सप्तरंगी कावळा

पुस्तकविश्ववरती फार पूर्वी लिहीलेला एक पुस्तकपरिचय सापडला.
_____________________
सप्तरंगी कावळा

https://images-na.ssl-images-amazon.com/images/I/81AXIEmtIXL.jpg
.
माझी मुलगी ५ वर्षाची चिमुरडी होती तेव्हा एके दिवशी शाळेतून घरी आली आणि मला अधीरतेने म्हणाली "आई, मी ग्रंथालयातून एक पुस्तक आणलं आहे. आपण वाचू यात का? खूप सुंदर चित्रांचं पुस्तक आहे. मला आत्ताच्या आत्ता वाचायचं आहे." तिच्या बालहट्टाला मी आनंदाने रुकार भरत पुस्तक उघडले आणि मनात तुच्छतेने म्हटले - "रेनबो क्रो? म्हणजे सप्तरंगी कावळा? छे कावळा मेला सप्तरंगी कसा असेल? कावळा तो काळा तो काळाच. मेलेले उंदीर अन उकीरडा खाणारा."
पुढे आम्ही पुस्तक वाचू लागलो आणि ही नेटीव्ह अमेरीकन दंतकथा वाचता वाचता आम्ही गुंग होऊन गेलो. एक तर ती नेटीव्ह अमेरीकन कथा त्यात दंतकथा होती यातच तिच्या अद्भुततेचा उगम होता.कावळ्याच्या त्यागाची अतिशय करूण आणि विलक्षण अशी ती कहाणी होती.
फार फार वर्षापूर्वी दोन पायांचा प्राणी अस्तित्वात येण्याआधी , कावळा हा सर्वात सुंदर पक्षी होता. सप्तरंग आणि मधुर आवाजाची देणगी कावळ्याला निसर्गाने मुक्तहस्ते बहाल केली होती. सौंदर्याची तर त्याच्यावर लयलूटच होती. पण एकदा काय झालं खूप हिमवर्षाव होऊन, मऊमऊ आणि चमचमणार्‍या बर्फाने पृथ्वी गोठून गेली. आता या संकटावर मात कशी करायची म्हणून सर्व पशुपक्षांची सभा झाली आणि सर्वानुमते ठरले की कावळा हाच आकाशदेवतेकडे जाण्यास योग्य पक्षी आहे.
मग पुढे पुस्तकात खूप रसभरीत वर्णन, कविता येतात की ३ दिवस - ३ रात्री कावळा बिचारा कसा उडत राहीला आणि शेवटी आकाशदेवतेपर्यंत कसा पोचला. तेथेदेखील गोड आवाजात आळवणी करून त्याने आकाशदेवतेची कशी मनधरणी करून , आगीची भेट पदरात पाडून घेतली. भेट तर मिळाली, पण ही आग काडीवर घेऊन येई येइपर्यंत बिचार्‍याची रंगीत पिसं पार काळी ठिक्कर पडली. धूरामुळे आवाज कर्कश्श होऊन बसला. आणि अशा रीतीने पृथ्वीवरील प्राण्यांना आगीचे वरदान मिळाले पण कावळ्याने सौंदर्य आणि गोडवा कायमचा गमावला.
पण आजही तुम्ही जवळून कावळ्याचे पीस पहाल तर त्यावर सप्तरंग नाचताना दिसतात. होय खरच दिसतात. पक्षी नीरीक्षक हे जाणतात तुम्ही थोडे नीरीक्षण केले तर तुम्हालादेखील अनुभवता येइल.
या त्यागाच्या बदल्यात, आकाशदेवतेने कावळ्याला वर जरुर दिला की मानव हा अन्य पक्ष्यांना मारुन खाइल पण तुला मात्र कधीही खाणार नाही कारण तुझे मांस चवीला, धुरकट लागेल.
ती गोष्ट वाचल्यानंतर मी आणि माझी मुलगी थोडा वेळ शांत झालो, जरा खिन्नच वाटत होतं. ती अद्भुत गोष्ट खूप खूप आवडली होती हे नक्की.बाह्यरूपाने अंतरंगाचा ठाव घेता येत नाही हे पुनश्च अधोरेखीत झाले होते. ते पुस्तक वाचल्यानंतर कावळ्याकडे पहाण्याची माझी दृष्टी पूर्ण १८० अंशातून बदलली होती.
लहान मुलांच्या पुस्तकांचं हे छान असतं, या पुस्तकांमुळे आपली नाळ परत विसरलेल्या साध्या सोप्या संस्कारांशी, मूल्यांशी जोडली जाते.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)