मेलानियाच्या निमित्ताने

संकीर्ण

मेलानियाच्या निमित्ताने

- सीमा.

अमेरिकन परंपरेप्रमाणे राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला मिळणारे ‘फर्स्ट लेडी’चे पद शून्य वेतन आणि बऱ्याच जबाबदाऱ्या व अपेक्षांचे ओझे घेऊन येते. या अपेक्षा रास्त आहेत का, प्रत्येक फर्स्ट लेडीकडून या अपेक्षा ठेवाव्यात का याबद्दलचे हे विवेचन — महिला राष्ट्राध्यक्ष दुर्दैवाने आजवर झाल्या नसल्याने — ‘फर्स्ट लेडी’ पदापुरते मर्यादित आहे, ‘फर्स्ट जंटलमन’ पदाची दिवास्वप्ने सध्या लांबणीवर.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेत स्वच्छ आणि आकर्षक प्रतिमेला बरेच महत्त्व दिले जाते. त्याचे आचारविचार, त्याने इथवर केलेले सामाजिक आणि राजकीय काम, कौटुंबिक सुव्यवस्था, त्याच्या पत्नी आणि मुलांचे त्याच्या महत्त्वाकांक्षेला असलेले समर्थन हे सगळे मिळून उमेदवाराची ही जनमानसातील प्रतिमा बनलेली असते. हल्लीच्या काळात निवडणुकीपूर्वी राष्ट्राध्यक्षपदात रस असलेले उमेदवार त्यांच्या कुटुंबासह नागरिकांना सामोरे जातात. उमेदवारी जाहीर करताना किंवा प्रचारातील महत्त्वाच्या टप्प्यांत सगळ्या कुटुंबाची, कमीतकमी पत्नीची उपस्थिती असते. पत्नीचा पतीला असलेला पाठिंबा आणि त्यांच्यातील सुसंवाद उमेदवाराची आणि पत्नीचीही लोकप्रियता वाढवायला मदत करतात. हा जेवढा अमेरिकन परंपरेचा आणि इतिहासाचा परिणाम आहे तेवढाच अमेरिकन विश्लेषणात्मक हाताळणीचा (analytical manipulation)ही परिणाम आहे. लोकांना काय आवडेल याचा अभ्यास करून आणि सतत प्रयोग करून त्याप्रमाणे उमेदवाराची प्रतिमा तयार करणे हा प्रचाराचा भाग झाला. जास्तीत जास्त नागरिकांना जवळच्या वाटणाऱ्या प्रतिमा ‘हा उमेदवार तुमच्यापैकीच आहे आणि म्हणून तो तुमचाच उमेदवार आहे’ हे पटवण्याचे काम करतात. तशी ठोस प्रतिमा एकदा स्थापित झाल्यावर राष्ट्राध्यक्ष या प्रतिमेला काळजीपूर्वक जोपासताना दिसून येतात. पण राष्ट्राध्यक्षांना साथ करणाऱ्या त्यांच्या पत्नीची तारेवरची कसरत नेमकी इथेच सुरु होते.

थॉमस जेफरसनने १७७६ साली "All men are created equal" असे म्हणून स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार केला आणि अमेरिकन क्रांतीची सुरुवात झाली. १७८९ मध्ये नवीन शासन स्थापन होऊन जॉर्ज वॉशिंग्टन यांची पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आणि लेडी वॉशिंग्टन काहीशा नाराजीनेच न्यूयॉर्क आणि नंतर फिलाडेल्फिया येथे दाखल झाल्या. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या अध्यक्षपदाखाली १७९० मध्ये व्हाईट हाऊसचे मूळ बांधकाम सुरू होऊन १८०० साली दुसरे फर्स्ट कपल जॉन आणि अबीगेल अॅडम्स येथे राहायला आले. पण फर्स्ट लेडी ही ओळख १९व्या आणि २०व्या शतकातली. या संबोधनाचा उगम कुठे झाला याबाबत वाद आहेत, पण १९३४ मध्ये वेब्स्टर्स डिक्शनरीने या पदवीचा उपयोग करून तिला थोडीफार अधिकृतता दिली. त्याआधी अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात लेडी वॉशिंग्टन, लेडी मॅडिसन अशी राजेशाही संबोधने वापरात होती.

