मुलांकरीता लेखन / डिजिटल साहित्यासाठी आवाहन
सद्य:स्थितीत बालसाहित्य हे मराठी साहित्यातील सावत्र बाळांपैकी एक. मराठी बालसाहित्याकडे बघितलं तर सध्या काय दिसतं? एका टोकाला इसापनीती, पंचतंत्र, रामायण, महाभारत आणि शूर वीर वगैरे राजे/नेते/सैनिक वगैरेंबद्दल गोड-मधाळ किंवा हिंसात्मक लेखन या काठ्यांवर उभारलेला व्यावसायिक डोलारा, तर दुसरीकडे माधुरी पुरंदरे, स्वप्नाली मठकर वगैरे स्वबळावर टिकून राहिलेल्या चित्रकार-लेखकांची व काही प्रकाशनांची ओअॅसिससदृश एकांडी बेटं. अशी बेटं वाढताहेत हे कबूल पण ते प्रमाण पुरेसं आहे का? ते पुरेसं प्रातिनिधिक आणि आत्ताच्या मुलांच्या विश्वाला पुरेसं कवेत घेणारं आहे का? तर माझ्या मते नाही. मुलांवर माहितीचे डोंगर ओतायला किंवा त्यांना आयते तथाकथित संस्कार पाजायला सगळे सज्ज आहेत पण मुलांच्या पातळीवर जाऊन त्यांच्यासाठी चित्र, कला, कथा, कविता, गाणी, गोष्टी, खेळ यांद्वारे त्यांच्यासाठी किती निर्मिती होते?
आता यावर नुसते लेख लिहून किंवा फेसबुक पोस्ट टाकून काही होणार नाहीये हे पुरं जाणून आहे - तुम्हीही जाणून आहात. याच विचारांतून या (२०१८च्या) बालदिनाला लहान मुलांसाठी केलेले लेखन प्रकाशित करणार्या एक वेबसाइटची घोषणा केली आहे. डोमेन-नेम बुक केलं आहे (www.atakmatak.com) आणि तांत्रिक काम लगोलग चालू झालं आहे. शक्य तितक्या लवकर ही साइट सुरू करण्याचा मानस आहे.
शालेय विद्यार्थ्यांना वेळोवेळी वाचायला/बघायला देण्यासारखे लेखन/दृक्-श्राव्य फिती/खेळ वगैरे बाबी या साईटवर प्रकाशित करायची इच्छा आहे. साइटची कल्पना थोडक्यात सांगायची, तर समकालीन, उदारमतवादी, लिंगाधारित साचे न मानणारं, नवं ताजं, मुलांना आपलं वाटेल असं काही मराठीतून मुलांना मिळावं - मिळात रहावं यासाठी ही साइट असेल.
एकीकडे तांत्रिक काम करताना, इथे दर्जेदार बीजलेखनाचे आवाहन करत आहे. या दृष्टीने तुमची मदत हवी आहे. त्यासाठी काही सूचना:
१. ही वेबसाइट वेगवेगळ्या वयोगटांच्या मुलांसाठी साहित्य प्रकाशित करेल. मुलांबद्दलचे किंवा बालसंगोपन/विकास/पालकत्व वगैरे विषय या साइटच्या कक्षेबाहेर असतील.
२. सदर लेखन/दृकश्राव्य ध्वनिफिती / चित्रफिती (क्लिप्स) monitor.atamatak@gmail.com या पत्त्यावर पाठवाव्यात.
३. शब्दसंख्येची/ आराखड्याची (फॉर्मॅटची)/माध्यमाची मर्यादा नाही. एखाद्या शालेय वयोगटाच्या मुलांना आवडेल/समजेल अशा भाषेत काहीही चालेल.
४. पाठवाल त्या लेखनावर संपादकीय संस्कार होतील ह्याची नोंद घ्यावी.
५. मुलांची साइईट म्हटली, की चित्रांची गरज मोठ्या प्रमाणात भासते. तुम्हाला चित्रकलेत गती आणि लेखनानुरूप चित्र काढण्यात रस असल्यास तुमचं स्वागत आहे.
पाठवलेले प्रत्येक लेखन साइटवर येईलच असे नाही. मात्र लेखन पाठवल्याच्या १५ दिवसांत ते स्वीकारले आहे, की नाही ते कळवू.
या लेखनासाठी/चित्रांसाठी आर्थिक मोबदला ताबडतोब देणे शक्य नाही, पण पुढेमागे व्याप्ती वाढल्यास त्याचाही विचार करता येईल. मग, करताय ना मदत?
सध्या लगेच लेखन पाठवू शकत नसाल, तरी दोन प्रकारे मदत करू शकता:
१. आमच्या फेसबुक पेजला लाइक करा व त्या पेजचा फेसबुक, व्हॉट्स ॲपद्वारे प्रसार करा.
२. साईटचं बोधचिन्ह (लोगो) अजूनही ठरवलेला नाही. तुमच्या डोक्यात एखादा लोगो/कल्पना असेल तर कच्चं रेखाटन, वा त्याचं छायाचित्र वरील इमेल पत्त्यावर धाडा.
याबद्दल अधिक बोलायचे असेल तर मला व्यनिमधून संपर्क करू शकता.
