Skip to main content

गुलाबी सिर- द पिंक हेडेड डक

'गुलाबी सिर- दी पिंक हेडेड डक' या संतोष शिंत्रेच्या पहिल्या कथासंग्रहाच्या 'ब्लर्ब' मध्ये म्हटलेलं आहे, 'नव्या शतकाच्या पहिल्या अकरा वर्षांमध्ये लिहिलेल्या या कथा. माणसाचं व्यक्तिगत आणि सामूहिक आयुष्य कधी उजळून, कधी झाकोळून तर कधी भोवंडून, चक्रावून टाकणारी ही वर्षं. माध्यमं, तंत्रज्ञान, संधी, आव्हानं, मूल्यं, माणुसकी, परस्परसंबंध, शोषण, सामाजिक वास्तव... सगळंच ढवळून काढणारी वर्षं. सोबतीला निसर्गाच्या सतत होणार्‍या र्‍हासाची गिरमिटयुक्त जाणीव. पण कुठेतरी, आशेची एक न संपणारी लकेरही. 'गुलाबी सिर- दी पिंक हेडेड डक' मधील कथा म्हणजे 'अपेक्षाभंग' आणि 'भ्रमनिरास' या जुन्या दोस्तांच्या सोबतीनंच पण आशेच्या त्या लकेरीसह त्या सगळ्या जाणिवांना, बदलांना एका ताज्या, लिहित्या मनानं दिलेला सकारात्मक प्रतिसाद.' हा कथासंग्रह वाचताना हे वर्णन किती समर्पक आहे हे जाणवत जाते
संतोषच्या या कथासंग्रहातील नऊ कथांपैकी बर्‍याचशा कथांचा मी पहिला वाचक, उदंड प्रशंसक आणि प्रसंगी कठोर टीकाकार झालेलो आहे. या कथांपैकी काही कथांचा कच्चा खर्डा वाचताना कधी मी त्यातल्या विषयांच्या, मांडणीच्या नाविन्यानं थरारुन गेलेलो आहे. तर कधी त्याच्या कथांमधील काही घटना, काही रचना न पटल्याने मी त्याच्याशी तुटेस्तोवर वादही घातलेला आहे. यातल्या नवापैकी आठ कथा 'साप्ताहिक सकाळ' मध्ये प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्यांनी कथास्पर्धेमधली बक्षीसं पटकावली आहेत. 'गुलाबी सिर- दी पिंक हेडेड डक' या 'दीपावली' च्या २०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या ताज्या कथेला नुकतंच महाराष्ट्र साहित्य परिषदेचं दि. अ. सोनटक्के पारितोषिक मिळालं आहे. या कथासंग्रहात समाविष्ट असलेल्या 'इन्सिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' या कथेचं नाट्यरुपांतर अनेक प्रेक्षकांपर्यंत पोचलेलं आहे. या न्यायाने या कथा लोकप्रिय झालेल्या आहेत. पण तरीही संतोषच्या या कथा जनसामान्यांसाठी नाहीत असंच मला वाटत आलेलं आहे. निव्वळ मनोरंजन, चार घटका करमणूक, वामकुक्षीच्या आधी डोळ्यासमोर धरायची चार अक्षरं असं या कथांचं स्वरुप नाही. खरं तर कुठल्याच लिखाणाचं केवळ असं स्वरुप असू नये, पण तो वेगळा मुद्दा झाला.
या कथा म्हणजे आज मध्यमवयाकडे वाटचाल करणार्‍या पिढीला हादरवून टाकणार्‍या विविध गोष्टींची एका संवेदनशील मनात उठलेली वलये आहेत. जुन्याचे आकर्षण सुटत नाही, नव्याचा मोहही टाळता येत नाही अशा चमत्कारिक परिस्थितीत सापडलेली ही पिढी. बर्मन-गुरुदत्त, तलत-मुकेश, कुलकर्णी-माडगूळकर, हृषीदा-गुलजार, होम्स-वुडहाऊस यांमधला जुनाट गोडवा सोडवत नाही आणि संगणक-इंटरनेट-मोबाईल फोन, ट्रॅफिक यांशिवाय जगताही येत नाही अशा परिस्थितीत काहीशी कुतरओढ होत असलेली ही पिढी. समाजाचे वेगाने होणारे बकालीकरण, सपाटीकरण आणि उथळपणाचा समाजाच्या सर्वच थरांनी बाहू पसरुन केलेला स्वीकार यामुळे पुरती भंजाळलेली ही पिढी. एकीकडे विज्ञानाचा जगभर गाजावाजा होत असताना दुसरीकडे समाजात बुवा, दादा, बापू, मां यांचे चे भीती वाटावी असे वाढत चाललेले प्रस्थ, भ्रष्टाचाराचा समाजातल्या