आपण केलेल्या कृतीतून भविष्यातील शासनाचा पाया रोवला जाईल याची जाणीव ठेवून पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन आणि लेडी वॉशिंग्टन यांनी त्यांचे काम निष्पक्षता, विवेकबुद्धी, आणि सचोटीने करण्याची पराकाष्ठा केली. मार्था, अॅबीगेल अॅडम्स, डॉली मॅडिसन या पहिल्या तीन फर्स्ट लेडीजचा नवऱ्याच्या यशात, देशाच्या राजकारणात आणि ते राजकारण जिथून चालवायचे त्या व्हाईट हाऊसला आकार देण्यात मोठा हात आहे. व्हर्जिनियामध्ये स्वतःच्या बागायतीच्या देखभालीत यजमानीण म्हणून केलेले समारंभ मार्था वॉशिंग्टनला न्यूयॉर्कमधील स्वागतसमारंभाच्या आयोजनात उपयोगी पडले. स्वागत समारंभांचे यजमानपद हा तिचा वारसा आजतागायत फर्स्ट लेडीज चालवत आहेत. मुळात जॉर्ज वॉशिंग्टनशी मार्थाने तिच्या पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न करून त्याला संपत्ती आणि व्हर्जिनियाच्या उच्चभ्रू वर्तुळात स्थान दिले नसते तर त्याने अमेरिकेच्या स्थापनेचे काम केलेच नसते असे काही लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अमेरिकेच्या स्थापनेला तिचा दुसऱ्या लग्नाचा निर्णय कारणीभूत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण या गोष्टींची राष्ट्राध्यक्षांच्या दस्तऐवजात ऐतिहासिक नोंद मात्र नाही.

दुसरी फर्स्ट लेडी अॅबीगेल अॅडम्स जॉनच्या कामामुळे बरीच वर्षे त्याच्यापासून दूर राहिली. पण दूर राहत असूनही सततच्या पत्रव्यवहारातून ती त्याच्या संपर्कात होती आणि बऱ्याच राजकीय चर्चा त्यांनी पत्रांतून केल्या. तिच्या त्या पत्रांचा संग्रह १८४० साली प्रकाशित झाला. आणि नंतर युद्धकालीन पत्रव्यवहाराचा दस्तावेज म्हणून वापरला गेला. तिने व्हाईट हाऊसमध्ये राहायला आल्यावर त्याच्या सजावटीचे कामही मन लावून केले. हा अॅबीगेलचा वारसा.

अठराव्या शतकापासूनच प्रचारापासून ते राजकीय धोरण ठरवण्यापर्यंत सर्व बाबतीत विश्वासू सल्लागाराचे काम जवळ जवळ सगळ्याच फर्स्ट लेडीज सातत्याने करत होत्या आणि तरी फर्स्ट लेडीच्या नावावर इतिहासात नोंदले गेलेले पहिले मोठे योगदान १९१३पासून सत्तेत असलेल्या आणि १९१५ साली वूड्रो विल्सनशी लग्न करून फर्स्ट लेडी बनलेल्या ईडिथ विल्सन हिचे. १९१९ मध्ये पहिल्या महायुद्धानंतर वूड्रो विल्सन यांनी ‘लीग ऑफ नेशन्स’ स्थापण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना बाहेरच्या देशांत यश मिळाले तरी अमेरिकेत पाठिंबा नव्हता. तो मिळवण्याच्या उद्देशाने केलेल्या देशांतर्गत दौऱ्याचा ताण सहन न होऊन वूड्रो विल्सन आजारी पडले. ईडिथने त्यांना राजीनामा देण्यापासून परावृत्त करून सगळा कारभार आपल्या हाती घेतला. ती राष्ट्राध्यक्षांची विश्वासू सल्लागार आधीही होतीच पण राष्ट्राध्यक्षांच्या आजारपणानंतरच्या एकांतवासात तिने कॅबिनेट सदस्यांच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या संवादात मध्यस्थाचे काम केले. जवळ जवळ दोन वर्षे राष्ट्राध्यक्षांच्या अनुपस्थितीत चालवलेल्या देशाच्या कारभाराबाबत तिच्यावर सडकून टीका झाली. मंत्रिमंडळाच्या टीकेकडे साफ दुर्लक्ष करून समर्थपणे तिने राष्ट्राध्यक्षांच्या तब्येतीची काळजी घेणे आणि राष्ट्राध्यक्ष-मंत्रिमंडळ यांच्यात संवाद राखणे या दोन्ही बाजू सांभाळल्या. वूड्रो विल्सन यांची गणना दहा सर्वोत्तम राष्ट्रध्यक्षांमधे होते यावरून तिच्या योगदानाचे सामर्थ्य आणि महत्त्व दिसून यावे. मजेची गोष्ट अशी की ईडिथने हे काम केले तेव्हा अमेरिकेत स्त्रियांना मतदानाचा हक्कही नव्हता. कुठलेही निर्णय तिने एकटीने घेतल्याचे स्वत: नाकारले असले तरीही वेळोवेळी आलेल्या संकटांना सामोरे जात आणि टीकेकडे यथायोग्य दुर्लक्ष करत आपले काम करत राहण्याची तिची क्षमता उल्लेखनीय होती. स्वतःचा स्टाफ असलेली ती पहिली फर्स्ट लेडी होती.

