स्त्री पुरुष समानता म्हणजे काय?
स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमके काय? हा प्रश्न फार दिवसा झाले पडला आहे. अदितीच्या ह्या लेखामुळे त्यावर जरा विचार करून उत्तर शोधून काढावेच असे वाटते. ह्या बाबतीत मला असे वाटते किंबहूना आजवरचे माझे मत असे की पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्री
- आर्थिकदृष्ट्या परावलंबी असते
- शिक्षणापासून वंचित राहते
- सत्तेत किंवा अधिकारामध्ये तिला वाटा नसतो
- चूल आणि मूल ह्या संकल्पनेत तिला जखडून टाकले गेले असते
(हे समाजातील तळागाळापासून एलिट असे सर्व थर गृहीत धरून व्यक्त केलेले मत आहे)
तर, तिला शिक्षण मिळून ती आर्थिकदृष्ट्या स्वाबलंबी होऊन तिला सत्तेत किंवा अधिकारामध्ये वाव मिळायला हवा ही झाली स्त्री मुक्ती आणि त्यासाठी ‘सर्व पातळीवर समान संधी’ मिळणे म्हणजेच शिक्षण, करियर, सत्तेत (अधिकारात) वाटा ह्यामध्ये स्त्री पुरूष असा लिंगभेद न होता समान संधी मिळणे म्हणजे स्त्री पुरुष समानता.
त्या अनुषंगाने आंतरजालावर जरा शोध घेतला तर फार काही हाती लागले नाही. खरंच हे जरा विस्मयकारकच होते. पण जे काही थोडे बहुत वाचायला मिळाले, काही चर्चा वाचायला मिळाल्या तेथेही मुळात स्त्री पुरुष समानता म्हणजे काय हेच स्पष्ट नाही. एके ठिकाणी स्त्रिया कुंकू लावतात पुरूष नाही, पुरुषाला फक्त मिस्टर असे संबोधन तर स्त्रियांना मिस आणि मिसेस असे वैवाहिक स्टेटस असलेले संबोधन असे काहीसे मत मांडून समानता आणि (अ)समानता असा उहापोह केला होता. हे वाचून हसू तर आलेच पण कीवही आली.
सांख्यिकीच्या आधारे ही समानता मोजण्याचा प्रयत्न वर उल्लेखलेल्या अदितीच्या लेखात झाला आहे. ज्या ज्या गोष्टी पुरूष करू शकतात त्या त्या स्त्रियांनी करणे म्हणजे समानता का? किंवा मग तसे नसेल तर निदान ज्या गोष्टी स्त्रिया करू शकतात त्यात त्यांची संख्या पुरुषांएवढी(च) हवी का? म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का?
ही स्त्री पुरुष समानता नेमकी काय हा विचार करता करता ‘दिमाग का दही’ का काय म्हणतात तसे झाले आणि अचानक एक छान लेख वाचायला मिळाला (हिंदीत आहे). ह्यात म्हटले आहे की स्त्री पुरूष हे अर्धनारीश्वर (शीव-पार्वती) असून ते एकमेकांना पूरक आहेत आणि समानता म्हणजे एकमेकांना Complement करणं आणि निर्भेळ सहजीवन अनुभवणं. मला हे एकदम भावले आणि पटले.
साधक-बाधक चर्चा होऊन ह्याचे उत्तर इथे मिळेल असे वाटते ब्वॉ.
आत्ता सहज हाताशी हे आहे
आत्ता सहज हाताशी हे आहे म्हणून लिंक देतेय ही http://www.scribd.com/doc/35149940/Kamla-Bhasin-Gender
मराठीतही पुष्कळ लिहिलं गेल आहे या विषयावर पण त्यातल नेटवर किती उपलब्ध आहे याची मला माहिती नाही. काही पुस्तक तुम्हाला हवी असल्यास व्यनितून कळवते.
मूलभूत हक्क व स्वातंत्र्याची समानता
समानता या शब्दाचा अनेक वेळा सोयीस्कररीत्या गैर अर्थ काढला जातो. 'अहो कसलं समानतेचं खूळ घेऊन बसलाय? आता समानता म्हणजे पुरुषांनी ब्रा आणि स्त्रियांनी लंगोट घालायचे का?' वगैरे पाचकळ पातळीवर तो शब्द उडवला जातो. याचंच थोडा सौम्य स्वरूप म्हणजे 'सगळे कसे समान होणार? पुरुषांमध्येदेखील वैविध्य असतंच ना. हाताची पाच बोटं वेगवेगळी असतात. तर स्त्री-पुरुष कसे समान होतील?'
त्यामुळे समानतेची नीटपणे व्याख्या झाली पाहिजे.
समान म्हणजे हुब्बेहुब, तंतोतंत नाही. पुरुष जे जे करतील तेच तेच (त्यांच्या चुकीच्या गोष्टींसकट) स्त्रियांनी करावं किंवा त्यांना करायला मिळावं हा अर्थ नाही. किंबहुना समानतेची अपेक्षा ही कृतींबाबत किंवा वागणुकीबाबत नाहीच. 'आपल्याला जे हवं ते करायचं असेल ते करण्याचं समान पातळीवरचं स्वातंत्र्य' हा समानतेचा अर्थ आहे.
आजच्या घडीला काही मूलभूत हक्कांचं, स्वातंत्र्यांचं वाटप होताना पुरुषांना ते निव्वळ पुरुष आहेत म्हणून झुकतं माप मिळताना दिसतं.
- जन्माला येण्याचा हक्क : भावी अपत्य केवळ स्त्रीलिंगी आहे म्हणून गर्भपात केले जातात. ही परिस्थिती का आहे? कारण मुलगी म्हणजे हुंडा, उत्पन्न काही नाही हा समज. हा समज का आहे? कारण मुलींना शिक्षण देण्याची आणि त्यांनी नोकरी करण्याची पद्धत नाही. ही पद्धत का नाही? कारण पूर्वापार चालत आलेलं - न स्त्रीम स्वातंत्र्यं अर्हति. या अनेक पातळ्यांवर चाललेल्या विषमतेपोटी गर्भपात होतात.
- शिक्षणाचा हक्क : आजही साक्षरतेत स्त्रिया मागे आहेत. शिक्षण नाही म्हणून अर्थार्जनाचं साधन नाही, त्यामुळे पुरुषावर अवलंबून रहाण्याचा नाईलाज, त्यातून अन्याय सहन करण्याची प्रवृत्ती येते.
- नोकरी करण्याचा हक्क : तत्वतः हा हक्क आहे. पण एकतर शिक्षण नाही, त्यामुळे नोकऱ्यांमध्ये संख्या प्रचंड कमी. आईवडिलांची प्रवृत्ती अशी की हिला शाळेत, कॉलेजात घातलं तर डोईजड व्हायची व हुंडा जास्त पडायचा. त्यापेक्षा घरकाम शिकवणंच बरं, नाहीतरी तेच तर करायचं आहे ना... हे दुष्टचक्र. ही विचारपद्धत जोपर्यंत समाजात आहे, तोपर्यंत खऱ्या अर्थाने तो हक्क आहे हे कसं म्हणणार? नोकऱ्यांमध्येदेखील अनेक काळपर्यंत स्त्रियांच्या बुद्धिमत्तेविषयी असलेल्या क्षुद्रतेच्या भावनेमुळे पुरुषांना प्राधान्य. ही भावना का? कारण आत्तापर्यंत पाहिलेल्या स्त्रिया अशिक्षित. पुन्हा दुष्टचक्र.