सगळ्याच स्तरांनी सहजपणाने केलेला स्वीकार, निसर्ग, पर्यावरण याबाबतची शासनापासून, सामान्यांपर्यंत सगळीकडे दिसणारी उदासीनता आणि यापलीकडे कशाचेच कशाशी 'देणे-घेणे नसलेला' पाट्या टाकून वैध- अवैध मार्गाने पैसे कमावणारा, विकणारा आणि विकत घेणारा, पैठण्या, गजरे, झब्बे, बटर चिकन, टू बीएचके, मल्टीप्लेक्स, आयटेन, गुगल,फेसबुक, सिंगापूर-मलेशिया (आणि अर्थातच अमेरिका!) हा आणि एवढाच विचार करणारा सुस्त मद्दड समाज याने कमालीची अस्वस्थ झालेली ही पिढी. संतोषच्या या कथांमध्ये या पिढीच्या मनातील खळबळच दिसून येते. 'एम्पथी' या कथेतला मार्केटिंगमधल्या माणसाला उपयोगी पडणारा समोरच्या क्लायंटचा मूड ओळखून त्याला किती 'कमीशन' -लाच द्यायची आहे एवढंच कॅलक्युलेट करणारा- एवढीच फंक्शन्स असणारा कॅलक्युलेटर, 'मारिच' कथेतला बापूंच्या आश्रमातील सत्संगात डोळ्यांत पाणी आणून साधना करणारा धूर्त साधक, आपल्याल शैक्षणिक संकुलातलं 'फिलॉसॉफी' चं डिपार्टमेंट बंद करुन त्या इमारतीत 'पावटॉलॉजी' चा कोर्स सुरु करणारे शिक्षणचूडामणी बाळासाहेब कलंत्रे ही या खळबळींचीच प्रतिकं आहेत. आजूबाजूच्या जगात होत असणार्‍या या विसंगत गोष्टी बारीक नजरेनं टिपताना संतोषने भाषेचा (मराठी आणि काही काही वेळा इंग्रजी आणि हिंदीही) एक कुसरीचे -'क्राफ्ट' चे साधन म्हणून सुरेख वापर केला आहे. शासकीय कर्मचार्‍यांची भाषा, शास्त्रज्ञ-अभ्यासकांची भाषा, अध्यात्म-गुरुंची भाषा ( 'हरी की क्रिपा..), इतिहासतज्ञांची भाषा ('आमचे अगत्य असो द्यावे...') आणि अर्थातच समाजात सगळीकडे झुरळांसारखे पसरलेल्या 'पंक्स' - पावट्यांची भाषा ( 'कम्प्लेट गावात आपला टेरर है बंधो!') या सगळ्या भाषांचे नमुने बघताना लेखकाचे डोळस निरीक्षण तर दिसतेच, पण मुळात त्याचे भाषेवरचे प्रेमही दिसते. 'आख्खे कंट्री की भाषा की तो वाट लगेली है' म्हणणारा 'मुन्नाभाई' आणि हा विनोद म्हणून घेणारे त्याचे प्रेक्षक आठवतात आणि मग भाषाशुचिता हे एक मूल्य मानणार्‍या पिढीचे आणखी एक शल्य ध्यानात येते.
संतोषच्या या कथांपैकी काही कथांना विज्ञानाची, काही ठिकाणी रहस्याचीही जोड आहे. पण तरीही रुढ अर्थाने या कथा रहस्यकथा किंवा गूढकथा नाहीत.काही वेळा त्याची कथा फॅन्टसीचा अंगानेही जाते. त्यामुळे या कथांच्या विषयांसारखे या कथांचे 'फॉर्मस्' ही अगदी वेगवेगळे आहेत. हे लेखकाने मुद्दाम जाणीवपूर्वक केलेले आहे असे वाटत नाही. मनात घाटणारी कथा त्या त्या अंगाने फुलू द्यायची आणि मग त्यावर मेहनत घ्यायची ती फक्त तपशीलाच्या स्वरुपात- अशी काहीशी या कथांची निर्मितीप्रक्रिया दिसते. म्हणून या कथा साच्यांतून काढल्यासारख्या, बेतलेल्या वाटत नाहीत. एक वाचक म्हणून मला संतोषच्या कथांचे हे वैशिष्ट्य वाटते.
लेखन - मग अगदी ते कथालेखन का असेना - संपूर्णपणे काल्पनिक कधीच असत नाही. त्यात समाजातील घटनांबरोबरच लेखकाच्या स्वतःच्या विचारांची-मतांची प्रतिबिंबं उमटत असतातच. कथांमधली पात्रं बोलतात ती वाक्यं, ते विचार कधी कधी - कधी कधी काय, बर्‍याचदा- लेखाकाची स्वतःची वाक्यं, त्याचे स्वतःचे विचार असतात. संतोषच्या कथांमध्येही त्याच्या पात्रांच्या विचारांत त्याच्या स्वतःच्या विचारांचे प्रतिसाद दिसतात. केवळ ज्ञान, निखळ, बावनकशी सोन्यासारखं झळझळीत ज्ञान - या ज्ञानाचा ध्यास घेतलेले काही वेडे लोक आणि त्यांना द्रव्यपूजक समाजाकडून मिळणारी दारुण उपेक्षा, एकूणच संगणक सोडून इतर ज्ञानशाखांबाबत समाजात असलेली कमालीची उदासीनता, दिवसभर आकड्यांवर डोळे लावून डे-ट्रेडिंग, फॉरवर्ड ट्रेडिंगवर पैसा मिळवून माज करणारे पॅरासाईट सटोडिये, पैसा सोडून इतर कोणत्याही गोष्टीबाबत संवेदनशील नसणारे अमेरिकन प्रोफेशनॅलिझम असणारे व्यापारी, कोणत्याही प्रकारची शरम न बाळगता एक शर्ट काढावा आणि दुसरा घालावा इतक्या सहजतेनं आपल्या भूमिका बदलणारे भ्रष्ट शासकीय अधिकारी... आणि अगदी अपवाद म्हणून का असेना, या सगळ्या किडक्या यंत्रणेविरुद्ध एकटे उभे राहाणारे काही ताठ कण्याचे, तेजस्वी डोळ्यांचे बाणेदार लोक. लोभाला लाथाडून श्रेयस आणि प्रेयस, यिन आणि यँग, सत्प्रवृत्ती आणि दुष्टप्रवृत्ती यातली आपल्या विवेकाला पटेल तीच निवड करणारे लोक... संतोषच्या कथांमधले हे सगळे 'बाहेरचे' -काल्पनिक असे वाटत नाही.
संतोषच्या या कथांच्या विषयवैविध्यांबरोबरच त्याने त्या त्या विषयांचा खोलवर जाऊन केलेला अभ्यास हे मला या कथांचे आणखी एक वैशिष्ट्य वाटते. 'गुलाबी सिर' आणि 'उद्यापासून सुरवात' या कथांसाठी साठी पक्षी, प्राणी, पर्यावरण हे (लेखकाच्या आवडीचे)विषय, 'एम्पथी ' साठी मार्केटिंग आणि त्यातल्या खाचाखोचा हा विषय, 'यिन, यँग आणि साताळकर' साठी ऐतिहासिक कागदपत्रे, त्यांचा खराखोटेपणा आणि त्यांची किंमत आणि माणसाच्या मनात मोह आणि विवेक यांची चालणारी आंदोलने हे विषय, 'हस्तरेखांच्या ललाटरेषा' साठी हाताच्या बोटांचे ठसे हा अगदी वेगळाच विषय... संतोषच्या कथा वाचताना त्याने त्या त्या विषयावर घेतलेली मेहनत जाणवते. अस्सल लिखाणात अशी 'मेहनत' जाणवू नये असे म्हणतात. म्हणून हा त्या कथांचा गुण म्हणायचा की कथालेखनाची मर्यादा हे ज्याने त्याने ठरवावे.
अर्थात हा कथासंग्रह सर्वार्थाने उत्कृष्ट आहे किंवा यातल्या सगळ्याच कथा उत्तम आहेत असे मीही म्हणणार नाही. 'गुलाबी सिर- दी पिंक हेडेड डक' या कथेचा पहिला मसुदा वाचूनच मी या कथेचा शेवट मला पटत नसल्याचे म्हणालो होतो. माझे आजही मत तेच आहे. तो शेवट मला आजही पटत नाही. 'एम्पथी' या कथेचा पायाच मला इतर कथांच्या तुलनेत थोडा दुबळा वाटतो. 'हस्तरेखांच्या ललाटरेषा' आणि 'डॉट कॉम... डॉट ऑर्ग' या कथा थोड्याशा सोप्या करता आल्या असत्या की काय असे वाटून जाते. वर्णने आणि संभाषणे वास्तववादी करण्यासाठी संतोष आपल्या कथांमध्ये बरेच इंग्रजी शब्द, वाक्ये वापरतो. त्यांचाही कधीकधी अतिरेक होतो, असे मला वाटते.
पण एकंदरीत माझ्या मित्राचा 'मॅजेस्टिक' ने काढलेला हा कथासंग्रह बघून मला फार बरे वाटले. 'There is no greater agony than having an untold story inside you' हा या पुस्तकासाठी वापरलेआ 'मोटो' मला फार समर्पक वाटला आणि 'माझ्या जगण्याची व्याप्ती, उंची आणि खोलीही विस्तारणार्‍या मित्रमैत्रिणींसाठी' या त्याच्या अर्पणपत्रिकेत कुठेतरी माझाही एक लहानसा सहभाग आहे, या जाणिवेने तर फारच बरे वाटले.
गुलाबी सिर- द पिंक हेडेड डक
संतोष शिंत्रे
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
मार्च २०१२, १४२ पाने, किंमत रु.१७०

