माणूस नावाच्या प्राण्याची आतापर्यंतची वाटचाल

मानव विजय'आपल्या पूर्वग्रहांना धक्का न लावणाऱ्या विचारांकडे आपला नेहमीच कल असतो. आपल्या मतांच्या विरोधातील किंवा आपल्या विचारांना छेद देणारा एखादा विचार असल्यास तसले विचार करण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे, असेच आपल्याला वाटत असते.’ बर्ट्राँड रसेल यांनी 1925 साली हा विचार मांडला होता. गेल्या 90-95 वर्षात अजूनही आपण त्याच अविचारांच्या गर्तेत आहोत. या गर्तेतून बाहेर काढणाऱ्या काही मोजक्या विचारवंतापैकी ‘मानव-विजय’ या पुस्तकाचे लेखक शरद बेडेकर आहेत, असे आपण निश्चितपणे म्हणू शकतो.

आयुष्याचा प्रवास करताना आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात, पृथ्वीवर माणूस केव्हा व कसा आला, आपल्याला घडवण्यात संतांचे योगदान किती, पाप, पुण्य, कर्मफलसिद्धांत, आत्मा, साक्षात्कार, इत्यादींचे निकष कोणते, प्राचीन हिंदू वाङ्मयात वैज्ञानिक दाखले सापडतात का धर्माची वाटचाल कशी असते. अज्ञेयवाद व निरीश्वरवाद यामधील फरक काय, मानवतावाद म्हणजे नेमके काय इत्यादी प्रश्नांना समर्पक उत्तरं शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न शरद बेडेकर यांनी या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादाकडे वाटचाल करणाऱ्यांसाठी वाटाड्या ठरू शकेल.

मानव-विजय हे पुस्तक, साप्ताहिक सदर म्हणून लोकसत्तासाठी लेखकाने लिहिलेल्या लेखांची पुनःसंस्करित पुस्तकी आवृत्ती आहे. मनोगतात लेखकाने व्यक्त केल्याप्रमाणे “उत्क्रांतीने प्राप्त झालेल्या गुणांनी व क्षमतांनी माणसाने संपूर्ण पृथ्वी व्यापली. शेती, कोठारे, घरे, इत्यादीद्वारे वर्षभराच्या अन्न-पाण्याची सोय करून तो घरात व समाजात स्थिर, सुखी व प्रगत जीवन जगू लागला. शेवटच्या तीन चार शतकामध्ये विज्ञान-संशोधनाद्वारे निसर्गसृष्टीच्या नियमनाचे काहीसे सत्य ज्ञान माणसांने प्राप्त करून घेतले. हेच मानवाचे विजय होत.” परंतु या पुस्तकात केवळ मानवी विजय गाथा नसून मानवजातीच्या काही अघोरी चुकामुळे मानववंशाबरोबर संबंध सजीवसृष्टीचाही विनाश होण्याच्या शक्यतेच्या धोक्याचा इशाराही लेखकानी दिला आहे.

मनोगताचा शेवट “हे पुस्तक वाचणाऱ्या अनेकांना माझे निरीश्वरवादी विचार पटतील, आवडतील असा मला विश्वास आहे” असे लेखकाने केले असून या पुस्तकातील लेखांचा ओघ कुठल्या दिशेने वाहणार आहे याची कल्पना यावरून येऊ शकते. रानटी अवस्थेतून आधुनिक, सुसंकृत जीवन जगण्यापर्यंत मजल मारलेल्या मानवी वंशाचा हा विजय स्वतःच्या काही वैचारिक प्रमादामुळे वाया जाता कामा नये या कळकळीतून पुस्तकातील बहुतेक लेख लिहिलेले आहेत याचा प्रत्यय वाचकांना होते. देव, धर्म, पंथ, संप्रदाय, ईश्वर, भक्ती, श्रद्धा इत्यादी सर्व बाबी एके काळी मानवी हिताचे वा मानवाच्या अस्तित्वाला पूरक ठरले असतील. परंतु 19व्या शतकात मानवाच्या बुद्धीची झेप इतकी उंच होती की या सर्व संकल्पनांचा पुनर्विचार करावा लागला, त्यातील बहुतेक बाबी काही समाजांना निरर्थक वाटले, काह गळून पडल्या. आधुनिक जगातील या वैचारिक क्रांतीमुळे मानवी जीवन सुखकर झाले व माणूस अधिकाधिक चिकित्सकखोर होत गेला व कुठे आहे तो ईश्वर हा प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य त्याच्या अंगात आले.

डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतामुळे या जगामागे कुणी स्वयंभू ईश्वर आहे आणि त्याने माणसाला निर्माण केले आहे या गृहितकाला प्रचंड धक्का बसला. पृथ्वीवरील मानव प्राणीच्या विकासाच्या टप्प्याविषयीचे वर्णन व सर्वांना सोईस्कर अशी जीवन पद्धती स्थापित झालेल्याचा तपशील एका लेखात आहे. या संदर्भात सजीवतेची पार्श्वभूमी काय असेल, एकपेशीय प्राण्यापासून बहुपेशीय प्राणी, त्यातून इतर सजीव व माणूस, माणसाच्या मेंदूचा होत गेलेला विकास इत्यादींचे विस्तृत वर्णन वाचत असताना आस्तिक विचारधारा कशी प्रचलित होत गेली याचीसुद्धा कल्पना येऊ शकेल. गंमत म्हणजे या सर्व गोष्टींच्याबद्दल गेली अनेक वर्षे कित्येक विचारवंत आपापल्या पुस्तकातून मांडणी करत आलेले आहेत. तरीसुद्धा महाराष्ट्रातील समाज मात्र अजूनही रूढी परंपरांच्या विळख्यातून बाहेर पडत नसल्यामुळे शरद बेडेकरासारख्या विचारवंताना या गोष्टी पुन्ह पुन्हा सांगणे भाग पडत आहे.

मानवी विकासाच्या संदर्भात मराठी वाचकांना सिंधूसंस्कृती ते वेदसंस्कृतीबद्दल जास्त कुतूहल असते. जे जे आताचे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान आहे ते सर्व भारतभूमीवर शेकडो वर्षापूर्वी होते आणि नंतरच्या काळात परकीय हल्ल्यामुळे ते सर्व गुप्त झाले व परकीयानी त्याची चोरी करून आपल्या नावाने खपवत आहे, याबद्दल त्यांच्या मनात अजिबात संशय नाही. म्हणूनच लेखक इ.स.पू 3000 पासून आतापर्यंत भारतात झालेल्या स्थित्यंतरांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. सिंधूसंस्कृतीचा काळ पाच हजार वर्षापूर्वीचा असून आर्यांचे आगमन होण्यापूर्वी भूमध्य समुद्रीय लोक भारतातील अनेक ठिकाणी स्थिरावलेले होते. त्यामुळे सिंधूसंस्कृतीत त्या काळातील इतर संस्कृतांचे अंशही सापडतील असे लेखकाना वाटते. आर्यांनी भारतात प्रवेश केल्यांनतर आर्य व अनार्य यांचा संमिलित समाज तयार होण्याची प्रक्रिया चालू झाली. त्याच कालखंडात चार वेदांच्या रचना झाल्या. आणि हा वेदकाळ इ.स.पू. 3000 पासून इ.स. 1000 पर्यंत अस्तित्वात होता. परंतु तो काळ कसा होता, त्यांची जीवन पद्धती कशी होती, वेदविचारांच्या प्रभुत्वाची कारणे कोणती होती, त्याकाळी जातीभेद, चातुर्वण्यभेद होते की नाही, इत्यादिबद्दलचे तपशील एका लेखात आहे. उपनिषद व भारतीय दर्शने यामुळे भारतीय जीवनावर झालेला परिणाम, जैन व बौद्ध धर्मांचा उदयकाल, इत्यादीबद्दल वाचत असताना आपले पूर्वज निसर्गाचे व निसर्गशक्तीचे भौतिक नियम शोधून काढण्याऐवजी म्हणजे, विज्ञानाच्या मार्गाने जाण्याऐवजी उलट दिशेला वळून भजन, कीर्तन, पूजा, प्रार्थना पुण्यसंचय इत्यादींच्या मागे लागले, हा लेखकानी काढलेला निष्कर्ष योग्य आहे असे वाटू लागते. म्हणूनच लेखकाला “इंग्रजासारख्या प्रगत युरोपीय राजवटीने शे-दीडशे वर्षे भारतावर राज्य केले. त्यामुळे आपण आधुनिक जगाच्या मुख्य प्रवाहात सामील झालो. त्यामुळे कालांतराने संगणक, माहिती व दूरसंचार क्रांतीत सामील होऊ शकलो आणि आपली इस्रो अभिमानाने मंगळयानसुद्धा सोडू शकली! नाही तर, जग अनेक क्षेत्रांत वैज्ञानिक प्रगती करून संपन्न होत असताना आपण यज्ञात आहुती टाकत तपश्चर्या, व्रते करत अनेक देवांना प्रसन्न करून घेत राहिलो असतो. आज आपण स्वतःच्या पायांवर उभे आहोत आणि आपल्याला ज्या दिशेला वळायचे आहे त्या दिशेला वळू शकतो.” असे सुचवावेसे वाटले.

धर्म व धर्मदर्शनाच्या प्रभुत्वाखालील आस्तिक नेहमीच दृष्टांत, साक्षात्कार, नामस्मरण, नाम साधना इत्यादी तथाकथित आध्यात्म मार्गांचा आधार घेत ईश्वरीय अनुभवांचे भलावण करत असतात. जगात अलौकिक असे काही तरी आहे, चमत्कारांना नाकारणे योग्य नाही असेही प्रतिवाद करत असतात. लेखकानी आपल्या एका लेखात यासंबंधीचे समज गैरसमजाबद्दल विस्तृतपणे टीका टिप्पणी केली आहे. दैव, ललाटलेख, विधिलिखित, नियती प्रारब्ध, नशीब इत्यादी शब्द वापरत आपला भार ईश्वरावर सोपवून शांत बसावे ही दैववादी वृत्ती मानवी प्रगतीला हानिकारक आहे, असे स्पष्ट मत लेखकानी व्यक्त केली आहे.

आपल्यातील अनेक जण, ईश्वराचे अस्तित्व मान्य नसले तरी, जन्म पत्रिकेतील भविष्यवाणी, ग्रहांचे सामर्थ्य, मंत्र-तंत्रांचा प्रभाव, रंगीत खडे, रुद्राक्ष इत्यादी मधील संकटविमोचक शक्ती इत्यादीविषयी सकारात्मक मत व्यक्त करत असतात. आपली दैवदत्त बुद्धी वापरून भविष्यात डोकावता येते याबद्दल त्यंच्या मनात तिळमात्रही संशय नसतो. परंतु लेखकाला मात्र प्रत्येकाचे भविष्य जन्मतः ठरलेले आहे, ग्रह-तारे इत्यादींचा प्रभाव माणसाच्या व्यवहारावर पडू शकतो, वा मंत्र-तंत्रमाध्ये अगाध शक्ती असू शकते इत्यादी गोष्टी मान्य नाहीत. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने मानवी भविष्य आधी समजण्याचा प्रश्न उद्भवत नाही. असे ते ठामपणे सांगू इच्छितात.