- मालमत्तेत समान हक्क : मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क मिळतोच असं नाही. भारतातला कायदा नक्की काय सांगतो हे मला नीटसं माहीत नाही. मात्र प्रत्यक्षात हा हक्क मिळताना दिसत नाही. बंगालात जिथे हा हक्क होता, तिथे तिला 'सती' म्हणून मारून टाकायचं हे प्रकार (फार पूर्वी) झालेले आहेत.
- चूल मूल सांभाळण्याबाबत समानता : एके काळी सात सात बाळंतपणं व्हायची. प्रत्येक स्त्री कायमच गरोदर किंवा/आणि खांद्यावर तान्ही पोरं बाळगून असायची. त्या काळात स्त्रियांनी घरी बसणं याला तसा पर्याय नव्हता. आता ती परिस्थिती नाही. साधारण पस्तीस-चाळीस वर्षांच्या करिअरपैकी फार कमी वेळ प्रत्यक्ष गरोदरपणात जातो. हे समीकरण बदललेलं असताना जुनीच व्यवस्था चालू ठेवण्याची समाजाची अपेक्षा ही कालबाह्य आहे. पण नवरा घरचं बघतो आणि बायको नोकरी करते अशी किती कुटुंब दिसतात? का?
या सगळ्या बाबतीत स्वातंत्र्यं मिळाल्यानंतरही जर कोणा स्त्रीने आपल्याला हवं म्हणून चूल-मूल-रांधा-वाढा-नवऱ्याची सेवा करा केलं तर काहीच हरकत नाही. पण समाजव्यवस्थाच अशी की हे सगळं लादलं जावं, याला मी विषमता म्हणतो.
पहिल्या दुव्यात दिलेल्या कुंकू, मिस्टर वगैरे लेखात समानता येण्यासाठी काय करावं यापेक्षा विषमतेची चिन्हं कुठची हे सांगितलेलं आहे. त्यामुळे ते असंबद्ध वाटत नाही.
सांख्यिकीला असलेला आक्षेप कळला नाही. विषमता कितपत आहे याचं मोजमाप, तिच्या मूलभूत कारणांवरची उपाययोजना, त्यांच्या परिणामकारकतेचं मोजमाप, त्यातून निष्कर्ष काढणं - हे सगळं सांख्यिकीशिवाय कसं करता येणार? मला वाटतं तुम्ही समाजव्यवस्थेच्या समानतेच्या व्याख्या व एखाद्या विशिष्ट कुटुंबातल्या समानतेच्या व्याख्या या दोनमध्ये गल्लत करत आहात.
दुसऱ्या दुव्यात दिलेल्या लेखातली कल्पना अर्थातच रम्य आहे. पण समानतेची कल्पना हे पाश्चात्यांचं अंधानुकरण हा मुद्दा पूर्णपणे चुकीचा वाटतो. वर दिलेले हक्क भारतातल्या स्त्रियांनाही मिळण्यासाठी कोणाचं अंधानुकरण होण्याची गरज नाही. ते जगातल्या प्रत्येक स्त्रीचे हक्क आहेत. काही देशांमध्ये ते आधी मिळाले इतकंच.
+१
या सगळ्या बाबतीत स्वातंत्र्यं मिळाल्यानंतरही जर कोणा स्त्रीने आपल्याला हवं म्हणून चूल-मूल-रांधा-वाढा-नवऱ्याची सेवा करा केलं तर काहीच हरकत नाही. पण समाजव्यवस्थाच अशी की हे सगळं लादलं जावं, याला मी विषमता म्हणतो.
यात एक गोष्ट सुटल्यासारखी वाटते. समाजाचं दडपण.
मंगळसूत्र घालत नाही, कुंकू, बांगड्या नाहीत म्हणून आज २१व्या शतकातही लग्न झालेल्या स्त्रियांना बोलून छळणारे लोक आहेत, अगदी माझ्या नात्यात, ओळखीतही आहेत. घरी नवराही स्वयंपाक करतो म्हणून बायकोला कमी लेखणारेही आहेत. नाव बदललं नाही म्हणून छळणारे आहेत. या सगळ्याचा स्त्रियांवर परिणाम होऊन त्यांनी स्वातंत्र्य काय हे माहित असतानाही, नवराही समानतेचा पुरस्कार करणारा असला तरीही वेळोवेळी पडती भूमिका घेतली तर त्याला समाजाची कितपत जबाबदारी आणि त्या स्त्री-पुरुषाची कितपत? "कुठे आई (किंवा सासू)ची कटकट ऐकायची, म्हणून घालते मंगळसूत्र!" हे वाक्य मी किती वेळा ऐकलेलं आहे! हाच प्रकार स्त्रियांनी सणासुदीला काय कपडे घालावेत, घरी बाहेरचे लोक काही वेळापुरते किंवा मुक्कामी आले की, आणि अशा अनेक वेळा!
आणि लग्न झालं नाही म्हणून तर मुलींना जवळच्या नात्यातलेच लोक किती छळत असतील याची कल्पना प्रत्यक्ष ती मुलगी असाल तर किंवा तिची जवळची मैत्रीण असाल तरच येईल.
समानतेची कल्पना हे पाश्चात्यांचं अंधानुकरण हा मुद्दा पूर्णपणे चुकीचा वाटतो. वर दिलेले हक्क भारतातल्या स्त्रियांनाही मिळण्यासाठी कोणाचं अंधानुकरण होण्याची गरज नाही. ते जगातल्या प्रत्येक स्त्रीचे हक्क आहेत. काही देशांमध्ये ते आधी मिळाले इतकंच.
अनुकरण पाश्चात्यांचं असलं की ते बाय डीफॉल्ट चूकच असतं का? लहान मुलं अनुकरण करूनच तर शिकतात ना?
मी लग्नानंतर नाव बदलेलं नाही. मराठी पारंपरिक रितीप्रमाणे माझं नाव, वडलांचं नाव आणि आडनाव असं कागदोपत्री नाव आहे. अनेकदा लोकं आपापल्या बुद्धीने माझं नाव सौ .... लिहीतात. "याचा अर्थ मी माझ्या वडलांची पत्नी असा लावायचा का", असं विचारल्यावर भूत बघितल्यासारखे बघतात. "कुठे कटकट वाढवायची, त्यापेक्षा नाव बदलू" असं अजूनपर्यंत माझं झालेलं नाही.
दुव्यांवरील निबंध वाचले
लेखात उल्लेखलेला पहिला दुवा वाचला :
एके ठिकाणी (दुवा) स्त्रिया कुंकू लावतात पुरूष नाही, पुरुषाला फक्त मिस्टर असे संबोधन तर स्त्रियांना मिस आणि मिसेस असे वैवाहिक स्टेटस असलेले संबोधन असे काहीसे मत मांडून समानता आणि (अ)समानता असा उहापोह केला होता. हे वाचून हसू तर आलेच पण कीवही आली.