सदर आवाहन प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल ऐसी प्रशासनाचे आभार.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
सध्या फक्त शुभेच्छा
अरे मस्तच उपक्रम. हृषिकेशा तू आधी बोललेलास तसे करत आहेस ह्याचा आनंद आहे.
बरंच म्हणजे बरंच काही करु शकेन पण आर्थिक मोबदल्याशिवाय सध्या काहीच करणे जमणार याचे सध्या प्रचंड दु:ख आहे. फक्त शुभेच्छा सध्या देतोय. येत्या काळात काही चांगले घडले माझ्या व्यवसायाच्या बाबतीत तर अवश्य करेन अटकमटकसाठी काम. शुअर.
ललित
माझ्या मर्यादित शहरी सर्कलमधील मुलांची मराठीतून ललित करमणूक (कथा, कादंबऱ्या, कविता, गाणी) उपलब्ध नसण्याची मोठी तक्रार आहे. विशेषत: किशोरवयीन मुलांची. त्यात लिंगभेद नसलेले किंवा हल्लीच्या मुलींच्या नजरेतून लिहिलेले किंवा समकालीन नैतिकतेचे भान असणारे बालसाहित्य मराठीत कोणत्याही वयोगटासाठी दिसलेले नाही.
जे बरे म्हणावे असे ललित साहित्य आहे (आवाहनात म्हटलेली बेटं) ती सुद्धा मुंबई-पुणे-नाशिक या त्रिकोणातील शहरी ममव मुलांना डोळ्यासमोर ठेऊन केलेली निर्मिती आहे. बाकी बहुतांश मुलांसाठी काही लोक जमेल तितकं काम करताहेत पण व्यावसायिक निर्मिती शुन्यवत आहे.
अवांतर/समांतर: भागवत अंकातील अमृतवल्ली यांचा इदं न मम हा लेख यासंदर्भात खूप बोलका ठरावा
नमस्कार .
नमस्कार .
मी ईशान पुणेकर .
(हे माझे टोपण नाव आहे .
बालसाहित्य मी या नावाने लिहितो. )
लहान मुलांसाठी गेली खूप वर्षे लेखन करतोय .
मला अटक मटक साठी लेखन करायला नक्की आवडेल ..
मी नवीन लेखन तर करीनच पण
जे अगोदर प्रकशित झाले आहे ते ही देण्याची इच्छा आहे .
कृपया कळावे .
सस्नेह
बिपीन
अटकमटक.कॉम सुरू झाली आहे
इथे घोषित करण्यास आनंद होतोय की १ जानेवारी रोजी अटकमटक.कॉम ही साईट सुरू झाली आहे. ठराविक वेळेच्या अंतराने इथे धागे प्रकाशित होत रहातील. आपल्या घरांतील मुलांना यातील लेखन जरूर वाचायला द्यावे व प्रतिक्रिया कळावाव्यात ही विनंती.
त्याचबरोबर परिचित, नातेवाईक यांच्याद्वारे या साईटबद्दल प्रसारास हातभार लावावा असे आवाहन करतो.
साईट प्रकाशित झाली असली तरी वरील लेखन/चित्र आदीबद्दलचे आवाहन लागू आहे किंबहूना अधिक महत्त्वाचे झाले आहे. याची नोंद घ्यावी :)
साइटचा पत्ता: www.atakmatak.com
मुलांसाठी लिहिताना
अटकमटक.कॉम तर्फे घेऊन येतोय हा पहिला कार्यक्रम. आपल्यापैकी अनेकांना मुलांसाठी काही लिहावं असं वाटत असतं. काही कल्पना असतात, काहींनी थोडं लिहूनही पाहिलं असतं. मात्र सुरुवातीला अनेकांना थोड्या मार्गदर्शनाची गरज भासते.
याचसाठी घेऊन येतोय एक अनोखी बालकथा लेखन कार्यशाळा 'मुलांसाठी लिहितांना'. ही कार्यशाळा प्रसिद्ध बालकथा लेखक 'फारुक एस. काझी' घेणार आहेत.
ही संधी दवडू नका. जागा मर्यादित आहेत. या लिंकवरील जाहिरातीत दिल्यानुसार संपर्क करून आपली जागा आजच नक्की करा.
आभार. आमच्याशी तुम्ही monitor
आभार. आमच्याशी तुम्ही monitor.atakmatak@gmail.com या पत्त्यावर इमेल संपर्क करू शकता
बाकी सर्व ठीकच, परंतु...
Uttam marathi lekhikaa aahe .
...नाही म्हणजे, असालही; त्याबद्दल प्रत्यवाय नाही - उलटपक्षी, तसे असल्यास आदर तथा कौतुकच आहे, परंतु... हे असे स्वतःच स्वतःबद्दलच लिहायचे? आत्मस्तुती?
काही नाही, गंमत वाटली, इतकेच.
And I have a nice series for children in mind.
हं, हे ठीक आहे. यात केवळ statement of intent आहे. उत्तम.
उत्तम उपक्रम
तुमचे संस्थळ सचित्र करण्यास मदत करू शकेन. मराठी हस्ताक्षर, सुवाच्य कसे लिहावे इ.वर सचित्र लिखाणही जमेल. पण बालसाहित्य अगदीच हद्दीपलिकडची बाब. असो. तुमच्या कार्यास अनेक शुभेच्छा.
--
आर्थिक मोबदल्याची अपेक्षा (सध्यातरी :P) नाही.