ईडिथ विल्सननंतर एलेनॉर रूझवेल्ट (१९३३-१९४५) दुसरी प्रभावी फर्स्ट लेडी ठरली. तिने मानवी हक्कांसाठी सतत आवाज उठवला. यजमानपदापर्यंतच आपली भूमिका मर्यादित न ठेवता तिने नवऱ्याच्या कामात सक्रिय भाग घेतला. पूर्ण देशात फिरून लोकांच्या समस्या आणि विचार प्रशासनापर्यंत पोहोचवले. प्रशासनातील जागांवर स्त्रियांची नियुक्ती करवली, मानवतावादी दृष्टीकोन ठेवून तरुण, बेरोजगार, अल्पसंख्याक लोकांसाठी एलेनॉरने बरेच काम केले. ज्या काळात व्हाईट हाऊस स्त्री पत्रकारांना खुले नव्हते त्या काळात तिने स्त्री पत्रकारांसाठीच असलेल्या पत्रकार परिषदा भरवल्या. स्त्री पत्रकारांची ती ‘हिरो’ बनली. एलेनॉरची व्हाईट हाऊसमधील कारकीर्द लांबलचक, यशस्वी पण तेवढीच अडचणीची होती. त्यांच्या लग्नानंतरच्या काही वर्षांतच फ्रॅंकलिन रूझवेल्ट यांचे तिच्या मदतनीस महिलेबरोबर संबंध आहेत हे कळल्यावर तिने घटस्फोट देण्याची तयारी दाखवली. पण आपल्या राजकीय कारकीर्दीवर परिणाम होऊ नये म्हणून फ्रॅंकलिनने घटस्फोटाला नकार दिला. पण या घटनेने एलेनॉरला पूर्णपणे स्वतंत्र आणि खंबीर बनविले. तिने स्वत:ला राजकीय आणि सामाजिक कामात झोकून देऊन फ्रॅंकलिनबरोबर यशस्वी भागीदारी निर्माण केली. त्याचा दोघांना आणि अमेरिकेला फायदा झाला. पतीच्या मृत्यूनंतर तिने युनायटेड नेशन्सची अमेरिकन प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. सार्वभौम मानवी हक्कांची घोषणा लिहिण्यात तिची बरीच मदत झाली. तिच्या मते हे तिचे सर्वात उल्लेखनीय यश होते.

राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीच्या कामांची ही अन्य काही उदाहरणे.

