूडतोड्याचा. जंगलातून चाललेला असता त्याचा दृष्टीस पडते ती एक टोपी, जपानी भद्र समाजातील स्त्रिया उन्हापासून आपले संरक्षण करताना घालतात ती गोल टोपी, त्याला असलेल्या झिरझिरित बुरख्यासह. थोडे पुढे गेल्यावर त्याला सापडते सामुराई लढवय्ये वापरतात तशी लहानशी टोपी. मग सापडते ती एक दोरी. थोडे पुढे गेल्यावर वाटेवर एक चमकदार वस्तू पडलेली त्याला दिसते. त्यावरून परावर्तित झालेल्या कवडशामुळे त्याच डोळे दिपतात. ती वस्तू नक्की आहे तरी काय हे निरखून पहात तो तिच्याकडे जात असताना तो अडखळतो. आपण कशाला अडखळलो हे पाहू जाता त्याला दिसते ते दोन हात समोर करून पडलेले एक प्रेत. घाबरून तो पळ काढतो. त्याची कुर्‍हाड, त्याने उचलून घेतलेली सामुराईची टोपी नि ती दोरी त्या धावपळीत तिथेच पडतात.

लाकूडतोड्याला सापडलेल्या वस्तूंबाबत काही लक्षणीय आहे. तीनही वस्तू एका जागी सापडलेल्या नाहीत. तो घटनाक्रम अंशा अंशाने प्रकट होत जातो आहे. त्या तीनही वस्तूंची मालकी वेगवेगळ्या व्यक्तींकडे आहे हे पुढे स्पष्ट होते. प्रत्येक वस्तू त्या त्या व्यक्तीबद्दल काही सांगून जाते. अवगुंठ्ण हे स्त्रीचे आहे हे तर उघडच आहे पण त्याचबरोबर ती स्त्री प्रतिष्ठित अथवा भद्र समाजातली असावी. दुसरी टोपी तर एका सामुराईची त्यामुळे त्याचा मालक एक सामुराई असावा याबाबत शंका घेण्याचे कारणच नाही. तिसरी आहे ती दोरी ही तशी सामान्याचे साधन, ते एखाद्या लाकूडतोड्याचे असू शकते अथवा एखाद्या डाकूचे. थोडक्यात त्या तीन वस्तू तीन तिथे व्यक्तीचे अस्तित्व सूचित करतेच नि त्यांच्या सहभातून घडलेल्या घटनेची परिणती ते प्रेत लाकूडतोड्याला दाखवत असते.

तीन दिवसांनी लाकूडतोड्याला न्यायालयात साक्षीसाठी बोलावणे येते.

लाकूडतोड्याची साक्ष
लाकूडतोड्या साक्ष देतो आहे. पण इथे पडद्यावर न्यायाधीश नाही. तो सरळ कॅमेर्‍याकडे पहात बोलतो आहे. एकप्रकारे हा प्रेक्षकांशीच संवाद आहे. न्यायाधीशांनी विचारलेले प्रश्न प्रेक्षकांना ऐकू येत नाहीत (जणू न्यायाधीशाच्या भूमिकेत प्रेक्षकच ते प्रश्न विचारताहेत), पण साक्ष देणार्‍याला ते ऐकू येतात. साक्ष देणारा वाळूवर बसला आहे. त्याच्या पाठीमागे भिंत आहे नि तिच्यावरून मागचे आकाश दिसते आहे. तो बसलेल्या ठिकाणी अर्ध्या भागात प्रकाश आहे तर उरलेला अर्धा भाग सावलीत आहे. प्रकाश नि सावली दोघांनाही पुरी जमीन व्यापता आलेली नाही. सावलीचे क्षेत्र, मग दिसणारे कडक उन्हाचा पट्टा, त्यानंतर थोड्या अधिक गडद रंगाची भिंत नि पलिकडे काळ्या पांढर्‍या रंगांची घुसळण मिरवणारे आकाश.

