काही छायाचित्रे
मालकीणबाईंकडून प्रेरणा घेऊन मी काढलेली काही छायाचित्रे इथे चढवते आहे. मला छायाचित्रणातले ओ का ठो कळत नाही. डिजिकॅम स्वस्त झाल्याने तो घेऊन कशाचीही कशीही छायाचित्रे काढणार्यांच्या जमातीतली मी आहे. तेव्हा कृपया खालील चित्रे पाहून छायाचित्र काढताना कसला कसला विचार करावा याबद्दल मार्गदर्शन करावे.
१.
मला इथे आडव्या-तिरक्या रेषा आणि रंगातला काँट्रास्ट पकडायचा होता.
२.
या छायाचित्रात चित्रविषय हा धनंजय म्हणतात त्याप्रमाणे धप्पकन मधोमध आला आहे, हे खरे.
३.
४.
हे छायाचित्र काढतानाचा कोन वेगळा हवा होता का?
५.
या आणि यापुढच्या छायाचित्रांत मला फुलांचे रंग, कुंड्यांच्या गोल कडा आणि सूर्यप्रकाश हे सर्व आवडले होते.
६.
७.
अभिप्राय कळवा.
टीपः प्रतिमा नीट दिसाव्यात यासाठी मूळ धागा संपादित केला आहे - संपादक.
चांगले प्रयत्न
पहिल्या चित्रात कथानक ("वेगवेगळ्या कोनातील रेषा") फार छोट्या भागात आहे, आणी कथानकाचा परिपोष न-करणारा कंटाळवाणा भाग फार आहे. चित्रे संपादित करून काही कातर-चित्रे दाखवण्यास अनुमती असल्यास दाखवेन.
२. :-) धप्पकन मध्ये आलेले नाही. डोळे थबकतात ते दोन पिवळ्या फुलांवरती. पण जर हे कथानक असेल, तर चित्र आणखी सुधारता येईल. मधला भोवरा जर कथाविषय असेल, तर मात्र होय, तो कंटाळवाणा वाटतो.
चित्र ३ चा कोन वेगळा हवा होता. (किंवा हाताने/दोरीने झुपका हलवायला हवा होता.) पार्श्वभूमीत काहीतरी रेषारेषांचे आहे, आणि त्याचा फुलाच्या कथानकाशी संबंध कळत नाही.
उन्हसावलीची चित्रे कशी काढतात ते मला जमत नाही. त्यामुळे चित्रे ४-७ बाबत नेमके काहीच सुचवता येत नाही. ही चित्रे बरी जमणे म्हणजे कठिण प्रकार आहे, असे गुळमुळीत अ-सकारात्मक म्हणू शकतो.
एकूण राजेश घासकडवींशी सहमत. फुलांच्या चित्रांत नाविन्य आणण्याकरिता मोठी प्रतिभा लागते. तरी आस्वादक म्हणून मनाची कवायत करावी लागते, त्याकरिता अशी चित्रे काढून बघणे चांगले. अभिनंदन.
पहीला फोटो
पहिल्या फोटोत लांब रेषांचा इफेक्ट चांगला आला आहे, त्याबरोबर दुसरं काहीतरी खूप छोट्या आकारचं असतं तर एक वेगळाच फोटो झाला असता असं वाटतं. लांब जाणार्या वेगवान रेषांसमोर तोकड्या रेषा एकमेकांबरोबर जात नाहीएत असं मला वाटतं.
फुलांच्या फोटो बाबत मी आता इम्युन झालो आहे. :-(
काही शक्यता
काही शक्यता :
पिसाचे चित्र
३_१४अदितींची सुचवणी सुद्धा आवडण्यासारखी आहे. मात्र चौकोनात कातरायला पाहिजे.
_______________________________
जांभळ्या फुलाचे चित्र (निष्काळजी कातराकातरी, उत्सवमूर्ती पिवळ्या फुलांचे पिवळेपण कमी करणारा हिरवा रंग पूर्ण कातरून टाकायला पाहिजे.)
अर्थात फारच थोड्या विचाराअंतीच्या शक्यता आहेत. सुचवण्या नाही आवडल्या तर नावड मान्य करायला मी लगेच तयार आहे.
पहिल्या चित्रात पिसातल्या
पहिल्या चित्रात पिसातल्या तिरक्या रेषा छान दिसल्या तरी खालच्या रेषा फार दिसत नाहीयेत. खालचा भाग थोडा वाढवून (मला) कदाचित अधिक आवडेल.
वळवलेलं चित्र चौकोनात कातरायला पाहिजे याच्याशी सहमत. कातरायचा प्रयत्न केला, पण त्यात आवडेल असं काही मला कातरता आलं नाही.
रसग्रहण- एक माफक चित्रसमीक्षा
पहिल्या फोटोमधील निळसर काळ्या तिरप्या रेषांचा ताण काटकोनात असलेल्या अबलख हिरव्या रेषांशी असल्याने चित्र गूढ, धूसर न वाटता प्रत्यक्ष समोर आल्यासारखे रम्य बटबटीत सुंदर सामान्य वाटते. अर्थात हाही चित्राचा एक गुणच म्हणायचा. किंवा दोषच. दुसर्या चित्रातली मधोमध न फुललेल्या कळ्या अधिक धूसर करुन कडेच्या फुललेल्या कळ्या अधिक स्पष्ट करता आल्या असत्या तर चित्र कामूचा लेखांसारखे, कथांसारखे अंगावर येणारे हिंस्त्र शुभ्र काही जीवघेणे झाले असते. तिसरे चित्र फुलाचे आहे की घोड्याचे ही भ्रम छान पकडला आहे. या घोड्याची मान अशी काटकुळी का हा प्रश्न दोस्तोवस्कीच्या कादंबर्यांतल्या मानवी जीवनाचा अर्थ काय या सनातन प्रश्नांप्रमाणे छळत राहातो हे या चित्राचे खरे वैशिष्ट्य. इतर सर्व फुलांच्या चित्रांत लहान बालकाच्या निरागस हास्यापासून चाकूने सपासप वार करणार्या खुन्यापर्यंतच्या मानवी भावना सलग, तुटक, एकसंध विस्कळितपणे दिसतात आणि दिसत नाहीतही. रेंब्राँच्या चित्रांमधला हा उदास, सळसळणारा प्रयत्न निओ-इम्प्रेशनिस्ट चित्रे आणि नॉन-निओ-इम्प्रेशनिस्ट दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्यामधील फरक दाखवून जातो असे म्हटले तर ते फारसे खोटे ठरणार नाही आणि फारसे खरेही. ग. ह. खरेंसारखे.
क्रमांक ५ - मस्त
क्रमांक ५ चा फोटो मस्त जमलाय, उन-सावलीच्या रँडम पॅटर्नमुळे चित्र नाट्यपूर्ण झालयं, तसेच रुल ऑफ थर्ड लागु पडलाय, एकंदर फोटो मस्त आहे.
बाकी फोटो पण छान आहेत, मी फोटो काढले असते तर खालिल बदल केले असते
१. ह्यासाठी अदितीशी सहमत, कॉन्ट्रास्टसह रेषांमधला खेळ मांडल्यावर चित्र अधिक छान दिसेल.
२. मधे फुलाचा रंग ब्राइट नाही, व पार्श्वभुमीवरील रंगांमधे फुलाचा रंग नसता तर फोटो अधिक छान दिसेल.
३. सावली जास्त असल्याने फुलाचा तपशील झाकला गेला आहे, थोडा उजवीकडून फोटो काढला असता निम्मी सावली व निम्मे उन असा फोटो छान अला असता का असा विचार करतोय.
४. छान फोटो, पण पार्श्वभुमीवरील रंगांमधे फुलाचा रंग नसता तर बरे झाले असते.
५ आणि ६ उत्तम व छान.
७. ह्यामधे परागकणांवर फोकस असता तर फोटो अधिक उठावदार झाला असता असे वाटते.
पहिल्या फोटोतला प्रयत्न
पहिल्या फोटोतला प्रयत्न चांगला आहे. रेषा अधिक ठसठशीत असत्या तर जास्त नाट्यमय झाला असता. असेच आणखीन काही काढून बघा. तिसरा फोटो चांगला आहे. इतर फोटोंमध्ये सर्वसाधारण हिरव्या पार्श्वभूमीऐवजी काळी हिरवी, थंड पार्श्वभूमी आलेली आहे हेही चांगलं दिसतं. तसंच संधीप्रकाशात फोटो काढल्यामुळे फुलं भगभगीत दिसण्याऐवजी सावल्यांमुळे थोडी सौम्य दिसताहेत हेही आवडलं. एकंदरीतच फुलांच्या फोटोमध्ये तसं वैविध्य आणणं कठीण असतं.