दुवा वाचला. मला हा सारांश तितकासा पटला नाही. "पुरुष कुंकू लावत नाहीत" हा मुद्दा एक विनोदी-क्षुल्लक मुद्दा आहे. मुख्य मुद्दे गुप्त नाहीत, स्पष्ट सांगितलेले आहेत :
विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.
आणि
जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे.
हे दोन्ही मुद्दे मला तरी निरीक्षणावरून ठीकठाक वाटतात. माझ्या नातेवाइकांत तरी माझे निरीक्षण असे आहे : माझ्या चुलत-मावस-आत्ये-मामेभावंडांत आई-वडलांना मुलीच्या लग्नाच्या जितका घोर लागून होता, त्यापेक्षा मुलांच्या लग्नाबाबत घोर लागून नव्हता. माझे कुटुंब हे तितके अपवादात्मक नाही. त्यामुळे दुव्यातील निबंधाचा मुद्दा सकृद्दर्शनी पटण्यासारखा आहे.
माझ्या मित्रांपैकी मुले मुली-बघायला गेली, आणि प्रथम नकाराचा हक्क मुलाकडे होता, तर मुली दाखवल्या-गेल्या आणि मुलींकडे फक्त द्वितीय-नकाराचा हक्क होता. अशा प्रकारचा बाजार हा व्यवहारकर्त्यांसाठी वेगवेगळा अकतो. त्यामुळे "जोडीदार मिळण्याबाबत नियम वेगवेगळे आहेत" ही बाब मला पटते.
आज कित्येक नवविवाहित जोडपी स्वतंत्र संसार थाटतात. परंतु जी जोडपी आदल्या पिढीसह राहातात, त्यांच्यात नवर्याच्या आईवडलांबरोबर राहायचे प्रमाण अधिक आहे, आणि बायकोच्या आईवडलांबरोबर राहाण्याचे प्रमाण कमी आहे. (स्त्रीभ्रूणहत्या वगैरे प्रकार धरूनही) हम दो हमारे एक-दो जमान्यात मुली सुद्धा एकुलत्या असतात. मुलींनी लग्नानंतर लग्नाच्या आदल्या आयुष्याचा मोठा भाग त्यागण्याची प्रथा अजून खूप प्रचलित आहे.
(मागच्या पिढीत तर फारच : खुद्द माझ्या आईने लग्न होताच होती ती पर्मनंट नोकरी सोडली, आणि दूरगावी निघून गेली. त्या काळी माझ्या वडलांची नोकरी पर्मनंट नव्हती, आणि थोड्याच वर्षांत त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली. त्या काळात याच्या विरुद्ध सल्ला माझ्या आईला कोणीही दिला नाही. [अशाच परिस्थितीत असलेल्या माझ्या एका नाते-बहिणीने स्थिरस्थावर होईस्तोवर नोकरी सोडणार नाही, असा निर्णय घेतला, हे सांगण्यास आनंद वाटतो. पण आजही काही बायका नोकर्या सोडून दुसर्या गावात कमी प्राप्तीची नोकरी पत्करतात.] उलट माझ्या आईचे वागणे अपेक्षितच मानले गेले. माझ्या आईच्या फार थोड्या मैत्रिणी त्या नोकरीत टिकून राहिल्या, त्यांना - आणि मग त्यांच्या नवर्याला, अपत्यांना - पुष्कळ आर्थिक फायदा झाला. माझी आई तशी शांत आहे, पण क्वचित कधीतरी या निर्णयाबाबत ती खंत व्यक्त करते. हे सर्व वैयक्तिक अनुभव मला क्षुल्लक वाटत नाहीत.)
एकूण दुव्यावरच्या निबंधात चांगले, गंभीर आणि माझ्या ओळखीच्या स्त्रियांना सुख-दु:ख देणारे मुद्दे आलेले आहेत. निबंधाची सुरुवात "पुरुष कुंकू लावत नाहीत" या विनोदाने केली आहे, पण कुठल्याशा क्षुल्लक विनोदाने निबंधांची सुरुवात करण्याची शैली सुद्धा प्रचलित आहे.
दुसरा दुवासुद्धा चांगला आहे. स्त्री-पुरुष एकमेकांना पूरक आहेत ही कल्पना फार काळापासून मान्य आहे. शरिरे वेगवेगळी असएले स्त्री-पुरुष कित्येक बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी करतील हे ठीकच आहे निबंधकार म्हणतात :
हां, उस स्थिति में अवश्य बैठाना है जहां वह पूर्ण रू पेण पुरूष के समकक्ष हो।
पण या "समकक्ष"मध्येच तर ग्यानबाची मेख आहे. या दुसर्या निबंधातील त्रुटी ही, की समकक्षतेचे कुठलेही उदाहरण नीटसे दिलेले नाही. हे न दिले, तर वाटेल ती बाब "पूरक"मध्ये ढकलली जाऊ शकते.
जॉन रस्किन (१८१९-१९००) हा माझ्या आवडत्या निबंधकारांपैकी आहे. त्याच्या न-पटलेल्या भूमिकांपैकी ही एक : त्याच्या मते पुरुषांचे शिक्षण असे असले पाहिजे, की समाजात त्याला महत्कार्ये करता यावीत. स्त्रीचे शिक्षण असे असले पाहिजे की घरच्या पुरुषाला उत्तम सल्ला-मसलत देऊ शकेल, त्यास योग्य मार्गावर ठेवू शकेल, वगैरे. जॉन रस्किन हा एक विशालहृदयी गृहस्थ होता. त्याचा हा निबंध वाचताना स्त्रियांबाबत त्याच्या मनातील सन्मान अगदी स्पष्ट होता. समाजात दोघांचे पूरक आणि वेगळे स्थान आहे, पण दोन्ही स्थाने सन्माननीय आहेत, असे त्याचे मत होते. (संदर्भ : ऑफ किंग्स ट्रेझर्स (पुरुषांच्या शिक्षणाबाबत); ऑफ क्वीन्स गार्डन्स (स्त्रियांच्या शिक्षणाबाबत)
त्याचे मत मला न-पटण्याचे कारण २१व्या शतकात सांगायची गरज पडू नये. मात्र जॉन रस्किनची या बाबतीत तरी स्तुती करावीशी वाटते, की "सुविद्य शिक्षकाकडून शिक्षण मिळावे या बाबतीत समकक्ष, तर काय शिक्षण मिळावे त्याबाबत पूरक-वेगळे" हे त्याने स्पष्ट करून सांगितले आहे.
दुव्यावरील "अर्धनारीश्वर"मध्ये या उपमा-रूपकाचा प्रत्यक्ष काय परिणाम व्हावा, हे काहीच सांगितलेले नाही. (कुठल्या बाबतीत "समकक्ष" असावे? कुठल्या बाबतीत भिन्न असावे?*) त्यामुळे प्रत्येक जण "आपण आधीच या सुवर्णमध्य पूरकतेपाशी पोचलो आहेत" ही गोड शाबासकी देऊन निबंध वाचून संपवू शकतो.