अज्ञात Sun, 01/04/2012 - 07:30

अस्सल सन्जोप राव ट्च.
पुस्तक परिचय आवडला. आपल्या मतांबद्दल आणि आपल्या लिखाणाबद्दलही नितांत आदर आहे. आपण लिहीता त्यावरून आपल्या वाचनाची खोली ध्यानात येते... कदाचित म्हणूनच आपल्याकडून दर्जेदार लेखनाची अपेक्षा केली जाते... वरील लेखन हे जरी पुस्तक परिचय या स्वरूपात असले तरीही या अपेक्षा पूर्ण झाल्या असेच म्हणेन.

राजेश घासकडवी Sun, 01/04/2012 - 07:31

मराठी लेखनात नवीन ताजंतवानं काहीतरी होतं आहे हे वाचून बरं वाटलं. पुस्तक अर्थातच वाचलेलं नाही, पण वेगळ्या जातकुळीची कथा वाटते. ओळख करून देणारा लेख तर जबरदस्तच.

आतिवास Sun, 01/04/2012 - 10:16

तुमच्या परीक्षणावरून हे पुस्तक 'वाचायला पाहिजे' या यादीत टाकायला हरकत नाही.
'गुलाबी सिर- दी पिंक हेडेड डक'>> अशा थाटाचे शीर्षक (मराठी पुस्तकाचे शीर्षक) मात्र मला अस्वस्थ करते. यातून लेखकाला जे काही म्हणायच आहे ते व्यक्त करायला मराठीत का बरं शब्द नसावेत असा विचार मनात येऊन जातो. आणि आजकाल हे अनेकदा घडताना दिसते ... ही एक नवी पाउलवाट बनत चालली आहे का?

श्रावण मोडक Sun, 01/04/2012 - 11:26

In reply to by आतिवास

मराठी शब्द मिळ्तील, पण कदाचित तेही स्पष्ट करुन द्यावे लागतील, कारण भाषा बदलली आहे. ते शब्द रूढ असतीलच असे नाही.
भाषेतील हा बदल जागतिकीकरणाचे (!) एक बायप्रॉड्क्ट म्हणता येईल. भाषा तिच्या पर्यावरणातून घडत अस्ते, ते पर्यावरणही घडवत असते असे मानले तर भाषेतील हा बदल तिच्या पर्यवरणातील बदलाचा परिणाम आहे. बरा की वाईट हे ज्याने त्याने ठरवावे.

आतिवास Sun, 01/04/2012 - 12:42

In reply to by श्रावण मोडक

भाषा तिच्या पर्यावरणानुसार बदलते हे मान्य. बदलाला आंधळा विरोध नाही किंवा बदलाचे अति भावूक दु:खही नाही. काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या - भाषाही बदलणारच.

