Skip to main content

अंगाई: आली ग निज

आली गं निज, सांगुया तिज, आता नको मज खेळायचे!
अशा या राती, मायेची कुस, किती दिस असे मिळायचे?


    जोजो गे जोजो, माझी सानुली, आता सार्‍यांनी निजायचे
    चंद्र ही झोपे, चांदणी निजे, कशाला आपण जागायचे?


लागताच गं, मजला डोळा, छानशी ही बाग दिसतसे
वेचाया फुले, खेळाया मुले, मग कसे गं झोपायचे?


    जोजो गं बाळा, मिटूनी डोळे, छानशी बाग स्वप्नी असे
    झोपून बघ, बागेत मग, फुलामुलांसवे हसायचे


आता जराशी, आली ग झोप, तरिही सारे बघायचे
डोळे गं माझे, जरा मिटता, लगेच नाही हं पळायचे


    नाही गं पिल्ला, सोडूनी तुला, नाही कुठेही हरवले
    मिटा शिंपले, झाकून मोती, निजेमधे खोल बुडायचे 


    अंगाई घरी, मंगाई गेली, आता सार्‍यांनी निजायचे
    चंद्र ही झोपे, चांदणी निजे, कशाला आपण जागायचे?



 

सानिया Fri, 09/03/2012 - 19:15

बरेच दिवस 'छोट्यांसाठी'चे जग शांत होते.

आली गं निज, सांगुया तिज, आता नको मज खेळायचे!

ऐवजी आली गं निज, सांगुया तिज, आता नाही मज खेळायचे! बरे वाटेल का?

अजून येऊ द्या.

राजेश घासकडवी Sat, 10/03/2012 - 22:21

सोपी शब्दयोजना आवडली. स्वल्पविरामांवर थोपटण्याचा ठेका धरता येतो हेही छान.
सानियांनी म्हटल्याप्रमाणे मज पेक्षा मला जास्त बरं वाटतं. मुळात हेतू नीज, तीजशी अनुप्रास साधण्याचा असावा. पण इतर ओळींमध्ये ते बंधन पाळलेलं नसल्यामुळे इथेही आवश्यक वाटत नाही.

ऋषिकेश Sun, 11/03/2012 - 11:17

सानियांनी म्हटल्याप्रमाणे मज पेक्षा मला जास्त बरं वाटतं

सानिया यांना खरड लिहिली होती, मात्र दुसरा तसा प्रतिसाद आल्यावर इथेच ती कल्पना लिहितो
==
अंगाईची कल्पना अशी आहे की बाळाला आई झोपवते आहे आणि बाळ झोपायला तयार नाहिये. डावीकडून सुरू होणारी कडवी बाळाची (बाळाच्या मनातली) आहेत आणि किंचित जागा सोडून थोडी उजवी कडे सुरू झालेली आईची. (अर्थात गाताना मात्र सारी अंगाई आईच गाणार आहे)
शेवटी आई बाळाला झोपवते व बाळ झोपल्याने त्याचे शेवटचे कडवे नाही .
पहिल्या कडव्यात, बाळाला झोपायचे नसल्याने, बाळ म्हणतेय की निज आली आहे, पण आता नको येऊस मला खेळायचे आहे

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 12/03/2012 - 00:13

In reply to by ऋषिकेश

अंगाई आवडली. आणि रचनेची ही कल्पनाही आवडली.

अंगाई वाचल्यावर ही अंगाई आईनेच म्हणायला हवी असं काही वाटलं नाही. :-)

सहज Tue, 20/03/2012 - 08:26

In reply to by ऋषिकेश

फा.फॉ. ११ मधे सगळेच एकसलग दिसते आहे
आली गं निज, सांगुया तिज, आता नको मज खेळायचे!अशा या राती, मायेची कुस, किती दिस असे मिळायचे? जोजो गे जोजो, माझी सानुली, आता सार्‍यांनी निजायचे चंद्र ही झोपे, चांदणी निजे, कशाला आपण जागायचे? लागताच गं, मजला डोळा, छानशी ही बाग दिसतसेवेचाया फुले, खेळाया मुले, मग कसे गं झोपायचे? जोजो गं बाळा, मिटूनी डोळे, छानशी बाग स्वप्नी असे झोपून बघ, बागेत मग, फुलामुलांसवे हसायचे आता जराशी, आली ग झोप, तरिही सारे बघायचेडोळे गं माझे, जरा मिटता, लगेच नाही हं पळायचे नाही गं पिल्ला, सोडूनी तुला, नाही कुठेही हरवले मिटा शिंपले, झाकून मोती, निजेमधे खोल बुडायचे अंगाई घरी, मंगाई गेली, आता सार्‍यांनी निजायचे चंद्र ही झोपे, चांदणी निजे, कशाला आपण जागायचे?

पण ऋ एन्जॉय!!!!!! :-)

पैसा Mon, 19/03/2012 - 19:52

>>मिटा शिंपले, झाकून मोती, निजेमधे खोल बुडायचे

हे फार आवडलं.