Skip to main content

नातीगोती- (ब्रह्मघोटाळा या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण) - १

ललित

नातीगोती- (ब्रह्मघोटाळा या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण)

लेखक - ज्युनियर ब्रह्मे

नातं या शब्दाशी गोतं या शब्दाचं कसंकाय नातं जुळलंय कुणास ठाऊक. कदाचित 'गोत्यात आणतात ती नाती' असा कर्मधारय (की बहुव्रीही?) समास कुणातरी चतुर माणसानं योजला असावा. किंवा गोणत्यात नेऊन भरून सोडावीत ती नाती अशी मूळ व्याख्येतल्या 'ण'चा कालौघात लोप होऊन हा शब्द बनला असावा. काहीही असलं तरी नाती गोत्यात आणतात हे लक्षात ठेवावं. आता, आमच्याच नातेवाईकांच्या ह्या गोष्टी पाहा ना!

*****

ब्रह्मेवाडा : पहिला मजला : मोठ्या (नक्षलवादी) काकांची खोली.
पात्र- काका (एक नग), काकू (एक नग) आणि बंगाल (केवळ उल्लेखापुरता)

काकू : कॅमोन? इतक्यात आलात परत? आणि हे काय? खॉली थॉइली?
काका : काय आणायचं होतं गं?
काकू : घ्या, म्हणजे तेच लक्षात नाही! कुठंतरी दुसरीच काहीतरी गोष्ट बघत गेला असाल.
काका : आता आणखी कशाला दुसरी बघू? एक आहे तीच सांभाळता-सांभाळत नाही!
काकू : तरीपण लक्ष बाहेरच तुमचं. परवा कसे काय ट्रकला जाऊन धडकलात हो?
काका : ट्रकला नाही धडकलो मी…
काकू : खोटं बोलू नका. मला माहितेय त्या स्कूटीवालीला कट मारतामारता ट्रकला धडकलात.
काका : अगं, तो मिलिट्रीचा ट्रक होता. त्यांच्या बंदुका बघून तोंडाला पाणी सुटलं, त्यामुळं पाय घसरला.
काकू : तर तर… मला सांगताय! त्या स्कूटीवाल्या सटवीला अंगावर घेऊन कसे पडलात मग?
काका : अगं, ती स्कूटीवालीच माझ्या येऊन अंगावर पडली तर त्याला मी काय करणार?
काकू : तुम्हीच डोळा मारून तिला खुणावलं असणार!
काका : मी कशाला डोळा मारेन? उभ्या आयुष्यात तुला तरी कधी डोळा मारलाय का?
काकू (वेडावून दाखवत) : म्हणे मला डोळा मारला नाही कधी! अंगभर बँडेज असताना मी दिसले की टुणटुण उड्या मारायचात ते?
काका (रहस्याची पुडी सोडत) : …तेव्हा मी तुला बघून पळून जायचा प्रयत्न करत असायचो.
काकू : पळपुटे बाजीराव कुठले!
काका : हो बाई, मी पळपुटा आणि तू शूर सिराजउद्दौलाची वंशजच ना?
काकू : काढलंत का शेवटी बंगालचं नाव? अहो, आम्ही बंगाली माणसं होतो म्हणून तुम्ही पळपुटे लोक स्वतंत्र झालात. नाहीतर बसला असतात अजून तसेच गोर्‍या साहेबाची चाकरी करत!
काका : शक्य आहे. बंगाली माणसांचं इंग्लिश ऐकून इंग्रज पळाला असेल...
काकू : आमच्या इंग्लिशबद्दल बोलू नका. इंग्लंडमध्ये बोललं जात नसेल इतकं प्युअर इंग्लिश बोलतात आमच्याकडे.
काका : … म्हणून ते कुणालाच कळत नाही.
काकू : तुम्हांला कळत नसेल म्हणून तुम्ही मिश्या फेंदारताय.
काका : मिश्या आहेत म्हणून फेंदारतोय ना! तुमच्या बंगाली लोकांत कुणाला मिश्याच नसतात, तरीपण जिथंतिथं नाक फेंदारत असतात…
काकू : का? का? रोबीन्द्रनाथांना एवढी मोठी हातभर दाढी होती ते? ते बरं विसरलात?
काका : दाढी विसर. मिशी असणं पुरुषार्थाचं लक्षण आहे.
काकू : थापा मारू नका. दाढी असणं हे पुरुषार्थाचं खरं लक्षण मानतात.
काका : आणि टक्कल असणं कशाचं लक्षण मानतात बंगालमध्ये?
काकू : तरी म्हटलं माझ्या टकल्या काकांचा उद्धार का झाला नाही अजून?
काका : उद्धार करायला तुझा काका काय अहिल्येसारखा पतित आहे का?
काकू : उगाच काहीही बोलू नका. पेलेनंतर फटीकबाबूंचाच नंबर लागतो असं म्हणतात बंगालमध्ये.
काका : पिल्यानंतर?
काकू : पेलेनंतर! पेले म्हणजे फूटबॉलमधला ब्रह्मे.
काका : अस्सं होय? मग नंतर कशाला, आधीच लावा म्हणावं नंबर. कसल्या, रेशनच्या रांगेतला नंबर आहे का हा?
काकू : टिंगल करू नका. काका इतके प्रसिद्ध आहेत की त्यांच्या शाळेत पेलेच्या फोटोशेजारी काकांचा फोटो लावलाय.
काका : हार घालण्यासाठी? की नेमबाजीची प्रॅक्टिस करण्यासाठी?
काकू : करा चेष्टा. लोक तुम्हांला फटीकबाबूंचा जावई म्हणून ओळखू लागतील ना तेव्हा त्यांची महती कळेल तुम्हांला.
काका : हे बघ, तसंही आजवर लोक मला ज्युनियर ब्रह्मेचा मोठा काका, सम्राट ब्रह्मेचा मोठा भाऊ, व्लादीमिर ब्रह्मेचा मुलगा, एलिझाबेथचा थोरला भाऊ, आणि एका वेडसर बंगाली बाईशी लग्न केलेला ब्रह्मे, नक्षलवादाचा पुण्यातला उगवता लाल तारा अशा विविध नावांनी लोक ओळखतात. ते सगळं चालतं. पण त्या फाटक्या माणसाशी कुणी माझा संबंध जोडला तर मी ते खपवून घेणार नाही.
काकू : आणि मीपण माझ्या काकांच्या टकलाबद्दल बोललंत तर खपवून घेणार नाही. 'टक्कल तिथं अक्कल' अशी म्हण आहे आमच्याकडं.
काका : असं का? म्हणजे डोक्याच्या मध्यभागी तेवढी अक्कल आणि कडेकडेनं मूर्खपणा असा प्रकार आहे का तुझ्या काकांचा?
काकू : पुन्हा टिंगल? काकांना हे कळलं तर एका बनाना किकमध्ये तुम्हांला सरळ करतील.
काका : तुझ्या काकाला बाईकला धड किक मारता येत नाही. मागच्या वेळेस आला होता तेव्हा किक मारायला जाऊन मंडईत गाडी अंगावर पाडून घेतली होती. अख्खी मंडई हसली होती. हसण्याच्या नादात भाजीवालीनं कोथिंबीर जुडी फुकट दिली होती. ते पाहून रागानं बस पेटवायला होता तो वेडपट म्हातारा. नंतर पुढचे चार महिने भाजीवाल्या बायका मला पाहिलं की चोरून खुसूखुसू हसायच्या.
काकू : त्यांचं तरी काय चुकलं? तुम्हांला बघून कुणालाही हसू येतंच.
काका : हसू लग्न केल्यामुळं झालंय.
काकू : हो, हो. लग्नाआधी तुम्ही जसे मोठे नेपोलियॉन बोनापार्ट होतात.
काका : जाऊदे. बाजाराचं बोल. नेपोलिअनला जोसेफिन असली बाजाराची फालतू कामं सांगत नव्हती.
काकू : आणि नेपोलिअनपण लढायला जाताना कुठं लढायला जायचंय ते विसरत नव्हता.
काका : मुद्द्याचं बोल. बंगाली आहेस म्हणून दरवेळी असंबद्ध बोललंच पाहिजे असं नाही.
काकू : बोलतच होते. तुम्हीच विषयांतर केलंत. तुम्हां मराठी लोकांना उठसूट बंगालचं नाव काढल्याशिवाय चैनच पडत नाही ना. आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात हे लक्षात ठेवा.
काका (हात जोडण्याची ॲक्शन करुन) : हो माझे आई, चुकलो मी. आता काय लक्ष्मीमाता कमळावर उभी राहते तशी मला आडवा पाडून माझ्या अंगावर उभी राहणार आहेस का?
काकू : लक्ष्मी नव्हे काली! आणि ते कमळ नसतं तर तो राक्षस असतो. शिवाय तो तुमच्यासारखा निवांत लोळत पडलेला नसतो तर कालीदेवीनं त्याचं मुंडकं उडवलेलं असतं.
काका : डिटेल्स आर नॉट इम्पॉर्टंट.
काकू : हे पहा, मला इंग्लिशमधून बोलायला भाग पडू नका.
काका : नाही भाग पाडत दुर्गादेवी. बाजारातून काय आणायचं होतं ते सांग.
काकू : वाटलंच होतं, तुम्ही विसरणार म्हणून…
काका : मग चिठ्ठीवर लिहून द्यायचं ना…
काकू : दिलं असतं. ती चिठ्ठी तुम्ही आणखी कुणा स्कूटीवालीला नेऊन द्याल. तुमचा काय भरवसा?
काका : आजपर्यंत खंडणीची सोडली तर कधी कुठली चिठ्ठी लिहीलीय का मी कुणाला? काहीतरीच तुझंपण.
काकू : होक्का! आणि कँपवर असताना मला चोरून पत्र लिहिलं होतंत ते? काय म्हणे तर चारू गं चारू, दे मला दारू…
काका : अगं, पण मी तर बंदुकीची दारू मागत होतो.
काकू : पत्र लिहिलं होतंत की नाही हा मुद्दा आहे. दारू बंदुकीची, प्यायची का फटाक्यांची हा मुद्दा गैरलागू आहे.