रोझलीन कार्टरने (१९७७-१९८१) राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीचे कार्यालय इस्ट विंगेत प्रथम सुरु केले. राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय व्हाईट हाऊसच्या वेस्ट विंगेत आहे. मध्य व दक्षिण अमेरिकेचा दौरा करून तिने राष्ट्राध्यक्षांसाठी अहवाल तयार केले. त्यातून जिमी कार्टरच्या धोरणांचा उगम झाला. अध्यक्षांच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये तिचा नेहेमीच सहभाग राहिला. बेटी फोर्डने तिच्या स्तनांच्या कर्करोगाबद्दल जाहीरपणे बोलून या रोगाबद्दल आणि त्याच्या व्याप्तीबद्दल जनमानसात जाणीव निर्माण केली. तिच्यामुळे बऱ्याच कर्करोगग्रस्त स्त्रियांना वेळेवर मदत मिळाली. हिलरी क्लिंटन फर्स्ट लेडी होण्यापूर्वी स्वत:च एक यशस्वी वकील आणि सामाजिक कार्यकर्ती होती. तिने फर्स्ट लेडीचे ऑफिस मुख्य इमारतीत हलवून बिलच्या राष्ट्राध्यक्षपदातील तिचा सहभाग स्पष्ट करून खळबळ उडवून दिली. आरोग्य सुधारणा बिलासारख्या अवघड गोष्टींवर तिने काम केले, त्यात आलेले अपयश पचवले. तिथेच न थांबता २००० साली यू.एस. सीनेटमधले पद जिंकून निवड होऊन आलेली ती पहिली फर्स्ट लेडी ठरली आणि १६ वर्षांनंतर तिने प्रमुख राजकीय पक्षाचे नामांकन मिळवून अध्यक्षपदाची निवडणूक लढवली हा तर अगदीच ताजा इतिहास आहे.

व्हाईट हाऊस चालवणाऱ्या या बायकांचा त्यांच्या नवऱ्याच्या कारकिर्दीवर आणि धोरणांवर असणारा प्रभाव वारंवार नजरेसमोर येऊनही बरीच वर्षे पुरेशी मान्यता पावू शकला नाही. याचे पहिले कारण म्हणजे वर्तमानपत्रे आणि इतर माध्यमे या पदाकडे अफवांचा, लफड्यांचा स्त्रोत म्हणून बघत आली आहेत. त्यांनी या पदाविषयी बातम्या छापल्या त्या काही वादग्रस्त विषय उद्भवल्यावरच, आणि एकूणच या पदाला शोभेच्या वस्तूपेक्षा अधिक महत्त्व दिले नाही. दुसरे आणि अधिक महत्त्वाचे कारण म्हणजे इतिहासाच्या पानांत स्त्रियांना नसलेले स्थान. हा प्रश्न जागतिक आहे, अमेरिकेपुरता मर्यादित नाही. जगभराप्रमाणे अमेरिकन इतिहासही पुरुषांनी पुरुषांसाठी लिहिलेला आहे, त्यात स्त्रिया नाहीत. लेडी हा शब्दच मुळात राजकारणात आणि वादांत न पडणाऱ्या स्त्रियांसाठी वापरला गेला आहे. ईडिथ रूझवेल्ट म्हणत असे की “सभ्य कुलीन स्त्रीचे नाव फक्त तीन वेळा छापले जावे — तिच्या जन्म, लग्न आणि मृत्यूच्या वेळी!” पुरुषांनी केलेल्या कामांनी पानेच्या पाने भरलेली असताना, त्याचवेळी त्यांच्या बायकांनी केलेल्या मदतीचा उल्लेखही नाही; कारण मदत करणे हे पत्नीचे अलिखित कर्तव्य आहे. मजेची गोष्ट म्हणजे स्त्रीवादी स्त्रियांकडून झालेल्या लेखनातसुदधा वेळोवेळी या पदाची अवहेलनाच झाली आहे, कारण हे पद अजूनही बऱ्याच कौटुंबिक पारंपरिक मू्ल्यांवर आधारित आहे आणि तीच मूल्ये जपते. १९३४पासून वॉशिंग्टनमध्ये कार्यरत असलेल्या लोकांची सूची प्रतिवर्षी प्रकाशित होते. या सूचीमध्ये फर्स्ट लेडीचा समावेश प्रथमच १९६४ साली झाला. फर्स्ट लेडीच्या कामाचे स्वरूप संदिग्ध आहे, कारण हा निवडून आलेला हुद्दा नाही. त्याच कारणास्तव तिच्याकडून अपेक्षा भरपूर असल्या तरी तिच्या यशाला किंवा कामाला पुरेशी मान्यता मिळत नाही, केलेल्या कामावर टीका होण्याची शक्यता जास्त असते कारण तिने कुठले काम करायला हवे याबद्दल काहीच मार्गदर्शन उपलब्ध नाही. ती करत असलेल्या प्रत्येक कामाला करदात्यांच्या पैशांचा अपव्यय म्हणता येऊ शकतो.