याच प्रकारे नियतीवाद या संकल्पनेप्रमाणे कर्मफलसिद्धांत, पाप पुण्य, आत्मा, श्रद्धा, पूर्वजन्म, पुनर्जन्म इत्यादी आपल्या परिचयातील संकल्पना किती तकलादू आहेत, याबद्दलची सडेतोड चर्चा लेखकानी केली आहे. वेद, उपनिषद, व पुराण या प्राचीन ग्रंथापेक्षा भगवद्गीतेतील या संकल्पना-संबंधातील मांडणीबद्दल अनेकांना वृथा अभिमान असतो. परंतु लेखकाच्या मते “भगवद्गीतेने उचलून धरलेली व आधुनिक काळात बदनाम ठरलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था ही आत्मा या संकल्पनेला व कर्मफलसिद्धांताला एकत्र करून ताणून रचलेल्या पूर्वजन्म व पुनर्जन्म या सिद्धांतावर उभारलेली कल्पनांची भरारी आहे. दरिद्री व अन्यायग्रस्त ऐहिक जीवन जगणाऱ्या दुर्दैवी जनतेने त्याविरुद्ध बंड करून उठी नये, यासाठी ती उपयुक्त ठरत असल्याने या कल्पनारंजनाला धर्मामध्ये स्थान देण्यात आले असावे. ”श्रद्धेच्या संदर्भातील “जगातील सर्व धर्म-पंथांच्या श्रद्धा परस्पर भिन्न आणि परस्पर विरोधीही आहेत. त्यात ‘वैश्विक सत्य’ असे काही नसते. त्यामुळे आपापले धर्म, पंथ, गुरु सांगतात त्याप्रमाणे आपण सर्व काही श्रद्धेने स्वीकारू शकत नाही. निसर्गाने व उत्क्रांतीने ज्या मनुष्य प्राण्याला मेंदू व मनबुद्धी प्राप्त झालेली आहे, त्याच्या जवळ सत्यशोधनासाठी व अज्ञान-अंधारातील त्याच्या सुखमय प्रवासासाठी त्याची बुद्धी हेच एकमेव साधन आहे. त्यामुळे मानवी बुद्धीला प्रमाण मान'ले पाहिजे. ईश्वरावरील श्रद्धा हे प्रमाण होऊ शकत नाही. ”, हे लेखकाचे मत सर्व बुद्धीप्रामाण्यवाद्यांना नक्कीच मान्य होईल.

भारतात उपलब्ध असलेल्या प्राचीन हिंदूंच्या वाङमयात आपले पूर्वज मोठे कल्पक, बुद्धीमान व तर्कप्रज्ञावान होते याबाबतीतील अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील. स्मृतीपुराणे, मनुस्मृती, धर्मसूत्रे इत्यादी ग्रंथात ईश्वरविषयक उल्लेख, जगाची उत्पती, स्थिती व लय याबद्दलची भाकितं, हे सर्व जग ब्रह्मनिर्मित आहे याची खात्री इत्यादी काल्पनिक गोष्टी व त्यांच्या पुषट्यर्थ केलेले तार्किकवाद सापडत असले तरी इतर काही ग्रंथात विज्ञानासंबंधीचे काही उल्लेखही सापडतात. अंकगणित, बीजगणित, रेखा गणित, त्रिकोणमिती, या शास्त्राबद्दलचे ज्ञान भारतीयांना अवगत होते याचेही काही पुरावे सापडतात. खगोलशास्त्रातील काही उल्लेख आधुनिक निरीक्षणाशी जुळतात. पदार्थ विज्ञान, शिलाशिल्प, धातुविज्ञान शास्त्र इत्यादी अभ्यास क्षेत्रात आपल्या पूर्वजांचे योगदान होते हेही नाकारता येत नाही. परंतु पूर्वजांनी सुखी मानवी जीवनासाठी प्रखर तर्कप्रज्ञा वापरून निसर्ग व विश्वातील भौतिक शक्तींचा शोध न घेता स्वतःच्या अंतप्रज्ञे (intuition)वर भर देण्यात आयुष्य खर्ची घातले. अध्यात्म व ईश्वराचा शोधातच ते मशगुल राहिले. त्यातच समाधान मानू लागले. त्याच वेळी युरोपातील घडामोडीने विज्ञानयुग प्रत्यक्षात आमून जगाला आधुनिक दृष्टी दिली. मानवी वंशाला ऐहिक सुख व समाधानाचे दिवस दाखवले. त्यामुळे आमच्याकडे विमानं होती, ब्रह्मास्त्रे होती, प्लॅस्टिक सर्जरीचे तंत्र अवगत होते, अवयवरोपणाची उदाहरण होती या निराधार स्वप्न रंजनेत आहोत याची आठवण लेखक करून देत आहेत.