काका : बरं. आणायचं काय होतं ते सांग.
काकू : विसरलो होतो हे मान्य नाही केलंत अजून.
काका : विसरलो बाई. सपशेल विसरलो. झालं आता समाधान?
काकू (एकदम सूर चढवत) : असे कसे विसरलात? उद्या मलापण विसराल का?
काका : मी लाख विसरेन गं. तू विसरू देशील का मला?
काकू (दातओठ खात) : म्हणजे मला विसरायची इच्छा आहे, पण धाडस होत नाही. होय की नाही?
काका : तसं नाही गं माझ्या कॉम्रेडिनी. तुला एकदा पाहिल्यावर तुला विसरणं शक्य होत नाही.
काकू : कुणी सांगावं, मला विसरून अजून त्या मल्याळी बाईच्या मागे फिरत असाल.
काका : अगं, ती नवऱ्याबरोबर गेली वीस वर्षं कुवेतमध्ये राहते आहे. तिच्यामागं इतक्या लांब कशाला जाईन मी?
काकू : अच्छा! म्हणजे इथपर्यंत तिची खबरबात ठेवता तर.
काका : नाही गं, इराक युद्धातले रणगाडे स्वस्तात विकायला काढलेत, तर काही घेऊन ठेवू का म्हणून विचारायला तिनंच परवा फोन केला होता.
काकू : हो, घ्या घ्या, रणगाडे घ्या. म्हणजे रणगाड्यातून एकमेकांना चिठ्ठ्या पाठवायला मोकळे ना तुम्ही.
काका : तू मला बाजारातून काय आणायला सांगितलं होतंस त्याबद्दल बोलत होतो ना आपण?
काकू : हो. भाजी आणायला सांगितली की रणगाडे आणतायेत. परवा क्यापशिकोम लिहिलं होतं तर ते लेटूश असं वाचून बॉन्धाकोपि घेऊन आलात. तुमचं सगळं लक्ष त्या चिठ्ठ्या पाठवणाऱ्या स्कूटीवालीकडंच ना.
काका : कोण स्कूटीवाली? ती काळी की गोरी तेपण माहीत नाही. फक्त जी होती ती भलतीच वजनदार होती.
काकू : म्हणजे तिला अंगावर घेऊन पडलात ना? तरीच… तरीच, तिचा स्पर्श झाला त्या भागाला मला हात लावू देत नव्हता काय?
काका : तुला काय, दोन दिवस मलाही हात लाववत नव्हता. ते जाऊदे, काय आणायचं आहे ते सांगणार आहेस का? की तसाच मंडईत जाऊ?
काकू : आधी असे कसे विसरला ते सांगा.
काका : ते कसं सांगता येईल? कसं विसरलो ते आठवून लक्षात ठेवायचं असतं का? एवढी उलटतपासणी करण्याऐवजी मला लिहून का दिलं नाहीस तू? मी विसरतो हे विसरली होतीस का?
काकू : तुम्ही विसरणार हे माहीत होतं. म्हणून तर तुम्हांला गाणं म्हणत जायला सांगितलं होतं.
काका : यादी विसरू नये म्हणून गाणं म्हणायचं? काय गं, बंगालमध्ये हेडरची प्रॅक्टीस जोरात चालते वाटतं?
काकू : फालतू बडबड करू नका. गाणं कोणतं म्हणायला सांगितलं होतं ते विसरलात का?
काका : नाही. चांगलं आठवतंय.
काकू : मग सांगा, त्याचं पहिलं कडवं म्हणून दाखवा बघू.
काका : का? इथं काय गाण्याचे क्लास उघडायचे आहेत का?
काकू : तुमचं गाणं ऐकून परवा जोशांना त्यांची कुत्री रडतात असा भास झाला होता. ते सोडले बाकी कुण्णी घाबरत नाही तुमच्या आवाजाला. म्हणा बिनधास्त!
काका : (घसा खाकरून) आकाश काँदे हताशासम… नाई जे घूमे नोयोने मम…
काकू : बघा, बघा, ब्योमकेशबाबू बोक्षी… पहिल्या ओळीतच काय आणायचं ते सांगितलं आहे.
काका : म्हणजे कांदे? अरे देवा! काय हे? गाणी म्हणून कांदे आणायची वेळ आलीय?
काकू : एलिभेंटोरी, माय डिऑर होम्ष.

*****

3.166665
Your rating: None Average: 3.2 (6 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

हा खरा दिवाळी अंक लेख झाला

हा खरा दिवाळी अंक लेख झाला बुवा!

मस्त

मस्त

मस्त जमलाय लेख! पुस्तक नक्की

मस्त जमलाय लेख!
पुस्तक नक्की वाचणार!

बेस्ट!

मस्त मजा आली वाचताना!

ती तोफेच्या गोळ्या बांधुन चिठ्ठी पाठवायची आयड्या तर अफलातुन

मस्त जमलय ! ती तोफेच्या गोळ्या बांधुन चिठ्ठी पाठवायची आयड्या तर अफलातुन . Big smile