Skip to main content

ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१८ आवाहन

नमस्कार,

गेल्या सहा वर्षांची परंपरा पाळत यंदाही 'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकाबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. त्यासाठी 'ऐसी अक्षरे'च्या सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.

संगीत नाटकाची सुरुवात नांदीने करतात तशी दिवाळी अंकासाठी लेख मागवायचे झाले की याच वाक्याने सुरुवात करायची परंपरा आहे, म्हणून आपलं हे वाक्य लिहिलेलं आहे. बाकी परंपरा, फॉर्म्यालिट्या वगैरेंना ऐसीवर किती भाव दिला जातो हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे असल्या गोष्टी हव्या असतील तर गेल्या वर्षीचं आवाहन वाचा. तिथे तुम्हाला - दर्जेदार लेखनच कसं हवंय (आता कोण संपादक बिनदर्जेदार लेखन चालेल म्हणून नाक वर करून सांगतो? मनाची नाही तर जनाची तरी बाळगावी लागते!); सगळंच लेखन स्वीकारता येत नाही म्हणून वैट्ट वाटून घेऊ नका (थोडंसं वाईट वाटून घेतलं तरी चालेल, पण निराशेच्या खोल गर्तेत उडी मारणं वगैरे टाळा); गेल्यावेळी कसं छान लेखन आलं होतं त्याहीप्पेक्षा आता जास्त चांगलं येईल असा एक रिकामटेकडा आशावाद; आणि एकंदरीत 'आम्हा संपादकांना हा अंक काढण्यासाठी क्यवढे कष्ट पडतात' असं स्पष्टपणे न म्हणता 'तुम्हा मायबाप ऐसीकरांमुळेच हा अंक निघतो' वगैरे ठसेबद्ध, ढाचिक वागलंकार - हे सगळं सापडेल. तुम्हाला असल्या गोष्टी आवडत असतील तर आवडोत बापड्या.

तर यावेळची थीम आहे विनोद. म्हणजे ऐसीचा हा अंक असेल 'विनोद विशेषांक'. आवाहनात नुसताच विषय सांगायचा आणि मग त्या विषयाला एक ढिंच्याक नाव आयत्या वेळी द्यायचं हीही आमची एक परंपरा आहे. ती आम्ही पाळतो यात परंपरेवर आणि परंपरा पाळण्यावर प्रेम वगैरे काही नाही. ‘काहीतरी धमाकेदार नाव द्यायला पायजेलाय’ अशी मूळ इच्छा नेहेमीच असते, पण तेवढा विचार इतक्या आधी करायला वेळ झालेला नसतो. त्यात 'डेडलाईन हा प्रतिभेचा प्राणवायू आहे' हे तत्त्व आम्ही संपादक दिलोजानसे पाळतो, त्यामुळे 'आज करेसो कल कर, कल करेसो परसो...' असं आम्ही म्हणतो. तसंही सामान्य जीवनात विषय आधी, त्यातून बीजरोपण, त्यानंतर प्रसूतीच्या कळा, त्यातून निर्मिती आणि नंतर बारसं हा धोपट मार्ग आहे, तेव्हा त्यावरून आम्हीही चालतो. उगाच बेकायदेशीर सोनोग्राफी करून आधीच नाव ठरवण्याची बिकट वाट का पत्करा?

तर ऐसीच्या दिवाळी अंकासाठी विनोद हा विषय घेतल्यावर नक्की काय स्वरूपाचं लेखन अपेक्षित आहे? त्यासाठी विनोद म्हणजे नक्की काय याबद्दल थोडंसं काहीतरी लिहावं लागेल. आम्ही समीक्षक वगैरे नसल्यामुळे हे अगम्य भाषेत सांगणं काही जमणार नाही. पण आमच्या संपादकीय कुवतीनुसार प्रयत्न करतो. आमच्या मते विनोद हा एखाद्या खाद्यपदार्थासारखा असतो. काही लोक तो बनवतात, उरलेले लोक तो खातात किंवा कंझ्यूम करतात, काही लोक तो चाखून बघून त्यावर टिप्पण्या करतात. काहीवेळा तो कुजकट असू शकतो, काही वेळा तो नासतो, तर काही वेळा तो बकरी जिवानिशी गेली तरी खाणाऱ्याला वातड लागल्याने पूर्णपणे वाया जातो. कधी तो अर्धकच्चा असतो, तर कधी तो अति शिजून लिबलिबित होतो. काही विनोद शाकाहारी असतात तर काही नॉनव्हेज असतात. उपमा करून तो ओ येईपर्यंत चरावा, तशी ही उपमा हवी तितकी ताणता येईल, पण साधारण मुद्दा तुमच्या लक्षात आला असेलच.

थोडक्यात, एखाद्या खाद्यपदार्थाबद्दल किंवा खाद्यसंस्कृतीबद्दल लिहायचं असेल तर काय लिहाल, तेच लिहायचं. म्हणजे वेगवेगळ्या विनोदांच्या पाककृती काय असतात, कुठल्या हाटेलात फर्मास मिसळ (ऐसीवर खरं तर वारुणीची पाककृती विचारली पाहिजे) मिळते असं विचारता येतं तसं कुठल्या लेखकाच्या लेखणीतून झणझणीत (किंवा पहिल्या धारेचा) विनोद झरतो? नवनवीन पदार्थांमुळे आणि तंत्रज्ञानामुळे खाद्यसंस्कृती गेल्या शतकांत बदलली, तशी विनोदसंस्कृती कशी बदलत गेली? आजकाल गोमांसावर जशी बंधनं आलेली आहेत, तसे कुठचे विषय आज विनोदांत वापरायला ट्याबू आहे? असल्या अनेक विषयांवर लेखन करता येईल. आणि अर्थातच आंतरजालावर हा अंक येत असल्यामुळे, प्रत्यक्ष विनोदी लेख, कथा, व्यंगचित्रं, विडंबनं, विनोदी वाचनं, किंवा नाट्यतुकडेही सादर करता येतील. काही काही 'सो ब्याड, द्याट इट इज गुड' वर्गातल्याही गोष्टी अंकात देता येतील.

आणि हो, नेहेमीचा इशारा लागू आहेच. विनोद विशेषांक म्हणजे केवळ त्याच विषयावर लेखन हवं आहे असं नाही. किंवा सर्वच लेखन विनोदी हवं आहे असं नाही. गंभीर किंवा शोकांत कथा, 'कोलकात्याच्या ट्रेन स्टेशनांच्या नावांचा इतिहास'सदृश अभ्यासपूर्ण लेख, किंवा इतर स्फुट (अथवा अस्फुटही) लिखाण चालेल.

तेव्हा पाठवा लेखन १५ सप्टेंबर २०१८ च्या आत. ऐसीला व्यनि करा किंवा इमेल करा aisiakshare@gmail.com या पत्त्यावर. इमेल करणार असलात तर युनिकोडित मजकूर पाठवा. वर्ड किंवा इतर अटॅचमेंट पाठवण्याजागी इमेलात मजकूर कॉपी करा किंवा गूगल डॉक वापरा. मुद्दा असा आहे की कसंही पाठवा, पण पाठवा. मात्र मोर्स कोड, ब्रेल आणि हातखुणा शक्यतो नको. (नेत्रपल्लवी, भ्रुकुटीविभ्रम चालतील)

जय महाराष्ट्र!

Taxonomy upgrade extras