मानव विजयाचा अजून एका टप्प्यात आपल्या महाराष्ट्रातील संत व समाजसुधारकांचा योगदान आपण कधीच विसरू शकत नाही. पंधराव्या व सोळाव्य शतकामध्ये युरोपातील प्रबोधन चळवळीत प्रमाण भाषा असलेल्या लॅटिन भाषेतील बंदिस्त ज्ञान सर्व सामान्याना कळणाऱ्या स्थानिक भाषेत आणल्यामुळे युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. युरोपियन समाजात चौकस वृत्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्याला व विकसित होण्याला प्रेरणा मिळाली. तसाच काहीसा प्रकार आपल्या महाराष्ट्रातही ज्ञानेश्वर तुकाराम आदी संतांनी बंडखोरी करून समाजाला वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न केला. ही संत चळवळ सुमारे पाच शतके आवश्यक व उपयुक्त लोकशिक्षण देण्यात प्रभावी कार्य केले. तरीसुद्धा भक्त म्हणविणाऱ्यांनी त्यांच्या नावांशी चमत्कार व मिथके जोडून त्यंच्या मूळ विचारांना बगल दिले. भक्तीमार्गी संतानीसुद्धा तथाकथित धार्मिक, कर्मठ आचारांची उपयुक्तता नाकारून दैनंदिन जीवनातील निर्मळ आचरणाला महत्व दिले. वेद नाकारला. त्यंचे पाठांतर नाकारले. लोकभाषा हे माध्यम वापरून बहुजनांना उन्नयनाचा मार्ग दाखवला. तरीसुद्धा वर्णधर्माची चौकट, जातीभेदांच्या भिंती, स्पृश्यास्पृश्यतेची दुष्टचाल, स्त्रियाबाबतचे भेदभाव अशा अन्याय्य व्वस्थेला हे संत मोडू शकले नाहीत.

परंतु या पूर्वाच्या समाजसुधारकांचा वारसा एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील आगरकरसकट अनेक समाजसुधारकांनी चालवला. बदलत्या परिस्थितीतील जीवनातले जे प्रश्न संतांना कळणे शक्य नव्हते ते सुधारकांना चांगल्या प्रकारे कळू लागल्यामुळे देशभक्ती आणि स्थितीप्रिय मार्गापेक्षा मानवतावादी आणि चैतन्यमय मार्गाने वाटचाल झाली पाहिजे अशी आग्रहाची मांडणी त्यांनी केली. अनेक समाजसुधारकांनी ईश्वराच्या अस्तित्वाला कुठलाही पुरावा नाही असे म्हणत निरीश्वरवाद व मानवतावाद यांचा पुरस्कार केला. मानवता हे तत्वज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन आणि निरीश्वरवाद या दोन मूळ विचारांवर आधारित असते अशी मांडणी लेखक करत आहेत. अनेकांना ही विचारसरणी रुचत नसली तरी ईश्वराला उघडपणे विरोध करणारा निरीश्वरवाद जास्तीत जास्त लोकांनी स्वीकारल्यास मानवतावादाला बळ येईल. मानवतावादात नीतीला प्रथम स्थान असून सहानुभूती मैत्री, दया, व प्रेम यांच्या पायावर ती उभी असते. ही नैतिकता मानवाच्य यानंतरच्या वाटचालीत अत्यंत गरजेचे आहे.

लेखक शेवटी शेवटी धर्मातिरेकातून, प्रदूषणातिरेकातून व लोकसंख्यातिरेकातून विनाशाकडे चाललेल्या मानव वंशाला वेळीच सावध होण्याचा इशारा देत आहेत. “मानवाने पृथ्वी व्यापणे, विविध संस्कृती निर्मिणे आणि विज्ञान शोधून काढणे ही विजयाची पावले असले तरी या अतिरेकातून पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या संपूर्ण विनाशाची शक्यता निर्माण झालेली आहे. या विनाशापासून मानवजातीला वाचवण्यासाठी मानवाने स्वतःच उपाय शोधून अमलात आणले पाहिजेत. ते आपले कर्तव्य आहे.” हा धोक्याचा इशारा देत मानव विजयाचा थोडक्यातल्या इतिहासाची सांगता करत आहेत.

मानव-विजय
लेखकः शरद बेडेकर,
डायमंड पब्लिकेशन्स, पुणे,
पृ. सं – १६२ किंमतः १९५ रु

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet