Skip to main content

साफसफाई एक समृद्ध प्रयत्न

घरातील अडगळ झटकताना उडालेली सुवर्णधूळ, झगमगून
टाकत खिडकीपुढला आसमंत, गुदमरवून
टाकत फुप्फुसाकाश, कोंडला
अनंत प्राचीन श्वास, ढकलत कासावीस प्राण.

सूर्यशक्तीचे तेजान्न घेऊन
उधळणारी हिरण्यधूळ, विखुरते
घनमेघांकृतीतून
होऊदे तुझा तेजोभंग येताच
कल्लोळ्हुंकार व्हॅक्यूम क्लीनरचा.

हे वेड्या व्हॅक्यूमक्लीनरा,
सुवर्णधूळरूपी अन्न घराच्या कानाकोपर्‍यामध्ये विखुरले आहे,
ते तुला खाता येत नाही, कारण
आता वीज गेली आहे.

--लिखाळचंद्र

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 27/02/2012 - 01:04

लिखाळचंद्र यांनी इतरांच्या डोक्यातली धूळ साफ करायला घेतली आहे असं वाटलं. खरंतर त्या निमित्ताने कवितेचे रसग्रहणच लिहीणार होते,
ते लिहीता येत नाही, कारण
आता वीज गेली आहे.

ऋषिकेश Mon, 27/02/2012 - 09:38

हा हा हा!
आता कस स्वच्छ स्वच्छ वाटतंय! असं लिहिणार होतो पण अरेरे वीज गेलीच का!

ऐसी वर मनःपूर्वक स्वागत! :)

अनंत ढवळे Mon, 27/02/2012 - 21:31

मुळ कविता ओळखीची वाटते :)

राजेश घासकडवी Thu, 01/03/2012 - 19:21

फुप्फुसाकाश गुदमरणे, हिरण्यधूळ, कल्लोळहुंकार वगैरे भन्नाट.

तुमच्या लेखणीवरची धूळ झटकून थोडी समृद्ध अडगळ आमच्या वाट्याला दिलीत हे आमचं परमभाग्य.

लिखाळ Thu, 01/03/2012 - 19:45

स्वागतकेल्याबद्दल, सूवर्णकणांची दखल घेतल्याबद्दल आभार.

मराठीमधल्या दोन प्रसिद्ध पुस्तकांच्या सुरवातीच्या काही ओळी वाचून या कवितेची स्फूर्ती आली हे जाणकारांच्या ध्यानात आलेच असेल. असो .

वरील कविते सारखे अनेक धुलीकण उधळतात. खिडकीपुढले आसमंत व्यापतात, प्रकाशामुळे थोडावेळ चमकतात आणि शेवटी व्हॅक्यूमक्लिनरच्या कुशीत विसावतात, त्यांचे थर साठतात. असाच एक नवा थर साठणार इतकेच :)