त्याला न्यायाधीश विचारतात 'तिथे तू एखादी तलवार पाहिलीस का?' त्यावर तो केवळ ’नाही’ या एका शब्दात उत्तर न देता अतिशय गडबडतो नि घाईघाईने 'नाही, मुळीच नाही' असे ठासून सांगतोय. त्या वाटेवर आपल्याला सापडलेल्या त्या तीन वस्तूंव्यतिरिक्त तो झाडावर एके ठिकाणी एक ताईत लटकलेला दिसल्याचा उल्लेखही करतो. तो ताईतही त्याच्या मालकाला अरिष्टाला दूर ठेवू शकलेलाच नसतो.

पुढची साक्ष त्या भिक्षूची. भिक्षू आता लाकूडतोड्या जिथे बसला होता त्या जागी बसलाय. पण त्याच्या मागे काही अंतरावर तो लाकूडतोड्या बसला आहे. प्रत्यक्षात न्यायालयात एकाची साक्ष पुरी झाल्यावर त्याने पुढील साक्षींसाठी अथवा निकालासाठी उपस्थित असणे अनिवार्य नसते. त्यातून पुढच्या साक्षीदाराच्या पाठीमागे बसण्यापेक्षा समोरच्या बाजूला बसून ती ऐकणे अधिक संयुक्तिक नव्हे काय? पण हे वरकरणी अनाकलनीय वाटणारे दृश्य वाटते तितके आश्चर्यकारक नाही. लाकूडतोड्या नि भिक्षू यांच्या साक्षींनंतर पुढील - पोलीस, ताजोमारू, ती स्त्री आणि माध्यमाच्या सहाय्याने दिली गेलेली सामुराईची साक्ष या - सर्व साक्षी/जबान्यांच्या वेळी हे दोघे साक्ष देणार्‍याच्या पाठीमागे बसलेले दिसतात. जंगलातील ज्या घटनेचा अंशमात्रच जाणत असल्याने संपूर्ण घटनाक्रमाबद्दल उत्सुकता असल्याने ते या सार्‍या साक्षीपुराव्यांचे वेळी उपस्थित राहून जंगलात नक्की काय घडले हे जाणून घेऊ पहात आहेत.

भिक्षू सांगतो मी त्या मृत व्यक्तीला त्याच्या मृत्यूपूर्वी भेटलो आहे, सुमारे तीन दिवसांपूर्वी, दुपारी. एका घोड्याला हाती धरून चालवत नेणारा पुरुष नि त्यावर आरुढ झालेली एक स्त्री, बुरखा असल्याने तिचा चेहरा दिसला नाही. पुरुषाच्या कमरेला तलवार होती, बगलेत बांधलेले धनुष्य नि पाठीवर बाणांचा भाता. त्याचा असा शेवट होईल याची शंकादेखील मला आली नाही. मानवी जीवन प्रात:कालीन दवबिंदूंइतकेच अल्पायुषी असते हेच खरं. जे घडले त्याबद्दल तो खंत व्यक्त करतो नि मृतासाठी प्रार्थना करतो.

भिक्षूची साक्ष ही घटनाक्रमाच्या मूल्यमापनाच्या दृष्टीने बव्हंशी निरुपयोगी अशी आहे. लाकूडतोड्याला सापडलेल्या तीन वस्तूवरून आधीच तर्क केलेले एक स्त्री नि एका सामुराईच्या त्या जंगलातील अस्तित्वाला अनुमोदन देण्यापलिकडे त्यातून काहीच उपयुक्त माहिती मिळत नाही. समाजात असलेल्या त्याच्या केवळ साक्षीदाराच्या, सहभागशून्य चांगुलपणाच्या भूमिकेचे सादरीकरण यापलिकडे प्रत्यक्ष खटल्यात त्या साक्षीला फारसे महत्त्व नाही. घटनाक्रमामधे सहभागी असलेल्या पहिल्या दोन व्यक्तींचा कथावस्तूमधे प्रवेश या साक्षीमधून होतो. उरलेल्या तिसर्‍याचा प्रवेश पुढील साक्षीतून.

यानंतर न्यायासनासमोर येतो तो ताजोमारू नावाचा डाकू नि त्याला बंदिवान करणारा, बहुधा पोलिस. प्रथम साक्ष होते ती त्या पोलिसाची. पोलिसाची साक्ष चालू असताना शेजारीच बसलेला, बंदिवान केलेला डाकू आकाशात तिसरीकडेच कुठेतरी नजर लावून बसलेला आहे. समोर जे चालू आहे त्याच्याशी आपला काडीचाही संबंध नाही असा त्याचा आविर्भाव आहे. या दोघांच्या पाठीमागे तो लाकूडतोड्या नि भिक्षू बसलेले दिसतात. पोलिस मात्र न्यायासनासमोर अतिशय नम्र आहे. वारंवार अभिवादन करत तो न्यायासनाला आपण त्या डाकूला बंदिवान कसे केले याचा घटनाक्रम उलगडून सांगतो आहे. दोघांच्या समोर एक तलवार, धनुष्य नि बाणांचा भाता ठेवलेला आहे. ’हा जो मी पकडलेला माणूस आहे तो आहे कुप्रसिद्ध डाकू ताजोमारू.’ अशी प्रस्तावना करून तो घडलेला प्रसंग सांगू लागतो नि तो कुरोसावा प्रेक्षकांसाठी पडद्यावर साकार करू लागतो. तो पोलिस दोन दिवसांपूर्वी कत्सुरा नदीकिनारी फिरायला गेलेला असताना तिथे पोट पकडून तळमळत पडलेला ताजोमारू त्याला दिसतो. त्याला तो उठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ताजोमारू त्याला इतक्या जोराने झिडकारतो की तो तीनताड उडून थेट नदीत जाऊन कोसळतो. ताजोमारूच्या शेजारीच कातड्याचे आवरण लावलेल्या धनुष्याबरोबरच गरुडाचे पंख लावलेले काही बाण विखुरलेले दिसतात. जवळच एक घोडा रेंगाळत असतो. (हे सारे त्या मृत माणसाचे, सामुराईचे होते).

पोलिसाची साक्ष (बाजूला बंदिवान केलेला ताजोमारू)
पोलिस आपण ताजोमारूला कसे पकडले हे सांगत असताना ताजोमारू आकाशात उलगडणार्‍या ढगांच्या लडींकडे नजर लावून बसला आहे. पोलिसाच्या जबानीकडे जणू त्याचे लक्ष नाही. पोलिस पुढे सांगतो "ताजोमारूचे दुर्दैव हे की त्या चोरलेल्या घोड्याने त्याला फेकून देऊन एक प्रकारे आपल्या धन्याचा सूड उगवला त्याच्यावर." हे ऐकल्यावर मात्र ताजोमारू खाडकन आपली मान फिरवतो नि खुनशी नजरेने फौजदाराकडे पाहतो. मग वेडगळपणाची झाक असलेले गडगडाटी हास्य करतो. ’मला घोड्याने पाडले? मूर्ख कुठला.’ तो म्हणतो. ’त्यादिवशी...’ असे म्हणत तो आपली साक्ष सुरू करतो.

घटनेत सहभागी नसलेल्या किंवा साक्षीभावानेही उपस्थित नसलेल्या तिघांच्या साक्षी आता पूर्ण झालेल्या आहेत. प्रत्यक्ष गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तिघांची ओळख प्रेक्षकांना या साक्षींमधून झालेली आहे. आता प्रत्यक्ष सहभागी असलेल्या तिघांच्या - हो तिघांच्या, कारण मृत झालेल्या सामुराईची साक्षही कुरोसावा काढतो आहे - साक्षी आता कुरोसावा आपल्यासमोर मांडतो आहे. ’घोड्याने आपल्याला पाडले’ हे पोलिसाचे म्हणणे खोडून काढत ताजोमारू आपले निवेदन सुरू करतो, जे आपल्यासमोर दृश्यरूपात साकार होऊ लागते.