एलेनोर रूझवेल्ट, जॅकी केनेडी, हिलरी क्लिंटन, ल्युक्रेशा गारफिल्ड, लेडी बर्ड जॉन्सन, फ्लोरेन्स हार्डिंग आणि इतर काहीजणींनी पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे झालेल्या टीकेला आपापल्या पद्धतीने तोंड दिले. वर्तमानपत्रे आणि अन्य माध्यमांनी या बातम्यांना विक्रीच्या गणितानुसार स्कँडल्सच्या रंगात रंगविले. पण फर्स्टलेडीपद स्वीकारलेल्या या शूर आणि कर्तव्यनिष्ठ स्त्रियांनी पतीची कारकीर्द, महत्त्वाकांक्षा, आणि देशाचे भवितव्य यांना महत्त्व देऊन एकनिष्ठ पत्नीची आणि देशातील सर्वोच्च यजमानाची भूमिका यशस्वीपणे निभावली.

१९७८मध्ये लागू झालेल्या PL 95-570 कायद्यामध्ये प्रथमतः राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला व्हाईट हाऊसच्या व्यवस्थेसाठी लागणाऱ्या पैशांवर कायदेशीर अधिकार मिळाले. राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या कामात मिळणारी पत्नीची मदत आणि त्या कामांसाठी होणारा खर्च या निधीत समाविष्ट झाला. त्यापूर्वी व्हाईट हाऊसमधील करमणुकीचा खर्च पहिल्या जोडप्याच्या खासगी पैशातून होत असे किंवा वेळखाऊ पद्धतीने मंजूर करवून घ्यावा लागत असे. पण या कायद्यातूनही फर्स्ट लेडीकडून मूलभूत अपेक्षा राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या कामात कमीत कमी अडथळा आणणे, जमेल तेवढी मदत करणे, व्हाईट हाऊस सजवणे, त्याची काळजी घेणे आणि राजकीय स्वागत समारंभ आयोजित करणे एवढ्याच असल्याचे स्पष्ट होते. हा मुद्दाच जर्मेन ग्रीअरसारख्या स्त्रीवादी बायकांना खटकतो आणि तो चुकीचा नाही. पण परंपरावादी अमेरिकनांच्या गळी उतरवायला एखादी ईडिथ विल्सन, हिलरी, किंवा एलेनॉर रूझवेल्ट हवी आहे. मेलानिया, तू हे काम नक्की करू शकशील.

सगळ्याच राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी राजकारणात अथवा सामाजिक कार्यात सक्रिय नव्हत्या. पण राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीच्या भूमिकेत आल्यावर बऱ्याच जणींनी आपल्या पदाचा वापर सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केला. काहींना जमले, काही अयशस्वी झाल्या. पण प्रत्येकीने प्रयत्न केले. राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीमागचे सामर्थ्य, त्यांचा प्रभाव, नवऱ्याच्या कामापायी त्यांना करावा लागलेला त्याग या सर्वांची सामान्य लोकांना जाणीव नसली तरी फर्स्ट लेडी म्हणून त्यांनी अनुभवलेली ही शक्ती अद्भुत होती. हे सगळे काम पूर्वप्रशिक्षण नसताना, बाकी काही मदत नसताना केवळ नवऱ्याच्या महत्त्वाकांक्षेपायी विनावेतन आणि विना-श्रेय, तुटपुंज्या वादग्रस्त इतिहासाखेरीज अन्य कुठलेही मार्गदर्शन नसताना करत आल्या आहेत.

फर्स्ट लेडी कडून असलेल्या अपेक्षांमध्ये विरोधाभासही भरलेला आहे.

१. कामांची रूपरेषा नसल्याने तिची प्रत्येक हालचाल टीकेस पात्र आहे, पण राष्ट्राध्यक्षपदाच्या खालोखाल या पदाला मान आहे.
२. फर्स्ट लेडीचे पोल रेटिंग्स राष्ट्राध्यक्षांपेक्षा चांगले असतात आणि राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियतेत भर टाकतात. पण फर्स्ट लेडीचे हे रेटिंग्स तिच्या फॅशन आणि यजमानगिरीला असतात असा एकंदर समज असतो.
३. कुठल्याच फर्स्ट लेडीने या पदासाठी अर्ज केलेला नसतो पण विरोधी पक्षांच्या — आणि स्वपक्षाच्या देखील — टीकेचा तिला सामना करावा लागतो. तसा मेलानियाला स्टिलेटोजमुळे आणि न्यूड छायाचित्रांमुळे करावा लागला.