- - -
*
"परिवार और समाज में भी कामों के बंटवारे में दोनों को एक-दूसरे का पूरक ही बनाया था। लेकिन बराबरी की बात कहकर स्त्रियों के मन में हीन भावना उपजाई गई है, मानों घर-परिवार में वह पुरूष के बराबर नहीं रही, इसलिए पिछड गई। यह गलत सोच है। यदि पुरूष भी घर से बाहर का काम करता रहा तो वह भी तो पिछड गया। फिर उसके अन्दर तो हीन भावना नहीं है। पुरूष प्रधान समाज कहकर भी हम स्त्रियों के अन्दर हीन भावना का ही सृजन करते हैं।
निबंधलेखिकेचे असे म्हणणे आहे काय की ही गलत सोच नसली, तर स्त्री आनंदाने घरातले काम करत राहील - पुरुष बाहेरची कामे हीन-भावने-विण करत राहातो, तशी स्त्री आनंदी होईल. मला वाटते, की निबंधलेखिकेचे मत साधारणपणे जॉन रस्किनसारखे असावे. २१व्या शतकात?
भेद नको - निरपेक्षता
स्त्रीपुरुष समानता म्हणजे कोणत्याही गोष्टीत स्त्रीपुरुष निरपेक्षता. (अर्थात काहि नैसर्गिक मर्यादा आहेत - ज्या बहुदा प्रजनन आणि अर्भकपोषणक्षमता इथेच संपतात)
बाकी कोणी कोणते काम करावे - केले पाहिजे याबाबर वर्गीकरण नको. ज्याला जे हवे ते त्याला करण्याचे स्वातंत्र्य हवे.
मात्र त्याच वेळी अशी समानता म्हणजे 'स्त्री-मुक्ती' हा दृषीकोन मला मंजूर नाहि. जेव्हा एखाद्या वर्गाने दुसर्याला 'मुक्त' करायचे म्हटले की तिथेच आपण वर्गीकरणाला सुरवात करतो. शिवाय स्वातंत्र्य असे देऊन घेता येत नाहि. मागे मंगला आठलेकरांचे गार्गी अजुन जिवंत आहे हे पुस्तक वाचले होते. त्यातील गुलाबबाईंचं तत्त्वज्ञान मला आवडतं. तुम्ही इतर स्त्रियांना बळ देण्यासाठी काय करता ह्या प्रश्नांवर गुलाबबाईचं उत्तर मार्मिक तर आहेच पण अतिशय चिंतनीय आहे. ती लेखिकेलाच प्रतिप्रश्न विचारते "आजूबाजूच्या स्त्रियांसाठी मी काय करायला हवं होतं असं तुला वाटतं? माझ्यासाठी कुणी काय केलं? मला वडिलांनी स्वातंत्र्य दिलं म्हणशील तर ते माझ्या बहिणींनाही होतंच की! त्यांनी काय केलं त्या स्वातंत्र्याचं? तेव्हा मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो. आणि झालाच स्वतंत्र तरी ते स्वातंत्र्य त्याला वापरता येत नाही. कारण बेड्या गळून पडल्या तरी त्या हातापायांचं काय करायचं हेच त्यांना ठाऊक नसतं. मला काय हवंय, आयुष्यात काय करायचंय हे निश्चित झालं की ते मिळविण्यासाठी त्याची आतूनच एक जबरदस्त आस निर्माण होते. हेच स्वातंत्र्य! ते स्वतःलाच मिळवता येतं"
जेव्हा एखाद्या वर्गाने
जेव्हा एखाद्या वर्गाने दुसर्याला 'मुक्त' करायचे म्हटले की तिथेच आपण वर्गीकरणाला सुरवात करतो. शिवाय स्वातंत्र्य असे देऊन घेता येत नाहि.
क्या बात कही!! बस. समानता हा नॉन-इश्यू आहे. दुसर्याकडून समानता पाहिजे अशी अपेक्षा करणे म्हणजेच तुम्ही स्वतःला त्याच्या समान समजत नाही असा अर्थ होतो. वरती राजेश घासकडवींनी विषमतेचे काही मुद्दे मांडले आहेत. त्यात मुलींचा जन्माचा आणि शिक्षणाचा वगैरे हक्क डावलला जातो असं म्हटलंय ते अगदी खरं आहे. पण शिकलेल्या त्यांच्या आयाही याला विरोध करताना फारशा दिसत नाहीत असे का?
राहिलं स्वातंत्र्य. स्वतंत्र आहोत असं वागायला लागायचं एवढंच स्त्रियांनी करायचं आहे. जे बरोबर येतील त्यांना घेऊन आणि जे विरोध करतील त्यांना सोडून स्वतःला जे हवं ते करायचं.
दुसर्याने दृष्टीकोन बदलण्याची अपेक्षा करणे किंवा दुसर्याने आपल्या अपेक्षेप्रमाणे वागले पाहिजे असा हट्ट करणे हा स्वातंत्र्याचा मार्ग नव्हे.
आहे त्या चौकटीतच बदल होत नसतील तर चौकट मोडणे हे करता आलं पाहिजे आणि ते दुसरं कोणीही करून देणार नाहीय. ते स्वतःलाच केलं पाहिजे.
असहमत
जेव्हा एखाद्या वर्गाने दुसर्याला 'मुक्त' करायचे म्हटले की तिथेच आपण वर्गीकरणाला सुरवात करतो. शिवाय स्वातंत्र्य असे देऊन घेता येत नाहि.
"आजूबाजूच्या स्त्रियांसाठी मी काय करायला हवं होतं असं तुला वाटतं? माझ्यासाठी कुणी काय केलं? मला वडिलांनी स्वातंत्र्य दिलं म्हणशील तर ते माझ्या बहिणींनाही होतंच की! त्यांनी काय केलं त्या स्वातंत्र्याचं? तेव्हा मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो.
वरील दोन उद्धृतातून व्यक्त होणार्या अर्थाशी असहमत आहे. शोषिताला फक्त स्वतःच्या जोरावर शोषणातून मूक्तता मिळवता येईलच हे म्हणणे बरोबर नाही. आपले शोषण होते आहे ही जाणिव होणं, त्या विरुद्ध उभं रहाण्याची तयारी हे शोषणाच्या विरोधातले महत्त्वाचे टप्पे आहेत हे जरी खरं असलं तरी दरवेळी ह्यांमुळेच शोषण धाब्वता येईल नाही.
त्याच बरोबर दुसर्याचे शोषण होत आहे शोषण न होणार्या किंवा शोषण करणार्याला कळणे हा सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
आणि झालाच स्वतंत्र तरी ते स्वातंत्र्य त्याला वापरता येत नाही. कारण बेड्या गळून पडल्या तरी त्या हातापायांचं काय करायचं हेच त्यांना ठाऊक नसतं.
हे ही खरं नाही. उदाहरण द्यायचं झालं तर सतीच्या प्रथेतून मूक्त झालेल्या स्त्रीयांचं घ्या. त्या काळी हे स्वातंत्र्य ज्यांना काही न करता मिळालं त्यांना त्यांच्या जीवनाचं काय करायचं हे ठाऊक नव्हतं म्हणणं हास्यास्पद आहे.
असहमत
तेव्हा मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो. आणि झालाच स्वतंत्र तरी ते स्वातंत्र्य त्याला वापरता येत नाही. कारण बेड्या गळून पडल्या तरी त्या हातापायांचं काय करायचं हेच त्यांना ठाऊक नसतं.
हे पटत नाही. दक्षिण अमेरिकेतले कृष्णवर्णीय १८६५ पर्यंत गुलामीत होते. गोऱ्यांची त्यांच्यावर इतकी कडक पकड होती की त्यांनी काहीही केलं असतं तरी ते स्वतंत्र होऊ शकले नसते. राष्ट्रीय कायदा झाला तेव्हाच गुलामी संपली. हा युक्तिवाद दिल्यावर अब्राहाम लिंकन काय म्हणेल याचा विचार करून बघा.
जेव्हा एखाद्या वर्गाने दुसर्याला 'मुक्त' करायचे म्हटले की तिथेच आपण वर्गीकरणाला सुरवात करतो.
हेही पटत नाही. वर्गीकरण आधीच झालेलं असतं. त्याचे परिणाम उघड उघड दिसत असतात. आणि गरज असते, तेव्हाच ही स्वातंत्र्य देण्याची मागणी येते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्यावर राज्य करणारे ब्रिटिश व त्यांनी भरडलेली भारतीय जनता हे वर्गीकरण स्वातंत्र्य मागणाऱ्यांनी केलं का?
हे पटत नाही. दक्षिण
हे पटत नाही. दक्षिण अमेरिकेतले कृष्णवर्णीय १८६५ पर्यंत गुलामीत होते. गोऱ्यांची त्यांच्यावर इतकी कडक पकड होती की त्यांनी काहीही केलं असतं तरी ते स्वतंत्र होऊ शकले नसते. राष्ट्रीय कायदा झाला तेव्हाच गुलामी संपली. हा युक्तिवाद दिल्यावर अब्राहाम लिंकन काय म्हणेल याचा विचार करून बघा.
राजेश, आज भारताततरी स्त्रियांची तशी अवस्था नक्कीच नाही. तसं नसेल तर राजा राममोहन रॉय, फुले, कर्वे, आगरकर यांनी काहीच काम केलं नाही म्हणायचं.
आज अगदी मध्यमवर्गातल्या स्त्रियाही शिकलेल्या, स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. मग समानतेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आणखी कशाची वाट पाहत आहेत? पुन्हा कोणी पुरुष प्रेषित येऊन आणखी सुधारणा (पक्षी: पुरुषांना बदलणे) करेल अशी अपेक्षा आहे काय? तसे असेल तर खरेच वर नाव घेतलेल्या पुरुषांचे कार्य वाया गेले असे मी म्हणेन.
स्त्रियांविरुद्धच्या विषमतेचे कारण मुळात अर्थकारणात दडलेले आहे. विवाहसंस्था, एकपतीत्व/एकपत्नीत्व आणि वारस मुलग्यांचा हट्ट हा केवळ संपत्तीच्या जपणूकीतून आलेला आहे. त्यामुळेच हरयाणा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सधन भागात स्त्रीलिंगीगर्भपाताचे प्रमाण जास्त दिसते. ते अर्थकारण समजून न घेता विवाहसंस्था (आणि त्यातून मिळणारे फायदे) टिकवून ठेवण्याचा पण तिच्यात आपल्याला हवे तेच बदल घडण्याचा आणि कोणताही इन्सेन्टीव्ह नसताना केवळ नैतिकता म्हणून पुरुषांनी बदलण्याचा आग्रह धरल्याने समता आणि स्वातंत्र्य येणार आहे काय?
स्त्रियांच्या बाजूने पुष्कळ कायदे झाले आहेत आणि त्याचा फायदा घ्यायला स्त्रियाही पुढे येत आहेत. आजकाल स्वतःच्या पायावर उभ्या असल्याने आणि नवर्याइतकीच संपत्ती निर्माण करू शकत असल्याने पटत नसल्यास स्त्रिया सरळ विवाहविच्छेदाचा मार्ग निवडताना दिसतात (गेल्या दोन वर्षात माझ्या चार परिचितांचा घटस्फोट झाला आहे) . याच्या पुढची पायरी म्हणजे इच्छा आणि गरज नसेल तर लग्न न करणे आणि तरीही इच्छा असेल तर अपत्यास जन्म देणे ही होय. जेव्हा पुरुषांना कळेल की स्त्रिया खरोखरच स्वत:चं स्वतः जगू शकतात तेव्हाच पुरुषप्रधान व्यवस्थेत बदल होण्यासाठी इन्सेन्टीव्ह मिळेल.
आणखी एक निरीक्षण म्हणजे बर्याच केसेस मध्ये स्त्रियांना नवर्याचा नव्हे तर सासूचा त्रास महत्वाचा वाटतो. सासू टोमणे मारते म्हणून तिला घरी येऊ न देणार्या किंवा नवर्यापासूनही वेगळं होणार्या स्त्रिया जास्त दिसतात. म्हणजे स्वतःच्या हक्कांची जाणीव होणे ही प्रगती असली तरी आधीच्या "सामाजिक दडपणाखाली" ब्रेनवॉश झालेल्या स्त्रीच्या मत्सराकडे सहानुभूतिने पाहता येत नसेल तर ती प्रगती शून्य आहे.
आज भारताततरी स्त्रियांची तशी
आज भारताततरी स्त्रियांची तशी अवस्था नक्कीच नाही. तसं नसेल तर राजा राममोहन रॉय, फुले, कर्वे, आगरकर यांनी काहीच काम केलं नाही म्हणायचं.
आज भारतातल्या सर्वच स्त्रियांची अवस्था तितकी वाईट नाही. त्यामुळे रॉय, फुले, कर्वे हे स्त्रियांमधूनच निर्माण होण्याची शक्यता आहे. किंबहुना त्यांना त्या काळी कार्य करावं लागलं यावरूनच 'मला स्वातंत्र्य आहे' असं समजून मिळत नाही हे अधोरेखित होतं.
स्त्रियांविरुद्धच्या विषमतेचे कारण मुळात अर्थकारणात दडलेले आहे.
१०० टक्के बरोबर. मी वर म्हटल्याप्रमाणे, वीसपंचवीस वर्षांच्या करिअरमध्ये सात बाळंतपणं होत असतील तर चूल आणि मूल बायकांनी सांभाळणं हा अर्थकारणातून आलेला बऱ्यापैकी सूज्ञ निर्णय ठरू शकतो. मात्र आता परिस्थिती बदललेली असली तरी काप गेले भोकं राहिली याप्रमाणे पोकळ परंपरा टिकून आहेत. बंधनं टिकून आहेत. ही बंधनं स्वतःला तोडता येणं हे ती किती बळकट आहेत आणि आपल्यात किती शक्ती आहे यावरून ठरतं. जे मुक्त आहेत त्यांनी मदत करायला काहीच हरकत नाही. प्रेषिताचीच वाट बघत रहावं असं नाही, पण बाह्य मदत आवश्यत ठरते.
ज्या ज्या गोष्टी पुरूष करू
ज्या ज्या गोष्टी पुरूष करू शकतात त्या त्या स्त्रियांनी करणे म्हणजे समानता का? किंवा मग तसे नसेल तर निदान ज्या गोष्टी स्त्रिया करू शकतात त्यात त्यांची संख्या पुरुषांएवढी(च) हवी का? म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का?
सांख्यिकी दृष्टीकोनामागे निव्वळ संख्यांची समानता नसून समान संधी अभिप्रेत असते. समान संधी कुठल्या सामाजिक कारणांमुळे स्त्रियांना मिळत नाही हे शोधण्याचे ते फक्त एक तंत्र आहे.
तसेच स्त्री-पुरुषांनी त्या त्या गोष्टी करणे एवढेच नव्हे, तर त्या गोष्टींना समाजात, संस्कृतीत लावलेले अर्थ आणि महत्त्व जास्त महत्त्वाचे आहेत. यातूनच स्त्रीपुरुषांमधल्या समानता-विषमतेचा बोध होतो.
या विषयावर लिहाल तितकं कमीच आहे. पण एकाच गोष्टीचा पुरुषप्रधान समाजात स्त्री-पुरुषांच्या संदर्भात कसा वेगळा अर्थ लागू शकतो, यावर ग्लोरिया स्टाइनेम चा If Men Could Menstruate हा प्रसिद्ध लेख आठवला.
मुद्द्यांशी सहमतच.
मुद्द्यांशी सहमतच.
ग्लोरियाच्या या लेखात स्त्रीवादातली एक बाजू अतिशय समर्थपणे मांडलेली आहेच, शिवाय अमेरिकन समाजाचं यथार्थ चित्रण अतिशय तिरकस विनोदी शैलीत केलेलं आहे. (प्रचंड हसले.) अलिकडेच ओबामा प्रशासनाने कॉंट्रासेप्टीव्हजचा खर्च विमा कंपन्यांनी करावा अशी टूम काढल्यानंतर हा लेख फारच आवडला. लेख शेअर करण्याबद्दल धन्यवाद.
या सर्व पार्श्वभूमीवर त्या
या सर्व पार्श्वभूमीवर त्या असंख्य मुली ज्या केवळ आणि केवळ दिसायला छान आहेत (गोर्या, उंच इ इ) आणि केवळ त्या गोष्टीला "क्वालिफिकेशन" मानून अमेरिकेत स्थिर असलेला नवरा शोधताहेत अन मिळवताहेत त्यांच्याबद्दल काय मत आहे..? त्यांनी ज्या दोन गोष्टी "इक्वेट" केल्या आहेत त्या "पॉवर गेम"ला खतपाणी घालणार्या नाहीत का? त्यांनाही स्वातंत्र्य हवं ही आयडियलिस्टिक मागणी खरीच आहे, पण त्यांनी तरी परावलंबी जीवन स्वतःच्या चॉईसने स्वीकारलं आहे हे खरं ना ?
(यावर आपल्या कर्तबगारीवर परदेशी गेलेल्या किंवा अगदी सेटलही झालेल्या मुलींची उदाहरणं समोर टाकता येतील. पण त्यांच्याखेरीज एका मोठ्या वर्गात अमेरिकेतल्या नवर्याची कर्तबगारी आणि श्रीमंती एकीकडे आणि मुलीचं फक्त सौंदर्य एकीकडे अशी तराजूतली तुलना होतेय .. ती होत नाहीये असं म्हटल्यास प्रश्नच संपला.. मग ते डिनायल म्हटलं पाहिजे.. कोणतीही मॅट्रिमोनी साईट / जाहिरात पाहिली की हे स्पष्ट होईल.)
?
या सर्व पार्श्वभूमीवर त्या असंख्य मुली ज्या केवळ आणि केवळ दिसायला छान आहेत (गोर्या, उंच इ इ) आणि केवळ त्या गोष्टीला "क्वालिफिकेशन" मानून अमेरिकेत स्थिर असलेला नवरा शोधताहेत अन मिळवताहेत त्यांच्याबद्दल काय मत आहे..? त्यांनी ज्या दोन गोष्टी "इक्वेट" केल्या आहेत त्या "पॉवर गेम"ला खतपाणी घालणार्या नाहीत का? त्यांनाही स्वातंत्र्य हवं ही आयडियलिस्टिक मागणी खरीच आहे, पण त्यांनी तरी परावलंबी जीवन स्वतःच्या चॉईसने स्वीकारलं आहे हे खरं ना ?
मुद्दा नीटसा कळला नाही. इथे असं म्हणायचं आहे का की त्या स्त्रीयांना अमेरीकेत स्वावलंबनाची कुठलीही संधी नाही म्हणून? (अधोरेखित)
तसे असेल तर त्यांना भारतातही स्वावलंबनाची कुठलीही संधी नाही. मग भारत आणि अमेरीका ह्यामध्ये निवड करताना त्यांनी इतर कारणांनी काहीही निवडलं तरी त्याचा आणि समानतेचा काही संबंध दिसत नाही.
इथे मात्र एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे. ही 'अरेंज्ड मॅरेज' सिस्टीमच 'बेस्ट डील' मिळवण्याकरता बनवलेली आहे. मग अगदी कुंडली जमवण्यापासून ते लग्न कोण लावून देणार, आहेर वगैरे वगैरे. अशा वेळी एखादीने आपल्या रुपाचं भांडवल करून कोणा श्रीमंत मुलाशी लग्न जुळवायचा प्रयत्न केला तर त्यात वावगं ते काय?
आता अमेरीकेतली ही मुलं "केवळ आणि केवळ" दिसायचा छान असणार्या मुलींना बायको म्हणून स्विकारायला का बरं तयार होत असावेत? अर्थातच त्यांचा करताही ते 'बेस्ट डीलच' शोधत असतात. त्याच प्रमाणे दिसायला वाईट असणार्या मुलींशी लोक भरपूर हूंड्या करता लग्न करतात.
मलाही हा मुद्दा समजला नाही.
मलाही हा मुद्दा समजला नाही.
फक्त अमेरिकेत आहे आणि श्रीमंत आहे म्हणून एखाद्या मुलाशी लग्न करणार्या, उंच आणि वर्णाने (भारतीय) गोर्या असणार्या मुलींशी लग्न करणारे मुलगेही तेवढेच गुलाम नाहीत का? घरात गुंगी गुडीया हवी असणारे मुलगे/पुरूष अमेरिकेत आहेत (किंवा फार कमावतात) म्हणून मुक्त ठरत नाहीत.
मुद्दा समजला नाही? काय बरं
मुद्दा समजला नाही? काय बरं करावं? दोघेही गुलामच वगैरे सर्व ठीक आहे. त्या मुली खरेच गूंगी गुडिया असतात की ट्रेड करुन उत्तम आयुष्य पॅरासाईटसारखे जगतात हा नवा वादाचा मुद्दा होईल. अशा ब्याक्राउंडवर कोणी आपल्या अवलंबित्वामुळे स्वातंत्र्यासाठीही पतीवर अवलंबून रहावे लागेल हा विचार केलेला नसतो. इ इ.
पण आत्ता अधिक स्पष्ट करत नाही.कारण त्या गो-या गुडिया आपापल्या नव-यांच्या कुशीत आम्रिकेत गाढ झोप पूर्ण काढून ताज्यातवान्या होऊन बसलेल्या किंवा ग्रोसरीला निघालेल्या असताना मज पामराने जागरण करुन त्यांजवर कशापाई लिहावे?
अधिक लेखन अन वाद भारतीय वेळेनुसार झोप पूर्ण झाल्यावर नाश्ताबिश्ता करुन मग.. ;)
प्रश्न
>>>त्या मुली खरेच गूंगी गुडिया असतात की ट्रेड करुन उत्तम आयुष्य पॅरासाईटसारखे जगतात हा नवा वादाचा मुद्दा होईल. अशा ब्याक्राउंडवर कोणी आपल्या अवलंबित्वामुळे स्वातंत्र्यासाठीही पतीवर अवलंबून रहावे लागेल हा विचार केलेला नसतो. इ इ.
नीटसे विवेचन समजले नाही
अमेरिकास्थित व्यक्तींशी लग्न करून गेलेल्या सर्व व्यक्ती "गूंगी गुडिया" असतात का ? मग यात "गुड्डे"लोकांचा उल्लेख कसा काय नाही? कारण माझ्या परिचयाचे असे "गुड्डे" मला माहिती आहेत की. त्यांचा उल्लेख विसरला असाल तर आपलं सांगितलेलं बरं. बरं ज्या "स्त्रिया" "गूंग्या" आहेत त्या सर्वच गोर्या आणि उंच आहेत हेही माहिती नव्हतं. आम्हाला काही उंचीने कमी , निमगोर्या व्यक्तीही माहिती आहेत. अमेरिकास्थित मुलीशी लग्न करून आलेला एक मुलगा थोडा जाडसरही होता. नि त्याच्या गालावर बारीक तीळ होता :)
बरं मग अशा व्यक्ती काही काळापुरत्या आपल्या जोडीदारावर (सॉरी, स्टिरिओटाईपिंगमुळे फक्त पतीवरच बर्का) "स्वातंत्र्यासाठीही अवलंबून" असतात म्हणजे काय ते कळले नाही.
बाकी कुठल्या विशिष्ट परिस्थितीतल्या , भौगोलिक ठिकाणच्या व्यक्ती कुणाच्या कुशीत असतील किंवा कुठली दुय्यम समजली जाणारी घरगुती कामं करत असतील याचा छद्मी उल्लेख करणार्यांचा प्रतिवाद करायचा का नाही या विचारात सध्या मी मग्न आहे. त्यामुळे कोण कधी नि कुठे नि कुणाबरोबर झोपतो , कुणाकरता नाश्ता कोण बनवतो , या दरम्यान कुणी कुणाला मिठी मारतं का, या तपशीलात आपण जाणं म्हणजे त्याच पातळीवर उतरल्यासारखं होतं म्हणून तेही करत नाही.
गुंगी गुडिया हा माझा शब्द
गुंगी गुडिया हा माझा शब्द नाही. उलटपक्षी त्या खरंच गुंगी गुडिया असतात की विचार करुन त्यांनी आपलं स्वातंत्र्य ट्रेड केलेलं असतं हा प्रश्न मी उपस्थित केला होता. तस्मात मला गुंगी गुडिया या विशेषणाचे पालकत्व देऊ नये अशी विनंती.
बाकी डोळा मारल्याच्या स्माईलीने गमतीत बोलतो आहे असा अर्थ होत असावा अशी समजूत होती.
अशा प्रकारे मग पुलंच्या असामी मधल्या बेंबट्याचे बाबा जे म्हणतात की साहेब त्याच्या मडमेस कुशीत घेऊन झोपलाय गाढ तिकडे मलबार हिलवर आणि तुम्ही इकडे मुगभाटातून कांदेवाडीत,कांदेवाडीतून धसवाडीत कसले रे लेंगे स्वराज्य लेंगे करताय?
हा संदर्भ विनोदी अंगाने घेतला होता.
above this , : "कुशीत झोपणे" हा मजेत सुशेगाद असल्याचा सिंबॉल म्हणून वापरला होता. त्यात त्यापुढचा काही अर्थ घेतला असल्यास क्षमस्व.. माझे ज्या बाबतीत रेप्युटेशन नाहे ते व्हायला नको म्हणून खुलाशाचा प्रयत्न. असो.
मला फ़ारच व्यक्तिगत छद्मी किंवा यापुढची विशेषणे लागण्यापूर्वी या गंभीर ठिकाणातून काढता पाय घेतो. ब-याच काळाने काही चर्चेत भाग घ्यावा वाटला. वरील सर्व चर्चेबद्दल क्षमस्व.
>>>अमेरिकास्थित व्यक्तींशी
>>>अमेरिकास्थित व्यक्तींशी लग्न करून गेलेल्या सर्व व्यक्ती "गूंगी गुडिया" असतात का ? >>>
हे राम.. हे कुठून काढलंत. माझी पहिलीवाहिली प्रतिक्रिया वाचा अन मग खाली वाचत या अशी विनंती.. एक मोठा वर्ग हे करतो पण सगळ्या तशा नसतात हे उल्लेखूनच सुरुवात केली आहे.
हेही केवळ तुम्ही अर्थात मुक्तसुनीत भलते गैरसमज करुन घेत आहात म्हणून वाईट वाटलं याकरिता मुद्दाम स्पष्ट करत बसलो
इतर कोणाला कदाचित स्पष्टीकरणही दिलं नसतं.
माझ्या मते, आपण ज्या
माझ्या मते, आपण ज्या स्वातंत्र्याबद्दल बोलत आहोत, निदान मी ज्या स्वातंत्र्याबद्दल बोलते आहे ते इतरांकडून मिळत नाही. स्वतःच्याच डोक्यातल्या परावलंबितेच्या मूर्त्या फोडून ते स्वतःच मिळवावे लागते. त्याचा लग्न, वय, व्यक्तींचे लिंग, मॅरिटल स्टेटस (मराठी?), मुलांचे पालकत्व याचा कशाशीही संबंध नसतो. अनेक गूंगे गुड्डे-गुडीया हे स्वतः (खोर्याने) कमावणारे, एखाद-दुसरा छंद जोपासणारे, भरपूर वाचन करणारे असेच असतात. (त्यांची गार्डन व्हरायटी अगदी आंजावरही आजूबाजूला पाहिल्यावर दिसतेच दिसते.) आणि तरीही हे स्वतःच्याच डोक्यातल्या अचाट कल्पनांचे गुलाम असतात.
स्वतः न कमावणारी, वाडवडलांकडून आलेला किंवा नवरा-बायकोने कमावलेल्या पैशांवर गुजराण करणारी व्यक्तीही डोक्याने अतिशय स्वतंत्र असू शकते. अशा स्वातंत्र्याचीही किंमत चुकवावी लागतेच. तिचं नाव आहे जबाबदारी. आणि अनेक स्त्रियांना ही किंमत चुकवूनही आपल्याला अतिशय आनंदात आयुष्य जगता येतं यावर विश्वास नसतो किंबहुना माहितच नसतं. कारण बाहुल्यांना सिंड्रेलाच त्यांची हिरॉईन वाटते. सिंड्रेलाची गोष्ट ही अतिशय बिन्डोक मुलीची गोष्ट आहे, अशा बनू नका असं सांगण्याऐवजी, तुला कोणीतरी श्रीमंत मुलगा गटवून आनंदाने जगता येईल असं शिकवलं जातं. कळत नकळत. आणि म्हणून स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल अधिक विचार करावा लागतो.