'हुं. म्हणे घोड्याने मला पाडले' -ताजोमारू
आकाशात काळेकभिन्न ढग विहरत आहेत. त्यांच्यामधून एखादा चुकार सूर्यकिरणांचा पट्टा निसटून जमिनीकडे झेपावतो आहे. क्षितीज अगदी खाली जेमतेम नजरेस येईल इतक्या उंचीवर दिसते आहे. नि त्यावरून अगदी खेळण्यातला वाटावा इतका इटुकला दिसणारा ताजोमारू आरडाओरड करत दौडत जातो. "मी घोड्यावरून दौड करत होतो नि मला तहान लागली होती. ओसाकाजवळ एका झर्‍याचे पाणी मी प्यायलो. कदाचित त्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला एखादा विषारी साप मरुन पडला असावा. ते पाणी प्यायल्यावर थोड्याच वेळात मला पोटात वेदना होऊ लागल्या. नदीकाठी येईतो पोटदुखी असह्य होऊन मी खाली कोसळलो नि जमिनीवर तडफडत पडून राहिलो." तुच्छतेने पोलिसाकडे नजर टाकून तो म्हणतो "आणि हा म्हणतो मला घोड्याने पाडले, हुं. एखादा मूर्खच असा मूर्खपणाचा विचार करू शकतो." इथे आपण केवळ योगायोगाने पोलिसाच्या हाती लागलो, पोलिस किंवा घोडा यांच्यापैकी कोणीही आपल्यावर मात केलेली नाही हा अहंकार त्याने जोपासला आहे.

"आज ना उद्या तुम्ही मला पकडणारच होतात. ठीक आहे. काहीही न लपवता आता मी सांगतो. त्या व्यक्तीला ठार मारणारा हा ताजोमारूच होता." आता तो प्रत्यक्ष घटनेबद्दल सांगू लागतो. "तीन दिवसांपूर्वीची दुपार. मी जंगलात एका झाडाखाली झोपलो होतो. अचानक वार्‍याची एक थंडगार झुळुक आली. पुढे जे काही घडले ते या एका झुळुकीमुळे. ती झुळुक आली नसती तर मी त्याला ठार केले नसते."

(क्रमश:)

_______________________________________________________

*क्योटो ही जपानची तत्कालीन राजधानी.
**क्रायटेरियन कलेक्शनमधे उपलब्ध असलेल्या प्रतीमधे - निदान सबटायटल्समधे - हे दिसले नाही. परंतु राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात जेव्हा आम्हाला हा चित्रपट दाखवला गेला तेव्हा पडद्यावरचे पहिले वाक्य हे होते. याच्याशिवाय राशोमोन द्वाराची भग्नावस्था तसेच कथेचा अविभाज्य भाग असलेल्या तिसर्‍या माणसाचे वर्तन प्रेक्षकाला समजावून घेता येणे अवघड होते.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

ह्म्म रोचक!
वाटच बघत होतो.. पुन्हा क्रमशः बघून खट्टू झालो आता अजून वाट पाहणे आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरे वा

गुरुजी, तुमच्या आवडीच्या ट्रॅकवर भाग ३ आल्यामुळे अंमळ आनंदच झाला. नेमक्या या विषयात मला गती जरा कमी आहे. आमची गाडी प्रभात चित्र च्या पुढे जातच नाही Sad

एकेक शिकायला मिळते आहे हेच खूप आहे. Smile
एकंदरित आस्वाद कसा घ्यावा हे आता कळू लागले आहे.
आपली (घाईघाईत) पुण्यात भेट झाली तेव्हा तुमच्या हातातील त्या गलेलठ्ठ पुस्तकाची महती आत्ता पटू लागली आहे.
आता तुमची पुढची भेट घाईघाईत घेण्याचा मूर्खपणा मी करणार नाही Wink त्यावेळी ते वजनदार पुस्तक नक्की घेऊन या अशी आग्रहाची विनंती

अकिरा कुरोसावा हा मनुष्य (आणि तुम्ही) याच भूतलावरचा आहे की कुठून आकाशातून खाली पडलाय अशी शंका मनात निर्माण होते आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा आवडता चित्रपट आहे.

इथे पडद्यावर न्यायाधीश नाही. तो सरळ कॅमेर्‍याकडे पहात बोलतो आहे. एकप्रकारे हा प्रेक्षकांशीच संवाद आहे. न्यायाधीशांनी विचारलेले प्रश्न प्रेक्षकांना ऐकू येत नाहीत (जणू न्यायाधीशाच्या भूमिकेत प्रेक्षकच ते प्रश्न विचारताहेत), पण साक्ष देणार्‍याला ते ऐकू येतात.

प्रेक्षक म्हणून एक नवा दृष्टिकोन दिलात. धन्यवाद रमताराम. मी खुद्द आजवर न्यायाधीश-भूमिकेतून ती साक्ष बघितलेली नाही. न्यायाधिशापाशी मोक्याच्या ठिकाणी बसलेला व्यक्ती म्हणून साक्ष पाहिली. पण तुम्ही म्हणता तो दृष्टिकोन पटण्यासारखा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या "वाचते आहे" एवढंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उत्कृष्ट दिग्दर्शनाचं एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे अनेक बारक्या बारक्या फ्रेम्सही एक छोटीशी कथा सांगतात, किंवा चालू कथेसाठी वातावरण निर्मिती करतात. काही वेळा त्यांतून शब्द मनात उमटतात, तर काही वेळा आपल्या आंतर्मनात मनात विचार निर्माण करतात.

यात काळे ढग पांढर्‍यांवर आक्रमण करताहेत की पांढरे काळ्यांचे साम्राज्य उलथण्याच्या निर्धाराने सामोरे जात आहेत हे सांगणे अवघड होऊन बसते.

त्याचे पुरे दर्शन कधीच घडत नाही, अधूमधून नि खंडशः दिसणार्‍या त्याच्या प्रकाशाच्या तुकड्यांवरून त्या विशाल वृक्षांच्या पर्णराजीपलिकडे वर त्याचे स्थान असावे इतके नक्की सांगता येते. त्यानंतर दिसतो तो एका व्यक्तीचा खांदा नि त्यावरील कुर्‍हाड, जिचे पाते एका चामड्याच्या तुकडयाने अवगुंठित केले आहे.

या व अशा इतर बारीक निरीक्षणांतून हे छान दाखवलेलं आहे.

या कथेने मनावर पकड घ्यावी यासाठी सादरीकरणातही लेखकाने/ दिग्दर्शकाने कष्ट घेतलेले दिसतात. सुरूवातीच्या प्रसंगात 'काहीतरी वेगळंच घडलंय' हे जाणवतं. आणि असं काय घडलं असावं ज्याने या लाकूडतोड्याचा आणि भिक्षूचा माणुसकीवरचा, माणसाच्या अंतरात्म्यावरचा विश्वास गमावला जावा? हा प्रश्न मनाची पकड घेतो. त्याचबरोबर दोघांच्या साक्षीतून प्रसंगाचा शेवट - दोरी, प्रेतं, मृत्यू आणि त्याआधीचे दोन उच्च घराण्यातले प्रवासी दिसतात. या दोन टोकांमध्ये काय बरं असेल? हाही पुढचा प्रश्न. हेच जे काही आहे ते इतकं भयंकर आहे की त्याने त्या दोघांना विमनस्क केलं ही उत्कंठा आहे.

लाकूडतोड्याला प्रथम तुकडे, तुकडे दिसतात. काहीतरी वेगळं आहे अशी शंका येत रहाते आणि मग प्रेत दिसतं. तसंच या कथेबद्दल चालू आहे.
मी चित्रपट बघितलेला नसल्यामुळे नक्की प्रेत काय दिसणार याची भीतीयुक्त उत्कंठा निर्माण झालेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0