पण हे भाषेचे पर्यावरण आपण पर्याय नाही म्हणून बदलत आहोत? का पर्याय शोधायची गरज वाटत नाही म्हणून बदलत आहोत? की पर्याय शोधायचा कंटाळा आला आहे म्हणून बदलत आहोत? की हाच पर्याय योग्य वाटतो म्हणून बदलत आहोत? ... यात साहित्यिकांची भूमिका काय? वाचकांची भूमिका काय? ... असे असंख्य प्रश्न त्यानिमित्ताने उभे राहतात समोर.

शिवाय भाषेतल्या या बदलामुळे जे या पर्यावरणात रहात नाहीत (उदाहरणार्थ इंग्रजी भाषेशी रोजचा व्यवहार वगळता फारसे संबंध नसणारे मराठी साक्षर लोक) त्यांच्याही भाषेचे पर्यावरण बदलते .. म्हणजे पुन्हा प्रभावक्षेत्र कुणाचे मोठे असा एक विषय आला.

असो. हे चालूच राहणार निरंतर.

नंदन Sun, 01/04/2012 - 12:32

परिचय. हे पुस्तक आता मिळवून वाचणे क्रमप्राप्त आहे. भौतिक प्रगती आणि नैतिक अधोगती यातली विसंगती दाखवताना बरेचसे मराठी लेखक फार ढोबळ, प्रेडिक्टेबल होतात, असं कधीकधी वाटून जातं. त्या पार्श्वभूमीवर या कथा वाचण्यास उत्सुक आहे.

'कम्प्लेट गावात आपला टेरर है बंधो!'

रावसाहेब, हे वाक्य वाचून तुमचीच एक नाट्यछटा आठवली.

अशोक पाटील Sun, 01/04/2012 - 13:52

मराठी जालीय विश्वाचा सदस्य झाल्याचा माझ्या दृष्टीने अग्रक्रमी फायदा कुठला असेल तर साहित्यात अशा वेगवेगळ्या प्रयत्नातून आपले अस्तित्व रोखठोक समोर आणणार्‍या संतोष शिंत्रे सारख्या लेखकाची माहिती मिळते. मी 'सत्यकथा' च्या परंपरेत वाढलो असल्याने 'कथा' हा प्रकार मला वर्तमानपत्रांच्या साप्ताहिक 'चारे पानी पुरवणी' सम सदरात आल्याचे पाहणे कधीच भावले नाही [आजकाल तर त्या चार पानापैकी कॅटरिनाला किती आणि सलमानला किती जागा द्यायची हे अगोदर उपसंपादक निश्चित करतो, मग उरलेल्या दीडेक पानात बटबटीत शब्दांनी माखलेल्या क्रांतीच्या कविता, बालगीते, पाककृती आणि सौंदर्याच्या टिपण्या याना....यातून उरलीच तर मग कथा....त्यावरही मुद्राराक्षसाचे थैमान.. असो]. जो लेखक गेली अकरा वर्षे लिखाण करतो आहे, आणि त्याच्याविषयी आता माहिती मिळते, हे मराठी साहित्याच्या वाटचालीच्या दुर्दैवाचे द्योतक होय [किमान या लेखामुळेतरी इतके तरी समजले]. साहित्य संमेलनाच्या जत्रेत हमखास 'बेळगाव-कारवार सीमाप्रश्ना' वर ठराव आणणार्‍या दुढ्ढाचार्यांना संतोषसारख्या शेकडो तरुण लेखकांचे साहित्य तमाम मराठी वाचकांपर्यंत जाण्यासाठी काय प्रयत्न केले जावेत यावर परिसंवाद ठेवावासा वाटत नाही.

श्री.शिंत्रे यांच्यासारख्या लिखाणाची जबरी ताकद असलेल्या [जे रावांच्या लेखनधाटणीकौतुकावरून प्रकर्षाने जाणवते] युवकाला अत्यंत नाईलाजाने साप्ताहिक पुरवण्यांचा आधार घ्यावा लागला असेल [असे मी मानतो] तरी त्यांच्याविषयी आस्था बाळगणार्‍या मित्रमैत्रिणींनी त्याना वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहानाच्या आधारे त्या कथांचे पुस्तकरुपाने सादरीकरण वाचकांपुढे आणले गेले आहे यात जसे त्या मित्रांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे तितकेच शिंत्रे यांच्या वाटचालीचेही.

