"सशाची शिंगे" : पुस्तक परिचय
खरं म्हणजे हे "स.शा.ची शिंगे" असं लिहायला हवं. "स.शा." हे समाजशास्त्र या शब्दाचं संक्षिप्त रूप आहे.
खूप खूप वर्षांपूर्वी - म्हणजे मी कदाचित सहावी सातवीत असेन - आमच्या वडलांच्या शाळेतले त्यांचे एक स्नेही एक मजेशीर पुस्तक घेऊन आले. पुस्तक त्यांच्याच संस्थेतल्या एका शिक्षकाने लिहिलेलं होतं. हे लेखकमजकूर होते इतिहासभूगोलनागरिकशास्त्राचे शिक्षक. म्हणजे समाजशास्त्र विषयाचे. अनेक वर्षं हा विषय शिकवताना शेकडो मुलांनी लिहिलेले वेगवेगळ्या परीक्षांतले पेपर्स त्यांनी तपासले असावेत. त्यांच्या हे लक्षांत आलं की अनेकदा माहित नसलेली उत्तरं तशीच कोरी सोडायच्या ऐवजी मुलं प्रचंड थापा मारत सोडवतात. ही सगळी उत्तरं प्रचंड मनोरंजक असल्याचं त्यांच्या लक्षांत आलं आणि मग त्यांनी त्यातली मासलेवाईक उत्तरं एका वहीत नोंदायला सुरवात केली. वही जसजशी भरत गेली तसतशी ती वही त्यांच्या मित्रवर्तुळात फिरू लागली. आणि हास्यकल्लोळाचा मध्यबिंदू ठरू लागली. मग केव्हातरी कुणा अन्य शिक्षकाच्या पुढाकाराने ती वही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. ते पुस्तक म्हणजे हे. सशाला नसलेल्या शिंंगांचं स्वरूप ज्याप्रमाणे कपोलकल्पित त्याप्रमाणेच इतिहास-भूगोलातल्या -
समाज शास्त्रातल्या - कुठल्याही गोष्टीचं शेपूट दुसर्या कशालाही जोडून बनवलेली ही सशाची शिंगंच.
लहानपणी जे निर्भेळ निरपवाद आनंदाचे - मुख्य म्हणजे घरातल्या वडीलधार्यांबरोबरच हास्यविनोद करण्याचे - जे काही क्षण होते त्यात हे पुस्तक त्या स्नेह्यांबरोबर घरातल्या व्यक्तींबरोबर जाहीर वाचल्याचा एक.
हे पुस्तक नंतर अर्थातच कुठे सापडलं नाही आणि तशी आशाही नव्हती. पण इंटरनेटावर पुस्तकप्रेमाच्या असंख्य गप्पा मारता मारता मी याबद्दल कुठेतरी बोललो होतो. आणि मग एके दिवशी एका मैत्रिणीने मला ते पुस्तक सापडल्याचं सांगितलं आणि मला ते पाठवलंसुद्धा.
ते पुस्तक वाचतानाची जाणीव नक्की काय होती ते शब्दांत सांगता येणं कठीण. त्यामागच्या भावना खासगी असल्याने त्याबद्दल फक्त निर्देश करता येईल; प्रदर्शन करणं योग्य होणार नाही. मैत्रिणीचा मी ऋणी आहे वगैरे म्हणणं कृत्रिम भासलं तरी ते खरं आहे नि सांगणं आवश्यक.
सामान्यपणे जेव्हा पुस्तकांबद्दल इथे मी (किंवा अन्य कुणी) लिहितो तेव्हा त्या पुस्तकाचं जाणवलेलं मूल्य साहित्यिक स्वरूपाचं असतं. या पुस्तकाचं तसं नाही. त्याचं स्वरूप बरंचसं वैयक्तिक आहे. त्यामुळे याबद्दलचं "रेकमेंडेशन" एरवी जसं त्रयस्थ भावनेनं देतो तसं इथे नाही. किंबहुना पुस्तक ग्रेट आहे असा कसलाच दावा नाही.