जेव्हा एखाद्या वर्गाने
जेव्हा एखाद्या वर्गाने दुसर्याला 'मुक्त' करायचे म्हटले की तिथेच आपण वर्गीकरणाला सुरवात करतो.
हेही पटत नाही.
मला काय म्हणायचेय ते विस्ताराने लिहायला बराच वेळ जाईल. थोडक्यात माझ्या लाडक्या अमेरिकन नेत्याचे लाडके वाक्य देतो "आय डोन्ट लाईक स्लेव्हरी सो आय डीनाय टु बी मास्टर'
त्याच चालीवर मला स्त्रीयांना वेगळे समजता येत नाही म्हणून मी त्यांना स्वातंत्र्य 'देऊ' शकत नाही. म्हणजे जर मी वेगळा, श्रेष्ठ नाही तर मग मी ते देणारा कोण?. एकदा का देणारा दाता आणि घेणारा गरजू ही भुमिका आली की कसलं आलंय स्वातंत्र्य आणि समानता?
स्त्री-मुक्ती या शब्दाला बदनाम करण्यात काय अर्थ आहे?
बदनामीचा प्रश्नच नाही. आगरकर फुल्यांच्यावेळी स्त्रीला मुक्ततेची गरज असेल - होतीच. तेव्हा तो शब्दप्रयोग उचितही असेल - होता. मात्र आता? आता ती परिस्थिती आहे का? का स्त्रीयांना केवळ मुक्ती या पायरीवरच रहायचं आहे. समानता बाणवून त्यायोगे येणारी जबाबदारी नको आहे? माझ्या मते असे नक्किच नाहिये. समानता हवी म्हणताना मुक्तीच्या पायरीवर राहुन कसे चालेल. मुक्ती हा बंडखोरपणा झाला (जो समाजाला हलवायला एकेकाळी उपयोगी होताच - पण किती काळ?) आणि समानता हा हक्क. तेव्हा ही 'मुक्ती' आता गैरलागू होत चालली आहे असे वाटते.
त्याच चालीवर मला स्त्रीयांना
त्याच चालीवर मला स्त्रीयांना वेगळे समजता येत नाही म्हणून मी त्यांना स्वातंत्र्य 'देऊ' शकत नाही. म्हणजे जर मी वेगळा, श्रेष्ठ नाही तर मग मी ते देणारा कोण?
ही फारच उच्च तात्विक भूमिका झाली. ज्यांना हा विचार करता येतो त्यांच्यासाठी स्वातंत्र्य देणं आधीच झालेलं असतं. 'हे अधिकार माझे, आणि तुझे एवढेच' असं वर्गीकरण करणाऱ्या भिंती आधीच मोडून पडलेल्या असतात. ज्यांच्याकडून अधिकार वाटप करण्याची अपेक्षा केली जाते, ते देणारे, श्रेष्ठ वगैरे नसून बळकवणारे, अप्पलपोटे वगैरे असतात.
एकाच समाजात अनेक सामाजिक वास्तवे (असे अनेकवचन करतात का? (जीभ दाखवत)) असताना मुक्तीची पायरी कधीच पूर्णपणे गैरलागू होत नसते, असे वाटते.
हे पूर्णपणे पटतं. बहुतेक वेळा परिस्थिती काय आहे याचा अंदाज अनेक जण आपल्या घरात व आसपास आपल्यासारख्यांच्याच घरात दिसणाऱ्या वास्तवावरून करतात. दुर्दैवाने किंवा त्यांच्या सुदैवाने म्हणा, विचारवंत हे सुशिक्षित असल्याने उच्चमध्यमवर्गीयांत येतात. त्यामुळे भारतातला स्त्री वर्ग एकजिनसी आहे, व तो आपल्याला आसपास दिसणाऱ्या स्त्रियांप्रमाणे आहे हे गृहितक अपुरं पडतं.
?
विचारवंत हे सुशिक्षित असल्याने उच्चमध्यमवर्गीयांत येतात.
याबद्दल साशंक आहे.
याबाबत काही खात्रीलायक विदा आहे काय? असे काही सर्वेक्षण झाल्याचे ज्ञात आहे काय? की ही केवळ एक अटकळ आहे?
(विचारांचा आणि शिक्षण, आर्थिक परिस्थिती - झालेच तर जात, धर्म, लिंग, वयोगट, यू नेम इट - यांचा काही अन्योन्यसंबंध नसावा, अशी माझी अटकळ आहे.)
जीवशास्त्रीय नियतवाद
स्त्रियांना(कमजोर वर्गाला)मिळाणारी असमान वागणूक जीवशास्त्रीय नियतवादाचे फलित असावी.
पण लेस्टर फ्रँक वॉर्ड म्हणतो "सामाजिक/अनैसर्गिक/मनुष्य-निर्मित असमानता दूर करून जनुकीय असमानतेप्रमाणे जिवांना त्यांची सामाजिक जागा शोधू देणे गरजेचे आहे" ते नक्कीच पटते.
चर्चा वाचायला उत्सुक
@ऋषिकेश
समानता म्हणजे(च) स्त्री-मुक्ती नव्हेच. पण स्त्री-मुक्ती ही समानतेच्या आधीची आवश्यक पायरी आहे. जोवर मानसिक गुलामगिरीतून सुटका होत नाही, तोवर तिथे पोचणार कसे? स्वातंत्र्य हे ज्याचे त्याने मिळवायचे असते वगैरे खरेच आहे. पण काही लोकांच्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या कल्पनेमध्ये - स्वतंत्र असण्याला अवकाश देईल अशी सामाजिक स्थिती निर्माण करण्यासाठीचे प्रयत्नही - अंतर्भूत असतात. जसे फुल्यांच्या वा आगरकरांच्या कामामध्ये होते. 'ज्याला हवे तो मिळवेल त्याचे स्वातंत्र्य' असे म्हणून ते जर स्वस्थ बसले असते, तर मी आज हे इथे खरडू शकले नसते.
उगीच स्त्री-मुक्ती या शब्दाला बदनाम करण्यात काय अर्थ आहे? समानता हे स्वप्न आहे. पण ते पाहण्यासाठी जी निरोगी मानसिक-सामाजिक-आर्थिक परिस्थिती आवश्यक असते, ती एका विशिष्ट सामाजिक घटकाला आज उपलब्ध नाही. ती ज्यांच्यापाशी आहे (त्यात स्त्री आणि पुरुष दोन्हीही आले) आणि ज्यांना अशा समानतेची आच आहे त्यांनी स्त्री-मुक्तीसाठी (स्त्रीला स्वातंत्र्य मिळवण्यास उद्युक्त करणारे काहीही असे इथे अभिप्रेत आहे) प्रयत्न केले, तर ते समानतेकडे जाणारेच ठरेल ना?