न्यायपूर्ण परीक्षणामुळे या संग्रहातील कथाभांडाराच्या मूल्याची जाणीव झाली आणि पुस्तक 'मॅजेस्टिक' ने प्रकाशित केले असल्याने ते इथल्या स्थानिक विक्रेत्याकडे येणार हे ओघाने आलेच [नामवंत प्रकाशकाकडून नवोदिताचे साहित्य प्रकाशित होणे एक फायदाच असतो. जास्तीतजास्त वाचकापर्यंत पुस्तक आपसूकच पोचते]. 'ब्लर्ब' वर लेखकाने "....माध्यमं, तंत्रज्ञान, संधी, आव्हानं, मूल्यं, माणुसकी, परस्परसंबंध, शोषण, सामाजिक वास्तव... सगळंच ढवळून काढणारी वर्षं....' असे म्हटल्याचा उल्लेख आहे. खरे तर प्रत्येक लेखकाला उमेदीच्या वर्षातील ते एक दशक अनेकविध घटनामुळे 'ढवळून' काढणारेच वाटत असते. दुसर्‍या महायुद्धाच्या दशकात लिहिली गेलेल्या 'रणांगण' मधील वर्षे बेडेकरांना ढवळून काढणारीच वाटली होती, तर सत्तरीच्या दशकात पेंडश्यांनी लिहिलेली 'लव्हाळी' डायरी कादंबरी परस्परसंबंधाच्या सीमारेषा किती बोथट झाल्या असून "....यहाँ कल क्या होगा किसने जाना....' या वचनावर गाढ विश्वास ठेवणारी मिनी तीनचार कुटुंबाचे आयुष्य ढवळून काढणारीच होती. नेमाड्यानी 'कोसला' मध्ये वेगळं काय सांगितलं होतं ? त्यानीही त्या दशकातील संधी, आव्हानं, मूल्यं, माणुसकी, परस्परसंबंध....यांचाच मागोवा घेतलेला दिसेल.

फरक पडतो तो त्या त्या दशकातील भाषेमुळे. "पंक्चरली जरि रात्र दिव्यांनी", "फसफसून येतो सोड्यावरती गार", "शब्द टराटर फाडुनि टाकी" अशा विलक्षण शब्दांच्या रचना मर्ढेकरांनी ज्यावेळी केल्या त्यावेळीही सनातन्यांच्या भुवया वक्र झाल्याच होत्या. संतोष शिंत्रे आज ज्या जमान्यात आहेत तो इतका वेगवान आहे की, त्यानी केलेल्या शब्दयोजनेमुळे उलटपक्षी त्यांच्या कथांना एकप्रकारची अधिकृतता आली असल्याची जाणीव परीक्षणावरून होते.

सन्जोप राव म्हणतात, "आजूबाजूच्या जगात होत असणार्‍या या विसंगत गोष्टी बारीक नजरेनं टिपताना संतोषने भाषेचा (मराठी आणि काही काही वेळा इंग्रजी आणि हिंदीही) एक कुसरीचे -'क्राफ्ट' चे साधन म्हणून सुरेख वापर केला आहे.".......... ठीक, पण कुसरीच्या नादात कलेकडे दुर्लक्ष केले नसले म्हणजे मिळविली [अर्थात सर्व कथा वाचून झाल्यावरच हे समजेल]. संग्रह खरेदी करतोय, कथा वाचून झाल्यावर स्वतंत्रपणे श्री.संतोष शिंत्रे याना जरूर लेखी अभिप्राय देईन. पुस्तकावर पत्ता असेलच, नसला तर श्री.राव यानी शक्य झाल्यास संतोष यांचा ई-मेल देण्याची व्यवस्था करावी...ते करतीलच.

अशोक पाटील

सन्जोप राव Sun, 01/04/2012 - 17:48

पुस्तकाचे शीर्षक मला तर खटकले होतेच, पण खुद्द संतोषलाही ते फारसे पसंत नव्हते.'काल-आजच्या कथा' किंवा 'कथाष्टक' (त्यावेळी आठच कथांचे नियोजन होते) असे या संग्रहाचे नाव असावे अशी चर्चा झाल्याचे स्मरते. 'गुलाबी सिर - द पिंक हेडेड डक' हे बहुदा प्रकाशकाने सुचवलेले नाव आहे.
संतोषचा पत्ता पुस्तकावर आहे. तो असा:
'समाधान', प्रभात रस्ता. नववी गल्ली, पुणे ४११००४
ई मेलः shintresantosh@gmail.com

राजन बापट Mon, 02/04/2012 - 06:04

पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. पुस्तक यादीमधे टाकतो आहे हेवेसांनल.

पुस्तकाची ओळख करून देण्याचा हा एक आदर्श नमुना आहे हे आवर्जून नमूद करतो. उत्कृष्ट लिखाण.

अदिति Mon, 02/04/2012 - 12:27

अगदी रावांच्या लेखणीतून उतरलेला लेख. खूप आवडला. पूर्वी मनोगतावर 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' वाचायची संधी मिळाली होती. तेव्हा संतोषरावांच्या लिखाणाची ओळख झाली होती. त्यांच्या कथांना पुरस्कार मिळाले, त्या कथांचे पुस्तक निघाले हे ऐकून फारच आनंद झाला. संतोषरावांचे मन।पूर्वक अभिनंदन!
पुस्तक वाचले पाहिजे या यादीत जमा केले आहे.वाचल्यावर प्रतिक्रिया देईनच. पण इतका उत्तम परिचय इथे करून दिलात त्याबद्दल धन्यवाद.
अदिति

मेघना भुस्कुटे Wed, 18/04/2012 - 11:04

पुस्तक वाचले. या पुस्तकाच्या शिफारशीकरता संजोप राव यांचे मनापासून आभार.
पुस्तक अर्धे वाचले. मग ते संपून जाईलशा भीतीने, अर्धे दडवून ठेवून दिले. अखेर संपलेच.

चित्रा राजेन्द… Tue, 01/05/2012 - 20:57

एखाद्या कथासंग्रहाचा परिचय करुन देणे अवघड असते. मुख्य कारण म्हणजे कथांच्या विषयांतील विविधता, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेळी केलेले लिखाण. अशा पुस्तकातून समान धागा शोधून काढण्याचे कौशल्यपूर्ण काम ह्या लेखात झाले आहे.
शिवाय, मित्राचे असल्याने चांगले-वाईट सर्व काही मन:पूर्वक लिहिलेले...

रोचना Thu, 14/06/2012 - 15:13

प्रत्येक कथेचा पट निराळाच, आणि रोचक वाटला, पण एकूण कथा फारशा भावल्या नाहीत. काही कथा - इंस्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी, किंवा मारीच, आणि शीर्षक कथा - यांची रचना आवडली. यात वापरलेल्या उपहासात्मक, किंवा रहस्यमय शैली शिंत्र्यांना छान जमतात, पण ते त्या कथा संपेपर्यंत सलग चालू ठेवत नाहीत. मधेच लेखकाचे खरे विचार आणि सामाजिक टीका अगदी स्पष्ट, काहीशा प्रचारकी वेशात समोर येतात. कथेचा मूळ आशय ते सरळसरळ सांगून टाकतात. याने अनेक विषयांवरची त्यांची कळकळ जाणवते (आणि ती पटण्यासारखी ही आहे यात काही संशय नाही) पण म्हणून कथा मधूनच कर्कश्श वाटल्या. काही कथांमध्ये संजोप रावांनी म्हटल्याप्रमाणे उगीचच इंग्रजी शब्दांचा वापर जाणवला. पण झपाट्याने बदलत चाललेल्या जगात नाहीशी होत जाणार्‍या मूल्यांवरच्या कथांना "पिंक हेडेड डक" नाव अगदी शोभसं आहे!

अनंत ढवळे Thu, 14/06/2012 - 22:00

लेखन आवडले.
बाकी ही अन्य भाषेतील समानार्थी शब्द वापरून उपशीर्षके देण्याची नव्वदोत्तरी मंडळींची सवय मला काही पटत नाही. अर्थात हे एक वैयक्तिक मत आहे.

पुंबा Thu, 07/11/2019 - 00:04

कथा हा आवडता प्रकार असल्याने हे पुस्तक केव्हाचे घेऊन ठेवले होते. यातील पहिली कथा 'गुलाबी सिर द पिंक हेडेड डक' आज वाचली. जबरदस्त कथा. अतिशय प्रवाही शैली आणि नितळ शब्दकळा. एरव्ही इंग्लिश शब्द घुसडलेले डोळ्यांना खटकत राहतात, या कथेत मात्र असे होत नाही. खुप आनंद देणारा अनुभव. संजोपरावांनी केलेली प्रशस्ती वाचूनच पुस्तक घेतले होते त्यामुळे त्यांचे आभार.