आता मेलानियाविषयी थोडेसे.

स्लोव्हेनियामधील छोट्या शहरात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मेलानियाने १६व्या वर्षी मॉडेलिंग सुरु केले. फॅशन आणि ग्लॅमर मधे रस, आणि मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेण्याचं बाळकडू (स्पर्धात्मक वातावरणामुळे आणि महत्त्वाकांक्षी वडिलांकडून) या भांडवलावर तिने जे कमावले ते उल्लेखास पात्र आहे. फॅशन आणि फोटोग्राफीचा अभ्यास, आर्किटेक्चर वगैरे शिकली, पण मॉडेलिंगच्या क्षेत्रातील यश पाहून बाकी सगळे सोडून तिने या क्षेत्रात उडी घेतली. तिला पॅरिस आणि इटली येथील छायाचित्रकारांनी संधी दिली. तिथून एका इटालियन एजंटने न्यूयॉर्कला आणले आणि त्याने दिलेल्या पार्टीत तिची आणि ट्रंपची भेट झाली, त्यापुढे त्यांची ६-७ वर्षांची मैत्री आणि २००५ मध्ये लग्न.

२०१६च्या निवडणूकीत टेड क्रूझच्या प्रचारमोहिमेत मेलानियाच्या न्यूड छायाचित्रांचा वापर केला गेला. ती छायाचित्रे २० वर्षांपूर्वी मेलानिया मॉडेलिंगचा व्यवसाय करत असताना घेतलेली आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेसाठी हे प्रकरण नवीन असले तरी ट्रंपच्या मतदारांना याने फारसा फरक पडला नाही आणि हिलरीसमर्थकांनी मेलानियाच्या छायाचित्रांच्या अशा वापरावरच टीका केली. त्यांच्यापुरता हा तिच्या व्यवसायाचा भाग, तिची युरोपियन पार्श्वभूमी या सबबींवर हा वाद मिटला. काही छायाचित्रे ट्रंपच्या कँपेनने प्रकाशित केल्याचेही आरोप झाले आणि त्याच्या लिंगवादी (सेक्सिस्ट) वागणुकीवर टीका झालीच, पण रिपब्लिकन पक्षाच्या दुतोंडीपणावरही ताशेरे ओढले गेले. एका वर्षांनंतर याकडे पाहताना मात्र ना मेलानियाला फरक पडला ना ट्रंपला, बाकीच्यांनीच उगीच आरडाओरड केली असे आता वाटते. झाला तर तिच्या सौंदर्याच्या चर्चेचा त्यांना फायदाच झाला असावा. तिने त्या वादग्रस्त चर्चांमध्ये भाग न घेऊन थंडपणाचा मुखवटा कायम ठेवला हे नोंद घेण्यासारखे आहे. मेलानिया, तू थंडपणा सोडून दिलास तर ट्रम्पच्या सेक्सिस्ट, आत्मपूजक वागणुकीला बांध नक्की घालू शकशील.

चक्रीवादळग्रस्त टेक्सासला भेट देण्यासाठी विमानात चढताना तिने घातलेल्या उंच टाचांच्या बुटांची बेदम उलटसुलट चर्चा झाली. चक्रीवादळाला जाताना अव्यवहार्य आणि अयोग्य पोशाख केला, तिथे लोकांचे जीव जाताहेत आणि ही इकडे फॅशन फॅशन खेळतेय, फर्स्ट लेडीने आज प्रसंगाला शोभेल असा काळा पोशाख निवडला. त्यावर हाय हील्स आणि बाँबर जाकीट अठावदार दिसत होते वगैरे वगैरे. आणि ही टीका रिपब्लिकनांकडूनही होत होती.

स्टिलेटोज मेलानिया

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत टोकाची टीका नवीन नाही. फर्स्ट लेडीजनी वर्षानुवर्षे याला तोंड दिलेले आहे. मॅडम प्रेसिडेंट, हर मॅजेस्टी, क्वीन नॅन्सी अशा अपमानकारक संबोधनांचा वापर करणे, फर्स्ट लेडीने निवडलेल्या सामाजिक कामांमध्ये खुसपट काढून खर्चाबाबत ओरड करणे, फर्स्ट लेडी अध्यक्षांपेक्षा जास्त नेतृत्वकुशल दिसू नये, फर्स्ट लेडीने फार क्रियाशील असू नये, पण फार निष्क्रियही असू नये, फार तरुण किंवा फार म्हातारी असू नये, फार आनंदी किंवा फार दुःखी असू नये अशा सर्व प्रकारच्या अपेक्षा ठेवणे हे त्यातलेच काही प्रकार. (आखिर चाहते क्या हो भाई!) विरोधी पक्ष आणि स्वपक्षातील अध्यक्षांचे स्पर्धक — दोन्हींकडून टीका होत असते. मेरी टॉड लिंकन आणि हिलरी क्लिंटन यांनी अशी टोकाची टीका अनुभवली आहे. हिलरीने वकिली पदवी घेण्याऐवजी कुकीज बनवायला शिकायला हवे होते या विषयावर ती फर्स्ट लेडी असताना चर्चा घडवल्या गेल्या. हिलरीने काही वेळा तिची प्रतिमा सुधारावी म्हणून पत्रकारांसाठी नाताळच्या कुकीजही बनवल्या. मेलानियावर होणारी टीका त्यामानाने बरीच सौम्य वाटतेय — ती विवादापासून आणि प्रसिद्धीपासून लांब राहते, फार काही बोलण्याच्या फंदात पडत नाही, आणि पारंपरिक पत्नी असल्याचे कबूल करते म्हणून असावे. जेम्स गारफिल्डच्या बायकोने, लुक्रेशाने, निवडणूक प्रचाराच्या वेळी पडद्याआड राहणे पसंत केले. कारण जोडीदार म्हणून तिची ठळक प्रतिमा पुढे आली तर गारफिल्डच्या प्रेयस्या वृत्तपत्रांकडे जातील अशी भीती तिला होती. तिने एवढा प्रयत्न करूनही त्याच्या वेश्यागमनाचा मोठा विवाद उपस्थित झालाच. यापासून धडा घेऊन मेलानियाने ट्रंपचे किती अपराध माफ करायचे ते ठरवून ठेवावे असे सुचवावेसे वाटते. कारण तिने कितीही विवाद टाळला तरी ट्रंप संकटे ओढवून घेतच राहील. मेलानिया, तू वाद न टाळता जे चुकीचे आहे त्याबद्दल आवाज नक्की उठवू शकशील.

मेलानियाने तिच्यापेक्षा २४ वर्षांनी मोठ्या असलेल्या अब्जाधीशाशी लग्न केले एवढे तिला गोल्ड-डिगर ठरवण्यासाठी पुरेसे आहे. पाश्चात्य किंवा कुठल्याही संस्कृतीत श्रीमंत बायका आणि श्रीमंत पुरुष यांची यादी केली तर कुठली यादी अति लांबलचक होईल हे स्पष्ट आहे. त्यातले बरेचसे श्रीमंत पुरुष लग्न करण्याचा गाढवपणाही करतात. त्यामुळे गोल्ड-डिगर बायकांची मांदियाळी असते हे ओघाने आलेच. मेलानियाने लग्नपूर्व करार करून ट्रंपची संपत्ती (त्याच्या दिवाळखोरीसहित) सुरक्षित ठेवण्यास त्याला मदत केलेली आहे, लग्न करण्यापूर्वी पाच वर्षे दोघे डेटिंग करत होते, त्याला भेटण्याआधीच ती यशस्वी मॉडेल होती, स्वतःचे घर भाड्याने घेऊन न्यूयॉर्क सारख्या शहरात एकटी राहात होती, स्वतंत्र आणि स्वावलंबी होती, त्यांचे लग्न १२ वर्षं टिकून आहे, तिची प्रतिमा स्वच्छ आहे हे सगळे एका शंकेपुढे फिके पडते. मेलानियाने जे आज केले आणि ज्यामुळे ती गोल्ड-डिगर म्हणवली गेली तेच १७७५-७६मध्ये जॉर्ज वॉशिंग्टनने व्हर्जिनियातल्या सगळ्यात श्रीमंत स्त्रीशी, मार्था कस्टिसशी, लग्न करून केले होते याचा सोयीस्कर विसर सगळ्यांना पडतो.

मेलानियाला सामाजिक कार्याचा अनुभव नाही, पूर्वप्रशिक्षण नाही हे खरे आहे. तसा तर ट्रंपही राष्ट्राध्यक्षांच्या नोकरीला लागणारे कौशल्य नोकरी करतानाच “देशाच्या खर्चाने” कमावतो आहे. पण हा तर गोऱ्या पुरुषाचा विशेषाधिकार झाला. आहे त्या चौकटीत फर्स्ट लेडी पदाच्या संदिग्ध व्याख्यांचा फायदा घेऊन ज्या कामात मेलानियाला रस आहे आणि ज्याचा इतरांना उपयोग होऊ शकतो अशा कामांना प्राधान्य देऊन ती आपल्या पदाचा सदुपयोग करू शकते. रोझलीन कार्टरने म्हटलेच आहे की या पदाचा प्रभाव असा आहे की माझे एखाद्या गोष्टीबाबत नुसते विचार करणे ती गोष्ट बदलायला कारणीभूत होऊ शकते.

तिचे मॉडेल असणे तिला परंपरावादी जनतेला अपेक्षित असलेली शोभेची बाहुली ठरवण्यासाठी उत्तमच आहे. हा साचा फोडण्याची संधी तिच्याकडे आहे. मेलानिया, हा शोभेच्या बाहुलीचा साचा तू नक्की फोडू शकशील. आणि तेवढे केल्यानंतर तू वाल्या कोळ्याची बायको होऊन ट्रंपच्या पापात सहभागी व्हायला नकार नक्की देऊ शकशील.

---

काही फुटकळ गोष्टी -

१. ब्रिटिश राजवटीतील अत्याचारांतून प्रेरणा घेऊन जेफरसनने स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिला. “All men are created equal” हे लिहिताना त्याच्याकडे त्याला वारशाने मिळालेले १००पेक्षा जास्त गुलाम होते.
२. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचे घोषणापत्र १७७६ साली लिहिले गेले. १७८३ मध्ये पॅरिसचा करार होऊन ग्रेट ब्रिटनने अमेरिकेच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली आणि अमेरिकन क्रांती संपुष्टात आली. अमेरिकन कृष्णवर्णीय पुरुषांना मताधिकार १८७० साली मिळाला; स्त्रियांना मताधिकार मिळायला १९२० उजाडले. (२००८-२०१६ या काळात अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कृष्णवर्णीय पुरुष — बराक ओबामा — होता; या पदावर अजूनपर्यंत एकाही स्त्रीची निवड झालेली नाही.)
३. १८व्या शतकात अमेरिकेत स्त्रियांनी दुसरे लग्न करणे ही अतिसामान्य गोष्ट होती.
४. अध्यक्षांचे विवाहबाह्य संबंध असणे ही सुद्धा सामान्यच गोष्ट होती.
५. अध्यक्ष रूझवेल्ट यांच्या अफेअरबद्दल कळल्यावर दबावांपासून मुक्त होऊन एलेनॉर रूझवेल्ट स्वतः समलिंगी स्त्रियांकडे आकर्षित झाली अशा अफवा आहेत.
६. १८व्या, १९व्या आणि २०व्या शतकाच्या पूर्वार्धात फर्स्ट लेडी पदावर येऊन खंबीर निर्णय घेणाऱ्या आणि सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या बऱ्याच स्त्रिया राजकीय आणि सामाजिक दबदबा असणाऱ्या प्रतिष्ठित कुटुंबातून आलेल्या आहेत. उदाहरणार्थ: एलेनॉर रूझवेल्ट, ईडिथ विल्सन, हेलन टाफ्ट

संदर्भ
१. The Presidents' Wives: Reassessing the Office of First Lady, 1st Edition by Robert P. Watson (2000)
२. http://www.history.com/topics/first-ladies
३. https://www.whitehouse.gov/1600/first-ladies
४. Rating The First Ladies: The Women Who Influenced The Presidency, by John B. B. Roberts

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अशा चर्चा सर्वच ठिकाणी होत असतात. फक्त त्याकाळी प्रसारमाध्यमे कमी होती. टीकाटिपण्याही दहापंधरांतच विरून जायच्या. नवीन काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0