पुस्तकातल्या काही "सौंदर्यस्थळां"चे नमुने इथे देत आहे त्यातून पुस्तकातल्या मज्जेची कल्पना यावी.
काही मुक्ताफळांची उदाहरणं :
१. लोकांच्या मनावर बौद्ध धर्माची जागृत भावना निर्माण झाली व बौद्ध धर्माचा लोप झाला. (११)
२. बौद्ध धर्माचे तत्त्व : निर्गुण व निराधार देवाची प्रार्थना करावी. (११)
३. अशोकाने आपली प्रजा खूप मृत पावली याचा सूड घ्यावा म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला. (११)
४. रामायणमहाभारतात देवाधर्माच्या उच्चाटनाच्या गोष्टी वर्णन केल्या आहेत (११)
५. मुसलमानांनी दिवसातून एकदातरी नमाज पडावें व त्यासाठी प्रत्येकाने आपल्या कबरीत जावें असे त्यांचे तत्त्व आहे. (११)
६.अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या शिपायांचा पगार वजनाप्रमाणे ठेवला होता. (११)
७. मराठे हे स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करून लढत असतं. (११)
८. शाहू हे जेलातून सुटून आल्यावर त्यांनी आपले राज्य मागितले परंतु अहिल्याबाईने ते दिले नाही म्हणून त्या दोघांत चुरस निर्माण झाली (११)
९.नेल्सन रात्रंदिवस जहाजांची हेटाळणी करीत असे. (१०)
१०. कर्तव्य व पराक्रम यांचा त्याग करून नेल्सनने लढता लढता प्राण सोडला.
१. शिकंदर हा हिंदू धर्माचा होता व तो सर्व भारताचा रेजा होता. (५)
२. ब्राह्मण लोक बौद्ध धर्माचे होते म्हणून त्याचे महत्त्व व वर्चस्व वाढले.
३. नाडहब्ब या प्रसिद्ध गावात लोकरीच्या कापडाच्या गिरण्या आहेत.
४.भूपृष्ठ जसजसे थंड होत गेले तसतसे विषुववृत्तावर राहणारे द्रावीड लोक भारतात आले. ते सोने व इष्क या धातूंचा उपयोग करीत.
५.विद्यारण्य हा एक ग्रंथ आहे. हा ग्रंथ हरिहरबुक्काने लिहिला आहे. त्यांत राजकारणाची व युद्धाची माहिती आहे. हा ग्रंथ विजयनगरच्या राज्यास उपयोगी पडला.
६. कृष्णदेवराय तुघलक घराण्यातला मोठा पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने १९०५-१९२९ पर्यंत राज्य केले.
७. मोहेंजोदडो येथे रस्त्यावर काळोख असू नये म्हणून विजेचे दिवे लावले होते.
८. मोहेंजोदडो काळचे लोक रानटी अवस्थेत होते. त्यांना कशाचीही माहिती नव्हती. ते प्रथम प्रथम ओरडायला शिकले.
९ मोहेंजोदडोकाळी बायका निरनिराळ्या तऱ्हेचे दागिने घालून इकडून तिकडे उगाच नाटत असत.
१०. झरत्रुष्ट्र हा ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ आहे.
११. हिंदू व बौद्ध धर्म यांचे प्रस्थ खूपच वाढले व त्यामुळे दोगात भांडणे होऊ लागली व त्याचा परिणाम अफा झाला की त्यांच्यातून मुसलमान हा नवीनच धर्म स्थापन झाला.
- महम्मद पैगंबराने मक्का येथील अरबांची देवळे फोडून आपली देवळे बांधली.
- बहामनी राज्याची स्थापना हरिहर बुक्क या दोन भावांनी केली.
- अकबर हा बौद्धधर्मीय होता. त्याने बौद्ध धर्माची स्थापना केली.
- औरंगजेबाने 'सिटी ऑफ गॉड' हा ग्रंथ लिहिला.
- शेरशहाने अनेक रेल्वेमार्ग काढले.
-अकबरानंतरच्या पडत्या काळात एलिझाबेथने राज्य सावरले.
- राजाचे नाव मयूर म्हणून त्याच्या सिंहासनाला मयूर सिंहासन म्हणतात.
- हम्मुरबी हा एक माकड आहे. या पृथ्वीवर हा पहिला माकड आहे.
- पानिपतची पहिली लढाई फ्रेंच व इंग्रज यांमधे १७७७ साली झाली.
-राणीचा जाहीरनामा म्हणजे झाशीच्या राणीने आपल्या पदाचा दिलेला राजीनामा.
शीर्षक : "सशाची शिंगे"
लेखक : गो ज सामंत
आनंद प्रकाशन
प्रकाशन वर्ष १९७१.
समीक्षेचा विषय निवडा
मस्तय हे . खपतात हो बऱ्याच
मस्तय हे . खपतात हो बऱ्याच थापा .
ओळखीच्या एका थोर युवकाने सोशिओलॉजि च्या पेप्रात कुठलीशी थिअरी लिहिताना "हि थिअरी डॉ शेल्डन कूपर आणि डॉ लेनर्ड यांनी मांडली असे लिहिले . तपासणाऱ्याने त्यावर टिक मार्क केला होता . पेपर आल्यावर विजयोन्मादात 'बघा काहीही खपतं 'असं म्हणून मला पेपर दाखवला . ( त्यानंतर मी त्याला मा. आदूबाळ यांनी कुठंही लिहिलेली पेपर लिहिण्याची ' खुंटा मेथड 'वगैरेच सांगून माझे ज्ञान पाजळले )
सध्या काय वाचताय ची लक्ष्मणरेषा
नेमकी काय .?
एसी ने खाणे ,बघणे,वाचणे ला एक एकच कोनाडा सेपरेट नेमून मुख्य महामार्ग हा महत्त्वाच्या विषयाभिव्यक्तीस मोकळा ठेवतांना एक महान आदर्श एक शिस्त मसं समोर ठेवला होता. त्यातीलच मनातलं छोटे विचार या पासुन इतर मसं नी चक्क प्रेरणा ही घेतली. मुख्य महामार्ग चिल्लर कीरकोळ खासगी आवडी निवडीच्या फेसबुकीय कायप्पीय पातळींवर न घसरतां महामार्ग वरील मंथनातून समाज परीवर्तन घडवणारे विचारमंथन व्हावे इ वेगळेपण दाखवणारे महान हेतु एक गहन विचार या मागे नक्कीच होता. आज हे सर्व संकेत परंपरा पायदळी तुडवले जात असल्याचे बधतांना जाणवते केवळ निराशा .
मसं नी प्ेरणा तरी कुठून घ्यावी ?
मसं तील सत्यकथे ने असे वागले तर दर्शवतां जत्रां चे कसे होणारं ?
आणि एकच प्रश्न वारंवार मनांत येतो
विंजीनीयर तुम्हीसुध्दा ?
दुसराही येतो
असे वागुन आपल्याकडे आशेने पाहत असलेल्या विश्वासमोर आपण काय आदर्श ठेवणार ?
असो
मोग्याम्बो खुश हुवा मधल्या
मोग्याम्बो खुश हुवा मधल्या मोग्याम्बोचा जन्मच 1987 सालचा आहे.** आणि नव्वदीपूर्व काळात राष्ट्रपित्याबद्दल असे आचरट उद्गार काढणं हे एक कानसुलात बसायला कारक ठरत असावं.
त्यामुळे हे काव्य नव्वदीतल्या बालपिढीच्या गटारमुखातून जन्माला आलेलं असणं स्वाभाविक आहे.
**याच सिनेमाने नव्वदीतल्या बालपिढीला "मिस्टर इंडिया होणे" म्हणजे नाहीसा होणे हा वाक्प्रचारही पुरवला होता.
असेच काही नाही...
आणि नव्वदीपूर्व काळात राष्ट्रपित्याबद्दल असे आचरट उद्गार काढणं हे एक कानसुलात बसायला कारक ठरत असावं.
असेच काही नाही. आमच्या वेळेस (बोले तो आम्ही पुणे ३०मध्ये माध्यमिक शाळेत ते हायस्कुलात असताना - सर्का १९७५-८१दरम्यानच्या काळात) प्रचलित काही बापूगीतांच्या तुलनेत उपरोद्धृत अपकाव्य हे नको तेवढे सोज्ज्वळ मवाळ इ.इ. आहे. (पुढील पांढऱ्या ठशातील मजकूर स्वत:च्या जबाबदारीवर वाचावा. 'ती पहा, ती पहा बापूजींची डावी गोटी, उजवीपेक्षा थोडी मोठी, मध्ये उभा जगज्जेठी' इ.इ. हे झाले अपकाव्य. मूळ काव्य मला वाटते 'ती पहा, ती पहा बापूजींची प्राणज्योती' की कायसेसे आहे. जाऊ दे, कोणी ऐकलेय!)
हे झाले बालगीतांचे. त्याव्यतिरिक्त, राष्ट्रपित्याचा दु:स्वास करणारी आणि खाजगीमध्ये त्याचा उल्लेख 'बुढ्ढा' असा करणारी (आणि बहुधा आपल्या पोराबाळांनाही ते बाळकडू पाजणारी) आबालवृद्धांची एक मोठी सनातन आणि पारंपरिक कॉन्स्टिट्यूअन्सी होती. आमच्या महाविद्यालयीन वसतिगृहाच्या दिवसांतील (सर्का १९८३ ऑनवर्ड्स) आमच्या एका सहाध्यायाने 'हे राम!' या उद्गारांमागील (तथाकथित) रहस्यस्फोट करणारी एक (कपोलकल्पित) कथा आम्हांस सुनावली होती, ती खाली अॅज़ फार अॅज़ फेलिंग मेमरी पर्मिट्स मूळ शब्दांबरहुकुम देण्याचा प्रयत्न करीत आहोत. (अर्थात पांढऱ्या ठशात. मजकूर नेहमीप्रमाणेच स्वत:च्या जबाबदारीवर वाचावा.)
'तर काय झालं, की तिथून बुढ्ढा नेहमीप्रमाणे दोन पोरींच्या खांद्यांवर हात टाकून येत होता. नथुरामानं जाऊन त्याला प्रथम नमस्कार केला. बुढ्ढ्याला वाटलं, 'वा वा वा, आपल्याला नमस्कार करतोय.' म्हणून तो पुढे आला, तर यानं पिस्तुल काढून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. तर बुढ्ढ्याला त्याचा राग आला आणि त्याला रागानं म्हणायला निघाला, "हरामजादे!" पण हे म्हणत असताना वेदनेमुळे शब्द तोंडातून वेडेवाकडे आले, नि "हराम..." एवढंच म्हणून झाल्यावर मरून पडला. तर पब्लिकनी "हे राम" म्हणाला म्हणून उठवून दिलं झालं.'
(बहुधा कौटुंबिक/अन्य खाजगी मौखिक परंपरांतून/द्राक्षवेलींतून असल्या गोष्टी प्रसृत होत असाव्यातसे वाटते. अन्यथा, 'बौद्धिकां'तून असे एखादे मौक्तिक जाहीररीत्या ऐकावयास मिळण्याच्या शक्यतेबद्दल साशंक आहे. असो.)
(अवांतर: उपरोल्लेखित कॉन्स्टिट्यूअन्सी ही प्रामुख्याने पुणे-३०, पुणे-२ आदि भागांत विखुरलेली आहे, असे म्हणण्याचा मोह अनावर होतो खरा, परंतु तसे कथन करणे हे सत्याचा अपलाप तथा सत्याशी प्रतारणा ठरेल. उपरोद्धृत कथा आम्हांस सुनावणारा आमचा सहाध्यायी हा उपनगरीय मुंबई क्र. ६३ (गोरेगाव पूर्व) मधील होता. तर ते एक असो.)
त्याशिवाय, महात्मा गांधी आणि मधुबाला यांचा सुरस आणि चमत्कारिक किस्सा (ज्यात सपोर्टिंग क्यारेक्टर्स म्हणून प्रामुख्याने नेहरू आणि एक्स्ट्राज़ म्हणून आपल्याला हवे ते दोन नेते - टिपिकली टिळक आणि सावरकर - येतात) ऐकला असेलच. आम्ही हायस्कुलात असताना ऐकला होता. तसा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचलित किस्सा असावा - म्हणजे, नेसेसरिली बापू आणि मधुबाला यांच्या संदर्भातच नव्हे, पण ब्रिजिट बार्दो आणि ब्रेझनेव्ह, किंवा कोणतीही प्रसिद्ध लैंगिक स्त्री आणि कोणताही शारीरिकदृष्ट्या रिपल्सिव्ह राजकीय नेता, अशा विविध आवृत्त्या खपतात.
त्याच धर्तीवर, 'मजबूरी का नाम महात्मा गॉंधी' हा उत्तरेत - विशेषत: दिल्लीच्या बाजूस - प्रचलित मुहावरा आपण ऐकला असावा किंवा कसे, कल्पना नाही. आम्ही तो महाविद्यालयीन दिवसांत ऐकला होता. त्यास काही लैंगिक कनोटेशन्स आहेत, हे जाताजाता सुचवू इच्छितो.
सांगण्याचा मतलब, नव्वदीपूर्व काळ हा आजच्या तुलनेत (किमान गांधीजींच्या बाबतीत) सोवळ्यातला होता, अशी जर आपली समजूत असेल, तर ती सपशेल चुकीची आहे, असे निदर्शनास आणू इच्छितो. उलटपक्षी, कालौघात गांधीजींचा समाजमनातील ठसा धूसर होत जाऊन आजमितीस त्या आचरट्याची धार बोथट झाली असण्याची - आणि एकंदरच समाज गांधीजींप्रति अधिक टॉलरंट झाला असण्याची - शक्यता मला दाट वाटते.
इत्यलम्|
कदाचिदपि शशविषाणम्
यावर्षी एवढीच सापडली. पुढील भाग आता सहा महिन्यांनी.
प्रवेशपरीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासताना अधिक मजेशीर शिंगं सापडतात. यावर्षीच्या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न ठेवून प्रशासनाने आम्हाला कडक उन्हाळ्यातील गारव्यापासून वंचित ठेवलं.
दर वर्षी प्राप्त झालेल्या मौलिक शिंगांचा साठा करून ठेवीन म्हणते.
कदाचिदपि शशविषाणम्
कदाचिदपि शशविषाणम्
हे सुभाषित अगोदर माहिती नव्हते. धन्यवाद. नेटवर शोध घेतला असता खालील ओळी सापडल्या.
कदाचिदपि पर्यटन् शशविषाणम् आसादयेत्'|
न तु प्रतिनिविष्ट मूर्खजनचित्तमाराधयेत् ||
हे भर्तृहरीचे आहे असे दिसते. नक्की कुठल्या शतकात आहे ते पाहिले पाहिजे.
"कधी हिंडताना सशाचे शिंगही दिसेल, परंतु स्वत:हून मूर्खाचे हृदय/चित्त/मन मात्र सापडणार/ऐकणार नाही."
वामनपंडितांनी याचे भाषांतरही केलेले आहे.
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे |
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे ||
सशाला दिसे विपिन फिरता शृंगही जरी |
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी ||
मुळातले वृत्त = पृथ्वी, वामनपंडितकृत श्लोकाचे वृत्त = शिखरिणी.
ल गो विंझे कृत शतकत्रयीच्या भाषांतरात मात्र मूळ वृत्त नेहमीच सांभाळलेले आहे.
=))
=))
सारच भारी; पण हे विशेष्ह महा लोल --
"मोकलाया" नंतर इतका निर्मळ निर्भेळ आनंद प्रथमच मिळाला :)